तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
26 Feb 2017 - 12:13 pm

तुझ्या ऊन्हाचं कौतुक
किती करावं करावं
माप पदरी सुखाचं
किती भरावं भरावं

बघ तुळशीला आल्या
मखमालीच्या मंजिर्या
चिऊताईच्या दातांनी
किती खुडावं खुडावं

खिडकीच्या गजावर
झुले डांगराचा वेल
बोटभर आधारानं
वर चढावं चढावं

नंदी बसलेला दारी
गळी लेणं घुंगराचं
येताजाता भक्तीभावे
तिथं नमावं नमावं

झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं

पुण्य कुठल्या जन्माचं
आज फळुनिया आलं
भरलेल्या गोकुळात
दिस सरावं सरावं

गाणेकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Feb 2017 - 12:38 pm | पैसा

अप्रतिम सुरेख रचना!

छान आहे कविता. आवडली.

माहितगार's picture

26 Feb 2017 - 5:17 pm | माहितगार

कविता आवडली मस्तच आहे, तुमच्या बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .. अतूट काही... आणि आताची हि कविता स्त्रीत्वातील भारतीयता दाखवते. नको वाटते.. या कवितेतील स्त्री मागत असलेला 'खुला पैलतीर' कवितेची पार्श्वभूमी नाही सांगितली तर स्त्री मुक्ततावादी वाटेल पण कवितेतील 'खुला पैलतीर' अर्थ पारंपारीक भारतीय संकल्पनेतील मुक्ति मागणारा वाटतो.

प्राची अश्विनी यांच्या कविता स्त्रीयांच्या नवीन पिढी पेक्षा एखाद पिढी आधीच्या स्त्रीची भावना रेखाटतात की भारतीय स्त्रीयांची नवी पिढीही या कवितांप्रमाणे विचार करते असा एक प्रश्न सहजच मनात येऊन गेला.

माहितगार's picture

26 Feb 2017 - 5:21 pm | माहितगार

किंवा नवीन पिढीतील स्त्रीला या कवितेतील भावनांशी नाळ जुळवणे कितपत जमू शकेल ?

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2017 - 7:18 am | प्राची अश्विनी

धन्यवाद. पण बापरे , असा विचार केला नव्हता. कदाचित तुमचं म्हणणं बरोबरही असेल.

अनन्त्_यात्री's picture

27 Feb 2017 - 9:58 am | अनन्त्_यात्री

सुन्दर रचना ! फक्त " किलबिल" च्या जोडीला "चारीठाव" हा शब्द (जो चौरस व पोटभर जेवणाच्या सन्दर्भात वापरतात) थोडा खटकला.

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2017 - 10:09 am | प्राची अश्विनी

ओह्! बरं झालं सांगितलंत ते. मी सतत असं समजत होते. आता बदलते.:)

श्वेता व्यास's picture

28 Feb 2017 - 4:55 pm | श्वेता व्यास

अप्रतिम कविता आहे, मी चारीठाव म्हणजे सगळीकडे, चार दिशांना असं समजत होते.

माहितगार's picture

1 Mar 2017 - 8:52 am | माहितगार

चारीठाव सर्वसाधारण पणे आहाराच्या संदर्भाने वापरला जात असला तरी 'चारीठाव' म्हणजे दिवसातून चार वेळा खाणे अशा अर्थाने येतो का ? म्हणजे चारीठाव या शब्दाचा मूळ अर्थ दिवसाच्या चार वेळा असा असावा असे आता पर्यंत समजत आलो होतो. ऑनलाईन डिक्शनर्‍यांमध्ये हा शब्द मिळाला नाही कुणि छापील शब्दकोशातून सांगू शकेल का ?

