मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही...

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
10 Jun 2017 - 11:39 pm

(मुळात मुलांचे लैंगिक शिक्षण कसे करावे?, त्याना हे शिक्षण कसे द्यावे? हे सांगण्याकरता हा लेख लिहिलेला नाही. ह्या एरवी अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी सर्वसामान्य पालकांचा आणि सरकारचाही दृष्टीकोन काय आहे आणि तो कसा असायला हवा?, का असायला हवा? हे सांगायचा हा प्रयत्न आहे. खरे पाहू जाता लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण ह्यात थोडा फरक आहे पण मुळात जेथे लैंगिक शिक्षण ह्या विषयी जबाबदारीने काही लिहिणे बोलणे कमी, त्यात ह्या दोनही गोष्टीतल्या फरकावर विस्तृत बोलणे म्हणजे विषयान्तराला आमंत्रण देणे ...मागे एकदा मी ‘ शिक्षण : धोरण उद्दिष्ट आणि गफलती’ हि चार भागांची लेखमाला लिहिली होती. त्यात शिक्षणाच्या अनुषंगाने मराठी भाषेबद्दल थोडे काही लिहिले गेले होते. पण त्याचा परिणाम असा झाला कि बहुतेकांनी पुढचा लेख वाचलाच नाही आणि चर्चेचा, प्रतिक्रियांचा सगळा ओघ मराठी भाषा आणि तिचे संवर्धन ह्या बाजूने गेला... आणखी एक, ह्या लेखात वर्णन केलेल्या घटना काल्पनिक नाहीत. त्या खऱ्या आहेत फक्त विषयाच्या आणि लेखाच्या सोयी करता, आणि व्यक्तिगत गोपनियतेसाठी जुजबी फेरफार केलेले आहेत.)
मागिल महिन्यातली, म्हणजे मार्च मधली गोष्ट. नुकत्याच मुलीच्या सुट्ट्या सुरु झालेल्या...सकाळी सकाळी पोरगी गळ्यात पडली आणि “बाबा आज कामावर जाऊ नको...” म्हणाली. मी सुद्धा निमित्तालाच टेकलो होतो. मारली दांडी! दोन्ही मुली खुश( म्हणजे माझी मुलगी आणि सासऱ्यांची मुलगी...) आता बायको खुश व्हायचं आणखी एक कारण म्हणजे तिला त्या दिवशी नेहमी पेक्षा एक दोन पेशंट जास्त होते आणि मिहीकाला सुट्ट्या पडल्याने, तसेच ऐन वेळी तिचे नेहमीचे पाळणाघर काही ‘अपरिहार्य’ कारणाने बंद असल्याने तिच्या समोर मिहीकाची सोय काय करायची? हा मोठाच प्रश्न होता, तो आपसूकच सोडवला गेला.असो तर मग ती तिच्या क्लिनिक ला गेल्यावर मी आणि मिहिका थोडावेळ बाहेर वगैरे जाऊन आलो, आईने निग्रहाने नाकारलेल्या चिल्लर खरेद्या नेहमीप्रमाणे माझ्या गळ्यात पडून तिने वसूल केल्या आणि आम्ही अकरा साडे अकराला परत आलो. तर कॉलनीतली तिची एक मैत्रीण तिची खेळायला वाटच पाहत होती पण ऊन जास्त असल्याने मी त्या दोघींना घरातच काहीतरी खेळा म्हणून सांगितलं. त्यांनी काहीतरी खेळ चालू केले. मी आतल्या खोलीत जाऊन कम्प्युटर वर बसलो. थोडावेळ गेल्यानंतर, नेहमीप्रमाणे त्या दोघींचा खिदळण्याचा (किंवा भांडणाचा जास्त अपेक्षित)आवाज न आल्याने मी त्या दोघी काय करताहेत ते बघायला बाहेर आलो. तर ह्या दोघी बहुला बाहुली खेळत होत्या. मिहिका कडे एक बराच जुना बाहुला आहे( तो, अंगावर कुठेही दाबले कि रडणारा किंवा निरनिराळे आवाज काढणारा )तिच्या मैत्रिणीने तिची बाहुली आणली होती आणि तिने तो बहुला आणि बाहुली ह्यांच्या अंगावरचे कपडे काढून चक्क त्यांना संभोगाच्या पोझिशन.