दूधसागर - एक अविस्मरणीय अनुभव!

समीरसूर's picture
समीरसूर in भटकंती
21 Aug 2016 - 9:33 pm

जून 2016 च्या एका दुपारची चारच्या आसपासची कंटाळवाणी वेळ. रणरणतं ऊन. डोळे घड्याळावर. कधी एकदाचे संध्याकाळचे सहा वाजतात आणि कधी एकदाची "ऑफीस सुटले, मन मोहरले, चकाट्या पिटाया, मोकळे जाहले" अशी परमानंदाची अवस्था येते असे झालेले. मी आणि माझा उत्साही मित्र नितीन चहा प्यायला गेलो. हे ही एक कर्मकांड! एरवी बाहेरच्या टपरीवर निवांत चहा प्यायला काय मजा येते! पण ऑफीसात चहा पिणेदेखील काम करण्याइतकेच शुद्ध कर्तव्यभावनेतून जन्मलेले एक कर्म असते. आम्ही चहाचे प्याले घेऊन कुठेतरी बूड टेकवतो. आमच्या अजून एका उत्साही मित्राचा, सारंगचा, फोन येतो. त्याचे बोलणे ऐकून आमचे डोळे चमकतात. त्याने कर्नाटक-गोवा सीमेवर असलेल्या आणि 'चेन्नई एक्सप्रेस'मुळे प्रकाशझोतात आलेल्या प्रसिद्ध अशा दूधसागर धबधब्याला सहल काढायची का अशी विचारणा केली. त्याने मिसळपाव.कॉमवर त्याविषयी एक लेख वाचला होता. नितीन आणि मी या कल्पनेने सुखावलो. नेहमीच्या रटाळ आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची ही संधी होती. पण दूधसागरला जाणे तितके सोपे नाही याची त्याने जाणीव करून दिली. मी तो लेख वाचला होता. रेल्वेच्या रुळांमधून बरेच किलोमीटर (कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 22 किलोमीटर) चालणे, पाऊस असल्यास चिंब भिजणे, खाणे आपल्यासोबत घेऊन जाणे वगैरे विचार कमकुवत करायला लावणारी सहलीची ही वैशिष्ट्ये ऐकून आम्ही थोडे विचारात पडलो. सुखासीन शरीराला थोड्या कष्टांचा विचारदेखील थकवा आणतो. सर्वार्थाने शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 ही तारीख सोयीस्कर वाटत होती. वेगळी सुटी घेण्याची गरज पडणार नव्हती आणि भर पावसाळा असल्याने सहलीची मजा द्विगुणित होणार होती. यथावकाश आम्ही आमच्या इतर मित्रांशी थोडी बातचीत केली. आधी उत्साहाने सहलीला येण्याची तयारी दाखवणारे मित्र सहलीची खास 'वैशिष्ट्ये' सांगीतल्यावर विचारात पडले. मग "अरे, मी सांगायचे विसरलो. माझ्या बायकोच्या चुलत बहिणीच्या जावेच्या बहिणीचे लग्न त्याच दिवशी आहे." अशी कारणे येणार असा आमचा अंदाज होता पण तसे काही झाले नाही. ज्यांना काही अपरिहार्य कारणांस्तव शक्य होणार नव्हते त्यांनी तसे स्पष्ट सांगीतले. असे आम्हा तिघांना धरून आम्ही आठ (आम्ही तीन + रितेश, वैभव, विक्रम, निखिल, मयूर) मित्र तयार झालो. जुजबी माहिती घेऊन आम्ही 19 ऑगस्ट 2016 या दिवशीचे गोवा एक्स्प्रेसचे पुण्यावरून आरक्षण करून टाकले.

आपले मिपास्नेही श्री. हृषिकेश पांडकर यांनी त्यांच्या या सहलीच्या अनुभवांवर आधारित एक छान लेख लिहिला होता. तोच लेख आमची प्रेरणा ठरला होता. म्हणून आम्ही त्यांनाच संपर्क केला. त्यांनी आमच्यावर बॉम्ब टाकला. आजकालच्या शिरस्त्याप्रमाणे काही सेल्फीग्रस्त (अतिस्वप्रतिमाप्रेमग्रस्त) पर्यटकांनी सेल्फीसाठी प्राण त्यागण्याच्या घटनांनंतर रेल्वे पोलिसांनी दूधसागरला पर्यटनावर बंदी आणली आहे असे त्यांनी नम्रपणे नमूद केले. आमचे धाबे दणाणले. आठ जणांचे आरक्षण झालेले होते. दूधसागरला नॉर्मल असणारे रुळांच्या मधून चालणे, इंजिनमध्ये चढून प्रवास करणे वगैरे प्रकारदेखील बंद झाल्याचे त्यांनी सांगीतले. या सहलीविषयी प्रकाशित झालेले ब्लॉग्ज आम्ही वाचून काढले. माझ्या ऑफीसात जे कुणी या सहलीला जाऊन आले त्यांना विचारले. सगळीकडून "बंदी आहे; पोलीस जाऊ देत नाहीत; दूधसागरला उतरू देत नाहीत" अशीच माहिती मिळाली. आमचे चेहरे पडले. अब क्या करें? शेवटी आम्ही मनाचा हिय्या करून जायचे ठरवले. एकदा ठरवलेली सहल रद्द करणे आमच्या "उसूल के खिलाफ" होते. जो होगा सो देखा जायेगा असे ठरवून आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. अगदीच काही नाही जमले तर परत येतांना दिवसाच्या उजेडात ट्रेनमधून दूधसागरचे दर्शन झाले तरी चालेल असा विचार करून आम्ही आमच्या मनाला सहलीसाठी तयार केले.

आम्ही सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली. आम्ही 19 ऑगस्टला संध्याकाळच्या गोवा एक्स्प्रेसने पुण्यातून सायंकाळी 4:45 वाजता निघून लगेच 20 ऑगस्टला तिकडून सुटणाऱ्या निजामउददीन एक्स्प्रेसने निघून 21 ऑगस्टला (रविवारी) पहाटे पुण्यात पोहोचणार होतो. त्याप्रमाणे तिकिटे आरक्षित केली होती. दूधसागरला जाण्याचे सगळे पर्याय आम्ही अभ्यासले. पहिला पर्याय म्हणजे दूधसागरला पहाटे ट्रेन थांबली तर तिथे उतरणे. गोवा एक्स्प्रेस दूधसागर स्टेशनला पहाटे साधारण चारच्या आसपास पोहोचते. पण इथे रेल्वे पोलीस उतरू देत नाहीत अशी माहिती मिळाली होती. इथे रेल्वेचा अधिकृत थांबा नाही पण ट्रेन इथे अगदी 30-40 सेकंद थांबते असे कळले होते. काही तांत्रिक कारणांमुळे हा थांबा असतो असे कळले. इथे उतरू शकलो तर धबधब्यापर्यंत पोहोचणे सोपे होणार होते. चालण्याची गरज पडली नसती. परत पुण्याला येतांना मात्र दूधसागरला आमची परतीची ट्रेन थांबणार की नाही हे माहीत नव्हते. दुसरा पर्याय म्हणजे दूधसागरपासून साधारण साडे तीन किलोमीटर पुढे (गोव्याच्या दिशेने) असणाऱ्या सोनोलियम स्टेशनला उतरणे आणि तिथून साडे तीन किलोमीटर रेल्वे रुळांमधून चालत धबधब्यापर्यंत येणे. सोनोलियम स्टेशन धबधब्यानंतर दहा बोगदे मोजल्यानंतर येते ही माहिती मिळाली होती. तिसरा पर्याय म्हणजे सोनोलियम स्टेशनपासून आणखी पुढे (गोव्याच्या दिशेने) आठ किलोमीटर असलेल्या कुळें या स्टेशनवर उतरणे आणि साडे-अकरा किलोमीटर मागे (पुण्याच्या दिशेने) धबधब्यापर्यंत चालत येणे. हे सगळे धबधब्यापर्यंत पोहोचण्याचे पर्याय होते पण धबधब्यापासून पुण्याला येणारी ट्रेन पकडण्यासाठी कुठे आणि कसे जायचे हा प्रश्न होताच. इंजिनमध्ये रेल्वे पोलीस बसू देत नाहीत हे ऐकले होते. पुण्याला परत येण्यासाठी धबधब्यापासून कुळेंपर्यंत पायी जायचे हा पर्याय आम्ही स्वीकारला होता. आमचे परतीचे आरक्षण कुळेंपासूनच होते. अर्थात हा पर्याय सोपा नव्हता. आणि पोलीस कुठे उतरू देतात, कुठपर्यंत जाऊ देतात, जाऊ देतात किंवा नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्हास माहीत नव्हती. आम्ही दूधसागरला न उतरता सोनोलियमला उतरून मागे साडे तीन किलोमीटर चालत यायचे या पर्यायावर लक्ष केंद्रित केले होते.

