राईट टू (बी) लेफ्ट !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 6:12 pm

"तू लेफ्टी आहेस?"
मी डाव्या हाताने लिहितोय हे दिसत असूनही त्याने मला विचारलं. पण ह्या प्रश्नाची मला सवय आहे.
" हो", मी उत्तरलो.
"लहानपणापासून ?"
मी दचकलो. आता हे काय नवीन ? एखाद्याला व्यक्तीला ," का हो तुम्ही चालायला लागल्यापासून दोन पायांवरच चालता का ?" असं विचारलं तर कसं वाटेल ? तरीही सयंम राखून मी उत्तर दिलं.
"हो अर्थातच"
"जरा वेगळं नाही वाटत का असं?”
" नाही... मी जर उजव्या हाताने लिहिलं तर ते जगावेगळं वाटेल !", माझा संयम आता सुटत होता.
मी मुद्दाम 'जगावेगळं' अश्यासाठी म्हटलं, कारण लहानपणी मी डावखुरा आहे हे लक्षात आल्यावर आई जेंव्हा जेंव्हा मला उजव्या हाताने लिहायला सांगायची तेंव्हा मी उर्दू लिहिल्यासारखं उजवीकडून डावीकडे लिहायचो. मायमराठीचे असे धिंडवडे उडताना पाहून ती माऊली वरमली. आणि मी डावखुराच राहिलो!
" त्या मानाने अक्षर खराबचं आहे तुझं ?", तो म्हणाला.
"त्या मानाने म्हणजे?"
"डाव्या हाताने लिहिणाऱ्यांच अक्षर छान असते असं म्हणतात...पण तुझं तर........"

वरील संभाषण प्रातिनिधिक असलं तरी डावखुऱ्यांना असे अनुभव दैनंदिन जीवनात नेहमीच येतात.चार लोकांपेक्षा काहीतरी वेगळं दिसलं की ते एकतर अद्भुत तरी असते किंवा तुच्छ तरी असते.अरे कोणी सांगीतलय यांना डावखुरे चांगल्या अक्षरात लिहितात म्हणून ? मी मान्य करतो की माझे अक्षर वाचण्याजोगे नाहीत. लोकं आकडेमोड करतात तसं मी अक्षर 'मोड' करतो. पण त्याचा लिहिण्याच्या हाताशी काय संबध? डाव्या हाताला लिहिण्याची सूचना देताना आपला मेंदू काय 'जरा चांगल्या अक्षरात लिही' अशी वेगळी तळटीप देतो का? डावखुरे लोकं चित्र फार छान काढतात हा आणखी एक गैरसमज ! मला वर्तुळाचे दोन टोकसुद्धा नीट जुळवता येत नाहीत. परीक्षेत मी घाईघाईत लिहिलेला शुन्य हा आकडा फुटक्या अंड्यासारखा जास्त दिसत असल्यामुळे आमचे सर वर्तुळाची दोन्ही टोकं व्यवस्थित जुळवून मला शुन्य मार्क द्यायचे. चित्रकलेत पन्नास पैकी अठरा मार्क हा माझा सर्वोत्तम पर्फोर्मंस होता. डावखुरे लोकं त्यांच्या क्षेत्रात फार हुशार असतात हा तिसरा गैरसमज. मी म्हणतो, लिहित असेल सचिन तेंडूलकर डाव्या हातानी पण त्याच्या शंभर शतकाएवढ्या अपेक्षा आमच्याकडून कश्यासाठी? शाळेत एकदा आम्ही क्रिकेट खेळत असताना मी बॅटिंगला करायला आलो. सवयीप्रमाणे मी उजव्या हातात बॅट धरली. एका इच्चक मित्राने शंका काढली की हा जोश्या डाव्या हातानं लिहिते तं बॅटिंग उजव्या हातानं काऊन? झालं !! मी डाव्या हातानीच बॅटिंग करायची असा आग्रह सुरु झाला. मुळात मी उजव्या किंवा डाव्या कोणत्याही हातानी बॅटिंग केली तरी फार काही फरक पडणार नव्हता.(अरे वर्गातल्या टीम मध्ये सातव्या नंबरवर बॅटिंगला येणारा काढून काढून किती रन्स काढणार ! पण हे सत्य जर मी उघड केलं असतं तर मला आयुष्यात बॅटिंग मिळाली नसती !) आईनष्टाइनसुद्धा डावखुरा होता म्हणे. मी म्हणतो असेल ना, पण म्हणून मला थेयरी ऑफ रिलेटीव्हीटी समजली पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? फिजिक्स आणि मी एकमेकांशी रिलेटीव्हली डिसकनेक्टेड आहोत हे पुरेसं नाहीये का ?

या डावखुऱ्या प्रकारचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, राजकारणातसुद्धा उजवी आणि डावी विचारसरणी ही हातावरूनच ठरवतात असं मला वाटायचं. त्यामुळे मी डाव्या विचारांचा आहे अशी अनेक वर्ष माझी उगाचंच समजूत होती.(आता विचारसरणी हातावरून ठरत नसली तरी हल्लीच्या राजकारणात "हाताच्या" विरोधात असलेले सगळे उजवे अशी सरळसोट व्याख्या आहे हा भाग वेगळा !) आम्हाला दहावीत "लेफ़्ट इज राईट" नावाचा एक धडा होता. त्यातही जगभरातल्या महान डावखुऱ्यांचा उल्लेख केला होता. ते लिहिणारा सुद्धा डावखुराच असला पाहिजे. त्या सगळ्या महान लोकांविषयी पूर्ण आदर राखून मी म्हणेल की, डावखुरे लय भारी असतात असा जर काही नियम असेल तर त्या नियमाला अपवाद म्हणून माझा उल्लेख करावा. सन्माननीय नव्हे तर लज्जास्पद अपवाद म्हणून करा हवं तर.

सगळीकडे आश्चर्य किंवा आदर मिळत असला तरी डाव्यांना हमखास तुच्छतेची वागणूक मिळते ती देवाधर्माच्या ठिकाणी. मंदिरात डाव्या हातानी घंटा वाजवणं किंवा डाव्या हाताने गंध,फुलं वाहणं किंवा प्रसादासाठी डावा हात पुढं करणं हे सगळे अजामीनपात्र गुन्हे आहेत. कारण तिथल्या तिथे ,"अरे काय करतोयेस, देव शिक्षा देईल" अशी शिक्षा ठोठावून लोकं मोकळे होतात. मला नेहमी प्रश्न पडतो, भगवंताच्या दहा अवतारात एकही डावखुरा नव्हता का? रामाने शिवधनुष्य उचलताना तरी डाव्या हाताचा उपयोग केला असेलच ना? की भर सभेत त्याला जनकाने ," तू डावा हात वापरलास म्हणूनच शिवधनुष्य भंगलं, आता वनवास पक्का" असं म्हटलं असेल ? एका भक्ताने तर मी डावखुरा आहे हे कळल्यावर मला पत्रिका दाखवण्याचा सल्लासुद्धा दिला होता. मी त्या काकांची फार उडवली होती.
सुरवात थोडीबहुत वरच्यासारखीच,
"पत्रिका दाखवून दे एकदा. डाव्यांच्या पत्रिकेत बहुतेकवेळा काहीतरी दोष असतो म्हणतात."
" कोण म्हणतात?"
" असं ऐकलंय मी. शास्त्रात लिहिलं असेल कदाचित."
"म्हणजे शास्त्र लिहिणाऱ्या लोकांमध्ये एकही डावखुरा नव्हता?"
"फालतू जोक मारू नको. पत्रिका दाखवून घे."
"बरं दाखवतो... पण दाखवू कोणाला ? तो सुद्धा डावखुरा असेल तर ? की आधीच विचारून घेऊ ?"
"तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. तुमची नवीन पिढी म्हणजे................................"
झालं!... काका नवीन पिढीवर घसरले आणि त्यांचा दिवस सार्थकी लागला !

