सडमाडं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
24 Mar 2016 - 6:16 pm

कळी, भात, वांग्याची आमटी, आन चपाती पत्रावळीवर आल्यावर बब्यानं जेवायला सुरु केलं. आण्या मात्र कोशिंबीरीची वाट बघत खाऊ का गिळू अवस्थेत ताटकळला होता. रामाला हाकावर हाका मारुन कोशिंबीर त्यानं त्याच्या पंगतीत फिरवायची व्यवस्था केली. चार पळ्या कोशिंबीर त्याच्या पत्रावळीत पडली तवा त्याच्या जिवात जीव आला. तरी अजून पापड्या यायच्या बाकी होत्या. मग गर्दीत हरवलेल्या पापडीवाल्याच्या शोधात त्यांच्यावर बारीक नजर ठेवतच आण्यानं जेवन झोडायला सुरुवात केली.

वाढपी दुरडी घेऊन फिरत होते. दुरडीत भात का कळी हे खाली बसून कळत नव्हतं. बब्या वाढप्याला बोलवायचा आणी त्याचा दुरडीत जे आसल ते घ्यायचा. शेवटाशेवटाला त्याच्या पत्रावळीत नुसतीच कळी पडत राहिली. पण हिकडं आण्यानं पत्रावळीत भाताचा डोंगरच ऊभा केला. कुणीतरी त्याच्यापाशी वांग्याच्या आमटीची बादलीच आणून ठिवली. मग मात्र आण्यानं नुसती तर्री तर्री काढून भाताच्या डोंगरावर ओतली. मांडी घालून नडगीला रग लागल्यानं एक पाय बाजूला घेत मग तो जेवणावर तुटूनच पडला. शेवटाशेवटाला तर त्याला पँटचा हुकपण ढिला करावा लागला.
पहिली उठून दुसरी पंगत बसली तरी कोपऱ्यात बब्या न आण्या हाणतच होते.शेवटी टोपीवाल्या जेष्ठांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्यावर जरा लाजूनच उठले.

पाणी प्यायला 'ही' गर्दी. टिपाडं पाण्यानं भरलेली, पण गिलांसावर कब्जा झालेला. मग शेवटी हौदातच हात धुवून त्यांनी गलासाला रांग लावली. कसाबसा एक गलास मिळवून टिपाडातून भरुन घेतला. ऊन्हाचं तापलेलं पाणी ते, त्यात तर्रीनं घशाचा केलेला जळफळाट. पाणी काय नरड्याखाली उतरना. चार घोट पाणी पिऊन दोघंबी शेवटी मंडपाबाहेर आली. रुपारुपायाच्या मोठ्या जम्बो पेप्श्या घेऊन झाडाखाली चोखत बसली. पोटात भडकलेली आग तवा कुठं निवायला लागली.

मंडपात आहेरांची पुकारणी चालू होती. नवरानवरी पायापडणीचे पैशे गोळा करत समद्या मांडवभर फिरत होते. कानपिळकी अजून बाकी होती. पंगती उठून आजून बसतच होत्या. सुर्य डोक्यावर आग ओकत होता. त्यात आचाऱ्याच्या भट्टीचा धूर मंडपात शिरत होता. उकडलेल्या अंड्यासारखी माणसं शिजत होती. वारा नावाची गोष्ट तिथं वाहतच नव्हती.

"वराड काय लवकर निघत न्हाय लगा " मंडपातली एकंदरीत दशा बघून आण्या पुटपुटला.
"हू..." बब्यानं पेप्शी चोखत हुंकार भरला.
"चल जरा फिरुन युव माळावरनं, हितं मव्हळं लय मिळत्याती, काढू येकांद "
मव्हळाचं नाव काढताच बब्यांच डोळं चमकलं. मग दोघंबी निघाले माळावर. वाटत बब्यानं माणिकचंदची पुडी फोडली. ती दोघांनी अर्धी अर्धी वाटून घेतली. पिचकाऱ्या मारत मग दोघं कुसळं तुडवत निघाले. बोरीची बाभळीची वाळलेली झाडं त्यांना वाटत भेटत गेली. ऊन्हाच्या झळयांनी त्यांचे डोळे दिपून गेले. दूर कुठेतरी हिरवळ दिसली. तिकडं जाताना वाटत एक डबकं लागलं. मग कापडं काढून बब्यानं पहिला सूर मारला. पाठोपाठ आण्याही पाण्यात उतरला. डोळे लाल होईपर्यंत दोघे पोहत राहिले. मग कापडं घालून पुन्हा पुढे चालू लागले.

