गारपार्‍यातली गहनकथा

आदूबाळ's picture
आदूबाळ in लेखमाला
29 Oct 2016 - 12:05 am

("গড়পারের গহনকথা" या अद्याप लिहिल्या न गेलेल्या मूळ बंगाली कथेचा स्वैर अनुवाद)

दुर्गापूजा वीस दिवसांवर आली होती. कोलकात्याच्या हवेत हळूहळू पूजेचा उत्साह भरायला लागला होता. फेलूदा मात्र अस्वस्थ होता. म्हणजे तसं पाहायला गेलं, तर तो एका जुन्या डिक्शनरीत डोकं खुपसून बसला होता. कव्हरवर मळक्या अक्षरांत 'हॉब्सन जॉब्सन' असं लिहिलं होतं. पण दर पाच मिनिटांनी डोकं काढून घराखालच्या रजनी सेन रस्त्याकडे अस्वस्थ नजर टाकत होता.

मी मोबाइलवर गेम खेळत होतो, पण माझं पूर्ण लक्ष फेलूदाकडेच होतं. फेलूदाने मला तर्कशुद्ध विचार करायला शिकवलं होतं. दहा मिनिटं त्याची चुळबुळ बघितल्यावर मी त्याला म्हटलं, "त्यापेक्षा लालमोहनबाबूंना फोनच का नाही करत, फेलूदा?"

फेलूदा चक्क दचकला. खळखळून हसला, आणि माझ्या डोक्यात टपली मारली. "शाब्बास, तपश्या! जमतंय तुला. मला वाटलं तो कँडी क्रश सागा खेळून तुझं डोकं बधिर झालं असेल. कसं ओळखलंस सांग पाहू?"

"तू रस्त्याकडे बघत होतास - श्यामाप्रसाद मुखर्जी रस्त्याच्या टोकाकडे, विरुद्ध बाजूच्या लेक प्लेस रोडच्या टोकाकडे नव्हे. लालमोहनबाबूंची हिरवी अँबेसेडर त्यांच्या गारपारमधल्या घराकडून नेहमी मुखर्जी रस्त्याच्या बाजूने येते. म्हणजे तू लालमोहनबाबूंची वाट पाहात होतास." मी म्हणालो.

"पण त्या बाजूने कितीतरी लोक येतात, तपश्या." फेलूदा मान हलवत म्हणाला. "गेल्या चौदा वर्षांत इथे आलेल्या क्लायंट्सपैकी पंचावन्न टक्के लोक मुखर्जी रस्त्याकडून आलेले आहेत, आणि पंचेचाळीस टक्के…"

मी रेडियोवरच्या बातम्या देणार्‍या निवेदकाचा आवाज काढला. "गेली चौदा वर्षं याच दिवसांत - म्हणजे पूजेच्या आधी बरोब्बर तीन आठवडे - लालमोहनबाबू गांगुली उर्फ जटायू त्यांचं नवं थ्रिलर पुस्तक तुला भेट द्यायला येतात. दोन महिन्यांपूर्वी तूच त्यांना त्यातले तपशील तपासून दिलेले असतात. त्याबद्दल त्यांच्याकडून तू पैसे घेत नाहीस. म्हणून ते नव्या पुस्तकाची पहिली प्रत तुला भेट देतात." मी म्हणालो. "आणि हो, नकूड़ नंदीचा शाँदेशपण." मी मिटकी मारली.

"बरं, मग?"

"लालमोहनबाबूंच्या या वेळच्या पुस्तकाचं नाव आहे 'कंबोडियातली कंबख्ती'. तू तपासत होतास तेव्हा मी पाहिलं होतं. पुस्तकाचं प्रकाशन काल होतं. आणि त्यानंतर साडेसत्तावीस तास उलटून गेले, तरी लालमोहनबाबू आलेले नाहीत. असं पूर्वी कधी झालेलं नाही. साहजिकच तू जरा चिंतेत आहेस, आणि सारखा मुखर्जी रस्त्याकडे बघतो आहेस, की हिरवी अँबेसेडर दिसतीय का?"

फेलूदाच्या चेहर्‍यावर स्मितरेखा चमकून गेली. "तुला नाही हे विचित्र वाटत?"

"वाटतंय ना. म्हणूनच म्हणतो लालमोहनबाबूंना फोन कर." मी म्हणालो.

"काही गरज नाही." फेलूदा एकाएकी म्हणाला. मी त्याला त्याच्या इगोवरून काहीतरी बोलणार, तेवढ्यात तो उठून खिडकीकडे जात म्हणाला, "ते बघ!"

श्यामाप्रसाद मुखर्जी रस्त्यावरून एक हिरवी अँबेसेडर रजनी सेन रस्त्यावर वळली होती. आम्ही सरसावून बसलो. फेलूदाच्या मनात काय भाव होते माहीत नाही, पण माझ्या जिभेवर शाँदेशची चव होती.

लाकडी जिन्यात पावलं वाजली. फेलूदाच्या चेहर्‍यावर आठी चढली. चाहूल लालमोहनबाबूंच्या छोट्या पावलांची नव्हती. एक पायरी गाळून चढणार्‍या कोणा उंच्यापुर्‍या मनुष्याची होती. दारात लालमोहनबाबूंचा ड्रायव्हर हरिपद दत्त होता.

"या हरीबाबू." फेलूदा स्वागत करत म्हणाला. "लालमोहनबाबू कुठे आहेत?"

"साहेब घरीच आहेत." हरिपदबाबू थोडे घुटमळले. "त्यांनी पाठवलं नाही, मी स्वतःहून आलोय. साहेबांना काहीतरी झालंय परवापासून. परवा सकाळपासून त्यांनी स्वतःला त्यांच्या अभ्यासिकेत कोंडून घेतलंय. बाहेर पडत नाहीत, खात नाहीत की पीत नाहीत."

फेलूदाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"सुरुवातीपासून सगळं सांगा, हरीबाबू." आपली निळी वही उचलत फेलूदा म्हणाला.

"सोमवारी सकाळी साहेबांचं नवं पुस्तक येणार होतं. दुर्गापूजेसाठी. त्यांनी मला बोईपार्‍यातल्या अभिजन प्रकाशनाकडून शकुनाच्या दोन प्रती घेऊन यायला सांगितल्या." हरिपदबाबू सांगू लागले. "नेहमी ते एक प्रत घरच्या दुर्गापूजेत ठेवतात, आणि दुसरी तुम्हाला द्यायला आम्ही इथे येतो..."

मी विजयी मुद्रेने फेलूदाकडे पाहिलं. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं.

"...त्या दिवशी मात्र ते माझ्यासाठी दारातच थांबले होते. त्यांच्या हातात अगोदरच एक पुस्तक होतं. मी आल्यावर माझ्या हातातून पुस्तक हिसकावून घेतलं. तिथल्या तिथे दोन्ही पुस्तकांत काही तपासून पाहिलं, आणि डोकं धरून मटकन् बसले. माझ्याकडे पाहिलंदेखील नाही. सरळ वर निघून गेले… तेव्हापासून तिथेच आहेत. खोलीच्या बाहेरही पडले नाहीयेत."

हे काहीतरी विचित्रच होतं. लालमोहनबाबू थोडेसे भाबडे, थोडेसे विक्षिप्त, थोडेसे आत्मप्रौढी मारणारे होते. त्यांच्या पुस्तकांत अनेकदा तपशिलाच्या चुका असत. त्याबद्दल अनेकदा ते फेलूदाची बोलणी खात. चुका सुधारत, पण सुधारायचं नाव नाही. इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं, स्वतःला कोंडूनबिंडून घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं.

"ते पुस्तक कोणतं होतं त्यांच्या हातात?" फेलूदाने विचारलं.

"लालबुंद कव्हरचं कोणतंतरी होतं. मी नाव नाही पाहिलं." हरिपदबाबू म्हणाले.

फेलूदाने उठून चपला घातल्या आणि निळी वही खिशात कोंबली. "चला, हरीबाबू. मोहम्मद पर्वताकडे येत नसेल तर पर्वतालाच मोहम्मदाकडे जायला पाहिजे."

"शाँदेशपण आपणच न्यायचं का?" मी निरागसपणे विचारलं. फेलूदाने तीक्ष्णपणे माझ्याकडे पाहिलं. मी मुकाट चपला घातल्या.

--x--

चौर्‍याऐंशी लोकप्रिय थरारकादंबर्‍यांचे लेखक लालमोहन गांगुली उर्फ जटायू हातात डोकं धरून आमच्यासमोर बसले होते. आमच्याकडे बघतदेखील नव्हते. अंधार्‍या अभ्यासिकेचे पडदे ओढलेले होते, मॅकबुक बंद होता, आयपॅडही. समोरच्या टेबलावर 'कंबोडियातली कंबख्ती' पडलं होतं. दुसरं एक - जवळजवळ त्याच आकाराचं आणि जाडीचं - पुस्तक उपडं पडलं होतं.

