दोन मराठी माणसे चंद्रावर राहायला गेली तर तिथे तीन मराठी मंडळे स्थापन करतील. दोघांचं मिळून एक अन दोघांच स्वतःचंही प्रत्येकी एक. अमेरिकेतील एका कार्यक्रमात भारतातून आलेल्या एका मराठमोळ्या कलावंताने सांगितलेला हा एक विनोद. यात गमतीचा भाग सोडला तरी एवढे निश्चितच म्हणता येईल की मराठी माणसे जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी मराठी मंडळात सामील होतात अन सामील होण्यास मंडळ उपलब्ध नसल्यास त्याची स्थापना करतात. अमेरिका व कॅनडा मिळून किमान पन्नास मराठी किंवा महाराष्ट्र मंडळे जोमाने आपलं कार्य करत आहेत.
पाच सहा दशकांपूर्वी जेव्हा मराठी माणसे उत्तर अमेरिकेत येऊन नोकरी व्यवसायात स्थिरावू लागली तेव्हा आसपासच्या मराठी मंडळींना एकत्र करून गणेशोत्सव, दिवाळी, साहित्याचा आस्वाद घेणारे लहान प्रमाणावरील कार्यक्रम आयोजित करु लागली. सहभागी मंडळींची संख्या फार नसल्याने कुणाच्या घरी वगैरे हे कार्यक्रम केले जात. जेवणाच्या बाबतीतही पदार्थ वाटून घेतले जाऊन विविध घरगुती चवींचा आस्वाद घेतला जात असे.
या कारणाने लहान प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या मित्रमंडळांचे रूपांतर अधिकृत मराठी किंवा महाराष्ट्र मंडळांमध्ये होऊ लागले. बहुतेक ठिकाणी मंडळांची कार्यकारी समिती दोन वर्षांनी बदलते. काही ठिकाणी तर या समितीच्या निवडीसाठी निवडणुकाही होतात.
बहुतेक मंडळांच्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये संक्रांत, गणेशोत्सव, दिवाळी या सणांशी संबंधीत उत्सवी कार्यक्रमांचा समावेश असतो. त्याखेरीज पिकनिक, सांगीतिक कार्यक्रम, भारतातून येणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम, स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेली नाटके अथवा एकांकिका तसेच लहान मुलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा, आनंद मेळावा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. तसेच भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात इतर भाषिक मंडळाबरोबर सहभाग असतो. कार्यकारी समितीच्या जोडीने स्वयंसेवक सदस्य या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी उचलतात.
मिनेसोटा मराठी मंडळातला गणेशोत्सव
मिनेसोटा मराठी मंडळातल्या बालकलाकारांनी सादर केलेल्या रामायणावरील नाटिकेतला एक प्रसंग
भारतातून येणाऱ्या कलाकारांची विमानतळावरच्या आगमनापासून परतीच्या प्रवासापर्यंत घरगुती पद्धतीने उत्तम बडदास्त ठेवली जाते. भारतात राहून मोठमोठ्या कलाकारांचा सहवास लाभणे ही अनेकांसाठी अतिशय दुर्मिळ गोष्ट असते परंतु या बाबतीत मंडळांचे स्वयंसेवक नशिबवान ठरतात. भारतातून आलेले कलाकारही परदेशात राहून जपलेल्या मराठीपणाने सांस्कृतिक ओलाव्याने भारावून जातात. अशा कलाकारांचे कार्यक्रम रंगतदार तर होतातच तसेच कार्यक्रमाखेरीज इतर वेळी रंगणाऱ्या गप्पांच्या मैफिलीदेखील आयुष्यभर स्मरणात राहतील अशा असतात.
मराठी मंडळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातून अथवा इतर ठिकाणांहून त्या शहरात नव्याने येणाऱ्या मराठी कुटुंबांना येण्यापूर्वी व आल्यावर मार्गदर्शन व प्रसंगी गरज पडल्यास मदतही केली जाते. आणखी एक स्पृहणीय उपक्रम म्हणजे बऱ्याच मराठी मंडळांशी संलग्न मराठी शाळा. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांना मराठी भाषा बोलता तर येते पण मराठी भाषेत लिहिणे वाचणे शिकण्यासाठी दर रविवारी भरणाऱ्या मराठी शाळा एक मोठा आधार असतो.
