तीर्थरुपांच्या काही आठवणी!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
23 Oct 2016 - 9:35 pm

आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत.
माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे. आम्हा मुलांची जेवणं आधीच झाली होती आणि उरलेलं पुरण टेबलावर वाटीत तसच होतं आत्याला वाटल ते उरलच आहे, ती म्हणाली हे पुरण जर वाया जाणार असेल तर ते मी घेते, या वर एका क्षणाचा विलंब न लावता देशपांडे म्हणाले, “म्हणजे वायाच कि!”
देशपांडे आणि त्यांचा बँकेतला एक मित्र देवधर म्हणून होता. त्या दोघांनी एकदा कसली तरी बँकेतली परीक्षा दिली होती आणि ती ते दोघही पास झाले. म्हणून त्या देवधरच्या सांगण्याप्रमाणे देशपांड्यांनी एका रविवारी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आमच्या घरी मेजवानीलं बोलावले.त्याप्रमाणे ते देवधर काका, देवधरिणबाई आणि त्यांची मुलगी आरती आणि मुलगा सुजय एका रविवारी घरी आले. आता तो देवधर, पक्का कोकणस्थ त्यामुळे जेवायला मटण रस्सा, सुकं मटण, त्यांच्या पोरांना नळी फोडायला जमेल न जमेल शिवाय देवधर काकू मटण खात नाहीत( का? ह्या प्रश्नच उत्तर मला अजून मिळालेलं नाही) म्हणून चिकन, वर आणि तोंडी लावायला कोलंबी फ्राय( हो! त्यात काटे नसतात म्हणून) भाकरी, पुलाव वगैरे बेत होता. आता आम्ही जातीने वडलांकडून ब्राह्मण पण आई जातिवंत पठारे प्रभू – तिला मटण आणि मासे एकदम प्रिय. देशपांडे नास्तिक असण्याचा फायदा तिला सगळ्यात जास्त झाला.(आता माझ्या बायकोला होतो...आम्ही कोरडे- देशपांडे असेच, स्वतःच्या बायकोला फायदा मिळावा म्हणून असे कायम त्याग करतो...असो! )लग्नानंतर श्रावण,चतुर्थी, एकादशी गुरुवार कशशाकशाचा म्हणून तिला अडथळा उरला नाही, तिच्या माहेरी म्हणजे माझ्या मामाकडे ह्या गोष्टी अगदी काटेकोर पणे पाळल्या जात.म्हणजे श्रावणाचा अक्खा महिना मासे खायचे नाहीत. आता हे जरा अवघड व्हायचं म्हणून जेवताना शेगडीवर सुक्या बोम्बलाचा तुकडा जाळायचा आणि अख्ख घर त्या वासानं घमघमलं कि त्यासावर मेथीची भाजी नाहीतर शेपूची भाजी खायची असे आमचे आजोबा कट्टर(?)... तर ते एक असो, देवधरांनी जेवणावर चांगला अडवा हात मारल्यावर अगदी तुंदिल टन्नू (हा आईचाच शब्द !)झाल्यावर देशपांडे देवधरकाकूंना म्हणाले, “ वाहिनी आता पुढच्या रविवारी तुमच्याकडे अशीच पार्टी करूयात , काय म्हणताय , तुमचा नवरा हि परीक्षा पास झालाच आहे कि.“ त्यावर देवधर काकू म्हणाल्या, ”छे हो आम्हाला कुठे तुमच्या बायकोसारख मटण चिकन करायला जमणार? आमच्या घरी तर अंडही फुटलेलं चालत नाही. आणि आम्हाला हे मटण मासे करायला जमत हि नाही.” झालं देशपांड्यांचा फ्युज उडायाला एव्हढ पुरेसं होतं. म्हणजे एक तर माझ्या आई वडिलांचा आंतर जातीय विवाह, आई ब्राह्मण नाही ह्याची हेटाळणी आणि मटण मासे घरात शिजवण हि काही फार चांगली गोष्ट नाही(बाहेर, लोकांच्या घरी जाऊन खाण्याला काही हरकत नसावी बहुधा) असा एक सूर त्यात होता. (अर्थात हे मला नंतर कळलं)देशपांडे लगेच म्हणाले ,” त्यात काय एव्हढं! मटण, मासे करायला येत नसेल तर बासुंदी करा त्याला काही अक्कल लागत नाही.”
देवधर गेल्यावर आईने बाबांची अशी झाडी केली म्हणता पण ती देवधरांकडची बासुंदी पार्टी अजूनही झाली नाही.
--आदित्य

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

23 Oct 2016 - 11:09 pm | जव्हेरगंज

____/\____

जबरदस्त!!!

जी.एं. च्या काही कथा याच धाटणीने गेल्या आहेत. अगदी जी.ए. वाचतोय असं वाटलं.
सशक्त लेखन.

या आठवणी जरी असल्या तरी यात कथाबीज घालून वाढवू शकता. उत्तम कथेची मांडणी यात नक्कीच आहे!