पंगतीत जेवताना एखादा डावखुरा बाजूला आला की उजव्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते.
"त्या हाताला काही लागलंय का ?"
"नाही"
"मग दोन्ही हाताने जेवायची सवय आहे का ? अरे चार लोकात बरं दिसत नाही असं. उजव्या हाताने जेव."
होतं काय की अश्यावेळी आपण नुकतंच पुरणपोळीचा घास घेतला असतो. त्यामुळे या काकांना उत्तर देण्याऐवजी खाल्लेल्या पुरणाला जागणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच उत्तरादाखल त्याच डाव्या हाताने काकांच्या मांडीवर मठ्ठा सांडवायची तीव्र इच्छा दाबून ठेवावी लागते !

नाही नाही... डाव्यांच्या हक्कांसाठी वगैरे लढत नाहीये मी इथे. डाव्यांना भगवान का दिया सबकुछ हैं! दौलत हैं..शोहरत हैं..कधी जास्त तर कधी कमी अशी इज्जत सुद्धा हैं! डाव्यांना नेहमीच येणारे गमतीशीर अनुभव मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. खरं तर मला डावखुरा असल्याचा काही अभिमान वगैरे नाहीये. उजवा असतो तरी असाच आणि इथेच असतो. शेवटी कुठला हात आभाळाला टेकला ह्यापेक्षा दोन्ही पाय जमिनीवर असणं जास्त महत्त्वाचं !! नाही का?

--चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

डावर्‍यांना अशी हेटाळणीची वागणूक मिळते हे पाहिलेलं आहे आणि ते डोक्यात जातं.

(डावरा) बॅटमॅन.

हा. डावर्‍यांना लहानपणापासून लैच त्रास भोगावा लागतो. और ये जालिम दुनिया. ;)
मी आजपर्यंत भेटलेल्या सगळ्या लेफ्टींचं अंकगणित लक्षात येईल इतकं चांगलं आहे, ते मॅक्सीमम लेफ्टी सक्सेसफुल वगैरे कॅटेगरीत आहेत.
(दोन्ही हातानी लिहिणारा आणि चित्रे काढणारा फुल्ल डावरा) अभ्या

स्पा's picture

14 Mar 2016 - 11:02 am | स्पा

डावरा (स्पा )

मालोजीराव's picture

14 Mar 2016 - 2:48 pm | मालोजीराव

डकन्या बॅटमॅन
(सोलापुरात डावर्‍यांना डकन्या म्हन्तेत)

हो. आणी आपल्या बार्शीत चपणा.

मालोजीराव's picture

14 Mar 2016 - 3:00 pm | मालोजीराव

का र्र...चपन्या...कडू

सुबोध खरे's picture

7 Mar 2016 - 6:17 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन आणी मी पहिला

पीके's picture

7 Mar 2016 - 6:25 pm | पीके

शात्रिजींनी पहिला नंबर लावलाय.
रच्यकने.. लेखन आवडले.

सुबोध खरे's picture

7 Mar 2016 - 6:22 pm | सुबोध खरे

हायला
तेवढ्यात एका डावर्याने खोडा घातला.
असो
आमच्या वेळेस डावरे दंत वैद्य यांना त्यांच्या दातातील गिरमिटासाठी असलेले उपकरण विलायतेहून मागवावे लागत असे कारण उजव्या लोकांचे उपकरण चालत नसे आणी इथे त्याची निर्मिती होत नसे.
आमच्या बरोबरची एक मुलगी एम बी बी एस ला नापास होता होता वाचली कारण यकृत तपासण्यासाठी ती रुग्णाच्या डावीकडे उभी राहून डाव्या हाताने पोटाला हात लावणार होती म्हणून. आमचे इंटरनल परीक्षक तिला ओळखत होते म्हणून अन्यथा एक वारी होणार होती.
असे अनेक किस्से आहेत. बाकी जुने लोक डाव्या लोकांकडे फार पूर्वग्रह दूषितपणे पाहतात.

बोका-ए-आझम's picture

7 Mar 2016 - 6:25 pm | बोका-ए-आझम

अनिल अवचटांनीही याच विषयावर एक छान लेख लिहिलेला आहे. त्याची आठवण झाली. एखाद्या बाटलीचे किंवा बरणीचे झाकण उघडण्यापासून एखादं वाद्य वाजवण्यापर्यंत ब-याचशा गोष्टी य उजवखु-यांना अनुकूल असतात.

कपिलमुनी's picture

7 Mar 2016 - 6:25 pm | कपिलमुनी

जोडीदार डावा असेल तर जेवायला बसताना काळजी घ्यावी लागते.
डावा -उजवा बघून बसावा लागता.

बाकी लेख उजवा आहे :)

केडी's picture

7 Mar 2016 - 6:43 pm | केडी

मस्त लिहिलंय। मी स्वतः डावखुरा असल्यामुळे बरेच प्रसंगांशी relate करता आलं। आई ने मारूनमुटकून लहानपणी उजव्या हाताने जेवायची सवय लावली। बाकी अक्षर आणि चित्रकले मध्ये माझी तीच गत आहे। (माझ्या Elementary my dear watson) लेखात एकंदर माझ्या चित्रकलेची गाथा मांडलेली आहेच।

जगप्रवासी's picture

7 Mar 2016 - 6:52 pm | जगप्रवासी

माझे वडील डावरे आहेत, त्यांच गणित उत्तम आहे त्यामुळे मला पण लहानपणी डाव्या हाताने लिहायला आवडायचं पण इथे उजव्या हाताने लिहिताना कळत नाही तर डाव्या हाताने लिहिल्यावर काय कपाळ कळणार. बाकी एक अनुभव असा की डावरी मानसं जेवण खूप मस्त बनवतात, त्यांच्या हाताला छान चव असते. माझ्या नात्यातल्या चार ते पाच व्यक्तींनी बनवलेल्या जेवणाचा अनुभव आहे म्हणजे त्यांच्या हातच जेवण जेवल्याचा अनुभव आहे.

अद्द्या's picture

7 Mar 2016 - 6:59 pm | अद्द्या

लेख मस्तच जमलाय ..

कुठला हात वापरतो या पासून ते डोक्यावरचे केस आहेत कि गेलेत किंवा आणखी काही फालतू गोष्ट , यावरून माणसे ओळखण्याचा प्रयत्न करतात लोक .

एक तर हसू येतं किंवा नुसता राग . असोच .

