भटकंती इर्शाळगडची

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
25 Oct 2016 - 12:34 am

नमस्कार मंडळी
एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो. घाट उतरून खोपोलीला उतरल्यावर उजवीकडे भीमाशंकर आणि पदरगड सोबत करू लागतात तर दुरवर डावीकडे कर्नाळ्याचा अंगठा थम्ब्स अप करून दाखवत असतो.जरा पुढे पनवेलजवळ आले की प्रबळ आणि इर्शाळ स्मित करून स्वागताला सज्ज असतात.कळंबोलीहून पुढे निघाले कि दूरवर हाजी मलंग तीन बोटे आणि करंगळी उंचावून आशीर्वाद देत असतो.
gh
यापैकी बरेचसे किल्ले आतापर्यंत बघून झाले असले तरी प्रबळ आणि इर्शाळ मला नेहमीच हुलकावणी देत आले आहेत. त्यापैकी इर्शाळचा बेत अचानक ठरला आणि बघता बघता ८ -१० जण तयारही झाले.
वन डे ट्रेक असल्याने फार तयारी किंवा प्लॅनिंग न करता, पुणेकरांनी सरळ ट्रेनने कर्जतला जायचे आणि मुंबईकरांनी त्यांना तिथेच भेटून पुढचा प्रवास टमटम ने करायचं असा सोपा बेत ठरला.
मात्र ऐनवेळेला मरेने दगा दिला आणि डेक्कन क्वीन सोडून सर्व गाड्या रद्द केल्या. त्यामुळे आयत्या वेळी बेत बदलावा लागला आणि पुणेकर 2 गाड्यांमधून चौक फाट्याला येतील आणि मुंबईकर त्यांना तिथेच भेटतील असे ठरले.
यथासांग सर्वजण चौक फाट्याला भेटले आणि प्रथेप्रमाणे मिसळपाव चहा वगैरे होऊन मोरबे धरणाच्या
मार्गाला लागले (चौक फाट्यापासून 1 कि.मी. पुढे उजवीकडे छोटा रस्ता चौक रेल्वेस्टेशनला जातो. चौक गाव डावीकडे आहे तिकडे न जाणे ).
एकीकडे खेडेगावचे मोकळे वातावरण दिसू लागले. धरणाच्या भिंतीच्या कडेने गाड्या चालल्या होत्या.

आदिवासी पाडे दिसू लागले. एक दोन ठिकाणी थांबून रस्ता विचारला आणि एका ठिकाणी रस्ता संपला तिकडे गाड्या लावून चढाईला सुरुवात केली. साधारण १०चा सुमार होता पण ऊन तापत चालले होते. त्यामुळे पटापट पाय उचलू लागलो.
उजवीकडे मोरबे धरणाचा विशाल जलाशय सोबत करीत होता आणि त्यातील पाणी चमचमत होते.

दूरवर कर्जत पनवेल रेल्वे मार्ग दिसत होता आणि आगगाड्यांचे हॉर्न ऐकू येत होते.क्वचित पक्ष्यांचे सुस्वर ऐकू येत होते.डावीकडे एक दोन छोटी धरणे तलाव दिसत होते पण त्याकाठी बंगले असल्याने ते खाजगी तलाव आहेत कि काय असे वाटत होते. याना सी.आर.झेड वगैरे कसे लागू होत नाहीत कोण जाणे?
df

असो. वाट चढणीची असल्याने आणि डोक्यावर सूर्य तळपत असल्याने चांगलीच दमछाक होत होती आणि सारखे थांबून पाणी प्यावे लागत होते. तशातच एक म्हातारबुवा उतरताना दिसले. आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. म्हातारबुवा लंगडत आमच्याजवळ आले आणि आम्हाला विचारले " किल्ल्यावर चालला का?रस्ता माहित आहे का तुम्हाला ?" माझे शहरी मन मला सांगू लागले कि आता हा वाट दाखवतो म्हणणार आणि पैसे मागणार. म्हणून मी त्याला म्हटले कि आमचे लोक पुढे गेलेत त्यांना वाट माहितेय. तरी तो म्हणाला कि डाव्या बाजूनेच जात राहा ..म्हणजे वाट चुकणार नाही. आणि वरती पाणी भरपूर आहे. काळजी करू नका.पुढे त्याने पायाला बांधलेली चिंधी दाखवली आणि म्हणाला "कोयता लागला पायाला.खूप रक्त गेले. आता चौक ला जाऊन इंजेक्शन आणि पट्टी करून येतो. पुन्हा माझे शहरी मन सांगू लागले कि आता हा उपचारासाठी पैसे मागणार. पण त्याने तसे काहीच केले नाही. त्याची मुलगी का सून पाठून येत होती . ती आली आणि हा निघाला.
er
आता मात्र मलाच माझ्या विचारांची लाज वाटू लागली.शहरात येणाऱ्या एक एक अनुभवांमुळे आपली विचार करायची पद्धत कशी बिघडून गेलेय आजकाल.असोच.
मध्ये एक आदिवासी पाडा लागला. ते म्हातारबुवा तिथूनच आले होते. इकडे नाचणी आणि तांदुळाची शेती खूप दिसली. नाचणी विकतही घेता आली.
we
पाडा सोडून पुढे निघालो.आता आम्ही इर्शाळ उजव्या हाताला ठेवून चाललो होतो.इथून वर बघितले कि झोपलेल्या बुद्धाची पोझ दिसते असे म्हणतात.
ty
ऊन तापत चालले होते. पण मधेच झाडी आली कि विसावा मिळत होता.पावसाळ्यातील गवतात अनेक किडे होते आणि अधे मध्ये चावून त्रासही देत होते.
एकीकडे आमचे फोटो ग्राफीचे प्रयोगही चालू होते. कुठे मधमाशीचा फोटो कधी, कुठे फुलाचा तर कुठे फुलपाखराचा.