भटकत भटकत त्यांना एके ठिकाणी रेल्वेचा रुळ दिसला.
"यील कारं रील्वी ?" रुळ डोळ्याखालनं घालत बब्यानं शंका काढली.
" काय म्हायीत !" ताटकळून गेलेला आण्या एका झाडाखाली बसत म्हणाला.
मग बब्यानं तंबाखूची पुडी फोडली. मळली. खाल्ली. आण्या झाडाखाली झोपून घोरायला लागला. बब्या काड्या करत रेल्वेची वाट बघत राहिला. पण रेल्वे आली नाही. आण्याची झोप पुरी झाली तरी रेल्वे आली नाही. शेवटी कटाळून दोघे निघाले तवा अचानक भकभकभकभक करत रेल्वे आली. रेल्वे कसली मोठ्ठी मालगाडी होती ती. डोळ्यांचे पारणे फिटोस्तोर त्यांनी तिला बघितली. तो धूर, तो नाद, ती लय, ते डब्बे बघून दोघेही भारावून गेले. एवढ्या लांबच्या लग्नाला आल्याचं सार्थक झालं. किमान एकतरी अचाट, अतर्क्य किस्सा त्यांच्याजवळ होता. जो सगळ्यांना रसरशीत वर्णन करुन सांगायचा होता.

सुर्य कलल्यावर दोघंही घाईघाईने मंडपाकडे निघाले. फुफाट्यात, धोंड्यात, रुईच्या काट्यात, वाट काढत चालतच राहिले. परत आले तेव्हा मंडपात सगळीकडं सामसूम होती. रुकवताचं सामान टेंपोत भरलं जात होतं. रडारडीचा कार्यक्रम कधीच होऊन गेलेला. नवरानवरी ट्रॅक्समध्ये बसून देवाला निघून गेलेली.
वऱ्हाडाचा ट्रॅक्टरही निघायच्या तयारीत होता. पुढची म्हाताऱ्यांची टायली टाळून दोघांनी मागच्या पोराठोरांच्या टायलीत उड्या घेतल्या.
तरी एक म्हातारं करवादलंच " कुटं हुतारं इतक्या उशीर ?"
" हितंच हुतू की आण्णा, जरा पडलू हुतू झाडाखाली " बब्यानं वेळ मारुन नेली.

ट्रॅक्टर निघाला. मागच्या टायल्या धडाडा. आता हायवेला लागोस्तोर कंबरटंच मोडणार. फळक्यावर टेकून बब्या ऊभाच होता. कसनुसं तोंड करुन सोबतीला आण्यापण.
छकूबायनं कसलीशी पिशवी उघडली. आन आण्याला दुपारी खायच्या राहिलेल्या पापड्यांची आठवण झाली. बायाबायांत पिशवी फिरत राहिली. चवदार पापड्यांचा फडशा उडाला. पिशवी रिकामी झाली. मग टायलीबाहेर गेली. डोळे पेंगुळले. ट्रॅक्टर हायवेला लागला. काळोखात रस्त्यावर धावू लागला.

फळक्यावर बसून कटाळल्यावर समदी पोरं एक एक करत खाली बसली. दाटीवाटीनं जागा करुन पेंगायला लागली.
आज बब्याच्या डोळ्यापुढून रेल्वे काय हटायला तयार नव्हती आन आण्याच्या डोळ्यापुढून पापड्या.

तेवढ्यात कुणीतरी बारकी पोरगी फिस्कारली, " कानपिळकीला काय मज्जा आली ना !"
"आगं ती कानंच सोडत नव्हतं, " दुसरीपण कोणी खिदाळली.
" फुटू, फुटू काढायचा हुता गं त्यला" कुण्या थोराड बाईनंपण माहिती पुरवली.
" आगं न्हाय, त्या रामाभावनंच सांगितलं हुतं त्यला, जोरात कान पिळायचा म्हणून." पुन्हा पहिली बारकी फिस्कारली.
बायकापोरांच्या गप्पा रंगल्या. हासण्याखिदळण्यानं टायली दणाणली. बब्या न आण्या कान टवकारुन ऐकू लागले. मांडवातली भलतीच मजा आपण गमावून बसल्याची रुखरुख त्यांच्या डोळ्यात आज कुणालापण दिसली असती.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मीता's picture

24 Mar 2016 - 6:41 pm | मीता

भारी लिहिलीये कथा ..

हेमंत लाटकर's picture

24 Mar 2016 - 7:23 pm | हेमंत लाटकर

कळी म्हणजे?

