हरणेश्वराय नम:

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
28 Jun 2017 - 8:01 am

हरणेश्वराय नम:

“जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून" स्व:ताच्या डोळ्यातील अश्रू पुसत, हुंदके आवरत सीतामाई कडाडल्या. “स्व:ताच्या मोहक रंगरुपाने मला फसवलेस, रावणासारख्या दुष्ट व्यक्तीला मदत केलीस आणि माझ्या नशिबी माझ्या प्रिय पतीचा विरह लादलास त्याबद्दल मी तुला कदापि क्षमा नाही करणार.”
“माई, माझी बाजू तर ऐकून घ्या” तो मृगाधीपती सांगण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला मध्येच अडवत सीतामाई पुनः कडाडल्या.
“कसली बाजू ? हेच ना की मला तुझ्या रुपाने भुलवलंस, मला मोहात पाडलंस आणि मी मोहात पडले” डोळ्यातील अश्रू पुसत सीतामाई संतापाने ओरडल्या. “जा, आता हेच तुमच्या भाळी लिहिले आहे. ह्या तुमच्या रुपापायी सत्ययुगापासून जगाच्या अंतापर्यंत, सगळ्यांना तुमची भुरळ पडत राहील आणि तुमची मृगया होत राहील. अन्य श्वापदे तुमची शिकार करतील, एव्हढेच नव्हे तर अहिंसक, पापभिरू, सरळ स्वभावाचे ऋषीमुनी देखील तुमचेच कातडे बसण्यासाठी, निद्रेसाठी उपयोगात आणतील. शिकारी तुमची शिकार करतील, कलियुगी धनवान व्यक्ती, तुमच्या मृत शरीरात पेंढा भरून आपल्या दिवाणखान्यात मांडतील, तुमची शिरे कापून भिंतीवर लटकवतील. इतकेच नव्हे तर काही सिनेकलाकार तुमची दिवसा ढवळ्या शिकार करतील आणि न्यायालये त्यांना मोकाट सोडतील. जा, जा, हीच तुमची शिक्षा आहे”
“नको, नको, नको माई, अशी कठोर शापवाणी नका उच्चारू. ह्यात आमची काहीच चूक नाही, आम्ही निरपराध आहोत” डोळ्यात आसवे आणून त्या मृगाधिपतीने सीतामाईच्या पायी लोळण घेतली. “तो कांचनमृग आमच्यापैकी नव्हताच. तो त्या लंकाधिपती रावणाचा मामा मरीच होता, त्याने आमचे मायावी रूप धारण करून आपल्याला फसवले”.
“काय ?” आश्चर्यचकित होत सीतामाई उद्गारल्या. रावणाच्या अशोक वाटिकेत, राक्षशिणींच्या कडेकोट पहाऱ्यात, आपली बाजू मांडायला तो मृगाधीपती अवतरला होता. आपल्या काळ्याभोर टपोऱ्या नयनात आसवं आणून तो आपली बाजू मांडत होता.
“मग, लक्ष्मणा धाव, सीते धाव” असा आर्त पुकारा कोणी केला ? सीतामाईंनी साशंकतेने विचारले.
“माई, मारीच मामाने तुम्हाला फसविण्यासाठी कांचनमृगाचे मायावी रूप घेतले, त्याला तुम्ही स्त्री-सुलभ मोहाने भुललात आणि प्रभू रामचंद्रांना त्याला पकडून आणण्यासाठी पाठवलेत. जेव्हा प्रभू रामचंद्रानी त्याला बाण मारला त्यावेळी त्याने प्रभू रामचंद्राच्या आवाजात तुम्हाला, लक्ष्मणाला साद घातली. लक्ष्मणाचा प्रभू रामचंद्रावर विश्वास होता, पण तुम्ही त्यांना ना ना तऱ्हेची दुषणे देऊन, निर्भत्सना करून प्रभू रामचंद्रांच्या मदतीला जायला भाग पाडलेत व त्या नीच रावणाने डाव साधला. ह्या सर्व प्रकरणात आम्ही मात्र हकनाक बळी गेलो" डोळ्यातील आसवे टिपीत तो मृगराज उत्तरला.
“खरंच का मृगराज ? हे सर्व असेच घडले का ? हो, असेच घडले असणार, म्हणून तर मी आज ही इथे माझ्या प्राणनाथांपासून दूर येऊन पडले आहे” व्याकुळ होत सीतामाई म्हणाल्या. “मृगराज, मला क्षमा करा. माझ्या अविवेकी वागण्याने मी सर्वांना त्रास दिला, तुम्हाला सारासार विचार न करता शाप दिला, मला कुपया क्षमा करा, मीच खरं तर दोषी आहे"
