टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
गणिताचे निम्नस्तरीय अध्यापन: विश्वशांती ढळण्याचे कारण
शीर्षकाबद्दल आधीच माफी मागतो. मला तशीही जरा प्रक्षोभक शीर्षके लिहिण्याची सवय आहे. आजवरच्या विश्वजालावरील वावरात मला तीन प्रकारचे लोक भेटले आहेत. एक गट, एकूण सदस्य संख्येच्या वीस टक्के, हा शीर्षक पाहून मगच लेखन वाचावे की नाही हे ठरवणारा. दुसरा गट, एकूणअंशी टक्क्यांचा, कुणी लिहिले हे पाहून मगच वाचणारा. तिसरा गट सध्या निवृत्त लोकांचा, त्यांना कुठलेही लेख वाचायला खूप वेळ असतो. दुसऱ्या गटाला स्वत:चे लेखन वाचायला लावणे, ही मोठ्या कष्टाची बाब आहे. त्यामुळे, मी पहिल्या वीस टक्क्यांवर लक्ष केंद्रित करतो. पण शीर्षक जरी नेहमीप्रमाणे अतिशयोक्तीकडे झुकणारे असले, तरी तुम्हाला हा लेख वाचायला त्याच शीर्षकाने उद्युक्त केले, हे नक्कीच. (तसे नसेल, तर तुम्ही अंशी टक्क्यात आहात, अभिनंदन!)
जगात गेली कित्येक वर्षे गणित हा विषय शिकवला जात आहे. अधिकाधिक ऋषींना भोवती बसून आहुती देण्यासाठी जागा वाढवता यावी, म्हणून यज्ञकुंडासाठी लागणाऱ्या जागेचा आकार कसा असावा, हा तत्कालीन पी एच डी चा विषय कुण्या शिष्याला कुण्या भारतीय ऋषीने जेव्हा दिला, तेव्हा गणिताला विद्या म्हणून स्थान मिळाले. पुढे अनेक राजे रजवाडे आपल्या राज्याच्या सीमांतर्गत क्षेत्र आपल्या अनेक राजपुत्रांमध्ये समसमान वाटून देण्यासाठी प्रधानजींना किंवा आपल्या कुलगुरूला संशोधन सहाय्य देऊ लागलेत, त्यामुळे भूमिती ह्या गणिताच्या शाखेचे महत्त्व वाढले. पण त्या आधीही, आकाशातले हे चमकणारे दिवे, आज रात्री एका ठिकाणी दिसतात, तर उद्या दुसऱ्या ठिकाणी, हे कसे काय बॉ ? हे शोधण्याच्या कामी अनेकांची नियुक्ती झाली. त्यांना जेव्हा ह्या दिव्यांच्या हालचालीत काही ठराविक परस्पर संबंध दिसलेत, तेव्हा त्यांनी ते संबंध समजवून घेण्याचा प्रयत्न तर केलाच, पण मग हे संबंध इतरांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्रिमीत भूमिती, बीजगणित ह्यांचाही शोध लागला. आणि हे ग्रहगोलांचे गणित सर्वसामान्य जनतेला शिकवण्यासाठी शैक्षणीय उपकरणे तयार झालीत, त्याचाच विपर्यास कुंडल्या आणि जन्मपत्रिकांत झाला.
चिन्हांच्या विशिष्ट मांडणीतून स्वत: आपल्या सभोवती दिसणाऱ्या सृष्टीबद्दल ताडलेले, स्वत:ला विज्ञानाबद्दल कळलेले, इतरांना सांगावे, ह्याचा इतिहास असा खूप जुना आहे. भाषा आणि लिपी ह्यांचा उगम आदिमानवाने स्वत:चे आत्मचरित्र गुहांमधल्या चित्रांतून केला. तीन-चार काड्यांसारखी माणसे एक मोठ्ठा हत्ती मारताहेत, अशी प्राचीन गुहांमधली चित्रे आपण बघितली आहेत. दरवेळी हे आदिमानव हत्तीच का मारायचे ? एकदातरी त्या तीन चार काड्यांमधून एखादी काडी त्या हत्तीच्या पायाखाली गेल्याचे पुरातन चित्र का दिसत नाही ? दरवेळी हे आदिमानव हत्तीचीच शिकार करत नसतील, कधी कधी एखादा गेंडा तरी दिसायला होता, ह्या चित्रांत! कदाचित सोंड असल्याने हत्तीचे चित्र कितीही घाणेरडा काढला तरी ओळखू येतो, म्हणून असेल. त्यामुळे ह्या चित्रे नसून चिन्हे आहेत, असे ठरवण्यास खूप वाव आहे. नव्हे, पुरातनकालातील चित्रलिपींतून ह्याचे अनेक पुरावे मिळतात. आपल्याला जे सांगायचे आहे, ते शब्दबंबाळ करण्यापेक्षा चिन्हांतून सांगणे सोपे, हे आपले संस्कार खूप जुने आहेत.
सांगायचे हेच, की चिन्हे, त्यांची विशिष्ट मांडणी, आणि त्यातून आपल्याला कळलेले ते इतरांना सांगणे, ही परंपरा खूप जुनी आहे. ह्या चिन्हांची ही भाषा, त्या चिन्हांच्या विशिष्ट मांडणीतून निर्माण होते, हे आपल्या पूर्वजांना कळले होते. भाषेची आणि लिपीची निर्मिती, आणि गणिताची निर्मिती ही ह्या चिन्हांपासून झाली आहे. माझ्या मते, कधीतरी ह्या चिन्हमांडणीकारांचे मतभेद झाले असावेत. "मी हत्तीची सोंड सरळ काढतो, तू कधी कधी ती वक्र काढतोस, म्हणून तुझे शुद्धलेखन चुकीचे आहे" म्हणून हत्तीला मारण्यासाठी बनवलेला दगडाचा भाला कुणा एका आदिमानवाने दुसऱ्या आदिमानवाच्या छातीत खुपसला नसेलच, असे सांगता येत नाही. पण कधीतरी ह्या चिन्हांना काहीतरी नियम असावेत, असे मानणाऱ्यांचा जय झाला (हत्तीची सोंड वक्र काढणारे आदिमानव, हे शुद्धलेखनवाल्या आदिमानवांनी संपवले.) आणि गणिताचा विजय झाला.