(मिशनरी पोझिशन) मध्ये ठेवलेले होते. नक्की ती मिहीकाला काय सांगत होती ते मला ऐकू आले नाही पण ती दबक्या आवाजात बोलत होती.( इथे मुद्दाम सांगायचे असे कि मिहिका ६ वर्षांची आहे आणि तिची मैत्रीण साधारण ८ वर्षांची म्हणजे दोघीही वयाने फार काही मोठ्या नाहीत आणि नक्कीच त्या दोघी काय करत होत्या ते त्यांना समजत नव्हत.)पटकन काय करावे ते मला सुचेना पण मग प्रसंगावधान राखून मी मध्ये येऊन त्याना म्हटलं चला उकाडा फार जास्त आहे आपण मस्त आईस्क्रीम खाऊन येऊ. त्या दोघी अगदी व्यवस्थित हसत खेळत माझ्याबरोबर बाहेर आल्या. तिची मैत्रीण ही दचकली किंवा ओशाळी झाल्याचे मला जाणवले नाही.दोघी तो खेळ विसरूनही गेल्या. मी विसरणे शक्यच नव्हते. बायको क्लिनिक वरून आल्यावर योग्य वेळ बघून तिला झालेला सगळा प्रकार सांगितला.आम्ही दोघांनी निर्णय घेतला कि मिहीकाशी ह्या विषयावर बोलले पाहिजेच पण तिच्या मैत्रिणीच्या आई वडिलांशी ही बोलले पाहिजे. आता बायको मनोविकार तज्ञ असल्याने, (शिवाय त्या मुलीचे बाबा कामानिमिता बाहेर गावी असल्याने,) तिने त्या मुलीच्या आईशी बोलणे जास्त संयुक्तिक होते. त्या प्रमाणे ती बोलली. त्यावर त्या आईची प्रतिक्रिया अगदी अनपेक्षित नसली तरी निराशाजनक होती. म्हणजे, “आम्ही आमच्या मुलीवर चांगले संस्कारच(!) करतो, तिचे बाबा आणि मी तर तिच्या समोर एकमेकांशेजारीहि बसत नाही. तिच्या बाबांना सांगू नका नाहीतर त्यांचा राग फार वाईट आहे ते तिला फोडूनच काढतील, आमच्या मुलीच्या डोक्यात असले घाणेरडे(?) विचार येणे शक्य नाही. तुमच्या मुलीनेच असले काहीतरी घाणेरडे तिला शिकवले असेल, तुम्ही तिला माझ्या मुली पासून दूरच ठेवा कसे...” इ. इ.
नंतर आम्ही दोघेही मिहीकाशी बोललो. बायकोला असल्या गोष्टी हाताळण्याचा चांगलाच अनुभव असल्याने तिने मिहीकाशी ह्या विषयावर व्यवस्थित संवाद साधला. पण मी, माझ काय? मला प्रकर्षाने जाणवले कि माझी ह्याविषयावर माझ्या मुलीशी काही बोलायची तयारीच नाही. मला हे असले प्रसंग समोर आल्यावर आपण काय करायचे हेच माहिती नव्हते. आणि मला माझे लहानपण आठवले.
तेव्हा मी साधारण ५वीत असेन.आमचा कुत्रा पिंटू, त्याला घेऊन बाबा रोज सकाळी फिरायला जायचे. कधी कधी मी हि जात असे. एकदा असेच त्यांच्या बरोबर फिरायला गेलेलो असताना रस्त्यावर कुत्रा कुत्री संभोग करताना मी पहिले आणि बाबांना ते काय करतायत हे विचारले.घरी गेल्यावर सांगतो असे बाबा म्हटले. आम्ही घरी जाई पर्यंत मी तो प्रकार विसरलो होतो पण आई आणि बाबा दोघांनी मला समोर बसवुन, व्यवस्थित समजावून सांगितले होते. कोणत्याही प्रकारचा संकोच, लाज, अवघडलेपण त्यांच्यात नव्हते कारण तशा भावना माझ्या मनात ही संक्रमित झालेल्या नव्हत्या. एवढेच नाहीतर ह्या असल्या विषयांवर मी पुढे कधीही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकत असे. स्त्रीयांना येणारी मासिक पाळी, त्याची कारणं, स्त्री पुरुष संबंध, मुल कसे जन्माला येते, गर्भ धारणा कशी होते हे सगळे मला त्यांनीच वेळोवेळी समजावून सांगितले.