न्यू यॉर्क : २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Feb 2017 - 11:23 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

मॅनहॅटनच्या अपर वेस्ट साइडमध्ये आणि सेंट्रल पार्कला लागून असलेल्या "अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" ची गणना जगातल्या अतिविशाल संग्रहालयांमध्ये होते. शहरामधील चार ब्लॉक्सच्या १७ एकर (६९,००० चौ मी) क्षेत्रफळावर पसरलेल्या "थिओडोर पार्क"मध्ये ते आहे. सन १८७७ ला जनतेला खुले झाल्यानंतर, या संग्रहालयात नवनवीन संग्रह आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अधिकाधिक इमारतींची भर पडत आली आहे. या संग्रहालयातल्या एकमेकाला जोडलेल्या २८ इमारतींमध्ये ४५ स्थायी संग्रह दालने, एक तारांगण, एक ग्रंथालय आणि अनेक समयोचित/तात्पुरती संग्रह दालने आहेत. या संग्रहालयाच्या बांधणीत, वृद्धीत आणि जोपासनेत अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचा, नामवंत अमेरिकन व्यक्तींचा आणि धनाढ्यांचा हातभार लागला आहे. येथे प्राणी, वनस्पती, अश्मीभूत अवशेष, अश्म, खनिजे, उल्का, मानवी संस्कृतींचे अवशेष, इत्यादी गोष्टींचे एकूण ३.३ कोटींपेक्षा जास्त नमुने संग्रहित आहेत ! अर्थात,१९०,००० चौ मी (२० लाख चौ फूट) इतके मोठे क्षेत्रफळ असले तरी या महासंग्रहालयात त्यातले फक्त निवडक नमुनेच एका वेळेस बघण्यासाठी उपलब्ध करणे शक्य होते. या संग्रहालयाला दरवर्षी ५० लाखांवर पर्यटक भेट देतात.

संग्रह प्रयोगशाळा (Exhibitions Lab)

कार्ल एथन अ‍ॅकली याने सन १८६९ मध्ये जगात प्रथमच स्थापन झालेल्या "संग्रह प्रयोगशाळा" या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाने जमवलेल्या वस्तूंचा संग्रह तयार करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे यासाठी कामी येणार्‍या अनेक भौतिक शास्त्रांचा (प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इ) व कलांचा (चित्रकला, फोटोग्राफी, मल्टिमेडिया, इ) संगम घडवून त्यांना शास्त्रीय बैठक दिली. तो इतका यशस्वी ठरला की येथे केलेल्या प्रयोगांचे जगभर अनुकरण केले गेले आहे आणि उत्तम संग्रहालयासाठी "संग्रह प्रयोगशाळा" ही एक अत्यावश्यक व्यवस्था समजली जाऊ लागली. या सुधारणेमुळे, जगभरच्या संग्रहालयांना भेट देण्यार्‍या पर्यटकांचा अनुभव, अधिक रोचक, आनंददायी व ज्ञानवर्धक झाला आहे. सद्या इथल्या प्रयोगशाळेत ६० पेक्षा जास्त कलाकार, लेखक, संग्रह तयार करणारे कर्मचारी, डिझायनर आणि प्रोग्रॅमर काम करत आहेत. ते दर वर्षी २-३ खास प्रदर्शने/शो तयार करतात. त्यांचे अमेरिकेतील इतर संग्रहालयामध्येही प्रदर्शन केले जाते.

संशोधन ग्रंथालय, संशोधनकार्य आणि शैक्षणिक कार्य

संग्रहालयाच्या चवथ्या मजल्यावरचे संशोधन ग्रंथालय अभ्यागतांनाही उघडे असते. त्याच्या विशाल संग्रहात शेकडो विषयांवरील पुस्तके आहेत. संशोधक, संग्राहक, प्रवासी-शोधक, अमेरिकन एथ्नॉलॉजिकल सोसायटी, न्यू यॉर्क अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इत्यादींच्या उदार ग्रंथ/ग्रंथसंग्रहांच्या देणग्यांमुळे इथल्या माहितीसंसाधनांची (पुस्तके, चलतचित्रे, चित्रे, प्रकाशचित्रे, पत्रके, स्मृतिचिन्हे, इत्यादींची संख्या ५५०,००० ओलांडून पुढे गेली आहे. त्यात काही १५व्या शतकातील दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे.

