फिक्सींग

रघुनाथ.केरकर's picture
रघुनाथ.केरकर in जनातलं, मनातलं
8 Jun 2017 - 6:29 pm

राजा: हळु रे .... कित्या इतको राग काढतय...

शिवा: मेल्या तुका आदी मी वळखाकच नाय मरे....

राजा: सांगतय काय...? तेवाच मायझया ह्यो वाकर काढलय मानेर

शिवा : सॉरी सॉरी हा.... चुकान झाला रे....

राजा: मेल्या भगभगता कसला.... कितकी ती धार काढलय शींगांका. येक दिवस शाप झरान जातली.

इतक्यात शिवा ने जोर कमी केला. राजा बैल अजुन तसाच मस्तक रेटत शिवा बैलाला पुढे ढकलत राहीला. दोन्ही बैलांचे मालक हातात कासरे धरुन झुंज बघत होते. मालकांचे पाठीराखे बैलांच्या नावाने ओरडत होते. पण दोन्ही बैल एकमेकांच्या मस्तकाला मस्तक लाउन फ़ुरफ़ुरत होते.

शिवा: पायात काय रे तुझ्या??

राजा: मागे सराय कडे कणकवलेच्या स्पर्धेत कुडाळच्या बैलाक पाट घेउन घालौन दिलय तेवा ह्या पेण्णेकाराच्या झीलान मुंबयसुन पितळेच्या तोड्यांचो जोड हाडल्यान. हुश्श.... हळु रे... आज खुपच कुतामतय मरे.

शिवाच्या जोराने राजा थोडा हैरान झाला होता.... वस्तवीक पहाता वयाचे हे दोन पाडे,
पण तरी ही शिवा अंगाने राजा पेक्षा थोडा जास्तच आडदांड होता. त्या मानाने राजा थोडा बसक्या अंगाचा, किंचीतसा स्थुल पण चिवट. गाडीला ला लावला की चार रेड्याच्या ताकदीची लाकडाची तोड तो एकटा गिरणीवर चिरायला घेउन जाइ. टिपीकल मारकी शिंगे. मस्तक समोरच्या बैलाला लावली की हमखास रक्तपात. त्यात मालकाने शिंगाला धार लावली की समोरच्याची अजुन हालत खराब व्हायची. काजा रंग, किंचीतसं स्थुळ पण भरदार अंग. चरायला सोडला की माळभर ढेकर घालत शिंगाने माती उकरायचा. सगळ्या पंचक्रोशीत राजा नावा प्रमाणे राजा होता, त्याचा वेगळाच रुबाब होता, तोरा होता, पण एकदा दाव्यावर आला की शांत व्हायचा. साक्षात नंदी भासायचा. पेडणेकराच्या संदीप ने राजाला सावंतवाडीच्या पलीकडच्या माडखोलातुन आणाला होता आणला तेंव्हा जेमतेम अडीच वर्षाचा होता. पण पेडणेकरांच्या हायवे शेजारच्या जमीनीची विक्री राजाच्या शरीरसौष्ठवाला पोषक ठरली. पेडणेकरांनी राजाला असा काय मातवला की अख्ख्या तालुक्यात राजा सोबत झुंजायला जोड मीळेना. राजा तालुक्यातला अनभिषिक्त सम्राट झाला होता. आणी मग बंदी असताना सुधा राजा बैल झुंझीच्या स्पर्धा मारत राहीला. आपल्या पेक्षा कमी ताकदीच्या बैलांना हरवत राहीला. गुलालाच्या पावसात न्हात राहीला. पण राजाने कधीच कुणाला घायाळ केले नाही, ना बैलाला ना माणसाला. एकदा राजाच्या गोठ्यात एक २ वर्षाचं पोरं चुकुन घुसलं. तर ते पोर ओरडायचं सोडुन राजाच नुसता हंबरत राहीला. त्याच्या ओरडण्याने सगळा वाडा जमा झाला. असला हा गुणी राजा, पण त्या पोराला एक ओरखडा देखील आला नाही. बाकी तसा चपळ पण राजा बद्दल एक ओरड नेहमी असायची की झुंजीला सुरुवात झाल्यावर राजा बराच वेळ नुसतं मस्तकाने समोरच्या प्रतीस्पर्धी बैलाला धरुन ठेवी. बराच वेळ धरुन ठेवी . झुंझ खुप वेळ रेंगाळत राही. आधीच बंदी त्यात तास तास एका झुंजीला घेई. त्यामुळे पेडणेकराना आणी इतर बघ्यांना घाम फ़ुटे, मग मध्येच कधी तरी तो प्रतीस्पर्धी बैल धुम ठोकत असे.

