आठवणीतला श्रावण

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in जनातलं, मनातलं
12 Jul 2015 - 11:37 pm

श्रावण! मराठी सारस्वतात आजवर अनेकांनी हाताळलेला विषय. श्रावण आहेही तसाच. ह्या विषयावर आधीच एवढी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती झालेली असताना, मला त्यात भर घालण्याचे कारण नाही. पण तरीही काळाच्या ओघात हा आठवणीतला श्रावण निसटून जाऊ नये म्हणून हा प्रयत्न.

श्रावण म्हणजे रिमझिमणारा पाऊस, ऊन-पावसाचा खेळ. एकूणच श्रावण म्हणजे पावसाच लोभसवाणे रूप. तसं बघायला गेलं तर पाऊस मला आवडतोही आणि नाहीही. पावसाचं आणि माझं जन्मापासूनचे नातं आहे. म्हणजे माझा जन्म ७ जूनचा असल्याने पावसाचं आणि माझं आगमन अगदी हातात हात घालून झालेलं आहे. माझ्या जन्माच्या दिवशी पुण्यात गारांचा पाऊस झाला होता म्हणे. आता सामान्यपणे माणसाला त्याच्या जन्माशी निगडित गोष्टी, म्हणजे स्थळ, वेळ, ऋतु इत्यादीं विषयी विशेष ओढ असते. पहिल्या दोन गोष्टींबाबत ते बऱ्यापैकी बरोबर देखील आहेपण जन्म पावसाच्या सुरवातीचा असूनही मला पावसाबद्दल तशी विशेष ओढ पटकन निर्माण होत नाही. ह्याचा अर्थ पावसाविषयी माझ्या मनात अढी आहे असेही नाही. पण मघाशी म्हटल्या प्रमाणे पाऊस मला आवड्तोही आणि नाहीही. ह्याची कारणं शोधायला माझ्या बालपणात जावं लागेल. लहानपणी पहिला पाऊस मला प्रकर्षाने जाणीव करून द्यायचा ती संपत आलेल्या सुट्टीच्या दिवसांची. शाळा भरताना वाजणाऱ्या घंटे प्रमाणे तो मला भासयचा. त्यामुळेच पाऊस सुखद वाटत असूनही मनापसून आवडायचा नाही. आपलं काहीतरी हा हिरावून नेत आहे ह्याची बोच मनात राहायाचीच. पुढे मोठेपणी तीच भावना जरा वेगळ्या स्वरुपात. दरवर्षी फिरून पाऊस आला कि हातातून निसटणारया वाळू सारखे आयुष्यातील क्षण निसटून चालल्याची जाणीव वायची. ह्या अशा विचित्र मनस्थितीत पावसाचे स्वागत केल्याने माझं आणि पावसाचं नातं कधी पटकन जुळत नाही.

आता एवढे सारे लिहिल्यावर मी श्रावानावर काय लिहिणार? पण मनात हुरहूर ठेवून का होईना, दरवर्षीच फिरून येणाऱ्या पावसाला मी समोर गेलोय आणि मनातील ती हुरहूर कमी झाल्यावर त्यातील गंमतही अनुभवलीय.
माझ्या बालपणी पुण्यात श्रावणाची रिमझिम असायची आतासारखा तो कोसळायचा नाही. श्रावणात चिखलभरल्या शाळेच्या मैदानात खेळलेला फुटबॉल, दुर्वा तोडायच्या नावाखाली गवतात घातलेला धुडगूस, नाकतोड्या च्या शेपटीला दोरा लावून त्याचे केलेले ‘हेलीकॉप्टर’, रस्त्यावर साचलेल्या डबक्यातून मुद्दाम उड्या मारत घरी परतणे सारे कसं अगदी श्रावणात फुललेल्या फुलांसारखे मनात ताजं आहे.