लेख मस्तच

बरेचसे प्रतिभावंत लोक (व मिपाकरही) डावखुरे असतात. ;-)

(प्रतिभावंत मिपाकर हा द्विरुक्तीदोष म्हणावा काय! :-) )

मिहिर's picture

7 Mar 2016 - 11:25 pm | मिहिर

छान लिहिलंय.

"पत्रिका दाखवून दे एकदा. डाव्यांच्या पत्रिकेत बहुतेकवेळा काहीतरी दोष असतो म्हणतात."
" कोण म्हणतात?"
" असं ऐकलंय मी. शास्त्रात लिहिलं असेल कदाचित."
"म्हणजे शास्त्र लिहिणाऱ्या लोकांमध्ये एकही डावखुरा नव्हता?"
"फालतू जोक मारू नको. पत्रिका दाखवून घे."
"बरं दाखवतो... पण दाखवू कोणाला ? तो सुद्धा डावखुरा असेल तर ? की आधीच विचारून घेऊ ?"
"तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. तुमची नवीन पिढी म्हणजे................................"
झालं!... काका नवीन पिढीवर घसरले आणि त्यांचा दिवस सार्थकी लागला !

:D

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2016 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

खुमासदार लेखातून डावखुर्‍या व्यक्तिंना मिळणार्‍या त्रासदायक वागणुकीबाबत सहजपणे केलेलं भाष्य आवडलं.

इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात डावखुर्‍यांबाबतचा पाठ होता. त्यानंतर आजच या लेखाद्वारे त्या विषयावरचं वाचायाला मिळालं...

सतिश गावडे's picture

7 Mar 2016 - 11:48 pm | सतिश गावडे

डावखुरेपणाबद्दल छान लिहिलं आहे. आवडला लेख.

शिर्षक वाचून मला वाटले व्हाटसप ग्रुप सोडण्याबद्दल काही आहे की काय. असतात काही दुर्दैवी जीव असे ज्यांची ईच्छा नसताना ग्रुपमध्ये अ‍ॅड केले जाते आणि नंतर ईच्छा असूनही ग्रुप सोडता येत नाही. :)

उगा काहितरीच's picture

7 Mar 2016 - 11:56 pm | उगा काहितरीच

मस्त लेख... डाव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तीला मिळणारी विशेष वागणूक पाहून लहानपणी उगाच प्रयत्न करीत होतो डावा हात वापरण्याचा. जसेकी ब्रश डाव्या हाताने करणे, माऊस लेफ्टी करून वापरणे इत्यादी . बॕडमिंटन खेळू शकतो डाव्या हाताने.

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2016 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

गल्ली क्रिकेटमध्ये मी डाव्या हाताने बॉलिंग करून उजव्या हातापेक्षा बराच बरा परफॉर्मंस देतो :-) .

बर्‍याच फलंदाजांना (गल्ली क्रिकेटमधल्या) डाव्या हाताची गोलंदाजी कळायला अधिक वेळ लागतो असा अनुभव आहे.

हरित वायु's picture

14 Mar 2016 - 11:46 pm | हरित वायु

मी पण डाव्या हाताने गोल्नादजी करतो आणि फल्नदाजी उजव्या हाताने. शाळेत बर्‍याच जनतेला झेपायचे नाही.
लि़़खाण उजव्या हाताने. बहुदा लहानपणि मारुन मुटकुन करुन घेतले असावे आजीने.

चिनार's picture

8 Mar 2016 - 9:22 am | चिनार

धन्यवाद !!

असंका's picture

8 Mar 2016 - 9:47 am | असंका

आमच्या वर्गात एक मुलगा बोलताना नेहमी अडखळायचा. मी कुठेतरी वाचलं की असं अडखळण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे लहानपणी डावरे असून उजवा हात वापरायची सक्ती करणं!
एकदा त्याच्या जवळ बसलो असताना ते बरोबर असल्याचं लक्षात आलं.
गमती गमतीत म्हणालो की बघू कोण डाव्या हाताने पण चांगलं अक्षर काढू शकतो. त्याने अगदी सहज चांगलं अक्षर काढलं! बाकी कुणालाच जमलं नाही!

तो डावराच होता. पण कुणी कुणी केलेल्या सक्तीने उजवा झाला होता. वर तोतरेपणा न मागता मिळाला होता...

नाखु's picture

8 Mar 2016 - 9:56 am | नाखु

"चिनार्या बघता बघाता चांगलाच "उजवा" लेख लिहिलास की रे ! बाकी तू यांच्या साठी (अ‍ॅमेझॉनवरून तरी) घोरपडीच तेल नक्की आणशील असे हे कालच म्हणत होते"

सार्वकालीन माई

चिनार's picture

8 Mar 2016 - 10:14 am | चिनार

धन्यवाद नाखुकाका !!

माई...घोरपडीचं तेल आणायला अमेझॉनच्या जंगलातच जावं लागेल असं दिसतंय.. :-)

यशोधरा's picture

8 Mar 2016 - 10:06 am | यशोधरा

डाव्यांच्या दु:खाला वाचा फुटली म्हणायची.
येलकम टू डावा क्लब!

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2016 - 10:14 am | प्रकाश घाटपांडे

मस्त लेख.
या निमित्ताने लेफ्टी की रायटी हा प्रभाकर नानावटींचा लेख जरुर वाचा.

राजाभाउ's picture

8 Mar 2016 - 10:14 am | राजाभाउ

मस्त लेख.

आता विचारसरणी हातावरून ठरत नसली तरी हल्लीच्या राजकारणात "हाताच्या" विरोधात असलेले सगळे उजवे अशी सरळसोट व्याख्या आहे हा भाग वेगळा !

की भर सभेत त्याला जनकाने ," तू डावा हात वापरलास म्हणूनच शिवधनुष्य भंगलं, आता वनवास पक्का" असं म्हटलं असेल ?

हे तर अगदी हा हा पु वा.

चिनार's picture

14 Mar 2016 - 10:05 am | चिनार

:-) :-) :-)

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 11:22 am | वेल्लाभट

तुम्ही मस्तच लिहिलंयत. असंच होतं आणि अशातच अनेक डावखुरे, उजवीकडे वळतात, वळवले जातात. मुळात हे मेंदूशी निगडीत आहे. यात शुभ अशुभ काहीही नाही आणि किमान शिकल्या सवरलेल्यांनी ते मानू नये असं वाटतं. बाकी इथली डॉक मंडळी सांगतीलच.

डावखु-यांचा उजवा मेंदू अधिक कार्यक्षम असतो. डावखुरे असाल तर क्रिएटिव्हिटी म्हणजेच कल्पकता, कल्पनाविलास, कला, या आणि अशा अजून काही क्षमता तुमच्यात जास्त असतात. उजवे लोक बहुतकरून विवेचन, विश्लेषण, गणिती क्रिया, इत्यादी अधिक चांगलं करू शकतात. हे सरसकटीकरण नव्हे, ही ऑब्झर्वेशन्स आहेत लोकांनी मांडलेली. तुम्ही कल्पक आहात ते तुमच्या लेखातून कळतंच. सुंदर लिहिलंय.

