वैनी........२ (अंतीम)

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
22 May 2015 - 7:37 pm

त्यानंतर मधून मधून संध्याकाळी परड्यात वैनी दिसू लागली . कधी विहिरीवर पाणी भरताना तर कधी झाडताना . ती दिसली की आम्ही मोठ्ठ्यानं गलका करू, "वैनी अंजीर , वैनी अंजीर ." ती बिचारी अंजीर ओच्यात वेचून घेऊन येई . आमचा अंजीरांचा खुराक पुन्हा सुरु झाला . काही दिवसात आमची आणि वैनीची गट्टी जमली. अलीकडे बळवंतराव लवकर घरी येई . मग तो आणि वैनी फिरायला बाहेर पडत. ती दोघं निघाली की इकडे सरूच्या तोंडाचा पट्टा चालू होई , " आता आइसक्रीम खातले , आमका नाय देवचे . परवा ह्यो गुळयाचे भजे घेऊन इल्लो . खोलीत जाऊन दोघा गुपचूप खाय होती . आमका एक पण देउक नाय , माका वास इलो. खावा खावा, किती खातलास ते " वगैरे वगैरे . आमचा चांगला टाईम पास होई . पण हे फार काळ चाललं नाही . वर्षभरात लग्नाची नवलाई संपली आणि बळवंतराव पुन्हा उशिरा घरी येऊ लागला . वैनी रोज संध्याकाळी परडं झाडताना दिसू लागली .
वैनी एकदम साधी होती . लग्न होईपर्यंत ती एकदाही तिच्या खेड्याबाहेर गेली नव्हती . त्यामुळे तिला आमच्या गावातल्या सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटे . आमच्यापैकी कुणी मुंबईला किंवा कोल्हापूरला वगैरे जाऊन आल्याचं कळलं की त्याला तिथले रस्ते , दुकाने, बिल्डीन्गी, पार्कं वगैरे बद्दल ती विचारत बसे. एकूणच तिला लहान मुले आवडत. पण तिथून आल्यावर सगळी मोठी मुलं विचारत, ' काय रे ? वैनी बरोबर गूळ काढी होतं काय ?"
याचा अर्थ कळत नव्हता , घरी विचारायची तर सोयच नव्हती. पण मैदानात होत असलेले बदल हळू हळू लक्षात येवू लागले होते . मुलं गावकरणीच्या परड्याला लागून व्हॉलीबॉल खेळू लागली. वैनी परडं झाडायला आली की कुणाच्या न कुणाच्या हातून बॉल हमखास सुटून परड्यात जाई आणि पोरं " वैनी बॉल बॉल "करून ओरडत आणि मोठ्ठ्याने हसत . काही दिवसात गावकारीण , जी संध्याकाळी कधी बाहेर दिसत नसे, ती बाहेर येउन बसायला लागली . आणि बॉल परड्यात आला की मुलांवर डाफरू लागली . ती वैनीवरसुद्धा चिडत असे . गावाकारणीला चिडताना पूर्वी कधी पाहिलं नव्हतं . पण काही वेगळं घडत होतं खरं . ते समजायला मी अजूनही लहान होतो.
सुट्टी लागली . एक दिवस दुपारी घरी माळा आवारत असताना जुने पेपर ,पुस्तके, फायली असा खजिना हाती लागला . त्यात एक भन्नाट गोष्ट सापडली . राजा रविवर्म्याची कॅलेंडरं आणि चित्रं . अशी चित्र की आई बाबांची चाहूल जरी लागली की पटकन लपवावीशी वाटणारी . माझा रिकामा वेळ कुणाच्या नकळत ती निरखण्यात जाऊ लागला. ती बघण्यासाठी मी मुद्दाम वेळ काढू लागलो . बाई किंवा स्त्री ची नव्यानं ओळख घडत होती आणि स्वतःच्या शरिराचीदेखील . आपण इतके दिवस कित्ती बावळट होतो हे समजलं . सगळ जग नवीन दिसू लागलं . नवी दृष्टी मिळाली .
