अंडरटेकर: End of an Era

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
5 Apr 2017 - 4:39 pm

अंडरटेकर हा जगप्रसिद्ध WWE कुस्तीपटू परवा निवृत्त झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. त्याने त्याच्या वाढत्या वयामुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल पण यामुळे आपलंही वय बरच वाढलंय की असं वाटून गेलं. अख्ख लहानपण झपाटलेलं या माणसाने.

अंडरटेकर हे पात्रच असं होतं की त्याभोवती अफवांचं वलय निर्माण होणं साहजिक होतं. Dead man walking अशी बिरुदावली उगाचच नव्हती मिळवली त्याने. त्याची एंट्री होण्याआधी सर्वत्र अंधार व्हायचा, एक निळा प्रकाश पसरायचा आणि मग अचानक वाजू लागलेल्या घंटा ऐकल्या की धडकी भरायची. त्याच एका लयीत चालणं,भुतासारखे लांब केस, ओव्हरकोट आणि डोक्यावर हॅट. मग रिंगमध्ये आल्यावर हॅट काढून बुबुळ पांढरी करून प्रतिस्पर्ध्याला घाबरवणं हे सगळं भन्नाट होतं. गळ्यावर सारा लिहिलेलं टॅटू असायचं. खांद्यावरही टॅटू.

WWE मध्ये प्रत्येक रेसलरचं स्वतःच एक गिमिक म्हणजे पात्र (किंवा सोंग) असतं. जसं शॉन मायकल्सचं हार्ट ब्रेक किड, ट्रिपल एचचं दि गेम, तसंच अंडरटेकरची दोन प्रसिद्ध गिमिक होती. एक म्हणजे डेड मॅन(वर वर्णन केलाय तसा) आणि दुसरं अमेरिकन बॅडॅस (badass) जो बाईकवरून बंडाना बांधून यायचा. तो कूल असायचा.

त्याच्या मॅचेस पण एकापेक्षा एक खतरी असायच्या. साडेतीनशे पौंड वजन आणि जवळपास सात फूट उंची असूनही त्याच्या हालचालीतली चपळाई पाहण्यासारखी असायची. त्यातली सगळ्यात प्रसिद्ध मॅच म्हणजे buried alive( प्रतिस्पर्ध्याला जिवंत पुरणे आणि मॅच जिंकणे). अर्थात हे सगळं scripted आहे हे त्यावेळी माहीत नसायचं त्यामुळे एखादा खेळाडू पूरला गेला आणि दोनतीन महिन्यांनी परत आला की त्याचं भूत बदला घ्यायला आलंय असंच वाटायचं.
दुसरी म्हणजे casket मॅच ज्यात प्रतिस्पर्ध्याला शवपेटीत बंद करायचं असे(ही पेटी कधीकधी जळत असायची). या दोन्ही मॅचेस अंडरटेकरसाठीच बनलेल्या आहेत असं वाटायचं. आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून पाहायचो.
त्याचाबद्दल पसरलेल्या अफवा अचाट होत्या. उदा. तो सातवेळा मरून जिवंत झालाय अशी एक आवई उठलेली असायची.
कोणी म्हणायचं तो दोनशे वर्षांपूर्वी मेलाय आणि त्याच भूत खेळतंय.
एकाने आम्हाला चक्क अशी थाप मारलेली की हा खरा अंडरटेकर नव्हेच. हा हॉलिवूडचा एक नट आहे ज्याला अंडरटेकर बनवून आणलाय. खऱ्या अंडरटेकरचा त्याच्यावर जळणाऱ्या स्टोनकोल्ड, रॉक, ट्रिपल एच, बिग शो इत्यादींनी काटा काढलाय आणि त्याला जिवंत पुरलाय. हे कळू नये म्हणून त्याचा डुप्लिकेट आणला. हे दृश्य त्यावेळी लहान असणाऱ्या केनने पाहिल्याने त्याच्या तोंडावर ऍसिड टाकून त्याला विद्रुप केलं गेलय. आणि मोठा झाल्यावर हाच केन आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी मास्क घालून आलाय. आणि त्याची ही थाप चक्क पचली होती. आम्ही पुढची काही वर्षे हे खरंच मानून चालायचो. आता मात्र आठवलं की अजूनही हसू येतं.

अंडरटेकर बद्दल बोलायचं असेल तर केनचा उल्लेखही झालाच पाहिजे. केन हा अंडरटेकरचा पडद्यावरील भाऊ. ही जोडगोळी brothers of destruction या नावाने प्रचंड गाजलेली. पण गंमत म्हणजे प्रत्यक्षात मात्र या दोघांच्यात कोणतंही नातं नाही. केनचं खरं नाव ग्लेन जेकब्ज तर टेकरच नाव मार्क कॅलवे आहे.

टेकर पडद्यावर कितीही भीतीदायक असला तरी खऱ्या आयुष्यात तो
तसा नाही. कुस्तीबरोबरच त्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. आणि इतर बरेच समाजकार्य तो करत असतो. पण पडद्यावर मात्र त्याने आपलं गिमिक कधी मोडलं नाही(अपवाद- रिक फ्लेअरचा निरोप सोहळा).
बाकी अनेक गोष्टी वेल्लाभट यांनी लिहिलेल्या आहेत. त्या पुन्हा लिहीत नाही. काही निवडक प्रसंग आहेत त्याच्या कारकीर्दीतले जे भावनिकदृष्ट्या खूप जवळचे आहेत प्रत्येक WWE फॅनच्या. त्यातले मला आवडणारे तीन तेवढे नमूद करतो.

