नक्षी

इनिगोय's picture
इनिगोय in विशेष
8 Mar 2015 - 1:41 am
महिला दिन

तिची पाठ दरवाज्याकडे होती. स्वतःच्याच तंद्रीत ती खिडकीबाहेर पाहत होती. समोरचा बगिचा आता बर्फाच्या चादरीतून बाहेर पडून उमलायला लागला होता. आता या झाडांना पानं फुटतील, मग कळ्या येतील, त्या उमलतील.. माझ्या स्वप्नांसारख्याच! तिचे विचार सुरूच होते. होय. अजूनही तिच्या मनात कळ्या, फुले, पाने, चंद्र, सूर्य, तारे असे प्रेमकवितांमधले शब्द येत असत. पांढराशुभ्र घोडा, रुबाबदार राजकुमार, गोंडस मुलंबाळं, सुंदर सजलेलं घर, नोकरचाकर या कल्पनाविश्वात रमणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग होता. जेमतेम १९ ची तर होती नेली जोनॅथन...
neli
चित्रः आनन्दिता
खिडकीतून बाहेर पाहत असतानाच ती हातातल्या भिंगाशी चाळा करत होती. तिथेच पडलेल्या नक्षीदार रुमालाने तिने भिंगाची काच स्वच्छ केली. तो रुमाल कसा विणायचा ते एमिलीने शिकवलं होतं तिला. तिच्या स्वप्नातल्या घरात असे सुंदर नक्षीचे कितीक रुमाल होते.. एमिलीला असं बरंच काही काही येत असे. सुंदर केशरचना कशी करावी, स्वतःला कसं सजवावं, चवीपरीचे केक्स कसे बनवावे.. आह! लग्नानंतर दूरच्या गावात गेलेल्या मैत्रिणीच्या विचाराने नेलीने उसासा टाकला. तिने पुन्हा भिंग हातात घेतलं आणि रुमालावरची सुबक नक्षी भिंगातून निरखायला सुरुवात केली..
त्या भिंगातून आरपार पाहतापाहता तिला एक घर दिसू लागलं. घराच्या व्हरांड्यात एक तिशीचा माणूस आरामखुर्चीत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते ते नेमकं सांगता यायचं नाही. एकाचवेळी तो वैतागलेला आणि कंटाळलेला वाटत होता. त्याच्या आजूबाजूला दोन लहान मुलं खेळत होती. खेळणं कसलं.. गोंगाटच सुरू होता. त्यांच्या आवाजाने त्रासून अखेर त्या माणसाने जोरात हाक मारली. नेलीला नीटसं ऐकू आलं नाही, पण त्या आवाजाने घरातून एक बाई बाहेर आली. तिच्या कडेवर अजून एक तान्हं मूल होतं. जराशी स्थूल दिसत होती. तिचा पोशाख, केस, चेहरा काहीच ओळखीचं वाटेना.. तिचा चेहरा मात्र नेलीला ती आरशात पाहताना दिसत असे, तसा वाटला.. खरंच की! नेलीच होती ती! मग तो माणूस? ती मुलं? ओहो...!
बाहेर येऊन तिने त्या दोघा मुलांना उगाचच रागावल्यासारखं केलं. घरकाम आटपता आटपता मध्येच बाहेर यावं लागल्याने खरंतर तिची चिडचिडच झाली. आता बाहेर आलोच आहोत तर नोकराने घोड्यांना चारापाणी केलंय का ते बघून घ्यावं म्हणून ती पागेकडे वळली. तिला तिथे जाताना पाहून त्या माणसालाही आठवलं की बग्गीची डागडुजी करायला हवीय. मनाविरुद्धच तो खुर्चीतून उठला.
कसा कोण जाणे, पण त्या घरातला तिचा दिवस न संपणारा आणि रात्र न उजाडणारी होती! सगळ्या दिवसभराला पुरून उरतील अशी मुंग्यांची रांग लागावी तशी कामं सामोरी येत असत. कितीही वेळ गेला तरी ती रांग तशीच. न संपणारी. पागेची, घोड्यांची देखरेख करत असतानाच तिला आठवलं, दोघा मुलांना औषध द्यायची वेळ झाली होती. दोघांनाही सतत सर्दी, खोकला नाहीतर पोटाची तक्रार सुरूच असे. शिवाय सगळ्यात धाकटं तर अजून रांगायलाही लागलं नव्हतं. तिला आठवलं, रात्रभर जागरण करून आता ते तिच्या खांद्यावर गाढ झोपी गेलं होतं. तिला हेही आठवलं, की असं गाढ झोपल्याला तिला कैक वर्षं होऊन गेली होती...
ती पुन्हा घरात शिरली. आत शिरताच सगळ्या घराचे एकुणेक कोपरे तिला हाका मारत आहेत, असं तिला वाटायला लागलं. दिवाणखान्यातल्या फुलदाणीतली कोमेजलेली फुलं, आतल्या खोलीतल्या मेजावर पडलेला तऱ्हेतऱ्हेचा पसारा, स्वयंपाकघरातली भांडी, मागच्या व्हरांड्यात येऊन पडलेल्या मळ्यावरच्या भाज्या, न्हाणीघरात धुऊन ठेवलेले वाळत घालायचे असलेले कपडे! निर्जीव मनाने ती तो कोलाहल ऐकत राहिली.
कडेवरचं मूल चुळबूळ करू लागलं तसं ती त्याला झोपवण्यासाठी आतल्या खोलीत गेली. तिथल्या पलंगावर त्याला ठेवून माघारी वळताना खिडकीपाशी असलेल्या मेजावर चमकणाऱ्या वस्तूने तिचं लक्ष वेधून घेतलं. भिंग.. थबकून ती तिथल्या खुर्चीवर टेकली. ते भिंग हातात घेऊन त्यातून आरपार पाहता पाहता तिला फार पूर्वी पाहिलेली एक खोली दिसू लागली...
... त्या खोलीच्या खिडकीशी बसलेली एक तरुण मुलगी अविश्वासाने तिच्याकडे पाहत होती!

