माकडीचा माळ

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
26 May 2016 - 11:12 pm

आखरी घाणा झाल्यावर झ्याटलींग माकडाने झाऱ्या आपटला. कढईतले तेल चुर्रर झाले. चावी फिरवून त्यानं स्टो बंद केला. दुकानासमोर एक फळी आडवी टाकून त्यावर लंबी ताटली ठेवली. तयार मालाची पाटी उचलून ताटलीत रिकामी केली. भलामोठा ढिगारा झाला !
आतून एक पोतं आणून माकडाने ते भुईवर टाकलं. खाली बसकण मारून त्याने गल्ल्यातले सुट्टे पैसे चापचले. मग उदबत्ती पेटवून ढिगाऱ्यात खोचली. शमनेश्वराचं स्मरण करुन त्याने आजूबाजूला नजर फेकली. आणि " ए चला पाच रुपय किलू, पाच रुपय किलू " म्हणत जोरात वरडायला सुरुवात केली.
'झ्याटलींग भजीपाव केंद्र' तयार माल खपवण्यासाठी सज्ज झालं होतं.

बाजार भरायला सुरुवात झाली होती. व्यापारी टेम्पोनं माल आणून बाजारात ओतत होते. कलिंगड, केळी, आंब्यानं बाजार हिरवागार झाला होता. बघावं तिकडं चहा आणि सरबताची दुकानं लागली होती. लोकं मोठाल्या पिशव्या घेऊन बाजारात फिरत होती.

तोंडात कोंबडी घेऊन बच्छू वाघ 'झ्याटलींग भजीपाव केंद्रा'पुढून मोठ्या ऐटीत शेपूट हालवून निघून गेला. 'हे काय भलतचं' म्हणून माकडानं कपाळावर आठ्या पाडल्या. 'बाजारात मांसाहारी नकोत अशी ग्रामपंचायतीत तक्रार करावी की काय' असा विचार करत त्यानं पावावरच्या माश्या उडवल्या.

तेवढ्यात एक जिगरी दोस्तांचा कळप भजीपाव केंद्रावर धावून आला.
"मी पयला" म्हणत एका माकडाने ढिगाऱ्यातला बारका तुकडा तोंडात सारला. आणि जाग्यावरच दोन उड्या हाणल्या.
मग डोमकावळा पुढे झाला. ढिगाऱ्यात चोच खुपसून "वा! मस्त! अजून येउंद्यात! पुढच्या भज्यांसाठी शुभेच्छा" म्हणून आकाशात उडून गेला!
"गेल्या दहा हजार वर्षात अशी भजीपाव कधी बघितली नाही" उभ्या उभ्या गाढाव मधूनच खिकाळलं.
"सहमत आहे. जिसको ढुंढनेके लिये हमने पुरी कायनात लगा दी, वो आज हमारे सामने ढिगारा भरके पडी है. " पायदळी घोड्यानं बसल्या बसल्या शेर सुनावला.

"दोन छटाक भजी द्या" चंदू कोल्हा हातात चावली घेऊन उभा होता.
चला एवढ्या गर्दीत किमान एकतरी गिऱ्हाईक सापडलं म्हणून झाटू माकडानं तराजू हातात घेतला. पुडक्यात बांधून चंदूला भजी दिली. चावलीच्या रुपानं पहिली बोहोणी गल्ल्यात टाकली. आणि शमनेश्वराच्या नावानं माश्या उडवल्या.

तसा जिगरी दोस्तांचा कळप पुढे गेला. झाटू माकडाने बसल्या बसल्या चार भजी फस्त केले. बराच वेळ निघून गेला. सकाळपासून फक्त दोन छटाक भजी? झाटू विचारात पडला.

समोरुन एक रानरेडा "आगागागा" म्हणून पुढे निघून गेला. झाटूनं त्याच्याकडं जास्त दिलं नाही.

एव्हाना बच्छू वाघ तोंडात दुसरी कोंबडी घेऊन "झ्याटलींग केंद्रा'पुढून दिमाखात चालत गेला. माकडाने दात विचकलं. त्यानं भजी उचलून पुन्हा घाण्यात तळून काढली. दोन घोट पाणी पिऊन पुन्हा त्यानं "पाच रुपय किलू" सुरु केलं.

"आजून दी रं पावशेर" यावेळी चंदू कोल्हा हातात ठोचळा घेऊन उभा होता.
"ये लै भारी" डोमकावळा आकाशातून वरडला.

