तुम्हाला कुणाचा हेवा वाटतो का?

इना's picture
इना in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 12:35 pm

हेवा, मत्सर, असूया.

च्यायला आम्ही इतकं घासून पण उपयोग नाही, कुणालाही पाठवतात साले ऑनसाईट किंवा त्याला कसं प्रमोशन मिळालं माझ्यानंतर येऊन!?

मला सगळ्या गोष्टी मिळवायला कष्ट करावंच लागतं! पण त्याला किंवा तिला किती सहज मिळते प्रत्येक गोष्ट! घर, गाडी वर्षा दोन वर्षात लगेच फॉरेनच्या ट्रिप! इथं मी साधं मुळशी नाहीतर खडकवासल्याला जाऊया म्हणलं तरी नाक मुरडतात!

माझ्या बहुतेक हातालाच चव नाही, तिनं काहीही कसंही केलं तरी ते चांगलंच होतं.

मी मोठी/मोठा असून मला घरात कुणी विचारत नाही! सगळे निर्णय लहान भाऊ/बहीण/जावेच्या हातात!

कसलं भारी सरप्राईज गिफ्ट दिलं तिच्या नवऱ्यानं/ त्याच्या बायकोनं! कसलं रोमँटिक! इथं आमच्या वाढदिवसांना चॉकलेट आणि फुलांच्या पुढे मजल जात नाही!

काय अभ्यास करतात त्याची/तिची मुलं. आणि शिवाय प्रत्येक एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीत पुढे!आम्ही तिनही त्रिकाळ शंख केला तरी पालथ्या घड्यावर पाणी!

ओळखीचं वाटतंय का हे सर्व? कधी कधी जवळच्या कुणीतरी मनातलं बोलून दाखवलेलं तर कधी कधी आपल्याच मनातले हे आवाज. I want to have what you have! म्हटलं तर अगदी क्षणभराची ही भावना पण खोल आतवर टोचत जाणारी. कधी कधी असा विचार करायची सवय लागते मनाला. एखादा क्रोनिक आजार असावा तशी. लक्षात येईपर्यंत अनेक आनंदाच्या क्षणांना, अनेक आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणीना गमावलेलं असतं.

तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे विचार मनात येणं अगदी कॉमन आहे. फक्त आपल्या नकळत ते पोखरत जातात आपल्याला. तर ही वाळवी कशी थांबवायची? असा प्रश्न गुगलबाबाला विचारल्यावर उत्तर आलं, बी ग्रेटफूल! कृतद्न्य व्हा. तुमच्या आयुष्यात असलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दलसुद्धा. तुमचं अगदी छोटंसं काम जरी कुणी केलं असेल, तुमच्याशी अगदी दोन शब्द प्रेमाचे बोलले असतील तर त्यांना धन्यवाद द्या. कुठलीही गोष्ट गृहीत धरू नका. आणि हे कधीतरी एखादा दिवस करू नका तर याची सवय लावा.

हे सगळं तत्वज्ञान वाचून एकदम छान वाटतं पण काही दिवस गेले की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात. तसं होऊ नये म्हणून हा धागाप्रपंच. थोडक्यात काय तर कुठलीही गोष्ट एकत्र केली, कुणाबरोबर केली तर उत्साह टिकून राहतो. इथं सगळे व्यायामाचे धागे काढत असतात, हाही एक मनाचा व्यायाम म्हणून करायला काय हरकत आहे? आपल्या दिवसातली कुठलीही गोष्ट/गोष्टी ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते त्या इथं लिहूया का? कधी कधी असं वाटेल की रोज रोज काय तेच तेच लिहिणार? किंवा एवढं काही घडत नसत माझ्या आयुष्यात? पण खरंच असा विचार करण्यापूर्वी एकदा लक्ष देऊन आजूबाजूला पहा. मला खात्री आहे एखादी तरी गोष्ट अशी असेल ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला कृतज्ञता नक्की वाटेल.

सुरवात मी माझ्यापासून करते,

आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की मला हा लेख लिहायचं सुचलं :)

आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की माझी तब्येत धडधाकट आहे. :)

आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की माझ्या सर्व आप्त स्वकीयांची आणि मित्र मैत्रिणींची तब्येत उत्तम आहे, कुणाच्याही मागे डॉक्टर, औषधपाणी नाही. :)

ह्या सगळ्या गोष्टी म्हणलं तर अगदीच लहानसहान पण खूप ताकत असलेल्या, त्या लिहून झाल्यावर खूप छान वाटलं. मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा शेयर करणार का इथे? दिवसातला अगदी थोडा वेळ द्या पण इथे येऊन काहीतरी जरूर शेयर करा. आंतरजालावर नकारात्मक काही वाचायला मिळायची अजिबात ददात नाही. आपण जाणीवपूर्वक चांगलं, सकारात्मक इथे या धाग्यावर लिहून कुठेतरी आशेची एक पणती तेवत ठेवूया का?