आम्ही सगळ्यांनी तयारी सुरु केली. मी रोज 6-7 किलोमीटर चालण्याचा सराव सुरु केला. बाकी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सराव सुरु केला. जर 22 किलोमीटर चालावे लागले तर आपल्याला झेपेल का या चिंतेतून हा सराव घडत होता. सगळ्यांना 19 ऑगस्ट कधी येते असे झाले होते. आणि अचानक 12 ऑगस्ट (शुक्रवार) या दिवशी संध्याकाळी माझा घसा दुखायला लागला. डोळे आग-आग करायला लागले. अंग दुखायला लागले. नाकात बरीच उलथापालथ सुरु झाली. ऑफीसात खुर्चीवर बसण्यापेक्षा टेबलावर आडवे व्हावेसे वाटू लागले. मला रीतसर विषाणूसंसर्ग झाला. एक आठवडा हातात होता. मी गोळ्या सुरु केल्या. त्यात 13, 14, 15 ऑगस्ट जरा धावपळीचे गेले. त्यामुळे त्रास जास्त वाढला. 16 ऑगस्टला माझ्या अंगात ताप होता. 17 ऑगस्टला सुटी घेतली आणि दिवसभर झोपलो. 18 ला किंचित बरे वाटले पण दूधसागर यात्रा पार पाडू शकेल की नाही याची खात्री नव्हती. 19 ऑगस्टलादेखील माझे हात-पाय, सांधे दुखतच होते, डोळे आग पाखडत होते, तोंड कडूजार पडले होते. अजिबात उत्साह वाटत नव्हता. सारंगलादेखील याच दरम्यान ताप येऊन गेला. दुपारी दोन वाजता ऑफीसातून निघून घरी पोहोचायचे आणि चार वाजेपर्यंत पुणे स्टेशनवर पोहोचायचे असे ठरले होते. शेवटच्या क्षणापर्यंत मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो. घरी जाऊन सरळ झोपावे आणि मग उठून शाल पांघरून मस्त चहाचे घोट घेत 'खुलता कळी खुलेना' आणि 'काहे दिया परदेस' बघावे असे वाटत होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता उठून मी पेपर वाचत चहाचा आस्वाद घेतोय हे चित्र वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत होते. बावीस हा आकडा माझ्या मनात कारंजे थुई थुई उडावे तसा उसळ्या मारत होता. शिवाय रात्रीची होणारी अत्यंत अपुरी झोप, रुळांमधून अंधारात कित्येक किलोमीटर चालणे, पावसात बरे नसताना चिंब भिजणे वगैरे कल्पना करून माझे पाय लटलट कापत होते. मला पुण्यातच हुडहुडी भरत होती. टू बी ऑर नॉट टू बी! मित्रांना मला बरे नसल्याची माहिती होती. पण प्राचीन मित्रधर्मानुसार त्यांनी मी सहल टाळण्यासाठी मुद्दाम काहीतरी खटपट करून हा विषाणूसंसर्ग ओढवून घेतला आहे असे बेछूट आरोप करायला सुरुवात केली. ज्याला आधीच हा संसर्ग झाला आहे त्याच्या जवळ मी मुद्दाम पाच-सहा तास राहिलो असादेखील आरोप झाला. अशा आजारी व्यक्तीच्या इतक्या जवळच्या सहवासात (ती व्यक्ती जर एखादी सुंदरा नसेल तर) मी कशासाठी माझा वेळ दवडेल या माझ्या बिनतोड प्रश्नावर मात्र माझ्या क्रूर मित्रांकडे उत्तर नव्हते. अब मेरी इज्जत का सवाल था. शिवाय अशी सहल पुन्हा पुन्हा करणे शक्य होणार की नाही ही शंका मला होतीच. मला उत्सुकता होतीच. हा वेगळा अनुभव दवडणे मला रुचत नव्हते. शेवटी दुपारी दोन वाजता मी ऑफीसातून वैभवसोबत निघालोच. नितीनने आधीच घरून काम करण्याचा सेफ पर्याय निवडला होता.

साधारण चार वाजेपर्यंत आम्ही सगळे पुणे स्टेशनला पोहोचलो. आधी नियोजन केल्याप्रमाणे सगळ्यांनी जय्यत तयारी केली होती. कपड्यांचे जादा जोड, रेनकोट, दोन वेळ पुरेल इतके जेवण, कोरडे खाद्यपदार्थ, सुकामेवा, मोजे, औषधी, पाण्यासाठी बाटली, विजेरी, पैसे, मोबाईल, चार्जर, ओळखपत्र, एखादे क्रेडीट किंवा डेबिट कार्ड वगैरे तयारी करून सगळे आले होते. पावणे पाचच्या आसपास आमची ट्रेन निघाली. खूप वर्षांनी मी निराळ्या ट्रॅकवर इतक्या मित्रांसोबत रेल्वेने प्रवासाला निघालो होतो. खूप मस्त वाटत होते. जोरदार गप्पा सुरु होत्या. मग एक चहाचा राउंड झाला. इकडे पी. व्ही. सिंधू रिओमधली तिची फायनल मॅच खेळात होती आणि तिकडे ट्रेनमध्ये आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. रितेश दर पाच - दहा मिनिटांनी घरी फोन करून स्कोअर विचारात होता. आम्ही सगळे या सामान्याकडे डोळे लावून बसलो होतो. साधारण सात - सव्वा सात वाजता आम्ही जेवायला बसलो. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उठून बरेच चालायचे असल्याने ट्रेनमधले खाणे आम्ही टाळले. सगळ्यांनी आपापली शिदोरी सोडली. एक पेपर टाकून त्यावर सगळी शिदोरी सोडली. मेथीचे पराठे, दशम्या, पोळ्या, पुऱ्या, बटाट्याची विविध प्रकारची सुकी भाजी, कांद्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, केचप असे विविध चवीचे पदार्थ समोर मांडलेले होते. ट्रेन वेगाने धावत होती. आम्ही गप्पा मारत, एकमेकांची खेचत जेवत होतो. पहाटे अडीच वाजता उठून तयार व्हायचे असल्याने आम्ही रात्री साडे आठच्या सुमारास झोपलो. अडीच वाजताचा गाजर लावला होता. झोप नीटशी झाली नाही पण तरीही सगळे अडीच वाजता उठले आणि तयार झाले. थोड्या वेळाने कासल रॉक नावाचे स्टेशन आले. हे कर्नाटकमध्ये आहे. इथून घाट सुरु होतो. पोर्तुगीज गोव्यावर कबजा करून बसलेले असताना 1961 पर्यंत (गोवा भारतात विलीन होईपर्यंत) कासल रॉक येथे पोर्तुगालचे आंतरराष्ट्रीय इमिग्रेशन चेकपॉईंट आणि पोर्ट ऑफ एंट्री होते. इथे पोर्तुगालच्या शिक्का मारून लोकांना गोव्यात जाता येत असे. आम्ही स्टेशनवर उतरलो. अतिशय स्वच्छ आणि टुमदार असे हे स्टेशन आहे. आल्हाददायक हवा होती. इथूनच घाट सुरु होतो. इथे रेल्वेचे पोलीस पर्यटकांना उतरण्यास मज्जाव करत होते. आम्ही सोनोलियमला उतरण्याचा निर्णय घेतला खरा पण तेथेही पोलीस असल्यास आमचा बेत फ्लॉप होणार होता. स्टेशनवर चहा वगैरे घेऊन आम्ही पुन्हा निघालो. आता आम्ही बाहेर डोळे लावून बसलो होतो. अंधारातदेखील घनदाट अरण्य जाणवत होते. मध्येच छोटे मोठे धबधबे दिसत होते. आणि थोड्या वेळाने डावीकडे दूधसागर धबधबा आला. अंधारातदेखील त्याची भव्यता जाणवत होती. इथे अगदी 30 सेकंद ट्रेन थांबली. इथून दहा बोगदे मोजल्यानंतर ट्रेन थांबली. हे सोनोलियम स्टेशन होते. सर्वत्र अंधार होता. सोनोलियमला आम्ही पहाटे पावणे पाचला पोहोचलो. येथे प्लॅटफॉर्म्स नाहीत. सगळे पटापट उतरले. उत्साहाच्या भरात मी आरोळी ठोकत स्टाईलमध्ये खाली उडी टाकली आणि खालच्या दगडांवर डोके टेकवून नमस्कार केला. असे न करण्याबद्दल सांगीतले असूनदेखील मी उडी टाकली. सुदैवाने मला लागले नाही पण लागण्याची शक्यता होती कारण अंधार होता आणि खाली लोखंड आणि दगड होते. माझा हात मात्र कशाने तरी भरला. मला वाटलं रेल्वे रुळांवर पहाटे - सकाळी बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचं आगमन होत असतं यापैकीच हा एक पदार्थ असावा. म्हटलं च्यायला उतरल्या उतरल्या हा काय शकून पण नीट पाहिल्यानंतर लक्षात आलं की ते रुळांना टाकतात ते ग्रीस होतं. अजून दोन - तीन ग्रुप्स तिथेच उतरले. बऱ्याच मुलीदेखील होत्या. एकूण जवळपास 20-25 जण होते. आम्ही लगेच धबधब्याच्या दिशेने काळोखात चालायला सुरुवात केली. पाठीवर बॅग्ज, हातात पाण्याच्या बाटल्या आणि विजेरी घेऊन आम्ही चालू लागलो. मिट्ट काळोख होता. रुळांच्या मध्ये खडी होती त्यामुळे चालणे अवघड वाटत होते. थोड्याच वेळात आम्हाला जाणवले की हे चालणे वाटते तेवढे सोपे नाही. रुळांच्या मध्ये लावलेल्या पट्टयांवर पाऊले टाकत आम्ही चालत होतो त्यामुळे लवकरच आमचे तळपाय दुखायला लागले. शिवाय मधून मधून मोठे मोठे खडे पायांना रुतत होतेच. मध्येच ट्रेनच्या भोंग्याचा आवाज आला. म्हणजे कुठलेतरी ट्रेन येत होती. शेवटी ट्रेनचा लाईट दिसल्यावर आम्ही बाजूला झालो आणि धडधडत ट्रेन गेली.