येथे २२५ संशोधक पूर्णवेळ काम करतात. ते दर वर्षी जगभरातल्या विविध ठिकाणी १२० पेक्षा जास्त शास्त्रीय मोहिमा फत्ते करतात. याशिवाय हे संग्रहालय शिक्षणक्षेत्रातही काम करते. त्याच्या अधिकारातील महाविद्यालयात "मास्टर ऑफ आर्ट्स इन सायन्स टिचिंग" व "पीएचडी इन कंपॅरेटिव बायॉलॉजी" या मान्यताप्राप्त उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालविले जातात. त्यात भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना संग्रहालयात काम करणार्‍या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन तर होतेच पण तिथल्या कोट्यवधी नमुन्यांच्या प्रत्यक्ष अभ्यासाचा अमूल्य फायदा सहजपणे मिळतो.

सामाजिक प्रसिद्धी साधनांमधिल हजेरी

या संग्रहालयाचा उल्लेख दहापेक्षा जास्त कादंबर्‍यांत आला आहे; याच्या वेगवेगळ्या सदनांचे सातपेक्षा जास्त चलतचित्रपटांमध्ये चित्रीकरण झालेले आहे आणि साधारण आठ टीव्ही मालिकांमध्ये त्यांच्या पार्श्वभूमीचा उपयोग केलेला आहे. इतकेच नव्हे तर या संग्रहालयाच्या पार्श्वभूमीचा 'Grand Theft Auto IV', 'Manhunter: New York' आणि 'Parasite Eve' या तीन व्हिडिओ गेम्समध्ये उपयोग केला गेला आहे.

तर अश्या नावाजलेल्या संग्रहालयाला भेट न देणे अशक्य होते. त्याच्यासाठी एक अख्खा दिवस राखून ठेवला होता. सकाळी न्याहारी आटपून निघालो.

वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे

हे संग्रहालय मध्यवर्ती ठिकाणी व सेंट्रल पार्क वेस्ट अ‍ॅव्हन्यूला जोडलेल्या सबवेच्या थांब्याजवळच आहे. तरीही सबवेच्या गुहेमधून बाहेर आल्यावर थिओडोर पार्कच्या उंच्यापुर्‍या हिरव्या झाडीमध्ये झाकून गेल्यामुळे त्याची थोडीशी शोधाशोध करावी लागली. मात्र झाडी ओलांडून जरा पुढे आल्यावर त्याचे रोमनस्क शैलीतले भारदस्त प्रवेशद्वार दिसले. प्रवेशद्वारासमोर घोड्यावर आरूढ थिओडोर रुझवेल्टचा पुतळा आहे...


सेंट्रल पार्क वेस्ट अ‍ॅव्हन्यूवरचे संग्रहालयाचे रोमनस्क शैलीतले प्रवेशद्वार

या संग्रहालयाला ७७ स्ट्रीटवर पारंपरिक किल्ल्यासारखे दिसणारे अजून एक प्रवेशद्वार आहे. या बाजूच्या दर्शनी भागात 'ब्लॅक चेरी' लाकडापासून बनवलेल्या व काळजीपूर्वक जतन केलेल्या ६५० खिडक्या आहेत...


७७ स्ट्रीटवरचा किल्ल्यासारखा दिसणारा संग्रहालयाचा दर्शनी भाग आणि प्रवेशद्वार

सेंट्रल पार्क वेस्ट अ‍ॅव्हन्यूवरील प्रवेशद्वाराच्या पायर्‍या चढून आत शिरल्यावर एक रोमन बॅसिलिका शैलीत बांधलेला Theodore Roosevelt rotunda नावाचा प्रशस्त आणि उंचापुरा स्वागतकक्ष लागतो. तिथे मिळालेल्या माहितीवरून कळले की त्या दिवशी संग्रहालयात पाच विशेष कार्यक्रम/संग्रह प्रदर्शित केले जात आहेत. सगळे स्थायी संग्रह पाहण्यात रस होताच, पण तरीही कोणत्याही संग्रहालयांतले खास अस्थायी कार्यक्रम काहींना काही अधिक रोचक माहिती व अनुभव देऊन जातात. त्यामुळे त्यांना चुकवणे मला जमत नाही.