गणित ही विज्ञानाची भाषा झाली, ह्याचे कारण हे शुद्धलेखन. अचूक लिहिले नाही, तर अचूक समजून घेता येणार नाही, आणि अचूक समजून घेता आले नाही, तर स्वत:ला समजलेले ज्ञान इतरांपर्यंत नीट पसरवता येणार नाही, ही समजूत मानवाला कधी झाली, कुठून आली, ह्याविषयी अधिक संशोधन आवश्यक आहे. पण ही समजूत कधीतरी आली, हे नक्की.
स्वत:चे अनुभव इतरांना कळावे, म्हणून अधिकाधिक अचूक लिहिता यावे, ही मूळ भावना गणिताच्या इतिहासात नेहमीच दिसून आली आहे. म्हणून गणितींमध्ये ह्या शुद्धलेखनाविषयी जेवढे विवाद दिसून येतात, तेवढे भाषाशास्त्रज्ञांमध्ये पण दिसत नाहीत. आधुनिक युगामध्ये देखील गणितात आणि विज्ञानात हा "सिन्टॅक्स" खूप महत्वाचा मानतात. तर इतर "आर्ट्स" मध्ये सिंटॅक्स सोडून "सीमॅंटिक्स" किंवा "प्राग्मॅटिक्स" महत्त्वाचे मानतात.
असे असल्यास, गणित आणि विज्ञान, हे समजायला सर्वात सोपे असायला पाहिजे. कारण, ह्या शाखेचे नियम अधिक अचूक आहेत. मुळात ह्या शाखांत "सीमॅंटिक्स" ला काहीही महत्त्व नाही. विज्ञान व्यक्त करण्याची भाषा, म्हणजे गणित. गुरू आणि शनीची युती पावसास घातदायक, असे सीमॅंटिक्सच्या दृष्टिकोणातून बरोबर असलेले विधान (कारण "घातदायक" ह्या शब्दाची अचूक व्याख्या नाही), गणिताच्या भाषेत कसे व्यक्त करता येईल ? (सर्व ग्रह हे बिंदू धरल्यास, त्रिमितीय भूमितीत गुरू ह्या एका बिंदूचा शनि ह्या दुसऱ्या बिंदूबरोबर पृथ्वीशी असणारा त्रिमिती कोन एक त्रिमितीय रॅडयन पेक्षा कमी असल्यास पृथ्वीच्या वातावरणातील पाणी पृथ्वीवर पडण्याचे प्रमाण एक टक्क्याने कमी होते, असे जरी सुडो-सायंटिफिक म्हटले, तरी ती गणिती भाषा होत नाही.)
धर्माचेही असेच. अनेक धर्मवेत्त्यांची वक्तव्ये (हिंदु धर्मवेत्त्यांत सध्या आसारामबापू, रामदेवबाबा वगैरे ह्यांची गणती होते, त्यामुळे) मी ऐकलेली आहेत. गणितातील भाषेचा उपयोग ते अधे मध्ये करीत असतात. विशेषत:, "क्ष हे विधान जर आपण खरे मानले, तर मग य हे विधान खरे होते" असे अनेकदा सांगतात. आणि मग हळूच, "य हे विधान खरे आहे, त्यामुळे क्ष हे विधान खरे असलेच पाहिजे", असे ठोकून देतात. इथे त्यांची गणिताशी फारकत होते. पण समोर माना डोलवणाऱ्या त्यांच्या शिष्यांना हे पटते असे त्या शिष्यांचे हावभाव आणि वाढणारी शिष्यसंख्या सांगत असते. ह्या शिष्यांत सगळेच काही अनपढ गवार नसतात, असा माझा अनुभव मला सांगतो. पण गणितातल्या, तर्कशास्त्रातल्या एका मूलभूत तत्वाची येथे अवहेलना होते आहे, हे त्यांच्या गावीही नसते.
गणिताचा विपर्यास (मुद्दाम?) करून घेणारा तिसरा वर्ग म्हणजे अर्थशास्त्रातील तज्ञ म्हणवून घेणारे समभाग विक्रेते आणि ग्राहक. स्वत:च्या विद्याशाखेला "शास्त्र" म्हणवून घेणारे अनेक गुणिजन आहेत. अभिजात संगीताला शास्त्रीय संगीत म्हणून हिंदुस्थानी गायकीच्या पाठीशी "शास्त्र" उभे आहे, अशी स्वत:ची समजूत करून घेणारे लोक, ज्योतिष शास्त्रज्ञ, आणि हे तिसरे म्हणजे स्टॉक ट्रेडर्स. "धीरुभाईने आज हरा कुर्ता पहना है", म्हणून आज रिलायन्स चा स्टॉक वरती जाणार, असा कयास लावून, आपल्या मध्यमवर्गीय ग्राहकांची कमाई रिलायन्स मध्ये उद्यापुरती टाकणारे लोक. हे फक्त भारतातच नाहीत. हे जगभरात सगळीकडे आहेत. ह्यांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे लिहिले जात नाहीत, कारण "समभागांत गुंतवलेले पैसे, कमीजास्त होऊ शकतात, त्यामुळे सावधानी बाळगा", हे त्यांनी त्यांच्या ग्राहकांना आधीच बारीक अक्षरांत सांगितेलेले असते. पण मोठ्या अक्षरांत "गेल्या दहा वर्षांत आमच्या ग्राहकांचे पैसे दुप्पट झाले आहेत", असे देखील लिहिलेले असते. त्यामुळे, हे लोक गणितात बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? अशी एखाद्या विज्ञानाधीष्ठित गुंतवणुकदाराची निष्ठाही अर्थहीन असते. आर्ट्स वाल्या सर्वसामान्यांची तर गोष्टच निराळी. (ब्रोकरवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांतील आर्ट्स वाले किती, कॉमर्सवाले किती, आणि सायन्सवाले किती, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. समाजशास्त्रातील एक-दोन पी एच डी नक्कीच होतील ह्या विषयावर.)