मी जन्मापासून डावखुरा. लक्षात कधी आलं त्याची कहाणी अशी. मी वर्षा दीड वर्षाचा असेन जेंव्हा आमच्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो होतो किरकोळ काहीतरी तपासणीसाठी. तेंव्हा बाहेर पडताना मी त्यांना डाव्या हाताने अच्छा केला. त्यांनी आम्हाला आत बोलावलं. त्यानंतर अर्धा तास ते आई बाबांशी बोलले. हा मुलगा डावरा आहे. तुम्हाला आजूबाजूला, घरातही अनेक जण हेच सांगतील की अमकं उजव्या हाताने करायला लाव इत्यादी. त्यालाही तिसरा माणूस तुमच्या अपरोक्ष प्रसाद देताना, कुणाकडे जेवायला गेल्यावर हेच सांगेल की उजव्या हाताने जेव. या वयात तो नाही म्हणणार नाही पण तुम्ही इंटरव्हीन केलं पाहिजे. याचा संबंध मेंदूच्या फंक्शनिंगशी असतो. तेंव्हा लेट हिम बी अ‍ॅज ही इज अँड डोन्ट चेंज एनिथिंग.

डॉक्टरांचे अत्यंत आभार मानावेसे वाटतात, कौतुकही वाटतं. त्यांच्यामुळे खरं तर 'नाही तो डाव्यानेच जेवणार' हे सांगायचं आईबाबांना बळ मिळालं असावं; अर्थात त्यांनी त्याशिवायही मला बदललं नसतं याची खात्री आहे मला. पण डॉक्टर सांगतात ते वेगळं असतं.

सो मी १००% डावखुरा आहे. आणि आनंदाने, अभिमानाने हे नमूद करतो.
१३ ऑगस्ट, जागतिक लेफ्ट हँडर्स डे असतो हे सांगतो.

हा डाव्या हाताचा शेकहँड घ्या!

धन्यवाद वेल्लाभट साहेब !!
शेकहँड !!

मृत्युन्जय's picture

8 Mar 2016 - 11:47 am | मृत्युन्जय

मस्त लिहलय चिनारसेठ . तुम्ही उत्तम लिहिता . एकदम चितळ्यांच्या बाकरवडी सारखे खुशखुशीत. जरा वारंवार लिहायचे मनावर घ्या

धन्यवाद मृत्युन्जय साहेब !!

चिनार's picture

14 Mar 2016 - 12:07 pm | चिनार

खूप लिहायची इच्छा आहे. विषयसुद्धा सुचतात बऱ्यापैकी. पण काय करणार कम्बख्त पापी पेट का सवाल हैं...
हवा तसा वेळ मिळत नाही.
असो. तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटले. उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

बेकार तरुण's picture

14 Mar 2016 - 10:37 am | बेकार तरुण

मस्त लिहिलय

धन्यवाद …खुप दिवसांनी दिसलात बेकार तरुण साहेब

नीलमोहर's picture

14 Mar 2016 - 10:46 am | नीलमोहर

डावखुर्‍या लोकांबद्दल हेवा आणि कुतूहल दोन्ही वाटते :)

कमाल आहे. मी आजवर जितके डावखुरे बघितले त्या सगळ्यांचं कौतुकच होताना पाहिलय.
लेख फक्कड जमलाय बाकी.

कविता१९७८'s picture

14 Mar 2016 - 11:08 am | कविता१९७८

माझही कौतुकच झालय,नेहमीचा शेरा म्हणजे लेफ्टी हुशार असतात. लेफ्टी असलेल्याची हेटाळणी हे तर मी आताच वाचतीये, लेफ्टी असले तरी मी दोन्ही हाताने जेउ शकते. बाकीची सर्व कामे डाव्या हाताने.

तुम्ही आमच्या दुःखाला वाचा फोडली:)

सुधांशुनूलकर's picture

14 Mar 2016 - 2:11 pm | सुधांशुनूलकर

लेख आवडला.
परदेशात काही दुकानांत खास डावखुर्‍यांसाठी कातरीसारख्या वस्तू असणारी वेग़ळी दालनं असतात असं ऐकलं आहे.

मी उजवखुरा असलो, तरी अनेक कामं डाव्या हाताने करतो.. ही सवय कशी लागली ते माहीत नाही. जेवण आणि लेखन उजव्या हाताने, बाकी बर्‍याच गोष्टी डाव्या हातानेही करू शकतो. (म्हणूनच का बॅट्या, अभ्या.. यांच्याशी आपली तार जुळते? वेल्लाभटशीही जुळेल असं वाटतं.)

वेल्लाभटचा प्रतिसाद आवडला.

ता. क. : 'एकदम उजवा लेख' हे माझ्या प्रतिसादाचं शीर्षक मी बदललंय. 'उजवा' लेख असं म्हणताना अजाणतेपणे उजव्याला श्रेष्ठता देऊन डाव्याला हीन लेखल्याची जाणीव झाली.

चिनार's picture

14 Mar 2016 - 2:27 pm | चिनार

क्या बात हैं !!

विजुभाऊ's picture

17 Mar 2016 - 12:02 pm | विजुभाऊ

वा वा वा
अगदी मनातलं बोललात.
मी पण अर्धा डावखुरा आहे. पेटी वाजवणे वगैरे डाव्या हाताने करतो. डाव्या हाताने लिहीता येतं पण इतके सफाईदार नाही.बाकी लिखाण वगैरे उजव्या हाताने.

पैसा's picture

14 Mar 2016 - 12:32 pm | पैसा

मस्त, खुसखुशीत लिहिलंय!

मन१'s picture

14 Mar 2016 - 12:43 pm | मन१

डावखुरे - उजवेखुरे समजू शकतो. पण हातसफाईतही मिश्र प्रकार पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते.
हे मिश्र लोक म्हणजेच ambidextrous किम्वा अर्जुनासारखे सव्यसाचि काय?
.
.
माझा उपक्रमवरील जुना प्रतिसादः-
.
.
लोकांचेही काय काय प्रकार असतात. काही जण सगळिच कामं उलटी करतात(सर्वत्र उजव्या ऐवजी डावा हात वापरणे).
तर काही जण काही विशिष्ट कामांसाठिच हातांची अदलाबदल करतात (अर्धवट डावरे)
उदा:- खालिल् प्रसिद्ध व्यक्तिमत्वे बघा:-
१.सौरव गांगुली :- डाव्यानं ब्याटिंग उजव्यानं गोलंदाजी
२.आपला सचिन ब्याटिंग बोलिंग उजव्यानं, पण इतरत्र डावरं व्यक्तिमत्व(लेखन,भोजन,टाळी देतानाही त्याचा डावा हात उत्स्फुर्तपणे वर जाताना पाहिलाय म्याचमध्ये. वगैरे.)
३.झहीर खानः- अगदि सौरव च्या उलट.
४.झिंबाब्वे चा १९९९ विश्वचषकाचा स्टार नील जॉन्सन सौरव प्रमाणेच.
५.आशिष नेहरा, कर्टली आंब्रोस, अर्जुना रणतुंगाही शेम टु शेम (डाव्याने बोलिंग, उजव्याने बॅटिंग किंवा उलट.)
६.आफ्रिकेचा लान्स क्लुजनर सौरव सारखाच.
७.महाभारत ह्या ग्रंथातील अर्जुन हस्तिनापूरकर (भगवान श्रीकृष्णाचा आते भाउ) हा दोन्ही हातांनी बाण
मारण्यास सक्षम् होता म्हणे.(सव्यसाची)
८.महाभारत सिरियल मध्ये दुर्योधन आणि कर्ण डावरे दाखवलेत.

