तो, मी आणि इगो…!

सनकी's picture
सनकी in जनातलं, मनातलं
15 Jun 2017 - 5:13 pm

खूप दिवस झाले मन अस्वस्थ होत होतं. दिवसातून एकदा तरी त्याचा विचार मनात यायचाच. त्याच्याशी जवळ जवळ वर्षभर बोललो नव्हतो. मग एके दिवशी लावला फोन आणि बोललो. तसा व्यवस्थित बोलला, अगदी formally कोणाशीही बोलावं तसं. का कुणास ठाऊक मी त्याच्या आवाजात मायेचा ओलावा शोधत होतो, पण तसं काही जाणवलं नाही. त्याला म्हणालो कैक दिवस आपलं बोलणं किंवा भेटणं झालाच नाही, तेंव्हा भेटू. तो म्हणाला सध्या परगावी चाललोय १५ दिवस. मग मी म्हणालो आलास की फोन कर, तो हो म्हणाला नि मी फोन ठेवला. फारशी आशा नव्हती पण कुठेतरी आतून वाटत होतं की करेल फोन. त्याला येऊन आता महिना झाला पण त्याचा फोन काही आला नाही.
एक मन उद्विग्न झाले की का नसेल केला त्याने फोन? तर दुसरे मन म्हणाले तुलाच नेहमी माघार घ्यायची काय गरज आहे? या हि वेळी तू तेच केलंस आणि त्यानेही. तू तुझ्या स्वभावाला धरून राहिलास, नाते टिकविण्याकरिता झालेले issues, गैरसमज, मनावरचे घाव आणि स्वाभिमान सोडून तू पुन्हा झुकलासच. अन त्याने नेहमीप्रमाणे, सख्खा भाऊ असून सुद्धा तुझ्या हाकेला साधी ओ देखील दिली नाही. तेंव्हा तूच विचार कर तुला कसे वागायचे आहे ते…
खरंच हल्ली कोणत्याही नात्यामध्ये 'मी' हा इतका महत्वाचा का आहे? मला काय वाटते किंबहुना मला जे वाटते तेच बरोबर आहे हा अट्टाहास का? कोणीच स्वतःला समोरच्याच्या जागी ठेऊन आता विचार करीत नाही की - अरे त्याच्याही काही अडचणी असू शकतील, काही कारणे असू शकतील अशा वागण्यामागे. उलट तो चुकला आहे, पण हे नाते टिकविण्याकरिता मीच त्याला माफ करतो आहे असा चुकीचा भाव मनी बाळगतात लोक. हल्लीच्या काळात आपल्याला फारसा वेळ नसतोच एकमेकांसाठी. तेंव्हा हे असे गैरसमज मनात धरून वर्षानुवर्षे एकमेकांशी साधा संपर्कही ना करणे चुकीचे नव्हे का? कोणताही प्रश्न एकमेकांशी बोलण्याने सामंजस्याने सोडवता येतोच, हे लोकांच्या विस्मरणात गेले आहे. त्या ऐवजी दुराभिमान बाळगून आपापल्यात कोशात स्वतःला गुरफटून घेत; जे मला दिसते, पटते तेवढेच जग आहे मानण्यात व्यस्त आहेत लोक.
अरे कोणीतरी काढा यांच्या डोळ्यावरची 'मी'पणाची पट्टी नि दाखवा याना स्वत्वापलीकडचे मोकळे नात्यांचे आकाश. त्यात भरलेले विविध नात्यांचे रंग, काही प्रफुल्लित करणारे तर काही उदासीन असतील. पण गैरसमजाचे मळभ दाटलेल्या आभाळापलीकडे प्रेमाचा तेजस्वी सूर्य अखंड तळपतो आहे अगदी स्वच्छ मनाने. तेंव्हा मनावरचे मळभ दूर करून तर बघा, समोरच्या व्यक्तीसाठी, तुमच्या नात्यासाठी दोन पावले पुढे जाऊन तर बघा, आज ना उद्या ती व्यक्तीही तेच करेल. कोणत्याही दोन व्यक्ती ह्या वेगळ्या असणारच, वेगळा विचार करणारच, पण म्हणून नात्यांची नाळ लगेच तोडून टाकावी का? दोन व्यक्ती एकत्र आल्या की त्यांचा स्वतःचा असा विचार असणारच, त्या व्यक्ती-स्वातंत्र्याचा आदर नक्कीच करावा. पण जेंव्हा दोघांशी निगडित काही निर्णय घ्यायचा असेल, तेंव्हा दोन्ही व्यक्तींनी मोकळेपणाने बोलून सामंजस्याने निर्णय घेणेच जास्त संयुक्तिक आहे, नाही का?
हि पोस्ट वाचत इथवर पोचला असालच, तर तुमच्या सर्व नातेसंबंधांची मनात उजळणी करा, तुमच्या मोबाइल मधले सारे कॉन्टॅक्टस चाळून काढा . कित्येक दिवस, महिने, वर्षे न ठोठावलेली मैत्रीची दारे धुंडाळा. नि द्या बिनधास्तपणे मनमोकळी धडक, बघा मैत्रीच्या झऱ्याला पाझर फुटतो की नाही ते.

