जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस

विहंग३००७'s picture
विहंग३००७ in भटकंती
23 Aug 2016 - 6:19 pm

जॉर्डन – पश्चिम आशियातल्या धगधगत्या वाळवंटी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवलेला एक चिमुकला देश. उत्तरेकडे सिरीया, पश्चिमेकडे इस्रायल व पॅलेस्टाईन, दक्षिणेकडे सौदी अरेबिया, तर पूर्वेकडे इराक अशा सतत ‘चर्चेत’ असणाऱ्या देशांच्या मध्ये राहून जॉर्डनने मोठ्या हिमतीने एक सुस्थिर राष्ट्र निर्माण केले आहे. जर्मनीहून भारताकडे येताना एकदा एजंटने रॉयल जॉर्डानियन या विमान कंपनीची तिकिटे हातात ठेवली. नाताळच्या सुट्टीमुळे विमानाची तिकिटे महागच होती. त्यातल्या त्यात याच कंपनीची तिकिटे जरा परवडणाऱ्या दरात मिळत होती. मात्र अम्मान (जॉर्डन ची राजधानी) येथे १३ तासांचा स्टॉप-ओवर होता. आता एवढा वेळ विमानतळावर बसून करायचे तरी काय? सहज म्हणून आसपास काही बघण्यासारखे आहे का याचा शोध घेऊ लागलो. जसजसे गुगल महाशय एकेक पान उघडून जॉर्डन विषयीची माहिती समोर आणू लागले तसतशी माझी उत्कंठा वाढू लागली. निसर्ग, इतिहास, स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती या सगळ्यांनी भरगच्च असा खजिनाच माझ्या हाती सापडला होता.

जॉर्डनचे स्थान

आपण भारतीय मंडळी परदेशसहल म्हटल्यावर युरोप, अमेरिका, दुबई, सिंगापूर, फार तर फार ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका, यांच्या पलीकडे फारसा विचार करत नाही. पण हे जग प्रचंड मोठं आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक देश आपापला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा अभिमानाने मिरवतो आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा तर थोडं चाकोरीबाहेर जायलाच हवं. पश्चिम आशियात दुबई वगळता अजून काही फिरण्यासारखे असेल असे वाटले नव्हते. अनायासेच जॉर्डन चा ‘शोध’ लागला होता. आता अम्मान मध्ये उतरतोच आहोत तर या देशाला एक धावती भेट द्यायलाच हवी असं ठरवून मी अम्मान ते मुंबई हा विमानप्रवास ५ दिवसांनी पुढे ढकलला. योगायोगाने भारतीय पासपोर्ट धारकांसाठी जॉर्डन चा व्हिसा on arrival उपलब्ध होता. सगळं जुळून येतंय हे पाहून मी अत्यानंदाने मनातल्या मनात एक टुणकन उडी मारली आणि फेसबुक वर feeling excited चा स्टेटसही टाकला!

तिकिटे आरक्षित झाल्यावर मी जॉर्डन मधले पाच दिवस कुठे कुठे भटकायचे ते ठरवू लागलो. जॉर्डन मध्ये रेल्वे सेवा नाही. देशांतर्गत प्रवास हा बसने किंवा वैयक्तिक वाहनानेच चालतो. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यथा-तथाच. त्यामुळे देशांतर्गत प्रवासाचे आगाऊ आरक्षण शक्यच नव्हते. शिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल याचा धड अंदाजही येत नव्हता. त्यामुळे स्थलदर्शनाची फारशी काटेकोर रूपरेषा मी ठरवलीच नाही. पहिल्यांदाच युरोपबाहेरच्या देशात जात होतो. तोही एकटा. थोडीशी धाकधूक मनात होतीच. पण काहीतरी भन्नाट करायला जातो आहे, मज्जा येईल अशा विचारांनी मला स्फुरण चढत होतं. अखेर तो दिवस उजाडला. फ्रँकफर्टवरून ठरलेल्या वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. विमानातली सेवा अपेक्षेपेक्षा फारच चांगली होती. समोरच्या स्क्रीनवर जॉर्डनमधल्या पर्यटनस्थळांचे सतत मार्केटिंग सुरु होते. त्यामुळे माझी उत्कंठा अधिकच ताणली जात होती. अम्मानमध्ये विमान उतरले तेव्हा स्थानिक वेळेनुसार रात्रीचे पावणेबारा वाजले होते. सामान लगेचच मिळाले. व्हिसासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी काही जुजबी प्रश्न विचारले आणि पासपोर्टवर शिक्का मारला. भारतीय पासपोर्टधारक एखाद्या देशात इतक्या सहज प्रवेश मिळवू शकतो याचं मला आश्चर्यच वाटत होतं. बाहेर पडलो तर थंडगार वारं अंगाला झोंबू लागलं. जर्मनीतून निघताना आता काही दिवस हिवाळी जॅकेटपासून सुटका मिळेल अशी स्वप्नं बघत होतो. पण इथे तर अपेक्षेपेक्षा जास्तच थंडी होती. मी गुमानपणे अंगावर जॅकेट चढवलं आणि टॅक्सीवाला कुठे दिसतोय ते शोधू लागलो.