सुट्टी संपल्यानंतर पुन्हा संध्याकाळचं खेळाचं रुटीन चालू झालं . आता मात्र वैनी वेगळीच भासू लागली . वैनी दिसायला जरी सुमार असली तरी पुढं मागं भरलेली होती. पुष्कळाच जणू . तिच्यापुढे रविवर्माच्या चित्रातील नायिका झक मारतील . कितीही व्यवस्थित पदर घेतला तरी हे सर्व लपण्यासारखं मुळीच नव्हतं . मुलांची व्हॉलीबॉल खेळायची जागा का बदलली असावी , वैनी दिसताच मुलं बॉल बॉल का ओरडतात, गूळ काढणं म्हणजे काय अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मला आपोआप कळली . आता चिंचा आवडेनाशा झाल्या . सारखा अंजीर मागायला जाऊ लागलो. वैनी काहीतरी मला विचारत असे पण माझं लक्षच नसे . नजर अंजीर सोडून भलतीकडे भिरभिरत असायची . वैनी अजून मला लहानच समजत होती . पण तिच्याकडे बघितल्यावर माझी कानशिलं चांगलीच तापत असत . मला मिसरूड फुटू लागलं होतं . गोट्या , काजी हे खेळ चिल्ल्यापिल्ल्यांचे वाटायला लागले . व्हॉलीबॉल खेळणं प्रतिष्ठेचं वाटू लागलं . मी माझा ग्रुप बदलला . हळूहळू चुकत माकत मीही खेळायला लागलो . उंची ताडमाड वाढली होती. लवकरच मी पट्टीचा व्हॉलीबॉलपटू झालो . पण तरीही मला कच्चा लिंबू गणलं जाई . गेम झाला की सगळे एका कोपऱ्यात चकाट्या पिटत बसत पण मला मात्र घरी पिटाळत. खूप वाईट वाटे . त्या अड्ड्यात सामील व्हायला काय वाट्टेल ते करायला मी तयार होतो पण मार्ग सापडत नव्हता.
गणिताच्या पुस्तकातून जर रविवर्मा अभ्यासला तर परीक्षेत काय होणार ? व्हायचं तेच झालं होतं . सातवीच्या परीक्षेत मार्क कमी पडले होते . आता आईला माझं संध्याकाळचं खेळायला जाणं खटकू लागलं . "कुठं त्या उनाड मुलांच्या नादी लागतोस , वाया चाललायास " वगैरे वगैरे संभाषण रोजचं झालं . शेवटी वैतागून बाबांनी परुळेकर सरांचा क्लास चालू केला . आठवड्यातले तीन दिवस संध्याकाळी ६ ते ८ मला अडकवून टाकलं . पण तरी इतर दिवशी व्हॉलीबॉल चालूच होता . मैदानावर मी व्हॉलीबॉल सकट बऱ्याच नवीन गोष्टी शिकत होतो . मी शाळेच्या व्हॉलीबॉल टीम मध्ये निवडला गेलो. जिल्हा स्तरापर्यंत जिंकून सुद्धा आलो . पण...... पण अजूनही मोठ्यांच्या गृपमध्ये माझं बस्तान बसत नव्हतं . माझी बेचैनी वाढत होती . आणि इकडे रविवर्मा जाम त्रास देत होता .
एक दिवस खेळताना माझ्याकडून बॉल सुटला आणि नेमका गावकरणीच्या परड्यात गेला . तिथं वैनी झाडत होती . सगळी मुलं धावत धावत परड्यापाशी आली. मी पुढं होतो. "वैनी बॉल" मी धापा टाकत म्हणालो . वैनीने बॉल दिला , "काय रे आज काल अंजीर मागूक येणा नाय तो? " वैनी म्हणाली . वैनीकडे बघताच माझी कानशिलं तापायाला सुरुवात झाली होती . . परड्यापाशी अख्खी व्हॉलीबॉलची गॅंग जमली होती . समोर वैनी हातात बॉल घेऊन उभी होती . वाटलं ग्रुपमध्ये खऱ्या अर्थी सामील व्हायची हीच वेळ आहे . होता नव्हता तो धीर एकवटला आणि मी बोलून गेलो , " वैनी , मला आता बॉल आवडतात . ते सुद्धा व्हॉलीबॉल सारखे मोठ्ठे . " क्षणभर शांतता पसरली . आणि नंतर हसण्याचा स्फोट झाला . वैनीने माझ्याकडे बघितले ," मोठा झालास तू " असे पुटपुटत ती मान खाली घालून घरात निघून गेली .
मी गड सर केला होता .