काही डावरे सर्वत्र डावा हातच प्राधान्यानं वापरतात (फुल फ्लेज्ड डावरे)
१.सनथ जयसुर्या
२.वासिम अक्रम
३.युवराज सिंग(की सिंघ??)
४.विनोद कांबळी,ब्रायन लारा
५.वन-डे स्पेशालिस्ट मायकल बेव्हन

अजुन एक केसः-
सुनील गावसकर जशी नेहमी उजव्या हातानं अप्रतिम फलंदाजी करायचे, जवळ जवळ तशीच त्यांनी डाव्या हातानही रणजीमध्ये वगैरे केल्याचं ऐकलय.(ह्यालाच सव्यसाचि म्हणतात काय् ? )

क्रिकेट मधले डावरे शैलीदार वाटतात, हे खरच.

अभिनेत्यांपैकी केवळ दोन जण माहित् आहेत् डावरे:-
बच्चन् पिता -पुत्र.

डावखुर्‍या मुलीशी तणातणी होणं महागात पडू शकतं. भडकली की थेट डाव्या सटकन् थोबाडित बसते उजव्या गालावर. थोबाडित कधी खाल्लीच तर लहानपणापासून डाव्या गालावर अधिक खायचा अनुभव असल्याने सटकन् अनपेक्षित थोबाडित उजव्या गालावर बसणे काही क्षण गुंग करते. सँडल तर अजूअन्च बेक्कर बसते ;)

लेफ्टी मुली खूप कमी बघण्यात आल्या. म्हणजे त्या लेफ्टी हायेत की नाहीत बघताच आले नै. ;)
आमच्या शेजारील कुटुंबात मोठी मुलगी फुल्ल लेफ्टी होती. धाकटी तिचे बघून लेफ्टी झाली पण तिला दोन्ही हातानी जमायचे लिहायला. त्यांचा मधला भाउ मात्र उजव्याने लिहायचा.
ओळखायची शिंपल आयडीया म्हणजे एका हाताने चेहरा धुताना हात कोणता वापरला जातो. लगेच कळते. किंवा टूथब्रश वापरताना.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी

मस्त लेख!

माझी मुलगी संपूर्ण डावरी असल्याने (सर्व क्रिया डाव्या हाताने) लेखातील बर्‍याचशा गोष्टी परिचित आहेत.

सुनील गावसकर जशी नेहमी उजव्या हातानं अप्रतिम फलंदाजी करायचे, जवळ जवळ तशीच त्यांनी डाव्या हातानही रणजीमध्ये वगैरे केल्याचं ऐकलय.(ह्यालाच सव्यसाचि म्हणतात काय् ? )

१९८१-८२ च्या रणजी स्पर्धेत उपांत्य फेरीत कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या रघुराम भट्टने पहिल्या डावात ८ व दुसर्‍या डावात ५ बळी घेऊन मुंबईची दाणादाण उडविली होती. त्याचे चेंडू हातभर वळत होते. दुसर्‍या डावात मुंबईचा निर्णायक पराभव टाळण्यासाठी रघुराम भट्टची गोलंदाजी सुलभतेने खेळणे आवश्यक होते. त्याची गोलंदाजी डाव्या हाताने फलंदाजी करूनच नीट खेळता येईल असे गावसकरला वाटल्याने त्याने भट्टसमोर डाव्या हाताने फलंदाजी करून नाबाद १८ धावा करून निर्णायक पराभव टाळला. जेव्हा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाजी करायचा तेव्हा सुनील गावसकर नेहमीप्रमाणे उजव्या हाताने फलंदाजी करायचा पण भट्टसमोर तो डाव्या हाताने फलंदाजी करीत होता.

http://www.espncricinfo.com/blogs/content/story/618414.html

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2016 - 2:44 pm | श्रीगुरुजी

यावर अजून एक सविस्तर लेख (गावसकर डाव्या हाताने फलंदाजी करीत असलेल्या फोटोसकट)

http://www.openthemagazine.com/article/sports/when-he-batted-left-handed

बेकार तरुण's picture

14 Mar 2016 - 3:26 pm | बेकार तरुण

जबरी माहिती गुरुजी !! मी हे कधीच वाचलं नव्हतं
वर लारा चा उल्लेख झाला आहे, माझ्या माहितीप्रमाणे तो थ्रो उजव्याच हाताने करतो, आत्ता नक्की आठवत नाही.
सचिन दोन्ही हाताने थ्रो करु शकतो, तो डाव्या हातानेहि पार सीमारेषेवरुन थ्रोची नियमीत प्रॅक्टीस करायचा हे वाचले आहे (पण मॅच मधे कधी तसं केल्याचे पाहिलं नाहीये)
तसच आत्ता अंडर १९ वर्ल्ड कपमधे श्रीलंकेचा मेंडीस नावाचा गोलंदाज डाव्या तसच उजव्या हाताने स्पिन बॉलिंग करायचा असं वाचल्याचे आठवले.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2016 - 7:54 pm | श्रीगुरुजी

मेंडीसबद्दल माहिती नाही. सचिनने डाव्या हाताने थ्रो केलेला पाहण्यात नाही. लाराबद्दलही आठवत नाही.

बेकार तरुण's picture

15 Mar 2016 - 6:39 am | बेकार तरुण

गुरुजी - काही लिंक्स (आज ऑफिसमधे लै वेळ आहे मला, म्हणुन टीपी)

श्रीलंकेच्या गोलंदाजाबद्दल - http://www.dnaindia.com/sport/report-meet-sri-lankan-wonder-kamindu-mend...

ह्याची खरच कमाल आहे !!!

लारा बद्दल , आणी एकुणच बर्‍याच खेळाडूंची माहिती आहे.

http://www.theroar.com.au/2012/03/29/the-weird-world-of-ambidextrous-tes...

सचिन तेंडुलकर बद्दल - प्लेयिंग स्टाईल मथळ्याखाली १लीच ओळ -

http://www.cs.mcgill.ca/~rwest/link-suggestion/wpcd_2008-09_augmented/wp...

बेकार तरुण's picture

15 Mar 2016 - 6:39 am | बेकार तरुण

गुरुजी - काही लिंक्स (आज ऑफिसमधे लै वेळ आहे मला, म्हणुन टीपी)

श्रीलंकेच्या गोलंदाजाबद्दल - http://www.dnaindia.com/sport/report-meet-sri-lankan-wonder-kamindu-mend...

ह्याची खरच कमाल आहे !!!

लारा बद्दल , आणी एकुणच बर्‍याच खेळाडूंची माहिती आहे.

http://www.theroar.com.au/2012/03/29/the-weird-world-of-ambidextrous-tes...