मजल दरमजल करत आम्ही पहाटे सहाच्या आसपास धबधब्याजवळ पोहोचलो. अजून बऱ्यापैकी अंधार होता. हळूहळू उजाडायला लागले आणि एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराने आपल्या कुंचल्याचे हळुवार फटकारे मारून एखादे सुंदर चित्र रंगवावे तसे क्षणाक्षणाला ते विहंगम दृश्य समोर आकार घेऊ लागले. अतिशय उंचावरून कोसळणारा तो दूधसागर धबधबा डोळ्यांचे पारणे फेडत होते. दुधासारखे शुभ्र पाणी अतिशय वेगाने खाली कोसळत होते. दोन - तीन ठिकाणांवरून हे पाणी कोसळत होते. धबधब्याच्या तीन-चार शाखा स्वतंत्रपणे कोसळत होत्या. खाली रेल्वेच्या पुलाजवळ एक मोठे तळे तयार झाले होते आणि तिथून ते पाणी पुलाच्या खालून पुढे अतिविशाल अशा दरीत झेपावत होते. मंडोवी नदीवरचा हा धबधबा पुढे पुन्हा नदीचे रूप घेऊन गोव्याला जात होता. धबधब्याच्या समोर पुलाच्या दुसऱ्या बाजूला हिरवीगार दरी पसरली होती. गर्द हिरवे रान! उंचच उंच झाडे! निबीड अरण्य! आणि धबधब्याचा घनगंभीर आवाज वगळता सर्वत्र नीरव शांतता होती. पाऊस नव्हता पण आभाळ गच्च भरलेलं होतं. धबधब्याच्या माथ्यावर ढगांनी छत्रचामरं धरली होती. धबधब्याचं उगमस्थान नेमकं दिसतच नव्हतं. पुलाच्या कडेने थोडं खाली उतरलो. तिकडून हिरवा पूल, बाजूला कोसळणारा दूधसागर, प्रियकरानं प्रेयसीभोवती घुटमळत राहावं तसे वरून प्रेमाने खाली बघणारे ढग, आणि सर्वत्र गार हिरवाई हे दृष्य मनाला सुखावणारं होतं. आम्ही भान हरपून सगळं मनात साठवत होतो. निसर्गाचे हे चमत्कार निसर्गाचं देवत्व सिद्ध करतात असं वाटून गेलं. रुद्रावतार धारण केल्यानंतर हाच निसर्ग आपलं कवित्व, देवत्व विसरून चिडून जे दिसेल ते चिरडून टाकतो. या विध्वंसातही निसर्गाचा चमत्कारच लपलेला असतो. कधी माणसाच्या चुकांची ती शिक्षा असते तर कधी नवतेसाठी, नव्या अविष्कारांसाठी नवी जागा, नवा अवकाश, नवी आशा निर्माण करण्याचं त्याचं ते अद्भुत तंत्र असतं. संपूर्ण पृथ्वीतलावरची सजीव सृष्टी तोलून धरणारा, तिला शतकानुशतके जिवंत ठेवणारा निसर्ग म्हणजेच देव नव्हे काय? अशा या निसर्गाच्या या नयनरम्य अवताराकडे भान हरपून बघतांना मी भारावलो.

इतक्या उंचावर रेल्वेचे रूळ नेऊन तिथे आगगाडीला झुकझुकायला लावणारा साहेब दुर्लक्षून कसे चालेल? जो घाट पार करायला ट्रेनच्या आगे-मागे चार-पाच इंजिन लागतात अशा दुर्गम घाटात रेल्वेची वाहतूक निर्वेधपणे पार पडेल अशी यंत्रणा उभारणार्‍या ब्रिटीशांचे कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. त्यांनी बांधलेले ते पूल, बोगदे अजूनही शंभर वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत. योजनाबद्ध रीतीने विकास घडवून आणायचा आणि पुढील शंभर वर्षांचे अंदाज - आडाखे बांधून त्यानुसार नेटाने, कष्टाने प्रामाणिक कृती करायची आणि आपण करत असलेल्या कामाचे सतत कठोर मूल्यमापन करत त्यात सुधारणा घडवून आणायच्या हे गुण शिकावे तर ब्रिटीशांकडूनच!