“माई, हे सर्व नियतीचे खेळ आहेत, चूक कोणाचीच नाही, आपण सर्व त्या जगन्नियत्याच्या हातातली कळसुत्रे आहोत. आपण तर शापवाणी उच्चारलीत, आता कृपया उशाप देऊन आमच्या पुढील पिढीची सुटका करा.”
“मृगराज, तुमचे मन मोठे आहे, माझ्या ह्या अविवेकी आणि आततायी वागण्याने मी तुमच्या पुढील पिढीला दु:खात लोटले पण दुर्दैवाने आता त्यापासून सुटका नाही. तरी देखील मी एक उशाप देते तो नीट लक्ष देऊन ऐका. कलियुगात, एकविसाव्या शतकात, तुमचा एक वंशज पंढरपूरच्या वारीत सामील होईल, वारकऱ्यांसोबत ते वाटचाल करील, त्यांच्या बरोबरच मुक्काम करील, भजन-कीर्तनात तल्लीन होऊन जाईल. त्या हरणाची ही विठ्ठल भक्ती एक चर्चेचा विषय ठरेल. सर्व प्रसिद्धी माध्यमे त्या हरणाचा उदोउदो करतील. त्या प्रसिद्धीने हरणाचा हरणेश्वर होईल. मग त्या हरणेश्वराच्या सन्मानार्थ त्याचे एक भव्य-दिव्य मंदिर बांधून त्यात त्याची सुवर्ण प्रतिमा प्रस्थापित केली जाईल. माउलींच्या दर्शना इतकीच त्याच्याही दर्शनाची जनसामान्याना आस लागेल. ज्या प्रमाणे कलियुगी, उंदराच्या कानात सांगितल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतील, नंदीच्या शिंगावरून महादेवाचे दर्शन घेतल्याने आपले पाप धुतले जाईल अश्या श्रद्धा निर्माण होणार आहेत, त्याच प्रमाणे हरणेश्वराच्या खुरावर आपले मस्तक रगडल्याने पाप धुतले जाईल, त्यांची शिंगे मस्तकावर घासल्याने आपल्या पुढच्या पिढ्या स्वर्गात जातील, असा विश्वास निर्माण केला जाईल. हरणेश्वराच्या दर्शनाने विविध मनोरथे पूर्ण होतील, विद्यार्थ्याला परीक्षेत यश मिळेल, पुत्र्यार्थ्याला पुत्र प्राप्ती होईल, नोकरी-धंद्यात प्रगती होईल, अपेक्षित वर-वधु एकमेकांना लाभतील, गडगंज दौलत लाभेल अशी त्याची ख्याती पसरवली जाईल. त्याच्यावर शेकडो भजने, प्रार्थना, कथा रचल्या जातील. उपास-तापास, व्रत-वैकल्यांची उत्पत्ती केली जाईल. मग त्याला भोळेभाबडे, अज्ञानी स्त्री-पुरुष बळी पडतील. हरणेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी त्याच्या दर्शनाला लांबलचक रांगा लावून भक्त उभे राहतील. मग त्या देवस्थानांची व्यवस्था पाहणारे, ‘खास', ‘अति-खास' ‘अति-अति-खास' अशी देणग्यांच्या आधारावर भक्तांची वर्गवारी करून त्यांच्या दर्शनाची सोय करतील. हरणेश्वराला सोन्याच्या चाऱ्याचा प्रसाद चढविला जाईल, त्यातील एक-एक तृण ‘प्रसाद’ म्हणून मिळविण्यासाठी श्रीमंत आपापसात स्पर्धा करतील. हरणेश्वराला हिऱ्याचा मुकुट, सोन्याचे तोडे, चांदीचे कंबरपट्टे घातले जातील. प्रात:काळी दूरदर्शनवरून हरणेश्वराचे भजन-कीर्तन-महती प्रसिद्ध केली जाईल. ‘अमक्याला हरणेश्वर प्रसन्न कसा झाला, तमक्यावर त्याचा रोष कसा झाला ते तिखटमीठ लावून सांगतिले जाईल. कलियुगी निर्माण होणाऱ्या प्रसिद्धी माध्यमाच्या साधनाने दिन-प्रतिदिन हरणेश्वराची महती वाढत जाईल आणि काही हुशार मंडळी त्या प्रसिद्धीचा वापर करून आपले उखळ पांढरे करून घेतील. तेव्हा, हे मृगराज, असे दुखीकष्टी होऊ नका, तुमचा भविष्यकाल उज्ज्वल आहे"
सीतामाईंच्या उशापाने हर्षित होऊन मृगराज तेथून अंतर्धान पावले.
(कथा स्फूर्ती - वारीत सामील झालेले हरीण ही वृत्तपत्रातील बातमी)

कथालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

28 Jun 2017 - 9:47 am | ज्योति अळवणी

इतकेच नव्हे तर काही सिनेकलाकार तुमची दिवसा ढवळ्या शिकार करतील आणि न्यायालये त्यांना मोकाट सोडतील.

हे वाचेपर्यंत असे वाटत होते की रामायणातील फारसा माहीत नसलेला भाग समोर येतो आहे.

सौन्दर्य's picture

30 Jun 2017 - 12:03 am | सौन्दर्य

हरण वारीत सामील झाल्याची बातमी वृत्तपत्रात, व्हॉट्सप, फेसबुक वगैरे सोशल मिडीयावर इतक्या वेगाने पसरत चालली आहे की भविष्य काळात त्यातून काय निपजू शकते ह्याचा मनात विचार आला आणि अचानकच रामायणातील सीता हरणाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. ह्या दोन घटनांची सांगड घालून एक हलकाफुलका लेख मनात स्फुरला तो लिहिला. गैरसमजाबद्दल दिलगीर आहे.

योगी९००'s picture

28 Jun 2017 - 10:44 am | योगी९००

आवडला हा लेख...

इतकेच नव्हे तर काही सिनेकलाकार तुमची दिवसा ढवळ्या शिकार करतील आणि न्यायालये त्यांना मोकाट सोडतील.

हे वाचेपर्यंत असे वाटत होते की रामायणातील फारसा माहीत नसलेला भाग समोर येतो आहे.
मलाही असेच वाटले होते...

सौन्दर्य's picture

30 Jun 2017 - 1:18 am | सौन्दर्य

सहजच सुचलेली ही एक कथा आहे.

योगी९००'s picture

30 Jun 2017 - 9:15 am | योगी९००

सॉरी कशासाठी? इन फॅक्ट मी असे म्हणून तुमचे कौतूक करत होतो...

मला खूप आवडली कथा...

सौन्दर्य's picture

30 Jun 2017 - 9:02 pm | सौन्दर्य

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

अमोल केळकर's picture

29 Jun 2017 - 11:29 am | अमोल केळकर

सुरेख ,

सौन्दर्य's picture

30 Jun 2017 - 9:04 pm | सौन्दर्य

कथा आवडल्याबद्दल आभार.

एस's picture

30 Jun 2017 - 12:19 am | एस

:-) मस्त!

सौन्दर्य's picture

30 Jun 2017 - 9:06 pm | सौन्दर्य

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

रुपी's picture

30 Jun 2017 - 11:55 pm | रुपी

मस्त :)

सौन्दर्य's picture

14 Jul 2017 - 2:49 am | सौन्दर्य

धन्यवाद.