सगळ्यांची माझ्याकडे बघण्याची नजर एकदम बदलली. टीम मधली माझी जागा पक्की झाली . आज पहिल्यांदा गेम झाल्यावर मी सर्वांच्यात गप्पा मारत बसलो. त्या आनंदात तरंगत तरंगत उशिरा घरी आलो . पण रात्री झोप येईना. वैनीने आईला सांगितले तर ही भीती वाटू लागली. पण त्याहीपेक्षा वैनीचा दुखावलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता . वैनीने आजपर्यंत माझ्यावर निष्पाप माया केली होती . तिच्याशी असं वागायला नको होतं. चूक घडून गेली होती . त्यावेळी मोठ्या विजयी विराप्रमाणे हसलो पण आता पश्चात्ताप होत होत . फुग्यातली हवाच निघून गेली .
दुसऱ्या दिवशीसुद्धा याचा विसर पडेना . खेळायला जावसंच वाटेना . वैनी दिसली तर? तिच्यापुढे जायची हिम्मत नव्हती . आजपर्यंत जी मला मुलाप्रमाणं वागवत होती तिच्याशी आपण फार चुकीचं वागलो हे कुठंतरी टोचत होतं . वैनीचं तोंड चुकवायला क्लास होताच. मी क्लासला जायला लांबचा मार्ग निवडला आणि सायकलनं गेलो . हे नेहमीचंच झालं . मी मैदानात न जाण्याचे बहाणे बनवू लागलो . आईला वाटलं , बर झालं, सुंठीवाचून खोकला गेला . तिनं कधीच खेळायला जा असा आग्रह केला नाही. पण माझा व्हॉलीबॉल बंद झाला . खेळावसच वाटेना. मी शाळेची टीमसुद्धा सोडून दिली. नंतर नववी दहावी ही महत्त्वाची वर्षं होती . दहावी नंतर कॉलेज साठी शहरात आलो आणि गावही सुटलं. फक्त सुट्टीपुरता गावाचा संबंध राहिला. परस्पर नोकरीनिमित्त परदेशात गेलो , लग्न झालं पण तेही रजिस्टर . त्यामुळे गावी यायची , फार कुणाला भेटायची वेळ आली नाही . वैनी, व्हॉलीबॉल सर्व विसरून गेलो .
पण आईनं सरू गेल्याचं सांगितलं आणि जुनं सगळं आठवलं . कितीही टाळलं तरी आई काही पाठ सोडेना . म्हणून तीस वर्षांनी मी पुन्हा पाणंदीत शिरत होतो. गावकरीण जाऊन दहा बारा वर्षे होऊन गेली होती .आजूबाजूचं गाव बदललं तरी गावकरणीचं घर होतं तसंच होतं चिंच , मैदान उरलं नसलं तरी अंजीर आपल अस्तित्व टिकवून होता . माझी चाहूल लागताच " कोण आसा ? " म्हणत वैनी बाहेर आली . वैनीचे केस आता पिकले होते. तोंडाचं बोळकं झालं होतं . बारीक झाली होती . वाकली होती . एकदम म्हातारी दिसत होती .
वैनीनं इतक्या वर्षांनंतरही मला ओळखलं ."भटाचो झिल मा रे तू? " पण मग माझे सुशिक्षित उच्चवर्गातले कपडे बघून ती एकेरीवरून अहो जाहो वर आली . " या या बसा ". मी अवघडून बसलो . "तुम्ही इलात ते ह्यांनी सांगला व्हता . मी म्हटलंय यांका ,माका भेटाक इल्याशिवाय रवाचे नाय तुम्ही. "
मला कुठं तोंड लपवू असं झालं . "घराकडे सगळा ठीक ना? बायको पोरा बरी आसत ना ? " वैनीनं चौकशी केली . मग ती सरुबद्दल गावकरणीबद्दल आणि इतरही बरंच काही बोलली . "हो नाही "याशिवाय माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता . मी खाली बघत उत्तर देत होतो . पुढं काय बोलावं ते सुचेना . वैनी जुनं सगळं विसरली असावी , पण माझ्या डोक्यातून ते जात नव्हतं . "वायज चा ठेवतंय " वैनीने असं म्हणताच मी भानावर आलो . "नको नको , उशीर झाला.निघतो मी " म्हणत मी उठलो . इतक्या वेळात वैनीच्या डोळ्यात पहायची हिम्मत झाली नव्हती . मग काय विचार आला माहित नाही ," वैनी चूक झाली , येतो मी " म्हणून वैनीचे मी पाय धरले. " अरे अरे, असू दे असू दे. सुखी राहा. येत जा इलात की " डोळ्याला पदर लावून तिनं आशीर्वाद दिला . . आणि अगदी हलका हलका होऊन मी तिथून बाहेर पडलो .