एवढच काय, पण पुढे जेव्हा कधी मी लग्न करायचे ठरवेन तेव्हा मी आणि माझी होणारी बायको दोघांनीही विवाहपूर्व समुपदेशन (Pre marital counselling) घेण्याचा सल्ला ही त्यांनीच आवर्जून दिला होता. मी त्यांचा धडधाकट असलेला एकुलता एक मुलगा( माझी मोठी बहिण मतीमंद आणि अर्धांग वायुने आजारलेली होती)त्यामुळे ह्या विषयात त्यांना पूर्वानुभव असणे शक्य नव्हते. नक्कीच त्यांनी कधी ना कधी हा प्रसंग आपल्या समोर येणार आहे. हे ओळखून तयारी केलेली होती. मी सांगतो तो काळ १९८६ ते १९९३ च्या आसपासचा आहे. आणि त्या काळाच्या मानाने हि एक विशेष गोष्ट होती, असे मला बायकोने सांगितले. हेही मला बायकोनेच सांगितले कि “तो काळ सोड, आजही भारताततरी आई वडलांनी असे शास्त्रशुद्ध तयारी करून मुलांशी बोलणे हे विरळाच आढळून येते.” तिचे स्वत:चे आई वडील उच्च विद्या विभूषित( विशेष म्हणजे वडील डॉक्टर-शल्यविशारद)असूनही ते कधीही तिच्याशी ह्या विषयावर बोलले नाहीत. १३व्या १४व्या वर्षी शाळेत असताना तिला प्रथम पाळी आली तेव्हा ती मनातून प्रचंड घाबरली होते. आपण आता लवकरच मरणार आहोत, आपण केलेल्या कुठल्या तरी पापाची शिक्षा म्हणून आपल्याला असला घाणेरडा(!) रोग झालेला आहे असे तिला वाटले होते. घरी गेल्यानंतर आईला घाबरत घाबरत सांगितल्यानंतर आईने तिला फक्त हे असे सगळ्यांनाच होते तु घाबरू नकोस वगैरे जुजबी सांत्वन आणि sanitary pad कसे वापरायचे हे सांगितले बस ह्यापेक्षा अधिक काहिही नाही. हे चित्र आजही फारसे बदललेले नाही. मुलग्यांची अवस्था हि काहीशी अशीच असते. त्यांना मिळणारे लैंगिक ज्ञान हे त्यांच्या मित्र परिवारातून. नाक्या कट्ट्यावरच्या चवदार गप्पातून, कुठेतरी मिळणाऱ्या पिवळ्या पुस्तकातून आणि मुख्य म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून , ब्ल्यू फिल्म्स, पोर्न क्लीप ह्यातून मिळालेले असते. त्यांना मिळालेली माहिती बऱ्याचदा चुकीची, भडक, अतिरंजित, पौरूषत्वाच्या अतिशयोक्त, वेडगळ कल्पना, स्त्री पुरुष संबंधांबद्दल विकृत भावना निर्माण करणारीच असते. ही माहिती पुरवणारे बऱ्याचदा मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेचा, कुतूहलाचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण ही करतात.
बायको कडे येणाऱ्या १० मुलांमागे(मुलगा मुलगी दोघेही )साधारण चार जणांचे लैंगिक शोषण झालेले असते. ही अत्यंत भयानक आकडे वारी आहे आणि हि भारत सरकारच्या आकडेवारीशी जुळते. १९९८,२००६ आणि २००७ ला UNICEF आणि स्त्रिया व बाल कल्याण मंत्रालय,भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून असे समोर आले कि भारतात ४० ते ५३% मुलं हि लैंगिक शोषणाचे बळी आहेत . (१९९८ पूर्वी असला कुठला सर्वे भारतात झालेलाच नाही. १९९८ साली हे प्रमाण ४०%, २००६ सालि ४२% आणि २००७ साली ते ५३% होते.)भारतामध्ये ही आकडेवारी जवळपास महामारीच्या स्वरूपाला येऊन पोहोचलेली आहे. आशिया खंडात हे प्रमाण १२% आहे म्हणजे बघा. खाली जगाच्या निरनिराळ्या खंडात असलेली आकडे वारी दिलेली आहे
Region Girls Boys
Africa 20.2% 19.3%
Asia 11.3% 4.1%
Australia 21.5% 7.5%
Europe 13.5% 5.6%
South America 13.4% 13.8%
US/Canada 20.1% 8%