श्रावण हा व्रत-वैकल्ये यांचा मास. त्यात घरात धार्मिक वातावरण असल्याने श्रावणी सोमवार, शुक्रवार सगळं अगदी यथासांग. पहाटे होणारी सडा-रांगोळी, पहाटेच्या वेळी रेडिओवर ऐकलेली स्तोत्रे, चिंतन. इतकेच कशाला अगदी आघाडा, दुर्वा, फुले विकणाऱ्यांच्या हाळया, ह्या साऱ्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. ह्या व्रत-वैकल्ये यांच्या कळत माझं नावडीचा भाग म्हणजे शनिवारी मुंजा म्हणून इतरांकडे जेवायला जाणे. मुंज झाल्यापासून काही वर्षे तरी प्रत्येक श्रावणातले चारही शनिवार कुठे न कुत्ते बोलावणे असेच. त्यात बहुसंख्य लोक मला अत्यंत प्रिय (?) असणारे खीर, शिकरण इत्यादी दुग्धजन्य पदार्थ करत. जे मी खाणे सर्वथा अशक्य असे. मग तिथे आलेल्या गुरुजींकडून मुंजाने ताटात काही टाकू नये हे ऐकून घ्यावे लागे. अर्थात त्याकडे मी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असे. पुढे पुढे मग आईनेच बोलावणे आले कि ‘दुधाचे पदार्थ त्याला वाढू नका’ असे सांगायला सुरुवात केली. त्याचा बऱ्यापैकी परिणाम झाला. नंतर मग पुढच्या मुंज्यांची ‘फळी’ तयार झाल्यावर मात्र माझी ह्यातून सुटका झाली.

पुढे कॉलेजात आल्यावर मित्रांबरोबर सहली ठरू लागल्या आणि त्यातून भोवतालचा निसर्ग जो काही बघायला मिळाला त्यातून कवितेतला खरा श्रावण भेटला. श्रावणातील वर्षां सहल म्हणजे दरवर्षी ठरलेलीच. गाड्यांवरून रिपरिप पावसात भिजत मुळशी, पानशेत, लोणावळा, ताम्हिणी, बनेश्वर, निलकंठेश्वर अशी सर्व ठिकाणे आम्ही एक-एक करत पालथी घातली. धबधब्यांमध्ये भिजणे, गाड्यांवर ‘कौशल्य’ दाखविणे इत्यादी गोष्टी अशा सहलीमधील प्रमुख आकर्षणे असत. आम्ही जात असलेल्या ह्या मावळ पट्ट्यामध्ये निसर्गाने सौंदर्याचे एवढे मुक्त प्रदर्शन मांडलंय कि मित्रांच्या दंग-मस्तीतही निसर्ग सौंदर्य, विशेषतः सह्याद्रीचे राकट अंग मनाला भुरळ पडत होतं. त्यातूनच मग फोटोग्राफीचा छंद जडला. स्वतःकडे कॅमेरा नसल्याने मित्रांच्या कॅमेऱ्याला ‘आपलाच’ मानून त्यावर आपली कला आजामाविणे सुरु झालं. माझ्यातल्या कलाविष्काराच्या खुणा आजही माझ्या मित्रावार्गाकडे छायाचित्रं रुपात आहेत. पुढे पुढे ह्या सहलींची व्याप्ती वाढत ती कोकणा पर्यंत गेली. कोकण तसंही मला कायमच वेड लावतं. पण श्रावणात कोकणातली सफर म्हणजे खरोखर परमानंदच. एखाद्या रुपगार्विते प्रमाणे नटलेली तेथील हिरवी सृष्टी आणि फेसाळणारा समुद्र. किनाऱ्यावर रात्री बसून अनुभाविलेली नीरव शांतता आणि त्या शांततेतला लाटांचा गाज. एका प्रियकराचा प्रेयसीशी संवाद! मनात उठणारं वादळ ........ जाणाविणारे अपूर्णत्व!

श्रावणी सोमवारी वेळणेश्वराच्या गाभार्यात उमटणारे ओंकार, रुद्र यांचे स्वर, मंतरलेल्या वातावरणात देवदर्शन करून धरलेली परतीची वाट. कोकणातला श्रावण हा असाच मनात घर करून राहतो.

पुढे कॉलेज जवळपास संपल्या नंतर म्हणजे तसा उशीराच गिर्यारोहणाचा छंद जडला. आधी केलेल्या भ्रमंतीतून पाहिलेला सह्याद्री खुणावत होताच. योग्य संगत लाभताच मग पावसाळ्यात डोंगरयात्राही घडू लागल्या. तेव्हा मावळात धो धो कोसळणारे पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. घाट माथ्यावर अक्षरशः ढगांच्या साम्राज्यातून चालत, पावसाने पुसलेल्या पायवाटा शोधत भटकण्यातला आनंद अनुभवला. सह्याद्री आणि समुद्र दोघेही मला तितकेच प्रिय आणि दोघांची श्रावणातील भेटही.

गिर्यारोहणा प्रमाणेच गाण्याचं वेडही माझ्यात तसं उशिराच आलं. म्हणजे गाणं आवडत होतच पण नेमकं काय ऐकावं ह्याची जाणीव यायला जरा वेळ लागला त्यानंतर मात्र पावसाळ्यात रंगलेल्या एकाहून एक उत्तम मैफिली ऐकल्या. सुरुवातीलाच ऐन पावसात ऐकलेली सुरेल सभेने गरवारे मध्ये आयोजित केलेली संजीव अभ्यंकरांची मैफल. त्या रिमझिमणाऱ्या रात्रीत ऐकलेला ‘देस’ अजुनही तसाच स्मरणात आहे. संगीत आणि सह्याद्री दोघांची ओळख जरा उशिराने झाली खरी. पण आता दोघे माझ्या व्यक्तिमत्वाचे अविभाज्य अंग झालेत.

