असावीस पास ....

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
4 Apr 2017 - 5:41 pm

असावीस पास , जसा स्वप्न भास जिवॆ कासावीस झाल्याविना .

संदीप खरेंच्या अनेक डोक्याला त्रास देणाऱ्या कवितांपैकी हि एक .आणि किती काही वाटलं तरी प्लेलिस्ट मधून जात नाही हि . रात्री हे गाणं ऐकत पडलो होतो . सुंदर गाणं . तशीच झोप लागली होती

सकाळी ५.३० वाजता फोन वाजला . unknown number . इतक्या पहाटे कोण हा XXXX म्हणत फोन उचलून जवळपास ओरडलो. "वेळ काळ काही आहे कि नाही. ९ नंतर फोन कर. माणसं झोपेत असतात या वेळी .. "

समोरून आवाज आला . थोडा घाबरलेला. तरी हि खुदखुदत " ए बाबा , तुझी चिडचिड कधी कमी होणारे रे. किती तापटपणा तो . बीपी वाढून फुटशील एक दिवस . "

हे वाक्य ऐकून हि ५-६ वर्षे झाली होती . मी काही बोलणार तेवढ्यात पुन्हा बोलू लागली "ऐक, मी जास्ती बोलू शकत नाही फोन वर , बॅटरी संपत आलीये . समोरासमोर बोलू काय ते . मी गावी येतीये . बस बेळगाव ला थांबेल ६ वाजता १० मिनिटांसाठी. जमलं तर ये, आणि हो, गावातल्याच एक आज्जी आणि बहिण आहे सोबत . आलास तर सांभाळून वाग. तिथे तुझा तिरसटपणा नकोय "

फोन कट .

खाडकन झोप उतरली, तीच असावी का? आवाज तरी तसाच वाटत होता . एक नाव डोक्यात येत होतं . पण नाही, ती नसावी . ती गायब होऊन कित्येक वर्ष झाली फोन नाही , मेसेज नाही . मेल आयडी पण डिलीट केलेला आहे . तिच्या मैत्रीणीना पण माहिती नाहीये ती कुठे आहे .

ती असणं शक्यच नाही .

एकदम डोळ्यासमोर जसा चित्रपट चालू झाला.
एका सर्वर ट्रेनिंग क्लास मध्ये माझी पार्टनर. एखाद्या लहान मुलांच्या खेळण्यातली बाहुली असावी तशी.
गोल गोल चेहरा छोटुसं नाक . अगदी काही गोरी नाही गव्हाळ रंग . अगदी गोग्गोड होती दिसायला . चेहऱ्यावर कायम एक छानशी स्माइल . तिला बघितलं . कि मूड कितीही खराब असो आपल्याआपण हसू यायचं . आणखी काय हवं ना माणसाला

बोलायचीही तशीच . कधी कधी अगदी लाडात येउन मुद्दाम बोबडी . कधी उगाच खोटा खोटा राग . पण ते कधी विचित्र वाटलं नाही . होतीच तशी . कोणाचाही जीव जडावा अशी .

माझाही जडला . तसं तिला सांगितलं हि आणि आजवरच्या सगळ्या पुण्याच्या जोरावर . हो सुद्धा म्हणाली .

मग काय . . तो ३-४ तासाचा क्लास म्हणजे जीव कि प्राण होऊन गेला . ४ महिन्यात संपणारा कोर्स . फुकाचे प्रश्न विचारून , आणि ना ना तऱ्हा करून ७ महिने केला . अक्षरशः ट्रेनर ला त्रास देत होतो. पण बिचारी स्वभावाने चांगली होती, तिलाही माझ्या डोक्यात काय चाललाय हे समजत होतं . (त्या क्लास मधल्या सगळ्यांनाच समजत होतं म्हणा ).

मग पुढचे कोर्स . आणि सगळी कडे या बाई साहेब आमच्या बाजूला . ट्रेनर शिकवत असताना सिस्टम बंद ठेवावी हा नियम होता. समोरच्या स्क्रीन पेक्षा शिकवणाऱ्यावर जास्ती लक्ष असावं असा पवित्र उद्देश असावा त्यांचा . पण मग . आम्ही "अतिशय नालायक आणि निर्लज्ज " या प्रजातीत मोडतो . त्यामुळे हा नियम अगदी माझ्या पथ्यावर पडल्या सारखाच होता .