थोड्या वेळानंतर भूक जाणवायला लागली होती. एका बोगद्याच्या वर थोडी मोकळी जागा बघून आम्ही पुन्हा आमची शिदोरी सोडली. गप्पा ठोकत आम्ही तिथे न्याहरी घेतली. साधारण आठ वाजता आम्ही तिथून पुन्हा सोनोलियमकडे चालण्यास सुरुवात केली. आता किती किलोमीटर चालायला लागणार या विचाराने मनात थोडी चलबिचल झाली. मध्ये व्ह्यू पॉईंट म्हणून एक जागा आहे. तिथून धबधब्याचं मनोरम दृष्य दिसतं. ज्या अजस्त्र पर्वताच्या अंगाखांद्यावर नाचत बागडत हा धबधबा खाली कोसळतो त्या पर्वताचं संपूर्ण दर्शन या जागेवरून होतं. आम्ही पुन्हा रेल्वेच्या रुळांच्या मधून चालायला सुरुवात केली. एक-दीड तास चालून आम्ही पुन्हा सोनोलियमला पोहोचलो. तिथे मागून येणाऱ्या एका मालगाडीच्या इंजिन चालकाने आम्हाला हात दाखवून वर चढण्यास सांगीतले. आम्ही सुखावलो. जवळपास एखादा किलोमीटर पळून आम्ही इंजिनावर चढलो. बाकी बरेच जण आमच्यासोबत चढले. पळता पळता एक मुलगी खाली पडली आणि दगडावर तिचा गुढघा आपटला. बिचारी कळवळली. पण पर्याय नव्हता. पुन्हा पुढे आठ किलोमीटर चालत जाण्यापेक्षा हा पर्याय सोपा होता. इंजिन चालक सज्जन गृहस्थ होता. आमची इंजिनमध्ये बसून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ. त्याला तसे सांगताच तो गोड हसला आणि त्याने आम्हाला बसण्यास सांगीतले. सकाळी अकरा वाजता आम्हाला त्या भल्या इंजिन चालकाने कुळें स्टेशनच्या दीड किलोमीटर अलीकडे उतरवले. पैशाची अपेक्षा नसलेल्या त्या भल्या गृहस्थाने आम्हाला हात हलवून बाय केले. आम्ही त्यांना हात हलवून धन्यवाद दिले. मग चालता चालता आम्हाला मंडोवी नदी दिसली. ही नदी म्हणजेच दूधसागर धबधब्याचे खाली वाहत येणारे पाणी! तिथे आम्ही थोडा वेळ पाण्यात पाय सोडून बसलो. बरे वाटले. साधारण साडे अकरा वाजता आम्ही कुळें स्टेशनवर पोहोचलो. इथून आमची परतीची ट्रेन साडे चार वाजता होती. आम्ही कुळें गावात गेलो. हे गाव गोव्यात आहे. गोव्यातले छोटेसे गाव होते ते. मग एक छोटे हॉटेल दिसले. तिथे मस्त जेवलो आणि पान चघळत हळूहळू पुन्हा स्टेशनवर आलो. थोडा वेळ फोटो पाहिले आणि चौथऱ्यावर बॅगा टाकून आराम केला. येथे ट्रेनला घाट पार करून देण्यासाठी लागणार्‍या इंजिनांची तपासणी होते. वेळ होता म्हणून जरा लक्ष देऊन पाहिले. इंजिनाच्या दोन्ही बाजूला मोठ्या टाक्या असतात. एक माणूस त्यात खास अशी वाळू भरत होता. इंजिन ड्रायव्हरकडे चौकशी केली असतात घाटात चढ असल्याने इंजिनाची चाके घसरू शकतात. ते टाळण्यासाठी ही खास वाळू अगदी नाजूक फवार्‍यांमधून रुळांवर शिंपडली जाते. त्यामुळे चाके रुळाला धरून चालतात. वाळूचे कण रगडता तेल गळते की नाही माहित नाही पण रेल्वेचे महाअजस्त्र इंजिन व्यवस्थित पळते ही इंटरेस्टिंग माहिती मिळाली. नंतर एका कर्मचार्‍याने एका संपलेल्या रुळाच्या अलिकडे असलेली रूळ बदलण्याची मेकॅनिकल यंत्रणा चावी फिरवून मोकळी केली आणि एक खटका ओढून रुळ बदलले. मग एक इंजिन त्या बदललेल्या रुळांवरून ट्रॅक बदलून दुसर्‍या ट्रॅकवर गेले. हे एक साधे मेकॅनिकल तंत्र होते पण कित्त्येक वर्षे या तंत्राचा उपयोग करून ट्रेन्स आपला मार्ग निर्धोकपणे बदलतात. दोन रुळांच्या मध्ये अजून दोन रुळांची जोडी असते. जो रूळ मुख्य रुळाला चिकटतो त्या चिकटलेल्या आतील रुळाच्या ट्रॅकवर ट्रेन जाते. हे बघतांना खूप मजा वाटत होती. कुळें स्टेशनवर खूप मोकळी आणि गार हवा होती. इथे वेळ कसा गेला कळलचं नाही. नंतर फक्कड चहा घेऊन आम्ही पावणे पाच वाजता निजामउददीन एक्स्प्रेसने पुण्याच्या दिशेला निघालो. पुन्हा आम्हाला दूधसागरचे दर्शन झाले.

रात्री आठ वाजताच्या सुमारास आम्ही पुन्हा आमची शिदोरी सोडली आणि त्यावर येथेच्छ ताव मारला. आज 21 ऑगस्ट 2016 (रविवार) रोजी पहाटे चार वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो. उण्यापुऱ्या दीड दिवसाची ही सहल एक अविस्मरणीय अनुभव होता. आम्हाला एकूण नऊ किलोमीटर चालावे लागले. आणि आम्ही बऱ्यापैकी थकलो होतो. इंजिन चालकाच्या चांगुलपणामुळे आमचे आठ किलोमीटरचे अतिरिक्त चालणे वाचले. माझा आजार पळून गेला. सगळ्यांच्या सोबत असण्याने खूप मजा आली. सगळ्यांनी सहल व्यवस्थित व्हावी म्हणून मोलाचे योगदान दिले. विशेष आभार मिपाकर श्री. हृषिकेश पांडकर यांचे.

या सहलीच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. शरीराची बारीकसारीक दुखणी ही शरीरातील बिघाडामुळेच येतात असे नाही; यात मनाचे खेळ मोठी भूमिका बजावतात असे वाटते. मी बरे वाटत नाही म्हणून घरी थांबलो असतो तर एका चांगल्या अनुभवाला मुकलो असतो. आणि घरी थांबून माझा आजार शरीरातून पळाला असता कदाचित पण मनातून पळाला असता की नाही हे सांगणे अवघड आहे. शारीरिक कष्ट शरीराला लाभदायक असतात तितकेच ते मनालादेखील लाभदायक असतात हे अधोरेखित झाले. खूप उत्साहात ही सहल पार पडली. सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली. काही निर्णय काळवेळेप्रमाणे घेणेच हिताचे असते आणि त्यासाठी मोठे निर्णय बदलण्याची गरज नसते हेदेखील लक्षात आले. कुठे उतरायचे, काय करायचे वगैरे टेंशन आम्ही घेऊन बसलो असतो तर गोंधळ अधिक वाढला असता. थोडी तडजोड केली तर कमी सामान घेऊनदेखील सहली आनंददायी करता येतात हेदेखील महत्वाचे. अर्थात हे माझे खूप जुने तत्व आहे. भारंभार सामान घेऊन जाणे याच्यासारखा मूर्खपणा नाही.

दूधसागर सहलीसाठी अगदी फार जास्त तयारीची आवश्यकता नाही. तिथे डास, किडे वगैरे अजिबात नव्हते त्यामुळे बिनधास्त आखूड पँट्स घालून जाता येते. आम्ही सुकामेवा, एनर्जी बार, ओडोमॉस, वगैरे घेऊन गेलो होतो. या वस्तूंची तशी काही आवश्यकता नाही. दूधसागर धबधब्यापर्यंत आम्ही जाऊ शकलो. आम्हाला कुणीही अडवले नाही. सोनोलियमला उतरून मागे साडे तीन किलोमीटर चालत येणे किंवा दूधसागरलाच उतरणे हे चांगले पर्याय आहेत. कुळेंला उतरून चालत येत असताना पाय दुखले आणि कुठल्या तरी ट्रेनने जायचे म्हटले तर पोलीस अडकाठी करतात आणि पैसेदेखील मागतात. त्यापेक्षा वरील दोन पर्याय केव्हाही चांगले. दूधसागरला पहाटे खूप लवकर ट्रेन पोहोचत असल्याने (गोवा एक्स्प्रेस) सूर्योदय होईपर्यंत तिथे थांबावे लागते. पण पायी चालत येण्यापेक्षा ते बरे. कदाचित आम्ही उतरलो असतो तर आमचे चालणे अजून थोडे वाचले असते पण चालण्यामुळे थोडी मजादेखील आली.