लैंगिक शिक्षणाचा विशेषत: पालकांमध्ये असलेला ह्याबाबाताच्या जाग्रुतीचा अभाव हे ह्या मागचे एक प्रमुख कारण आहे. कोणत्या गोष्टीला लैंगिक शोषण म्हणायचे हेच पालकांना माहिती नसते. आधी आपल्या मुलाच्या बाबतीत असे काही होऊ शकते हेच मान्य करायचे नाही आणि असे काही झालेच तर ते लपवून, दाबून ठेवायचे ह्यामुळे अशा गोष्टीत मुलाना न्याय सोडा साधे संरक्षण ही मिळत नाही. शिवाय पालक आणि मुलं ह्यांच्यात असलेला सुसंवादाचा अभाव आहेच. ह्यामुळे गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या ,नैराश्य, वैफल्य आणि इतर मानसिक प्रश्न निर्माण झाले कि मग मानसोपचार तज्ञाकडे धाव घेतली जाते, ते सुद्धा शहरात आणि त्यातही काहीच पालक असे करतात एरवी वर्षानुवर्ष चालत आलेले नवस सायास , व्रत वैकल्य असले उपायाच केले जातात.
मुलांच्या शिक्षणा संबंधाने बोलताना बहुधा सगळ्यात कमी चर्चिला जाणारा विषय हा मुलांचे लैंगिक शिक्षण हा आहे(कमीत कमी भारतात तरी). मुळात लैंगिक भावना आणि क्रियाकलाप ह्यांचा आणि शिक्षणासारख्या पवित्र(!) गोष्टींचा एकत्र मेळ घालणे हेच अनेकांना पाप(?) वाटते. एकीकडे वरची आकडे वारी पाहता मुलांना लहान वयातच लैंगिक अत्याचाराच्या खाईत लोटलं जात आहे. आणि तरीही आपण पालक लोक अंगावर पडलेली पाल झटकावी तितक्या सहजतेने आणि कदाचित त्यापेक्षा अधिक शिसारी आल्यासारखे हा विषय झटकून टाकत आहेत. वयात आलेल्या, येऊ घातलेल्या, तुमच्या आमच्या मुलांच्या जगण्याशी, जोडलेला हा विषय आहे. त्यापासून इतकं घाबरून फटकून राहाण्याने भागणार नाही. मुळात लैंगिकता ही निसर्गतःच लहरी, तर्काच्या चौकटींत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते.लैंगिकता किंवा लैंगिक प्रेरणा माणसाची सहज प्रेरणा असल्याने ती टाळता येणे, थांबवता येणे, काही काळ लांबवता येणे, अशक्यप्राय, अनैसर्गिक तर असतेच शिवाय अनेक समस्या निर्माण करणारेही ठरू शकते, नव्हे ठरतेच.(स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना हल्ली वाढलेल्या दिसतात त्याचे खापर पाश्चात्य संस्कृती, मुलींचे तोकडे कपडे, रात्री उशीरा फिरणे, नोकरी करणे इ.इ. असल्या गोष्टीवर फोडणारे महाभाग मुलांना न मिळणारे किंवा अपूर्ण, विकृत असणारे लैंगिक शिक्षण हे त्याचे प्रमुख कारण असू शकते हे विसरतात.)
ह्या विषयावर सरकारचे धोरण पुरेसे स्पष्ट नाही. पण आपणच फक्त अशी बोटचेपी भूमिका घेतो असे नाही अमेरिके सारख्या देशातही सरकारच्या धोरणाची ह्याबाबत संदिग्धताच दिसून येते. अमेरिकन संघराज्याच्या ५२ राज्यांपैकी फक्त २२ राज्यांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य आहे आणि त्यापैकी फक्त १३ राज्यात ते वैद्यकीय दृष्ट्या अचूक असावे असा सरकारी निर्देश आहे. मजा आहे कि नाही! मुळात हा असा आग्रह कसा धरला जाऊ शकतो? म्हणजे गणित शिकवताना ते अचूक शिकवले जावे असा आग्रह धरण्या इतके हे हास्यास्पद आहे पण तरीही असा आग्रह ५२ पैकी फक्त १३ राज्य धरतात.म्हणजे उरल्या ठिकाणी अंधारच आहे.(त्यामानाने भारत सरकारचे एक बरे आहे. अशी कोणतीही संदिग्धता आपल्या सरकारी धोरणात नाही कारण आपल्याकडे तसे काही धोरणच नाही तर संदिग्धता कशी असेल!...)
२००७ मध्ये भारत सरकारने शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण समाविष्ट करण्याचे ठरवले. त्यावेळी त्याचा मुख्य हेतू एड्स सारख्या रोगांचा फैलाव आणि प्रतिबंधात्मक उपाय ह्या दृष्टीने मुलाना जागरूक करणे एवढाच मर्यादित (मुख्यत्वे करून )होता. तरी अपेक्षे प्रमाणे विविध राजकीय, धार्मिक नेते, संघटना, संस्था ह्यांनी ह्याला कडाडून विरोध केला.
ह्यातली धक्कादायक आणि दु:खद बाब म्हणजे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघाने तर शालेय पुस्तकांची होळी करण्याची धमकी दिली. जवळपास सगळ्या राज्यांनी ह्याला तीव्र विरोध दर्शवला आणि कठोर संघर्ष करायचे संकेत दिले. वानगी दाखल त्याकाळी आलेल्या काही वर्तमानपत्रातल्या बातम्या खाली दिलेल्या आहेत जिज्ञासूंनी जरूर पहावे.

