कहा गये वो लोग?--विलास

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
9 Jun 2017 - 11:07 pm

babukaka
aajibai
natha
mangya
sanjya
ranshur

आयला विलास तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी आणि ते पण या मालिकेत लिहायला मी कधी मिपावर येईन असे वाटलेच नव्हते रे ? म्हणजे कधी तसा विचारच मनात आला नाही. कायतरीच भयानक वाटतंय बघ.
तसा तू माझ्या ताईच्या वयाचा माणूस म्हणजे आपल्या वयात १०-११ वर्षाचे अंतर असणार.पण तुझ्याबरोबर फिरताना ,गप्पा मारताना गाणी म्हणताना तसं कधी जाणवलंच नाही.

म्हणजे मला आठवतंय की बोरगावकर वाड्यात मी कधी कधी बहिणींच्या मागोमाग खेळायला यायचो तेव्हा तू त्या विश्वात नव्हतास. तुझा ग्रुप, तुझ्या वयाच्या वेगळ्या लोकांबरोबर असेल किंवा तुमच्या आवडी निवडी वेगळ्या असतील. नंतर तुला मी जगदीश,बंड्या ,तारे यांच्या बरोबर फिरताना बघायचो पण एखादे स्मित करण्या पलीकडे आपला कधी संबंधच आला नाही.

मात्र मी थोडा मोठा झालो आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने मला पंख फुटले. त्यानंतर नि.गि. च्या चंदेरी आणि एक दोन ट्रेकमध्ये आपण बरोबर होतो.पण आपली खरी ओळख जमली ती अर्नाळा आणि वसईच्या किल्ल्याच्या ट्रेकमध्ये.तो वन डे ट्रेक छानच झाला होता , आणि तेव्हाच मला समजले कि ठराविक ग्रुपसाठी तू असे ट्रेक ठरवून त्यांना घेऊन जातोस.नंतर आपण केलेला मोरोशीजवळचा भैरव गड. तुझ्या सणसणीत उंचीचा फायदा घेऊन आपण तो गुहेजवळचा कठीण रॉक पॅच सहजपणे पार केलेला आणि वरपर्यंत हिंडून आलो होतो
त्यानंतर पुन्हा मी तुझ्याबरोबर सुधागड ट्रेक केला. तो दिवा पनवेल ट्रेन चा प्रवास,पालीचा मुक्काम ,मग टमटमने धोंडश्यापर्यंत केलेला प्रवास आणि सगळ्यात कळस म्हणजे वरती देवळात केलेला मुक्काम ,खिचडी, गप्पा गाणी आणि काय काय आठवतेय आता .मस्तच ट्रेक झालेला तो.

.मग हळूहळू नोकरी ,लग्न मुलेबाले यात गुंतत गेलो आणि एकूणच ट्रेकिंग कमी होत गेले.तुही नोकरीच्या निमित्ताने बेळगाव कि कुठे गेलास आणि आपला संबंध संपला असे वाटले. पण नाही.

देवाने काही नाती किंवा माणसे अशी काही जोडलेली असतात कि ती पुन्हा पुन्हा नव्या वळणावर भेटतच राहतात .तसेच काही वर्षांनी आपण दोघे नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक झालो आणि यथावकाश आपले फोनवर बोलणेही होऊ लागले. अर्थात मुख्य विषय असायचा ट्रेकिंग हाच.
२-४ वेळा तू सांगितलेस आणि मला जमले नाही पण नंतर ठरवून मी पुन्हा तुझ्याबरोबर वेळ जमवलीच आणि सिलसिला सुरु झाला.
उंबरखिंड ,नळीच्या वाटेने हरिशचंद्र, इर्शाळ असे उत्तमोत्तम ट्रेक तुझ्या योग्य नियोजनामुळे मला अनुभवता आले. अचूक टायमिंग , योग्य माणसे जमवणे, खर्चाचे अंदाजपत्रक इ-मेल ने सगळ्यांना अधीच कळवणे, आणि मुख्य म्हणजे आल्यावर सगळ्यांना ट्रेक चे वर्णन लिहायला प्रोत्साहन देणे (आणि प्रथम क्रमांकास जुन्या काळी ११० रुपये आणि आता १२५ रुपये बक्षीस कारण एका क्वार्टर ची ती किंमत आहे , हि पण एक तुझी मजाच ).
ट्रेकमध्ये आपल्या गप्पा बऱ्याचदा जुने कल्याण ,तिथली त्यावेळची आपल्या आजूबाजूची चित्र विचित्र माणसे , त्यांचे स्वभाव विशेष,परिस्थिती यावर व्हायच्या आणि काही गोष्टी , ज्या मी लहानपणी नुसत्याच बघितलेल्या असतील त्याबद्दल मला एक वेगळाच पैलू समजायचा. एकंदर मजा यायची.