माहितगार's picture

1 Mar 2017 - 9:08 am | माहितगार

गूगलले असता चारीठाव हा शब्द चारवेळा, चार दिशा, चौरस आहार, असाही वापरात येऊ लागल्याचे दिसते आहे. मोल्सवर्थातली नोंद मात्र 'चार ही ठाव' (Even the four, the very four, the main or preeminent four, dishes,--भात, भाजी, वरण, पोळी) A term for a decent, comfortable, or respectably-furnished feast or meal:--as disting. from घड्याळ टिपरूं &c. A poor meal--mere bread and a chili.

अशी मिळाली
संदर्भ

चांदणे संदीप's picture

27 Feb 2017 - 10:39 am | चांदणे संदीप

भरलेल्या गोकुळाचे सुरेख वर्णन, आवडले!

Sandy

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Feb 2017 - 3:43 pm | अॅस्ट्रोनाट विनय

कविता आवडल्या गेली आहे

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2017 - 6:42 pm | अत्रुप्त आत्मा

मससससससस्त!

अंजू१९७८'s picture

28 Feb 2017 - 10:53 pm | अंजू१९७८

छान आहे खूप.

निशांत_खाडे's picture

1 Mar 2017 - 12:49 am | निशांत_खाडे

छान. कविता आवडली.

dhananjay.khadilkar's picture

1 Mar 2017 - 4:03 pm | dhananjay.khadilkar

फार उत्तम

dhananjay.khadilkar's picture

1 Mar 2017 - 4:03 pm | dhananjay.khadilkar

फार उत्तम

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2017 - 4:15 pm | प्राची अश्विनी

सर्वांना धन्यवाद!!

पिशी अबोली's picture

1 Mar 2017 - 9:18 pm | पिशी अबोली

किती सुंदर!

डांगराचा वेल म्हणजे काय?

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2017 - 8:06 am | प्राची अश्विनी

अग, डांगर म्हणजे भोपळा.

साधी, सरळ, सोपी पण तितकीच आशयगर्भ! अतिशय सुंदर! :-)

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2017 - 7:42 am | प्राची अश्विनी

__/\__

फार सुंदर कविता प्राची!

वटवट's picture

3 Mar 2017 - 11:04 am | वटवट

सुंदर

मितान's picture

3 Mar 2017 - 12:24 pm | मितान

सुंदर कविता !!!

शिव कन्या's picture

1 Jun 2017 - 10:03 pm | शिव कन्या

फार सुंदर आहे सगळं. पण हे कुठेतरी हरवत चाललय हे ही खरे.
बाकी माहितगार - होय, लिहिताना नव्याची उत्सुकता उमटते, पण जुने लोभसवाणे खुणावत राहते.

रुपी's picture

1 Jun 2017 - 11:31 pm | रुपी

सुंदर कविता!

जयंत कुलकर्णी's picture

3 Jun 2017 - 7:37 am | जयंत कुलकर्णी

मस्तच.....!

प्राची अश्विनी's picture

4 Jun 2017 - 7:54 am | प्राची अश्विनी

__/\__

अतिशय सुरेख चित्रदर्शी कविता.

सानझरी's picture

4 Jun 2017 - 2:25 pm | सानझरी

+१.. असंच म्हणते.. सुरेख कविता!!

बहिणाबाईंच्या ओव्या आठवतात.

सुरेख !

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2017 - 2:29 pm | संजय क्षीरसागर

हे एकदम बरोबर आहे

झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं

चारीठाव म्हणजे सतत असा अर्थ होतो.

सांजसंध्या's picture

4 Jun 2017 - 6:03 pm | सांजसंध्या

मस्त मस्त मस्त. बहिणाईंची आठवण झाली.
असं काही वाचल्यावर मग त्यावर आणखी काही नकोच असे वाटते..

रातराणी's picture

5 Jun 2017 - 11:47 pm | रातराणी

फार सुरेख!

इरामयी's picture

19 May 2019 - 6:13 pm | इरामयी

प्रत्येक स्त्रीचं स्वप्न ... कदाचित पुरुषांचंही.

प्राची अश्विनी's picture

20 May 2019 - 9:47 am | प्राची अश्विनी

:) धन्यवाद!