निसर्गाचा, त्याच्या या अनाकलनीय खेळाचा, माणसाच्या अफाट कल्पनाशक्तीचा आणि त्याने बुद्धिमत्तेच्या बळावर केलेल्या अचाट प्रगतीचा, संपूर्ण सजीवसृष्टीच्या या पसार्‍याचा हा अतिभव्य, अव्याहत चालणारा ऑपेरा पाहिला की आपले एक व्यक्ती म्हणून असलेले खुजेपण जाणवते आणि माणूस अधिक नम्र होतो हे अशा सहलींमधून समोर येते. अशा सहली आपलीच भेट पुन्हा एकदा आपल्याशीच घडवून आणतात. अगदी नव्या अशा आपल्याशी! आपणच चकित होतो की अरेच्चा आपण असाही विचार करू शकतो, असे वेगळे निर्णय घेऊ शकतो, एखादे स्थळ किंवा दृष्य पाहून आपण इतका निराळा विचार करू शकतो. आपल्या आत लपलेल्या आपल्या स्वतःच्या कित्येक आपल्यालाच माहित नसलेल्या पैलूंवर झगझगीत प्रकाश टाकतात अशा सहली! अशा सहली आवश्यक आहेत. कुणी सांगावे, आपल्या आयुष्याची ट्रेन कुठे कसा ट्रॅक बदलेल आणि आपले आयुष्य अधिक समृद्ध करून जाईल! दूधसागर सहलीने असा अस्सल, बावनकशी अनुभव दिला हे नक्की!

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2016 - 10:50 pm | कानडाऊ योगेशु

लेख खुसखुशीत झाला आहे पण फोटो टाकायला हवे होते असे वाटते. कदाचित सेल्फीच्या भीतीमुळे तुम्ही मोबाईल/कॅमेराच नेला नव्हता असे तर नाही ना? तसे असेल तर तो ही एक चांगला निर्णय म्हणता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2016 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख खुसखुशीत झाला आहे पण फोटो टाकायला हवे होते...

-दिलीप बिरुटे

आजानुकर्ण's picture

22 Aug 2016 - 7:56 am | आजानुकर्ण

फोटो न टाकता लिहिल्याने प्रवासवर्णन अधिकच आवडले.

माधुरी विनायक's picture

25 Aug 2016 - 3:20 pm | माधुरी विनायक

अगदी खरं. फोटो नसल्यामुळे वाचतानाच दृश्य समोर उभी राहिली...
सध्या तरी अशा भटकंतीच्या वर्णनावरच समाधान मानावं लागतंय. पण असं भटकायला खरंच आवडेल...

असंका's picture

29 Aug 2016 - 10:00 am | असंका

+१..

चतुरंग's picture

22 Aug 2016 - 8:16 am | चतुरंग

एकदम मस्त झालाय लेख.

शरीराची बारीकसारीक दुखणी ही शरीरातील बिघाडामुळेच येतात असे नाही; यात मनाचे खेळ मोठी भूमिका बजावतात असे वाटते.

अगदी खरं आहे. कित्येकदा थोडं रेटून नेऊन काही गोष्टी केल्या की तो आळस होता किंवा मानसिक आडकाठी होती असे लक्षात येते..

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 11:32 am | महासंग्राम

दूधसागर ट्रेक वर बॅन ऐकिवात आहे. फारेस्ट विभागाने बंदी घातली आहे. ती बंदी उठली काय ???

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 9:48 am | समीरसूर

बंदी नावापुरतीच आहे असे वाटले. भरपूर पर्यटक होते आणि रेल्वे उलट पर्यटकांना सहकार्य करत असल्याचे दिसले.

दुधसागरला गाडी थांबल्यावर उतरू दिले नाही का?

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 9:47 am | समीरसूर

कदाचित उतरू दिले असते पण आम्हाला तिथे 2-4 लोकं शिट्ट्या मारताना दिसले. कदाचित पोलीस असावेत म्हणून आम्ही सोनोलियमला उतरलो. पण धबधब्यापर्यंत जायला काही अडचण आली नाही.

विदाउट फोटो असल्याने वाचायला फुल्ल मज्जा आली.
डोळ्यासमोर चित्र उभे राह्यले अगदी.
मस्त मस्त.

अनुप ढेरे's picture

22 Aug 2016 - 11:50 am | अनुप ढेरे

झकास वर्णन!

प्रसाद_१९८२'s picture

22 Aug 2016 - 3:50 pm | प्रसाद_१९८२

एका सुंदर सफरीचे तितकेच सुदंर वर्णन,

दूधसागर धबधब्या सारखाच प्रवाही आणि सुंदर लेख ...

निओ's picture

22 Aug 2016 - 8:09 pm | निओ

दूधसागरला जाण्यासाठी उपयुक्त माहिती.
गोवा बाजूने जीप मधून धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते असे वाचले होते. पण पुणेकरांना वरचा पर्याय योग्य दिसतो.

पावसाळ्यात हा पर्याय बंद असतो. ऑकटोबरमध्ये सुरु होतो. धबधबा पूर्ण ग्लोरीमध्ये पहायचा असेल तर रुळांवरून समोरून पहावयास हवा. होय, पुणेकरांसाठी हा पर्याय योग्य आहे पण कुळें स्टेशनवरून गाड्या धबधब्याच्या पायथ्याशी नेऊन सोडतात.

गणामास्तर's picture

23 Aug 2016 - 10:19 am | गणामास्तर

पावसाळ्यात सुद्धा गोवा बाजूने जाता येते, जीप बंद असतात पण बाईक वरून सोडतात पायथ्याला.
पावसाळ्यात एकदा त्या बाजूने करून बघावाचं असा ट्रेक आहे तो.

दूधसागरला जाणे मस्ट केलेय मिपाकरांनी वर्णनं लिहून लिहून!

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 9:51 am | समीरसूर

जाऊन या. फार अवघड नाही. मजा येते.

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 9:42 am | समीरसूर

एक दुरुस्ती. कासल रॉक स्टेशननंतर दहा बोगदे मोजल्यानंतर दूधसागर धबधबा येतो. दूधसागर आणि सोनोलियम स्टेशन दरम्यान तीन बोगदे आहेत.

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 9:50 am | समीरसूर

धन्यवाद!

सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद! :-)

साहेब..'s picture

23 Aug 2016 - 10:16 am | साहेब..

दूधसागर धबधब्या सारखाच प्रवाही आणि सुंदर लेख ...

dipak_borole's picture

23 Aug 2016 - 12:36 pm | dipak_borole

मस्त!!!!!!!!! जबद्स्त!!!!!

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 5:58 pm | संदीप डांगे

फोटोची गरजच नाही. तुमच्या ताकदवान, ओघवत्या शब्दातून फिर्वुन आणले तिकडे!!

सुंदर लिहिले आहे. आम्हालाही छान सफर करवून आणलीत :)

वेदांत's picture

24 Aug 2016 - 9:48 am | वेदांत

फोटो हवे होते ...
काही वेळेस शब्दांपेक्षा फोटो बरच काही बोलुन जातात ..

हृषिकेश पांडकर's picture

24 Aug 2016 - 11:13 am | हृषिकेश पांडकर

सुंदर अनुभव ..
फोटोज पण येऊद्या :)

सावि's picture

24 Aug 2016 - 4:56 pm | सावि

सावि's picture

24 Aug 2016 - 4:58 pm | सावि

जमत नाहीये :-)

अजून एक प्रयत्न

पैसा's picture

24 Aug 2016 - 5:35 pm | पैसा

चांगलं लिहिलंय. काही दुरुस्त्या: सोनावळी आणि मांडवी ही गावाची आणि नदीची खरी नावे आहेत. कर्नाटकची धरण पुरे करायची दंडेली चालली तर या धबधब्याचे पाणी आणि बाजूचे जंगल बरेच कमी होईल.