मराठी मंडळांची भूमिका केवळ सांस्कृतिक किंवा मौजमजेचे कार्यक्रम एवढीच मर्यादित नसून सामाजिक जाणिवांची किनारही तिला असतेच. स्थानिक स्वयंसेवी संस्थांना आर्थिक व श्रमदानाने साहाय्य तसेच भारतातल्या समाजसेवी संस्थांना आर्थिक साहाय्य नियमितरीत्या केले जाते. भारतातल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जमेल त्या मार्गाने मदत पाठवण्याचे प्रयत्न केले जातात.
मराठी मंडळांपुढची आव्हाने
- सर्वात मोठे आव्हान म्हणजे आर्थिक आव्हान. इतर कुठल्याही गोष्टींचे सोंग आणता येते परंतु पैशांचे सोंग आणता येत नसते. मराठी माणूस इतर सर्व वेळी उत्साहाने पुढे येत असला तरी वर्गणी देण्याच्या बाबतीत जुजबी रकमेच्या पलीकडे जाण्यास तयार नसतो. बहुतेक मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये किमान शंभर ते काही शे लोक सहभागी होतात पण त्यावेळी होणारी कामे करण्यासाठी भाड्याचे कामगार घेतले जात नाही. पैसे वाचवण्यासाठी स्वयंसेवकांना मजुरांसारखे राबावे लागते. कमीत कमी पैशात मोठमोठे कार्यक्रम करण्याची एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली गेली की दर्जावर परिणाम होतो.
- नव्या पिढीचा सहभाग. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी माणसांची मुले पौंगंडावस्थेत येईपर्यंत मराठी मंडळांच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत असली तरी अभ्यासाच्या जबाबदाऱ्या वाढल्यावर मंडळांपासून दुरावतात. नंतर अनेक वर्षांनी स्थिरस्थावर झाली तरी मंडळांच्या कार्यक्रमात सहभागी होताना अभावानेच दिसतात. भारतातून नव्याने नोकरी व्यवसायानिमित्त येणाऱ्या लोकांमुळे सदस्यसंख्या वाढत राहिली तरी इथे जन्मलेली पिढी मात्र मोठी झाल्यावर सहभागी होत नाही ही बाब लपून राहत नाही.
- मायदेशावरचे सांस्कृतिक परावलंबित्व - मराठी मंडळे कितीही जुनी झाली तरी उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांचे कार्यक्रम इतर शहरात अगदी अपवादानेच होतात. झाले तरी भारतातून येणार्या नावाजलेल्या कलाकारांच्या तुलनेत किरकोळ लोक श्रोते अथवा प्रेक्षक म्हणून हजेरी लावतात. या परिस्थितीत आगामी काळात फारशी सुधारणा होईल असे वाटत नाही.
ही आव्हाने किंवा इतर व्यवस्थापकीय आव्हानांना तोंड देत महाराष्ट्र मंडळांची चळवळ जोमाने पुढे नेत राहण्यात हजारो कार्यकर्त्यांचे कठोर परिश्रम व त्याग आहेत. या कार्यकर्त्यांच्या जोरावरच भविष्यातही या लोकचळवळीची वाटचाल अधिक ताकदीने होत राहील असा विश्वास या चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटतो.
प्रतिक्रिया
4 May 2016 - 9:05 am | अजया
महाराष्ट्र मंडळ हा नव्याने परदेशात गेलेल्या माणसाला खराच आधार वाटतो हे अनुभवलंय!
लेख आवडला.
4 May 2016 - 11:41 am | मुक्त विहारि
सहमत
4 May 2016 - 6:58 pm | आदूबाळ
मला आलेला अनुभव भलताच होता.