मॉनिटर बंद करून आरामात बसायचो . त्याच क्लास च्या कृपेने हि माहिती मिळाली होती कि LED स्क्रीन बंद असताना आरश्या सारखा असतो. तो असा काही फिरवून ठेवायचो कि बाजूला बसलेल्या "हिचा" चेहरा दिसला पाहिजे . सगळ्यांना वाटे किती लक्ष देऊन ऐकतोय दोघं.
पण . मी तिच्या कडेच बघत . आणि ती मध्ये मध्ये . मी बघतोय हे लक्षात येउन . जे लाजायची . अहाहा . स्वर्गच दिसायचा त्या बंद स्क्रीनवर .

अशीच दोन एक वर्षे गेली . आणि शेवटी जी भीती होती तेच झालं .
तिला लग्नाला एक मुलगा सांगून आला . वडील लहानपणीच गेलेले. हि आणि तिची आई मामा कडे राहायच्या . त्यामुळे ते सांगतील ती पूर्वदिशा होती .

नेहमी हसतमुख आणि गोड दिसणारी ही . कायम रडवेली आणि घाबरलेली दिसायला लागली . मी कधी तिच्यावर रागावलो नवतो. शक्यच नवतं ते. पण बाकीच्यांवर चिडचिड करायला लागलो .
कधी आरडा ओरडा नाही करायचो . पण थंड आवाजात तिरसट उत्तरे देणे . लागेल असे बोलणे . हे खूप होतं . तिलाही भीती वाटायची याची . शेवटी . रोजची चेष्टेतली लुटूपुटूची भांडणे . वादात आणि अबोल्यात बदलली .

पण मग कोणी ना कोणी माघार घ्यायचंच . कितीवेळ दुखावणार दुसऱ्याला .

तिला सांगायचो . कि बाई थोडा धीर धर . मी नाही होऊ देणार हे लग्न . बोलेन मी मामाशी तुझ्या . आणि तिला न सांगता बोललो हि . काय बोललो कसं बोललो काहीच आठवत नाही . एका तंद्रीतच होतो त्या दिवसात . सोबत द्यायला अक्षरशः सावली सारखा माझा भाऊ . दोघेमिळून एका वयस्कर मामाला त्याच्या लग्नाळू भाचीचं ठरलेलं नातं तोडायला सांगत होतो . अशक्यच होतं ते . आताही ते अशक्यच वाटतं . पण तेव्हा . अगदी शब्द असे नाचत होते जिभेवर दोघांच्या .जे काही बोललो . ते त्यानाही पटलं . त्यांनीही शब्द दिला . कि अजून दोन वर्ष नाही बघणार मुलगा हिच्यासाठी .

पण मग . त्या रात्री उगाच वाद घालत होती . उगाचच मला उपदेश देणं चालू होतं . त्याने माझी चिडचिड वाढली होती . शेवटी म्हणाली . मी कधी दूर झाले तर उगाच विचार करत बसू नकोस माझा , अभ्यास कर चांगली नोकरी कर . इत्यादि इत्यादि . डोकं फिरलं . म्हणालो .
काय फालतूपणा चालूये . कुठे जाणारेस? जा जाणार तर. मला काही फरक पडत नाही. मी नाही विचार करत कुणाचा . जा चल फुट . .

"हम्म मला माहिती होतं तू हे बोलणार पण ओळखते मी तुला, काळजी घे. कधी शक्य झालंच तर भेटू .

या नंतर काहीच फोन नव्हता . रोज ३०-४० वेळा प्रयत्न करायचो . पण . प्रत्येक वेळी तो . प्रचंड चीड आणणारा आवाज . "ये वोडाफोन क्रमांक अभी बंद है " . हे ऐकल्यावर नुसत्या शिव्या द्यायचो . वोडाफोन ला इतक्या शिव्या कोणीच दिल्या नसतील . उगाचच .कोणावर तरी राग काढायचा म्हणून .

हळू हळू फोन फ्रिक्वेन्सी कमी होत गेली माझीही . किती दिवस तरी वाट बघणार . लागलो आपल्या रस्त्याला . अभ्यास नोकरी इकडचे तिकडचे सर्टिफिकेट्स आणि इतर पन्नास लफडी .