सचिन तेंडुलकर बद्दल - प्लेयिंग स्टाईल मथळ्याखाली १लीच ओळ -

http://www.cs.mcgill.ca/~rwest/link-suggestion/wpcd_2008-09_augmented/wp...

मराठी कथालेखक's picture

14 Mar 2016 - 2:53 pm | मराठी कथालेखक

उजव्या हाताचा वापर करणारे लोक सामान्यतः जी क्रिया डाव्या हाताने करतात, ती डावरे लोक कोणत्या हाताने करतात ?
[सिरियसली कुतूहल आहे हो, शिवाय माझ्या ओळखीची कुणी डावरी व्यक्ती नाही म्हणून इथे विचारत आहे]
पण एक विनोद आठवला...परी़क्षेत "चयापचय बद्दल माहिती द्या " या प्रश्नाला एक वात्रट विद्यार्थी "चयापचय ही उजव्या हाताने सुरू होवून डाव्या हाताने संपणारी प्रक्रिया आहे"

हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे :-)
ज्याची त्याची इच्छा !

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Mar 2016 - 9:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त खुसखुशीत लेख.

जव्हेरगंज's picture

14 Mar 2016 - 10:47 pm | जव्हेरगंज

भाऊ चिनार!!

काय चुरचुरीत लेख लिव्हलायस !!!

मजा आली वाचायला !

:D

आभारी आहे जव्हेरगंज भाऊ !

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Mar 2016 - 6:27 am | कैलासवासी सोन्याबापु

लैच जबरा हो!, मी स्वतः लेफ्टी हार्डकोर! जेवण सोडुन सगळे काही लेफ्ट हैंडेड, बरेचवेळी आरतीचे तबक सुद्धा नैसर्गिक प्रेरणेने डाव्या हाती उचलत जाओ सटकन!, घरी खुप लोक लेफ्टी आहेत वडिलांच्या बाजुने सुद्धा अन आईच्या बाजुने सुद्धा त्यामुळे मी अनुवंशिकतेने लेफ्टी आहे,

माझ्यामते (अर्ध्यामुर्ध्या वाचीव ज्ञानानुसार), लेफ्टी लोकांची लॉजिकल रीजनिंग तुफान असते , पण गणित डब्बा गोल असते (माझे तरी आहे :P) reception and perception of asthetics उर्फ़ कलाग्राहकता प्रचंड जास्त असते म्हणजे एखाद्या कलाकाराला एखाद्या कलेतुन काय म्हणायचे आहे ते फटकन समजते,

लेफ्टीज चे प्रॉब्लम म्हणजे लेखनगती कमी पडणे होय, कारण उर्दू, हिब्रू वगैरे भाषा सोडता सगळ्या भाषा लेफ्ट टु राईट लिहिल्या जातात त्यामुळे लेफ्टी मुलांचा लेखन वेग कमी होतो कारण नीट एंगल साधत नाही लेखणीचा त्या कारणे एक तर राइटिंग पॅड पुर्ण आडवे करून लिहिले जाते किंवा हात पुर्ण उलटा करुन उजव्या हातासारखा एंगल साधला जातो (ह्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा होय) ह्या सर्कशीमुळे बरेच वेळ डावर्या मुलांवर जास्त वहिम येतो कॉपी केल्याचा परीक्षेत, तसेच जसा जसा सिलेबस वाढतो तसे ही मुले थोड़ी थोड़ी मागे पडू शकतात पण अर्थातच मेहनत करून एक्सीलेंस राखणारे सुद्धा असतातच.

उजव्यांच्या दुनियेत खुप बेसिक गोष्टी अडतात डावर्या लोकांना उदाहरण म्हणजे अगदी स्क्रू ड्राईवर किंवा चमचे नीट पकडून न जेवता येणे, कात्री हैंडल करायला होणार त्रास इत्यादी,

सुप्रसिद्ध डावर्या व्यक्ति हे एक वेगळेच प्रकरण आहे भाऊ, ते नंतर कधीतरी

ता.क. लेफ्टी पोरीचा मार खुप भयंकर लागतो मी सतत खाल्ला आहे, ती पोरगी म्हणजे आमची आई!! एक चपराक बसली डाव्या हाताची की बास!!

बापू...आभार ना तुमचेवाले...
एक प्रश्न आहे बापू... डावरे असल्यामुळे सैन्यात बंदूक किंवा इतर शस्त्र वापरताना त्रास होतो का ?

reception and perception of asthetics उर्फ़ कलाग्राहकता प्रचंड जास्त असते म्हणजे एखाद्या कलाकाराला एखाद्या कलेतुन काय म्हणायचे आहे ते फटकन समजते,

ही गोष्ट माझ्या बाबतीत खरी असावी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Mar 2016 - 10:09 am | कैलासवासी सोन्याबापु

मला तरी राइफल सोबत काही प्रॉब्लम येत नाहीत! हार्डकोर लेफ्टी असल्यामुळे सुरुवातीला मात्र उजव्या हाताने कॉकिंग बोल्ट ओढायला ताकद लावावी लागे आता काही त्रास नाही (सराव महत्वाचा), मुळात एक प्रॉब्लम येऊ शकतो तो होल्डिंग पोजीशन मुळे, उजवे लोकं राइफल बट आपल्या उजव्या खांद्यात रूतवतात डाव्या हाताने बैरल सपोर्ट देतात अन उजव्या हाताने फायरिंग कारवाई करतात आता राउंड फायर झाल्यावर रिकामी केसिंग बाहेर काढणाऱ्या इजेक्शन स्लॉट ची पोजीशन उजव्या बाजुला असते त्यामुळे राउंड केसिंग ची रिकामी पुंगळी फायर केल्यावर उजव्या बाजुला डिस्कार्ड होते, माझ्या बाबतीत ते उलटे असते म्हणजे डाव्या खांद्यात् राइफल रुतवून उजव्या हातचा सपोर्ट देऊन डाव्या हाताने मी ट्रिगर कारवाई करतो ह्यात माझे तोंड (चेहरा) साईट रेल्स मधुन नेम धरायला म्हणून उजव्या बाजूला चिकटवलेला असतो राइफल च्या, लॉजिकल विचार केल्यास अन गणिती प्रोबेबिलिटी नुसार राउंड फायर झाल्यावर उडणारे रिकामें केसिंग माझ्या तोंडावर लागायची प्रोबबलिटी जास्त असते , पण सहसा असे होत नाही, ती व्यवस्थित इजेक्ट होऊन डिस्कार्ड होते.दूसरा प्रॉब्लम म्हणजे राइफल जेव्हा स्लिंग ने गळ्यात लटकवतो तेव्हा ती जानव्या प्रमाणे सव्य असावी का अपसव्य हा प्रॉब्लम असतो उजवे सगळे सव्य लटकवतात मला अपसव्य लटकवणे अपरिहार्य असते. पण हे सगळे पोस्चर प्रॉब्लम आहेत जे सतत सराव करत राहिल्याने करेक्ट होऊन जातात, स्क्रू ड्राईवर किंवा कात्री वापरताना जसे इंस्ट्रूमेंट च्या टेक्निकल लिमिटेशन चा त्रास होतो तसा होत नाही. :)

चिनार's picture

16 Mar 2016 - 9:43 am | चिनार

ओके !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Mar 2016 - 7:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मधे एक आकडेवारी वाचनामधे आलेली. फक्तं उजव्या मेजॉरिटीसाठी बनवलेल्या डिझाईन्समुळे डावखुर्‍या लोकांना होणार्‍या अपघाताची. :(!!!

