हिरकणी (कविता)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
16 Oct 2016 - 1:34 pm

आसमंत तो काळोखाने
पूर्ण व्यापला होता
रायगडावर अडकुन पडली
सैरभैर ती माता

मावळतीला गेला सूर्य
बंद जाहली दारे
दंडक होता शिवरायांचा
शिस्त पाळती सारे

कष्टकरी ती नार अपूर्व
नाव जाणती हिरा
गडाखालती राहत होती
वाळूसरेतील घरा

दूध विकाया रायगडावर
ती मायमाऊली जाई
उरकुन जाता काम रोजचे
घरास परतुन येई

एके दिवशी गड सोडण्या
वेळ जाहला तिला
उघडण्याला बंद ती दारे
त्यांनी नकार दिला

घरास होते बाळ तान्हुले
कंठ दाटुनी आला
राहावयाचे कसे लेकरु
गलका मनात झाला

भिरभिर फिरली रायगडावर
शोधित तिथल्या वाटा
उंच कडा एक दिसला जेथे
ना पहारा फौजफाटा

उतरु लागली मरणकडा तो
बाळासाठी जीव तुटे
खरचटला तो सारा देह
तिला परंतु भान कुठे?

अशक्य ऐसा उतरुन गेली
प्राणपणाने उंच कडा
शिकवुन गेली प्रित आईची
मरणालाही आज धडा

ऐकताच ती तिची कहाणी
अपार राजे गहिवरले
वस्त्रालंकारांनी तिजला
शिवरायांनी गौरविले

बुरुज बांधुनी त्याच कड्यावर
हिरकणी ऐसे नाव दिले
अलौकिक त्या वात्सल्याला
शिवरायांनी वंदियले

साक्ष द्यावया मातृप्रितीची
अजुनी बुरुज तो उभा तिथे
अभेद्य कणखर सह्याद्रीही
नतमस्तक तो होतो जिथे

- शार्दुल हातोळकर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

16 Oct 2016 - 1:51 pm | जव्हेरगंज

वाह!

पद्मावति's picture

16 Oct 2016 - 2:41 pm | पद्मावति

सुरेख!

खुप छान " हिरकणी "...

प्रचेतस's picture

16 Oct 2016 - 11:45 pm | प्रचेतस

खूप सुंदर.

बाजीप्रभू's picture

17 Oct 2016 - 7:48 am | बाजीप्रभू

छान झालीय कविता.
ट्रेनमधे लटकत, ट्रॅफिक कापत बेबीसिटरकडे धावतपळत पोहोचणाऱ्या आजच्या हिरकण्यांनाही सलाम.

विअर्ड विक्स's picture

17 Oct 2016 - 10:13 am | विअर्ड विक्स

छान कविता.

नाखु's picture

17 Oct 2016 - 11:26 am | नाखु

आणि चित्रदर्शी

विवेकपटाईत's picture

17 Oct 2016 - 8:16 pm | विवेकपटाईत

मस्त, कविता आवडली

वटवट's picture

17 Oct 2016 - 8:18 pm | वटवट

व्वा

शार्दुल_हातोळकर's picture

17 Oct 2016 - 11:35 pm | शार्दुल_हातोळकर

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार _/\_
शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासामधील हिरकणीच्या मातृप्रेमाची अजरामर कहाणी....

अतिशय छान! बाजींच्या प्रतिसादाशी सुद्धा सहमत.

शार्दुल_हातोळकर's picture

25 Oct 2016 - 11:38 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद !

देशप्रेमी's picture

17 Jan 2017 - 1:41 pm | देशप्रेमी

हिरकणीची पूर्ण कहाणी कवितेतुन उत्तम रेखाटली आहे..
आवडेश...

मुरारबाजी's picture

7 Jun 2017 - 3:28 pm | मुरारबाजी

क्या बात है !!
हिरकणीची कथा डोळ्यासमोर उभी केलीत....
मन अगदी शिवकाळात पोहोचले....