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6949714.stm
http://timesofindia.indiatimes.com/india/Orissa-govt-against-sex-educati...
http://archive.indianexpress.com/news/sex-education-course-too-hot-for-v...
http://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/Maharashtra-resorts-to-a...
http://www.oneindia.com/2007/04/18/no-sex-education-in-karnataka-schools...
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/Womens-org...
http://archive.indianexpress.com/news/madhya-pradesh-bans-sex-education/...
http://archive.indianexpress.com/news/no-sex-education-please-it-corrupt...

भारत सरकारचे शिक्षण विषयक राष्ट्रीय धोरण हेच मुळात स्वातंत्र्यानंतर तब्बल ४० वर्षानंतर ठरले. १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आणि ९२ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांनाही आता पंचवीस वर्षे लोटली आहेत. दोन वर्षापूर्वीम्हणजे जानेवारी २०१५ मध्ये सरकारने शैक्षणिक धोरणाच्या पुनर्विचाराची प्रक्रिया सुरू केली होती.पण त्या मध्ये मुलांच्या लैंगिक शिक्षणा संदर्भात नक्की काय विचार केला गेला हे अजून तरी अज्ञातच आहे. शालेय शिक्षणासाठी विचारविनिमयार्थ १३ विषय निवडण्यात आले त्यात मुलांचे आरोग्य हा विषय होता पण लैंगिक शिक्षण हा विषय त्यात येतो कि नाही हे मात्र सरकारने स्पष्ट केलेले नव्हते. परंतु तत्पूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन ह्यांनी जुन २०१४ शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या लैंगिक शिक्षणावर बंदी घातली जावी असे मत व्यक्त केलेले होते. तेव्हा एकंदरीत फारसे आशादायक काही नसावे. लैंगिक शिक्षण हा एक राष्ट्रीय अजेंडा असून, तो एखाद्या पक्षाचा, राजकीय, धार्मिक किंवा इतर विचारप्रणालीच्या प्रसाराचा अजेंडा नव्हे. अधिक दु:खद बाब अशी कि ह्या निमित्ताने विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी “शाळेतील मुलांच्या लैंगिक शिक्षणावर बंदी घालणे योग्य कि अयोग्य?..” अशा प्रकारच्या ज्या मत चाचण्या घेतल्या त्यात साधारण ५१ ते ६०% लोकांनी बंदी घालणेच योग्य असा निर्वाळा दिला. म्हणजे आम्ही घरी ह्या विषयावर मुलांशी बोलणार नाही, शाळेत शिकू देणार नाही मग मुलांनी करायचे काय?
क्रमश:
---आदित्य