उत्साहाने महाराष्ट्र मंडळाला फोन केला. एका आजोबांनी उचलला आणि हॅलोचा ब्रिट हेल लावला. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी डायरेक "व्हिसा कोणता" असा खडा सवाल टाकला. (आता हा व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न आहे - च्यायला आम्ही डिप्लोमॅटिक पासपोर्टवर येऊ नाहीतर बेकायदेशीर इमिग्रंट असू - तुम्हाला काय आहे?) तरी संयम राखून आमच्या व्हिश्याचं स्वरूप सांगितल्यावर "आम्ही फक्त आयेलारवाल्या (पर्मनंट रेसिडंट) आणि नागरिकत्व असलेल्या लोकांनाच सभासद करून घेतो..." असं म्हणून चक्क फोन आपटला. स्पष्टीकरण नाही, कार्यक्रमाला या नाही, साधं सौजन्यसुद्धा नाही.
("...हल्ली कोणीपण यायला लागलंय...आमच्या वेळचं ..." वगैरे पुढची वाक्यं कल्पून आम्ही हसून घेतलं, पण त्यांना परत फोन केला नाही.)
त्याउलट मिपाचा वासंतिक कट्टा दरवर्षी तमसातटी होतो. "मंडळ" वगैरे कृत्रिम भानगडीपेक्षा हे भारी आहे.
4 May 2016 - 7:32 pm | राघवेंद्र
+१
5 May 2016 - 9:13 am | नाखु
मला आपला भाबडा गैरसमज की :
धन्यवाद ही बाजूही दाखविल्याबद्दल.
देशी गांवढळ नाखु
4 May 2016 - 9:16 am | एस
उत्तम आढावा घेतला आहे. यात ठिकठिकाणच्या प्रमुख मराठी मंडळांची थोडक्यात माहिती किंवा संपर्कपत्ते (त्यांच्या परवानगीने) दिल्यास या धाग्याचा उत्तम उपयोग होईल असे वाटते.
4 May 2016 - 11:59 am | पिलीयन रायडर
+१
न्यु जर्सी - न्यु यॉर्क मधल्या मराठी मंडळाचा संपर्क मिळाला तर बरे होइल.
लेख सुंदरच झाला आहे. गणपतीचा फोटो सुरेख आलाय. मागे मंदिर आहे का? अगदी पिक्चरच्या सेट सारखं सुंदर दिसतय!
4 May 2016 - 7:36 pm | राघवेंद्र
न्यु जर्सी मधील मराठी मंडळ http://www.marathivishwa.org/
Facebook पण बरेच Active असतात
4 May 2016 - 7:44 pm | संदीप चित्रे
---------------------------------
मराठी विश्व, न्यू जर्सी -- www.marathivishwa.org
---------------------------------
महराष्ट्र मंडळ, न्यू यॉर्क -- http://www.mmny.org/
तुम्ही न्यू जर्सी / न्यू यॉर्क भागात आहात का?
5 May 2016 - 12:15 am | रमेश आठवले
लॉस एंजेलिस चे महाराष्ट्र मन्डळ
4 May 2016 - 9:36 am | प्रीत-मोहर
लेख आवडला!!!
4 May 2016 - 9:38 am | सनईचौघडा
हायला रंगा लई भारी. तुमच्या मराठी मंडाळाला शुबेच्छा. पहिल्या छा.चि. त ते मागे मंदिर आहे काय?
6 May 2016 - 10:59 pm | श्रीरंग_जोशी
पहिल्या चित्रात पाठीमागे आमच्या शहरातले मंदिर आहे. रेडीफवरच्या या लेखात या मंदिराच्या निर्मितीची कहाणी आहे.
4 May 2016 - 11:28 am | सस्नेह
परदेशात मराठी संस्कृती जपण्याच्या उपक्रमाचे कौतुक आहे.
शेवटच्या पॅरामधली बोच जाणवली.
याबद्दल खूपच खेद वाटतो.
4 May 2016 - 11:54 am | नाखु
शेवटचा परिच्छेद व्रुत्ती आरसा दाखवतो. मिपावरही मदत धागे काढणारे पुढे नक्की मदत झाली का समस्या निवारण झाले का याबाबत अगदी अळिमिळी दाखवितात एखादाच जेप्या आठवणीने सहा महिन्यांनी का होईना सद्यस्थीती आणि आभार मानतो.