रुपी's picture

8 Jun 2017 - 6:00 am | रुपी

सुंदर!

माहितगार's picture

8 Jun 2017 - 9:38 am | माहितगार

चांगल्या कार्यासाठी जिवडावावर लावणार्‍या कोणाही हुतात्म्याचा गौरवच करावयास हवा. अर्थात गौरवी करण करतानाही जुन्याकाळातील अंधश्रद्धा या अंधश्रद्धा होत्या हे गौरवीकरण करताना लक्षात घ्यावयास हवे. हिरकणीने जिव दिला नसतातरी बुरुजाचे काम सुरक्षीतपणे झालेच असते. हिच हिरकणी स्वराज्यात राणी ताराबाईसोबत कदाचित रणांगणात आपली तलवारही परजू शकली असती असे वाटते.

सर्वप्रथम प्रतिसादांबद्दल देशप्रेमी, मुरारबाजी, रुपी आणि आपलेही मनापासुन आभार !

तुमच्या मुद्द्यामध्ये किंवा माझ्या समजण्यामध्ये काही गफलत होते आहे का?

कारण हिरकणीने जीव दिला नव्हता, तर घरी असलेल्या बाळाच्या ओढीने ती डोक्यावर घोंगावत असलेल्या मरणालाही धडा शिकवुन अत्यंत खडतर असा रायगडाचा डोंगरकडा रात्रीच्या अंधारात मोठ्या हिंमतीने उतरुन गडपायथ्याला गेली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरात दुध घेऊन ती पुन्हा रायगडाच्या दारात हजर झाली. तिला दरवाजात पाहुन पहारेकऱ्यांना मात्र खुप आश्चर्य वाटले, कारण रात्री दरवाजे बंद असताना ती रायगडाबाहेर गेलीच कशी?

म्हणुन पहारेकऱ्यांनी तिला शिवरायांपुढे हजर केले. तिची ती हकीकत ऐकुन राजे खुप गहिवरले आणि तिच्या मातृप्रेमाचा गौरव म्हणुन त्यांनी तिला वस्त्र-अलंकार देऊन तिचा सत्कार केला.

ती जिथुन कडा उतरुन गेली होती, ती गडाची बाजु शत्रुपासुन सुरक्षित करण्यासाठी महाराजांनी तिथे भक्कम बुरुज बांधला. तोच हिरकणी बुरुज होय.

माहितगार's picture

10 Jun 2017 - 8:59 am | माहितगार

शक्य आहे माझी कुठे गफलत होते असेल. मी काही वेगळे वाचल्याचे स्मरत होते, चुकले असेल तर क्षमस्व. आंतरजालावर व्यवस्थीत संदर्भांची उपलब्धता नसली की असे काहीसे होत राहते.

ज्ञानकोशीय लेखनासाठी कुणा जाणकारांना हिरकणी बुरुज विषयक कथांचे मूळ संदर्भ माहित असतील तर ते अवश्य द्यावेत.

प्रचेतस's picture

10 Jun 2017 - 9:03 am | प्रचेतस

हिरकणीची कथा ही दंतकथा आहे.

माझ्या स्मरणातील दंतकथा काही वेगळी असावी किंवा स्मरणात काही चुकीचे रेकॉर्डींग झाले असावे असेही शक्य आहे. दंतकथा असली तरी साहित्याने/दस्तएवजाने दखल घेतलेला पहिले उल्लेख कोणते आहेत ? बखरी वगैरेत कुठे काही उल्लेख आहेत का ? एकच दंतकथा आहे की एका पेक्षा अधिक दंतकथा आहेत. सहज सर्चेबल आंतरजाल जरासे शोधले दंतकथा दिसते आहे पण संदर्भ दिसत नाहीत.

सुरेख! पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी कविता.

मितान's picture

9 Jun 2017 - 7:16 pm | मितान

सुंदर कविता !

शार्दुल_हातोळकर's picture

11 Jun 2017 - 9:36 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद पद्मावतीजी आणि मितानजी !! __/\__