कथालेख

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

22 May 2015 - 7:50 pm | बॅटमॅन

..............

प्रदीप's picture

22 May 2015 - 7:57 pm | प्रदीप

कथाबीज उत्कृष्ट आहेच, आणि लिखाणाची शैलीही चित्रदर्शी व सुंदर आहे.

असेच लिहीत रहा.

वाढत्या वयात झालेल्या चुकीची माफी मागण्याने कथेचा शेवट होईल असे अजिबात वाटले नव्हते. लेखनशैली आवडली.

शेवटी तरी माफी मागितली हे फार योग्य झाले. कथा उत्तम जमली आहे.

अतिशय सुंदर लिहिले आहे. आवर्जून लॉगइन करून प्रतिसाद द्यावासा वाटला!

त्या वैनीचा कोंडमारा फार अस्वस्थ करून गेला. एकीकडे पदरात पडलेलं आणि दुसरीकडे टवाळांची धिटाई. काय वाटत असेल तिला एक स्त्री म्हणून!

बहुगुणी's picture

22 May 2015 - 11:00 pm | बहुगुणी

आवर्जून लॉगइन करून प्रतिसाद द्यावासा वाटला!
+१. वाचनीय लेखनशैली!

रेवती, प्रदीप आणि यशोधरा यांच्या प्रतिसादांशीही सहमत.

विंजिनेर's picture

22 May 2015 - 11:53 pm | विंजिनेर

आवर्जून लॉगइन करून प्रतिसाद द्यावासा वाटला!

असेच म्हणतो.
सुंदर आणि संयत लिहिली आहे कथा. उत्तम फुलविली आहे तरीसूध्दा नेटकी झाली आहे.

चुकलामाकला's picture

25 May 2015 - 6:44 pm | चुकलामाकला

स्वॅप्स, बहुगुणी, विंजीनेर, धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

22 May 2015 - 8:07 pm | मधुरा देशपांडे

लेखन आवडले.

जेपी's picture

22 May 2015 - 8:07 pm | जेपी

......

पैसा's picture

22 May 2015 - 8:14 pm | पैसा

फार सुंदर लिहिलंय! अभिनंदन! असंच लिहा अजून.

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 8:52 pm | टवाळ कार्टा

.

