होऊन आज सूर्य (गझल)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 1:45 pm

होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी

माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला
झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी

केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो
त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी

युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो
भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी

बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू
ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी

पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची
बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी

जातो आहे किनारा तो गूढ लांब आता
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी?

- शार्दुल हातोळकर

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

16 Mar 2017 - 11:15 pm | चांदणे संदीप

मस्त गजल! आवडली!!

Sandy

शार्दुल_हातोळकर's picture

19 Mar 2017 - 11:16 pm | शार्दुल_हातोळकर

या गझलेवर तुमचा एकमेव असा प्रतिसाद !! __/\__

माहितगार's picture

20 Mar 2017 - 9:36 am | माहितगार

छान अवीटच, एखाद्या मिपा कट्ट्यावर तुमचे काव्य वाचने होणार असेल तर नक्कीच येऊ, आणि अर्थातच उपरोक्त गझल एखाद्या चांगल्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड होऊन मिळत असेल तर पैसे खर्च करुनही जवळ बाळगू.

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 10:02 am | प्राची अश्विनी

आवडली.

देशप्रेमी's picture

20 Mar 2017 - 11:39 am | देशप्रेमी

प्रत्येक शेरात खोल अर्थ सामावलेला आहे.

मात्र मनमोकळेपणाने एक सांगावेसे वाटते की केवळ प्रतिसाद कमी असले तरी त्याने गझलचे महत्त्व कमी होत नाही.

गौरी कुलकर्णी २३'s picture

20 Mar 2017 - 12:28 pm | गौरी कुलकर्णी २३

खुप छान गझल... थेट ह्रदयाला भिडते ! युद्धात दुःखितांच्या .....ओळी मनाला मोहवून टाकतात !! तूमच्या काव्यप्रतिभेला मनापासून सलाम !!!

वेल्लाभट's picture

20 Mar 2017 - 2:27 pm | वेल्लाभट

उत्तम ग़ज़ल... सुरेख भाव. वाह.

काही ठिकाणी अक्षरगणवृत्ताच्या नियमांत बसत नाहीये, तेही सुधारता येत असेल तर प्रयत्न करू शकतोस. पण अन्यथाही, उत्तम ! आवडली.

शार्दुल_हातोळकर's picture

20 Mar 2017 - 4:00 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद वेल्लाजी, हो नक्कीच प्रयत्न करीन अधिक सुधारणा करण्याचा !

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Mar 2017 - 2:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

सुंदर! आवडली गझल खूप! खासकरून ह्या ओळी खूपच आवडल्या -

होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी

किसन शिंदे's picture

20 Mar 2017 - 3:00 pm | किसन शिंदे

फार आवडली ब्वॉ गझल. अगदी पहिल्या दोन ओळीपासूनच पुरता गुंतत गेलो पुढील संपूर्ण गझलेत.

अनन्त्_यात्री's picture

20 Mar 2017 - 3:21 pm | अनन्त्_यात्री

....."द्यायलो , घ्यायलो, न्यायलो" या शब्दा॑पाशी मात्र अडखळलो.

शार्दुल_हातोळकर's picture

20 Mar 2017 - 3:54 pm | शार्दुल_हातोळकर

माहितगार, प्राची अश्विनी, देशप्रेमी, गौरी, वेल्लाभट, प्रसाद, किसनदा, अनन्त यात्री आपणा सर्वांना प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद !! __/\__

खरे तर रसिक वाचकांना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे प्रतिसाद देण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा वाचक प्रतिसाद लिहितच नाहीत तेव्हा साहित्यकृतीचे गुण/दोष जाणण्यापासुन कवी वंचित राहतो आणि त्याचा सल फार मोठा असतो.

या गझलला आणि माझ्या इतरही गझलांना मी चाल लावली असुन त्यांच्या काही ओळी ऐकण्यासंदर्भात व्यनितुन संपर्क साधण्यास संकोच नसावा.

वेल्लाभट's picture

20 Mar 2017 - 5:03 pm | वेल्लाभट

मिपाचा यूट्यूब चॅनल आहे... तिथे टाकण्याचा विचार करावा !

शार्दुल_हातोळकर's picture

20 Mar 2017 - 9:21 pm | शार्दुल_हातोळकर

गझला चाल लावुन तयार आहेत, पण सध्या संगीत देण्यासाठी संगीतकाराच्या शोधात आहे, त्यामुळे अद्याप रेकॉर्डिंग झालेले नाही.....