फुत्कार

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जनातलं, मनातलं
29 Mar 2017 - 8:04 pm

हिशोब ठेवता येणार नाही इतकी घरं मागे टाकून ती अवघड व्यक्ती प्रवास करते आहे. आतापर्यंतच्या प्रवासात अनेक दो-या तिच्या नाळेला जोडल्या होत्या. अनेक दिशांनी त्या दोऱ्या तिची नाळ खेचत आणि विवशतेने ती व्यक्ती त्या अगम्य शक्तींच्या निर्हेतुक खेचाखेचीत, नाळ तुटणार नाही अशा दिशेने फरफटत जाई. ती धूर्त व्यक्ती, हळूहळू एकेक दोरी कापत, आता अशा स्थितीत आहे की आपण फरफटतो आहोत याचे भान सुटले आहे. काळसर्पावर विजय मिळवल्याचा सामान्य मानवी उन्माद, तीव्र प्रकाशाने अधू झालेल्या तिच्या नजरेत गर्वाने फडकतो आहे. आणि त्या व्यक्तीला जाणीव नसली तरीही, नाळ कापल्याशिवाय आपण त्या दो-यांपासून मुक्त होणार नाही ह्याची खंत त्या मिचमिच्या नजरेत जास्त प्रबळ आहे.

या संपूर्ण प्रवासात मूक असलेल्या त्या व्यक्तीने आज प्रथमच तोंड उघडले तेव्हां त्यातून एक लवलवती सर्पील जिव्हा लपापली आणि तिने एक फुत्कार टाकला. आतापर्यंतच्या प्रवासातील एका विशिष्ट घरातून आलेल्या तीव्रप्रखर कवडशाचे व्यंगचित्र त्या फुत्कारातून रंगविल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. त्या घरातून निघालेल्या कवडशाचा कोन त्या चित्रातील व्यंगाची मात्रा ठरवतो आणि मागे सरलेल्या कित्यानेक घरातील कवडशांचा कोन आपल्या लक्षात आहे आणि आपण त्या प्रत्येक वेळी अधिकाधिक आक्रसलो आहोत हे त्या व्यक्तीच्या थेंबाएवढ्या मेंदूला जाणवले. पण त्या फुत्कारात अनेक पेग रिचवल्याची झिंग होती. असे अनेक फुत्कार टाकून पूर्ण जग आपल्या विषाने जाळून टाकण्यासाठी ती व्यक्ती आता सज्ज झाली.

कथाव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

30 Mar 2017 - 2:08 pm | राजाभाउ

कहीच कळले नाही

संदीप-लेले's picture

30 Mar 2017 - 6:10 pm | संदीप-लेले

नेहमीपेक्षा काही वेगळे लिहावे असे एकदा मनात आले. जी. ए. कुलकर्णी यांच्या गूढ भाषाशैलीचे मला फार अप्रूप होते / आहे. वेगळे लिहायचा विचार मनात आल्यावर आपोआप हे लिहून झाले.
जी. ए. कुलकर्णी यांचे लिखाण मलाही अजिबात कळत नाही. तेंव्हा वरील कथा कळली नाही यात नवल नाही.
म्हणुन मी ज्या अर्थाने रुपकं वापरली आहेत त्याचा खुलासा देतो. या वरून कथेचा पुर्ण अर्थबोध व्हावा, निदान गाभा तरी लक्षात यावा अशी उम्मीद आहे.

कथेतील घर = .प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या व्यक्तीने वेळोवेळी सामोरे गेलेल्या घटना
नाळेला जोडलेल्या दोऱ्या = प्रत्येकाला असलेले वेगवेगळे पाश - जे आपल्याला वेगवेगळ्या उलटसुलट दिशांना खेचत असतात.
काळसर्पावर .... प्रबळ आहे ... पर्यंत = सामान्य माणूस जसे स्वतःच्या सामान्य कर्तबगारीला फार मोठी कामगिरी समजतो, त्याचे थोडे गूढ चित्रण.
कवडसा = अनुभव
कवडश्याचा कोन = अनुभवाची तीव्रता
मेंदूचे आक्रसणे = अनुभवांमुळे माणूस बहुतेक वेळा अधिकाधिक एकांगी किंवा एकतर्फी विचारधारा / भूमिका घेत जातो
फुत्कार = त्या एकतर्फी भूमिकेतून आलेले विचार / आचार
झिंग = हे एकतर्फी विचार / आचार कसे योग्य आहेत याची नशा / खात्री

रुपक उलगडुन सांगितल्यावर थोड थोड कळत आहे. मनापासुन धन्यवाद.
रच्याकान मलाही जी ए खुपच आवडतात अर्थात त्यात भाषाशैलीही आलीच.

पलेशु