आज देखील तसचं होत होतं आणी इथे तर समोरचा प्रतीस्पर्धी त्याच्या जुन दोस्त शिवा होता . शिवा हा आजर्‍याच्या दया भुसार्‍याचा बैल. शिवा सुखात वाढलेला. पण लहानपण गरीबीत गेलं. शिवा वेशीवरच्या घरात जन्माला आलेला. मालक अठरावीश्वे दारीद्री. सकाळ दुपार दारुत बुडालेला. एके दिवशी दारुसाठी आपल्या या दीडवर्षाच्या पाड्याला दया भुसार्‍याला विकुन आला. तेंव्हा पासुन शिवा दया भुसार्‍याकडेच. शिवा नाव देखिल दयानेच ठेवलं होतं. शिवा तसा उत्साही, उंचपुरा,अंग धरुन असलेला. चपळ पण उगाचच भाव खाणारा, दया ने कधी शिवाला नांगराला किंवा गाडीला जुंपला नाही , तरी शिवा चालायला मागायचा नाही. वेसण ताणली की शिवाचे पाय उचलायचे, पण उचललेल्या प्रत्येक पावलागणीक त्याचे पिळदार स्नायु त्याच्या विजयाचा दावा अधिक प्रबळ करायचे. मोजक्याच लढती शिवा हरला असेल, नाहीतर दरवेळेस शिवा विजयी गुलाल बुक्क्यात रंगुनच घरी परतायचा. मग त्या रात्री शिवाच्या गोठ्याच्या पार्ट्या व्हायच्या, दया शेट झिंगेस्तोवर प्यायचा. केंव्हा केंव्हा तर शिवाला सुध्धा एखाद वाडगं भरुन पाजायचा. बर्‍याच वेळा हे रात्री व्हायचं पण जसं जसं शिवाचं नाव तालुक्यात गाजत गेलं तसं दयाचं वाडगं स्पर्धेच्या आधी थोडावेळ शिवाच्या समोर यायला लागलं. दया आणी शिवा विजयाच्या कैफ़ात होते. वाडग्यातल्या कैफ़ामुळे शिवाला प्रतीस्पर्ध्याच्या घावांचा विसर पडे. आणी अधिक त्वेषाने तो प्रतीस्पर्ध्यावर तुटुन पडे. शिवाचा दरारा वाढत चालला होता आणी अशातच त्याची झुंज लागली ती त्याच्या जुन्या दोस्ताशी.

शिवा :मेल्या खरस कित्या घालतय? मालक जेवक घालिना वाटता???

राजा : जेवक घालता रे पन .. ग़ुळाम दिय ना मरे....

शिवा:म्हंजे.....????

राजा: म्हंजे तुज्या भरी माका गुळामभर गावना नाय. आमचो मालकच एकटो गुळाम सोपयता.

हे ऐकुन शिवा गोंधळला. त्या गोंधळाचा फ़ायदा घेत राजाने त्याला ताकद लावत मागे लोटला. खुर मातीत घासले गेले. शेपट्यांच्या कमानी झाल्या. शेपटाचे गोंडे थरारले. राजाच्या पाठीराख्यांच्या मुठी गुलालात घट्ट झाल्या. इकडे दया शेटचा ठोका चुकला. शिवाला राजाने दोन पावलं का होईना मागे लोटलं.

शिवा : काय मेल्या नाय झालला बोलतय. मीया क्यवाच घेनय नाय रे. केवा सुदीक नाय. श्या.

राजा: होय्य तर्र...त्वांडाक बघ कशी घान सुटली ती. मेल्या तकला गरगरला माझा.