गोवा एक्सप्रेसला दूधसागर हा थांबा नाही. पण लोकांनी साखळी ओढून वात आणण्यामुळे ट्रेन ड्रायव्हर नाइलाजाने अनधिकृतपणे गाडी थांबवर्तात. मी मागे कधीतरी माझा एक वैताग अनुभव लिहिला होता. बेळगावला अशाच विथाऊट तिकिट रिझर्व्हेशनच्या डब्यात चढलेल्या लोकांनी माझ्या तापाने फणफणून झोपलेल्या मुलीला उठून बस म्हणून अरेरावी केली होती. मी अर्थातच त्यांना नीट झापून काढले आणि टीसीला बोलावून त्याना कॅसलरॉक स्टेशन येईपर्यंत डब्याच्या दारात उभे केले.

तुम्ही जंगलातून खाली उतरला असतात तर जळवा चावून घ्यायचा आनंद मिळाला असता.

टुरिस्टांनी रुळाच्या दोन्ही बाजूंना आणि जागा मिळेल तिथे प्लॅस्टिक कचरा केल्यामुळे त्या भागातून जाताना एकूण वैतागवाणे दृश्य दिसते.

धबधब्याच्या पायथ्याशी गणपतीनंतर जायला गावातून गाड्या सुरू होतात. पण तेव्हाही पाण्यात उतरणे अजिबात सुरक्षित नाही.

निसर्गाचा भाग होऊन कुठेही जावे. आणि सेल्फी काढण्यापेक्षा तिथल्या आठवणी सोबत न्याव्यात. आपल्या खुणा कचर्‍याच्या रूपात निसर्गात सोडू नयेत. तर सर्वांनाच आनंद मिळेल.

एस's picture

24 Aug 2016 - 7:05 pm | एस

+१.

पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे आणि बेशिस्तीमुळे वात येतो.

वर बऱ्याचजणांनी म्हटल्याप्रमाणे फोटो नसले तरी काही बिघडले नाही. उत्तम वर्णन केले आहे.

प्रीत-मोहर's picture

24 Aug 2016 - 8:20 pm | प्रीत-मोहर

+१११
साहित्य संपादकांनी कृपया पैताईने सांगितलेले बदल करावे. जेवताना तोंडात खडा आल्यासारखे होतेय ते सिनोलियम वाचताना.अल्युमिनियम सारखं

समीरसूर's picture

25 Aug 2016 - 12:01 pm | समीरसूर

वाचताना आम्हालाही असे वाटले पण मग नंतर वाटले की कासल रॉक असे गावाचे नाव असू शकते तर सोनोलियम का नाही; म्हणून गप्प बसलो. :-)

प्रीत-मोहर's picture

25 Aug 2016 - 12:16 pm | प्रीत-मोहर

कॅसल रॉक आहे हो ते ;)

समीरसूर's picture

25 Aug 2016 - 1:32 pm | समीरसूर

मी जिथे टाईप करतो तिथे लिहिता येत नाहीये हे. 'केसाळ' असं लिहून येतं. :D हे इंग्रजी नाव आहे म्हणून आम्हाला वाटलं सोनोलियम पण असंच काहीतरी इंग्रजी टाईप नाव असेल. :-) सांगली जिल्ह्यात एक करोलीयम नावाचं गाव आहे. तसंही असेल असं वाटलं. :-)

पैसा's picture

25 Aug 2016 - 1:55 pm | पैसा

कोंकणीमधे बहुतेक गावांची नावे शेवट हलका अनुस्वार दिलेली असतात. उदा. कुळें या ळे चा उच्चार सानुनासिक आहे. मात्र पोर्तुगीज स्पेलिंग्स आणि उच्चार फ्रेंचांसारखे चमत्कारिक असल्याने स्पेलिंग Kulem होते. ज्याला ते नाव कुळें आहे हे माहीत नाही तो ते कुले, कुलें, कुलेम्, कुळे, कुळें, कुळेम्, यापैकी काहीही करील. C अक्षराने सुरू होणार्‍या नावाचा उच्चार क किंवा च असू शकेल पण Candipar असे स्पेलिंग असलेले नाव हे खरे खांडेपार आहे हे एखाद्याला बापजन्मी कळणार नाही.

सुबोध खरे's picture

25 Aug 2016 - 3:03 pm | सुबोध खरे

Marcaim म्हणजे मडकई हे आपल्याला स्वप्नात तरी येंईल का?
किंवा Curtorim म्हणजे कुडतरी.

पैसा's picture

26 Aug 2016 - 10:17 am | पैसा

आणि त्यात गोंधळ म्हणजे साधारण सारखी वाटणारी नावे असलेली एकाहून जास्त गावे असतात. मडगाव आणि मुरगाव स्पेलिंग्ज Margao, mormugoa. पाळी आणि पाल्ये स्पेलिंग्ज palem, palyem; मडकई चे Marcaim स्पेलिंग आहे तर माशें नावाचे वेगळे गाव आहे.

समीरसूर's picture

26 Aug 2016 - 10:04 am | समीरसूर

खतरनाक! स्पेलिंग आणि मूळ गावाचे नाव वाचून मी उडालोच. एवढा फरक! अगदी हॅरी पॉटर आणि हरी पुत्तर मध्ये असावा इतका...पण मग नंतर हीच नावे रूढ होतात. पुण्यात हिंजवडीचं हिंजेवाडी असं भारदस्त नाव झालंय. हिंजवडी कसं नाजूक अंगठी सारखं वाटतं आणि हिंजेवाडी एखाद्या बेमाप कंबरपट्ट्यासारखं! :-) मागे हिंजवडी ग्रामस्थ्यांनी यावर एक आंदोलन केले होते. सगळीकडे हिंजवडी असे नाव वापरण्याबाबत आवाहन करणारे बोर्ड्स लावले होते पण आता हिंजेवाडीच इतकं रुळलंय की ती ओळख पुसली जाणं अशक्य आहे. पण आय एग्री ज्यांना मूळ नाव माहीत असतं आणि जे तेच नाव वापरत असतात त्यांना नावांची मोडतोड रुचत नाही. मला स्वतः:ला हिंजेवाडी म्हणणं अजिबात आवडत नाही. आखिर 12 साल का रिशता है हिंजवडी से. तसंच बावधनचं बावधान झालंय. असो.

पैसा's picture

26 Aug 2016 - 10:12 am | पैसा

हिंजवडी कसं नाजूक अंगठी सारखं वाटतं आणि हिंजेवाडी एखाद्या बेमाप कंबरपट्ट्यासारखं! :-)

मस्त!

स्थानिक लोक मात्र कोणी कितीही वर्षे काही लिहिले तरी आपल्या बोलण्यात अजिबात चुकीचे उच्चार येऊ देत नाहीत. गोव्यात पोर्तुगीज आल्याला साडेचारशे वर्षे झाली तरी स्थानिक उच्चार अजिबात बिघडलेले नाहीत. भले बोर्डावर काही ल्हिलेले असो!

सुबोध खरे's picture

26 Aug 2016 - 10:29 am | सुबोध खरे

जाऊ द्या हो
पुण्यातील अर्धे मराठी लोक आमच्या मुंबई ला बॉम्बे म्हणतात.
सर्वत्र मराठीत, शासकीय कागदपत्रात किंवा एस टी वर प्रथमपासूनच मुंबई असूनही.
बाकी गोव्यातील पाववाले बस कंडक्टर आणि टॅक्सी ड्रायव्हर आजही मडगाव ला मारगाव, पणजीला पॅनजिम, कांदोळी ला कॅन्डोलिम आणि कुठ्ठाळी ला कोर्टालिमच म्हणतात.