फार छान लिहिलंयेत. नि:शब्द केलं आज या कथेने. नक्की लिहा अजुन कथा.

खूपच आवडलं. स्वॅप्स यांनी वर लिहिल्याप्रमाणे वैनीची "न लिहिलेली" कथा जास्त अस्वस्थ करून गेली.

आणखी लिहा.

रामपुरी's picture

22 May 2015 - 9:34 pm | रामपुरी

पु ले शु

स्वाती२'s picture

22 May 2015 - 11:47 pm | स्वाती२

कथा खूप आवडली!

वॉल्टर व्हाईट's picture

23 May 2015 - 12:47 am | वॉल्टर व्हाईट

गोष्ट अत्यंत आवडली. सत्यकथा असेल कथानायक हा खरोखरीच एक चांगला माणुस आहे असे म्हणायला हवे. मनमोकळी माफी मागुन त्याने वर्षानुवर्षे मनाला लागलेली टोचणी घालवली हे फार चांगले झाले. अन वैनी बरोबर काही वाईट झाले नाही हेही उत्तम, साधारणपणे अश्या कथा करुण दुख्खांताच्या वाटेने जातात. धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2015 - 1:04 am | श्रीरंग_जोशी

तुमचं लेखन खूप भावलं. वाचताना काही वेळा तात्या अभ्यंकरांच्या लेखनाची आठवण झाली.

जसं तुम्ही कोकणातलं ग्रामीण भागातलं वातावरण शंब्दांतून रंगवता तसंच ते मुंबईचं वातावरण रंगवतात.

पाटील हो's picture

23 May 2015 - 9:33 am | पाटील हो

जबरदस्त

पूर्ण सहमत
तात्यांची आठवण काडला आणि "रोशनी" आठवली .

चुकलामाकला's picture

23 May 2015 - 3:26 pm | चुकलामाकला

तात्यांचं लेखन नेहमीच आवडतं.

एक एकटा एकटाच's picture

23 May 2015 - 2:42 am | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलीय

शेवट आवडला.

रुपी's picture

23 May 2015 - 4:55 am | रुपी

छान लेखन..

या भागात नायकाचे भाव अगदी रोलर-कोस्टर राईड सारखे आहेत. शेवट आवडला.

जयंत कुलकर्णी's picture

23 May 2015 - 7:08 am | जयंत कुलकर्णी

शेवटी स्वतःपासून सुटका नाही......... चांगली लिहिली आहे.

अत्रन्गि पाउस's picture

23 May 2015 - 10:42 am | अत्रन्गि पाउस

+

अजया's picture

23 May 2015 - 8:38 am | अजया

संवेदनाशील मनाला स्वतःपासुन सुटका नाही.अगदी खरं.सुरेख जमलीये कथा.

सस्नेह's picture

23 May 2015 - 10:11 am | सस्नेह

कथाशैली आणि मांडणी उत्तम. आशय थेट भिडून गेला..
लिहा आणखी !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 10:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेवट आवडला. मनातली अपराधी भावना गेली ना की खुप हलकं वाटतं.

नूतन सावंत's picture

23 May 2015 - 10:44 am | नूतन सावंत

शेवट वाचल्यावर हलके वाटले.छान जमलेली नेटकी कथा.असेच लिहित राहा.पु.ले.शु.

अद्द्या's picture

23 May 2015 - 11:08 am | अद्द्या

माफी मागितली ते बरं केलं
.
डोक्यावरचं ओझं उतरलं . . सुंदर लिखाण .

पुढचा लेख वाचायला उत्सुक

नाखु's picture

23 May 2015 - 11:14 am | नाखु

विषयांतर नसलेली तरी बरेच काही सांगून जाणारी यावर एक समर्पक गाणे आपल्या कथेला दाद म्हणून.

आरसा

चुकलामाकला's picture

23 May 2015 - 3:23 pm | चुकलामाकला

क्या बात!
धन्यवाद!