नाहीतर पावलागणीक जवळ येत जाणारे इर्शालची शिखरे टीप असे चालेले होते.ऍपर्चर,वाईड अँगल, 18 ठेवायचे 55, 5.6 कि 11, पर्स्पेक्टिव ,आय. एस.ओ असे काय नी काय विषय बोलत बोलत आम्ही इर्शाळ च्या शिखराला येऊन भिडलो.
hg
lk
hj
po
kk
ii

हायवेवरून दिसणाऱ्या दोन शिखरांपैकी हे उजवे शिखर. पण शिखरावर सरळ चढाई करता येत नाही. त्यासाठी डाव्या बाजूने झाडीत घुसावे लागते. दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथे येण्याआधी एके ठिकाणी वाट चुकून खालच्या दिशेने जाण्याचा संभव आहे. तेव्हा सतत वरती जाणारीच वाट घ्यावी.
ll
(आम्हीपण चुकलो होतो पण वाटेतील एका झोपडीतील गोड आदिवासी मुलीने (बकुळा) आम्हाला योग्य वाटेला आणून सोडले) अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथवर मोरबे धरणाचे पाणी आपल्याला उजवीकडे दिसत राहते.ते दिसेनासे झाले तर समजावे कि वाट चुकली.
तर आता आम्ही सुळक्याच्या डावीकडून झाडीत घुसलो आणि वर जायला सुरुवात केली.शेवटची १०० मीटर चढाई राहिली असेल आणि एक पाण्याचे मधुर टाके लागले . अहाहा ..सकाळपासून ज्याची वाट पाहत होतो ते शेवटी मिळाले.

सगळ्यांनी पोटभर पाणी पिऊन घेतले आणि हात पाय सुद्धा धुतले.सगळे एकदम फ्रेश झाले.
hh
आता एक कठीण टप्पा आहे पण कोणी भल्या ग्रुप ने एक लाकडी शिडी इथे भक्कमपणे अडकवली असल्याने सर्वजण तो टप्पा लीलया पार करून गेले आणि लवकरच वर नेढ्यात पोचले.

हे नेढे इर्शालच्या दोन्ही शिखरांच्या मध्यभागी आहे. नेढ्यात ३-४ लोक बसू शकतात आणि आसपासही थोडी मोकळी जागा आहे. सावलीही होती
pp
दुपारचा १ वाजला होता त्यामुळे सर्वांनी शिदोर्‍या सोडल्या आणि सहभोजन केले.पुन्हा फोटोग्राफीचे काही प्रयोग झाले.
hh
त्यानंतर नेढ्यावर चढून मागच्या बाजूला लावलेल्या झेंड्याबरोबर फोटो वगैरे झाले.
ff
इर्शालची दोन्ही शिखरे अजून शंभरेक मीटर वर होती.आणि आमच्याकडे रोप होता पण आम्ही काही कसलेले गिर्यारोहक नाही.शिवाय उन्हाने खडक पार तापला होता. त्यामुळे दर्शनमात्रें समाधान मानले आणि उतरायला लागलो.
ट्रेक मस्त झाला याचे समाधान मनात होते. पण काही जण त्यावर संतुष्ट नव्हते. पनवेलच्या एका ग्रुपने काही वर्षांपुर्वी इर्शालच्या पोटात एक विवर शोधून काढले होते ते त्यांना बघायचे होते.त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. पाण्याच्या टाक्या पर्यन्त खाली उतरलो आणि जरा उजवीकडे गेलो.थोड्या शोधानंतर वरच्या दिशेला एका लैला मजनूचे नाव लिहिलेले दिसले आणि त्यावरून तिकडे जायला वाट असावी असे कळले. मग काही उत्साही लोकांनी वाट शोधली आणि ५० फूट सोप्या चढाई नंतर ते विवर मिळाले.
yy