समीरसूर's picture

26 Aug 2016 - 10:40 am | समीरसूर

सहमत. मराठी माणूसच मुंबईला अजूनही सर्वाधिक बॉम्बे म्हणतो. आणि पुण्यातीलच असे नाही; मला सगळ्या महाराष्ट्रातील भागातले लोक्स मुंबईला बॉम्बे म्हणतांना आढळतात. अगदी मुंबईचे मराठी देखील. मुंबईच्या मराठी लोकांना मराठी नीट येत नाही याचा कोण अभिमान असतो. अर्थात हे लोण आता सगळीकडेच आहे. पुणेदेखील काही फार मागे नाही. माझ्या रोजच्या आयुष्यात ज्या मुंबईच्या मित्रांशी माझा संबंध येतो त्यांचे मराठी अक्षरश: भयंकर आहे. अर्थात त्यांच्या सगळ्याच भाषांची शुद्ध बोंब आहे. सगळ्याच भाषा धेडगुजरी पद्धतीने बोलतात. मुंबईने भाषांचा धेडगुजरीपणा खूप वाढवला असे माझे मत आहे. मुंबईमध्ये कुणालाच चांगले हिंदी येत नाही आणि तरीही सगळे (मराठीने लोक्स धरून) अत्यंत चिंधीछाप हिंदीमध्ये बोलत असतात. पुण्यात हिंदीचा संबंधच नाही पण हिंदीभाषक बरेच आल्याने पुण्यातदेखील अनऐकेबल हिंदीचा असह्य मारा खूप वाढला आहे हे खरे.

पक्षी's picture

26 Aug 2016 - 11:02 am | पक्षी

हल्लि,

पुणे

ला

पुणा

बोलण्याची पद्धत रूढ होत आहे

सुबोध खरे's picture

26 Aug 2016 - 11:52 am | सुबोध खरे

त्यांच्या सगळ्याच भाषांची शुद्ध बोंब आहे. सगळ्याच भाषा धेडगुजरी पद्धतीने बोलतात
हि दुःखद पण सत्य बाब आहे. अंकिता किंवा करिष्मा सारखी नावे असलेल्या पोरी "फोर्थ ऑगस्ट ला स्टमक मध्ये पेन होतं डॉक नि इंजेक्शन दिलं तर ते रिलीव्हच नाय झालं" अशी भाषा बोलतात. मस्तकात तिडीक जाते.

पैसा's picture

26 Aug 2016 - 10:47 am | पैसा

तुम्ही वास्को मुरगाव भागात रहात असणार. तो भाग बराच कॉस्मोपोलिटन आहे आणि गोव्याबाहेरचे बरेच लोक तिकडे रहातात, त्यामुळे हे उच्चार तुम्ही जास्त ऐकले असतील. दुसरे म्हणजे बरेचसे बस कंडक्टर केरळी आहेत. आणि काही प्रमाणात कॅथॉलिक लोक आफ्रिकेतून परत आलेले. खास करून हे लोक आपले मूळ पोर्तुगीज आहे असे दाखवायच्या मागे असतात. इतर ठिकाणी लोक आपसात बोलताना मूळ उच्चार वापरतात आणि बाहेरच्या लोकांना समजले नाही तर बिघडलेले उच्चार असा माझा अनुभव.

सुबोध खरे's picture

26 Aug 2016 - 11:41 am | सुबोध खरे

हे लोक आपले मूळ पोर्तुगीज आहे असे दाखवायच्या मागे असतात.
हे बरोबर. पण रंग मात्र "अव्वल" देशी असतो
आणी "कोकणीतून" बोललो तर पोणजी आणि पणजी च्या मधील उच्चार येतो

कोकणी's picture

25 Aug 2016 - 9:38 am | कोकणी

<<<गोवा एक्सप्रेसला दूधसागर हा थांबा नाही. पण लोकांनी साखळी ओढून वात आणण्यामुळे ट्रेन ड्रायव्हर नाइलाजाने अनधिकृतपणे गाडी थांबवर्तात>>>
कसल रॉक कडून गोव्याकडे जाताना घाटात उतार आहे, अश्या उतारावर ब्रेक तपासणी साठी सगळ्या गाड्या थाम्बवल्या जातात. हा अधिक्रुत थाम्बा नसुन टेक्निकल थाम्बा आहे. लोणावळा ते कर्जत ह्या मार्गावर सुद्धा अश्या प्रकारे सर्व गाड्या थाम्बतात.

चाणक्य's picture

30 Aug 2016 - 8:06 am | चाणक्य

ठाकुरवाडीला बरोबर? तिथेपण ईंजिनाला मागे लटकून जाता येतं कर्जत पर्यंत. गाडी लोणावळ्याला चढवली की ईंजिनं जातात कर्जतला परत, तेव्हा हात दाखवून ईंजिन थांबवता येते चक्क.

समीरसूर's picture

25 Aug 2016 - 11:46 am | समीरसूर

छान प्रतिसाद.

गावाचे आणि नदीचे योग्य नाव सांगीतल्याबद्दल धन्यवाद. तिथे स्टेशनवर 'सोनोलियम' असे लिहिले आहे. बहुधा इंग्रजांनी केलेला अपभ्रंश असावा. जसं पुण्यात खडकीचं किरकी झालं होतं आणि घोरपडीचं घोरपुरी झालं होतं, तसं. नदीचं इंग्रजी मधलं स्पेल्लिंग Mandovi असं आहे म्हणून घोळ झाला.

दूधसागरला 'तांत्रिक थांबा' आहे असं ऐकलं होतं. खरं कारण आता कळलं. :-)

होय, कचरा खूप दिसला. विशेषतः प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या. ही समस्याच सगळीकडेच आहे.

शरभ's picture

25 Aug 2016 - 12:32 pm | शरभ

दुधसागर स्टेशनला गाडी ब्रेक टेस्ट साठी थांबवतात. धबधबा दुधसागर स्टेशनपासुन जवळजवळ १ किमी लांब आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा दुधसागर स्टेशलाच उतरलो होतो. आम्हाला टि सी उठवायलासुद्धा आला होता कारण त्याला तसे सांगुन ठेवले होते! उजाडेपर्येंत वाट पहावी लागणार होती म्हणुन तिथे जवळच चर्च आहे छोटेखानी तिथे जरा वेळ बसलो होतो, पण आधीच शेकडोने मारलेल्या जळवा बघुन फार वेळ नाही बसु शकलो, मग सकाळी ४ वाजताच थेट धबधबा गाठला. कूळेंपर्यंतचा प्रवास मग डिझेल इंजिनावर सवार होउन. बर्याच जणांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यातुन एकदा हा धबधबा आणि हरिश्चंद्रावरील सुर्यास्त (कोकणकड्यावरुन) करावाच.

- श

झेन's picture

24 Aug 2016 - 10:23 pm | झेन

वर्णन लै खास, फोटो सुध्दा झकासच अससतील आणि लेखाला खुलवतीलच. तस्मात फोटो डकवाच.

मराठमोळा's picture

25 Aug 2016 - 4:21 am | मराठमोळा

अनुभव आणि खुसखुशीत लिखाण दोन्ही अतिशय आवडले. :)
परंतु एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कायद्याने बंदी घातली असेल तर तिथे न जाणेच योग्य. धाडस करणे वेगळा भाग आहे परंतु बंदी का घातली आहे याच्या ऐकीव माहितीवर निर्णय घेणे धाडसापेक्षा जोखीमीचे काम आहे. मागे धरणातून सोडलेल्या पाण्यात काही लोक वाहून गेल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिला होता. 'काय नाय होत' म्हणून धाडस केल्याने अपघाताच्या बातम्या आपण रोजच बघतो त्यामुळे असे धाडस करण्याचे शक्यतो टाळावे. असो, बाकी बंदी असताना तिथे जाऊन आलो म्हणून जाहीर रित्या इथे एका गुन्याची कबूली दिलीत हे विसरू नका. ;)

समीरसूर's picture

25 Aug 2016 - 11:52 am | समीरसूर

तिथे जाण्यावर बंदी नाहीये. रेल्वे रुळांमधून जाण्यावर कदाचित असावी. आधी थेट धबधब्यापर्यंत पुलावर जाणे अलाऊड नव्हते. पण आता तसे काही फलक दिसले नाहीत आणि कुणी अडवणारेदेखील नव्हते. म्हणजेच ही बंदी उठवली असावी असे समजायला वाव आहे. ;-)