गणिताचा विपर्यास करणारे आणखी बरेच धंदेवाईक सापडतील. लॉटरी आणि सट्टेवाले. अनेक राजकारणी. अगदी डॉन लोक देखील आपल्या शार्पशूटर्स ला स्वत:शी एकनिष्ठ ठेवण्यासाठी गणिती शक्यतांचा प्रयोग करतात, हे सिद्ध झाले आहे. - दाऊदशी एकनिष्ठ असणारे किती छोटे मोठे ट्रिगरहॅपी डॉन दाऊदची जागा घेऊ शकतील ?)
जगात गणित समजणाऱ्यांची संख्या वाढली, तर गणिताला फाट्यावर मारणाऱ्या किंवा गणिताचा विपर्यास करणाऱ्या ह्या धंदेवाईकांचे प्रमाण कमी होईल. जगातील सुखी लोकांचे प्रमाण वाढेल आणि जग सुधारेल, असे समजण्यास खूपच वाव आहे. त्यामुळे मुलांना आणि मोठ्यांना गणित कसे शिकवावे, ह्याचा विचार होणे ही जग सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे.
माझ्या आजवरच्या वावरातून मराठी विश्वजालावर अनेक निवृत्त शिक्षिका / शिक्षक आहेत, असे कळले आहे. ह्या सर्वांनी गणित अध्यापनातील सुधारणांविषी विचार करायला हरकत नाही. आम्ही करतोच आहोत.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

आकडेमोड
हं
ज्याला गणित येते तो ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल ?
व ज्याला गणित येत नाही तो ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल?
व गणितद्वेष्टा ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल?
प्रत्येकाला थोडे गणीत येते व थोडा आपापल्या "सोयीने" गणिताचा "वापर" करतोच
याबद्दल जरा टिपणी करावी वैद्यमहाराज
ले.आ.हे.वे.सां.न.ल.
आपला
[गणितावरच्या कुठल्याही प्रश्नाला घाबरणारा] आ़़ज्ञाधारक
कबुली - लेखकाचे नाव वाचून हा लेख वाचला
माझी उत्तरे
अद्याप सदस्यांच्या अंतरंगात झाकून त्यांना काय वाटेल, हे कळत नाही. पण तरीही माझ्या सीमित बुद्धीतून मला वाटलेली उत्तरे अशी:
ज्याला गणित येते तो ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल ?
निष्कर्ष नाही, तर्कातील चुका काढेल.
व ज्याला गणित येत नाही तो ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल?
ले.आ.हे.सां.न. ल.
व गणितद्वेष्टा ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल?
स्वतःवरच टीका आहे, असे स्वतःशीच ठरवून तर्कदुष्ट प्रतिसाद देईल.
-- वैद्य
बरोबर !
>>ज्याला गणित येते तो ह्या लेखातुन काय निष्कर्ष काढेल ?
निष्कर्ष नाही, तर्कातील चुका काढेल.<<
सहमत आहे. तर्कशुद्धविचार करणारे लोक, समोरच्याचे विधान समजावुन घेउन त्यातील तर्कदोष दूर करत तेच म्हणणे पुन्हा साध्या भाषेत मांडण्याचा ऐवजी धागे काढत बसतात याचा अनुभव आहे.
आणि गणित न येणारे म्हणतात..
लेख आवडला
एक प्रश्न आहे.
गणित शिकल्यामुळे तर्कबुद्धी तयार होते की तर्कबुद्धी असल्याने गणित येते?
गणित समजण्याची शक्ती असलेले आणि तरीही शाळेत न गेल्याने अथवा गणित विषय न घेतल्याने गणित न शिकलेले लोक व्यवहारात चांगले काम करत असावेत असे वाटते.
इतर प्रतिसाद न वाचता हा प्रतिसाद लिहिला आहे. पुनरुक्ती झाली असल्यास सोडुन द्यावे.
आपले नाव वाचून लेखाचे शीर्षक वाचले. आणि त्यात गणित वगैरे शब्द वाचून काही चांगला लेख असेल असे वाटल्याने लेख उघडला.
('इतिहासाच्या अभ्यासाला' कंटाळलेले लोक असा सुद्धा एक चौथा गट संकेतस्थळांवर असावा असे वाटते.)
--लिखाळ.
दुसरा गट,
दुसरा गट, एकूणअंशी टक्क्यांचा, कुणी लिहिले हे पाहून मगच वाचणारा.
पण लेखक सतत नाव बदलत असेल तर त्याने काय काय करावे?
अगदी डॉन लोक देखील आपल्या शार्पशूटर्स ला स्वत:शी एकनिष्ठ ठेवण्यासाठी गणिती शक्यतांचा प्रयोग करतात, हे सिद्ध झाले आहे. - दाऊदशी एकनिष्ठ असणारे किती छोटे मोठे ट्रिगरहॅपी डॉन दाऊदची जागा घेऊ शकतील ?)