धोरणविचार

प्रतिक्रिया

शलभ's picture

11 Jun 2017 - 2:59 am | शलभ

विषय चांगला मांडलाय..आपल्याकडे खरंच बोंबआहे याची..

तुमची निरीक्षणे बरोबर आहेत. भारतात या विषयावर एकतर प्रचंड अज्ञान आहेच, त्याबरोबरच योग्य वयात अचूक लैंगिक शिक्षण न मिळाल्याने मुलांची होणारी जीवघेणी घुसमटसुद्धा आहे. त्यातूनच लैंगिक अत्याचार झाल्याचे नाकारायची मानसिकता आपल्याकडे दिसते. पुढील भागात तुम्ही अजून काही मते मांडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुभाप्र.

तुमचा लेख आणि तुमचा मुद्दा मला पूर्णपणे पटला पण ६ वर्षाच्या मुलीला हे सांगणं खुप " लवकर " नाही वाटत का? या वयात चांगला आणि वाईट स्पर्श, त्यांची प्रायव्हसी या गोष्टी शिकवायला हव्यातच. यावर तुमच्या बायकोचं (कारण त्या मानसोपचार तज्ञ आहेत ) मत समजुन घ्यायला आवडेल.

पिलीयन रायडर's picture

11 Jun 2017 - 7:16 am | पिलीयन रायडर

४-५ वर्षाची मुलं सुद्धा किती अडचणीत टाकणारे प्रश्न विचारु शकतात हे एकदा फुरसतीत सांगतेच तुला!!
ऑन सिरीयस नोट, हा विषय मुलांशी बोलण्याचे वय झपाट्याने खाली येत आहे.