- तुमच्यामधलाच एक.... चिवित्र…!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

दोन माणसांच्या नातेसंबंधात एक गोष्ट मला सतत जाणवत आली आहे. ती दोन्ही माणसे हयात असताना एवढ्या-तेवढ्याने ताणले जाणारे त्यांचे संबंध, त्यातली एक व्यक्ती कालावश झाली की इतके शिथील होतात, मागे राहिलेल्या व्यक्तीला मग जीवनासाठी गेलेल्याच्या दोषांत इतके गुण जाणवू लागतात की वाटते, या तणावरहीत संथ शांत जीवनासाठी इतकी मोठी किंमत द्यायलाच हवी होती काय..? समजूतदारपणा ही इतकी दुर्मीळ चीज कां असावी..? या 'अहम्' चा प्रभाव किती जबरदस्त आणि सर्वव्यापी आहे! आम्ही संस्कृतीच्या कितीही गप्पा मारल्या किंवा सुसंकृतपणा बाणवण्याचा कितीही मनापासून प्रयत्न केला, तरी यच्चयावत मानवजात ही या 'अहम्'ने आतून अशी एखाद्या भयानक रोगासारखी पोखरून काढली गेली आहे, की संस्कृती पेलण्याची ताकदच माणसात शिल्लक राहिलेली नाही. मृत्यूपुढेच फारतर हा 'अहम्' शरणागती पत्करत असावा. रोगापेक्षा ही औषधयोजना किती भयंकर आहे!

सुनीताबाई - आहे मनोहर तरी

सनकी's picture

15 Jun 2017 - 8:36 pm | सनकी

या 'अहम्' वर विजय मिळवण्याची कला भल्याभल्यांनाही साधली नाही आजवर. हातची गोष्ट जोवर हातातून जात नाही, तोवर काही कौतुक नसतेच समस्त मानवजातीला. मग तो माणूस असो किंवा एखादी यःकश्चित भौतिक गोष्ट...!

पद्मावति's picture

15 Jun 2017 - 9:19 pm | पद्मावति

मुक्तक आवडले.

पैसा's picture

16 Jun 2017 - 7:56 am | पैसा

छान लिहिलंय. पण "चला मनाची दारे उघडा" हे इतकं सोपं नसतंच.