त्या वेळेस चालू असलेले खास कार्यक्रम/प्रदर्शने अशी होती :
१. हेडन तारांगणातला "डार्क युनिव्हर्स" शो
२. ल फ्राक थिएटरामधील "नॅशनल पार्क्स" शो
३. फुलपाखरे संवर्धनगृहातील (बटरफ्लाय काँझरवेटरी) मधील अनुभव
४. गॅलरी ३ मधील "सीक्रेट वर्ल्ड इनसाईड यू" प्रदर्शन
५. ल फ्राक फॅमिली गॅलरीतील "डायनॉसॉर्स अमाँग अस" प्रदर्शन

इथल्या सर्व खास कार्यक्रमांना वेळ ठरवून प्रवेश आहे हे माहितीपत्रकावरून दिसले. अनेक इमारतींच्या पाच मजल्यांवरच्या अनेक दालनांत असलेले स्थायी संग्रह व अस्थायी खास कार्यक्रम पाहण्यात बरीच तारांबळ होणार हे कळून चुकले होते ! त्यामुळे सगळे खास कार्यक्रम बघायला प्राधान्य द्यायचे व त्यांच्यामधल्या वेळेत, एकाकडून दुसर्‍या कार्यक्रमाकडे जाताना, वाटेत येणारे स्थायी संग्रह पाहायचे असा ढोबळ कार्यक्रम ठरवला. स्वागतकक्षात एटिएम सारख्या दिसणार्‍या तिकिटाच्या १०-१२ मशीन्सची रांग होती. त्यातले एक निवडले व त्याच्या स्क्रीनवर सर्व कार्यक्रमांची माहिती भरून, स्लॉटमध्ये कार्ड सरकवून, तिकिट छापण्याचे बटण दाबले. मशीनने $३५ मिळाल्याबद्दल आभार मानले पण ते बेटे तिकीट काही छापेना ! नशिबाने मशीनच्या स्क्रीनवर माझ्या बुकिंगचे व पैसे मिळाल्याबद्दलची सूचना कायम होती. शेजारीच एक माहिती पुरवणारी स्वागतिका होती, तिला साद घातली. तिनेही मशीनबरोबर जराशी खुडबूड करून पाहिली, पण त्याने तिलाही दाद दिली नाही. शेवटी तिने मला तेथून पन्नास एक मीटरवर असलेल्या मॅनेजरच्या डेस्ककडे जायला सांगितले. पण तो माझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवेल असे विचारल्यावर, तिने तोवर तिथेच उभी राहून किल्ला... आपले मशीन... लढवत राहण्याचे आश्वासन दिले. नाहीतर मध्येच कोणी ते मशीन वापरले तर स्क्रीनवरचा माझा सर्व पुरावा नाहीसा झाला असता.