बादवे, तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे देशपांडे' असा केलाय. तो जाम भन्नाट झालाय.
फार आवडले!

पिलीयन रायडर's picture

24 Oct 2016 - 7:18 pm | पिलीयन रायडर

तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे देशपांडे' असा केलाय. तो जाम भन्नाट झालाय.

अगदी.. अगदी..!

तुंदिल टन्नु काय आणि सुक्का बोंबिल जाळुन त्याव्र मेथीची भाजी खाणे काय!! __/\__

फक्त माझं काही तरी हुकतंय, मला देशपांडेचा मुलगा "आदित्य कोरडे" कसा हे नाही कळालं अजुन! आईचं आडनाव लावलंय का? कारण "आम्ही देशपांडे-कोरडे" असे.. असा उल्लेख आहे..

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 4:34 pm | आदित्य कोरडे

माझा ह्या आधीचा लेख "देशपांडे आमचे वडील"ह्यात ह्याचा खुलासा आहे. तुमच्या साठी परत देतो
"देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. "

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 4:36 pm | आदित्य कोरडे

माझा ह्या आधीचा लेख "देशपांडे आमचे वडील"ह्यात ह्याचा खुलासा आहे. तुमच्या साठी परत देतो
"देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. "

स्रुजा's picture

24 Oct 2016 - 12:06 am | स्रुजा

हाहाहाहा.. सही लिहीलंय !

बादवे, तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे देशपांडे' असा केलाय. तो जाम भन्नाट झालाय.
फार आवडले!

+ १११११

अजुन लिहा.

खेडूत's picture

24 Oct 2016 - 10:23 am | खेडूत

+१११
मस्त!

जबरदस्त! भन्नाट लिहिलंय!

रेवती's picture

24 Oct 2016 - 6:34 am | रेवती

लेखन आवडले.

नाखु's picture

24 Oct 2016 - 9:12 am | नाखु

आणि फटकेबाजीही फर्मास.

चांदणे संदीप's picture

24 Oct 2016 - 9:17 am | चांदणे संदीप

शि. सा. दंडवत! =))

अजून लिहा!

sandy

आंतरजातीय प्रॉडक्टमधे स्वजाती अभिमान जरा जास्तच दिसून येतो . .

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 7:20 am | आदित्य कोरडे

म्हणजे काय?

आदित्य कोरडे's picture

3 Dec 2016 - 6:41 am | आदित्य कोरडे

आंतरजातीय प्रॉडक्टची जात नक्की कोणती मानायची....

साहेब..'s picture

24 Oct 2016 - 11:49 am | साहेब..

एवढं फटकून बोलणारे लोकं आजकाल कमी आहेत, पण जे काय बोलतात ते स्पष्ट असतं, लपवाछापवी नाही.
आवडलं.

अनुप ढेरे's picture

24 Oct 2016 - 11:52 am | अनुप ढेरे

सुंदर लिहिलं आहे! अजून लिहा!

कौशी's picture

24 Oct 2016 - 2:47 pm | कौशी

आणखी वाचायला आवडेल.

टवाळ कार्टा's picture

24 Oct 2016 - 6:54 pm | टवाळ कार्टा

खिक्क

महामाया's picture

24 Oct 2016 - 7:18 pm | महामाया

लेखन आवडले.

मंदार कात्रे's picture

29 Oct 2016 - 8:17 am | मंदार कात्रे

क्रुपया आपले लेख एका आठवड्याच्या अन्तराने टाका

मिपाची ती अलिखित पॉलिसी आहे

जुना जाणता मिपाकर म्हणुन सान्गतोय. राग नसावा . लेख चान्गले असतात तुमचे पण घाई करु नका टाकण्याची

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 9:18 am | यशोधरा

पिटू लेख नुलकरकाकांच्या लेखाची कॉपी, हा लेख मूळ कोणाचा?

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 4:48 pm | आदित्य कोरडे

पिंटू हा आमचा कुत्रा होता. तो आमच्याकडे १९८९ मध्य आला आणि २००३ साली तो वारला.

तुमचा कुत्रा होता हे ठीक आहे पण नूलकरकाकांच्या लेखमधून कॉपी पेस्ट का केले म्हणे?

प्रचेतस's picture

29 Oct 2016 - 5:38 pm | प्रचेतस

त्यांना शब्द सापडेल नसतील कदाचित.

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 6:00 pm | आदित्य कोरडे

मी काहीही कॉपी केलेले नाहीये. कोण नूलकर? त्यांचा कोणताच लेख मी वाचला नाहीये, मी येथे हल्ली हल्ली लिहू लागलोय. पण नूलकरांच्या त्या लेखाचा धागा दिला तर बरे होईल.

आदित्य कोरडे's picture

29 Oct 2016 - 6:01 pm | आदित्य कोरडे

आणखी एक , हा लेख मिपा वरून उडवला आहे का? दिसत नाहीये....

छान लेख, बाकी बासूंदी बनवणार्‍यांच्या भावना दुखावल्या नाहीत म्हणजे मिळवली...