फेलूदाने 'कंबोडियातली कंबख्ती'कडे हात नेताच लालमोहनबाबूंनी ते पुस्तक आपल्याकडे सरकावून घेतलं.

"फेलूबाबू! नको. तुमच्यायोग्य नाही हे पुस्तक..." ते जड आवाजात म्हणाले.

"ते मला ठरवू द्या, लालमोहनबाबू..." फेलूदा हळुवारपणे म्हणाला.

"तुमच्यासारख्याशी मैत्री करायची माझी लायकी नाही, फेलूबाबू." लालमोहनबाबूंचा आवाज आणखी खोल गेला. "तुमचा हा मित्र निव्वळ चोर आहे! डकैत! बाँडेज!"

"लालमोहनबाबू, तुम्हाला बहुतेक 'बँडिट' म्हणायचंय." मी न राहवून म्हणालो. "'बाँडेज' म्हणजे..."

फेलूदाने टोचून पाहिलं माझ्याकडे. मी जीभ चावली. अवघड जागचं ज्ञान जगाला वाटणं अवघडच असतं.

"बाँडेज. बँडिट. बिंडास. काय फरक पडतो? लोक मला चोरच म्हणणार..." लालमोहनबाबू चक्क हुंदके द्यायला लागले. "लोक म्हणणार, मी अक्रूर नंदीच्या प्लॉटवरून कादंबर्‍या ढापतो. वीस वर्षांची प्रतिष्ठा धुळीत मिळणार, तोपशे."

फेलूदाने हळुवारपणे त्यांच्याकडून सगळी कहाणी काढून घेतली.

अक्रूर नंदी म्हणजे कॅप्टन स्पार्क, शैतान सिंह, खुदीराम रक्षित आदी पात्रांचा निर्माता. थरारकादंबर्‍यांच्या क्षेत्रातला जटायूंचा प्रमुख प्रतिस्पर्धी. नंदीचा कॅप्टन स्पार्क आणि जटायूंचा प्रखर रुद्र यांच्यापैकी श्रेष्ठ कोण या विषयावर बंगाली आंतरजालावरच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. आमच्या समोरच्या घरात मृगनयनी सेनगुप्ता राहते. मृगाला कॅप्टन स्पार्क आवडतो. आमची नेहमी यावरून भांडणं होतात. (तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो - प्रखर रुद्र कॅप्टन स्पार्कपेक्षा कधीही भारी आहे. स्पार्क पावटा आहे.)

दर वर्षी अक्रूर नंदी आणि जटायू प्रत्येकी दोन पुस्तकं प्रकाशित करत - एक दुर्गापूजेच्या वेळी आणि दुसरं उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुरुवातीला. जटायूंचे प्रकाशक 'अभिजन' बरोब्बर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पुस्तक बाजारात आणीत, म्हणजे सुट्ट्या लागलेली मुलं लगोलग पुस्तक खरेदी करू शकत. अक्रूर नंदीचे प्रकाशक मात्र पंधरा दिवस आधीच पुस्तक बाजारात आणीत, कारण त्यांना वाटे लवकर बाजारात आलेलं पुस्तक जास्त खपेल. (याला 'फर्स्ट मूव्हर्स अॅडव्हांटेज' म्हणतात, असं फेलूदाने मला नंतर सांगितलं.) प्रत्यक्षात खपात जास्त फरक नसावा, कारण नंदीचे फॅन आणि जटायूंचे फॅन जवळजवळ समप्रमाणात होते. या वर्षी अक्रूर नंदीच्या पुस्तकाला थोडासा उशीरच झाला.

"या वेळी अक्रूर नंदीने मला त्याचं पुस्तक भेट म्हणून पाठवलं." लालमोहनबाबू म्हणाले. "खरं तर मी उघडून बघितलंच नसतं. पण त्याचं मुखपृष्ठ खूप आवडलं म्हणून सहज पाहिलं, आणि... आणि... " त्यांना पुढे बोलवेना.

मी अक्रूरचं पुस्तक उचलून पाहिलं. नाव होतं 'कांपुचियातली काळरात्र'.

फेलूदाने पुस्तक ओढून घेतलं आणि उघडून चाळायला लागला. मी तोवर 'कंबोडियातली कंबख्ती' हाती घेतलं होतं.

"फेलूदा, कंबोडिया... कांपुचिया..."

"कांपुचिया हे कंबोडियाचंच जुनं नाव आहे" फेलूदा स्वतःशी म्हणाला.

"इथेच संपलं नाही, फेलूबाबू," लालमोहनबाबू निराशेने मान हलवत म्हणाले. "कथानक जवळजवळ सारखंच आहे. इथे प्रखर रुद्र चिनी हेराच्या मागावर नॉम पेमध्ये जातो. तिथे कॅप्टन स्पार्क अमेरिकन हेराच्या मागावर जातो. दोघेही ख्मेर रूजच्या जाळ्यात अडकतात. दोघेही तुओल स्लेंग तुरुंगातून सुटण्यासाठी मानवी कवट्यांचा मनोरा रचतात. दोघेही... पण तुम्हाला काय सांगतोय मी फेलूबाबू. तुम्हीच तर सगळं तपासून दिलंत.”

लालमोहनबाबूंनी आपल्या पहिल्या खर्ड्यात 'पनॉम पन्हे' लिहिलं होतं. त्या आठवणीने मला किंचित हसू आलं.

"लालमोहनबाबू, रागावू नका. थेटच विचारतो - तुम्ही अक्रूर नंदीकडून..." फेलूदाचा प्रश्न पुरा व्हायच्या आतच लालमोहनबाबूंच्या डोळ्यात परत पाणी तरारलं.

"फेलूबाबू, माझ्या आईची, दुर्गामाँची, छापल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाची शपथ घेऊन सांगतो - मी चोरी नाही हो केली. मी तुमच्याएवढा हुशार नसेन. तुमच्या सिधुकाकांएवढा व्यासंगी नसेन. पण मला तुमच्यापेक्षा जास्त कल्पनाशक्ती मिळाली आहे. प्रत्येक कादंबरीचा प्लॉट वेगळा आहे, स्वतःचा आहे. युनिट आहे. चौर्‍याऐंशी कादंबर्‍यांत एकदाही - स्वतःचीही - पुनरावृत्ती नाही." इवलीशी छाती काढत लालमोहनबाबू म्हणाले. "पण आता संपलं हो सगळं. मी कितीही ओरडून सांगितलं, तरी लोक म्हणणार - जटायूने चोरी केली. तीही अक्रूर नंदीकडून. माझ्या प्रकाशकाचा तरी माझ्यावर का विश्वास बसावा? मी काल त्यांना फोन करून 'कंबोडियातली कंबख्ती'चं प्रकाशन थांबवलं आहे. त्यांचा सगळा खर्च मी भरून देणार आहे."

"हां, ते एक बरं केलंत." फेलूदा निश्वास टाकत म्हणाला. "म्हणजे तुमची कादंबरी अजून बाजारात आली नाहीये..."

"आली नाहीये आणि कधी येणारही नाही, फेलूबाबू. मी कादंबर्‍या लिहिणं सोडतो आहे. जटायू आपली लेखणी म्यान करतो आहे..." लालमोहनबाबूंना हुंदका फुटला. "ही पंच्याऐंशीवी कादंबरी होती. सेंचुरी पूर्ण करून मी लेखनसंन्यास घेणार होतो. पण... आता..."

"लालमोहनबाबू, शांत व्हा." फेलूदा त्यांना थोपटत म्हणाला. "टोकाला जाऊ नका. आपण सत्य काय ते शोधून काढू. रामायणातला जटायू आठवा. जखमी झाल्यावरही लढा देत राहिला."

"मी सांगतो ना तुम्हाला सत्य काय आहे ते. अक्रूर नंदीने काहीतरी कारस्थान करून माझा प्लॉट ढापला. कसा ते मला माहीत नाही. पुढच्या वेळीही असंच होणार. त्याच्या पुढच्या वेळीही..."

फेलूदा खुर्चीत ताठ बसला. "लालमोहनबाबू, सत्य काय ते मी शोधून काढेनच. तुम्हाला मी गेली कित्येक वर्षं ओळखतो. तुम्ही चोर नाही हे मला माहीत आहे. पूर्ण खातरी आहे. ही चोरी कुठून झाली, कुणी केली, सगळं शोधून काढेन. मगच तुम्ही ठरवा तुम्हाला निवृत्ती घ्यायचीय का."

लालमोहनबाबूंचा कंठ दाटून आला. पूर्वी कधी न केलेली गोष्ट त्यांनी केली - फेलूदाला कडकडून मिठी मारली. आणि मग मलाही! लालामोहनबाबू केवड्याच्या वासाचा साबण वापरतात वाटतं...