मी मॅनेजरकडे गेलो तर तो त्याच्या डेस्कवर नव्हता. शेजारच्या डेस्कवरच्या तरुणीने तो थोड्याच वेळात येईल असे दोन-तीनदा सांगत माझी महत्त्वाची दहा मिनिटे खर्च केली. पहिल्या अस्थायी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसा माझा पारा वर जात होता. जरा आक्रमक आवाजात मला इतका वेळ वाट पाहत ठेवल्याबद्दल तक्रार केली. मग मात्र तिने बाजूलाच, दोन डेस्क दूर, असलेल्या डेस्कवरच्या तरुणीशी गप्पा मारत असलेल्या तरुणाला (मॅनेजरला) हाक दिली. तो लगेच त्याच्या डेस्कवर आला. त्याला सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्याच्या चेहर्‍यावरील जरासे अविश्वासाचे भाव पाहून मी वापरलेल्या मशीनकडे पाहिले. तिथली स्वागतिका मशीनजवळ उभी राहून पर्यटकांशी बोलत होती. बहुदा तिने दिलेल्या शब्दाप्रमाणे ते मशीन इतर कोणाला वापरू दिले नसावे. मॅनेजरला तिला सगळे माहीत आहे हे सांगताना माझा हात तिच्या दिशेने गेला. कस्टमर सर्विसबद्दल जागृत असलेल्या तिचा एक डोळा आमच्याकडे होता. तिनेही "तो म्हणतोय ते बरोबर आहे" अश्या अर्थाने हात उंचावून हालवला. मॅनेजरची खात्री पटल्यावर मात्र त्याचा नूर एकदम मित्रत्वाचा झाला. त्याने स्वतःचा लॉगईन वापरून मी म्हटले तसे सर्व खास कार्यक्रमांसकटचे तिकीट देण्याचे कबूल केले. मग मात्र, "मी पहिल्यांदाच येथे आलो आहे. आता हे वेगवेगळ्या इमारतींच्या वेगवेगळ्या मजल्यांवर असलेले सगळे खास कार्यक्रम वेळेत जागेवर पोचून कसे पाहता येतील हे तूच ठरवून तश्या वेळा बुक कर." असे सांगून त्याच्या मैत्रिपूर्ण व्यवहाराचा पुरेपूर वापर करून घेतला ! त्यानेही सुस्मित चेहर्‍याने सर्व बुकिंग्ज करून मला कुठून कसे गेल्यास जास्त बरे हे पण समजवून सांगितले. ते विसरू नये यासाठी त्या कार्यक्रमांच्या वेळा आणि जागा माहितीपत्रकावरच्या त्याने नकाश्यावर लिहाव्या असे मी सुचवले आणि त्याने ते आनंदाने केले. त्याच्या या मदतीविना, ते सर्व कार्यक्रम आणि स्थायी संग्रह एका दिवसात पाहणे केवळ अशक्य झाले असते, हे संग्रहालयाच्या भुलभुलैयात वारंवार वाट चुकताना मला सतत जाणवत राहिले आणि मॅनेजरला अनेकदा धन्यवाद मिळत राहिले !

तर अश्या रितीने माझी एका अनपेक्षित समस्येतून सुटका तर झालीच पण वर मॅनेजरच्या अधिक सौजन्याचा फायदाही झाला. या संग्रहालयातील चक्रव्यूहाची आणि त्यातल्या खास कार्यक्रमांच्या जागांची रचना खालील नकाश्यात पाहिल्याशिवाय मी काय म्हणतो आहे हे नीट ध्यानात येणार नाही...

  
  

खास कार्यक्रमांच्या जागा व वेळांच्या नोंदींसह संग्रहालयाचा नकाशा

तर, अशी माहितीरूपी आयुधे सज्ज करून आम्ही चक्रव्यूहावर हल्ला करण्यास तयार झालो. सुरुवातीलाच भल्या मोठ्या आणि उंचच उंच दालनातल्या "अ‍ॅलोसॉरसपासून आपल्या बछड्याचे संरक्षण करणारी महाप्रचंड बॅरोसॉरस माता" असा प्रसंग रंगवणार्‍या तीन सापळ्यांच्या रचनेने स्वागत केले. हे प्रचंड आकाराचे सापळे आपल्याला संग्रहालयाच्या भव्यतेची आणि त्यातील संग्रहांच्या ताकदीची पुरेपूर जाणीव देतात. त्या भव्य दालनाच्या भिंतींवरील चित्तवेधक चित्रेही आपले लक्ष वेधून घेतात...