मध्यरात्रीची वेळ असल्याने मी विमानतळापासून हॉटेल पर्यंतची टॅक्सी आधीच आरक्षित करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे एक टॅक्सीचालक माझ्या नावाचा फलक हातात घेऊन उभा होता. साडेसहा फूट उंची, रुंद बांधा, वाढवलेली दाढी असे त्याचे रूप पाहून मला ‘जाणता राजा’ मधल्या अफझलखानची आठवण झाली. मी जरा दबकूनच त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्याचे नाव होते सालेह. आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत त्याने माझे स्वागत केले. थोड्याच वेळात आमची टॅक्सी एका प्रशस्त महामार्गावरून धावू लागली. रस्त्यावर गर्दी तुरळकच होती. मिट्ट काळोखात आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. बहुधा वाळवंट असावे. विमानप्रवासाच्या थकव्याने मी थोड्याच वेळात पेंगू लागलो. इतक्यात सालेहने गाडी बाजूला घेऊन थांबवली व मला म्हणू लागला ‘मी तुला एक जादू दाखवतो.’ आता या एकाकी, निर्जन रस्त्यावर, मध्यरात्रीच्या वेळी हा कसली जादू दाखवतोय? अरब देशांमध्ये निर्जन वाळवंटी प्रदेशात पर्यटकांचे होणारे अपहरण, लुटालूट यांविषयी वाचलेल्या बातम्या माझ्या मनात चुकचुकू लागल्या. पण सालेहने चेहऱ्यावर छान स्मितहास्य ठेवत गाडीच्या खणातून दोन डायरीवजा वह्या काढल्या. त्याने आजतागायत फिरवलेल्या पर्यटकांचे त्याच्या सेवेविषयीचे अभिप्राय त्यात होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांनी आपापल्या भाषेत सालेहविषयी कौतुकोद्गार लिहले होते. त्यात काही भारतीय लोकांचे अभिप्रायही दिसत होते. थोडक्यात, हा पठ्ठ्या नुसता टॅक्सीचालक नसून एक खाजगी सहलसंयोजक होता. सालेह मोठ्या अभिमानाने त्याच्या गेल्या १५ वर्षांच्या करिअरचा वृत्तांत कथन करत होता. मी झोपेला आवर घालून त्याचं ऐकत होतो. शेवटी तो मुद्द्यावर आला. मी पुढच्या पाच दिवसांच्या जॉर्डनसहलीसाठी त्याची गाडी आरक्षित करावी अशी गळ तो घालू लागला. मार्केटिंगची ही पद्धत एकदम भारी होती. पण मी काही विचार करून निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हतो. मला केवळ हॉटेलची खोली आणि तिथला पलंग दिसत होता. मी सालेहचे कार्ड घेतले आणि उद्या फोन करेन असे सांगत मला हॉटेलवर सोडण्याची विनंती केली.

हॉटेलवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. पाच मिनिटं दार वाजवल्यावर आतला माणूस आळोखे-पिळोखे देत दार उघडायला आला. त्याचे इंग्रजी तर अगदीच प्राथमिक होते. चेक-इन चे सोपस्कार पूर्ण करून मी खोलीमध्ये प्रवेशलो. खोली तशी कोंदटच वाटत होती. हलकासा सिगारेटच्या धुराचा वास येत होता. आधीच्या पाहुण्याने यथेच्छ धूम्रपान केले असावे. मी सहज म्हणून खिडकी उघडली तर बाहेरच्या थंडगार हवेचा झोत आतमध्ये आला. खोलीमध्ये हीटरची सुविधाही नव्हती. एकंदरीतच हॉटेलची निवड चुकल्याचे माझ्या ध्यानात आले. पण आता काही इलाज नव्हता. पुढच्या ३ रात्रींचे पैसे आगाऊ भरले होते. आता झोप अनावर होत होती. शेवटी तिथे होत्या तेवढ्या रजया अंगावर घेतल्या नि झोपी गेलो.

पुढील भागासाठी वाचा https://panthastha-awayfarer.blogspot.in/2016/08/in-jordan-desert-part2....

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

23 Aug 2016 - 6:36 pm | रुस्तम

ब्लॉगची जाहिरात का?

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 6:42 pm | संदीप डांगे

काय राव श्या!!

विहंग३००७'s picture

24 Aug 2016 - 3:09 pm | विहंग३००७

आपल्या इतर लिखाणाची लिंक इथे टाकायची नाही असा काही नियम आहे का? असल्यास संपादकांनी कृपया कळवावे. लेख मागे घेतला जाईल.

रुस्तम's picture

24 Aug 2016 - 7:24 pm | रुस्तम

पुढील भाग पण इथेच टाकावा.

"पुढील भागासाठी वाचा"

अशी जाहिरात करू नये.

सोनुसब's picture

4 Jan 2017 - 3:01 am | सोनुसब

Interesting

दाते प्रसाद's picture

4 Jan 2017 - 10:49 am | दाते प्रसाद

तुम्हाला जॉर्डनचा ऑन अरायवल विजा विनासायास मिळाला हे वाचुन बरं वाटलं

मला पहिल्या वेळी ५ तास लागले होते ऑन अरायवल विजा घ्यायला .

नंतर मात्र भारतातुन विजा काढुन जातो

जॉर्डन भटकायला/बघायला छान देश आहे, स्थानिक लोकं मदत करणारी आहेत

विहंग३००७'s picture

8 Jan 2017 - 11:23 pm | विहंग३००७

होय. नशिबाने मला व्हिसा साठी जास्त त्रास झाला नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाईट अनुभव मी ऐकले आहेत.

पैसा's picture

18 Jan 2017 - 12:26 pm | पैसा

पुढचे भागही इथे येऊ द्यात. आणि तुमचा फोटो अपलोड करताना काहीतरी घोळ होतोय. एकदा मदत पाने वाचून घ्या.