या बाबत दाक्षीणात्य लोकांच्या संस्था परदेशातच काय भारतातही इतर राज्यात चांगल्या फोफावतात आणि चहुअंगाने वाढतात.
खुद्द पुण्या-मुंबैत-दिल्लीत(ही) दाक्षीणात्यांच्या शि़क्षण-सामाजीक-धार्मीक संघटना-संस्था व्यवस्थीत चालविल्या जात आहेत.
मिपा वरकरी नाखु
5 May 2016 - 12:30 am | सखी
चांगला आढावा घेतला आहे.
व्यवसायानिमित्त येणाऱ्या लोकांमुळे सदस्यसंख्या वाढत राहिली तरी इथे जन्मलेली पिढी मात्र मोठी झाल्यावर सहभागी होत नाही ही बाब लपून राहत नाही.
याबद्दल खूपच खेद वाटतो.
स्नेहाताई याला बर्याच गोष्टी कारणीभूत आहेत. सगळेच कार्यक्रम मुलांना आकर्षित करू शकत नाहीत - यात फक्त मंडळांनाच दोष देऊन चालनार नाही.घरचं वातावरणावरही बरचसं अवलंबुन आहे. शाळेेत असेपर्यंत बराच सहभाग असतो मुलांचा पण नंतर कॉलेज/नोकरी मागे लागले की पोरपणं बिजी होत असावीत त्यांच्या आवडीनिवडी बदलत असाव्यात.
4 May 2016 - 11:37 am | बाबा योगिराज
छान ओळख करून दिलीत. देशाबाहेरसुद्धा तुम्ही लोक आपली ओळख जपून ठेवताय, क्या बात.
आपले कार्यक्रम पुढेही असेच चालत राहावे या साठी शुभेच्छा.
नवनविन उपक्रमाची सचित्र माहिती येऊ द्या.
पुलेशु.
पुभाप्र.
4 May 2016 - 11:53 am | स्पा
परदेशात सुद्धा मराठी बाणा जपलाय त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे
उत्तम लेख
4 May 2016 - 12:04 pm | मित्रहो
परदेशातील मराठी मंडळाच्या कार्याविषयी छान माहीती दिली.
समस्या नवीन वाटल्या. परदेशातील मराठी मंडळांना सुद्धा आर्थिक चणचण भासते हे वाचून आश्चर्य वाटले. नावाजलेल्या कलाकारांच्याच कार्यक्रमालाच गर्दी असते मग ते भारतात असो की परदेशात.
4 May 2016 - 1:41 pm | पद्मावति
खूप सुंदर लेख.
4 May 2016 - 1:44 pm | मधुरा देशपांडे
लेख आवडला.
4 May 2016 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख ! लेखातला मनोगताचा भागही भावला !
न्यु जर्सी - न्यु यॉर्क मधल्या मराठी मंडळाचा संपर्क मिळाला तर बरे होइल.
+१. थोडे पुढे जाऊन असे म्हणेन की उत्तर अमेरिकेतल्या सर्वच मराठी मंडळांचे पत्ते इथे दिल्यास ते उपयोगी ठरतील.
4 May 2016 - 6:25 pm | श्रीरंग_जोशी
काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळाच्या संस्थळावर टाकण्यासाठी संपूर्ण जगातल्या मराठी मंडळांच्या दुव्यांचे संकलन केले होते. ते खालील शेअर्ड स्प्रेडशीटमध्ये उपलब्ध आहेत. यापैकी काही दुवे आता काम करत नसण्याची शक्यता आहे.
5 May 2016 - 12:08 am | सखी
हि यादी कदाचित अद्ययावत असु शकते.
5 May 2016 - 8:52 am | श्रीरंग_जोशी
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दुव्यासाठी धन्यवाद.
ही यादी बर्यापैकी अद्ययावत असली (नेमका आमच्याच मंडळाचा बदललेला पत्ता न दाखवता जुनाच दाखवत आहे ;-) ) तरी ती यादी केवळ बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्न असणार्या मंडळांपर्यंतच मर्यादित आहे. काही लहान आकाराची मंडळे बृममंशी संलग्न नसतात.