मी डावरा नाही. माझ्या एका डावखुर्‍या मैत्रिणीला मारुन मुटकुन उजव्या हाताने सगळी कामं करायची सवय केवळ ती डावरी आहे हे लक्षात नं येउन केलेला. आता अँबीडेक्स्ट्रस आहे. तिच्या परवानगीने तिची काही पेंटिंग्ज चिकटवीन इथे,

भाग्यश्री कुलकर्णी's picture

15 Mar 2016 - 9:22 pm | भाग्यश्री कुलकर्णी

भारी लिहले आहे.डाव्यांविषयी.लेखन शैली आवडली

आनन्दिता's picture

15 Mar 2016 - 11:54 pm | आनन्दिता

मी पण अगदी हार्डकोर डावरी आहे. जेवण, छोटी मोठी सगळी कामे डाव्या हाताने. बॅडमिंटन च रॅकेट आणि क्रिकेट्ची बॅट ही डाव्याच हातात जास्त चांगली चालते. घरच्या कोणी कधी उजव्या हाताची सक्ती करायचा प्रयत्न केल्याचं आठवत नाही. माझ्या बाबांचा अशा सक्तीला दणकुन विरोध होता आणि आहे.
नाही म्हणायला गावी गेल्यावर ज्यांच्या समोर कोणाचं काही चालत नाही अशा एका आजोबांच्या समोर पंक्तीत उजव्या हाताने कधीमधी जेवलेय, तेही खुप कमी वेळाच. पण मला उजव्या हाताने जेवतानाही तितकीशी अडचण येत नाही. म्हणजे साधारण अन्न सांडत वगैरे नाही.

लिहते पण डाव्या हातानेच. अक्षर चारचौघात उठून दिसेल असं नक्कीच आहे. सुंदर हस्ताक्षराबद्दल बर्‍याच काँप्लिमेंट्स मिळतात. लिहीण्याचा वेग खुप नसला तरी, खुप कमी वगैरे पण नाहीये. मी चित्रे पण डाव्या हातानेच काढते, उजव्या हाताचा वापर ही कधी कधी करते पण त्यात सफाईदार पणा थोडा कमी आहे. मला एकंदरच रेषांची म्हणा, आकारांची म्हणा बर्‍यापैकी जाण आहे. चित्र काढताना त्यातले बारकावे , जसं की ढग, पाऊस, उन, प्रकाश, धुकं, वातावरणातला कुंदपणा किंवा मोकळेपणा कसे साकारता येतील याचा आराखडा माझ्या मनात क्षणात तयार होतो. मी केलेल्या पेन्सिल शेडींग चित्रात रेषांच्या जंजाळातुन मी उजव्या हाताने मारलेले स्ट्रोकस ओळखु शकते. जिथे जास्त अ‍ॅक्युरसि आवश्यक आहे तिथे आपसुकच डावा हात वापरला जातो.

सोन्या बापुंनी वरती मांडलेला कलात्मकतेचा मुद्दा माझ्या ही बाबतीत खरा आहे असं वाटतं.

माझा डावा हात बेक्कार लागतो असं लोक कबुल करतात. =))

गामा पैलवान's picture

16 Mar 2016 - 12:16 am | गामा पैलवान

लोकहो,

मी पूर्ण उजवखोरा आहे. डावरेपणाशी दुरान्वयेही संबंध नाही. पण माझ्या डाव्या हातात व पायात उजव्यापेक्षा किंचित जास्त ताकद आहे. मात्र अचूकतेच्या बाबतीत दोन्ही उजव्यांना झुकतं माप आहे.

माझ्या डाव्या पायाची किक उजव्यापेक्षा जोरदार असते. कदाचित उजव्या पायाने तोल अधिक चांगला सांभाळता येतो म्हणून असं वाटंत असेल काय? बाकीच्यांचे काय अनुभव आहेत? वाचायला आवडतील.

आ.न.,
-गा.पै.

मस्त खुसखुशीत लिहिलं आहे! मठ्ठा सांडण्याची आयडिया तर फारच आवडली ;) माझे बरेच आप्तस्वकीय डावखुरे आहेत, आणि मला त्यांचा थोडाफार हेवाच वाटतो! त्यांना दोन्ही हातांनी थोड्याफार प्रमाणात तरी कामे करता येतात. माझा डावा हात फारच कमजोर आहे.. त्यातल्या त्यात त्याचा सर्वांत जास्त उपयोग म्हणजे ऑफिसमध्ये मिपा-मिपा चालू असताना कुणाची चाहूल लागलीच तर पटकन Alt+Tab/ Cmd+Tab करुन दुसर्‍या Application मध्ये जाण्यासाठी होतो!

चिनार's picture

17 Mar 2016 - 9:52 am | चिनार

धन्यवाद !

त्यातल्या त्यात त्याचा सर्वांत जास्त उपयोग म्हणजे ऑफिसमध्ये मिपा-मिपा चालू असताना कुणाची चाहूल लागलीच तर पटकन Alt+Tab/ Cmd+Tab करुन दुसर्‍या Application मध्ये जाण्यासाठी होतो!

हा हा हा... मी भरपूर उपयोग करतो याचा..

चौकटराजा's picture

17 Mar 2016 - 10:38 am | चौकटराजा

मी डावरा आहेच . लहानपणी आईन मला " उजव्या" बनवायचा आटोकाट प्रयत्न केला पण म्या चपणाच राहिलो. फक्त
धुव्या हाताने जेवायचे नाही हा संस्कार मनाने स्वीकारल्याने जेवतो उजव्या हाताने पण चमचा हातात आला की डावा हात आपसुकपणे चमच्याचा ताबा घेतो.
डावा असण्याचे काही तोटे आहेत. सिन्थ वाजवताना डावा हात कॉर्‍र्डस वाजविण्यात कमी पड॑तो. कारण ।डाव्या हाताने आपण पहिली मेलडी शिकतो . मग कॉर्‍डस. तसे गिटार वाजवायला ही अवघड जात असावे. अर्थात डावे गिटार घेऊन वा
नव्याने सिन्थ ची प्रॅक्टीस केली मनापासून तर डावरेपणावर मात करणे शक्य आहे. क्रिडा क्षेत्रात क्रिकेट मधे व शटल टाईप गेम डावरे असण्याचा फायदा होतो.
अलेक्झांडर , नेपोलियन, अमिताभ, एम जी रामचन्द्रन, क्लिन्टन ,आशा पारेख संजीव कुमार, राहुल बजाज हे काही
सेलेब्रेटी डावरे तर मराठी कलाकारात सुहिता थत्ते, तेजश्री प्रधान, पुश्कर श्रोत्री, अंकुश चौधरी,आदिती सारंगधर, हे डावखुरे आहेत. बरेच लोक उजवे असूनही टाळी वाजविताना उजवा हात डाव्या हातावर आपटून डावर्या सारखी टाळी वाजविताना दिसतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Mar 2016 - 11:25 am | कैलासवासी सोन्याबापु

पण चमचा हातात आला की डावा हात आपसुकपणे चमच्याचा ताबा घेतो.