"आता मला सांगा लालमोहनबाबू, ही कादंबरी लिहिण्याची प्रक्रिया काय होती? तुम्हाला प्लॉट सुचण्यापासून ते प्रकाशन होईपर्यंत सगळं सांगा. तपशील कितीही बारीक, बिनमहत्त्वाचा वाटला तरी गाळू नका." फेलूदा निळी वही काढत म्हणाला.

लालमोहनबाबूंनी डोळे पुसले. आता ते बरेच सावरले होते. आपल्या कामाविषयी बोलायचं म्हटल्यावर थोडे प्रफुल्लितही झाले. इतके वर्षांत फेलूदाने चकार शब्दाने विचारलं नव्हतं, की बुवा कसं लिहिता तुम्ही?

"फेलूबाबू, तुम्हाला आठवतं, आपण तिघे मिडलटन स्ट्रीटवरच्या 'द ब्लू पॉपी रेस्तराँ'मध्ये गेलो होतो? तिथे आपण बर्मी पोर्क मोमो इन गॉट हार्लिक सॉस खाल्लं होतं?" मी मान डोलावली. मोमोज् फारच मस्त होते ते.

"त्या रात्री माझ्या पोटात गॅसेस झाले. पोर्क पचत नाही मला. रात्रभर जागा होतो. यू ट्यूबवर असंच काहीबाही पाहात होतो. अचानक मला कंबोडियावरची एक डॉक्युमेंटरी सापडली. ती बघितल्यावर वाटलं, की या देशात कोणी सामान्य माणूस सापडला तर जिवंत बाहेर येणं अशक्यच! मग लक्षात आलं - आपला प्रखर रुद्र तर असामान्य आहे! मग असा प्लॉट सुचत गेला.."

मी डोळे शक्य तितके ताणून फेलूदाच्या निळ्या वहीत डोकावायचा प्रयत्न केला. पोर्क मोमो, लालमोहनबाबूंचा 'गॉट हार्लिक' सॉस, गॅसेस यातलं किती वहीत गेलं आहे हे मला पाहायचं होतं. पण फेलूदा विचित्र ग्रीकोरोमन लिपीत लिहितो, त्यामुळे मला काही समजलं नाही.

"लालमोहनबाबू, तुम्ही नोट्स वगैरे काढल्या असतील ना? त्या पाहू शकतो का?" फेलूदाने विचारलं. उत्तरादाखल लालमोहनबाबूंनी पलंगाखालून बाटाच्या चार नंबरच्या बुटांचं एक खोकं काढलं. आतून कंबोडियाबद्दलची बरीचशी कात्रणं, सुट्टे कागद, बोळे, जुनीपानी पाठकोरी खरडलेली पँप्लेटं, एक चक्क मेट्रोचं तिकीट, फाडून ताठ केलेले लिफाफे असा बराच ऐवज निघाला.

"प्रेरणा कुठेही मिळू शकते. प्रतिभा कुठेही जागृत होऊ शकते." स्वतःच्या डोक्यावर टिचक्या मारत लालमोहनबाबू अंमळ लाघवीपणे म्हणाले, आणि ते नॉर्मलवर येत चालल्याची खातरी मला पटू लागली.

"हे खोकं कुठे असतं?" फेलूदाने विचारलं.

"इथेच. पलंगाखाली. झाडायला फक्त भारद्वाज येतो. आम्हां दोघांव्यतिरिक्त इथे कोणीच येत नाही." लालमोहनबाबूंनी खुलासा केला. भारद्वाज पक्षी नव्हे - लालमोहनबाबूंचा जुना नोकर. पूर्णपणे विश्वासपात्र.

"बरं, तुम्ही लिहिता कसं? थेट टाइप करता का?" मॅ़क आणि आयपॅडकडे बोट करत फेलूदा विचारता झाला.

"ह्या:! ही तर खेळणी आहेत. मी अजूनही खरंखुरं लेखन करतो. ते पहा!" कोपर्‍यातल्या गादीकडे बोट दाखवत लालमोहनबाबू म्हणाले. तिथे एक जुन्या पद्धतीचं, उघडणारं डेस्क आणि टेकायला तक्क्या होता.

फेलूदाने बैठक आणि डेस्क आतून-बाहेरून तपासलं.

"या डेस्कात काही संशयास्पद नाही, फेलूबाबू. हे माझ्या आजोबांचं - प्यारीमोहन गंगोपाध्यायांचं डेस्क आहे. यावर ते महालनोबिसाचं काम करत. मी कादंबर्‍या घडवतो. हा:हा:हा:" लेखनसंन्यास घ्यायची प्रतिज्ञा जटायू बहुधा विसरले असावेत.

फेलूदा काहीच बोलला नाही. त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं होतं.

"हे लिहिण्याचे कागद." फेलूदाने कागद हाताळले, आणि वहीत काही नोंद केली. "आणि हे पेन. हे मला नुकतंच भेट मिळालंय. जिंकलंय म्हणा ना! अर्थात तुमच्यामुळे." लालमोहनबाबू चक्क प्रफुल्लित दिसत होते.

"माझ्यामुळे?" फेलूदा कोड्यात पडला.

"बस्स काय फेलूबाबू! विसरलात तुम्ही! हे पेन मला खुद्द अक्रूर नंदीने भेट दिलं आहे! तो टीव्ही कार्यक्रम, ते क्विझ! तुमच्याच सल्ल्याने पार पडलो त्यातून!"

मला एकदम आठवलं. तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एका बंगाली उपग्रह वाहिनीवरच्या 'बोईबिश्व' या साहित्याला वाहिलेल्या कार्यक्रमात जटायूंना आमंत्रण होतं. दुसरा पाहुणा होता अक्रूर नंदी. अक्रूर अतिशय प्रसिद्धिपराङ्मुख होता. तो मुलाखतीही देत नसे, तर टीव्ही शो लांबची गोष्ट! पण कसं कोण जाणे, या कार्यक्रमात यायला तयार झाला.

पाचपाच मिनिटं दोघांचीही ओळख करून देणार्‍या चित्रफिती, मग खुल्या गप्पा, आणि सर्वात शेवटी एक क्विझ - ज्यात सूत्रसंचालिका या दोघांनाही प्रश्न विचारणार - असा एकंदर कार्यक्रम होता. नंदी विरुद्ध जटायू ही स्पर्धा प्रसिद्ध होती. त्याचा फायदा घेण्यासाठी त्या टीव्ही चॅनलने 'दोन थरारलेखकांतला जंगी मुकाबला' वगैरे प्रसिद्धी केली. चौकाचौकात दोघांचे चेहरे असलेले फ्लेक्स झळकत होते. लालमोहनबाबू आपला चेहरा फ्लेक्सवर बघून भलतेच उत्तेजित झाले, आणि स्वतःच त्या मुकाबल्याच्या मूडमध्ये गेले. काहीही करून अक्रूरला धूळ चारायचीच असा चंग बांधून बसले.

बाकी सगळं ठीक होतं, पण क्विझचं काय? सूत्रसंचालिका आणि वाहिनी क्विझविषयी काही सांगायला तयार होईनात, सर्प्राईज क्विझ आहे म्हणाले. लालमोहनबाबूंचं बीपी वाढायला लागलं. बाकी गप्पांमधली हार-जीत ठीक आहे, पण क्विझमध्ये हरलं की संपलंच! नंदीबैलासमोर नाकच कापलं जाणार.

मग अशा वेळी लालमोहनबाबू अनेक वर्षं जे करत आलेत तेच त्यांनी केलं. प्रदोषचंद्र 'फेलू' मित्र यांच्याकडे धाव घेतली. फेलूदाने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला, "सरळ आहे. तुम्हा दोघांच्या कादंबर्‍यांवरचे प्रश्न तुम्हाला विचारणार! तुमच्या कादंबर्‍यांवरचे प्रश्न तुम्हाला जमतीलच. आता अक्रूर नंदीच्या कादंबर्‍या वाचा!" लालमोहनबाबूंनी मग नंदीच्या सगळ्या कादंबर्‍या मागवून लहान मुलासारखा रीतसर अभ्यास केला.

आणि फेलूदाचा होरा खरा ठरला! क्विझ खरंच दोघांच्या कादंबर्‍यांवर होतं. लालमोहनबाबू या परीक्षेत चांगलेच पास झाले, आरामात क्विझ जिंकलं! सूत्रसंचालिकेने जाताजाता अक्रूर नंदीला टोला मारला - तुमच्या प्रतिस्पर्ध्यालाच तुमच्या कादंबर्‍यांविषयी जास्त माहिती दिसते आहे! पण अक्रूर नंदी चांगलाच दिलखुलास माणूस निघाला. त्याला हा अपमान वाटण्याऐवजी मौज वाटली आणि त्याने खूश होऊन लालमोहनबाबूंना आपलं पेन भेट दिलं!