मला वेळ मिळाला की मी माझी यादी तपासून अद्ययावत करीनच.
5 May 2016 - 2:09 am | स्रुजा
छान लेख, पंत.
तुमच्या सगळ्या मुद्द्यांशी सहमत. मराठी मंडळांचं स्वरुप आज बरंच सुधारलं आहे. आता खुप लोकं आहेत, दळणवळणाची, संवादाची साधनं वाढली आहेत. इथल्या काही "फाऊंडर मेंबर्स" बरोबर बोलताना लक्षात येतं की आजपासून ६०-७० वर्षांपूवी जेंव्हा हे लोकं इकडे आले तेंव्हा घरच्यांशी फोन वर बोलणं सोडाच पण इथे जवळपास कुणी भारतीय दिसणं त्यात ही मराठी दिसणं ही फार च मोठी लक्झरी होती. पुण्या-मुंबईतुन आलेल्या माणसाला आज ही मिनेसोटा, आटोवा, एडमाँटन, हॅलिफॅक्स ही शहरं छोटी (!) वाटतील . मी ६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आले तेंव्हा वाटलं "कुठे गेले सग्ळे जण ? " . पण तरी देखील या शहरांमधुन आता आंब्यापासून ते पार्ले जी पर्यंत आणि च्यवनप्राश पासून ते मेथीच्या भाजी पर्यंत सगळं आपल्या सोयीचं , सवयीचं मिळतं. " फर्स्ट इंडियन्स" (खरेखुरे, रेड नाही ;)) इथे आले तेंव्हा त्यांना कणिक मिळायची पण मारामार होती. ऑल पर्पज फ्लावर च्या पोळ्या, कैरी नाही तर हिरव्या सफरचंदाची लोणची अशी अनेक गंमतशीर वळणं घेत आता ही लोकं भारतीय ग्रोसरी स्टोअरचं आजचं स्वरुप बघतात. माझ्या मावससाबांचं लग्न झाल्या झाल्या त्या न्न्युझीलंडला गेल्या, त्यांच्याहीकडे असे अनेक किस्शे आहेत. उत्तर अमेरिकेत त्या मानाने भारतीय बरेच पण न्युझीलंड, युरोप वगैरे मध्ये तर फारच वानवा. भारतीयच नाही तर भारतीय सामान कुठुन मिळायला? त्याकाळी व्हेज/ नॉनव्हेज चा पगडा पण खुप होता. अगदी कुणी नॉनव्हेज खात असले तरी सगळ्यांनाच बीफ आणि पोर्क खायला जमतं असं नाही ! या लोकांनी खर्या अर्थाने परदेशात राहुन होमसिकनेस अनुभवला.
आपल्याला "बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स" मिळतं आहे सध्या. म्हणलं तर आपण प्रगत देशात , तिथले फायदे घेतोय. म्हणलं तर आपल्याला अगदी पुरणपोळीसकट जेवण मिळणं/करणं शक्य आहे. टोराँटो, न्यु जर्सी, व्हॅनकुव्हर , बे एरिया मध्ये तर विचारायलाच नको. इडली डोसा, पान, कुल्फी, उसाचा रस, इंडॉ चायनीज, चाट अगदी झाडुन सगळं मिळतं, भारतीय झाडु देखील मिळतो :)
मराठी मंडळं ही तेंव्हा गरज होती, आज ही आहे. मात्र लोकांच्या गरजा आता बदलल्या आहेत. रेडिट / मिपासारखे फोरम्स आहेत , फोन्स आहेत, प्रत्येकाच्या ओळखीत कुणी ना कुणी परदेशात असतंच. स्वतः पण अनेकदा छोट्या छोट्या ट्रिप्स करुन आलेले असतात, फेबु आहे, सिनेमा - सिरियल्स मुळे कल्चरल अवेअरनेस वाढलाय. त्यामुळे हल्ली लोकांना परदेशात येऊन भांबावल्यासारखं होत नाही. सपोर्ट सिस्टीम ही अनेकदा