प्रिय सचिन

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
24 Apr 2017 - 2:07 pm

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!!

आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी..
का म्हणजे काय??
त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो...

आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला..
लिहायला लागतंच काय रे?? तुझ्या एकेका फटक्यावर लेख लिहिता येतील..अजूनही लिहितात ना लोकं..सुरेख लिहितात...
पण कसंय..तुझ्यावर लिहायचं म्हणजे परत भूतकाळात जायचं..त्या आठवणीत रमायचं..आणि आत्ता तू मैदानावर नाहीस हे लक्षात आलं की भर्रकन वर्तमानात यायचं..
त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो...

कसंय ना सचिन..तुझ्याविषयीच्या आठवणी या फक्त क्रिकेटच्या नाहीयेत...तू आम्हाला आमच्या बालपणाशी जोडणारा दुवा आहेस ...एकेकाळी तू संचारला होतास आमच्यात..तुझ्या प्रेरणेने काहीही अशक्य नाही असं वाटायचं..पण परत तेच...वर्तमानकाळ दिसतो....अरे सर्दी झाली म्हणून सिक लिव्ह टाकणारे आम्ही...आम्ही तुमची प्रेरणा घेऊन तरी काय तीर मारणार?.....तुमचं सगळंच वेगळं असतं रे ...करोडोंच्या लोकांच्या अपेक्षा डोक्यावर घेऊन खेळणारा तू काय...डोक्याला बँडेज बांधून खेळणारा तो कुंबळे काय...अन कॅन्सरवर मात करून परत जिद्दीने मैदानावर येणारा तो युवराज काय...!!!...

मी काही तुला कधी देव वगैरे मानलं नाही..आणि ते तुलाही आवडत नाहीच..पण द्वारकेत गेल्यावर कृष्ण नंतर कधीही श्रीकृष्ण बनून गोकुळात परत आला नाही..कारण बाळकृष्णाची तीच छवी गोकुळवासियांच्या मनात कायम राहावी ही त्याची इच्छा होती....तसाच तू प्रशिक्षक वगैरे होऊन संघात वापस यावा असे मलातरी वाटत नाही..क्रिकेट संदर्भात आजकाल तू फारसा दिसत नाहीस ते एका अर्थाने चांगलंच आहे..तू जिथे आहेस तिथेच आनंदात राहावंसं एवढीच त्या श्रीकृष्णचरणी प्रार्थना...!

आणि हो...तो तुझा सिनेमा येतोय असं ऐकलंय..तो काही माझ्याकडून बघणं होईल असं वाटत नाही..माफ कर पण,
त्रास होतो रे...खरंच खूप त्रास होतो...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

इनू's picture

24 Apr 2017 - 2:26 pm | इनू

रिलेट झालं सगळं.
सचिन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

फेरफटका's picture

24 Apr 2017 - 7:34 pm | फेरफटका

एक नंबर जमलय! आज सचिन चा वाढदिवस म्हणजे क्रिकेट मधल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक.

श्रीगुरुजी's picture

27 Apr 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

सचिन आता निवृत्त झालाय ही कल्पनाच सहन होत नाही. सलग २४ वर्षे त्याने क्रिकेटचा मनमुराद आनंद दिला. त्याच्या आगमनापूर्वी देव्हार्‍यात सुनील गावसकर विराजमान होता. १९८७ मध्ये सुनील निवृत्त झाल्यावर देव्हारा रिकामा झाला होता. अवघ्या २ वर्षांच्या अवधीत सचिन आला आणि देव्हार्‍यात विराजमान झाला. पण आता देव्हारा परत रिकामा झाला आहे.

घड्याळाचे काटे उलटे फिरविता आले असते तर किती बरं झालं असतं. मी नोव्हेंबर १९८९ मध्ये जाऊन मैदानावर हातात बॅट घेऊन वकार, अक्रमचा सामना करायला येणारा १६ वर्षांचा कोवळा सचिन डोळे भरून पाहिला असता.

सचिन कधीतरी भेटावा अशी तीव्र इच्छा आहे. अर्थात तो भेटल्यावर त्याच्याशी नक्की काय बोलावं हा प्रश्नच आहे कारण मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखत असलो तरी तो मला अजिबात ओळखत नाही. त्याला एखादी भेटवस्तू वगैरे देणे म्हणजे त्याचा अपमान केल्यासारखं होईल. ज्याच्याकडे सर्वकाही आहे त्याला माझ्यासारखा क्षुद्र माणूस काय देणार. काहीतरी बोलण्यापेक्षा किंवा काहीतरी भेटवस्तू देण्यापेक्षा मी सरळ त्याच्या पाया पडेन. ज्याने सलग २४ वर्षे मनमुराद आनंद दिला त्याच्याविषयी कृतज्ञता म्हणून निदान एवढी किरकोळ गोष्ट तरी नक्कीच करता येईल.

Long Live Sachin! We miss you.

Embed from Getty Images

(HOBART, AUSTRALIA - FEBRUARY 28: Sachin Tendulkar of India leaves the field after being dismissed during the One Day International match between India and Sri Lanka at Bellerive Oval on February 28, 2012 in Hobart, Australia.
)