फेलूदाने पेन हातात घेऊन पाहिलं. अतिशय उत्तम दर्जाचं पेन होतं ते. बनावटीवरूनच परदेशी वाटत होतं, पण त्याच्यावर कंपनीचं नाव काही नव्हतं.

"बर्‍यापैकी वजनदार दिसतंय." फेलूदाने पेन उचलून बाजूच्या कागदावर वळणदार अक्षरांत आपली सही केली. "वा:! जितकं फाउंटन पेन वजनदार, तितकं अक्षर झकास येतं! खूप महागाचं असणार पेन."

"काय माहीत. मला मात्र आवडलं. एकदम स्पेशल." लालमोहनबाबू खांदे उडवत म्हणाले. "याची कार्ट्रिजेसपण गरियाहाटमधल्या एका विशिष्ट दुकानातच मिळतात. घटक पेन्स."

"हम्म. आणि एकदा तुमचं लिहून झालं की तुम्ही प्रत्यक्ष 'अभिजन'कडे नेऊन देता?"

"हो हो. मी स्वतः. खरं तर भारद्वाज किंवा हरिपद, कोणीही हे काम करू शकेल. पण माझी एक अंधश्रद्धा म्हणा. मी स्वतः संपूर्ण कादंबरी नेऊन देतो. माझ्याकडे काहीही ठेवत नाही - एक प्रतदेखील नाही. चौर्‍याऐंशी हस्तलिखित मूळप्रती 'अभिजन'च्या तिजोरीत सुरक्षित आहेत!"

"मी 'अभिजन'ला भेटायला तुमची काही हरकत नाही ना?" फेलूदाने विचारलं.

"फेलूबाबू, या प्रकारात 'अभिजन'चा हात असेल असं मला नाही वाटत. माझ्याशी काही वैर असतं तर चौर्‍याऐंशी वेळा संधी मिळाली आहे त्यांना." फेलूदाचा चेहरा पाहून लालमोहनबाबू गडबडीने म्हणाले, "पण जाऊन या तुम्ही. ६४/१ कॉलेज स्ट्रीट."

निघण्यापूर्वी फेलूदाने खोलीची पूर्ण तपासणी केली. गाद्या उचलून पाहिल्या, उशांचे अभ्रे उलटेपालटे केले, पण त्याला अपेक्षित ते सापडलं नसावं. लालमोहनबाबूंचा निरोप घेऊन आम्ही निघालो.

लालमोहनबाबूंच्याच हिरव्या अँबेसेडरमधून आम्ही निघालो. हरिपदबाबू का कोण जाणे व्यग्र दिसत होते. त्यांचं पूर्ण लक्ष ड्रायव्हिंगवर नव्हतं. मी हे फेलूदाच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला, पण तो निळ्या वहीत डोकं खुपसून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता.

डाव्या बाजूने श्रद्धानंद पार्क मागे पडलं. पण बोईपार्‍यात जायला उजवीकडे वळण्याऐवजी हरिपदबाबू डावीकडच्या एका छोट्याशा गल्लीत अचानक वळले. नीलमोनी गांगुली लेनमधून उजवी-डावी वळणं घेत सरळ व्हिक्टोरिया मेडिकल कॉलेजपाशी बाहेर पडले.

"हरिपदबाबू, आपण..." मी पुढचं काही बोलायच्या आत गाडी थांबली आणि फेलूदाने मला गाडीबाहेर ओढलं. आम्ही मागे वळून पाहिलं. एक मोतिया रंगाची काँटेसा भरधाव वेगाने बी बी गांगुली रस्त्याकडे वळताना दिसली.

"ही काँटेसा साहेबांच्या घरासमोरून जाते." हरिपदबाबूही गाडीतून उतरले होते. "घराच्या अगदी जवळ पार्किंग असलं तर थांबते, नाहीतर गोलगोल चकरा मारते, आणि निघून जाते." त्यांनी माहिती पुरवली.

"किती दिवस चालू आहे हे?" फेलूदाने विचारलं.

"कमीतकमी तीन महिने तरी चालू आहे. त्याआधी मी सुट्टीवर गावी गेलो होतो, तेव्हाचं ठाऊक नाही."

"हरिपदबाबू, गाडीत कोण असतं कधी पाहिलंत का?" मी विचारलं.

"नाही तपेशबाबू. काळ्या काचा आहेत. आतलं काहीही दिसत नाही. कोणी उतरतही नाही. दिवसातून एकदा तरी येतेच. कधीकधी दोनदा." हरिपदबाबू म्हणाले.

“बहोत खूब, हरिपदबाबू!” फेलूदाच्या चेहर्‍यावर हसू होतं. “तुम्ही नसतात तर आज बोईपार्‍यात आपण निष्कारण वेळ घालवला असता!”

“म्हणजे?” मी आश्चर्याने म्हणालो. ”आपण बोईपार्‍यात चाललो नाहीये?”

“आता काही गरज नाही. आपण घरी चाललोय.”

फेलूदा आता एकदम खुशीत होता. शीळ वगैरे घालत होता. आपला मोबाइल काढून त्याने व्हॉटसअॅपवर एक मेसेज पाठवला, आणि निवांत मागे रेलून बसला. काही विशेष काम असल्याशिवाय फेलूदा व्हॉटसअॅप वापरत नसे. वेगवेगळ्या ग्रूप्समध्ये सामील होऊन टाईमपास करण्याकडे त्याचा कल नव्हताच.

मला मात्र काही समजत नव्हतं. डोक्यात गोंधळ उडाला होता. कादंबरीची रूपरेखा-आराखडा चोरणं ही चोरी होऊ शकते का? एकच कल्पना दोन हुशार लोकांना एकाच वेळी सुचली, तर कोणीच कोणाची चोरी केली नाहीये. असं तर झालं नसेल? पुस्तक प्रकाशित झालं असतं तर जटायूंची छि:थू झाली असती. थोडक्यात वाचले जटायू. कोण असेल त्यांच्या वाईटावर?

--x--

मी दोन्ही पुस्तकं उचलली आणि शेजारी शेजारी धरली. एकाच उंचीची, जवळजवळ तेवढीच जाड. दोन-तीनशे पानं. अक्रूर नंदीच्या पुस्तकाच्या लालबुंद पार्श्वभूमीवर काळ्या कवट्यांचा मनोरा होता, समोर कॅप्टन स्पार्कची आकृती होती. जटायूंच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कंबोडियाचा नकाशा होता, आणि त्यात एका खंजीर खुपसलेला होता. आतल्या कथेत काय साम्यं असायची ती असोत, तरी दोन्ही पुस्तकांची कव्हरं मात्र सारखी नव्हती.

"शाबास, तोपशे." फेलूदा म्हणाला. "दोन गोष्टींमुळे ही केस एकदम सोपी झाली आहे."

"कोणत्या?" मी उत्सुकतेने विचारलं.

"तुला आत्ता जाणवलेली पहिली." फेलूदा स्मित करत म्हणाला. "जटायूंच्या आणि नंदीच्या पुस्तकाची कव्हर्स वेगवेगळी आहेत. याचा अर्थ काय आहे?"

"काय?"

"असं बघ. समज तोपशे आणि फेलू प्रकाशक आहेत. आपल्यात भयंकर स्पर्धा आहे. फेलूच्या लेखकाचं पुस्तक तयार आहे - मुखपृष्ठ आणि मजकुरासकट. काहीतरी घडून ते तोपशेच्या हाती पडतं. फेलूचा काटा काढायची एक शक्कल तोपशेच्या डोक्यात येते - असंच पुस्तक बनवून फेलू प्रकाशनाच्या आधीच बाजारात आणलं तर? लोकांना वाटेल की फेलू प्रकाशनाने तोपशे प्रकाशनाची नक्कल केली. मग ही योजना डोक्यात ठेवून तोपशे आपल्या लेखकाला मजकुराची नक्कल करायला बसवतो. मग कव्हरची नक्कल करायला काय अडचण आहे? पण इथे..." फेलूदा पुस्तकं मला दाखवत म्हणाला, "कव्हरं साफ वेगळी आहेत."

माझं डोकं आता चालायला लागलं होतं. "हम्म. याचा अर्थ जटायूंच्या पुस्तकाची चोरी प्रकाशकाकडून झाली नाहीये."

"कर्रेक्ट! आणि दुसरी गोष्ट."

"ती काँटेसा!" माझी ट्यूब पेटली.

"क्या बात है, तोपशे! हल्ली च्यवनप्राश वगैरे खातोस का?" फेलूदा हसत म्हणाला. "मी माझ्या मित्राला - इन्स्पेक्टर शॉबूजला - मोतिया रंगाच्या काँटेसाबद्दल विचारलं आहे. तो शोधून काढेल मालकाचं नाव."

मला काहीच समजलं नव्हतं.

"हूडनिट?"

"होय. पण हे हूडनिट नाहीये. व्हायडनिट आहे. आणि हाऊडनिटसुद्धा." फेलूदा कपाळाला आठ्या घालत म्हणाला. "अक्रूर नंदीचा फोन डिरेक्टरीत आहे का बघ रे जरा..."

अक्रूर नंदी या नावाने डिरेक्टरीत कोणताच फोन नंबर नव्हता. आता हे फेलूदाला सांगितलं असतं तर तो वैतागला असता. मी सरळ मृगाला फोन लावला. तिने भलतीच माहिती दिली. 'जटायू' हे जसं लालमोहन गांगुलींचं टोपणनाव आहे, तसं 'अक्रूर नंदी' हे मोनीकांचन देवबर्मनचं टोपणनाव आहे म्हणे.

हे फेलूदाला सांगताच त्याच्या कपाळावरच्या आठ्या लगेच विरल्या. स्वतःशीच हसत त्याने परत व्हॉट्सअॅपमध्ये डोकं खुपसलं. अक्रूर नंदी उर्फ मोनीबाबू चांगलाच आतिथ्यशील निघाला. फेलूदाने फोन करून भेटायला येऊ का विचारताच त्याने चक्क जेवणाचं आमंत्रण दिलं!

आम्ही कपडे करून लगेच कूच केलं. मला वाटलं परत हरिपदबाबूंना बोलवून गाडीने जायचं आहे, पण फेलूदाने रोबिंद्र सरोवर मेट्रो स्टेशनच्या दिशेने प्रयाण केलं.

"तपश्या, हे काम आपण फुकट करतोय. उगाच टॅक्सीवर पैसे नको उधळायला..."

पण वाटेत लेक प्लेसच्या भारतलख्खी मिष्टान्न भांडारमध्ये थांबून त्याने किलोभर शाँदेश मात्र घेतले.

"फेलूदा, पेनी वाईज पाऊंड फूलिश ही म्हण ऐकलीयेस का रे कधी?"

"मुस्काडात हाणीन तपश्या." फेलूदा हसत म्हणाला. "कोणी जेवायला बोलावलं तर मोकळ्या हाताने जातात का?"

धरमतल्ल्याच्या बाजूला अक्रूर नंदींचं घर होतं. एस्प्लनेडला उतरून आम्ही चालू पडलो. फेलूदा घारीसारख्या नजरेने आसमंत टिपत होता. पण त्याला हवी असलेली गोष्ट अक्रूरच्या घराबाहेरच उभी होती. मोतिया रंगाची काँटेसा!

अक्रूरचं घर तळमजल्यावरच होतं. आम्ही बेल वाजवली. एका बुटक्या बळकटशा दिसणार्‍या बिहारी माणसाने दार उघडलं. त्याच्या अंगावर पांढरास्वच्छ युनिफॉर्म होता. त्याच्या सोनेरी गुंड्यांवर आणि सुरकुत्या-डागविरहित कापडावर फेलूदाची नजर फिरलेली मी पाहिली. एक शब्दही न बोलता त्याने आम्हाला आत नेलं. छोटासा दिवाणखाना होता - पलीकडेच स्वयंपाकघर दिसत होतं. दिवाणखान्याच्या एका टोकाला खुर्चीत बसलेला एक माणूस आमच्याकडे सस्मित नजरेने पाहात होता.

“या या, फेलूबाबू! अलभ्य लाभ! तुमचं करियर उत्सुकतेने टिपतो मी! आयडियासुद्धा घेतो कधीकधी.” तो म्हणाला. “अर्थात जटायूसारखं नशीब नाही माझं - त्यांची पुस्तकं तुम्ही तपासून देता म्हणे!”

नव्या माणसाबद्दलची माहिती निरीक्षणातून कशी मिळवायची हे फेलूदाने मला शिकवलं होतं. पहिलं म्हणजे माणसाच्या वयाबद्दल अंदाज बांधायचा. म्हणजे मग त्याच्या आवडीनिवडी, व्यवसाय, वगैरे बाकी गोष्टींबाबत अंदाज बांधणं सोपं पडतं. अक्रूर नंदीचं वय मात्र मला सांगता येईना. माझ्यापेक्षा मोठा, पण लालमोहनबाबूंपेक्षा लहान. साधारणपणे फेलूदाएवढा?

फेलूदाने पुढे होऊन अक्रूरशी हात मिळवला. त्याच्यापाठोपाठ मीही मिळवला. बंगाली रहस्यकथांचे दोन्ही सम्राट मला प्रत्यक्ष भेटले होते! आणि गंमत म्हणजे:
“तोपशे!” अक्रूर त्याचं ते स्मितहास्य करत म्हणाला. “तुझ्यामुळे फेलूबाबूंच्या कथा वाचायला जास्त मजा येते. असाच लिहीत राहिलास तर एका दिवस मोठा लेखक होशील!” यावर काय बोलावं ते न सुचून जरा भांबावलो!

दोन मिनिटं कोणीच काही बोललं नाही. ऑकवर्ड सायलन्स! मग फेलूदाने घसा खाकरला, “आम्ही इथे का आलोय…” पण अक्रूरने त्याला थांबवलं. “फेलूबाबू, तुम्ही येणार हे मला सकाळपासूनच माहीत होतं. पण आधी जेवून घेऊ या. मग आहेतच या चर्चा.”

जेवायला ‘शोर्शे इलिश’ होता. म्हणजे मोहरीच्या ग्रेव्हीत बनवलेला हिलसा मासा. आजकाल मासे फार महाग झाले आहेत असं बाबा सारखं कुरकुरत असतात, आणि शोर्शेसारख्या किचकट पाककृती करायला आई तयार नसते. आज असं अचानक समोर आल्यावर मात्र मी आडवा हात मारला. फेलूदा आणि अक्रूर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. मी काही फारसं लक्ष दिलं नाही. जेवण संपतासंपता मात्र विषय उपग्रह वाहिनीवरच्या ‘जटायू-नंदी मुलाखती’कडे वळला.

“तुम्ही मुलाखत पाहिलीत का, फेलूदा?” अक्रूर नंदीने विचारलं. मी अक्रूरकडे पाहिलं. मघांच्या उत्फुल्ल दिलखुलासपणावर कसलासा काळपट ढग आला होता.

खरं तर मुलाखत आम्ही दोघांनीही पाहिली नव्हती. माझी परीक्षा होती, त्यामुळे बाबांनी टीव्हीवर बंदी घातली होती. फेलूदा राजनांदगावला कामासाठी गेला होता. आम्ही नकारार्थी मान हलवताच अक्रूर म्हणाला, “चला - आधी मुलाखत बघू या. मग नंतर…”

वाक्य अर्धवटच टाकून तो आतल्या एका खोलीकडे निघाला. खांदे पडले होते, पाय जमिनीला घासत होते. आम्ही पाठोपाठ गेलो.

आतली खोली अक्रूरची लिहिण्याची खोली होती. प्रशस्त, हवेशीर, प्रकाशमान. एका भिंतीशी पुस्तकांचं कपाट, दुसर्‍या भिंतीवर अवाढव्य टीव्ही स्क्रीन. (तो अठ्ठ्याण्णव इंचाचा आहे असं फेलूदाने नंतर सांगितलं!) लांबसडक टेबलावर एका कोपर्‍यात लॅपटॉप. दुसर्‍या बाजूला कोर्‍या कागदांची चळत, आणि त्यावर लालमोहनबाबूंच्या पेनासारखंच एक पेन.

फेलूदाही त्या पेनाकडे पाहात होता.

अक्रूरने टीव्ही सुरू केला. तो लॅपटॉपला जोडलेला होता, कारण स्क्रीनवर 'वाकॉम स्टुडियो प्रो' अशी अक्षरं झळकली, आणि स्क्रीनवर फेलूदाची लफ्फेदार सही चमकली. क्षणभरासाठीच. झटक्यात स्क्रीन बदलला, आणि 'कांपुचियातली काळरात्र'चं लाल मुखपृष्ठ वॉलपेपरच्या स्वरूपात झळकलं.

मला भास होताहेत की काय मला कळेना. अक्रूरच्या लॅपटॉपवर फेलूदाची सही? अक्रूर फेलूदाचा चाहता आहे वगैरे ठीक आहे, पण दोघे आधी कधी भेटले नव्हते हे मला माहीत होतं. तरी अक्रूरकडे फेलूदाची सही कशी काय? 'वाकॉम स्टुडियो प्रो' काय असतं?