अ‍ॅलोसॉरसपासून आपल्या बछड्याचे संरक्षण करणारी महाप्रचंड बॅरोसॉरस माता (सांगाडे) ०१


अ‍ॅलोसॉरसपासून आपल्या बछड्याचे संरक्षण करणारी महाप्रचंड बॅरोसॉरस माता (सांगाडे) ०२

सरळ क्रमाने संग्रहालय पाहिले तरी एक-दीड किलोमीटर चालणे सहजपणे होते. खास कार्यक्रमांच्या वेळा साधणे महत्त्वाचे असल्यामुळे मला हे संग्रहालय एक बाजू पकडून क्रमाक्रमाने बघणे शक्य झाले नाही. उलट्या सुलट्या फेर्‍या घालत का होईना पण प्रत्येक दालनाला हजेरी लावण्याचा माझा मनसुबा मी पुरा केलाच. मात्र, त्यासाठी दिवसभरांत डझन-दीड डझन वेळा तरी जिन्यांवरून वरखाली करावे लागले आणि एकदोन किलोमीटर तरी जास्त चालावे लागले. एकाच भेटीत सगळे आटपायचे म्हणजे हा आटापिटा करणे जरूर होते.

टीप : या संग्रहालयातली बहुतेक दालने (बहुतेक, संग्रहित प्राण्याची प्रतिकृतीमधली कातडी प्रखर प्रकाशाच्या परिणामाने खराब होऊ नये यासाठी) बर्‍यापैकी अंधारी आहेत. योग्य प्रकाशाच्या अभावात काढल्यामुळे आलेल्या फोटोंच्या प्रतीमधील कमतरतेसाठी क्षमस्व.

आफ्रिकन सस्तन प्राण्यांचा अ‍ॅकली हॉल (Akeley Hall of African Mammals)

वर उल्लेख आलेला कार्ल एथन अ‍ॅकली (१९ मे १८६४ ते १८ नोव्हेंबर १९२६) हा जगप्रसिद्ध अमेरिकन जीवशास्त्रज्ञ, शिल्पकार, संवर्धनतज्ज्ञ, संशोधक, निसर्गप्रकाशचित्रणकार आणि टॅक्सिडर्मिस्ट (मृत प्राण्यांची कातडी व इतर अवशेष वापरून त्याच्या मूळ रूपाची प्रतिकृती तयार करण्याची कला) होता. त्याला "फादर ऑफ मॉडर्न टॅक्सिडर्मी" समजले जाते. त्याच्या अनेकविध प्रतिभांची अनेक प्रसिद्ध अमेरिकन संग्रहालयांना मदत मिळाली आहे. त्यातही विशेषतः, फील्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी आणि अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी (AMNH) यांना त्याचे खास योगदान मिळालेले आहे. त्याने AMNH मध्ये संग्रहालय प्रयोगशाळा (AMNH Exhibitions Lab) स्थापन करून संग्रहालयाच्या स्थापनेत जरूर असणार्‍या अनेक शास्त्रांचा संगम करवून त्यांच्यामध्ये परस्पर पूरक संयुक्त संशोधन करण्याची परंपरा सुरू केली. संग्रहालय प्रयोगशाळांमुळे, आज जगप्रसिद्ध समजल्या जाणार्‍या अनेक संग्रहालयांची प्रत आणि उपयुक्तता वाढवली आहे.

या त्याच्या योगदानाच्या सन्मानार्थ AMNH मधल्या या एका मोठ्या विभागाला त्याचे नाव दिले गेले आहे. Theodore Roosevelt rotunda ला लागून असलेल्या या विभागाच्या दोन मजल्यांवर आफ्रिकेतील सस्तन प्राण्यांच्या व त्यांच्या पर्यावरणाच्या वैविध्याचे बारकावे प्रदर्शित करणारे २८ संग्रह (dioramas) आहेत.

सर्वात मध्यभागी, हल्ल्यापासून संरक्षण करणार्‍या रचनेच्या स्वरूपात ('alarmed' formation) आठ आफ्रिकन हत्तींचा कळप उभा आहे. ही भव्य रचना फोटोच्या एका चौकटीमध्ये बसवणे कठीण आहे. आजूबाजूला फेरी मारून बघताना हे हत्ती आपल्यावर चालून येतील की काय असे वाटावे इतक्या उत्तम रितीने त्यांची पुनर्रचना केली आहे...

  
अ‍ॅकली हॉलच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीतून दिसणारी आफ्रिकन हत्तींची रचना

हा विभाग ८० वर्षांपूर्वी प्रथम निर्माण केला गेला. त्या वेळेस अफ्रिकन जंगलात सर्वसामान्य असलेल्या प्राण्यांच्या अनेक प्रजाती अनिर्बध जंगलतोडीमुळे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही, आनंदाची गोष्ट अशी की, कार्ल अ‍ॅकलीने तेथे सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांमुळे (उदा : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील विरुंगा नॅशनल पार्क) त्यातली एकही प्रजाती अजून पूर्णपणे नष्ट झालेली नाही.

या संग्रहांचे वैशिष्ट्य असे की दर प्राण्याबरोबर त्याची पार्श्वभूमीही नैसर्गिक वाटावी इतकी हुबेहूब बनवलेली आहे...

  
  
  
आफ्रिकन प्राण्यांचे व पक्ष्यांचे काही संग्रह

आफ्रिकन संस्कृती

आफ्रिकेतील अनेक संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणार्‍या या संग्रहात तेथील मानवी समूहांच्या वापरातल्या अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या रोजच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे दर्शन घडवणारे संग्रह आहेत. त्यापैकी काही निवडक संग्रहांचे फोटो...

  
  
  
आफ्रिकन संस्कृतीचे दर्शन करवणारे संग्रह

आशियाई सस्तन प्राण्यांचा वेर्नी-फाँथोर्प हॉल (Vernay-Faunthorpe Hall of Asian Mammals)

Theodore Roosevelt Rotunda च्या डाव्या बाजूला असलेल्या या विभागातील भारत, नेपाळ, ब्रह्मदेश व मलेशियातील प्राण्यांचे १८ संग्रह आहेत. येथेही दोन आशियाई हत्तींचा संग्रह केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती इतर संग्रह रचलेले आहेत.


आशियाई हत्ती

  
  
आशियाई प्राणी

आशियन संस्कृती


    
आशियन संस्कृती दालनामधील काही संग्रहांचे फोटो ०१

  
  
  
  
आशियन संस्कृती दालनामधील काही संग्रहांचे फोटो ०२

उत्तर अमेरिकन सस्तन प्राण्यांचा बर्नार्ड फॅमिली हॉल (The Bernard Family Hall of North American Mammals)

या मोठ्या विभागात मेक्सिकोच्या उत्तरेकडील अमेरिकन खंडातील लहान मोठ्या प्राण्यांचे ४३ संग्रह आहेत. तेथील काही निवडक फोटो...

  
  

उत्तर अमेरिकन प्राणी

उत्तर अमेरिकन पक्षांचा सॅनफर्ड हॉल (Sanford Hall of North American Birds)

संग्रहालयाच्या सुरुवातीपासून, सन १९०९ पासून, असलेल्या या विभागात उत्तर अमेरिकन पक्षांचे एकूण २५ संग्रह आहेत.

  
  
उत्तर अमेरिकन पक्षी

सरपटणार्‍या प्राण्यांचा विभाग (Hall of Reptiles and Amphibians)

या भागात सरपटणार्‍या प्राण्यांच्या उत्क्रांती, रचना (सापळे) आणि जीवनावर आधारलेले संग्रह आहेत.


  
  
सरपटणारे प्राणी

सागरी जीवनाचे मिलस्टाईन दालन (Milstein Hall of Ocean Life)

छतापासून टांगून ठेवलेला मूळ आकारातील २९ मीटर (९४ फूट) लांबीचा भव्य नील देवमासा (ब्ल्यू व्हेल) या विभागाचे डोळ्यात भरणारे मुख्य आकर्षण आहे...