मला पण असेच वाटते आहे. आपण ऐक सिदधांत वैगरे तयार करुया ह्या साठी.
मला जगात हे सगळेच जण करतात.
ज्या प्रमाणे बरेचसे जण म्हणतात आम्हाला राजकारण आवडतात नाही, पण ते वापरतात.
राजकारण हे सुद्धा सर्वव्यापी आहे.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
गणिताचे
गणिताचे निम्नस्तरीय अध्यापन म्हणजे प्राथमिक किंवा पूर्वप्राथमिक शाळेत शिकवले जाणारे गणित असे वाटले...

आता शिक्षक मंडळी गणितावर लिहितीलच...
(हत्तीची सोंड वक्र काढणारे आदिमानव, हे शुद्धलेखनवाल्या आदिमानवांनी संपवले.)
जय मिसळ्पाव
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
गणित
जगात गणित समजणाऱ्यांची संख्या वाढली, तर .... जगातील सुखी लोकांचे प्रमाण वाढेल आणि जग सुधारेल,
गणित समजणार्यांची गणती वाढली तर जगाचे गणित सुरळित होईल हे गणितच मुळात बरोबर असायलाच हवे असे वाटत नाही. असो! विस्तारास वेळ नाही. सूअसांनलगे!
अर्थात गणित म्हणजे विवेकबुध्दिने विचार अशी व्यापक व्याख्या मनात असेल तर विचारास चालना देणार्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्यास भोंदूगिरीला आळा बसेल (अगदी बाय डेफिनिशन इटसेल्फ) असे म्हणता येईल.
(अगणित) एकलव्य
+१
अर्थात गणित म्हणजे विवेकबुध्दिने विचार अशी व्यापक व्याख्या मनात असेल तर विचारास चालना देणार्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्यास भोंदूगिरीला आळा बसेल (अगदी बाय डेफिनिशन इटसेल्फ) असे म्हणता येईल.
एकलव्यांशी सहमत.
एकूण लेख मस्तच, आवडला!
लेख गणिताशी संबंधित असेल असं वाटूनच लेख वाचला.
(नावातच गणित असणारी) १_६ अदिती
-२
यावेळी साफ निराशा झालेली आहे. लेख आवडलेला नाही. निम्म्यातुन वाचायचे सोडले. आपल्या इतिहास उत्खननामुळे अंमळ अपेक्षा होत्या, असतात. हे असलं काही वाचुन मजा नाही आली...
गणिताशी ३६ चा आकडा आणि इंजिनीयरींग चे ब्रम्हा-विष्णू-महेश (एम-१,एम-२,एम-३) कुंथून पास झालेला
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
विस्तवी वास्तवात
ए क अ क्ष र क ळ ल त र श प थ
प्रकारातली समिक्षा. (संदर्भःकेतकी पिवळी पडली)
अज्ञानी विजुभौ
अवांतरः पण जगात असेही लिखाण असू शकते या विस्तवी वास्तवात आणल्याबद्दल धन्यवाद .
अशा लेखनाचे शास्त्र आमच्या विष्वात अजून बाल्यावस्थेत आहे. बहुतेक प्रगल्भ व्हायला वेळ लागेल
प्रगल्भ व्हायला घाबरणारा विजुभौ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
उत्तम
लेखनातील मूळ विषय आवडला;विचार पोचले. गणिताच्या अध्यापनातील सुधारणांबद्दलचे शेवटचे वाक्य भिडले,त्या अनुषंगाने विचार करावासा वाटू लागले आहे (तसा तो नक्की करीनही!)
(विचारवंत)बेसनलाडू
गणित
जगात गणित समजणाऱ्यांची संख्या वाढली, तर गणिताला फाट्यावर मारणाऱ्या किंवा गणिताचा विपर्यास करणाऱ्या ह्या धंदेवाईकांचे प्रमाण कमी होईल.
माझ्या आजवरच्या वावरातून मराठी विश्वजालावर अनेक निवृत्त शिक्षिका / शिक्षक आहेत, असे कळले आहे. ह्या सर्वांनी गणित अध्यापनातील सुधारणांविषी विचार करायला हरकत नाही.
पटले.
माझे आजोबा (जे गणितज्ज्ञ होते) म्हणायचे,ज्याला गणित येतं त्याला सारं काही येतं.
स्वाती
सहमत
माझे आजोबा (जे गणितज्ज्ञ होते) म्हणायचे,ज्याला गणित येतं त्याला सारं काही येतं.
स्वातीताई,
आपल्या आजोबांशी सहमत !!!
-- वैद्य
+१
मी पण सहमत!
(१_६ गणिताची विद्यार्थिनी) अदिती!
मुद्दे
पटले, फक्त उपयोजित (ऍप्लाईड) प्रकारचे गणित शिकवण्यावर (किंवा व्यवहारात ते कसे लागू पडते, हे समजावून देण्यावर) भर असायला हवा, असं वाटतं.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
एक ऐकलेली गोष्ट
एका गणितज्ञाला दुसय्रा माणसानी म्हटलं, "मला असं वाटतं माझ्या मुलाला गणित जमेल. तर त्याला कशाप्रकारे शिक्षण द्यावं?" गणितज्ञानी विचारलं हा मुलगा शाळेत कसा जातो. तो नेहेमी बाबांच्या गाडीतून जायचा. गणितज्ञ म्हणाला, "त्याला तूच शाळेत सोड, पण दोन अटी: एकतर गाडीचा भोंगा वाजवायचा नाही आणि दुसरं म्हणजे ब्रेकपण नाही मारायचे". या गोष्टीचा "शेवट" मला माहित नाही.