मी फेलूदाकडे पाहिलं, तर त्याने स्क्रीनसमोरच्या एका बीन बॅगवर बैठक जमवली होती. चेहर्‍यावर ते सुप्रसिद्ध वाकडं हसू होतं. काहीही न बोलता मीही शेजारच्या बीन बॅगवर जाऊन बसलो. समोर व्हिडियो सुरू झाला.

--x--

जटायू-नंदी मुलाखतीतला काही भाग

मुलाखतकार : जटायू, तुमच्या लेखनाची प्रेरणा काय होती? सुरुवात कुठून झाली?
जटायू : लहानपणापासून मला कथा वाचायला फार आवडतं. पुस्तकांमध्ये मी अक्षरशः हरवून जात असे. मोठा झालो, बीए केलं. वडील म्हणत होते आता कुठेतरी नोकरी धर. मी त्यांना विनंती केली की एक वर्ष तुम्ही मला द्या. त्या वर्षात मी पहिली कादंबरी लिहिली. अभिजन प्रकाशनाने प्रसिद्ध केली. अँड रेस्ट इज द हिस्टरी. (फेलूदाने इथे तोंड आंबट केलं! - तपश)
मुलाखतकार : अक्रूर, जटायूंपेक्षा तू खूपच तरुण आहेस. तुझ्या लेखनाची प्रेरणा काय होती?
अक्रूर नंदी : माझ्या लेखनाची प्रेरणा इथे बसली आहे! जटायू!
मुलाखतकार : (आश्चर्याने) तुझ्या लेखनाची प्रेरणा जटायू?
अक्रूर नंदी : हो! थोडी कथा आहे त्यामागे - मी तेरा वर्षांचा होतो, तेव्हा एके दिवशी अचानक वेगळा वागायला लागलो. कधी फार मस्त वाटे, कधी एकदम निराश, रितं रितं वाटे. एकटेपणा. तुटल्यासारखं. आत्महत्येचे विचार मनात येत. वडील देवभोळे होते. त्यांना वाटलं काही बाहेरची बाधा आहे. ते मांत्रिकाकडे घेऊन गेले. पण माझी आई शहाणी होती. ती मला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेली. त्यांनी निदान केलं ‘बॉर्डरलाइन पर्सनालिटी डिसॉर्डर’. न्युरॉलॉजिकल कारणांमुळे होणारा एक प्रकारचा मनोविकार.
मुलाखतकार : (काय बोलावे ते न सुचून) बरं! मग?
अक्रूर नंदी : हल्ली औषधं निघाली आहेत - हॅलोपेरिडॉल रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अमिट्रिप्टायलीनसारखी अँटीडिप्रेसंट्स. त्या काळी असलं काहीच नव्हतं. सगळी भिस्त थेरपीवर. थेरपी देणारे डॉ. सरकार म्हणाले, तुला जे आवडतं त्यात मन रमव. मला जटायूंची पुस्तकं वाचायला आवडत असत. ती सगळी परत वाचून काढली. पण ती पुस्तकं तरी अशी किती दिवस पुरणार? आणि आणखी एक गोष्ट झाली…
मुलाखतकार : ती कोणती?
अक्रूर नंदी : (घुटमळत) सांगू की नको याचा विचार करतोय. जटायू, रागावू नका प्लीज. काही पुस्तकं मला पटली नाहीत. कथा चुकीच्या दिशेने गेली असं वाटलं. काहीकाही तपशीलही चुकीचे होते. (ही फेलूदा तपासायला लागण्याच्या आधीची पुस्तकं असणार. - तपश) एकदा वाटलं, जटायूंना पत्र पाठवून सांगावं.
मुलाखतकार : मग सांगितलंस का?
अक्रूर नंदी : नाही! त्याऐवजी मीच कथा लिहायला सुरुवात केली! I wrote what I wanted to read. डॉ. सरकारना दाखवलं, तर त्यांना खूप आवडलं. त्यांनीच प्रकाशकाशी गाठ घालून दिली…
मुलाखतकार : म्हणजे तुझी पुस्तकं ही जटायूंची फॅन फिक्शन आहे असं म्हणता येईल का?
अक्रूर नंदी : अंsss… अगदी असंच नाही म्हणता येणार. इतरही लेखकांचे प्रभाव आहेतच. जॉन ल कारे, शरदिंदू बंदोपाध्याय, सुहास शिरवळकर वगैरे. पण सुरुवात जटायूंपासून झाली हे नक्की.
मुलाखतकार : फारच रोचक आहे हे. जटायू - याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
जटायू : (घसा खाकरत) जरा विनोदीच वाटलं, नाही म्हटलं तरी. माझी पुस्तकं आणि अक्रूर नंदींची पुस्तकं यात साम्य आहे असं मला कधी वाटलं नाही. डोकं ठिकाणावर असलेल्या कोणत्याही वाचकाला असं वाटलं नसेल. अर्थात त्याची पुस्तकं डोकं ठिकाणावर नसतानाच लिहिली गेली आहेत, त्यामुळे… ह्या ह्या ह्या…
(क्षणभर तणावपूर्ण शांतता, आणि मग अक्रूरही हसण्यात सामील होतो.)

अक्रूरने व्हिडियो पॉज केला, "आणखी आहे. पाहायचं आहे?"

मी अवाक झालो होतो. फेलूदाचा चेहरा आवळला होता.

“हे त्या वाहिनीने प्रसारित केलं?” मी भीत भीत विचारलं.

“नाही.” अक्रूर नि:श्वास सोडून म्हणाला. “मुलाखतकार जटायूंना विचारते वगैरे भाग एडिट केला. मी अनकट व्हर्जन नंतर मागवून घेतलं.”

फेलूदा काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यांत काचेरी चमक होती. आपले लांब पाय सावरत तो उठला.

“लालमोहनबाबूंच्या वतीने मी क्षमा मागतो तुझी, मोनी.”

दोन पावलांत अक्रूर पुढे झाला आणि फेलूदाला कडकडून मिठी मारली. ते दोघे अलग झाले, तेव्हा दोघांच्याही डाव्या खांद्यावर दमट पॅच होता.

आम्ही तिथून निघालोच. पण निघायच्या आधी तिघांचा एका सेल्फी काढला मी. त्यात तो पॅच स्पष्ट दिसतो.

फाटकापाशी पोहोचलो आणि मागून अक्रूरची हाक आली. “तोपशे, जटायूंना हे पेन दे. माझ्याकडून ही खरीखुरी भेट.” वॉटरमन कंपनीचं निळंशार फौंटनपेन होतं ते. “त्यांना सांग, आधीचं तोडून फेकून द्या.”

“येतो.” फेलूदा म्हणाला.

--x--

लालमोहनबाबू दोन्ही हातांत डोकं धरून बसले होते. फेलूदा त्यांना न-भूतो-न-भविष्यति तासडत होता.

“नक्की कसला माज आहे तुम्हाला लालमोहनबाबू? देवाच्या दयेने तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे. सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे. पुस्तकं खपतात, पैशाच्या बाजूला काही खोट नाही. म्हणून कोणाच्या आजारावर, व्यंगावर असलं बोलायचा हक्क मिळाला असं वाटतं का तुम्हाला?”

माझीच चड्डी पिवळी व्हायची वेळ आली होती. फेलूदा चिडतो तेव्हा आजिबात आरडाओरडा करत नाही. त्याचा आवाजही चढत नाही. पण शब्दांना अशक्य धार येते.

“कुठे बोलताहात याचा तरी विचार करायचात. टीव्हीवर होतात तुम्ही. त्यांनी तो भाग कट केला हे एक सोडा, पण तुम्ही डोकं विकलं होतंत का? मनाचा सडका भाग असा जगाला दाखवताना लाज नाही वाटली?” फेलूदा कडाडला.

“आय अॅम सॉरी, फेलूबाबू. मी माफी मागतो अक्रूरची…”

“काही गरज नाही त्याची. मी मागितली तुमच्या वतीने. तुमचा मित्र म्हणवायला शरम वाटली मला, लालमोहनबाबू. खरं सांगतो.”

“थँक यू, फेलूबाबू!” लालमोहनबाबूंच्या डोळ्यांत पाणी आलं. “मला शिक्षा करा. मी चुकलो.”

“आपण भेटायच्या आगोदरची गोष्ट आहे, लालमोहनबाबू.१ आम्ही दार्जिलिंगमध्ये एका रहस्याची उकल केली होती. राजनबाबू नावाच्या तिथल्या एका गृहस्थाला निनावी पत्रं लिहून कोणी घाबरवत होता. शेवटी असं निष्पन्न झालं की तो घाबरवणारा मनुष्य राजनबाबूंचा भाडेकरू टिंकोरीबाबू होता.२ कारण काय होतं ठाऊक आहे?”

लालमोहनबाबूंनी नकारार्थी मान हलवली.

“राजनबाबू आणि टिंकोरीबाबू लहानपणी एकाच शाळेत होते. धावण्याच्या एका शर्यतीत राजनने टिंकोरीला लाथ घालून पाडलं होतं. टिंकोरी शर्यत तर हरलाच, त्याशिवाय त्याला मोठी इजाही झाली. टिंकोरीच्या पालकांनी त्याला दुसर्‍या शहरात नेऊन उपचार करवले, त्यामुळे टिंकोरीला कधी राजनला जाब विचारता आला नाही. पन्नास वर्षांनी टिंकोरी राजनच्या घरात भाडेकरू म्हणून आला. शेल्फात असलेल्या एका फोटोवरून हाच तो राजन हे टिंकोरीच्या लक्षात आलं, आणि सूडभावना पन्नास वर्षांनी जागृत झाली. याचं तात्पर्य काय, लालमोहनबाबू, लक्षात येतंय?”

“की पापाचा घडा शेवटी भरतोच…” लालमोहनबाबू साश्रुनयनांनी म्हणाले.

“बरोबर. तुमच्या पापाचा घडा लवकर भरला. आपली बुद्धी वापरून अक्रूरने तुमचं पुस्तक अक्षरशः हायजॅक केलं. पार माकड बनवलं तुमचं…”

“म्हणजे?”

“अक्रूरचं पेन द्या इकडे.” लालमोहनबाबूंनी पेन देताच फेलूदाने काड्कन त्याचे दोन तुकडे केले! आतून बरेचसे इलेक्ट्रॉनिक भाग बाहेर पडले.

“स्मार्टपेन.” फेलूदा म्हणाला. “अक्रूर टेक सॅव्ही आहे, लालमोहनबाबू. तुमच्यापेक्षा तर खूपच. तुम्ही अजून कागदावर लिहिता, तुमचे प्रकाशक सगळं टाइप करतात. पण अक्रूर पुढच्या पिढीतला आहे. प्रकाशकाला सरळ टाइप केलेला मजकूर पाठवतो. पण त्यालाही हाताने लिहायला आवडतं असं दिसतंय, पण कोणाकडून टंकवून घेत नाही. त्याच्या आजारामुळे त्याला लोकसंपर्क नको असेल, किंवा त्याला स्वतःचा खाजगीपणा जपायचा असेल. त्यामुळे तो वापरतो स्मार्टपेन. याच्या निबच्या आतल्या बाजूला छोटासा कॅमेरा असतो. लिहिलेलं सगळं रेकॉर्ड होतं, पेनाच्या मेमरीत साठवलं जातं. पेन त्याच्या फोनच्या हॉट स्पॉटशी जोडलेलं असणार. थोड्या वेळाने पेनातला मजकूर फोनमार्गे क्लाउडमध्ये जातो. लॅपटॉपमधून ते अॅक्सेस होतं, आणि हँडरायटिंग रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरून युनिकोडमध्ये टंकन होतं.”

लालमोहनबाबू आss वासून फेलूदाकडे एकदा आणि पेनाच्या अवशेषांकडे एकदा आलटून पालटून पाहात होते! लालमोहनबाबूंच्या टेकसॅव्हीनेसची झेप 'बटण दाबल्यावर छत्री उघडते' यापुढे अजून गेली नव्हती.

'आपलं आधीच कनेक्टेड पेन लालमोहनबाबूंना अक्रूरने भेट म्हणून दिलं.' माझ्या डोक्यात मात्र प्रकाश पडला. “तुम्ही ते पेन वापरून जे लिहाल ते पेनात सेव्ह होत होतं, लालमोहनबाबू. दिवसातून एकदा तो त्याच्या मोतिया काँटेसा गाडीतून तुमच्या घराजवळ येऊन सगळं आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्स्फर करून घेत असे. त्यासाठी त्याला फक्त रेंजमध्ये येणं आवश्यक होतं. म्हणजे शंभर फुटाच्या आत! तुम्ही स्वहस्ते आपलं पुस्तक त्याच्या हवाली केलंत, लालमोहनबाबू!”

“त्याने तुम्हाला खरं पारखलं. जटायू ते पेन ‘स्पॉइल्स ऑफ वॉर’ सारखं वापरणार - ते शोकेसमध्ये ठेवणार नाहीत, तर पुढचं पुस्तक लिहिण्यासाठी वापरणार हा त्याचा होरा तुमच्या दुराभिमानाने खरा ठरवला.” फेलूदा म्हणाला. “इन माय हम्बल ओपिनियन, यू डिझर्व्ह व्हॉट यू गॉट…”

लालमोहनबाबूंनाही असंच वाटत असावं. ‘कंबोडियातली कंबख्ती’ कधीच प्रकाशित झाली नाही. किंबहुना त्या दुर्गापूजेला जटायूंची कोणतीही कादंबरी प्रकाशित झाली नाही. आपल्या अनेक पंख्यांचा रोष मात्र ओढवून घेतला. लालमोहनबाबूंनी अभिजन प्रकाशनाला संपूर्ण नुकसानभरपाई दिली. त्यात त्यांना बराच आर्थिक फटकाही बसला असावा. 'कांपुचियातली काळरात्र' आजही अक्रूर नंदीच्या बेस्टसेलर कादंबर्‍यांमध्ये पहिल्या पाचांत आहे.

लालमोहनबाबू त्यानंतर अक्रूरला प्रत्यक्ष भेटले की नाही, माफी मागितली की नाही हे मला ठाऊक नाही. पण अक्रूरने भेट दिलेलं दुसरं पेन - वॉटरमन - लालमोहनबाबूंच्या डेस्कासमोर एका काचेच्या केसमध्ये आहे. कधी लालमोहनबाबूंकडे गेलो की या कथेची आठवण द्यायला ते सदैव हजर असतं.

--x----x----x--
_____
१आम्हाला (फेलूदाला आणि मला) लालमोहनबाबू प्रथम भेटले ते राजस्थानात. पाहा: 'शोनार केल्ला' (प्रथम प्रकाशन : 'देश', १९७१)
२ 'फेलूदार गोएंडागिरी' (प्रथम प्रकाशन : 'देश', १९६५)

प्रतिक्रिया

शिवोऽहम्'s picture

29 Oct 2016 - 2:05 am | शिवोऽहम्

फेलुदाची शैली मस्त जमली आहे! त्यात स्मार्टपेन, IoT वगैरेंचा तडका भारीच.

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 7:18 am | बोका-ए-आझम

भीषण शुंदर साहित्यशिल्प!

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:29 pm | कविता१९७८

खुपच छान गहन कथा.

मनिमौ's picture

29 Oct 2016 - 5:34 pm | मनिमौ

फार आवडली

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 7:25 pm | यशोधरा

चांगली जमली आहे.

प्रचेतस's picture

30 Oct 2016 - 7:57 am | प्रचेतस

आदूबाळ खरंच थोर लेखक आहे.
अप्रतिम जमलीय कथा.

व्वा ! खूप मस्त जमली आहे कथा !!

व्वा ! खूप मस्त जमली आहे कथा !!

गहनकथा खरेच भीषोण सुंदर जमली आहे. मजा आ गया.

आतिवास's picture

30 Oct 2016 - 4:20 pm | आतिवास

খুব সুন্দর. খুব ভালো. আমি গল্পের মতো না.
पण कथेतले एक दोन धागे जरा विस्कळीत वाटले.
पुन्हा वाचते. सवडीने.

फेलुदा कथांप्रमाणे यातही नक्की काय गडबड आहे ती दिशा किंवा क्लू सराईत वाचकाला आधीच लागलेला असतो. पण तरीही शेवटपर्यंत कथा वाचणं अपरिहार्य होत जातं कारण खात्री नसते. म्हणून ही फॅनफीक तुफान आवडली.

आदूबाळाला मुळ शैली एखाद्या टिपकागदाप्रमाणे इतक्या नेमकेपणाने टिपतो, वापरतो नि आपलीशी करतो त्याला तोड नाही.

टाळ्या, शिट्या, पागोटी, शेमले!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Oct 2016 - 8:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं आदुदादुस. जमेश :)!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Oct 2016 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा ! एका लेखात संपवल्यामुळे लेखनावर बंधन आल्यासारखे वाटले.

'प्रतिस्पर्ध्याने बक्षीस दिलेल्या' पेनचं जरा जास्तच वर्णन आले तेव्हा संशय आला होता. घराभोवतीच्या गाडीच्या चकरांबद्दल वाचून संशय पक्का झाला.

सिरुसेरि's picture

31 Oct 2016 - 8:06 pm | सिरुसेरि

दारुण भीषण शुंदर आशेन .