मलाही माझ्या मुलाला अगदी फार डिटेल मध्ये नाही पण तरीही बरीच माहिती द्यावी लागली. एक तर त्यांच तेच बरंच निरीक्षण करत असतात. त्यातही बाळांचा जन्म कसा होतो? मी पोटात कसा गेलो? वगैरे प्रश्न असतातच. उगाच देवानी दिलं अशी उत्तरं द्यायला मला आवडत नाही. त्यामुळे टोन डाऊन करुन उत्तरं दिली आहेत, पण सध्या त्याला समजेल अशा भाषेत. जसा जसा मोठा होईल तशी टर्मिनॉलॉजी बदलत जायची आणि थोडं थोडं खरं सांगत जायचं असा प्लान आहे. पण १००% खरं सांगायची वेळ लवकरच येणार अशी लक्षणं आहेत.

बाकी प्रायव्हेट पार्ट्स आणि आई-बाबा-डॉक्टर सोडुन कुणालाही त्यांना हात लावु द्यायचा नाही, कुणालाही ओठांची पप्पी घेऊ द्यायची नाही इ गोष्टी पोर पहिल्यांदाच पालकांना सोडुन घराच्या बाहेर पडत असतानाच सांगाव्यात. (पाळणाघर, शाळा.. कुठेही..)

एकच नियम आत्तापर्यंत पाळला आहे. कितीही धक्कादायक प्रश्न विचारला किंवा काही बोलला किंवा काही केलं तरी अजिब्बात ते चेहर्‍यावर दाखवायचं नाही.

लेखकांनी प्रसंग फारच शांतपणे हाताळलाय ह्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले. महत्वाचा विषय आणि उत्तम मांडणी.

स्रुजा's picture

11 Jun 2017 - 4:52 pm | स्रुजा

४-५ वर्षांची मुलं प्रश्न विचारतात याबद्दल दुमत नाही पण माझा प्रश्न आहे तो त्यावरील उत्तर किती तपशीलवार असायला हवं यावर. म्हणजे त्यांना टीव्ही / जाहीरातींमधुन मिळणारं एक्स्पोजर हा एक भाग झाला आणि दुसरा भाग त्यांच्या स्वतःच्या भावना - ज्या की टिन एज पर्यंत तरी त्यांना माहिती नसतात. मग या वयात किती डिटेल्स द्यायचे कारण अनेक गोष्टी ते पुढची काही वर्षं रिलेट सुद्धा करु शकणार नाहीत.

पिलीयन रायडर's picture

12 Jun 2017 - 6:18 am | पिलीयन रायडर

तपशीलवार सांगायचं नाहीच. त्यांच्या त्या त्या वयातल्या रिलेटेबल गोष्टींमधुनच. जसं की माझ्या मुलाला सुपर पावर आणि असं काय काय सांगितलंय स्टोरी मध्ये.

पण जर लेखात सांगितल्या प्रमाणे मुलांना आधीच इकडुन तिकडुन नको ती आणि नको तितकी माहिती मिळाली असेल तर थोडं डिटेल मध्ये बोलावं लागेल. मुलांना तपशीलात माहिती असणं, पण ती रिलेट न करु शकणं अशी ती विचित्र परिस्थिती असल्याने तिथे पालकांना इतक्या लवकर बोलण्याची इच्छा नसतानाही ह्या गोष्टी बोलाव्याच लागतात.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2017 - 8:46 am | संजय क्षीरसागर

नंतर आम्ही दोघेही मिहीकाशी बोललो. बायकोला असल्या गोष्टी हाताळण्याचा चांगलाच अनुभव असल्याने तिने मिहीकाशी ह्या विषयावर व्यवस्थित संवाद साधला.

हा संवाद नक्की काय झाला ते लिहीलंत तर (त्या वयाची मुलं असलेल्या) पालकांना उपयोगी होईल.

अभिजीत अवलिया's picture

11 Jun 2017 - 9:51 am | अभिजीत अवलिया

सहमत

सुचिता१'s picture

11 Jun 2017 - 11:40 am | सुचिता१

सहमत ... सर्व साधारण पा पालकां साठी नेमके काय आणि कितपत , कोणत्या शब्दांत माही ती द्यावी हा एक मोठा प्रश्न असतो.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2017 - 1:14 pm | संजय क्षीरसागर

तेव्हा सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात लागली. तिथे खेळणारी त्याची सहा वर्षाची मुलगी म्हणाली:
"ए बाबा, हे काय पाहतोयंस एवढं ? ते मोठ्या मुलींचे डायपर्स असतात."