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:52 pm | सविता००१

स्वप्न आणि सत्यातलं अंतर किती मस्त दाखवलंय!
छानच

अजया's picture

8 Mar 2015 - 9:10 pm | अजया

अगदी वेगळा कथाप्रकार यशस्वीपणे हाताळला आहेस,इने! खूप आवडली कथा.अप्रतिम चित्र काढलंय आनन्दिताने.

जुइ's picture

9 Mar 2015 - 2:02 am | जुइ

एक वेगळाच कथेचा प्रकार छान जमुन आला आहे. आनन्दिताने काढलेले चित्रही छान आहे!!

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 3:59 am | स्पंदना

आई ग!
वाक्य न वाक्य भिडलं इने!!
आनंदिता काय सुंदर चित्रे काढतेस ग!

आईग्ग! सुरेख कथा! असेच भिंग कितीजणींच्या खोलीत, एका कोपर्‍यात ठेवलेय हे जिने तिने तपासावे. कथेचा शेवट आला तशी धडधड वाढली होती. आनंदिताने काढलेले चित्र कथेच्या आशयाशी जुळते आहे. अगदी सुरेख!

या लेख आणि चित्रासंबंधीचा एक योगायोग आहे.आनन्दिताने तिची काही चित्र आधी दाखवली होती.त्यात हे चित्र होतं.मला फार आवडल्याने लक्षात राहिलं होतं.इनिची कथा वाचल्याक्षणी हे चित्रच डोळ्यासमोर आलं!ते मागुन घेतलंय अानन्दिताकडुन!दोन वेगळ्या माध्यमातुन एकच आशय दोघींच्या ध्यानीमनी नसताना व्यक्त होतोय!!