पण पुण्यात स्कूटर चालवण्याचा थोडा अनुभव आणि थोडा गणित शिकण्याचा यावरून मला अनुभवता आलं त्या गणितज्ञाला काय म्हणायचं होतं ते!
८ रुपयांची
८ रुपयांची वांगी, ५ रुपयांची गवारी घेऊन भाजीवाल्याला २० ची नोट दिल्यास ७ रुपये परत मिळतात,
१५ रुपयाचा समभाग २० रुपयास विकल्यास ५ रुपयांचा नफा होऊन ३३.३३% इतकी टक्केवारी पडते,
एक डझन आंब्यांचे २०० रुपये तर पाच डझनास १००० रुपये पडतात, किंवा या उलट,
बास!
इतपतंच आमचं गणित! यापेक्षा आमाच्या आयुष्यात गणिताला अधिक महत्व नाही...!
आपला,
(व्यावहारिक!) तात्या.
लेखाची कल्पना आवडली
छान नवीन कल्पना...
काही मते पटली, काही नाही पटली.
असो.
अधुनमधून मारलेल्या शाब्दिक कोपरखळ्या आणि तिरकस बाण नेहमीप्रमाणेच.
(वर गणिताला फाट्यावर मारणारी तात्यांची प्रतिक्रिया आलीच आहे..
चलने दो!
खुलासा.. :)
नानासाहेब,
वर गणिताला फाट्यावर मारणारी तात्यांची प्रतिक्रिया आलीच आहे..
आपला काहितरी गैरसमज होतो आहे. मी गणिताला फाट्यावर वगैरे मारलेले नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात गणिताचा उपयोग कितपत आहे इतकेच मी सांगायचा प्रयत्न केला आहे. बाकी, वैद्य हा एक हुशार मनुष्य आहे, आणि हा त्याचा लेखही लै भारी आहे यात वाद नाही!
आणि हो, शिवाय सदर लेखन हे त्याचे स्वयंप्रकाशित लेखन आहे याचाही आनंद वाटतो!
तात्या.
गैरसमज
गैर'समजा'बद्दल दिलगीर आहे

माझ्या प्रतिक्रियेला तुम्ही (विशेषतः ज्याप्रकारे) प्रतिक्रिया दिलीत यातून आणखी काही गैर'समज' होऊ शकतात.
माझ्या
माझ्या प्रतिक्रियेला तुम्ही (विशेषतः ज्याप्रकारे) प्रतिक्रिया दिलीत यातून आणखी काही गैर'समज' होऊ शकतात.
तेवढं चालायचंच हो! अहो शेवटी मिपा आहे हे!
असो, आता अधिक विषयांतर नको...
तात्या.
लेख
बरा वाटला.
लेख चांगला आहे
आपल्याकडे शिकवल्याप्रमाणे - घोकंपट्टी म्हणजे गणित. ७ x ६= ४२ च होते (का बुवा माहित नाही.) हे गणित शिकवणे आणि घोकंपट्टी करवून संस्कृत शिकवणे यांत फारसा फरक नाही.
यावर लेख काहीच प्रकाश टाकत नाही.
असो,
प्रागैतिहासिक गुहाचित्रांत हत्ती नसून असलाच तर मॅमथ (मराठी शब्द माहित नाही) असावा. याखेरीज घोडे, गवे, हरिणे इ. सापडतात. ज्
प्रकाश
यावर लेख काहीच प्रकाश टाकत नाही.
प्रकाश टाकण्याचे काम अनुभवी लोक करतीलच. आम्ही फक्त समस्या दाखवून दिलेली आहे.
-- वैद्य
गणितातील घोकंपट्टी आणि संस्कृत
आपल्याकडे ७ x ६= ४२ च होते असे लहानपणी (इ. दुसरीत समजू) शिकवतात - ते आदर्श नसले तरी दिसते तितके वाईटही नाही असे मला वाटते. ज्या व्यक्तीला ७ x ६= ४२ कसे हे जाणून घ्यायची आवड असते ती व्यक्ती १०२ x ९८ हा गुणाकार पुढच्या आयुष्यात तोंडी करू शकेल (म्हणजे ६-७ वर्षांनंतर ८ वी / ९ वीत असतानाही). (मी वैदिक गणितातील सूत्रांबद्दल नाही तर भारतीय शाळेत शिकविल्या जाणार्या बीजगणिताबद्दल बोलतो आहे)
याला पर्याय म्हणजे चित्रातून गणित शिकवणे - जे हल्ली नक्कीच होते. आणि भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये बाकी कितीही चुकीचे असले तरी "पाढे पाठ करणे" ही एक (तरी) गोष्ट इतर देशातील माणसे पाहता नुकसानकारक तर नाहीच पण फायदेशीरच ठरते असे मी स्वानुभवाने सांगतो
संस्कृतची घोकंपट्टी ही वेगळ्या प्रकारात मोडते - त्या भाषेचे एक व्याकरण आहे - (पाणिनी ने ठरवलेले?) ज्यात पुंलिंगी / स्त्रीलिंगी शब्दांना लागणार्या विभक्ती प्रत्ययांचे ठराविक नियम आहेत. ज्यामुळे "माला" शब्द कसा "चालतो" हे "पाठ" असेल तर "शाला" शब्द कसा चालतो ते ही समजते. (हे उदाहरण अगदी बाळबोध आणि कुठल्याही भाषेला लागू पडते असे वाटत असले - तर मला माझा मुद्दा नीट सांगता आला नाही असे समजू). संस्कृतच्या व्याकरणाच्या काटेकोर नियमांमध्येच तिचे महत्त्व आहे असे मला वाटते.