इशा१२३'s picture

23 May 2015 - 12:03 pm | इशा१२३

छान जमलिये कथा....पुलेशु

अविनाश पांढरकर's picture

23 May 2015 - 12:15 pm | अविनाश पांढरकर

छान जमलिये कथा

अनुप ढेरे's picture

23 May 2015 - 12:32 pm | अनुप ढेरे

आवडली गोष्ट!

सविता००१'s picture

23 May 2015 - 12:59 pm | सविता००१

मस्त आहे कथा.
संवेदनशील मनच असं वागू शकतं.
लिहा अजून

चुकलामाकला's picture

23 May 2015 - 3:28 pm | चुकलामाकला

वेळ काढून वाचल्याबद्दल आणि मुदाम प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद!

Sanay's picture

23 May 2015 - 4:46 pm | Sanay

चान कथा आहेत

उमा @ मिपा's picture

23 May 2015 - 5:18 pm | उमा @ मिपा

आशय, लेखनशैली सगळंच अत्त्युत्तम! सच्चा माणूस कसा असतो हे दाखवणारी, सर्वार्थाने सुंदर कथा! मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद इतकं छान वाचायला दिल्याबद्दल.

चित्रगुप्त's picture

23 May 2015 - 8:25 pm | चित्रगुप्त

तपशीलाचे फरक सोडले, तर बहुधा प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात त्या विशिष्ट काळात असेच अनुभव येत असतात, मला माझी सातवी ते दहावीची वर्षे आठवली, जणू आपल्याचबद्दल हे लिहिलेले आहे, असे वाटत होते.
अत्यंत संयत शब्दात पण नेमके जे काही सांगायचे आहे ते सांगण्याची हातोटी अपणास लाभलेली आहे. अतिशय आवडले लिखाण.

बॅटमॅन's picture

24 May 2015 - 12:47 am | बॅटमॅन

अगदी असेच.

शि बि आय's picture

23 May 2015 - 11:38 pm | शि बि आय

छान हो…
लेखन अगदी स्सुरेख जमले आहे. आयुष्यात आणि त्या अनुषंगाने शरीरात होणारे बदल, घालमेल अगदी छान टिपले आहे. ह्यतेल बरेचसे चाळे अशा आडनिड्या वयातील मुले करतात.कधी त्याचा कान धरावा लागतो तर कधी न समजून सगळे सोडून द्यावे लागते.( एक मनात आले म्हणून विचारात आहे हो… उगा गैरसमज नको… हे सगळे सुचले कसे हो… म्हणजे कुठे बघून कि काय ???)

चुकलामाकला's picture

25 May 2015 - 8:12 am | चुकलामाकला

भलताच अवघड प्रश्न आहे हो .:)
शि बि आय तपासणी करावी लागेल.:)

स्पंदना's picture

24 May 2015 - 4:48 am | स्पंदना

मनाच्या डंखाला उतारा दिला कथानायकाने. त्या सांजेपासून न दिसलेला "भटाचा झिल" तिलाही जाणवला असावाच.
स्वॅप्स, रेवाक्का, बहुगुणी आणि यशोचे प्रतिसाद आवडले.
लेखन अतिशय उत्कृष्ट!

पॉइंट ब्लँक's picture

24 May 2015 - 6:28 pm | पॉइंट ब्लँक

छान लिहिली आहे. शेवट मस्त केला आहे एकदम :)

चिमिचांगा's picture

24 May 2015 - 7:29 pm | चिमिचांगा

कथा चांगली जमली आहे. अजून येऊद्या.

चुकलामाकला's picture

25 May 2015 - 8:12 am | चुकलामाकला

सर्वांनाच धन्यवाद!

अगदी सुरेख जमलीये कथा..असेच लिहीत रहा

विनिता००२'s picture

14 Apr 2017 - 11:44 am | विनिता००२

वैनी मनात घर करुन गेली. कथानायकाने माफी मागून आमच्या पण मनांवरचे ओझे उतरवले.