आमचा एक २०-२२ वर्ष जुना आणि एकदम निःस्वार्थी ( त्याकाळी होता तो तसा...)मित्र असाच १ वर्षांपूर्वी आम्हाला दुरावला ....खरे तर तो आमच्या मित्रांच्या ग्रुप च्या मते बायकोच्या ताटाखालचे मांजर झाला...कधी तरी ताटाखालून बाहेर यायचा प्रयत्न करायचा पण ती acting सगळ्यांच्या लक्षात यायची.....नाहीच जमायचे त्याला आधी सारखे निःस्वार्थी relation ठेवणे....काम असेल तर च तो भेटायचं व कॉल करायचा..अन्यथा नाहीच ......शेवटी जी मैत्री त्याच्या साठी त्रासदायक होती ती आम्ही तोडली...( कारण बिचाऱ्याची बायको - तो जर आम्हाला कधीतरी चुकून भेटला तर त्याला कच्चं खायची .कारण आमच्या २-३ तास चालणाऱ्या गप्पा ....आम्ही कधी ही त्याला फुकायचा प्यायचा आग्रह करत नसू ...आणि त्याने ही तसे कधी केले नाही तरीही !!!)...आमची मैत्री ची व्याख्या म्हणजे वीकएंड ला ३/४ तास कट्टा जमवणे ....नो दारू.....जाऊ द्या..शेवटी काही गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नसतात.....थोडक्यात कधी कधी दुसऱ्याला सुखी ठेवण्यासाठी ही नाती तोडावी लागू शकतात .....

रविकिरण फडके's picture

16 Jun 2017 - 5:54 pm | रविकिरण फडके

ज्या नात्याला मी इतके महत्व देतो ते त्याच्या दृष्टीने अगदी किरकोळ, नगण्य असेल? मला देखील असे अनुभव आले आहेत; ४०-४५ वर्षे ज्याच्यांशी मैत्री होती त्यांनी कॉन्टॅक्टच तोडून टाकला. काहीही संभवनीय वा दृश्य कारण नसताना - निदान मी खूप विचार करूनही मला तरी ते सापडले नाही.
बरं, ह्या नात्यात काही अपेक्षा असतात, नियमित संपर्क असतो असे नाही. पण तरीही दुरावल्याची भावना नसते. फोनवर नाहीतर प्रत्यक्ष भेट झाली की मधली दोनपाच वर्षे विसरली जातात, एकमेकांच्या चौकशा केल्या जातात, भेटण्याचे निर्धार केले जातात, आणि एका उबदार भावनेने निरोप घेतला जातो.
पण हे सर्व मला वाटतं! त्यालाही तसंच वाटत असलं पाहिजे असा निष्कर्ष निघत नाही ना त्यातून?
म्हणतात ना, he has moved on! मीच बसलोय आपल्याच कोशात गुंतून!
ह्याच्याशिवाय दुसरा निष्कर्ष निघत नाही, आणि कुठला तरी निष्कर्ष काढल्यावाचून राहवत नाही. कारण माणसाला - निदान काही माणसांना - कोडे सुटल्याशिवाय झोप येत नाही.

सचिन काळे's picture

21 Jun 2017 - 2:28 pm | सचिन काळे

तुमच्या मोबाइल मधले सारे कॉन्टॅक्टस चाळून काढा . कित्येक दिवस, महिने, वर्षे न ठोठावलेली मैत्रीची दारे धुंडाळा. नि द्या बिनधास्तपणे मनमोकळी धडक>>> दिली होती हो धडक! आणि कपाळ फोडून घेतलं होतं. "इतक्या दिवसांनी कशीss कायss आठवण काढली आमचीssss?" तुम्ही कितीही म्हणा "सहज काढली" पण समोरच्याच्या मनातला संशय काही केल्या जात नाही. "हा आताच का चिकटायला बघतोय बरेsss!!? काहीतरी नक्की गौडबंगाल असणार. आपण सावध रहायला पाहिजे" वर आपल्या अपमानाचीही शक्यता नाकारता येत नाही.

तात्पर्य : बेसिनमध्ये वाहून गेलेले दूध पुन्हा वर येत नाही. वर पैसा यांनी म्हटल्याप्रमाणे "चला मनाची दारे उघडा" हे इतकं सोपं नसतंच.

सानझरी's picture

21 Jun 2017 - 9:21 pm | सानझरी

पण "चला मनाची दारे उघडा" हे इतकं सोपं नसतंच

.
याच्याशी सहमत.
काही नात्यांमधे स्वतःला ampute करणंही शिकायला हवं..