आई शपथ एक नंबर!! शेम टु शेम

चिनार's picture

17 Mar 2016 - 11:32 am | चिनार

मी पन !!शेम टु शेम

गिटार वाजवायला ज्यांचा डावा हात कमजोर आहे अशा लोकांनाही अवघड जात असावे - निदान मला तरी गेले. महिनाभर प्रयत्न केला. मला शिकवणारे सर सारखे मला सांगायचे की डाव्या हाताचा बोटांवर जरा तारांचे वळ दिसायला पाहिजेत, थोडा तरी जोर लाव, पण मला काही ते जमले नाही - शेवटी नाद सोडून दिला. किबोर्ड चे फक्त उजव्या हाताने भागून गेले, पण हार्मोनिअमचा भाता मारायला एक मदतनीस हवा असे मला नेहमी वाटायचे, त्यामुळे तेही राहिले.

मी उजवीखोर (असा खरंच शब्द आहे? लिहायले कसेतरीच वाटते! ) असूनही बरीच वर्षे चमचा मात्र डाव्या हातातच धरायचे. उष्ट्या उअजव्या हाताने चमचा धरायला मला मुळीच आवडायचा नाही.. व्याप वाढत गेल्यावर असे नखरे बंद झाले!!

जेपी's picture

17 Mar 2016 - 10:47 am | जेपी

लेख आणी प्रतिसाद मस्त..

विशाखा पाटील's picture

17 Mar 2016 - 11:28 am | विशाखा पाटील

खुसखुशीत लेखन! बालभारतीच्या नववी की दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात डावखुऱ्या लोकांवर एक धडा होता. धड्यात नक्की काय होते ते आता आठवत नाही, पण एका कॅनडीयन शिक्षकाने तो वाचून दिलेली प्रतिक्रिया आठवते. ते म्हणाले होते, 'हा धडा चुकीचे समज पसरवणारा आहे. त्यापेक्षा अश्या लोकांच्या चांगल्या गोष्टी दाखवायला हव्या. असे लोक मिरर इमेज चांगली ओळखतात.' मग काय! मी त्याच पंथातली असल्याने लगेच प्रयोग करून बघितला.
डावखुरे लोकच सव्यसाची असतात का? की सव्यसाची आणखी तिसरा प्रकार असतो? मी सव्यसाची आहे, म्हणून जरा कुतूहल.

तोच तो लेफ्ट इज राईट वाला धडा !

रातराणी's picture

17 Mar 2016 - 11:46 am | रातराणी

मस्त!

भिंगरी's picture

17 Mar 2016 - 12:17 pm | भिंगरी

चांगला विषय 'हाताळलाय'.
मी पण डावरी आहे पण १००% नाही.म्हणजे जेवणे,कात्रीचा वापर करणे हे उजव्या हातानेच करते,मात्र चमच्याने खाताना डावा हातच वापरते.काही वेळा उजव्या हाताने चमच्याने खाऊन पाहीले,पण सांडलवंडच जास्त होते.
पंगतीमध्ये डाव्या हाताने वाढलेले चालत नाही,अशा वेळेस मी भाजी,आमटी,यासारखे पातळ पदार्थ न वाढता,पुरी,पोळी,पापड,भजी अशा प्रकारचे पदार्थ वाढण्याची जबाबदारी घेते.
एकदा मी प्रसादाचे जेवण बनवत होते.डाव्या हाताने रवा भाजत होते,बाजुला मोठ्या भांड्यातील पदार्थ आचारी दोन्ही हाताने हलवत होता.एक आजीबाई आल्या आणि मला डाव्या हाताने रवा भाजण्यावरून सुनवू लागल्या.मी त्यांना म्हटले तो आचारी उजवा आणि डावा दोन्ही हात वापरत आहे,मग तो डावा हात कसा चालतो? त्या म्हणाल्या तो डावा हात उजव्याचा सहयोगी आहे म्हणून चालतो.
मला हे उत्तर पटले नाही.पण मुकाट्याने उजव्या हाताने रवा भाजू लागले.

घेताना डावखुरी [ मिरर ] गिटार घ्यावी लागली. ती लहान असताना बर्याच वेळा काही ठरावीक इन्ग्रजी अक्षरे त्यांचे प्रतिबिंब असल्यासारखी [मिरर] काढत असे.

सध्याच्या पिढीत डावखुरेपणा सहज स्विकारला जातोय, पण १ - २ पिढ्यांपुर्वी मात्र डावखुर्या मुलांना खुप मार खावा लागत असे. माझी आई डावखुरी आहे, पण लहानपणापासुन मार खाउन खाउन तिचि गत ना डाव्या हाताने नीट काम जमते ना उजव्या हाताने अशी झाली.

अनिंद्य's picture

1 Jun 2017 - 1:18 pm | अनिंद्य

@ चिनार,

मी डाव्या विचारांचा आहे अशी अनेक वर्ष माझी उगाचंच समजूत होती :-))

- मस्त लिहिले आहे, लेफ्टी असल्यामुळे एकदम रिलेट झालो.

डावखुऱ्या लोकांबद्दल अजूनही भरपूर प्रवाद आहेत. डाव्या-उजव्याचा बराच त्रास झाला आहे लहानपणी. प्राथमिक शाळेत दुपारचा डब्बा खातांना मला डावा हात मांडीखाली ठेवण्याची सक्ती होती - उजव्यानी खाल्ले नाही तर मित्र हसायचे. घरी पण जेवण उजव्या हातानेच करावे असा आग्रह होता, त्यासाठी बऱ्याच युक्त्या वापरल्या जात, मला मात्र त्याचा राग राग होत असे. पुढे दोन्ही हातांनी (सारखेच गचाळ अक्षर) लिहिणे, चित्रे काढणे अगदी १४-१५ वर्षाचा होईंपर्यंत. मग मात्र लिहिणे डाव्या आणि खाणे उजव्या हाताने अशी विभागणी झाली.

आता मजेत आहे - भारतीय जेवण उजव्यानी सुरु करतो, पण दोन्ही हातानी जेवतो :-) फारिनला आणि जिथे काट्याचमच्यांनी खायचा प्रोटोकॉल असतो तिथे थोडी तारांबळ उडते - डावा हात टेक्स फुल्ल कंट्रोल - मग ते डाव्या-उजव्याचे सर्व नियम कायदे सर्व आपल्या पाय(हात)दळी तुडवून मजा करतो :-)

सही आजही दोन्ही हातानी सेम टू सेम येते.

बाकी आम्सटरडॅमला डावखुऱ्या लोकांसाठी असलेल्या वस्तूंनी खच्चून भरलेले एक दुकान बघून आपण थोडे आधीच जन्माला आलो असल्याचे फीलींग आले होते !

फारच छान लेख !

चिनार's picture

1 Jun 2017 - 1:47 pm | चिनार

धन्यवाद !