जव्हेरगंज's picture

24 Mar 2016 - 7:29 pm | जव्हेरगंज

बुंदी

चांदणे संदीप's picture

24 Mar 2016 - 9:47 pm | चांदणे संदीप

गावाकडचं लगीन.... जोरातच कारेक्रम झाला की!!

Sandy

मितभाषी's picture

24 Mar 2016 - 10:02 pm | मितभाषी

कथेला निवडुंग नाव का दिलय.

कविता१९७८'s picture

24 Mar 2016 - 10:14 pm | कविता१९७८

कथा आवडली

आनंद कांबीकर's picture

24 Mar 2016 - 11:31 pm | आनंद कांबीकर

लय भारी!
आवडलं.

रातराणी's picture

25 Mar 2016 - 12:14 am | रातराणी

ग्रामीण बाज आवडला. पण कथेचा शेवट अजून खुलवता आला असता अस वाटल :)

उगा काहितरीच's picture

25 Mar 2016 - 12:28 am | उगा काहितरीच

कळी म्हणजे काय ते समजलं नव्हतं . बुंदीला छर्रा पण म्हणतात ना ग्रामीण भागात ? बाकी वर्णन आवडले ...कथा म्हणावे असे काही नव्हते , पण जे होते तेही आवडले.

चाणक्य's picture

25 Mar 2016 - 10:00 am | चाणक्य

म्हणजे ?

राजाभाउ's picture

25 Mar 2016 - 10:42 am | राजाभाउ

मस्तच !!!

विवेकपटाईत's picture

25 Mar 2016 - 10:50 am | विवेकपटाईत

वाचताना मजा आली.

अजया's picture

25 Mar 2016 - 11:46 am | अजया

लैच मज्जा!

नुक्ती न्हाय का म्हणत कळ्याला?
पेप्श्या...टायल्या....मज्जा मज्जा

जव्हेरगंज's picture

26 Mar 2016 - 1:19 am | जव्हेरगंज

@उका, अभ्या,

नुक्ती आणि छर्रा हे पहिल्यांदाच ऐकलं. आमच्याकडे 'कळी'च म्हणतात. बुंदी हा शब्द पण फारसा वापरात नाही.
बाकी, अभ्या, इंदापूरकडेपण जास्तकरून 'कळी'च वापरतात. सोलापूरात सगळीकडे कळीच आहे. हे नुक्ती कुठून आलं कळलं नाही.

तुषार काळभोर's picture

26 Mar 2016 - 7:53 am | तुषार काळभोर

आमच्याकडे (हवेली तालुका व पुरंदर तालुका) दोन्ही शब्द वापरतात.

सोलापूरात कळी हा शब्द वापरतात. पण माझी (मी ज्या भाषेत लिहितो ती) भाषा सोलापुरी नाही. सोलापूरी अशी सेपरेट लिहिता येत नाही. ती ऐकायची बोली आहे. शब्द पण बरेचसे वेगळे असतात. ती मी कधीच वापरीत नाही.
माझी भाषा मूळ बार्शीची. हा मराठवाड्याच्या सीमेवरचा तालुका. बार्शी, पंढरपूर, माढा, कुर्डूवाडी, अकलूज, परांडा, भूम, तुळजापूर, उस्मानाबाद आणि थोडा सातारा जिल्हा ह्या भागाची वेगळी बोलीभाषा आहे. बोलणार्‍याचा हा टोन कुठेही ओळखू येतो. ह्या भागात बुंदीला नुक्ती म्हणले जाते.

आनंद कांबीकर's picture

26 Mar 2016 - 7:24 pm | आनंद कांबीकर

नुक्ती हा मराठवाड़ी शब्द

हाव, नुक्ता ठिपका या अर्थी असावा.
बाकी स्टोरीत एकच खटकले. मणिकचंद सध्या 120 ला ते पन बल्याकने मिळते. बब्या आण्या दुसरी पुडी खाणाऱ्यातले वाटतेत.

जव्हेरगंज's picture

26 Mar 2016 - 8:16 pm | जव्हेरगंज

अडीचला बारकी न पाचला मोठी पुडी होता त्या काळातली गोष्ट हाय मालक ही ;)

जाताजाता, आजकाल माणिकचंद जाऊन आर.एम.डी चा जमाना चालू आहे :)

बोका-ए-आझम's picture

26 Mar 2016 - 12:01 am | बोका-ए-आझम

दूधवाली - हिरव्या रंगाची पिस्ता फ्लेवर. कथा भारीच. सडमाडं म्हणजे काय भौ? शब्द ओळखीचा वाटतोय पण काय सुधरून नाही राहिला!

जव्हेरगंज's picture

26 Mar 2016 - 1:12 am | जव्हेरगंज

@चाणक्य & बोकाभाऊ,

सडमाडं = बाजरीची वाळलेली वैरण.

(हा मला माहीत असलेला अर्थ आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा )

तुषार काळभोर's picture

26 Mar 2016 - 7:59 am | तुषार काळभोर

सडमाड = सरमाड = बाजरीची ताटं
पाचट = उसाची पाने
सपार = सरमाड वापरून केलेला आडोसा/खोली

जव्हेरगंज's picture

26 Mar 2016 - 7:13 pm | जव्हेरगंज

पाचट = उसाची पाने

याला 'वाडं' असंही म्हणतात. :)

भीडस्त's picture

27 Mar 2016 - 1:57 pm | भीडस्त

कडबा,पेंढा,तुराठ्या कुढं ठुल्या म्हंगाय्च्या. त्याय्बि आनशान क्का नाय समद्यान्ना दावायला.
झालंच तं यखान्दी वळ्हई रचा सरमाडाची नाह्यतं पेंढ्याची. म्हयी कळंन समद्यान्ना.
:) ;)

तुषार काळभोर's picture

26 Mar 2016 - 8:12 am | तुषार काळभोर

आता दहा वर्षापूर्वीपर्यंत आमच्याकडे लग्नं अशी व्हायची:
मराठी शाळेत (म्हणजे झेडपीची. संस्थेची शाळा (मराठी माध्यमाची असेल तरी) इंग्लिश स्कूल) नाहीतर मोठं आवार असलं तर देवळात मांडव असायचा. दुपारचं लग्न. शेवटची मंगलाष्टकं झाली की हातातल्या राहिलेल्या सगळ्या अक्षता भिरकावून पब्लिक जागेवर मांडी घालून बसायचं. (अ‍ॅडजश्ट होऊन आपोआप रांगा तयार व्हायच्या). मग पत्रावळ्या यायच्या. मग आधी भाजीवाला. वांगं-बटाटा-हरभरा मिक्स शाकभाजी. सुक्कीपन नाही आणि पातळ रस्सा पण नाही अशी लकथपी. मग भात अन् त्याच्या मागोमाग आमटीवाला. मग कळी(बुंदी). एखादा जहागिरदार असला तर यात पुरी, भजी नायतर पापड याची भर पडायची. वाढायला बहुतेक घरातलीच मुले. बारकी पोरं मीठ घेऊन फिरणार. थोडी मोठी, चौदाच्या पुढची, भात अन् आमटी वाढणार. भाजी आणि कळी मात्र मोठी माणसेच वाढणार. दोघं तिघं सगळ्या पंगतीवर नजर ठेवून असायची. अन् अधून मधून आवाज द्यायची.. 'ए, भात फिरव तिकडं!'

जेवणार्‍या पोरांच्या नजरा बुंदीवाला कधी येतोय त्याकडं असायच्या, पण भात-आमटी-भाजीवाले तीन-तीनदा यायचे, आणि बुंदीवाला मात्र एकदा वाढून गेला की परत दिसायचाच नाही.

सत्याचे प्रयोग's picture

26 Mar 2016 - 2:25 pm | सत्याचे प्रयोग

आणि पत्रावळी वाल्याला मस्का मारुन दोन पत्रावळ्या घ्यायच्या. एकीला छिद्र असेल तर जेवणात माती येऊ नये म्हणून.

जव्हेरगंज's picture

26 Mar 2016 - 7:19 pm | जव्हेरगंज

हे आम्हीपण करायचो. पण एकदा मांडवात जेवत बसलो असताना कुठुणतरी एक गोम आली आणी सरळ भातातच घुसली. आरारा.
तवापस्न आपुन एखादी आतली खोली शोधून फरशीवर पत्रावळी ठेवून जेवण झोडायला सुरवात केली. ;)

तर्राट जोकर's picture

26 Mar 2016 - 7:41 pm | तर्राट जोकर

ब्येक्कार लिवलं. जव्हेरगंज ह्यांच्या कथा असं पुस्तक आला पायजेल. लय झालं शंकर्पाटलांचं कौतुक. ;-)

मार्मिक गोडसे's picture

27 Mar 2016 - 9:16 pm | मार्मिक गोडसे

मस्तच!
ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकात शाहू पाटोळेंच्या ' ... ग्रामीण खाद्यसंस्कृती' ह्या लेखात बुंदीचा 'नुक्ती' असा उल्लेख केला आहे.
'सडमाडं' हा शब्द प्रथमच ऐकला. धन्यवाद.

पैसा's picture

27 Mar 2016 - 10:49 pm | पैसा

मस्त!