अरूण गंगाधर कोर्डे's picture

11 Jun 2017 - 9:41 pm | अरूण गंगाधर कोर्डे

उत्तम आणि सर्वात कमी चर्चिला जाणारा विषय आपण घेतला आहे. एखाद्या विषयावर त्रासदायक प्रतिक्रिया येतील म्हणून तो विषय कधीच विचारात घ्यायचा नाही ही आपल्याकडे जुनी पद्धत आहे. सध्या जरी स्वातंत्र्य असलं तरी याबाबतीत मुलं संस्कारी (म्हणजे जुनाट व बुरसटलेल्या विचारांची. एरव्ही आम्ही पुढारलेले आहोत की राव.) असायलाच हवी या आग्रहाखातर कोणीही यावर चर्चाच काय साधा उल्लेखही करणं टाळतात. आपले येणारे लेख नक्कीच वाचनीय असतील अशी आशा आहे.

मागे एकदा मी ‘ शिक्षण : धोरण उद्दिष्ट आणि गफलती’ हि चार भागांची लेखमाला लिहिली होती.

जरा चौथ्या भागाची लिंक देता का? मी शोधली पण मला पहिले तीनच सापडले....

जेम्स वांड's picture

12 Jun 2017 - 6:47 am | जेम्स वांड

तुमची काळजी अन कळकळ पोचली, ह्या विषयात खरंच खूप मोठा गॅप आहे भारतात..

मागे एक लेख वाचला होता, त्याला शास्त्रीय आधार होता की नाही हे मात्र मला माहिती नाही. त्या लेखानुसार शहरी वातावरणात माहितीची अतिरेकी आवक तसेच प्रदूषण वगैरे काही फॅक्टरमुळे लहान बालकांचे वयात यायचं वय (प्युबर्टी एज) झपाट्याने खाली आल्याचे सांगितले होते. ह्या वर मिपावरच्या वैद्यकीय तज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील.

इंटरेस्ट दिसतो. इतके प्रतिसाद येऊन सुद्धा स्वतःच्या मुलीशी, इतक्या नाजूक प्रसंगात नक्की काय बोलणं ते सांगायची तयारी नाही !

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jun 2017 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

+१ .

मोठ्ठं धनुष्य ताणायचं.. .
पण मग
बाणाला त्यात का नै आणायचं? ;)

गवि's picture

12 Jun 2017 - 3:12 pm | गवि

कितीही लहान वयात, जेव्हाकेव्हा पोरं पहिल्यांदा विचारतील तेव्हा जे आहे ते तसंच्यातसं सांगावं.

मित्रांनी सांगितलेली माहिती सत्याच्या जवळ होती आणि आईबाबांनी दिलेली माहिती म्हणजे चुना लावणं होतं असं नंतर पोरांच्या मनात कधीच यायला नको.

मुलगे, बॉईजच्या शूशूखाली ज्या दोन गोट्या असतात ना त्यात मोठे झाल्यावर एक रस बनतो. रक्त, थुंकी जसे बनतात तसा. तो रस मोठेपणी मुलीच्या, गर्लच्या शूच्या जागेतून आत घातल्यावर मुलींच्या पोटातल्या एका पिशवीत हळूहळू बाळ बनतो.

vcdatrange's picture

12 Jul 2017 - 10:38 pm | vcdatrange

https://youtu.be/EiIxkOah09E
शासकिय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत age appropriate Sexuality Education पोहोचविण्यासाठी सद्ध्या कार्यरत आहे. मराठीत सहभागी पद्धतीने सुमारे 550 शाळातील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेतोय