अळूची चिंचगुळातली मसाला देठी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
24 Aug 2016 - 1:52 pm

तसा मला रेसिपी द्यायला उशीर झालाय, श्रावणात शाकाहार असल्याने अनेकांना भाज्या काय करायच्या हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही वेगळी कृती!
साहित्यः
अळूची नुसती देठी २५/३० नग, चिंचेचा कोळ तीन चमचे, गूळ तीन चमचे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, तेल फोडणीसाठी,फोडणीचे साहित्य, कोथिंबीर.

dethi
कृती:
अळूची पाने आपण अळूवडीसाठी वापरतो. पण इथे नुसती देठी वापरायची आहे. अळूची देठी सोलून घ्यावी. छोटे गोल तुकडे करून घ्यावे. तुकड्यामध्ये थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे. वाफवताना एक काळजी घ्या, तुकडे जास्त शिजू देऊ नका. शिजलेले तुकडे चाळणीवर काढून त्यातले पाणी काढून टाका. पाणी काढल्याने देठीला खाज असेल तर निघून जाईल. गॅसवर कढई तापत ठेवा. तेलाची हिंग, मोहोरी, जीरे, हळद घालून फोडणी करा.गॅस बारीक करून फोडणीत लाल तिखट घाला. आता शिजलेली देठी घाला. तुम्हाला पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला. दाण्याचे कूट, खोबरे, गोडामसाला घाला. चिंचेचा कोळ आणि गूळ घाला, चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. गरजेनुसार तिखट, मीठ गूळ आणि चिंच याचे प्रमाण कमी जास्त करा. ही भाजी सणसणीत चांगली लागते.
कोथिंबीरीने सजवून वाढा.
dethi

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

24 Aug 2016 - 2:00 pm | त्रिवेणी

छान दिसते आहे.

सणसणीत चांगली लागते म्हणजे गरम असताना का?

पण प्रमाण देताना नेहमीच्या सर्वसामान्य चवीचे दिले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2016 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लागते ही भाजी.

अळू, सुरण इत्यादी भाज्यांमध्ये असलेले कॅल्शियम ऑक्झॅलेटचे सुईच्या आकाराचे स्फटिक घश्याला टोचून खवखव होते. पाण्यात उकळल्याने आणि चिंचेच्या कोळातील आम्लाने हे स्फटिक विरघळ असल्याने, या दोन प्रक्रिया केल्यास या भाज्यांमुळे होणारी खवखव कमी होते / टाळता येते.

जागु's picture

24 Aug 2016 - 3:04 pm | जागु

छान.
मी अळूच्या फतफत्यातच टाकते ही देठी. त्यातही छान लागते. ह्या देठींचे रायतेही करतात.

अनन्न्या's picture

24 Aug 2016 - 5:38 pm | अनन्न्या

रायते पण आवडते!

कविता१९७८'s picture

24 Aug 2016 - 3:24 pm | कविता१९७८

मस्त दिसतय

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2016 - 6:00 pm | स्वाती दिनेश

देठीचे रायते आवडते.
अळूची भाजी करताना देठी घालतोच आपण. पण मला वाटते, वड्यांच्या अळूची देठी रायत्याला किवा ह्या भाजीसारख्या देठीला जास्त वापरली जाते. कारण ती फक्त पानेच वड्यांकरता वापरली जातात.
मसाल्याची भाजी सारखी देठी खाल्लेली नाही कधी. आता बघेन.
स्वाती

नूतन सावंत's picture

24 Aug 2016 - 9:18 pm | नूतन सावंत

स्वातीशी सहमत.

साती's picture

24 Aug 2016 - 9:25 pm | साती

मस्तं!
आम्ही लाल पालेभाजीच्या (माठ) देठांचीही अशी देठी करतो.

राही's picture

25 Aug 2016 - 7:32 am | राही

आम्ही माठाचे जरा जूनसर देठ (अगदी लाकूड न झालेले) न सोलता सांबार मसाला आणि मीठ वगैरे चोळून उथळ तव्यावर थोड्या तेलात शेवग्याच्या शेंगाचे तुकडे तळावेत तसे तळतो. थोडे मातकट लागतात पण अनवट गावठी चव आवडते. सांबार मसाला जरा जाडसर रवाळ असला तर दुसर्‍या कुठल्या पिठात घोळवावे लागत नाहीत. पण मग मसाला खूप लागेल. तेव्हा थोडे इतर पीठ आवडीप्रमाणे मिसळावे. खाताना गर ओढून तोंडात येणार नाही, चावून चोथा फेकून द्यावा लागेल.
शिवाय हे जून देठ ऋषिपंचमीच्या कंदमुळात पाहिजेतच पाहिजेत.
ता. क. हेच ढेमसे ना?

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 12:08 pm | प्रभाकर पेठकर

ढेमसे वेगळे. ढेमशांना गुजराथी लोकं टिंडा म्हणतात.

ढेमसे इथे पाहा.

रुपी's picture

25 Aug 2016 - 2:34 am | रुपी

मस्त पाकृ

पिलीयन रायडर's picture

25 Aug 2016 - 2:57 am | पिलीयन रायडर

छान दिसतेय!

रेवती's picture

25 Aug 2016 - 8:05 am | रेवती

छान.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 8:14 am | कैलासवासी सोन्याबापु

तुफान क्लासिक दिसते आहे पाककृती ही! जमेश अँड आवडेश!

पैसा's picture

25 Aug 2016 - 9:35 am | पैसा

मस्त!

पद्मावति's picture

25 Aug 2016 - 2:18 pm | पद्मावति

मस्तं दिसतेय.