सागरी सुका मेवा (लेखासहीत)

जागु's picture
जागु in पाककृती
18 Feb 2015 - 1:00 pm

डोक्यावर टोपली, हातात एक हिरवा पाला असलेली छोटीशी फांदी, पायात कधी चप्पल नाहीतर अनवाणी, कोळी पद्धतीचे काष्टी पातळ नेसलेली आणि कानात मोठ्या गाठ्या प्रमाणे म्हणा की मोठ्या कोलंबीप्रमाणे असलेले कानातले, त्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत कानाच्या पाळीला पडलेले होलामुळे कानाच्या पाळीसकट लोंबणारे तिचे गाठी कानातले अशी रूप असलेली एक कोळीण आजी माझ्या आजीची मैत्रीण होती. महिना दोन महिन्याने तिची वारी आजीला भेटण्यासाठी आमच्या घरी असायचीच. उरणच्या करंजा गावातून ती आमच्या उरणच्या नागांव ह्या गावात जवळ जवळ दीड तास चालून यायची. आली की हॉलमध्ये टोपली उतरवायची मग आई चहा-पाणी वगैरे आणून द्यायची ते घेत आजी आणि ती गप्पा मारत बसायच्या. त्यांच्या गप्पा चालू असायच्या तेव्हा मात्र माझी नजर जायची ती त्या कोळीण आजीच्या टोपलीत. टोपलीत एक रास असायची व जवळ गेले की त्याला एक कुबटसा वास यायचा. त्या वासाच्या दिशेने टोपलीत डोकावले की दृष्टीस पडायचे ते सुके मासे, कधी जवळा, करंदी (अंबाड), वाकट्या कधी बोंबील, टेंगळी, बांगडे. ह्या टोपलीतील काही भाग ती आजीला चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून द्यायची. इथूनच मला सुक्या माश्यांची ओळख होऊ लागली.

ही आजीची मैत्रीण सुक्या माश्यांच्या बदल्यात काही मोबदला घ्यायची नाही. माझी आजी कधी कधी जबरदस्तीने तिला पैसे हातात द्यायची पण ती आजीच लक्ष नसताना हळूच पुन्हा आम्हाला दिलेल्या जवळ्याच्या राशीत ते पैसे लपवून ठेवायची. संध्याकाळी जेव्हा आई हा जवळा डब्यात भरायला जायची तेव्हा तिला ते पैसे जवळ्यात दिसायचे. मला मात्र हे पाहून खूप गंमत वाटायची. आपल्याला गोष्टीत ऐकल्या प्रमाणे धनलाभ झालाय किंवा खजिना सापडलाय असे वाटायचे. नंतर आजी तिला पैसे न देता मळ्यांतली वांगी, टोमॅटो वगैरे भाजी तिच्या टोपलीत देऊ लागली. पूर्वीचे मैत्रीचे व्यवहार बहुतेक अश्याच देवाण-घेवाणीवर चालायचे. अजूनही सुक्या माश्यांच्या भेटी आप्तांना देण्याची परंपरा काही प्रमाणात चालू आहे. माझ्या घरी पण सुके मासे भेट येतात. जास्त असले की आम्ही पण इतरांना भेट म्हणून देतो. स्नेहसंबंध वाढवण्यास ह्या सुक्या माश्यांचाही हातभार लागतो तर.

हे मासे कसे काय टिकून राहतात, कसे सुकवतात ह्या बद्दल नेहमीच कुतूहल वाटायचं. उरणमध्ये मोरा व करंजा येथे मोठ्या प्रमाणात मासेमारीचा धंदा होतो. करंजा गावात आजीचे नातलग राहत होते. आजीबरोबर त्यांना भेटायला जाताना करंजा जेट्टी वर व बर्‍याच कोळी बांधवांच्या दारासमोर सुके मासे वाळताना दिसायचे. तेव्हा ओल्या माश्यांना मीठ लावून ते खडखडीत वाळवले जातात हे समजू लागले. वाकट्या बोंबील तर पताका सजवल्याप्रमाणे दोरीवर एकाच आकारात व अंतरावर वाळवत असल्याने सुशोभित दिसायचे.