असते मात्र कुटुंब आजही अनेकांचं मुळदेशी आहे. त्यामुळे मराठी मंडळांमध्ये मुख्यतः नेटवर्किंग होतं असा माझा अनुभव आहे. मित्रमंडळ वाढतं, इकडे येणारे मराठी लोकं किंवा भारतीय ८०% वेळा तांत्रिक, सरकारी , डो, ईंजिनियर्स अशा महत्त्वाच्या कार्यक्षेत्रात असतात. त्यांच्या ओळखीने पुढच्या गोष्टी सोप्या होतात. घर घेताना, मुलं झाल्यावर याची गरज जास्त वाटते. नेमकं हेच कारण आहे की पुढची पिढी मराठी मंडळाला फार गांभीर्याने घेत नाही. दुसर्या -तिसर्या पिढीतल्या भारतीयांना नॉस्टेल्जिया पण नसतो आणि त्यांची भक्कम सपोर्ट सिस्टीम तयार असतेच. शिवाय भाषेचा अडसर ! कितीही नाही म्हणलं तरी मराठीची वीण हलकी पडलेली असते, अॅक्सेंटेड ईंग्लिश हीच सोपी वाटते. मराठी मंडळांचे कार्यक्रम मराठी मध्ये अस्तात, बर्याचदा जेवण सोडलं तर फार सं आकर्षक काही नसतं त्यामुळे पुढची पिढी येत नाही. पुढची पिढी कशाला, नव्याने इकडे आलेले विद्यार्थी ही येत नाहीत. लग्न झालं की येतात !
क्रमश : :)
5 May 2016 - 2:37 am | राघवेंद्र
सुंदर प्रतिसाद!!! बरेच मुद्दे मान्य आहेत. हा धागा आल्यापासून विचार करत आहे की मराठी मंडळ चे सदस्य का घ्यावे ?
5 May 2016 - 11:34 am | टवाळ कार्टा
क्रमशः वाचून ब्रे वाट्ले...लेखाचे मटेरिअल आहे हे
6 May 2016 - 3:08 pm | पिलीयन रायडर
सुंदर प्रतिसाद!!!
लेख लिहीणार म्हणत होतीस तोच तर नव्हे हा?! तुझे हे अनुभव वेगळा लेख म्हणुन वाचायला आवडतील.
5 May 2016 - 5:28 am | रेवती
लेख आवडला.
स्रुजाच्या प्रतिसादाशी सहमत.
मराठी मंडळाचा अनुभव नाही कारण मलाच फारशी आवड नाही. दोनेक गाण्याचे कार्यक्रम वगैरे पाहिलेत तेवढेच!
बाकी स्वयंसेवा मात्र अधूनमधून होत असते.
मराठी मंडळांपेक्षा भारतीय मंडळाचा अनुभव जास्त आहे. सार्वभाषिक लोकांमध्ये जास्त उठबस असल्याने आता तेच बरे वाटते. गेल्यावर्षीपासून पाच नव्या महाराष्ट्रीय फ्यामिलीजची ओळख झालीये पण सर्व मिळून फारतर दहा एक मराठी कुटुंबे माहित आहेत. आमच्या आजूबाजूला अनेक दक्षिणी मंडळे आहेत. त्यांचे कार्यक्रम चालू असतात व आम्ही सामील होण्यास सोयिचे असेल तर होतो.
5 May 2016 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख मस्तं.
5 May 2016 - 8:59 am | ऋषिकेश
माझा महाराश्ट्र मंडळांचा अनुभव फारच विपरीत आहे, त्यामळे या धागयवर सांगणे औचित्याला धरून होणार नाही.
==
तुमच्या कार्याला शुभेच्छा!
5 May 2016 - 9:10 am | बोका-ए-आझम
आणि योग्य माणसाने लिहिलेला आहे. भारतातील महाराष्ट्र मंडळांचे अनुभव चांगले आहेत. परदेशातील अनुभव नाहीत पण तुमच्या मराठी मंडळात यायची इच्छा आहे. बघू या कसं जमतंय ते!
5 May 2016 - 9:53 am | श्रीरंग_जोशी
प्रतिसादांमध्ये अनेकांनी त्यांना मराठी मंडळांकडून आलेल्या नकारात्मक अनुभवांचा उल्लेख केला आहे. बरेचदा प्रत्यक्षातही लोकांकडूनही ऐकले आहेच. माझ्या सुदैवाने गेल्या सात वर्षांत अमेरिकेतल्या तीन वेगवेगळ्या कोपर्यांतल्या मंडळांचा मला आलेला अनुभव अतिशय उत्तम आहे.
मी इथे नवा असताना माझ्याकडे गाडी नसल्याने शिरीष कणेकरांच्या कार्यक्रमासाठी टॅक्सीने गेलो होतो. माझ्या घरापासून ठिकाण बरेच लांब होते. कार्यक्रम संपल्यावर मंडळाच्या समितीतल्या एकाने माझी चौकशी केली व त्याला जेव्हा कळले की परत टॅक्सीने जाणार आहे त्याने स्वतःहून मला जवळच्या मेट्रो स्टेशनवर नेऊन सोडले जे प्रत्यक्षात गाडीने २५ मिनिटांच्या अंतरावर होते.
शेवटी माणसं जिथे काम करणार तिथे काही तरी कमी अधिक होणारच. अनेकदा मदत मागणारे हे विसरतात की मंडळाचे स्वयंसेवक त्यांचा नोकरी / व्यवसाय अन संसार सांभाळून या कामासाठी राबत असतात. दर वेळी प्रत्यक्ष मदत करणे इच्छा असूनही शक्य होत नाही.
केवळ एखादा नकारात्मक अनुभव अनेकांना मंडळांपासून लांब ठेवतो हे पाहिले आहे. माझा एक स्थानिक मित्र जो माझ्याअगोदर सात आठ वर्षांपूर्वी या शहरात स्थायिक झाला त्याचा एक अनुभव. तो शहरात अन अमेरिकेतही नवा असताना मंडळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमाला उत्साहाने गेला. कार्यक्रम संपल्यावर जेवणाच्या रांगेत तो उशिरा पोचला अन नेमका त्याच दिवशी आयोजकांचा संख्येचा अंदाज चुकल्याने जेवण कमी पडले. मराठी मंडळात धड जेवणही मिळत नाही म्हणून हा मनुष्य पुढची अनेक वर्षे मंडळाच्या एकाही कार्यक्रमाला गेला नाही. मी इथे मंडळात सक्रिय झाल्यावर त्याला कार्यक्रमाला बोलावले अन नव्या अनुभवानंतर तोही सदस्य बनला व तसेच काही वेळा स्वयंसेवक म्हणून त्याने मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये जबाबदारी पण उचलली.
काम करणार्या माणसांकडून चुका नक्कीच होऊ शकतात पण केवळ त्या चुकाच चळवळीची ओळख बनू नये म्हणून हा प्रतिसाद.
5 May 2016 - 11:22 am | पैसा
सुंदर लेख आणी प्रतिक्रिया!
5 May 2016 - 12:20 pm | चंद्रनील मुल्हेरकर
असे ऐकले आहे की आजकाल अमेरीकेतले भारतीयही जातपात पाळतात ,हे खरे आहे काय? मराठी लोकांत आधी अभिजन परदेशात गेले(पक्षी अमेरीका) मागच्या वीस वर्षात बहुजनांची पीढीही अमेरीकेत पोचली व झाला जातीयवाद सुरु .SC/ST association of UK/USA अश्या संघटनाही आहेत म्हणे ,मराठी मंडळात जातीयवादाचा कुणाला अनुभव आहे का ,असल्यास ,त्यावर काय उपाय केलेत.
5 May 2016 - 1:08 pm | नीलमोहर
परदेशातील मराठी मंडळांची थोडक्यात चांगली ओळख करून दिलीत. मंदिरासकटचा फोटोही सुरेख आलाय.
तुम्ही स्वतः या महाराष्ट्र मंडळांच्या चळवळीत सहभागी होता यासाठी अभिनंदन आणि ही चळवळ पुढे आणखी वृध्दिंगत होवो यासाठी अनेक शुभेच्छा.