अगदी अगदी! चित्र पाहिल्यावर हीच की नेली.. अशीच माझीही प्रतिक्रिया झाली होती. आनन्दिताचं खरंच कौतुक.. गुणी आहे अगदी :-)

आनन्दिता's picture

12 Mar 2015 - 7:20 am | आनन्दिता

हे चित्र माझं आत्तापर्यंतचं सगळ्यात आवडतं चित्र आहे. आणि ते तुझ्या कथेत बेमालुम पणे मिसळुन गेलंय याचा मला खुप आनंद आहे.

अजया ताई ने जेव्हा मला तुझी ही कथा या चित्राच्या संदर्भात पाठवली तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्काच बसला होता, एकच एक भावना दोन वेगळ्या माध्यमातुन एकसारखी व्यक्त होणे अन ती अशी अनपेक्षित समोर येणे एक मस्त योगायोग आहे. :)

वेगळाच प्रकार सुंदर हाताळलास इनि.
म्हटलं तर रूपक म्हटलं तर वास्तव... छानंच.!!

आनन्दिता सुरेख चित्र !

आरोही's picture

9 Mar 2015 - 2:10 pm | आरोही

मस्त !! खरेच खूप वेगळ्या पद्धतीची कथा खूप सुरेखरीत्या हाताळली आहे.......आणि चित्राबद्दल काय बोलावे मी तर आनंदिताची पंखी झालेय !!!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:28 pm | प्रीत-मोहर

__/\__ हे आनंदिता च्या चित्रांसाठी.

आणि इने मस्त झालीय ग कथा.

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 2:51 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते. आनन्दिता चित्र अफाट आवडले. लेखही तेवढाच छान.

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:58 pm | सस्नेह

जमलाय. पण चित्रण जरा निगेटिव्ह वाटलं ...

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 5:03 pm | सामान्य वाचक

प्रत्येक जण थोडे फार असे जगत असेल ना?

इनि.. कथा छान जमलीये अगदी आणि चित्र तर अप्रतिम. ती मुलगी खुप आवडली मला.

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 10:00 pm | स्वाती दिनेश

वेगळी कथा शैली आवडली. चित्र कथेला फारच चपखल आहे.
स्वाती

इशा१२३'s picture

10 Mar 2015 - 8:47 am | इशा१२३

कथेचे वेगळेपण आवडले..

कथा आवडली, चित्र त्याहून आवडलं!! :)

स्पा's picture

13 Mar 2015 - 2:08 pm | स्पा

लय भारी

विशाखा पाटील's picture

14 Mar 2015 - 9:59 am | विशाखा पाटील

पुन्हापुन्हा वाचावं असं हे रूपक आहे. प्रत्येकवेळी नवा पदर उलगडतो. अशा अनेक नेली आपल्या अवतीभवती वावरतात. अगदी स्वत:तही.
नेलीचं चित्रही खूपच छान.

पद्मश्री चित्रे's picture

14 Mar 2015 - 11:36 am | पद्मश्री चित्रे

शैली .आवडली कथा .चित्र पण सुंदर.अगदी समर्पक.

पलाश's picture

14 Mar 2015 - 2:30 pm | पलाश

कथा आवडली.

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 1:17 am | उमा @ मिपा

अतिशय आवडलं. मनाला स्पर्श करणारी कथा. अभिनंदन इनि!
आनंदिता, सुरेख चित्र! अभिनंदन!
कोणतं स्वप्न न कोणतं सत्य, इकडून तिकडे पाहताना तिकडच्याबद्दलची आतुरता, हुरहूर.
भिंगाशी चाळा करताना, रुमाल, एमिलीची आठवण, स्वप्नातलं घर, अगदी असच धागे जोडत असतं मन.
"आत शिरताच सगळ्या घराचे एकुणेक कोपरे तिला हाका मारत आहेत, असं तिला वाटायला लागलं." - या हाकांमध्ये स्वतःचाच आवाज विसरायला होतो.
नेली आहे इथेच माझ्यात, माझ्या आजूबाजूच्या कितीतरी जणींमध्ये.

