गूढ भाग ३

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
21 Jun 2017 - 3:01 pm

गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024

गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034

भाग ३

चंद्रभान दचकून जागा झाला. त्याच डोकं गरगरत होत. क्षणभर आपण कुठे आहोत आणि काय होत आहे हेदेखील त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने आजूबाजूला बघितलं. पण त्याच्या जवळ कोणीही नव्हत. डोकं गच्चं धरून तो बसून राहिला. आपण खरच आत्ता स्वप्न बघितलं की ती निशा आपल्या बाजूला बसली होती? तो सोफ्यावर बसून विचार करत होता. इतक्यात दाराची बेल वाजली आणि चंद्रभान पुन्हाएकदा दचकला. त्याने घड्याळाकडे बघितले. नऊ वाजून गेले होते. त्याने दार उघडले. दारात मीराताई होत्या. गेली अनेक वर्ष त्याच चंद्रभानच्या घरातलं सगळं काम करायच्या. त्याच्यासाठी स्वयंपाकही करून जायच्या.

आत आल्या आल्या त्यांची बडबड सुरु झाली. "साहेब मी नेहेमीसारखी आठला ईऊन गेली की. पण तुम्ही आज दार आतून लावून घेतलं होत. म्हा नून माझी चावी लागली न्हाई. बर घंटी वाजवली तरी तुम्ही दार उघडलं न्हाई. मंग मी पुढचं काम करून परत आले." मीराताईंचे हाताने काम आणि तोंडाने बडबड अस चालू झाल होत. चंद्रभान सोफ्यावर डोकं धरून बसला होता. मीराताईंनी त्याच्याकडे बघितलं. "साहेब बर नाही का वाटत?" त्यांनी आस्थेने विचारलं.

"ताई जरा कडक चहा करून देता का मला? डोकं दुखत आहे खूप." चंद्रभान म्हणाला.

"हो साहेब." अस म्हणून मीराताई स्वयंपाकघराकडे वळल्या. त्यांनी आत जाताच आतून चंद्रभानला विचारलं,"साहेब, कुनी आलंत का?"

चंद्रभान त्या प्रश्नाने दचकला. "का हो?" त्याने विचारलं.

"न्हाई... चहाची तयारी हित हाय ना. म्हणून म्हंनल. आलंबी बाहेर काढून ठेवलेलं दिसतय न." मीराताई म्हणाल्या.

त्यांचं बोलणं ऐकून चंद्रभान अस्वस्थ झाला. "नाही हो ताई. मीच करत होतो चहा." अस म्हणून तो आत खोलीत गेला. खोलीत त्याच्या पलंगावर काल तो वाचत असलेली कथा उघडी पडली होती आणि पानं फडफडत होती. चंद्रभानला ती कथा आत पलंगावर कोणी ठेवली हे कळत नव्हते. कारण त्याला आठवत होते त्याप्रमाणे तो कथा वाचत बाहेर सोफ्यावर बसला होता. नकळत तो त्या दिशेने वळला आणि फडफडणारी पान त्याने हातात घेतली.

कथेच शेवटच पान चान्द्रभानच्या समोर आल. आणि तो शेवट वाचून चंद्रभानच्या हातातून कथा गळून पडली. तो खूप घाबरला आणि धडपडत परत बाहेर आला. कारण काल रात्री त्याने वाचलेल्या शेवटच्या ओळीच्या पुढे अजून काही शब्द उमटले होते. कितीही प्रयत्न केला तरी ते शब्द चंद्रभानच्या नजरेसमोरून हलत नव्हते...........

आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि आता खऱ्या-खोट्या इतर वन्दातांच्या मध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खर सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या दिशेने जाणच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही................... खर तर चंद्रभानची कथा इथेच संपली होती. पण............. त्यापुढे उमटलेले शब्द असे होते.......आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूच नक्की काय झाल हे तिला माहित करून घ्यायचं होत आणि जमल तर त्याला परत आणायचं होत. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!

कोण असेल ही 'ती'? चंद्रभान विचार करत होता. 'का बर तिला त्या बाबूच काय झाल ते समजून घ्यायचं आहे? आणि ही जी कोणी ती आहे तिला कोणाबद्दल अशी खात्री आहे की तो तिच्या मदतीला जाईलच?'

"साहेब चहा." मीराताईच्या आवाजाने चंद्रभान केवढ्यांदातरी दचकला. त्याचे ते दचकणे बघून मीराताई हसायला लागली. "साहेब, तुम्ही पन दचकता? न्हाई म्हंनल भुताखेताच्या कथा लिहिता... घरात एकटे रहाता आन खऱ्या मानसाच्या आवाजाने दचकता..... म्हंजी कमाल म्हणायची."

"ताई भय किंवा गूढ कथा लिहिणारा माणूस दचकत नाही अस तुम्हाला का वाटल? मीसुद्धा एक माणूसच आहे ना?" चंद्रभान मीराताईकडे बघत म्हणाला आणि त्याक्षणी आपण असाच काहीस निशाला म्हणालो होतो ते त्याला आठवलं.

"अवो मानुस आहात तर मानसांची मदत करा की साहेब." अस म्हणून मीराताई परत आत गेल्या.

त्या गेलेल्या दिशेने चंद्रभान काही क्षण बघत बसला. आणि मग त्याने मोठ्याने ताईना विचारल,"काय म्हणता आहात तुम्ही ताई? आज हे अस का बोलता आहात तुम्ही माझ्याशी?"

आतून काहीच उत्तर आल नाही म्हणून चंद्रभानने अजून एकदा अजून थोड्या मोठ्या आवाजात तोच प्रश्न केला. तरी आतून शांतता. आता मात्र तो कोड्यात पडला आणि ताई गेलेल्या दिशेने दबकत दबकत जायला लागला. तेवढ्यात ताई झपकन बाहेर आल्या आणि चंद्रभान अजून एकदा दचकला. त्याच्याकडे बघत मीराताई मोठ्याने हसायला लागल्या आणि चंद्रभानला देखील हसू आले.

"काय साहेब? मी पार आत होते म्हनून एकू न्हाई आल." मीराताईनी हातातले वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालत चान्द्रभानला विचारले.

"कोणाच्या मदतीबद्दल म्हणत होतात तुम्ही ताई?" चंद्रभानने परत सोफ्यावर बसत विचारले.

"ती कोनी बया आली होती ना सक्काळी सक्काळी. तिला तुम्ही मदत हवी म्हन. मी आत येत हुतु आन ती बाहेर उभी हुती. तर मी म्हन्ली कुनाकड? तर म्हनली तुमच्या सायबाकड. आन मी काही बोलायच्या आत म्हन्ली सांगा सायबांना मला मदत करायला वो... एकटीच हाय मी. मी म्हन्ल कोन तुम्ही बाई. तर म्हन्ली सायबाना माहित हाय तुमच्या.... सांगा निशाला मदत करा. ती वाट बघती हाय. मी बर म्हनून पुढे आली." मीराताई आपल्याच नादात कपड्यांच्या घड्या घालत बोलत होत्या. पण त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक चंद्रभान अस्वस्थ होत होता. त्यांनी निशाचे नाव घेताक्षणी तो ताडकन उभा राहिला.

आज आपला साहेब हे अस का वागतो आहे त्याचा उलगडा काही केल्या मीराताईना होत नव्हता. "काय झाल साहेब?" त्यांनी चान्द्रभानला विचारल.

"काही नाही मीराताई. बर ते जाऊ दे. तुम्ही कोकणातल्या ना ताई?" त्याने अचानक मिराताईना विचारल.

"हो.. पार रत्नागिरीच्या पन फुड्च गाव हाय नव्ह" त्यांनी हसून चंद्रभानला म्हंटल.

"तुम्हाला उमरगाव माहित आहे का हो ताई?" चंद्रभानने सावधपणे चेहेऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मीराताईना प्रश्न केला. पण तो प्रश्न एकताक्षणी कपड्यांच्या घड्या घालणाऱ्या मीराताईंचा हात थांबला. त्यांनी चान्द्रभानकडे मोठ्ठे डोळे करत बघितल.

"तुम्हाला काहून उमरगाव माहित वो साहेब?" त्यांनी चंद्रभानच्या प्रश्नच उत्तर द्यायचं टाळत त्यालाच उलटा प्रश्न केला.

"ते महत्वाच नाही ताई. सांगा ना तुम्हाला माहित आहे का ते गाव?" चंद्रभानने परत एकदा प्रश्न केला.

"हो! पन माझ्या गावाकड जातानाचा तो एक थांबा आहे या पलीकड मला कायबी माहित न्हाई. बर तुम्ही चाय संपवा मी दुसऱ्या कामाला जाते. नंतर यीन मी." अस म्हणत मीराताईनी तो विषय तिथेच निदान त्यांच्यापुरता तरी संपवला. "ताई ती निशा त्याच गावची आहे. तुम्ही म्हणता आहात की मी तिला मदत केली पाहिजे. पण जर मी तिला मदत करायची तर मुळात मला तिच आणि त्या गावाच काय नात आहे ते समजून घेतल पाहिजे. जर मला तिची मदत करायला त्या उमरगावाला जाव लागणार असे तर त्यासाठी मला त्या गावाबद्दल पण समजल पाहिजे ना?" चंद्रभान म्हणाला.

त्याच बोलण एकूण मीराताई विचारात पडल्या. चंद्रभानने त्यांना कळू दिले नाही की त्याला उमरगावाबद्दल अगोदरच माहिती आहे. कारण त्याला मीराताईंकडे काय माहिती आहे ते समजून घ्यायचे होते.

"साहेब गाव तस झ्याक हाये वो. पन म्हणतात तिथ एक वाडा हाय. गावाच्या मागल्या अंगाला. एकटाच... मोठ्ठा... कधी कुणाला तिकड गेलेलं कोणी बघिटलच न्हाई. म्हन कोणी शहराकडचा बाबू ग्येला होता तिथ आन कधी परत आलाच न्हाई. मंग तवापासून त्या वड्याबद्दल कोनी बोलत न्हाई. ती पोरगी तिकडची हाय व्हय? नका लागू तिच्या नादी मंग. तुम्हाला काय कराच हाय? एक तर भूता-खेताच्या गोस्ती लिवता. नकोच ते." मीराताई म्हणाल्या. त्यांना शांत करायला म्हणून चंद्रभान 'बर' म्हणाला. त्याच्या त्या एका 'बर' म्हणण्याने मीराताईचे समाधान झाले आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या.

चंद्रभान विचार करायला लागला. काय झाल असेल नक्की? निशा म्हणजे नक्की कोण आहे? ती राजनकडे कामाला होती. याचा अर्थ ती खरच एक जिती-जागती मुलगी आहे. पण मग तिचा त्या गावाशी आणि त्या वाड्याशी काय संबंध आहे? अस अचानक चांगली नोकरी सोडून ती तिथे का निघून गेली? बर या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध असावा? कॉलेजमध्ये असताना त्या बाजूने जात असताना काहीतरी एकल होत त्यावरून आपण एक कथा लिहीली. पण आपण जी कथा लहिली आहे तसच काहीस तिथे घडल आहे अस या मीराताई आत्ता आपल्याला सांगत आहेत. मी लिहिलेल्या कथेचा आणि निशाचा काय संबंध? ती आपल्यकडे मदत मागते आहे; हे तरी कशावरून? खूप विचार करूनही चंद्रभानला त्याच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर सापडले नाही. म्हणून मग त्याने उमरगावला जाण्याचा निर्णय घेतला... त्याला आता उत्सुकता होती ती त्याने लिहिलेली कथा आणि निशा यांचा संबंध काय असेल? आणि जरी तिथे पोहोचल्यावर दुसर काही नाही समजल तरी अजून एखाद्या कथेसाठी काहीतरी सुचू शकेल; असा विचार त्याने केला. अर्थात त्याने याबद्धल कोणालाही काहीही सांगायचे नाही असे ठरवले आणि तसाच झटपट आवरून तो निघाला. त्याला अस तडकाफडकी निघताना बघून मीराताईना आश्चर्य वाटले.

"साहेब उमरगावला निघालात ना? उगाच न्हाई म्हनू नका. दुधखुली न्हाई मी. जाता तर जावा. पन एक सांगते... दुसऱ्याला मद्त करताना आपन कोन हाओत ते ईसरायचं नसत. भले तुमाला कुणीबी कायबी सांगू दे. हे कायम मनात जागवा की तुमी मोठे लेखक हात. हित मुंबईत तुमच खर आयुष्य हाय. हिथ तुमाला परत यायाच हाय. दुसर म्हंजी गावात जाल तर पयले मंदिरात जा. पुजाऱ्याला भेटा. त्यो तुमाला चार शानपनाच्या गोष्टी सांगल; त्या पण एकून घ्या. मंग हव ते करा." मीराताई म्हणाल्या.

"काळजी करू नका मीराताई. मी काहीही विसरणार नाही आहे. आणि तुम्ही म्हणता आहात तर अगोदर देवळात नक्की जाईन आणि मगच काय करायचं ते ठरविन. येऊ मी?" चंद्रभान म्हणाला.

"या साहेब. अंधारून जाईल न्हाईतर. वेळेत जावा तुमी." इतकेच उत्तर देऊन मीराताई त्यांच्या कामाकडे वळल्या. आता त्या अजून काही बोलणार नाहीत हे लक्षात येऊन चंद्रभानदेखील निघाला. त्याने स्वतःच गाडी चालवत उमरगावाला जायचे ठरवले आणि गाडी सुरु केली.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

गौतमी's picture

21 Jun 2017 - 3:20 pm | गौतमी

लवकर येऊदेत पुढचा भाग...

कपिलमुनी's picture

21 Jun 2017 - 3:22 pm | कपिलमुनी

पुलेशु

या मिराताईला बरच माहीत आहे तर. इंटरेष्टींग
ते एक दिवसाआड चा नियम सोडा, लवकर येउद्या पुढचा भाग

छोटा चेतन-२०१५'s picture

21 Jun 2017 - 11:23 pm | छोटा चेतन-२०१५

लवकर पुढचा भाग येऊ दया.

दशानन's picture

21 Jun 2017 - 11:26 pm | दशानन

वाचतोय!!!

पद्मावति's picture

22 Jun 2017 - 2:22 pm | पद्मावति

जबरदस्त!!

उत्तम ताणली गेलीय उत्सुकता. पुभालटा!