खतरनाक जमलेली फॅन फिक्शन.
टोटल वातावरण उभेच झाले डोळ्यासमोर. अगदी अस्सलपणे.
रेंच्या फेलुदाला आजच्या काळात असे फ्युजन करणे सोपे नव्हते. आदुबाळाच्या व्यासंगाने हे आव्हान पूरेपूर पेलले.
काळ बदलतो, गुन्हे करायची अन ती अन्वेषण करायची साधने बदलत जातात, आधुनिक होत जातात. काळाबरोबर बदलणारा डिटेक्टिव्ह ह्या कन्सेप्टवरच मिपाचे कव्हरपेज करायची आयडीया आली. कव्हरपेजच्या सादरीकरणाचे सारे श्रेय केवळ या कथेला.

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2016 - 10:57 pm | बोका-ए-आझम

@अादूबाळ, एखादा अंक Fan Fiction याच विषयावर काढू या. तुम्ही लिहिलेल्या ३ Fanfics - ऐसीच्या भा.रा.भागवत विशेषांकातली फास्टर फेणेची, ऐसीच्याच पोर्न विशेषांकातली आनंदध्वजाची आणि आता या दिवाळी अंकातली ही फेलूदाची - हे वाचल्यावर Fanfic हा गंभीरपणे घेण्याचा विषय आहे असे वाटायला लागले आहे.

आदूबाळ's picture

1 Nov 2016 - 12:03 am | आदूबाळ

सवालच नाय. Fanfic हा खरंच गंभीरपणे घ्यायचा विषय आहे. Fanfic हा लेखनाचा अभिनय असतो. पण अभिनय जसा "माशी टु माशी" पद्धतीने करायचा नसतो तशी fanficही लिहायची नसते.

मूळ लेखक कधीही न मिळवू शकलेलं स्वातंत्र्य fanfic लेखकाला असतं.

बोकोबा, तुम्हीच जरा fanfic लिहायचं मनावर घ्या.

वा दिवालि च्या आंनदात दुधातसाखार ! बंगालि सहित्य आनि नावे खुप आवद्तात. धन्यवाद !

ज्योति अळवणी's picture

1 Nov 2016 - 1:41 am | ज्योति अळवणी

कथा थोडी predictable वाटते एका वळणावर. पण तुम्ही अप्रतिम खुलवली आहे. मजा आली वाचून

नाखु's picture

1 Nov 2016 - 11:39 am | नाखु

आणि भारी फुलवलेली कथा

हा दिवाळी फराळ आवडला..

फराळी वाचक नाखु

वरुण मोहिते's picture

1 Nov 2016 - 4:57 pm | वरुण मोहिते

बाकी काय सुचत नाहीये लिहायला पण आवडलं खूप ..

बरं, तुम्ही लिहिता कसं? थेट टाइप करता का?" मॅ़क आणि आयपॅडकडे बोट करत फेलूदा विचारता झाला.

"ह्या:! ही तर खेळणी आहेत. मी अजूनही खरंखुरं लेखन करतो. ते पहा!"
इथेच उलगडा झालेला, पण शेवट हा ख-या गुन्हेगाराला शासन हवाली करताना वाचून वेगळेपण वाटले.

अमृत's picture

2 Nov 2016 - 9:12 am | अमृत

कथा मस्त जमून आलिये.

अवांतर - त्या बँडिटच्या वाक्यात 'सही पकडे है' अपेक्षित होतं. ? :-) :-)

सस्नेह's picture

2 Nov 2016 - 11:35 am | सस्नेह

कथा छान मांडली आहे. मात्र रहस्याचा अ‍ॅटमबॉंब जरा लीक झालाय. :)

एकनाथ जाधव's picture

2 Nov 2016 - 1:35 pm | एकनाथ जाधव

भीषण शुन्दर कथा

मस्त.. बाकी प्रतिसादांत आल्याप्रमाणे रहस्य जरा आधीच लक्ष्यात आले, पण बाकी कशा छान जमलीये.

पद्मावति's picture

3 Nov 2016 - 2:46 am | पद्मावति

खुपच छान.

अनुप ढेरे's picture

3 Nov 2016 - 4:23 pm | अनुप ढेरे

खूप छान लिहिलय!

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 6:33 pm | पिलीयन रायडर

मस्तच!

ग्रेंजर's picture

7 Nov 2016 - 2:36 pm | ग्रेंजर

छान जमलीये !!!!!!!!

शलभ's picture

7 Nov 2016 - 4:34 pm | शलभ

मस्त आहे. आवडली.
मागे एका दिवाळी अंकात रारंगढांग चा पुढचा भाग वाचण्यात आला. त्याची बॅकग्राऊंड अशी होती की दिवाळी अंकाने रारंगढांग चा पुढचा भाग लिहिण्याची स्पर्धा आयोजीत केलेली आणि ज्याची सगळ्यात चांगली असेल तीला अंकात स्थान मिळणार होतं. ती कथा ठीकठाक होती. पण तुम्ही खूप मस्त लिहिली असती. जमल्यास मिपावर असा प्रयोग पाहायला मजा येईल.

वरुण मोहिते's picture

7 Nov 2016 - 5:22 pm | वरुण मोहिते

रारंगढांग नंतर अश्या नावाचं. श्रीकृष्ण सवदी म्हणून लेखक आहेत . मला काही आवडलं नाही विशेष असो. पण तुमची सूचना चांगली आहे .

पैसा's picture

10 Nov 2016 - 5:36 pm | पैसा

क्या बात!

जुइ's picture

22 Nov 2016 - 9:19 am | जुइ

गुढ कथा आवडली!

असंका's picture

26 Nov 2016 - 10:08 am | असंका

आदुबाळ

____/\____

पिशी अबोली's picture

26 Nov 2016 - 10:55 am | पिशी अबोली

आईशपथ!

jp_pankaj's picture

26 Nov 2016 - 11:09 am | jp_pankaj

मस्तय

जेम्स वांड's picture

2 Sep 2018 - 12:28 pm | जेम्स वांड

अशक्य ताकदीने केलेलं लेखन. आख्ख कलकत्ता /कोलकाता उभं राहिलं डोळ्यासमोर, अगदी त्याच्या कॉलॉनिअल इतिहासा सकट. खूब भालो दादा मोशाय.

शेखरमोघे's picture

2 Sep 2018 - 6:28 pm | शेखरमोघे

খুব ভালো আদুদা!!

लेखक स्वत:ला सहायक पात्र म्हणून बनून येतो ही क्ॡप्ती फार आवडली / आवडते आदूबाळच्या कथेत. ( होम्सचे किस्से वाटसनने सांगावेत तसं.)

समीरसूर's picture

5 Sep 2018 - 3:07 pm | समीरसूर

कथा छान लिहिली आहे पण ही कथा मी 'बोमकेश बक्शी'च्या एका भागात पाहिली आहे. मला 'बोमकेश बक्शी'च्या या भागाचे नाव आठवत नाहीये.

प्लीज आठवून त्या भागाचं नाव सांगा. मी ब्योमकेश बक्षीचा (मालिका, बंगाली/हिंदी चित्रपट आणि लेखन) या सगळ्या फॉर्म्याटमध्ये चाहता आहे, आणि माझ्या आठवणीप्रमाणे असा कथाभाग कशातच नाही. शरदेंदुबाबूंनी या कथा स्वातंत्र्य +/- २० वर्षे या काळात लिहिल्या असल्याने त्यात 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' असणं शक्य नाही.

अर्थात माझ्या नजरेतून सुटलं असेल हे शक्य आहेच.

----
नवीन प्रतिसादकांचे अनेक आभार! फॅन फिक्शन लिहिणं ही माझ्यासाठी खूप आनंददायक प्रक्रिया असते. त्याचं कौतुक झालं की अर्थात सुखद वाटतंच!

श्वेता२४'s picture

6 Sep 2018 - 3:20 pm | श्वेता२४

रहस्य आधीच कळलं तरीही शेवटपर्यंत वाचून काढायचा मोह आवरत नाही व कथेतला रस जराही संपत नाही हेच कथा लेखकाचे यश. अजुन वाचायला आवडेल. मिपावर खूप दिवसांनी छान रहस्यकथा वाचायला मिळाली.

प्रसाद_१९८२'s picture

6 Sep 2018 - 4:12 pm | प्रसाद_१९८२

रहस्य कथा छान आहे.
खूप आवडली.
-----
मात्र,
त्या अक्रूर नंदीने लालमोहनबाबू यांना दिलेला पेन 'स्मार्ट पेन' होता तर लालमोहनबाबू तो पेन चार्जींगला कधी लावायचे? कारण कादबंरी काही एक दोन दिवसात लिहून पुर्ण झाली नसणार ! शिवाय लालमोहनबाबूंच्या मते तो साधा पेन होता तर कादबंरी लिखाणाच्या काळात चार्जींग न करता त्या पेनात इतके लेखन रेकॉर्ड कसे झाले ?