मातृभाषेची सेवा

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 2:19 pm

आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो. सगळ्या भाषा अापण शिकू शकत नाही पण मातृभाषेव्यतिरिक्त कमीत कमी जागतिक ज्ञानभाषा, जेथे राहतो तेथील राष्ट्रभाषा, ज्या राज्यात आपण राहतो तेथील राज्यभाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे.

भाषासाहित्यिकविचार

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Mar 2015 - 2:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी योग्य बोललास रे निमिषा.खरे तर प्रत्येक भारतियास २ ते ४ भारतिय भाषा अवगत असल्या पाहिजेत असे दुर्गाबाई भागव्तांनीही म्हंटले आहे.

स्पा's picture

2 Mar 2015 - 2:57 pm | स्पा

ओके

अत्रन्गि पाउस's picture

2 Mar 2015 - 3:25 pm | अत्रन्गि पाउस

ज्ञानभाषा झाल्याशिवाय कोणत्याही भाषेला उज्ज्वल भवितव्य नाही एखादी बोली /दुय्यम भाषा म्हणूनच तिचे अस्तित्व राहील .

युरोपातील जवळपास सगळेच देश आपापली भाषा ज्ञानभाषा म्हणून वापरतात ... इंग्रजी हि किमान संभाषणासाठी जरुरीपुरतीच ...आणि त्यांचा गाडा नीट चालू आहे

अर्थात आपल्याकडे हे सगळे समजणे आणि समजून वागणे हाच एक झोल आहे ...

राही's picture

2 Mar 2015 - 5:14 pm | राही

एक अगदी पायास्वरूप म्हणजे मुळातले तत्त्व असे की धनिक श्रेष्ठींची चाकरी आणि अनुकरण करण्यात इतर लोक धन्यता मानतात. त्यांची भाषा, वागणे, संस्कृती ही फॅशन म्हणून किंवा सोयीची म्हणून स्वीकारतात. त्यांच्यासाठी आपल्या स्वतःच्या वागण्या-बोलण्यात बदल करतात. ह्याचे ठळक उदाहरण म्हणजे गुजराती भाषा. अगदी विज़ासाठीची मुलाखतही गुजराती लोकांना गुजरातीतून देण्याची सोय आहे. शेअर बाज़ारात सर्वत्र गुजरातीच चालते. वाहिन्यांवर भले इंग्लिशमधून विश्लेषण असो पण सगळे व्यवहार गुजरातीतून होतात.
किंवा, मराठी लोक प्रवासी, टूरिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दुकानदार आणि फेरीवाले मोडक्यातोडक्या मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करतात. हे कश्मीरमध्ये विशेषकरून जाणवले.
तेव्हा आपली क्रयशक्ती महत्त्वाची. नुसते कागदी ठराव करून किंवा भाषादिन साजरे करून किंवा जबरदस्तीने दुकानांच्या पाट्या बदलून किंवा अगदी सरकारी पाठिंब्यानेही भाषेची महती वाढत नसते. मग ती अभिजात ठरो वा न ठरो.
भाषा ही पुस्तकांत न राहाता लोकव्यवहारात उतरली पाहिजे, जशी मराठी भाषा अठराव्या शतकात होती. म्हणजेच लोकव्यवहारांचा वेग आणि परीघ वाढला पाहिजे, लोकांमध्ये उद्यमशीलता, स्थलांतर, देशांतर वाढले पाहिजे. याही बाबतीत गुजरात्यांचे उदाहरण समर्पक ठरेल. त्यांचा डायास्पोरा जबरदस्त आहे. पाचही खंडांत आहे, अमेरिका-आफ्रिकेमध्ये आहेच आहे, अगदी चीनमध्येही आहे. सिंधी लोकांचाही डायस्पोरा आहे पण त्यांचा स्वतःचा असा प्रांतच नसल्यामुळे तो प्रभावशाली वाटत नाही. त्यामुळे त्यांची भाषावृद्धी झाली नाही. पण आता कच्छमध्ये त्यांचे एक सांस्कृतिक केंद्र उभे राहाते आहे. त्याचे उद्दिष्ट जगभरच्या सिंधी बांधवांना एक संस्कृती आणि भाषाकेंद्र निर्माण करणे हे आहे.
माझा मुद्दा हा आहे की अमुक भाषेत किती पुस्तके प्रसिद्ध झाली हा मापदंड नसून त्या भाषेचे प्रभावक्षेत्र किती दूरवर पसरले आहे, इतर भाषक गटांना तिची कितपत ओळख-पहचान-आदर-कुतूहल आहे हा आहे. आणि ही ओळख आणि आदर ही आर्थिक समृद्धीतूनच येऊ शकते. राज्यविस्तारातून येऊ शकत असे, पण सध्याच्या काळात ते शक्य नाही.