माझ्या मना लागो छंद....!

अमृत's picture
अमृत in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 9:32 am

अर्ध्याहून अधिक बालपण ३ खोल्यांच्या आगगाडीच्या डब्यासारख्या खोल्यांतून गेले त्यामूळे बागेशी व त्यायोगे झाडांशी थेट असा संबंध फारसा आला नाही. नाही म्हणायला मावशीच्या घरी थोडीफार झाडं होती पेरू, डाळिंब, पपई, चक्री (पांढर्या फुलांचे झाड याला विदर्भात चक्री म्हणतात). पण तो संबंध केवळ तिच्या घरी जाण्यापूरता होता. सातवी आठवीत असताना स्वतःच्या घरात राहायला गेल्यावर मात्र बागकामाचे बाळकडू वडीलांकडून मिळायला लागले.

सुरुवात झाली ती बोगनवेलीपासून. घराला भलामोठा गोलाकार पोर्च(व्हरांडा) होता.या पोर्चवर बोगनवेल खूप छान बहरली. सोबतीला काही गुलाब, कुंदा, चमेली सुद्धा लावलेत. घरामागे अन्दाजे ८००चौफु जागा रिकामी ठेवली होती त्यात मग भाज्या लावण्याचे प्रयोग सुरू झालेत. सायंस कॉलेज समोरच्या शासकीय रोपवाटीकेतून काही रोपं व सोबतीला एक मिश्र बियांचे पाकिट आणलं.आणि बघता बघता घरची बाग भाज्यांनी बहरली. भेंडी, मका, तुरी, दुधी, पडवळ, हरसूल, टमाटे, वांगी सर्व प्रयोग करून झालेत. अजुनही घराच्या पोर्चवर चमेली रूबाबात बहरते व रात्रीच्या वेळी जणूकाही चांदण्या उतरून आल्याचा भास होतो. पुढे दोनेक वर्षांनी आमच्या परसबागेनी मुकाट्यानी आणखी दोन खोल्यांसाठी जागा मोकळी करून दिली व तिथे या छंदाला अल्पविराम मिळाला.

पुढे शिक्षणानिमित्त वर्धा सुटलं, आणखी दोन तीन गावी काही वर्ष नोकरीसाठी घालविल्यावर एकदाचा पुण्यात स्थायिक झालो.ऐसपैस मोकळ्या घरांमधे बालपण गेल्यामूळे सुरवातीला सदनिकेत अ‍ॅडजस्ट व्हायला जरा वेळ गेलाच. इथे घराला दोन गच्ची आहेत व भरपूर मोकळी हवा व सूर्यप्रकाश सुद्धा. एके दिवशी सकाळी गच्चीत चहा पिताना, खाली सोसायटीच्या बागेत माळी काही काम करीत होता. त्याला काम करताना बघून मला माझे माझ्या परसबागेतील दिवस आठवले आणि माझ्यातील हौशी माळ्याने परत उचल खाल्ली. आता माघार न्हवती!

त्याच दिवशी काही कुंड्या व रोपं घेऊन आलो आणि आमच्या गच्चीतील बागेचा श्रीगणेशा झाला. चला आपली बाग झाली असा गोड गैरसमज करून मी आनंदात होतो. आता नवनविन रोपं आणायचा सपाटा लावला. कधी कुठे फिरायला गेल्यास वाटेत रोपवाटिका दिसली तर आवर्जून भेट द्यायची व एकतरी रोपं आणायचंच हा नियम झाला. उरळी कांचन, निगडी, वाकड, किवाळे, तळेगाव, सोमाटणे या भागातील सगळ्या रोपवाटीकांना भेटी देऊन झाल्या. मित्रांकडून विविध बिया आणून त्या लावल्यात. एव्हाना घरी जवळपास ३० कुंड्या झाल्या होत्या.त्या नीट रचून ठेवण्यासाठी स्टँड बनवून घेतला. शनिवार व रविवारची सकाळ बागेकरीत राखून ठेवली होती. सकाळी चहा घेताना बागेत उमलेल्या फुलांकडे बघून खूपच प्रसन्न वाटायचं.पण...... ही तर केवळ सुरवात होती पिक्चर तो अभी बाकी थी.

हळूहळू दिवसागणिक नवनविन समस्या पुढे येऊ लागल्या आणि मी घाबरलो. लहान असताना मार्गदर्शन करायला वडील होते खरंतर परसबाग वडीलांनीच फुलवली होती. पण आता काय? बागेत पानांवर छोट्या पांढर्या माशा (white flies) काही पानांवर मिलीबग तर काही झाडांवर काळी भुकटी सांडल्याप्रमाणे रोग दिसू लागले. याचा परिणाम म्हणजे कमी झालेल्या कळ्या, खुरटी फुलं, कोमेजलेली पानं आणि माझा डळमळू लागलेला आत्मविश्वास.

मग आन्तरजालावरून, मित्रांकडून जमेल तशी माहिती काढायला लागलो. घरांजवळच्या रोपवाटीकांना पुन्हा भेटी देऊन तिथल्या माळ्यांबरोबर चर्चा करून झाली. लसूण, आलं, मिर्चीचा फवारा बनवून वापरून झाला, नीम तेलाचा वापर झाला, डिटर्जंटचा फवारापण झाला. पण रोग हाताबाहेर जाऊ लागला. त्यावेळी कुंड्यांची संख्या होती ३० ज्यापैकी ५ झाडांनी मान टाकली. मिलीबग कशालाच दाद देत न्हवते. याचा सर्वाधिक फटका रानजाई, मोगरा,अनंत व जास्वंदाला बसला. हीच झाडं काही महिन्यांपूर्वी भरभरून फुलं देत असतील यावर सांगूनसुद्धा विश्वास बसला नसता.अखेरीस ही झाडं छाटायचा निर्णय घेतला. जेमतेम बोटभर बुन्धा ठेऊन संपूर्ण रानजाईचा वेल,मोगरा, जास्वंद, अनंत छाटले. पैकी अनंत वगळता इतर झाडांनी या जालीम उपचारास दाद दिली तर अनंताची कमी गोडलिंबानी भरून काढली.

ऑफिसमधे सहकार्‍यांशी चर्चा करताना मी केलेल्या काही चूका लक्षात येऊ लागल्या उदा. रोपांची निवड करताना त्याची उपयोगीता, त्याला आवश्यक असणारं नैसर्गिक वातावरण इ ल्क्षात न घेता आणलेली रोपं. काही रोपं उन्हातली तर काही सावलीतली जी मी योग्य जागी ठेवली न्हवती, काही रोपं ज्यांना वर्षभरात केवळ एकदाच फुलं येतात. रोपं लावताना कुंडीत मातीबरोबर मिसळायच्या इतर वस्तु उदा. गांडूळखत, कंपोस्ट, कोकोपीट तसेच जीवामृताचा वापर इत्यादी. या घडीला ३० पैकी २० झाडं तग धरून होती. पण मी आता नविन रोपं न आणता असलेली झाडं जगवायला प्राधान्य देण्याचं ठरविलं.

सगळ्या कुंड्यातील माती उकरून हवा खेळती केली, DAP (Diamonium phosphet) आणलं, मित्राकडून कंपोस्ट मिळवलं, झाडांच्या नको असलेल्या किंवा अमर्याद वाढलेल्या फांड्या छाटल्या, काही नको असलेली झाडं उदा अडुळसा, जास्तीच्या तुळशी मित्रांना दिल्या, लिलीची अनावश्यक रोपं उपटून काढली आणि परत तयार झालो नविन मोसमासाठी.

यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला काही जास्वंदाची रोपं, सदाफुली, प्लंबॅगो, कण्हेर,काही गावरान गुलाब, सोनचाफा, मोगरा आणलेत सोबतीला जुन्या कुलरच्या पाण्याच्या टाकीत मेथी, पालक, कोथींबीर व पुदीना लावलेत. निकाल उत्साहवर्धक आहेत.सध्या बागेत घेवडा व कारली लावली आहेत काही फलनिश्पत्ती झाल्यास इथे चायाचित्रे टाकीनच. आजमितीला माझ्याकडे जवळपास ३५ कुंड्या दाटीवाटीने एकमेकींना 'kindly adjust' म्हणत नांदत आहेत.

घरी बाग फुलवताना जसं ती फुलवणार्‍याची मेहनत असते तशीच किंवा त्याहूनही अधिक घरातील इतर सदस्यांचा आधार(झाडांना पाणी घालणे), संयम(नवरा सुटीच्या दिवशी बागेत वेळ घालवतो म्हणून कूरकूर न करणे किंवा एकदा नाही म्हटल्यावर झाडांची पानं न तोडता बाबांबरोबर झाडांना पाणी घालणे) व प्रोत्साहन (बागेत नविन फुल उमलल्यावर त्याची स्तुती किंवा घरी उत्साहानी फुलविलेली पण एका भाजीला सुद्धा न पुरणारी मेथी थालिपीठांच्या रूपानी ताटात येणे) या गोष्टींचा पण बहुमूल्य वाटा असतो. या बागेचा आनंद आमच्याबरोबरच चिमण्या, कबुतरं, देवचिमण्या, फुलांतला रस अलगद पिणारे छोटे पक्षीपण लुटत आहेत.

घराला अंगण नसल्याची कमी या बागेनी नक्कीच भरून काढली आहे.

खाली माझ्या बागेतील काही छायाचित्रं देत आहे(सगळी छायाचित्रे मोबाईलवरून काढली आहेत)

१. लाल गुलाब
Rose

२. प्लंबॅगो
Plambago

३. सदाफुली
Vinca

४. मिनीएचर तगर

Mini tagar

५. जास्वंद १
Jaswand 1

६. जास्वंद २
jaswand 2

७. जास्वंद ३

Jaswand 3

८. जास्वंद ४
jaswand 4

९. ऑफीस टाइम
office time

१०.डबल तगर किंवा दूधमोगरा
double tagar

११. कश्मीरहून आणलेल्या बियांची फुलं
kashmir 1

१२. गुलबक्षी
Gulbakshi

१३. घरी उगविलेली मेथी, कोथिंबीर आणि पालक
Crops

१४. कूलरच्या टाकीतील प्रयोग.

sowing
१५. पिवळा गुलाब
yellow rose

१६. रानजाई
Ranjai

राहती जागामौजमजाछायाचित्रणविरंगुळा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

30 Sep 2016 - 9:39 am | महासंग्राम

वाह कुलरच्या टाकीतील प्रयोग आवडला आहे अभिनंदन !!!

मेघना मन्दार's picture

30 Sep 2016 - 11:17 am | मेघना मन्दार

काय सुंदर बाग फुलवली आहे हो :) मस्त दिसतायेत सगळीच फुल आणि भाज्या !!

अजया's picture

30 Sep 2016 - 11:19 am | अजया

छान बाग आहे तुमची.
बागेची काळजी अगदी लहान बाळासारखी घ्यावी लागतेच.मिलिबग जास्वंदावर येतातच.त्यासाठी एक औषध आमच्या जवळच्या गो ग्रीन नर्सरीत मिळते.एकदा मी जास्त मारला औषधी फवारा तर सगळी पानं पिवळी पडून गेली.हल्ली मी बग दिसले की तेवढा भाग छाटुन टाकते.
गच्चीतल्या बागेत निदान गोगलगायी तरी येत नसतील. तो एक छळवाद आहे.

सानझरी's picture

30 Sep 2016 - 11:29 am | सानझरी

मस्त लेख आणि सुंदर फोटो.. झकास अगदी.

११. कश्मीरहून आणलेल्या बियांची फुलं

या फुलांना कॉसमॉस म्हणतात. कात्रज घाटात याच महिन्यात ही फुलं फुलतात. कात्रजच्या जुन्या बोगद्याच्या अलिकडे आणि पलीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजुला ही फुलं फुलली आहेत. हा बहुतेक तणाचाच एक प्रकार आहे.

.

.

.

समछंदी भेटलं कुणीतरी. वा!