"झ्याट्या, साल्या काय भजी तळतोस तू, आजपासून फिदा आपुन तुज्यावर " पायदळी घोडा चंदूच्या मागोमाग हळूवार ढांगा टाकत येत होता.
आख्खी जिगरी ग्यांग पुन्हा ठेल्यावर आली होती. कुणी छटाक, कुणी किलू, कुणी नुसताच एक भजा मागत होतं. झ्याटूनं भराभर वजनं केली. पुड्या बांधल्या. दोऱ्यात गुंडाळल्या. खुळखूळ पैसं गल्ल्यात टाकलं.शेमनेश्वराच्या नावान माश्या उडवल्या. आर्धा ढिगारा खतम झाला.

जिगरी ग्यांग पुढं गेली. जाताना झाटूला भरभरून स्मायल्या फेकून मारल्या. कुणी '+१' तर कुणी दंडवतपण ठोकला.
झाटू जाम खूश झाला. पुढच्या आर्धा तासात त्याच्या दुकानात नावालासुध्दा भजा उरला नाही. लोकं मिरच्यासुद्धा घेऊन गेली.

*****************************

बच्छू वाघाने कोंबडीवडे तळायला घेतले. फ्रिजमधील देशी संत्रा काढून जिगरी ग्यांगला सर्व्ह केले.
"चंदू जारे बाबा, चकण्याला झाटू भजी घेऊन ये " पायदळी घोड्यानं सुचना केली.

~~~~~

बच्छूनं दुसरी कोंबडी कापली.

"वडं म्हंजे वडं हाईत, लै झ्याक" गाढाव.
" पुरनार न्हाईत, जारे चंद्या, आजून उल्स आन" पायदळी घोडा.

~~~~~

तिसरी कोंबडी!

"गेल्या दहा हजार.... वडे..." गाढाव.
"ते भजे घाल चुलीत, हुंदे खर्च, आण वडेच" पायदळी घोडा.

*****************************

ठळक बातम्या :
झ्याटलिंग भजी केंद्राचे चौदा ठेले सुरु

बच्छू वाघ झाले आडगावातील पोल्ट्री फार्मचे मालक.

मौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 May 2016 - 11:20 pm | प्रचेतस

भन्नाट.
कं लिवलंय कं लिवलंय.

एका माकडाने काढले दुकान आठवले! भारीच आहे! क्रिप्टीक असेल तर कुणीतरी उलगडवा जरा.

च्यायला मिपा आठवडी बाजारच जणू.
.
.
पट्टी फाड ए गरामपंचायतची आदूगर.

रमेश भिडे's picture

27 May 2016 - 12:12 am | रमेश भिडे

दुनिया अशीच आस्तीय जव्हेरभाऊ.
बारसं आसो का बारावं, झालं ते झालं म्हनायला आनि आडवा हात करायला कमी नाय करायचे

बाकी ल्हिता भारी! गेल्या धा हजार वर्सात असलं लिखान कोन केलेलं नाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2016 - 12:51 am | डॉ सुहास म्हात्रे

हितं भजीची नाय जव्हेरभाव, जिलब्यांची दुकानं लावतेत लोकं ;) =))

खटपट्या's picture

27 May 2016 - 12:59 am | खटपट्या

भजीपाव कीलूवर मिळतो ?

बाबा योगिराज's picture

27 May 2016 - 1:40 am | बाबा योगिराज

मस्त भट्टी जमलीय.

मला पावशेर भजे आण पाव. जरा मिरच्या ज्यादा टाक रे भाव.

बाबा योगीराज

चाणक्य's picture

27 May 2016 - 6:15 am | चाणक्य

झाटूला कळतंय सगळं ते ठीक आहे.
(अवांतर:- भारी लिवलंय)

नाखु's picture

27 May 2016 - 8:39 am | नाखु

आणि जिलब्या न्हाईत (कुठं फेडाल हे (जिलबीवाल्यांची) पाप)

तरी (उठवलेला) बाजार आवडला.

आठवडी बाजार वारकरी नाखु

स्वामी संकेतानंद's picture

27 May 2016 - 8:48 am | स्वामी संकेतानंद
मी-सौरभ's picture

27 May 2016 - 5:37 pm | मी-सौरभ

आवडेश

बोका-ए-आझम's picture

23 Nov 2016 - 7:43 pm | बोका-ए-आझम

हे पण भारी आहे!

डोमकावळा पुढे झाला. ढिगाऱ्यात चोच खुपसून "वा! मस्त! अजून येउंद्यात! पुढच्या भज्यांसाठी शुभेच्छा" म्हणून आकाशात उडून गेला!

हे तर फारच भारी!

jp_pankaj's picture

24 Nov 2016 - 7:25 am | jp_pankaj

=))=))=))

जल्ला मला काय बी कल्ला नाय :(