संगणक भाषांचे समांतर उदाहरण द्यायचे म्हटल्यास "एच. टी. एम. एल. आणि एक्स. एम. एल. यातली कोणती भाषा संगणकाला सहजपणे समजेल" असा प्रश्न मी स्वतःला विचारतो. हेच उदाहरण पुढे नेऊन - "एखादी बोलीभाषा (इंग्लिश धरून) आणि संस्कृत यातली कोणती भाषा संगणकाला "सहजपणे समजू शकेल" "असे विचारून पाहतो. ह्या विषयावर संगणकशास्त्रात संशोधन चालू आहे / होते. (मी त्यात सहभागी नसलो तरी त्याचे मर्म नक्कीच जाणू शकतो) निदान या कारणासाठी तरी संस्कृत व्याकरणाचे नियम पाठ करण्यात काही वावगे नाही. संस्कृतच्या अभ्यासकांना त्या घोकंपट्टी केलेल्या नियमांमागे काही तर्कशास्त्र आहे का ते माहीत असेल (मी संस्कृतचा अभ्यासक नाही.)
मला गणितातील घोकंपट्टी आणि संस्कृत बद्दल जे सांगायचे होते ते सांगण्याचा प्रयत्न केला - जमला नसल्यास ही माझ्या लेखन कौशल्याची मर्यादा आहे. कुणाचाही उपमर्द / टिंगल करण्याचा हेतू नाही.
वरील प्रतिसादात आपल्याला संस्कृत व्याकरणातील घोकंपट्टी म्हणायचे होते असे समजून विधाने केली आहेत. परंतु आपल्याला जर श्लोक / वेद यांचे पठण हा अर्थ अभिप्रेत असेल तर माझे त्याबद्दल (अभ्यास तर सोडा, पण) काहीच मत / समर्थन (पण विरोधही) नाही.
-अमित
म्हणजे...
(अ+ब)*(अ-ब) = अ२ - ब२चा फंडा काय हो?
(अ+ब)*(अ-ब)=
(अ+ब)*(अ-ब)= अ*अ-अ*ब+ब*अ-ब**=अ२ - ब२ !!!!!!!!!!!
तुम्हाला असे सांगायचे होते का की हे सुत्र वापरून १०२*९८ करता येते?
पाठांतर का करावे
मी पाठांतराला वाईट म्हणत नसून ७ x ६= ४२ च का होते हे न सांगणार्या शिक्षकांच्या उदासीनतेला वाईट म्हटलेले आहे. माझ्या थोडक्या प्रतिसादातून ते स्पष्ट झाले नसल्यास क्षमस्व!
शब्द चालतो म्हणजे काय होते हेच आठव्या यत्तेत अनेकांना समजत नाही. जर समजत असते तर आज शाळेत संस्कृत शिकणारे सरसकट संस्कृत समजू शकले असते. त्यामुळे शाळेत शिकवल्या जाणार्या संस्कृतचे कोणतेही समर्थन मी करणार नाही. तो केवळ घोकंपट्टी करून गुण मिळवायचा विषय होता आणि अनेकांनी तसे केले असावे इतकेच.
काही बाबतीत पाठांतर करावे लागते हे खरे आहे पण ते का केले/ करावे हे कळून घेण्याचा हक्क त्या विद्यार्थ्याला आहे जो शिक्षणात फारसा मिळत नसेल तर हे गैर आहे. इंग्रजीची स्पेलिंग्जही पाठ करावी लागतात पण कोणती व्यंजने आणि स्वर त्यांच्या जागेनुसार (पोझिशन) कसे उच्चारले जातील हे मुलांना कळून घ्यायचा हक्क आहे.
आपण कोणत्या देशाबद्दल आणि नेमक्या कोणत्या व्यक्तिंबद्दल बोलता हे माहित नाही परंतु अमेरिका आणि युरोपमध्ये गणिताच्या अनेक शाखांत उच्चशिक्षण किंवा संशोधन होत असल्याने आणि त्याला प्रोत्साहन दिले जात असल्याने स्थिती वाईट नसावी. असो, इयत्ता चौथीत १०२ x ९८ हा आणि १.२५ x ३.७५ हा तोंडी गुणाकार पाढे न येता करणारी अमेरिकेतील मुलं (किंबहुना संपूर्ण वर्ग) मला माहित आहेत आणि हे मी स्वानुभावाने सांगते.
पाठांतर
शब्द चालतो म्हणजे काय ही गोष्ट ढोबळमानाने तरी ८वीत विद्यार्थ्यांना माहीत असतेच - जसे ५वी मध्ये he / his / him मधला फरक त्यांना सांगितला जातो आणि समजतो - तसाच देव शब्दाच्या ८ x ३ विभक्ती प्रत्ययांचा हा तक्ता आहे हे समजू शकते - सांगितले जाते. (आणि २रीत पाढे पाठ करणार्यांना जशा काही गोष्टी नंतर समजू शकतात तसेच संस्कृत शब्दाचे व्याकरणही नक्कीच समजते - लवकरात लवकर १० वी पर्यंत नक्कीच.)
संस्कृत शब्दांच्या उच्चारणाबद्दलचे नियमही अभ्यासक्रमातच शिकविले जातात. (संधी करताना र / श च्या नंतर येणारा "न" हा "ण" कसा होतो -- हे त्याचे एक उदाहरण.)
पाढे - या बाबतीत माझी शरणागती. मी पाहिलेली उदाहरणे वेगळी होती (विद्यार्थी तुर्की / अमेरिका / रशिया मधल होते).
-अमित
असतेच. नक्कीच समजते.
असे म्हटल्यावर वादाचा प्रश्नच उद्भवत नाही, नाही का?