मुक्तक

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

10 Mar 2017 - 12:40 pm | संदीप डांगे

कमी शब्दात अर्थगर्भ लैहणाऱ्यांचा हेवा वाटतो,
आज मला या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते की (निरर्थक) मेगाबायटी लिहायची खास देणगी मिळाली आहे. ;-)

अजून लिहितो... :-)

हाहा! तुम्ही मेगा/गिग/टेराबायटी प्रतिसाद लिहू शकता याबद्दल अखिल मिपासदस्य कृतज्ञ असतील यात शंका नाही :)

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2017 - 12:58 pm | मराठी कथालेखक

गुगलबाबाला नेमका कसा प्रश्न विचारलात हे जाणून घ्यायला आवडेल.
बाकी पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाची लाही वाढली होती, ती कमी होवून गेले तीन चार दिवस मस्त थंड वारे वाहत आहेत, त्याबद्दल आनंद, समाधान. या सुखद वातावरणात , आज (शुक्रवारी) सायंकाळी ३० मिली मदिरा (३० चे ६० वा ९० होतीलच..) प्राशन करण्याची गृहमत्र्यांनी मोठ्या मनाने अनुमती दिलीये.. त्याबद्दल कृतज्ञता :)

इना's picture

10 Mar 2017 - 1:14 pm | इना

feeling envy help असा प्रश्न विचारला होता :)

पैसा's picture

10 Mar 2017 - 1:30 pm | पैसा

भावातीत ध्यानाने मला शिकवलंय की माणसाचं आयुष्य हीच खूप मोठी देणगी आहे. त्यासाठी आयुष्यभराची कृतज्ञता आहे. प्रत्येक अनुभव हा गुरू आहे. तो अनुभव देणार्‍यांबद्दल कृतज्ञ आहे. घरातल्या मंडळीप्रति आणि मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांप्रति कृतज्ञ आहे. या क्षणी मिपावर असलं छान वाचायला मिळालं म्हणून मिपाप्रति आणि ते आपल्याला उपलब्ध करून देणार्‍या नीलकांतबद्दल कृतज्ञ आहे.

फारच दवणीय वाटतं का? पण असू दे. हा क्षण अगदी खराखुरा होता. त्यासाठी तुम्हालाही मनःपूर्वक धन्यवाद!

अर्धवटराव's picture

6 Apr 2017 - 4:53 am | अर्धवटराव

सुंदर.

एका घडुन गेलेल्या घटनेबद्दल मालकांचा आभारी आहे.!;) =))

सस्नेह's picture

10 Mar 2017 - 2:54 pm | सस्नेह

संपादक झालात वाट्टं ?
..अभिनन्दन हो !!

संजय क्षीरसागर's picture

10 Mar 2017 - 2:24 pm | संजय क्षीरसागर

ही एकच गोष्ट सगळं जीवन कृतार्थ करुन गेली आहे.

पद्मावति's picture

10 Mar 2017 - 2:58 pm | पद्मावति

जन्माला येतांना आपण आपल्याबरोबर एक पॅकेज घेऊन येतो. त्या पॅक मध्ये सुख, दु:ख, यश, निराशा, प्रेम, वियोग सगळ्या गोष्टी असतात. फक्त कुठली गोष्ट कुठल्या प्रमाणात आहे आणि ती कधी अनुभवायला मिळेल हे मात्र आपल्याला माहित नसतं. असतं सगळंच पूर्व नियोजित, आपण फक्त अंधारात असतो. प्रत्येकाचं पॅकेज कस्टम-मेड. त्यामुळे दुसर्याला काय मिळालंय याची काळजी, हेवा न करता आपल्या वाटयाची सुख-दु:खे भोगावी आणि मग शांतपणे परतीचा रस्ता पकडावा.

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2017 - 2:41 am | पिलीयन रायडर

माझं बोलणं रोखठोक आणि मन स्वच्छ आहे ह्या बद्दल मला कृतज्ञ वाटतं. आई वडीलांच्या संस्कारांच्या कृपेने कधी पातळी सोडुन वागता येत नाही, कुणाचं नुकसान करता येत नाही, स्वार्थ साधता येत नाही. आणि मला ही मुल्य शिकवल्या गेली ह्यासाठी कृतज्ञ वाटतं.

काही लोकांच्या डोक्यात विचारांची भयंकर क्लॅरिटी असते. स्वभावात एक स्थिरता असते. आणि त्यात कोणताही आव नसतो. अशा माणसांचा फार हेवा वाटतो.
ज्यांना जगभर सुंदर ठिकाणी फिरायला मिळतं अशा लोकांचा हेवा वाटतो.
ज्यांच्या हाताला चव असते त्यांचा हेवा वाटतो.