तुझा स्वभाव तसा परखड आणि मला वाटते रागीटही असेल कदाचित.म्हणजे मला कधी दिसला नाहीस तू तसा पण इतर लोक सांगतात त्यावरून. विशेष करून सगळी मुले, ज्यांना तू लहानपणापासून योगाचे धडे दिलेस आणि त्यांना तेव्हा पासूनच ट्रेकिंग ची सवय नव्हे व्यसन लावलेस, ते तुझ्या कडक शिस्तीबद्दल सांगतात. पण त्याच बरोबर तू त्यांचा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड होतास आणि सुंदर गोष्ट म्हणजे ते नाते तू आणि त्या सर्वांनी शेवट्पर्यंत जपले. सर तुम्हीच आणि री युनियन हे व्हाट्स अप ग्रुप ही त्याची एक खूण आहेच आणि आपला जी मेल ग्रुपसुद्धा ज्यावर दर थोडे दिवसांनी तुझे नवीन ट्रेकचे मेल बघायची सवय झालेय.
मात्र असा स्वभाव असूनही तू जोडलेली माणसे बघितली तर थक्क व्हायला होते. म्हणजे हरिश्चंद्र गडावरचा तुकाराम असो कि बेलपाड्यातील कमा आणि कमळू , किंवा वर उल्लेख केलेली मुले. वेगवेगळ्या ठिकाणचे ,स्वभावाचे ,वयाचे लोक तुझ्या सामायिक धाग्याने एकत्र आले होते आणि आहेत.
लग्न तू का केले नाहीस मला माहित नाही, आणि कधी विचारावेसे वाटले पण नाही.आपण क्वचित शाळेतल्या मुली , त्यांच्या नंतरच्या दिवसात आकस्मित झालेल्या भेटी ,वागण्याच्या बदललेल्या तऱ्हा वगैरे विषयांवर सुद्धा बोललो पण तुझ्या बोलण्यात नेहमी एक अलिप्त पणा जाणवायचा , म्हणजे लग्न केले नाही तेच बरे झाले कारण आजूबाजूला इतक्या जोडप्यांच्या वाईट तऱ्हा बघतो कि एकदा लग्न करायचे आणि आयुष्यभर खेचत राहायचे असे मला तरी जमले नसते असे काहीसे तू एकदा म्हणाला होतास. पण तेव्हढेच . तुझ्या सवंगड्यांमध्ये मात्र विवाहित, अविवाहित ,लहान मोठे, स्त्री ,पुरुष सगळेच होते. एक मोठा कोलाजच जणू . आणि हा सगळा मला माहित असलेला पट, त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच काही तुझ्या अवती भोवती असेलच.

यावर्षी तू वारीला जायचे म्हणत होतास , आणि तुझा नास्तिक स्वभाव माहित असल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला होता. पण तू मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होतास.परवाच आपले बोलणे झाले आणि तू मला बरीच माहिती दिलीस , पण मुख्य विषय वारीचाच होता. निघायचे कधी, मुक्काम कुठे,मी तुला कुठे भेटू शकतो वगैरे आणि त्यातच तुमच्या ताज्या ट्रेक च्या काही घडामोडी सांगताना मला कल्पनाही आली नाही कि हे आपले शेवटचे बोलणे असेल.
शनिवारी दुपारी अचानक फोन वाजला आणि पलीकडच्या माणसाने फार वेळ ना घेता पटकन बातमी सांगून टाकली. विलास ऑफिसमध्ये हार्ट फेल होऊन गेला. क्षणभर मन बधीर झाले आणि काय ऐकतोय तेच समजेना . जरा भानावर आलो आणि अजून १-२ जणांना फोन करून खात्री करून घेतली. खरंच तू गेला होतास आणि त्यावेळी तुझे पोस्ट मार्टेम चालू होते. संध्याकाळी तुझ्या भावाकडे आलो , आपले ट्रेकिंगचे आणि तुझे लहानपणा पासूनचे सगळे मित्र, नातेवाईक जमले होते. सगळ्यात वाईट वाटले तुझ्या आई वडिलांना तुझ्याजवळ बसलेले बघून. या वयात त्यांना हा मोठाच धक्का असणार. आमच्या साठी पण काही वेगळी परिस्थिती नव्हती म्हणा. तू मात्र नेहमीच्या शांतपणे पहुडला होतास, मात्र नेहमी लीडरशिप करणारा तू आज आम्हाला एकटे ठेवून कायमच्या ट्रेकला निघून गेला होतास.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

9 Jun 2017 - 11:48 pm | सौन्दर्य

राजेंद्र जी,
लेखाची सुरुवात वाचताना असा काही शेवट असेल असा अंदाजच आला नाही. वाटलं तुमच्या ह्या मित्राचा वाढदिवस वगैरे असेल, पण जस जसं वाचत गेलो, शंकेची एक पाल चुकचुकू लागली आणि शेवट वाचून गलबलूनच गेलो. ज्या व्यक्तीचा माझा काहीही परिचय नाही त्या व्यक्ती विषयीचे तुमचे लिखाण वाचून डोळे पाणावले. तुमच्या ह्या लीडरला त्यांच्या अंतिम ट्रेकसाठी खूप खूप शुभेच्छा.

जगप्रवासी's picture

10 Jun 2017 - 11:50 am | जगप्रवासी

सुरुवातीलाच वाटलं होत नेमका तसाच शेवट निघाला तरीपण वाचायचा मोह सोडवत नव्हता इतकं छान लिहिलात. त्यानिमित्ताने तुमचे आधीचे लेख देखील वाचून काढले. खूप छान लिहिता. आणि तुमच्या त्या मित्राला ट्रेकसाठी शुभेच्छा

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 12:16 pm | मुक्त विहारि

लेखनशैली सुंदरच पण ...... अशावेळी आम्ही ज्यांना कधीच भेटू शकलो नाही अशा यकूची मात्र राहून राहून आठवण येते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jun 2017 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुवि- यकुंचे बरेच लिखाण मिपावर वाचले आहे. अतिशय सुंदर लिहितात (किंवा लिहायचे असे म्हणतो).
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला, दुसरे काय?

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 4:25 pm | मुक्त विहारि

काय बोलणार?

बाकी यकू जर तुम्हाला आवडत असतील तर, तुमचे आमचे वाद-प्रतिवाद उत्तमच होतील.ते कधीच वैयक्तिक पातळीवर घसरणार नाहीत. मग भले एकमेकांची मते पटोत की न पटोत.

दशानन's picture

12 Jun 2017 - 3:06 pm | दशानन

:(