1) रिक फ्लेरचा निरोप सोहळा. सर्वजण रिकला साश्रू नयनांनी निरोप देतायत आणि अचानक अंधार. निळा प्रकाश. घंटा वाजतात. साक्षात अंडरटेकरचं आगमन. अंडरटेकर येतो तोच ओव्हरकोट,हॅट. तो हॅट काढतो. सगळ्यांना वाटतं की तो भयानक चेहरा करत बुबुळ फिरवणार. पण नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी तो रिकला मिठी मारतो आणि त्याला सलाम करून पुन्हा निघून जातो. या प्रसंगाचे महत्व केवळ एक hardcore रेसलिंग फॅनच समजू शकेल.

2) वर्ष 2011. Wreslemaniaचा इव्हेन्ट. सामना होतोय अंडरटेकर आणि ट्रिपल एच यांच्यात. हेल इन अ सेल. सगळ्यात घातक प्रकारांपैकी एक. शॉन मायकल्स हा गेस्ट रेफ्रि म्हणून आलाय. तिघेही एकाच पिढीतले रेसलर्स. मॅच घासून होते. पण अखेर अंडरटेकर त्याचा हुकमी tomb stone piledriver चालवून ट्रिपल एच ला नेस्तनाबूत करतो. रेकॉर्ड 20-0.
विमनस्क अवस्थेत बसलेला शॉन आपला मित्र ट्रिपल एचला उठवायचा प्रयत्न करतोय त्याला आधार देतोय. तेवढ्यात टेकर स्वतः शॉनला मदत करून ट्रिपल एचला उभा करतो. तिघे जण एकमेकांना मिठी मारतात , थोपटतात(अनेक वर्षांपूर्वी एक काळ या तिघांनी गाजवलेला असतो). तिघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून रिंगमधून खाली उतरतात आणि तसेच पाणावलेल्या डोळ्यांनी स्क्रीनपाशी जातात एकमेकांना सांभाळून घेत. हे दृश्य पाहून 75000 प्रेक्षक उठून standing ovation देतात, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि announcer जिम रॉसच्या मुखातून उदगार निघतात. "It is the end of an era".
आजही हे दृश्य पाहताना काटा येतो.

३) टेकरची परवाची मॅच. रोमन रेन्स हा ताज्या दमाचा नव्या पिढीचा खेळाडू त्याच्यासमोर. अंडरटेकरचं वय आता त्याच्या हालचालीतून कळून येतंय. सुटलेलं पोट, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसतायत. तो लवकरच निवृत्त होणार याचीही कुणकुण लागलेली आहे पण मन तयार नाही होत.
सामना तसा एकतर्फीच होतो. रोमन रेन्स जिंकतो आणि मैदान सोडतो. खचलेला अंडरटेकर उभा राहतो. जायला निघतो. पण काहीतरी आठवल्यासारखा थांबतो. पुन्हा येतो रिंग मध्ये. आपले ग्लोवस, कोट आणि हॅट काढून जमिनीवर ठेवतो. प्रेक्षकांत चलबिचल वाढते. अस्वस्थता दिसून यायला लागते. आणि मग कळून चुकतं की हीच ती वेळ जी यायला नको असं वाटायचं. मग प्रेक्षक भानावर येतात आणि मग टेकरच्या नावाचा जयघोष सुरू होतो. टाळ्यांच्या गजरात, स्टँडिंग ओवेशन देऊन आपल्या आवडत्या "the phenom" ला प्रेक्षक निरोप देतात. हात उंचावून टेकर अखेरची सलामी देतो आणि एरिना सोडतो.

असो. It is the end of an era.

मांडणी

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 6:04 pm | वेल्लाभट

क्लास लिहिलंयत भाऊ !!!!

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 6:21 pm | प्रसन्न३००१

वर्ष 2011. Wreslemaniaचा इव्हेन्ट. सामना होतोय अंडरटेकर आणि ट्रिपल एच यांच्यात. हेल इन अ सेल. सगळ्यात घातक प्रकारांपैकी एक. शॉन मायकल्स हा गेस्ट रेफ्रि म्हणून आलाय.

वर्ष २०१२ मध्ये हि एन्ड ऑफ एन ऐरा मॅच झालेली... २०११ मध्ये पण ट्रिपल एच आणि अंडरटेकर मॅच झालेली पण त्यात शॉन गेस्ट रेफ्री न्हवता

प्रसाद तुझं या बाबतीतलं ज्ञान वाखाणायला हवं. लई मुरलेला दिसतोस यात.

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 7:11 pm | प्रसन्न३००१

माझं नाव प्रसन्न आहे.. प्रसाद नाही भाऊ ;)

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 6:23 pm | प्रसन्न३००१

या प्रसंगाचे महत्व केवळ एक hardcore रेसलिंग फॅनच समजू शकेल.

सत्यवचन....

हा तुमचा धागा वाचताना सुद्धा... I am getting Goosebumps Man :)

ऱोमन hile's picture

6 Apr 2017 - 1:04 am | ऱोमन hile

अंडरटेकर सारखा खेळाडू परत होने शक्य नाही.आपल्या करीयर मध्ये तो फक्त दोनच मॅच हरला होता . यावरुन त्याच्या खेळाची कल्पना येते. बाकी रोमन रेन्स म्हणजे नाद करायचा नाय.

वेल्लाभट's picture

6 Apr 2017 - 7:34 am | वेल्लाभट

गल्लत होतेय. Wrestle mania मधे फक्त दोन हरला.