आदूबाळ's picture

11 Mar 2017 - 2:52 am | आदूबाळ

हेवा, मत्सर, असूया.

या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हो!

इना's picture

11 Mar 2017 - 9:04 am | इना

ओह्ह मी envy या शब्दाला समानार्थी शब्द काय असं गुगलला विचारल्यावर हे उत्तर मिळालं :(
या तीन भावना थोड्याफार फरकाने एकाच कारणाने ( मला दुसऱ्याकडे जे आहे ते हवंच आहे )उगम पावतात असं वाटल्याने हे तिनही शब्द वापरले. हा अंदाज बरोबर नसेल तर तुम्ही समजावून सांगता का प्लीज?

बाकी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवस अतिशय बिजी जातो त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

इतक्या बिजी रुटीनमध्येही सकाळ संध्याकाळ घरी जेवण करणं मॅनेज होतंय याबद्दलही मी कृतज्ञ आहे.

मुलीचा डबा शाळेतून जसाच्या तसा परत येत नाही याबद्दल तर खूपच मनापासून कृतज्ञ आहे :)

चतुरंग's picture

12 Mar 2017 - 2:00 am | चतुरंग

हेवा = उत्तम लिखाण जमणार्‍यांचा मला हेवा वाटतो.
असूया = कंपनीतल्या आपल्याच बरोबरीच्या दुसर्‍या माणसाला प्रमोशन मिळालं तर असूया वाटते.
मत्सर = आपल्याला आवडणारी व्यक्ती तिसर्‍याच व्यक्तीच्या प्रेमात पडली असली तर तिसर्‍या व्यक्तीबद्दल जो वाटतो तो मत्सर.

एस's picture

12 Mar 2017 - 12:27 am | एस

हेवा वाटलाच पाहिजे, मत्सर दाटलाच पाहिजे, असूया झालीच पाहिजे. नाही झालं यापैकी काहीही, तर तुम्ही माणूस कसे? तुम्ही संत झालात!नाही का? ;-)

आज एका फ्युनरल ला जाऊन आले. आमच्या मित्राची आई गेली शुक्रवारी. तो भारतीय आहे आणि मामा - मामी जवळच्या शहरात राहतात. वडील वेगळे राहतात, भावाचं आईशी पटायचं नाही. आमच्या मित्राने त्याच्या आईचं खुप केलं , बायकोनं ही केलं- जरा सुद्धा तक्रार न करता, शेवटपर्यंत केलं. खर्चापरी खर्च केला, वेळ दिला.. आई कधी तरी जाणार हे माहिती असल्यामुळे त्यांच्यासाठी ट्रिप्स करण्यापासून ते त्यांच्या बेडरुम मध्ये त्यांच्याबरोबर हे दोघं झोपायचे - तिथपर्यंत सगळं केलं. आज तरी फ्युनरल होम मध्ये तथाकथित फॅमिली आली आणि तिथुन च गेली. भाऊ काल येऊन टाकणं टाकुन गेला... फ्युनरल ची तयारी सगळी आम्ही मित्रांनीच केली . फॅमिली ने थोडा वेळ देऊन मोठेपणाने पुढे व्हायला हवं होतं. अशा वेळी आधार वाटतो.

त्याच्या कमिटमेंटचं आज खुप कौतुक वाटलं - आणि हाकेसरशी आणि कधी कधी हाक न मारता ही धावुन येणारी फॅमिली मिळाली म्हणुन स्वतःचाच हेवा वाटला. अचानक असलेले इशुज आज अगदी छोटे आणि नगण्य वाटायला लागले. दोन्ही फॅमिलीज कडून आम्ही इथे दोघंच आहोत म्हणुन सतत येणारे सल्ले, प्रश्न , सूचना कधी त्रासदायक वाटतात पण आज त्याचं मोल कळलं !

इना's picture

14 Mar 2017 - 3:15 am | इना

सुंदर प्रतिसाद!

आनंदयात्री's picture

24 Mar 2017 - 9:13 pm | आनंदयात्री

लेखन आवडले. याच विषयाला स्पर्शून जाणारे व्हाय माय लाईफ इज सो हार्ड हे पॉडकास्ट काल ऐकले.

स्रुजा's picture

24 Mar 2017 - 11:36 pm | स्रुजा

+१ , अगदी हेच ऐकत होते आज सकाळी.

ज्यांच्या मनात जे चाल्लंय ते चेहर्‍यावर अजिबात दिसत नाही, बोलबच्चन देऊन समोरच्याला गुंगारा देऊ शकतात आणि सात अंगार्‍यावर सापडणार नाही असं सपशेल खोटं बोलू शकतात त्यांचा हेवा वाटतो.

रुपी's picture

6 Apr 2017 - 2:33 am | रुपी

छान.. लेखन आवडले.