आणि . . .

पहाटे असा फोन आला . म्हटलं बघू . कोण आहे ते . शाळेतली कोणी तरी असेल . भरपूर मित्र मंडळी येत जात असतात . जवळपास च्या गावात राहणारी . सगळी कडे जायला त्यांना बेळगाव स्थानकावर यावच लागतं. असेल कोणी तरी कार्टी चेष्टा करत . गेल्याशिवाय कळणार हि नाही नक्की काय ते. पोचलो तिथे .

तिथे पोचल्यावर लक्षात आलं. कि कोणती बस . कुठून येणारी. कुठे जाणारी . काहीच माहिती नाही. स्वतःलाच शिव्या घातल्या चार आणि फोन बाहेर काढला . . फोन कोणाचा होता हेच माहिती नाही. वेंधळेपणा तर रक्तात भिनलेला. म्हटलं बघू फोन करून . परत तोच घाणेरडा आवाज. आणि या वेळी कन्नड मध्ये . "इ वोडाफोन क्रमांक स्विच ऑफ इदे " . आईचा घो या वोडाफोन चा . .

मरो . एक चहा मारू आणि जाऊ ग्राउंड ला खेळायला . हा विचार केला आणि पोचलो समोरच्या केन्टीन मध्ये . सीबीटी समोर " थुमकुर थट्टे इडली " नावाचं दुकान आहे . ही भली इडली आणि त्यावर वडा . त्यावरच ओतलेला सांबार आणि थोडी गोडसर खोबऱ्याची चटणी . पहाटे पहाटे भुकेल्या जीवाला आणखी काय पाहिजे . जीभ घसा पोट सगळं अगदी तृप्त होतं भल्या पहाटे . बरं, इतकी मोठी इडली आणि वडा असला तरी अगदी पिसासारखा हलका . ना खायला जड ना पचायला . हे साले उडपे काय घालतात त्यात देव जाणे. आणि मग सोबत ती वाटीमध्ये कापी . हो वाटीमध्ये , काप वगैरे क्षुल्लक गोष्टी आहेत . अक्षरशः वाटी मध्ये ' कापी ' आणि तुम्ही अगदीच सोफिस्टिकेटेड वगैरे असलात तर त्याखाली धरायला स्टील चीच छोटी प्लेट . घ्या लेको भाजून . असो. विषय काय चाललंय काय . हॉटेल वालीच एखादी मुलगी मिळते का बघितलं पाहिजे . च्यायला खाण्याची आवड तरी मिटेल चांगली .

तेवढ्यात समोरून एक लाल डब्बा खडखडत आला . शेवटून दुसऱ्या सीट कडे सहज लक्ष गेलं . तर तिथे तीच होती . तोच नेहमीचा बालिश गोड चेहरा. छोटूसं नाक . नजर भिरभिरत होती इकडे तिकडे. हिनेच फोन केला असावा का . कि फक्त योगायोग. तेवढ्यात फोन वर मेसेज आला . आहेस का तू सीबीटी ला? . पुणे डेपो ची बस आहे . शेवटची सीट .

रिप्लाय नाहीच दिला .होता नवता तेवढा चहा एका घोटात पिउन संपवला . हाताला जी नोट लागली खिशात ती टाकली दुकानात आणि पळतच बस मध्ये चढलो .

शेवटच्या मोठ्या सीट वर एका बाजूला एक म्हातारी झोपी होती . दुसर्या बाजूला एक लहान मुलगी. हिच्या बाजूला कोणीच नाही . जागा अडवण्यासाठी आपली ब्याग ठेवली होती तिथे तिने . काहीही न बोलता त्या सीट पर्यंत गेलो . मागच्या सीट वर एकदा नजर टाकली. आज्जी बाई अर्धवट झोपेत माझ्याकडे बघत होत्या . हिच्या कडे बघितलं . थोडी घाबरली होती . तिला विचारलं . कोणी आहे का बाजूला . बसू का मी? हसली,म्हणाली " हो बसा " तिची पिशवी उचलून वरच्या फळीवर टाकली आणि बसलो आरामात .

