अडवाटेवरच देऊळ

ओ's picture
in जे न देखे रवी...
4 Apr 2017 - 2:51 pm

आड वाटेवरच्या देवळात ,चैतन्याचा गाभारा
नाही मुर्ती, नाही शिळा, पुजेसाठी अंतरात

रिक्त गाभाऱ्याच्या सलगीने सभामंडप आहे उभा
येता जाता वाटसरू तिथे घेतात शांत विसावा

गाभाऱ्याच्या डोक्यावरती कळसाचा मुकुट चढवला
नाही सोने ,नाही तांबे,दगडाच्या नक्षीने तो सजला

झाडे वेली पानांची भितींवर छान नक्षी रंगली
रानातल्या फुलांनी बहरुन आणखीनच शोभा वाढवली

खळ खळ वाहणारा बाजूचा ओढा ओंकार नाद करत होता
देवळातल्या आरती साठी जणू तो टाळ घेऊन तयार होता

चहू बाजूनी देवळाला वृक्षांनी वेढले होते
त्या वृक्षांवरचे पक्षीच जणू तिथले पुजारी होते

कुठे एखादा कोकीळ पहाटेची काकड आरती गात होता
शेजारतीचा मान मात्र रातकिड्यानी राखून ठेवला होता

रात्रीच्या अंधारात हि ते मंदिर स्वयं प्रकाशित दिसत होते
त्या प्रकाशा मागचे रहस्य मात्र काजव्यांनाच ठाऊक होते

आडवाटेवरच्या त्या देवळात अजूनही चैतन्याचा वास आहे
निसर्ग देवतेची पूजा तिथे अशीच अखंड निरंतर सुरु आहे

---© ओंकार जोशी

कविता

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

4 Apr 2017 - 5:32 pm | अनुप ढेरे

मस्तं! 'औदुंबर'ची आठवण झाली.