शिवा: श्या... नाय रे.. फणसाच्या चारकांडाचो वास तो यता . मीया घेउक नाय रे.

पण शिवा समजुन गेला की राजा ला कळालय कि तो दारु प्यायलाय. आता जस्त बोलण्यात काही अर्थ नाही हे शिवा समजुन गेला. पण काही तरी सारवासारव करायला हवी म्हणुन बोलला.

शिवा: मेल्या दयान माका फ़सवन सोरो खावक घातल्यान. आसो....मीया काय रोज रोज घेनय नाय. तीया सांग ..कसो आसय बरो मा?

शिवाने विषय बदलत राजाला हालहवाल विचारले.

राजा: चल्ला ता बरा म्हणा व्हया. आमचे कासरे मालकाच्या हातीत. तो ठेयत तसा रवा व्हया. कदी गाडीयेक तर कधी झुजाक.

राजा नॉर्मलला आल्यावर शिवाने पण थोडा जोर वाढवला आणी राजाला मागे रेटले. ते पाहुन दयाच्या पाठीराख्यानी एकच हुर्यो केला.

राजा: मरा नको रे... ते लॉक बग वगीच धुर्लो उडयतत.

शिवा: आसानी रे... वायच मजा करुया तेंची..

असे म्हणत दोघानीही एकमेकाना मस्तकानेच ढकलायला सुरुवात केली. शेपट्यांच्या पुन्हा कमानी झाल्या. कधी शिवा दोन पावले पुढे तर कधी राजा दोन पावले पुढे. असे करत करत हि दोन अजस्र धुडे लोकांच्या घोळक्याच्या च्या दीशेने सरकु लागली. धुरळा उडु लागला. राज्या शिSSSवा च्या आरोळ्या पडयला लागल्या. दोन्ही मालक आपपल्या बैलाना शपथा घालुन चेताउ लागले.

इथे दोन्ही बैल थकायला आले होते, त्यांच्या पीळदार मानेवरती एकमेकांच्या शिंगाने झालेले घाव ओघळु लागले होते. पण त्या दोघांसाठी ते किरकोळ घाव होते. दोन्ही बैल लोहाराच्या भात्यासारखे गरम श्वास ओकत होते.

शिवा: ह्या दाया पायात काय रे?

राजा: खय काय? कडा मरे, मगाशी सांगलय मरे.

शिवा : कडा नाय रे, ह्यो दोरो कसलो बानलय?

राजा : शा .... काय नाय रे.... पतार्‍यातलो दोरो तो... गोनावलो असतलो पायात.

शिवा: काय मेल्या सांगतय... पतार्‍यातलो दोरो.... खयल्या पतार्‍यात गेल्लय??? सातार्ड्याच्या काय पंचाक्री??

राजा: काय मेल्या सोरो खाद्ल्या भरी बडबडतय...

आता राजा गोंधळला होता. मात्र शिवाने जोर लावला नाही . फक्त शिंगाचा खडखडाट केला.

राजा : काय सातार्डा काय पांचाक्री ???? काय खुळ्याभरी बडबडतय?

शिवा: मेल्या तु सांगाच नको. तुझो मालक दुनीया फ़िरान देवपाना करुन हाडता, तुका जिकव साटी. माका सग्ळा ठाव आसा. सगळो जिललो बोल्ता रे... कि सन्दिपाचो बैल देवपानार जिकता.

राजा थोडा सावध होत बोलला.

राजा: जिकतय ह्या खरा आसा ... पण देवपानाचा काय ता खरा नाह. मेलया ताकद माझी , शिंगा माझी , रगात माझा व्हवता. ता काय ह्या देवपानामुळे? माज्या इजयाचा काराण दुसराच आसा. मगे सांगतय तुका...

शिवा : मगे केवा?? पिंगोळेच्या जत्रेक येतोबाच्या जत्रेक......???? केवा सांगतलय?... नको त्यापेक्षा आयतारच्या बाजाराक माक वाडीक भ्याट, आपा कुडाळकाराच्या दुकानार भजी आनी शिन्गल कटींग खायत खायत सांग. (काहीसा त्रासीक होत) काय मेलो सांगता.