लाल डब्बा होता . त्यातून सकाळची वेळ होती .तासभर तरी हलणार नाही इथून एवढी ग्यारेण्टी होती. च्यायला यांची गाडी चालू व्हायलाच तास लागतो . पण असो . हेही अगदी पथ्यावर होतं आज . धन्य तो लाल डब्बा .

बाजूला बाईसाहेब होत्याच . कुजबुजत बोलणं चालू झालं. " नाटकं मस्त करतोस हा अजुनी. "

काय बोलणार यावर . हसलो फक्त . डोक्यात कित्येक प्रश्न होते . सगळे एकापाठोपाठ एक बाहेर पडत होते .

"कुठे होतीस ? काय करत होतीस.. इतक्या दिवसात एक मेसेज नाही करता आला ? दर सणाला येत असशीलच घरी . आज जे केलीस ते आधी नाही सुचलं ? आणि काय नाटक चाललं होतं त्या दिवशी ? काळजी काय घे , अभ्यास काय चांगला कर. दूर जायचं होतं तर सरळ सांगायचं तोंडावर . बाकी फालतू बडबड कशाला ?"

ती : "त्या संध्याकाळी आई गेली होती माझी .ती गेली . वडील लहान पणीच गेले . मामी कशी आहे ते माहितीये तुला . मला पुण्याला लहान मामांकडे घेऊन जाणार हे माहिती होतं मला .आणि तसच झालं . . तिथे गेल्यावर मला वाटलं . आता इथे सांभाळतील . कमी कमी माणूस म्हणून तरी वागवतील . पण नाही .
तिथे जड झाले होते मी त्यांना . लग्नाचे प्रयत्न सुरु झाले परत . एक मुलगा शोधला पण . एका आठवड्यात साखरपुडा झाला . पण लग्नाला ६ -७ महिने होते अजून . घरी खूप त्रास देत होते रे .

पुढे मग . ३ -४ महिन्यांनी . माझ्या नशिबाने . त्या मुला बद्दल काही वाईट गोष्टी कळल्या . आणि ते लग्न तुटलं . लग्न तुटलेली मुलगी . त्यातून आई बाप नाहीत . भिकारयापेक्षा वाईट हालत होती .

मग एक दिवस काय नशीब पालटलं नाही माहित, मामालाच दया आली असावी.. स्वतःची नोकरी बघ आणि घर सोड म्हणाला . खरं तर भीती वाटली पाहिजे होती . पण उलट मी खुश झाले होते . आपल्याच क्लास च्या मॅडम ना फोन केला , त्यांच्या ओळखीने पुण्यातच एका कॉल सेंटर मध्ये नोकरी मिळाली . टेक्निकल साईड हवी होती . पण सुरुवात तरी झाली . वर्ष भरात सर्टिफिकेशन्स घेतले आणि त्याच कंपनीत IT डिपार्टमेंट ला लागले. तिथेच चांगल्या मैत्रिणी मिळालेल्या. त्यांच्यासोबतच घर पण घेतलं . हे आत्ता सांगताना सोप्प वाटतंय. पण त्या वेळेला खूप त्रास होते. भरपूर भीती होती. कारण मला काहीच स्वतः करून माहिती नव्हतं. आधी मामा आणि मग बेळगावात असताना तू . साधं बस चं तिकीट पण काढायला देत नव्हता मला . तेव्हा ते चांगलं वाटायचं. पण नंतर समजलं कि जगाच्या दृष्टीने मी मूर्ख होते . त्रास झाला तरी सगळं शिकून घेतलं. कित्येकदा वाटलं कि तुला फोन करावा. तू हि बहुदा पुण्यातच होतास तेव्हा . आरामात सगळं सेट करून दिला असतास मला . पण मुद्दाम नाही सांगितलं . घरातले सगळे तुटलेच आहेत गेल्या ३-४ वर्षात . मी हि त्यांच्याशी संबंध नाही ठेवला . पण परवा समजलं कि मामाला अटॅक आलाय . बाकी काही असलं तरी मला सांभाळलं त्याने काही वर्षे . सो भेटायला जातीये . हे सगळं तुला सांगून . तू अजून टेन्शन मध्ये आला असतास . तुझी नवीन नोकरी होती. तुला नवता त्रास द्यायचा .