असतेच. नक्कीच समजते
मराठी मातृभाषा आहे म्हणून सोडून देऊ - पण इंग्लिश / हिंदी / फ्रेंच / जर्मन (शेवटच्या दोन्ही मी शिकलेलो नाही) यांचे व्याकरण विद्यार्थ्यांना समजते ना?
पण संस्कृत भाषेच्या बाबतीत "असतेच / नक्कीच समजते" हे म्हणणे योग्य नसेल तरीही वादाचा प्रश्न उद्भवत नाही
त्यामुळे या ही मुद्द्यावर आमची शरणागती
-अमित
गणित
आणि विश्वशांती हे शब्द वाचूनच लेख वाचावा कि नाही असा प्रश्न पडला . त्यात लेखकाचे नाव वैद्य ... गणिता इतकीच मला डॉक्टरांचीही भीती वाटते.
(मी कुठल्या गटात ?)
लेख आवडला आणि (जितका समजला तितका) पटला
"की चिन्हे, त्यांची विशिष्ट मांडणी, आणि त्यातून आपल्याला कळलेले ते इतरांना सांगणे, ही परंपरा खूप जुनी आहे. "
मला कॉनन डॉयल ची 'साईन ऑफ फोर' ही कथा आठवली...
आपल्या धर्मात सुद्धा अनेक सांकेतीक चिन्हे आहेत ज्याचा प्रतिकात्मक अर्थ लावायचा प्रयत्न अजूनहीचालू आहे..
लहान मुले सुद्धा लिहायला/वाचायला शिकायच्या आधी ही आकृती आणि चिन्हांची भाषाच आत्मसात करतात..
मला वाटते अभिजात/शास्त्रीय संगीतात सुद्धा गणित आहेच कि ...स्वरांची आवर्तने... त्याला लागणारा वेळ , रागांमधे लागणारे शुद्ध, कोमल, तीव्र स्वर ...तसेच ताल्..प्रत्येक तालात किती बीट्स येतात त्या मधे किती स्वर यायला हवेत हे सगळे गणितच आहे की ...
एका गोष्टीचे नवल वाटते.. ज्या देशात गणित इतके प्रगत होते ..जिथले गणिती अवकाशात न जाता ग्रह, ता-यांची अंतरे मोजत होते .. ज्यांनी शून्याची संकल्पना प्रथम शोधली त्याच समाजात हे शास्त्र इतके मागे कसे पडले ?
(पण एक नक्की .. माझ्या पेक्षा आमच्या अडाणी भाजीवालीचे गणित चांगले आहे ... कारण मी घेतलेल्या भाजीचे किती पैसे होतात हे ती माझ्यापेक्षा लवकर सांगू शकते )
अवांतर
ज्या देशात गणित इतके प्रगत होते ..जिथले गणिती अवकाशात न जाता ग्रह, ता-यांची अंतरे मोजत होते ..
अजूनही ग्रह, ता-यांची अंतरं मोजण्यासाठी अवकाशात जात नाहीत!
(अंतरं मोजणारी) अदिती
मला म्हणायचं होतं ..
..आजच्या इतकी प्रगत साधने त्या वेळी नव्ह्ती...तरीही त्यांचे ग्रह , तारे इ. संदर्भातील ज्ञान इतके अचूक होते .
मला वाटते
मला वाटते अभिजात/शास्त्रीय संगीतात सुद्धा गणित आहेच कि ...स्वरांची आवर्तने... त्याला लागणारा वेळ , रागांमधे लागणारे शुद्ध, कोमल, तीव्र स्वर ...तसेच ताल्..प्रत्येक तालात किती बीट्स येतात त्या मधे किती स्वर यायला हवेत हे सगळे गणितच आहे की ...
हो, परंतु ते गणित जिथे संपतं तिथेच उत्तम संगीत सुरू होतं. जी मंडळी त्यातलं फक्त गणितच बघतात ती बहुतेक विशारद वगैरे होतात!
आपला,
(संगीत विशारदांना गाणं शिकवणारा) तात्या.
डॉ. विद्याधर ओक
हो, परंतु ते गणित जिथे संपतं तिथेच उत्तम संगीत सुरू होतं.
तात्या, तुम्हाला डॉ. ओक माहिती आहेतच.
आणि डॉ. अरविंद थत्तेही माहिती असतीलच.
मग असे तर्कहीन विधान कसे करता बॉ तुम्ही ?
-- वैद्य
तात्या,
तात्या, तुम्हाला डॉ. ओक माहिती आहेतच.
चांगलेच!
आणि डॉ. अरविंद थत्तेही माहिती असतीलच.
एकदोनदा त्यांच्या घरी गेलो आहे.
मग असे तर्कहीन विधान कसे करता बॉ तुम्ही ?
२ + २ = ४ हे गणित झालं, परंतु अभिजात संगीताच्या अभिव्यक्तिमध्ये २ + २ = ४ असं करणं, हे निदान मी तरी संगीत मानत नाही. डॉ ओक, डॉ थत्ते किंवा इतर तज्ञ यांचं यावर काहीही मत असो, मी माझं मत सांगितलं!
तात्या.
गणित
गणित २ + २ =४ असे मांडण्या ऐवजी,
२ + २ म्हणजे ४ असण्याची शक्यता १.० आहे
असे मांडले तर संगीताविषयी गणितातून विचार करणे अधिक सोपे जाईल.
येथे द्विमान तर्कशास्त्र नाही तर धूसर तर्कशास्त्र वापरावे.
http://en.wikipedia.org/wiki/Fuzzy_logic
-- वैद्य
गणित २ + २ =४
गणित २ + २ =४ असे मांडण्या ऐवजी,
२ + २ म्हणजे ४ असण्याची शक्यता १.० आहे
असे मांडले तर संगीताविषयी गणितातून विचार करणे अधिक सोपे जाईल.