सुबोध खरे's picture

25 Aug 2016 - 10:00 am | सुबोध खरे

ब्रिटीशांचे कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. त्यांनी बांधलेले ते पूल, बोगदे अजूनही शंभर वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत.
यात एक दुरुस्ती.
ब्रिटिशांनी बांधलेली रेल्वे लाईन हि मीटर गेज ची होती. हिचे ब्रिगांझा घाट आणि त्याच्या अवघड वळणात ब्रॉड गेज मध्ये रूपांतर, त्यासाठी लागणारी रुळांच्या मार्गाचे रुंदीकरण आणि असलेले पूल मोठे आणि जास्त क्षमतेचे करून भारी मालवाहू गाड्यांसाठी जुने बारके पूल काढून टाकून भक्कम पूल बांधणे हे भारतीय रेल्वे इंजिनियरनी १९९५ ते १९९८ मध्ये केलेले भरीव काम आहे.
१९८८ साली पहिल्यांदा मी गोव्याला नौसेना अकादमीत गेलो होतो तेंव्हा गोमंतक एक्स्प्रेस या मीटर गेजच्या गाडीने गेलो होतो.यानंतर अनेक वेळेस गोव्यास रेल्वेने जाण्याचे योग्य आले. तेंव्हाच्या पायाभूत सुविधा आणि आताच्या सुविधा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. भारतीय रेल्वे इंजिनियरना याचे श्रेय नक्कीच मिळाले पाहिजे.
बाकी दूधसागर धबधबा अनेक वेळेस अनेक मौसमात पाहिलेला आहे. प्रत्येक मौसमात त्याचे सौंदर्य वेगळेच असते आणि कितीही वेळा पाहिलात तरी मन भरतच नाही.
आपला लेख वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला

ओह, हे माहीत नव्हते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! पण बोगदे पण 1995 - 1998 मध्ये तयार केलेत का? खूप जुने वाटले म्हणून विचारले. आपल्या इथे अशी कामे करण्याची क्षमता आहे पण अक्षम्य दिरंगाई, पराकोटीचा भ्रष्ट व्यवहार, चालढकल करण्याची वृत्ती, आळस, अप्रामाणिकपणा, मुजोरी या आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त अवगुणांमुळे आपले काही गुण प्रकाशातच येत नाहीत. अर्थात त्या काळी तिथे रेल्वेलाईन टाकण्याची ब्रिटिशांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहेच.

सुबोध खरे's picture

25 Aug 2016 - 12:33 pm | सुबोध खरे

ब्रिटिशांनी पुढे मागे गोवा पोर्तुगीजांकडून जिंकून घेण्याच्या दृष्टीने आणि मुरगाव ( मार्मा गोवा) बंदरातून होणाऱ्या माल वाहतुकीच्या सोयीसाठी तो मार्ग बांधला होता.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

सहलीचे वर्णन सुंदर आहे. सोबत आकर्षक छायाचित्र असती (मोजकीच) तर दूधसागर सहल ही 'दुधात साखर' अशी झाली असती.
सेल्फी काढू नये, कचरा करू नये, वेडी धाडसे करू नये, कायदा मोडू नये ह्याचे प्रत्येकानेच भान राखावे. नाहीतर आपल्या शिक्षणाचा, वाचनाचा, अनुभवांचा, संस्कारांचा उपयोग काय? असो.

समीरसूर's picture

25 Aug 2016 - 12:06 pm | समीरसूर

धन्यवाद!

छायाचित्रे डकवण्यासाठी माझा मित्र सावि याने जान की बाजी लागा दी बट नो उपयोग! :-( शेवटी नाद सोडून दिला (त्याने). :-) मला स्वतःला छायाचित्रांचा, सेल्फीजचा फारसा शौक नाही. त्यामुळे अजूनही सेल्फी केमेरा नसलेल्या फोनवर माझे काम भागते. :-)

लोनली प्लॅनेट's picture

25 Aug 2016 - 3:24 pm | लोनली प्लॅनेट

जबरदस्त वर्णन.... मी अगदी तुमच्यासोबतच होतो असेच वाटले

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 8:54 pm | बोका-ए-आझम

दूधसागर धबधबा काॅलेजमध्ये असताना एका ट्रिपमध्ये (जोडीने) पाहिला होता. त्यानंतर आजपर्यंत due to obvious reasons त्यावर फुली मारली होती. पण आता तुमचं वर्णन वाचल्यावर परत जावंसं वाटतंय.

समीरसूर's picture

26 Aug 2016 - 10:28 am | समीरसूर

अवश्य जाऊन या. चानस मिळाला तर एखादी रात्र मुक्काम करा कुलेंमध्ये आणि पायथ्याशीदेखील जाऊन या. त्या पर्वतराजींमध्ये मनमुक्त पायी फिरण्यात जबरदस्त मजा दडलेली असावी. अगदी वाट फुटेल तिकडे जावे. मी तर म्हणेन कुलेंमधल्या एखाद्या छोट्या हॉटेलात राहून 2-3 दिवस एक भन्नाट अनुभव घेता येईल. अगदी शांत निवांत गाव आहे ते. नो घाई, नो गडबड! ज्या हॉटेलात आम्ही जेवलो (लकी नाव होतं बहुधा) तेदेखील अगदी साधं होतं. "डफलीवाले डफली बजा", "मेघा रे मेघा रे", "या जगण्यावर या जन्मावर", वगैरे गाणी त्या हॉटेलात वाजत होती. आणि हवे असल्यास पाण्याव्यतिरिक्त आणि कोल्ड्रिंक, चहा, कॉफी, सोलकढीव्यतिरिक्त बरेच "बाकीचे" द्रवपदार्थ अगदी स्वस्त दरात मिळतात तिथे.

फिर ना कहना हम ने जन्नत का पता बताया नही
कुछ मुसाफिर बस ताजा हवा ही पिये जाते है
साकी तो फिजा में, वादियों में भी होती है समीर
कुछ राहगीर बस सीधे रस्ते पे ही जिये जाते है

;-)

मुक्त विहारि's picture

26 Aug 2016 - 10:18 am | मुक्त विहारि

एक ४-५ फोटो हवे होते...असे माझे मत.

समीरसूर's picture

29 Aug 2016 - 9:52 am | समीरसूर

मान्य! ट्राय पण केला पण जम्या नै... :-( किचकट आहे खूप. थोडी सोपी पद्धत नाही का आणता येणार मिपावर फोटो टाकण्याची? :-(

या लेखात फोटो असायला हवे होते असे मी म्हणत नाही.. पण किचकट नाहीये हो! तुम्ही बर्‍यापैकी मोठा लेख शुद्ध लिहिला आहे. फोटो टाकायला पण जमेल.

अनिकेत वैद्य's picture

29 Aug 2016 - 9:42 am | अनिकेत वैद्य

दुधसागरला जायला मनाई आहे
परवाच्याच शनिवारी (२७ ऑगस्ट) जावून आलो. सगळीकडे पोलिस उभे आहेत. आम्ही दुधसागर स्टेशनला उतरलो, आम्हाला तिथेच बसवून ठेवले आणि पुढच्या गाडीने खाली पाठवून दिले. अजिबात फिरून देत नाहीत. गाडीतून जेवढे दिसेल ते बघा आणि शान्त रहा असे सान्गितले.
अधिक चौकशीअन्ती, रेल्वे पोलिसान्चा कोणितरी मोठा साहेब त्या दिवशी त्या भागात दौर्यावर होता म्हणून जास्त बन्दोबस्त आहे असे कळले. उद्या आलात तर कदाचित सोडू असेहि म्हणाले.
थोडक्यात दौरा फुकट गेला.

समीरसूर's picture

29 Aug 2016 - 9:50 am | समीरसूर

अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र... :-) एनीवे, पुढच्या वेळेस नक्की होईल. डोन्ट वरी :-)