खरं तर अशा आठवणी लिहिण्या इतके माझं वय झालेलं नाही. यातील बऱ्याच गोष्टी मी अजूनही अनुभवतोय. तोच श्रावण फिरून पुन्हा पुन्हा येणार आहे , पुन्हा तीच हिरवाई, तेच सूर, तेच क्षण सारे सारे अनुभवायला मिळणार आहे. पण तरीही हा आठवणीतला श्रावण हवा तेव्हा बरसण्यासाठी!

टीप: प्रस्तुत लेख हा २००६ साली लिहिलेला आहे. त्यामुळे संदर्भ त्यानुसार आहेत.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

आवडला आठवणीतला श्रावण."ा आठवणी लिहिण्या इतके माझं वय झालेलं नाही. यातील बऱ्याच गोष्टी मी अजूनही अनुभवतोय. "--उत्तर भारतात,राजस्थानात झाडाच्या फांद्यांना झोपाळे वगैरे बांधतात,गाणी गातात.तोही अनुभव घेऊन पुढे कधी तरी लिहा.

यशोधरा's picture

13 Jul 2015 - 3:51 am | यशोधरा

आवडलं.

साहित्यिक लिहिलंय. छान आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2015 - 8:08 am | अत्रुप्त आत्मा

+१

समांतर:- @मराठी ""सारस्वत"">> ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय?

सारस्वत म्हणजे सरस्वतीची पूजा करणारे...पर्यायाने 'साहित्याचे उपासक' ह्या अर्थी.

एक एकटा एकटाच's picture

13 Jul 2015 - 8:04 am | एक एकटा एकटाच

लेख चांगलाय.
छान लिहिलय.

पुढील लिखणास शुभेच्छा

जडभरत's picture

13 Jul 2015 - 8:17 am | जडभरत

खूप छान लिहिलाय!
९/१०

सौंदाळा's picture

13 Jul 2015 - 10:17 am | सौंदाळा

छान लिहले आहे.
अजुन मोठा लेख किंवा याचा दुसरा भाग जरुर टाका. वाचायला आवडेल.

पैसा's picture

13 Jul 2015 - 12:15 pm | पैसा

खूप छान लिहिलंय! आता यानंतर सह्यमित्राकडून "सह्याद्रीतेला पाऊस" याविषयावरचा फोटोंनी भरलेला एखादा सुंदर लेख अपेक्षित आहे!

सह्यमित्र's picture

13 Jul 2015 - 3:47 pm | सह्यमित्र

धन्यवाद. नक्की प्रयत्न करेन.

श्रावण म्हणजे रिमझिमणारा पाऊस, ऊन-पावसाचा खेळ. एकूणच श्रावण म्हणजे पावसाच लोभसवाणे रूप. >>>
हल्ली हे वर्षभरात कधीही होतं . :-(

उगा काहितरीच's picture

13 Jul 2015 - 4:03 pm | उगा काहितरीच

वा क्या बात है ! आवडला लेख . (ते मुंजा बनून जेवायला जाणे मलाही अज्जिब्बात आवडायचे नाही.)

रातराणी's picture

13 Jul 2015 - 11:55 pm | रातराणी

उत्कृष्ट ! ! खूप आवडला. फोटोही टाका.

श्रावण म्हणजे सोमवारची क्ष अर्धी शाळा, शंकराच्या मंदीरातील गर्दीतले दर्शन, संंध्याकाळी सोडलेला उपास लहानपणाच्या या आठवणी विसरता येणार नाही.

हं श्रावण म्हणजे दिवसभराच्या उपासानंतर केळीच्या पानावर मटर उसळ, चाकवताचं गरगटं, केळीचं शिकरण आणि गरमागरम घडीची पोळी खात न बोलता, दिवा न शांत होऊ देता उपास सोडणं.

प्यारे१'s picture

14 Jul 2015 - 1:42 am | प्यारे१

लेख छान आहे पण ज़रा अधिक मास वजा करुन आलेला दिसतोय! अधिक नसता तर चार आठ दिवसात आलाही असता श्रावण. समयोचितही झालं असतं. तरीही हरकत नाही. महिन्याभरानं पुन्हा वाचू... आनंदे!