आता पर्यंत मी सगळं ऐकलं होतं शांतपणे . पण शेवटच्या वाक्यावर उखडलो .
तेवढ्यात तिने हाथ दाबला. हळू आवाजात म्हणाली .उठून जाऊ नको . मला माहितीये त्रास दिले मी खूप. आत्ता थोडा वेळ शांत बस . गावी गेले कि माहिती नाही काय होणारे .

काहीच करू शकलो नाही . हाथ धरून शांत बसून राहिलो फक्त .

शेवटी हिम्मत करून विचारलंच , मग तिथे कोणी भेटलाय कि काही चान्स आहे अजुनी ? बघ म्हणजे, सगळ्यांशी एकटं लढून झांसी ची राणी व्हायची हौस फिटली असेल तर मी बोलतो माझ्या घरी .

गोड हसली अगदी . खांद्यावर डोकं ठेऊन बसून राहिली . शब्दांनीच उत्तरे देता येतात हे कोण सांगितलंय . आता तिची ती खत्रूड आज्जी काय आणि उरलेली बस काय . सगळं विसरलो .

बस हि चालू झालेली, तिच्या गावाकडे निघाली .

थोड्या वेळाने खांदा ओला व्हायला लागला . पण . त्यावेळेस ति नसती थांबली रडायची . डोकं थोपटत होतो दुसऱ्या हातानी .
पुढचा अर्धा तास . काहीच बोललो नाही .

स्टॉप आला शेवटी . उतरता उतरता म्हणालो तिला.

घरी गेलीस कि बघ कसे आहेत मामा . आणि फोन कर मला . मी आजच बोलतो . तुला वाटल्यास सगळे मिळूनच घरी येतो . संपवून टाकू एकदाचा विषय काय तो . फक्त फोन बंद करू नको काही झालं तरी . काळजी घे . . .
तिच्या डोळ्यात तो एक विश्वासाचा भाव होता .
बास . तोच हवा होता मला .

अजून काय पाहिजे . या पेक्षा मोठं सुख ते काय . जवळपास ५-६ वर्षानंतर हि बाजूला होती. पुढे. भरपूर त्रास होणार होता. हजार लोकांशी वाद घालावा लागणार होता .त्या क्षणाला सगळं नगण्य वाटत होतं तिच्या समोर . हे बाळ असं खांद्यावर डोकं ठेऊन शांतपणे झोपणार असेल. . विश्वासाने . बाकी गोष्टी गौण ठरतात .

या पेक्षा सुखाचा क्षण आणखी नाहीच

गाण्याचा ओळी नुसत्या डोक्यात घोळत होत्या . .

असावीस पास . जसा स्वप्न भास .
जीवे कासावीस झाल्याविना .

कथालेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Apr 2017 - 5:59 pm | कंजूस

अगागा काय लिहिलय!!!

प्रचेतस's picture

4 Apr 2017 - 6:03 pm | प्रचेतस

जबरदस्त.
आमच्या शुभेच्छा आहेतच.

किसन शिंदे's picture

4 Apr 2017 - 6:09 pm | किसन शिंदे

अफाट लिहीलंय रावसाहेब, दंडवत स्विकारा.

आशा आहे खरी गोष्ट असावी, तसं असेल सोन्याहून पिवळं !!

राजाभाउ's picture

4 Apr 2017 - 6:14 pm | राजाभाउ

+१

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2017 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

अफाट लिहीलंय रावसाहेब, दंडवत स्विकारा.

आशा आहे खरी गोष्ट असावी, तसं असेल सोन्याहून पिवळं .

››› प्लस प्लस वण!

समांतर- अशीच गोष्ट आगोबा (आणी पांडुब्बा! =)) ) कंदी लिवनार?

अस्वस्थामा's picture

4 Apr 2017 - 6:09 pm | अस्वस्थामा

मस्त.. :)
खरी गोष्ट असेल तर अजूनच मस्त.. :))

मितान's picture

4 Apr 2017 - 6:13 pm | मितान

सुंदर ! मनाला भिडणारं !!!

राजाभाउ's picture

4 Apr 2017 - 6:13 pm | राजाभाउ

मस्त रे अद्द्या. हळव केलस भावा एकदम.

तुषार काळभोर's picture

4 Apr 2017 - 6:34 pm | तुषार काळभोर

एकदम मनातल्या आतला कुठला तरी हळवा कप्पा अलगद उघडून दाखवावा असं...