tt
हे म्हणजे अक्षरश: "चेरी ऑन द केक" होते. ईर्शाळाच्या डाव्या शिखराच्या पोटात हे आडवे विवर जवळ जवळ सत्तरेक फूट आतवर गेले आहे. ते कोणी आणि का खोदले असावे माहित नाही पण ते वाऱ्या पावसाने तयार झालेले नाही एव्हढे नक्की. आतमध्ये बघण्यासारखे काही नाही पण विझलेल्या शेकोटीवरून कोणीतरी ही जागा मुक्कामाला वापरल्याचे समजले.
काळजीपूर्वक खाली उतरलो. 3 वाजत आले होते.त्यामुळे आता झपाझप पावले उचलली आणि खाली उतरू लागलो. तासाभरात गाड्या लावलेल्या ठिकाणी पोचलो आणि पुढचा ट्रेक कोणता करावा याचा खल करीत परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप.. सर्व छायाचित्र माझा मित्र श्री. प्रवीण पाटील याच्या सौजन्याने

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

25 Oct 2016 - 5:29 am | चाणक्य

झालेली दिसतीये.ऊन चांगलच दिसतंय. बादवे याचं नाव ईरसाळगड आहे की तुम्ही म्हणताय तसं'ईर्शाळ/ल'गड ?

चाणक्य's picture

25 Oct 2016 - 5:29 am | चाणक्य

झालेली दिसतीये.ऊन चांगलच दिसतंय. बादवे याचं नाव ईरसाळगड आहे की तुम्ही म्हणताय तसं'ईर्शाळ/ल'गड ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Oct 2016 - 11:19 am | राजेंद्र मेहेंदळे

चौकवाले गावकरी याला वीरसाळ असेही म्हणतात.

मस्त लिहिलंय. फोटोदेखील छान.

वेल्लाभट's picture

25 Oct 2016 - 10:49 am | वेल्लाभट

सुंदर वर्णन, फोटोही छान. त्या मावशींचा फोटो विशेष उल्लेखनीय!

छान भटकंती. इर्शाळगडाचे सुळके प्रस्तरारोहणाच्या दृष्टीने छान आव्हानात्मक आहेत. शहरी मानसिकतेचे वर्णन अचूक केले आहे. फोटो मोजकेच टाकल्यामुळे ब्राऊजरमध्ये लोड झाले. धन्यवाद!

यशोधरा's picture

25 Oct 2016 - 1:37 pm | यशोधरा

मस्तच लिहिले आहे. शहरी मानसिकतेचे अचूक वर्णन.
इथे तुम्ही फोटो दिला आहे, तसाच झोपलेला बुद्ध पेलिंगलाही आहे. :) फोटोही आवडले.
असे निखळ, नितळ लेखन मिपावर हल्ली खूप कमी झालेय, धन्यवाद.

कंजूस's picture

25 Oct 2016 - 9:58 pm | कंजूस

तसा उंच नसला तरी घातकी असणाय्रा तीनपैकी एक आहे.चंदेरी आणि हा -सुळसुळीत गवत, सिद्धगड- सुटणारे धोंडे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Oct 2016 - 11:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद !

शार्दुल_हातोळकर's picture

26 Oct 2016 - 12:06 am | शार्दुल_हातोळकर

मस्त लेख !

हकु's picture

26 Oct 2016 - 9:09 pm | हकु

वा राजेंद्रदादा ! सुरेख वर्णन केलं आहेस. हा माझा ट्रेक यावेळी हुकला खरा, पण पुन्हा एकदा इथे जावंसं वाटतंय. मागे नऊ वर्षांपूर्वी भर पावसात इर्शाळ केला होता. पण तेव्हा तू लिहिलंयस त्याप्रमाणे काहीही दिसलं नव्हतं. कारण अर्थातच प्रच्चंड पाऊस. मी तोपर्यंत आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलेला सर्वात जोरदार पाऊस हा इथलाच. फक्त वरच्या त्या छोट्याश्या गुहेपर्यंत पोहोचू शकलो होतो. पण हे वर्णन वाचून इतर अनेक प्रेक्षणीय गोष्टीही तिथे आहेत हे कळलं.आता जायलाच हवं.
बाकी प्रवीण दादाच्या फोटोंबद्दल काय बोलावं !! अप्रतीम ! _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Oct 2016 - 11:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रेक्षणीय गोष्टी आहेत खर्‍या पण प्रस्तरारोहणाची साधने आणि कला अवगत हवी, तर अजुन मजा येईल. एखाद्या चांदण्या रात्री थोडे खाली धरणाच्या पठारावर मुक्काम टाकायलाही छान आहे. मस्त शेकोटी करु.

अजया's picture

26 Oct 2016 - 9:19 pm | अजया

रोज समोर दिसणाऱ्या गडावर कोणी मिपाकर येऊन गेले होते वाचले की उगाच भारी वाटतं बुवा!

मनोज डी's picture

8 Dec 2016 - 4:42 pm | मनोज डी

मस्त लेख, मस्त फोटो