राजा: अरे हुतलय मा? मगे सांगतय.

शिवा: मगे नको, आताच सांग, नायतर ह्यो मी चल्लय.

असे म्हणुन शिवा डोके सोडवु लागला. पण त्याला गुंतवुन ठेवत राजा म्हणाला.

राजा: आयक आधी काय बोलतय ता. वगीच उचामळ होउ नकोस. असो आनकेन दोनदा पळालय मा.. काय मगे मालक सोमतो व्हरतलो आनी झजरतलो. नायतर इकुन तरी टाकीत.

तुका आयकाचा होता मा. मी कसो जिकतय तो. तर आयक.

एव्हाना शिवा शांत झाला होता. राजाच्या शिंगामध्ये शिंग़े नीट अडकलीयत याची खात्री करुन तो खोट्या झुंजीचा नाटक पुढे रेटु लागला.

शिवा: सांग जालया.

राजा: अरे मेल्या, मी समोरच्या बैलावांगडा आधीच फ़िक्स करुन टाकतय. हयली म्याच मी मारलय तर फुढली म्याच मी तेका दीतलय. त्येच्या फ़ुडली तो माका दीतलो. पन एक दोन बारिक सारीक नियम आसत.

शिवा : कसले रे???? आयपीयलाभारी फ्री हीट???

राजा: खुप टिवी बग्तय वाटता? दयान गोट्यात डिस बसयला वाटता?

शिवा: तो मेलो काय डिस बसयतलो. बाएक*वर्‍यान आजुन माजी पडी सारकी करुक नाय. तो मेलो डिस बसयतलो. तेका मरा नी तु नियम सांग आदी.

राजा: नियम एक. कोणी कोणाचा रगात काढायचा नाय. नियम दोन. आनी पाठ घेतल्यार पब्लीक मदी धावायचा नाय. तर आता बोल. तुका काय व्हया?????
हि म्याच की फुडली.

आणी पुढच्याच क्षणी रेटारेटी वाढली, खुरानी माती उकरली गेली. धुरळा उठला. लोकांच्या आरोळ्यानी मैदान दुमदुमुन गेलं. गुलालाच्या फ़ैरी झाडल्या गेलया. दया शेट गुलालात न्हाउन निघाला. आज पुन्हा शिवाला वाडग्याचा नैवेद्य लागु झाला होता. राजा एव्हाना टेंपोत चढला होता. पेडणेकर देखील वाटेला लागले होते. सामने संपले.
लोक घरी निघुन गेले. शिवा ने पहीली मॅच फिक्स केली होती.

समाजलेख

प्रतिक्रिया

दशानन's picture

8 Jun 2017 - 6:37 pm | दशानन

झ्याक!
एकदम धुरालाच की गड्या, कोण्या गावाचं?
या आमच्या बेंदूरला टाईम काढून ;)

कागवाडी (बैल)
दशानन

रघुनाथ.केरकर's picture

12 Jun 2017 - 11:00 am | रघुनाथ.केरकर

मी कोकणातला....

स्वलिखित's picture

8 Jun 2017 - 11:20 pm | स्वलिखित

उधवस्त

आशय कळला! भारी लिहिलंय.

रघुनाथ.केरकर's picture

9 Jun 2017 - 12:05 pm | रघुनाथ.केरकर

मी परंपरा वैगरेच्या विरोधात नाहीय, पण जागा जमिनी विकुन फक्त शान म्हणुन झुंजायला बैल पोसणे हे मनाला पटत नाही, तसेच तो जिंकावा म्हणुन त्या बैलावर अमानवी प्रयोग करणे, त्याला जिंकवण्यासाठी देव भगत करणे हे प्रकार अस्वस्थ करुन जातात, त्या साठी हा लिखाण प्रपंच केला.

वरील तीनही प्रतीसादांसाठी खरच खुप धन्यवाद.

पैसा's picture

9 Jun 2017 - 4:52 pm | पैसा

शेवट ट्विस्ट एकदम भारी! परवाच पेपरला कुडाळमध्ये बैलाच्या झुंजी थांबवल्याची बातमी वाचली होती.