खरी गोष्ट असावी अशी प्रार्थना करत आहे!

हे खरं असेल तर शुभेच्छा!! आणि hats off __/\__

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Apr 2017 - 7:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अद्द्या....लेका भारी. पार्टी कधी बे?

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2017 - 7:11 pm | प्रसाद गोडबोले

कसलं भारी लिहिलंय ! डोळ्यात पाणी आणलेस राव ! खुप दिवसांनी असं काहीसं वाचायला मिळालं !!

अद्या राव साहेब ___/\___

ट्रेड मार्क's picture

5 Apr 2017 - 1:46 am | ट्रेड मार्क

+१

यश राज's picture

4 Apr 2017 - 7:19 pm | यश राज

मस्त लिहीलय .....

पैसा's picture

4 Apr 2017 - 7:40 pm | पैसा

किती सुंदर लिहिलंस!!

शिवोऽहम्'s picture

4 Apr 2017 - 7:55 pm | शिवोऽहम्

पण कविता संदीप खरेंची नाही, कवीवर्य बाकीबाब बोरकरांची आहे.

संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास, जीवे कासाविस झाल्याविना
तेंव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल, भुलीतली भूल शेवटली...

ओळी वाचल्या तेव्हाच काहीतरी औट ऑफ फेज झाल्यासारखे वाटले..पण पुढे लेख वाचताना विसर पडला..
छान लिहिलं पण.

अद्द्या's picture

4 Apr 2017 - 8:08 pm | अद्द्या

हो .. पण हि कविता संदीप खरेंनी रेकॉर्ड केली आहे..
चूकभूल माफी :)

शिवोऽहम्'s picture

4 Apr 2017 - 9:20 pm | शिवोऽहम्

गोष्ट फार सुंदर जमली आहे.

सांगली ते कोल्हापुर थेट बस असताना व्हाया इचलकरंजी जात होतो, तिच्याकडे बघता यावं म्हणून. ते सगळं आठवलं.

रातराणी's picture

4 Apr 2017 - 11:04 pm | रातराणी

खूप सुंदर लिहिलंय! ही कविता नाही सापडली तुनळीवर. कुठून मिळवता येईल? तुमच्याकडे एम पी थ्री आहे का? मला देता का? :)

अद्द्या's picture

4 Apr 2017 - 11:47 pm | अद्द्या

https://www.youtube.com/watch?v=q_६प्प५६क्सहसू

अमीबा's picture

5 Apr 2017 - 12:41 am | अमीबा

या लिंकवर सलील कुलकर्णींच्या आवाजात हे गीत ऐकता येईल.

दोघांनाही धन्यवाद. ही दोन्ही व्हर्जन्स सलीलच्या आवाजात आहेत. मला वाटलेलं लेखक म्हणतात ते संदीप खरेच्या आवाजात ऐकत होते म्हणून उत्सुकता वाटली. मूळ कविता अशक्य सुंदर आहे आणि काही जागा सोडल्या तर सलीलने उत्तम गायले आहे.

अद्द्या's picture

5 Apr 2017 - 10:34 am | अद्द्या

मूळ कविता अशक्य सुंदर आहे

हे मात्र अगदी खरं. माझ्याकडे दोन्ही व्हर्जन्स होते .. बघतो मिळतंय का

पिलीयन रायडर's picture

6 Apr 2017 - 7:34 am | पिलीयन रायडर

मला सलील कुलकर्णी तसा फारसा आवडत नाही. पण ही कविता चांगली म्हणली आहे. खरंच आवडली.

लेख फारच सुरेख आहे! आमचेही दिवस आठवले!

अद्द्या's picture

4 Apr 2017 - 8:09 pm | अद्द्या

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद :)

बाकी .. हि सत्यकथा आहे का हि शंका ज्यांना आहे त्यांना फक्त हेच म्हणता येईल ..
I wish

चांदणे संदीप's picture

5 Apr 2017 - 4:32 pm | चांदणे संदीप

I wish साठी = इन्शागणपती, आमेन वैग्रे!

Sandy

प्रभू-प्रसाद's picture

4 Apr 2017 - 8:44 pm | प्रभू-प्रसाद

If you wish!!

प्रभू-प्रसाद's picture

4 Apr 2017 - 8:44 pm | प्रभू-प्रसाद

If you wish!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2017 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लिहिलं आहे ! एकदम हृदयस्पर्शी !!

अजून काही वाचायला नक्की आवडेल.

संजय पाटिल's picture

5 Apr 2017 - 12:17 pm | संजय पाटिल

+१
असेच म्हणतो.

Ranapratap's picture

4 Apr 2017 - 9:11 pm | Ranapratap

मनातलं लिहिलंस, खरं असेल तर माझ्या शुभेच्यां. जितें रहो लिखते रहो

अनुप ढेरे's picture

4 Apr 2017 - 9:43 pm | अनुप ढेरे

वाह!

धर्मराजमुटके's picture

4 Apr 2017 - 9:55 pm | धर्मराजमुटके

सुंदर कथा ! आवडली.

एस's picture

4 Apr 2017 - 10:46 pm | एस

छान लिहिलंय.

छोटा चेतन-२०१५'s picture

5 Apr 2017 - 12:22 am | छोटा चेतन-२०१५

अप्रतिम

वरुण मोहिते's picture

5 Apr 2017 - 12:52 am | वरुण मोहिते

लिहिलंय .

लेखन आवडले. तुझ्या मनासारखं होण्यासाठी शुभेच्छा.

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 6:06 am | अर्धवटराव

होऊन जाऊ दे मित्रा. मिपाकर आहेतच आशिर्वाद द्यायला आणि काहि धावाधाव करायची वेळ आली तर सगळी सोय करायला. खफवर एक मॅसेज टाक फक्त. उडवुन देऊ बार च्यायला :)

अद्द्या's picture

5 Apr 2017 - 10:34 am | अद्द्या

हाहाहा.. जेव्हा असं काही हौल तेव्हा नक्कीच टाकेन खफ वर =]]

गोष्ट आवडली (शेवट चांगला आहे म्हणून).

नुमविय's picture

5 Apr 2017 - 8:14 am | नुमविय

काय बोलू... अप्रतिम...

अभ्या..'s picture

5 Apr 2017 - 8:49 am | अभ्या..

ऐ जिगर Sss खतरनाक बे

एक लंबर लिहिलाइस भावा.

नावातकायआहे's picture

5 Apr 2017 - 8:58 am | नावातकायआहे

लेखन आवडले!!

यशोधरा's picture

5 Apr 2017 - 9:15 am | यशोधरा

सुरेख लिहिलेस.

संधीप्रकाशात..

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना

तेह्वा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली

-बा. भ. बोरकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडलं. लेखन शैलीही सुरेख. म्हणजे आम्हीही तुझ्याबरोबर इडली खाल्ली. बस डोळ्यासमोर दिसली. शेवटच्या शिटावर तुम्ही दोघेही दिसलात. सुरुवातीच्या दिवसाचे प्रेमाचे क्षण गहीरे झाले. भांडनही झकास झालं. आणि काही प्रसंगांना हळवा झालो. सालं स्वत:ला कंट्रोल करता आलं नाही. लिहित राहा.

वरीजनल आयुष्यच असेलच तेव्हा तहेदिलसे शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

वरुण मोहिते's picture

5 Apr 2017 - 3:51 pm | वरुण मोहिते

हळूच जियो ची जाहिरात केली आहे . :))

चिनार's picture

5 Apr 2017 - 9:48 am | चिनार

फारच सुंदर लिखाण....!! खूप दिवसांनी इतकं चांगला वाचायला मिळालं...

(बाकी लोकांच्या लव्ह स्टोऱ्या येष्टीत कश्या काय पूर्ण होतात ते काय कळत नाही बा..आमची जिंदगी गेली अमरावती-अकोला,कारंजा,यवतमाळ,नागपूर,पुणे या रुटवरच्या येष्ट्यांमध्ये..ना कधी कोणी जुनी भेटली ना नवीन...असो. आमच्या प्रेमात तेवढी शिद्दत नसावी.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची जिंदगी गेली अमरावती-अकोला,कारंजा,यवतमाळ,नागपूर,पुणे या रुटवरच्या येष्ट्यांमध्ये..ना कधी कोणी जुनी भेटली ना नवीन

हाहाहा भारी.