इनिगोय's picture

16 Mar 2015 - 1:06 pm | इनिगोय

:-)
यापुढे ती काय करेल असाही विचार करून पहा!

कौशिकी०२५'s picture

15 Mar 2015 - 1:49 pm | कौशिकी०२५

लेख आणि चित्रं दोन्ही सुन्दर..दोन्ही मितीतले दृष्टिकोन अगदीच चपखल उतरले आहेत इनिताई.

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:35 pm | मनुराणी

कथा आवडली.

पिशी अबोली's picture

16 Mar 2015 - 3:22 pm | पिशी अबोली

वेगळीच आणि छान वाटली ललित कम कथा..

पैसा's picture

16 Mar 2015 - 11:12 pm | पैसा

अप्रतिम जमलेली कथा! अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यात असं वास्तव काय अन आभास काय याचा निर्णय कोणाला करता येत असेल असं वाटत नाही!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 11:13 am | अत्रुप्त आत्मा

चित्रकथा आणि कथाचित्र...दोन्ही आवडले. :)

================
समांतरः- आणि (दुत्त दुत्त ;) )आ..नंन्दिताला अशी विनंती, की अत्ता पर्यंत काढलेल्या चित्रांचा एक वेगळा धागा काढण्याचे करावे(च).

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्र आणि नेलीची चित्रवत् कथा दोन्ही आवडले !

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2015 - 5:41 pm | नगरीनिरंजन

छान कथा. पात्रांची नावं, घोड्यांची पागा वगैरे उल्लेख वाचून अनुवादित कथा वाचल्यासारखी भावना झाली.

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2015 - 6:25 pm | पिलीयन रायडर

कन्सेप्ट फार आवडली मला.. छोटीशी पण पॉवरफुल आहे कथा!

आणि आनंदिता बाईंच चित्र म्हणजे __/\__
सुरेख!!!

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:50 pm | कविता१९७८

छान कथा , मस्त चिञ

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:50 pm | कविता१९७८

छान कथा , मस्त चिञ

अंतरा आनंद's picture

20 Mar 2015 - 2:33 pm | अंतरा आनंद

क्या बात है. काळातला फरक खुप सुरेख दाखवलाय. खरच किती स्वप्न असतात ना लहान असताना.
एकदा काही नुकत्या कॉलेजमध्ये जायला लागलेल्या मुलींना बोलताना ऐकलं की "शी, रोज नउ ते पाच जॉब मला नाही आवडणार." तेव्हा आठवलं आपणही हेच म्हणायचो.

प्रतिसादाला जरा वेळ झाला … पण अप्रतिम चित्र गं आनंदिता आणि फार तरल लेख इनिगोय …

स्मिता श्रीपाद's picture

24 Mar 2015 - 11:02 am | स्मिता श्रीपाद

अरेच्चा हे कसं वाचायचं राहिलं माझ्याकडुन..
खुप गोड चित्र आणि कथा प्रकार सुरेख....

स्वाती२'s picture

24 Mar 2015 - 11:40 pm | स्वाती२

कथा फार आवडली. आनंदिताचे चित्र देखील सुरेख आहे.

जव्हेरगंज's picture

2 Sep 2016 - 10:19 pm | जव्हेरगंज

ती भिंगाची आयड्या भारीच!

योगायोगंच आहे मी पण अशीच एक आयड्या वापरली होती.

इथे. http://www.misalpav.com/node/33014

रातराणी's picture

2 Sep 2016 - 11:50 pm | रातराणी

सुरेख!

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2022 - 5:40 pm | चौथा कोनाडा

नेली आणि एमिलीची सुंदर कथा.
भिंगा पलीकडचे जग सुंदर टिपलंय !

💖

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !