उल्फत 2

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
10 Feb 2017 - 10:32 pm

एक

_______________________________________________________________

"तुझ्यासारखा भंगार माणूस एमबीए कसा करु शकतो?" हा प्रश्न होता भालचंद्रला. नेहमीच ऐकू येणारा. यावेळेस तुकारामने विचारला. त्याचं धाडस भलतंच वाढलेलं दिसतंय.

मी अर्धवट झोपेत होतो. आणि या दोघांचीही कुरबूर माझ्या कानावर पडत होती. मी उठून घड्याळ बघितले. अकरा वाजले होते. ते नेहमीच वाजतात. आजही वाजले.

"आणि तू डिप्लोमा करुन लय उपाxली का?" भालचंद्र बहुतेक चिडला होता. त्याच्या बोलण्यात एकप्रकारचा दम होता.
'uthlas ki nahi?' हा एसएमेस होता. माझ्यासाठी. मी 'gm' करुन परतवून लावला.

तुकाराम बुटाच्या लेस बांधत होता. मी म्हणालो, आज एवढा उशीर?
तो म्हणाला, आज साईटवर चाललोय.

"तो करप्ट माणूस हाय पाटील, द्या सोडून." जाडजूड पुस्तक वाचत बसलेल्या भालचंद्रचे सारे लक्ष आमच्याकडेच होते.
मग तुकाराम "झxलं तुला" म्हणत बुटाडं टाक टाक वाजवत निघून गेला.

मी बादली आणली. हिटर लावला. आंघोळ केली. तोंडावर स्नो वगैरे चापडून घेतला.
भालचंद्र मनापासून अभ्यास करताना आढळला.
"काय रे येतोस का नाष्ट्याला?" मी म्हणालो.
"नाही रे झालाय माझा, तू जाऊन ये" तो म्हणाला.

मी कपडे घातली. अगदी आमच्या दारासमोर दार असलेली मुमताज खाली बसून भांडी घासताना दिसली. तिचं घर पत्र्याचं आहे. दोन खोल्या. बरंच सामान आतमध्ये ठेवलं असणार. तिचा नवरा म्हणे रिक्षा चालवतो. आणि तो आजपर्यंत एकदाही दिसला नाही. नाही म्हणायला एक म्हातारा मात्र रोज रात्री तिच्याकडे जेवायला येतो.

ती म्हणाली, "भैय्याजी, आपकी जो चड्डी है ना, उधर डालो"
खरंतर ती माझी नव्हती. आणि ती काय चड्डी नव्हती. चांगला बर्मुडा होता.
मी भालचंद्रला म्हटलं, "तुझी आहे का रे?"
तो म्हणाला, "नाही नाही, त्या तुक्याची असेल"
सालं काय काय करावं लागतं या गलिच्छ वस्तीत. ती चड्डी उचलून मी आमच्या तारेवर टाकली.

जाता जाता माझ्या लक्षात आलं म्हणून मी भालचंद्रला विचारलं, "काय रे, तू गेला नाहीस कॉलेजला?"
तो म्हणाला, "आज तिथं शरद पवार येणार हायेत. मी कशाला जाऊ?"

****

मी नाष्टा करायला गेलो ते एक बरं हॉटेल होतं. खुर्चीवर बुवा बसलेला आढळला. आयफोनवर बोलत मालक आला.
"वेफर्स हाईत देवा, घ्या" त्यानं पाकीट फोडून प्लेटमध्ये ठेवलं.
"हरी ओम. थंड काय आसंल तर बघा" भगव्या कफनीतला बुवा. दाढी पांढरी हातभर. डोक्याला भगवे शेलाटे. गळ्यात, हातात, मनगटावर माळाच माळा.
"माऊंटेन ड्यू?"
"स्प्राईट बघाना आसंल तर.."

मग बाटली फुटली. थंडगार लिक्विड पिऊन बुवा सुखावला. 'ओssब' करुन ढेकरपण दिली. मग साग्रसंगीत पूजा. मालकाच मुंडकं बुवाच्या पायावर.
"येत चला. या लाईननं आला की दुसऱ्या फाट्यावर हे आपलं हाटेल"
धन्य धन्य तो मालक.

मग टोमॅटो फ्लेवरचं अजून एक पाकीट घेऊन बुवा गेला.

गर्दी तशी नव्हतीच. वडापाव खात मी एका बाकड्यावर बसलो. वाटलं, की या मालकाला विचारावं, की हा बुवा कोण होता? तुमच्याकडे कसा काय? किंवा बाकी कसं काय?
पण मी काही बोललो नाही.

एक ब्लँक एसएमेस आला. एडीट करुन मी एखादी स्पेस तरी दिलीय का बघितलं. पण ती नव्हती. तो एसएमेस मी डिलीट केला नाही. तसाच ठेवला.

बाहेर आलो तेव्हा बुवा कुठं दिसतोय का बघितलं. पण तो काही दिसला नाही. तसंही त्याला मी का शोधायचं. हा एक वेडगळपणाच होता. नेहमीच्या रस्त्यानं घरी परतण्याऐवजी मी वेगळी वाट पकडली.

जरा झोपडपट्टी सदृश्य भाग सोडल्यास पुढं सगळं ओकंबोकंच लागलं. जमीनीला वेगवेगळ्या खुणा केलेल्या आढळल्या. शेताला बांध घालतो तश्याच. बाभळीची तुरळक झाडेही दिसली.
एक झोपडी. भिंतीला उभा केलेला पत्रा. त्याच्या सावलीत पडलेला बाप. आणि बोचक्यात गुंडाळलेलं ते बाळ. रखरखतं उन आणि हे उजाड माळरान.

हि दुपार किती उध्वस्त आहे.

***

रुमवर परत आलो तेव्हा सुदीप कपडे धूत होता. दरवाज्यापाशीच एक सपाट दगड आहे तेथेच त्याची धुलाई चालते. कधी कधी सकाळी आंघोळही तो तेथेच करतो. न जाणो त्याच्या उघड्याबंब शरिराकडे मुमताज कुठुणतरी पाहत असावी.

कोपऱ्यात एक गाठोड होतं. प्रथमच दिसलं.
मी म्हटलं, कशाचं आहे?
सुदीप म्हणाला, "बेडशीट. पिलोकव्हर."
मला वाटलं यानं नवीन व्यवसाय सुरु केला की काय.

"डॉक्टरांना द्यायला लागतं. भेट म्हणून." तो म्हणाला.
हे बरंय. औषधं विकायला म्हणून डॉक्टरांना दिलेली ही एक प्रकारची लाचंच आहे. पण डॉक्टरंच मागून घेतात म्हणे.

"कंडोम आहेत का रे?" हे भालचंद्रनं विचारलं. तो असेच डाव टाकत असतो. त्याला बहुतेक चैन पडत नसावी.

दुपारी थोडावेळ झोपलो. सेकंड शिफ्ट घेतल्यावर म्हणे दिवस वापरायला भेटतो. पण हे अजिबात खरं नाही. दिवसभर डोळ्यात पेंग ही असतेच.

संध्याकाळी चार वाजता शिफ्टला निघाल्यावर भालचंद्र मला म्हणाला, "स्लमडॉग बघायचाय, येणार का?"

****

सुट्टी टाकून थेटरमध्ये पोहोचलो तेव्हा उशीर झाला. आतमध्ये आल्यावर कचऱ्याचा भव्यदिव्य ढिग पडदा व्यापून टाकत होता. ही पण काय दाखवण्याजोगी गोष्ट आहे. कचरा?
सांडपाणी, गटारे, नाले या गलिच्छपणात सौदर्य शोधणारा हा कसला सिनेमा. भर पावसात जागा शोधत येणारी लतिका, तिला तिसरी मस्कीटीयार ठरवून मोकळा झालेला जमाल, आणि जसं काही ममनंच दुसरं रुप असलेला सलीम, हे सहजासहजी डोक्यातून जाणारे नाहीत. चोळीत गेलेला ढेकूण सुद्धा इथे गारुड बनून राहतो.

सिनेमा बघून आल्यावर उगाचच त्या पडीक माळरानाकडे गेलो. थंड गारवा अंगावर घेत आतवर भटकत राहिलो. छोटे असले तरी तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहिले. रात्रीच्या वेळी ते जरा जास्तंच सुंदर दिसत होते.

रुमवर परत आलो तेव्हा झोप आली होती. पण झोपण्यापुर्वी 'sorry' असा एसएमेस टाकून दिला.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

10 Feb 2017 - 11:01 pm | वरुण मोहिते

पुढचा भाग लवकर टाका आता

प्रचेतस's picture

11 Feb 2017 - 10:50 am | प्रचेतस

भारीच.
बाकी दोन्ही भाग वाचून कथेचा काही अंदाजच येईनासा झालाय. काहीतरी गूढ, धूसर असं.

संजय पाटिल's picture

11 Feb 2017 - 5:15 pm | संजय पाटिल

+१

लोथार मथायस's picture

12 Feb 2017 - 3:06 am | लोथार मथायस

+१
जव्हेरगंज स्पेशल

राजाभाउ's picture

13 Feb 2017 - 5:59 pm | राजाभाउ

+१

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2017 - 6:12 pm | मराठी कथालेखक

छान...

वपाडाव's picture

7 Apr 2017 - 7:01 pm | वपाडाव

ओ मालक...
येउ द्या आता