-दिलीप बिरुटे

अद्द्या's picture

5 Apr 2017 - 10:37 am | अद्द्या

=]]]]
ष्टोरी असती म्हणूनच जुळतं बस मध्ये..
नाहीतर कोणी तरी तंबाकू खाणारा म्हाताराच येतो बाजूला.. आणि तो हि साला दार पाच मिनिटांनी चालत्या बस मधून थुंकत सगळीकडे शिंतोडे उडवत काहीबाही बडबडत असतो साला

संदीप डांगे's picture

5 Apr 2017 - 10:01 am | संदीप डांगे

........

अभिजीत अवलिया's picture

5 Apr 2017 - 10:34 am | अभिजीत अवलिया

लेखन आवडले ...

५० फक्त's picture

5 Apr 2017 - 11:00 am | ५० फक्त

मस्त लिहिलंय रे,

यातला अर्धा भाग अनुभवला आहे, अर्थात आज भाच्यांची गणती वाढली हे वर्तमान आहे असो..

इरसाल कार्टं's picture

5 Apr 2017 - 2:13 pm | इरसाल कार्टं

मामा झाला म्हणायचं का तुमचा?

५० फक्त's picture

5 Apr 2017 - 3:02 pm | ५० फक्त

एन टाइमस

लय भारी लिहिलंय अद्द्याभाऊ. लिहीत राहा!

पाटीलभाऊ's picture

5 Apr 2017 - 2:28 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय राव...असेच लिहीत राहा...!

मंजूताई's picture

5 Apr 2017 - 2:51 pm | मंजूताई

खूप सुंदर!

अत्रन्गि पाउस's picture

5 Apr 2017 - 3:13 pm | अत्रन्गि पाउस

जबरदस्त टेकवली आहे सिच्युएशन ....पुढचा भाग टाका खरे म्हणजे

जगप्रवासी's picture

5 Apr 2017 - 3:21 pm | जगप्रवासी

खूप छान लिहिलंय

महेन्द्र ढवाण's picture

5 Apr 2017 - 3:42 pm | महेन्द्र ढवाण

लय भारी लिहिलंय ,काय बोलू... अप्रतिम...

पद्मावति's picture

5 Apr 2017 - 3:59 pm | पद्मावति

अतिशय सुरेख!

पिशी अबोली's picture

5 Apr 2017 - 5:17 pm | पिशी अबोली

छान पिसासारखं लिहिलंय. खरं असेल तर शुभेच्छा!

फक्त त्या ओळी तेवढ्या बाकीबाबांच्या..

पुंबा's picture

5 Apr 2017 - 5:26 pm | पुंबा

अहाहा.. मस्त..

बाकी, 'अजुनी' हा शब्द कसला गोडूला वाटतो.

मी-सौरभ's picture

5 Apr 2017 - 5:32 pm | मी-सौरभ

असंच मस्त लिहीत रहा.

आणि हो, तुला तुझ्या मनातली जोडीदार मिळो म्हणुन शुभेच्छा!!

कथा ,वास्तव.. जे काय असेल ते मस्त आहे !
आपल्या तर शुभेच्छा बाबा !
आगे बढो !!

उगा काहितरीच's picture

5 Apr 2017 - 9:05 pm | उगा काहितरीच

1 नंबर लिहीलंत राव ! खरंच आवडलं !!!

उगा काहितरीच's picture

5 Apr 2017 - 9:05 pm | उगा काहितरीच

1 नंबर लिहीलंत राव ! खरंच आवडलं !!!

रुपी's picture

5 Apr 2017 - 11:06 pm | रुपी

मस्त.. छान लिहिलंय.

आज फिर उसकी याद आयी.

कौशी's picture

6 Apr 2017 - 4:26 am | कौशी

लेखन आवडले....पुढे काय झाले जरूर लिहा.

नीलमोहर's picture

6 Apr 2017 - 12:57 pm | नीलमोहर

खूप दिवसांनी खूप सुंदर काही वाचायला मिळालं,

अद्द्या, क्या बात है! जियो.
लिहीत रहा राव वरचेवर...

आनंदयात्री's picture

7 Apr 2017 - 1:38 am | आनंदयात्री

क्या बात है! कथा छान जमून आलीये.

सिरुसेरि's picture

7 Apr 2017 - 7:48 pm | सिरुसेरि

मनसु मल्लिगे