निशाचर

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 11:15 am

वेताळभैरवाचा नगारा वाजला. घोंघावतं वारं झोपडीत शिरलं. रातकिडे किर्रर्र. कंदिल ढळत होता. ओसरीत कुत्रं जोरात भुंकलं आणि मी जागा झालो. उठून कवाडामागचं दांडकं हातात घेतलं आणि बाहेर आलो. काळ्याभोर अंधारात जंगल सळसळत होतं. धो धो वाऱ्यानं फुफाटा डोळ्यात जात होता. तुळशीच्या ओट्यावर बसूनच कुत्रं भुंकलं होतं. कंदिलाची वात वाढवून चौफेर नजर फिरवली. कडब्याच्या गंजीजवळ चमकणारे दोन डोळे दिसले आणि एक थंड शिरशिरी अंगावर धावून गेली. ते हिंस्त्र डोळे होते. उग्र लालबुंद झालेले. एक भयाण सावली.

हा भास तर नाही?

कंदील उंचावत मी सावध गंजीकडं चालत गेलो. मिणमिणत्या प्रकाशात आता ती सावली अधिकच अवाढव्य होत चालली. एका बधीर जाणिवेने मी चालत गेलो कितीतरी दूर. दूर डोंगरावर पेटलेल्या दोन शेकोट्या मला दिसत होत्या. अवाढव्य काळा पहाड एखाद्या राक्षसासारखा विशालकाय भासत होता. हा भास होता हे जाणून मला बरे वाटले. कंदील विझवून मी पाहत राहिलो चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या दऱ्याखोऱ्या. खोल खोल गेलेल्या. मग बोचऱ्या थंडीत भटकत राहिलो त्या घनघोर अंधारात.

रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजात शेवटी परत फिरलो. घोंघावत्या वाऱ्यात भलीमोठी गंज सळसळत होती. तिच्या आडोश्याला उभा राहून मी पाहिलं एक जुनाट छप्पर. त्याच्या समोर होती एक दगडी तुळस आणि एक दगडी कुत्रं.

दूर डोंगरावर वेताळभैरवाचा नगारा वाजला. एकाकी कुत्रं भुंकलं. एक थंड शिरशिरी अंगावर धावून गेली. मी जागीच गारठून गेलो. त्या कुत्र्याच्या जवळंच उभी होती एक भयाण सावली. तिचे डोळे हिंस्त्र होते. उग्र आणि लालबुंद झालेले.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मितान's picture

2 May 2017 - 2:38 pm | मितान

भन्नाट !!!!!!!!!

तुमच्या कथांमधली वातावरण निर्मिति जबरदस्त असते !

वरुण मोहिते's picture

2 May 2017 - 2:41 pm | वरुण मोहिते

हा प्रकार जव्हेरगंज सरांकडून शिकावा. आवडलं

वा! या कथेतली कलाटणी भारी आहे.

सुखी's picture

2 May 2017 - 3:31 pm | सुखी

छान लिहिली आहे

समोर होती एक दगडी तुळस आणि एक दगडी कुत्रं.

दगडी म्हणजे निसचेत कि झोपलेला हे कळला नाही

जव्हेरगंज's picture

2 May 2017 - 5:49 pm | जव्हेरगंज

निसचेत

कुत्र्याच्या आकारात कोरलेली दगडी मुर्ती असं काहीतरी :)

आवडली गोष्ट!

चित्रगुप्त's picture

2 May 2017 - 4:49 pm | चित्रगुप्त

चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या दऱ्याखोऱ्या..... आणि ...... भटकत राहिलो त्या घनघोर अंधारात.....
हे एकाच वाक्यात कसे ? की हाच कथेचा आत्मा आहे ? .. कळेना कळेना कळेना ढळेना । ढळे नाढळे संशयो ही ढळेना ।

जव्हेरगंज's picture

2 May 2017 - 5:52 pm | जव्हेरगंज

हो,

पण चंद्रप्रकाशात जंगलात झाडाखाली अंधारंच असणार ना.. ;)

हेमंत८२'s picture

2 May 2017 - 5:16 pm | हेमंत८२

जव्हेरगंज आज कुठे काय तरी हरवलेले वाटले..
जसे कि ओसरी हि घराला असते आणि तुम्ही सुरवातीला झोपडी म्हंटले आहे.
वरती चित्रगुप्त यांनी उजेडाचा उल्लेख केला आहे. आज कंदाची आपण कुठे तरी कमी पडले असे आमच्या बालमनाला वाटते.

लहान मुलाचे किती ऐकवायचे हे मोठ्यानं ना सांगणे..

जव्हेरगंज's picture

2 May 2017 - 5:54 pm | जव्हेरगंज

बरोबर,

ओसरी ऐवजी काहितरी वेगळा शब्द हवा होता.

जव्हेरगंज's picture

2 May 2017 - 5:56 pm | जव्हेरगंज

आभारी आहे सगळ्यांचा

_/\_

कंजूस's picture

2 May 2017 - 6:53 pm | कंजूस

छान!

तेजस आठवले's picture

2 May 2017 - 7:03 pm | तेजस आठवले

मला कळली नाही.

जव्हेरगंज's picture

3 May 2017 - 7:09 am | जव्हेरगंज

सिंपल आहे!

अद्द्या's picture

3 May 2017 - 12:28 pm | अद्द्या

loop

चांगलीए .. मस्त

सिरुसेरि's picture

4 May 2017 - 7:16 pm | सिरुसेरि

मस्त लेखन . दर अवसेला होणारा वेतोबाचा फेरा आठवला .