संगीताविषयी कुणी गणितातच काय, परंतु कशातूनही विचार करावा, तो प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे! परंतु मुळात मी संगितज्ञही नाही आणि गणितज्ञ तर त्याहूनही नाही! मी फक्त,
"संगीताच्या थेअरीमध्ये गणित असतं परंतु त्याच संगीताची अभिव्यक्ति ही कुठल्याही गणिताच्या पुढे असते, शब्दातीत तर असतेच असते परंतु अंकातीतही असते..!"
एवढंच माझं व्यक्तिगत मत सांगितलं आणि त्याच्याशी मी ठाम आहे!
असो, या विषयावर हा माझा शेवटचा प्रतिसाद! या विषयावर मी अधिक काही लिहू शकेन असं मला वाटत नाही!
आपला,
(संगीताची फारच कमी जाण असलेला!) तात्या.
शास्त्रीय
शास्त्रीय पाया असलेल्या गोष्टीतूनही उत्तम सौंदर्यनिर्मिती कशी होउ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत. दर्जेदार गायक/वादक अशीच व्यक्ती होऊ शकते जी व्यक्ती शास्त्र आणि सौन्दर्यदृष्टी यांचा योग्य समन्वय साधून संगीतनिर्मिती करू शकते.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
पटले
आपले म्हणणे पटले.माझ्यामते जो तर्कसुसंगत विचार करु शकतो त्याला गणितच काय कोणताही विषय अवघड वाटणार नाही.परंतु सुसंगत विचारांप्रमाणेच आचरणही होणे आवश्यक आहे मगच शांतीच्या गप्पा मारणे योग्य होणार नाही कां?
हि कोण
हि कोण शांती ? मला कसा तिचा उल्लेख दिसला नाही?
उत्त्तर
ही शांती म्हणजे लेखात उल्लेख केली गेलेली विश्वशांती.आपल्याला कोणी मुलगी वगैरे वाटली नाही ना?
शिरोधार्य
परंतु सुसंगत विचारांप्रमाणेच आचरणही होणे आवश्यक आहे
आपला उपदेश शिरोधार्य आहे.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले
आपला शिक्षण क्षेत्रातील अनुभव जमेस धरता, मुलांना आणि मोठ्यांना तर्कसुसंगतता कशी शिकवावी, ह्याविषयी काहीतरी लिहा, ही आग्रहाची विनंती.
-- वैद्य
जरूर
जरूर,वेळ पडल्यास आणि वेळ मिळाल्यास लिहीण्याचा प्रयत्न करेन.पण शिक्षकाचे सांगणे किती मनावर घ्यायचे हे शेवटी विद्यार्थीच ठरवितो.घोडयाला पाण्यापर्यंत नेता येते,पण पाणी पिण्याचे काम त्यालाच करावे लागते,हे सत्य आहे.
पाणी
विद्यार्थ्याने पाणि पिणे , हे शिक्षकाने त्याला/तिला पाणी दाखवण्यावर अवलंबून आहे.
शिक्षक स्फोटक द्रव्यांपर्यंत विद्यार्थ्यांना नेऊन, "हे पाणी, पी आता", असे सांगत असेल, तर विद्यार्थ्याचा, शिक्षक/शिक्षिकेविषयी, किंवा पिण्यासाठी पाणी फुकट उपलब्ध असते, ह्या गोष्टीविषयीही विश्वास उडेल. मुळात विद्यार्थी पाणी पीत नाही, म्हणून त्याला पाणी प्यायला लावावे म्हणून आपले भाडोत्री गुंड त्याच्यामागे लावणे, हे कितपत समर्थनीय आहे ?
-- वैद्य
हा हा हा वैद्यराज!
आपल्या लेखातली गणिती वक्रोक्तीत मांडलेली केऑस थिअरी आवडली!

गणित हा अगणित गोष्टींचा आत्मा आहे. गणित जेवढं जास्त समजत जातं तेवढं आपल्याला काही समजत नाही हे कळत जातं!
(खुद के साथ बातां : रंग्या, गणिताबद्दलचं तुझं 'वैराग्य' तुला महागात पडणार बघ. चल ऊठ चटकन आणि माळ्यावरुन अबाकस काढ बघू!
)
चतुरंग
मला वाटते
मला वाटते आहे की, प्रस्तुत लेखकाला
'माहीतीचे योग्य व शास्त्रीय विश्लेषण' ह्याचा वापराविषयी बोलायचे आहे. जर ह्याचा वापर वाढला तर जगात शांतता लाभेल.
सखाराम गटणे
लेख आवडला
लेख फार आवडला. गणित हे नागवं असतं , होय/नाही हे ते तोंडावर सांगतं/फेकतं इतर विषयातील सब्जेक्टीव्ह शब्दबंबाळपणा गणिताला खपत नाही. त्यामुळं बरेच लोक त्याच्या वाटेला जात नाहीत असं वाटतं.
बाकी लेखकाचे नाव बघूनच वाचला अन्यथा असल्या शिर्षकाचा लेख उघडला देखिल नसता.
लीलावती
भास्कराचार्यांचे लीलावती अथवा पाटीगणित या ग्रंथाचे सुफल संपुर्णम ग्रहण झाले की माणसाला झाडाची पाने सुद्धा पटकन सांगता येतात असे म्हटले गेले.
बाकी लेख आवडला
सर्किटचे जालउपयुक्तता मुल्य वजा जालउपद्रव मुल्य = ?????
प्रकाश घाटपांडे
????
= वैद्य वजा सर्किट = ० ?
-- वैद्य