    
नील देवमासा

  
सागरी प्राणी

आर्थर रॉस उल्कादालन (Arthur Ross Hall of Meteorites)

या दालनात ग्रीनलँडमध्ये अहनिघितो (Ahnighito) या जागी सापडलेल्या २०० टन वजनाच्या उल्केचे तुकडे आहेत. त्यातला ३४ टन वजनाचा एक तुकडा वजनाने जगातली सर्वात मोठी उल्का आहे. या अवजड दगडाला उभा ठेवण्यासाठी आधार देणारे स्तंभ जमिनीतून खाली जात इमारतीखालच्या खडकामध्ये घुसवलेले आहेत...


अहनिघितो (Ahnighito) उल्केचा ३४ टन वजनाचा तुकडा

मॉर्गन मेमोरियल रत्नदालन (Morgan Memorial Hall of Gems)

या दालनात नैसर्गिक अवस्थेत असलेल्या रत्नांबरोबरच, संग्राहकांनी दान केलेल्या पैलू पाडलेल्या रत्नांचे आणि रत्नजडित दागिन्यांचे अनेक नमुने आहेत. संग्रहालयाच्या ताब्यात एकूण तब्बल एक लाखापेक्षा जास्त हिरे माणके आहेत. त्यातला एक पुष्कराज (topaz) तब्बल २७० किलो (५९६ पाउंड) वजनाचा आहे, तो खडा म्हणणे विनोदी वाटते !...

  
  

रत्नदालनातले काही नमुने आणि २७० किलो वजनाचा पुष्कराज

चालून चालून पाय दमले होते आणि भूकही लागली होती. तेव्हा थोडे मध्यांतर घेऊन उदरभरण केले. संग्रहालयाच्या रेस्तराँमध्ये ही चक्क रंगीबेरंगी m&m जेम्सनी सजवलेली आकर्षक कुकी मिळाली...


पायांना जरासा आराम मिळाला आणि पोटाचीही सोय झाली तसे मोठ्या उत्साहाने मोहीम परत सुरू केली.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

15 Feb 2017 - 8:55 am | चौकटराजा

या संग्रहालायात बर्‍याच चित्रपटांचे शुटींग विशेष्तः तो प्रचंड सांगाडा ज्या ठिकाणी ठेवला आहे तेथील. मॅमथ नावाचा एक हत्ती पुरातन काळी होता काय ?
आपल्या तिकिटाच्या किश्यासारखे अनुभव ( इष्टापत्ती) मला ही आलेले आहेत. तो सरपटणार्‍या प्राण्याचा लांग सांगाडा ... अबब . असाच एक मत्स्याचा सांगाडा बडोदा येथील संग्रहालयात आहे. अहनिघितो वरून पुण्यात ३ फुटावरून पाहिलेल्या चांद्र अश्मांची आठवण झाली. सगळ्यात गंमत शेवटच्या फोटोत आली. केळ्याशेजारी ती कुकी आहे ना तो मला रत्नांच्या संग्रहालयातील एक ऐक्झीबीट आहे असेच वाटले )))))) .

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2017 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

तो तीन सापळ्यांचा संग्रह आणि त्याच्या भव्यतेमुळे आणि सादरीकरणामुळे संग्रहालयाच्या भेटीच्या सुरुवातीलाच मनावर नक्कीच गाढ प्रभाव पाडतो.

Elephantidae family मधील मॅमथ (Mammuthus उर्फ Mammoth) हे आज दिसणार्‍या आधुनिक आशियाई हत्तींचे एक प्राचीन चुलत कुटुंब (genus) होते. त्यांच्यात अनेक प्रजाती (species) होत्या. पण आकाराने आधुनिक हत्तींपेक्षा मोठ्या व लांब सुळे असलेल्या प्रजाती जास्तकरून प्रसिद्ध आहेत. सर्व Mammuthus प्रजाती कालाच्या ओघात पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यांच्या शेवटच्या प्रजातीचा अंत सुमारे ४ ते ४.५ हजार वर्षांपूर्वी झाला.

Elephantidae कुटुंबाची वंशावळ खालच्या चित्रात पाहता येईल (जालावरून साभार)...

ती m&m जेम्स लावलेली कुकी रत्नदालनात शोभून दिसेल अशीच होती :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2017 - 1:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी धन्यवाद !