सुकत लावलेले बोंबील

सुकवलेले बोंबील

वाकट्या

सुक्या माशाचा कचरा म्हणजे टाकाऊ खराब झालेले मासे, त्यांचा कोंडा वगैरे झाडांसाठी खत म्हणून वापरता येतो. लहानपणी आमच्याकडे वडील खतासाठी म्हणून खास जुना झालेला जवळा किंवा टाकाऊ सुक्या माश्यांचे खत वाडीतील लागवडीसाठी मागवायचे.

सुक्या माशांमध्ये जास्त करून जवळा, करंदी (अंबाड), सोडे (सालं काढलेली कोलंबी), बोंबील, टेंगळी, बांगडे, घोळीच्या तुकड्या, वाकट्या, माकुल, पापलेट, कोलीमच्य पेंडी (वड्या) यांचा जास्त समावेश असतो. पूर्वी सोड्यांच्या पण साबुदाण्याच्या चिकवड्यांप्रमाणे वड्या मिळायच्या पण हल्ली त्या नामशेष झाल्यासारख्या वाटतात. सुटे सोडेच दिसून येतात.

बहुतेक सगळ्याच मांसाहारी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास डबा केलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा खडखडीत वाळवून ठेवले की अजून चांगले टिकतात. जवळ जवळ ४-५ महिने सुके मासे चांगल्या स्थितीत राहतात. बर्‍याचदा आणीबाणीच्या प्रसंगी म्हणजे जेव्हा भांग येते म्हणजे समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.

बर्‍याच ठिकाणी म्हणजे जिथे समुद्र किनारे नाहीत, मासे मिळत नाहीत अशा ठिकाणच्या मांसाहारी व्यक्तींसाठीही सुके मासे हे एक चविष्ट वरदान आहे. कारण समुद्रकिनार्‍या लगतच्या भागातून मासे नेऊन ते त्यांच्याइथे साठवण करू शकतात व हवे तेव्हा त्याचे सुग्रास जेवण बनवू शकतात. भारता बाहेर जाणारे कित्येक मांसाहारी भारतवासी हे माहेरचा आहेर असल्याप्रमाणे सुके मासे पॅक करून नेतात. मांसाहारी कुटुंब लांबच्या प्रवासाला जातानाही सुक्या मच्छीची टिकाऊ चटणी वगैरे सोबत घेऊन जातात.

सुक्या माशाच्या काही जुन्या आठवणी आजही जिभेवर रुची आणतात. लहानपणी बहुतेक मला व भावाला रोजचा नाश्ता हा चुलीत भाजलेले मासे आणि भाकरी असायचा. आजी सकाळीच गरमागरम भाकर्‍या चुलीवर करायची आणि त्याच चुलीच्या निखार्‍यावर वाकटी, बोंबील, कोलीमच्या पेंडी भाजत ठेवायची. भाजताना त्यांचा खरपूस वास यायचा त्यामुळे कधी एकदा तोंडात टाकतेय असे व्हायचे. भाजून झाले की चुलीतून बाहेर काढून त्यातली राख काढण्यासाठी ते थोडे वरच्या वर ठोकायचे म्हणजे त्यातली राख निघून जायची. ह्या बोंबील किंवा वाकटीचा तुकडा कटकन तोडून गरमा गरम भाकरी बरोबर खाण्यातला आनंद काही औरच. त्यात सुका बांगडा हा प्रकार असा असायचा की तो कोणाच्या घरी भाजला आहे हे कळावे अशा प्रकारे वास यायचा. गावात जवळपास कुठे भाजला असेल तरी तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहायचे नाही व कधी एकदा आपल्या कडे तो बांगडा आई-आजी कडे भाजून मागतेय असे व्हायचे. बांगडा हा इतका खारवलेला असतो की त्याचा एक इंचाएवढा तुकडा पण आख्ख्या भाकरीला पुरतो. चिमूटभर भाजलेल्या बांगड्याचा तुकडा भाकरीला लावून खाताना सुखावून जायला होत.

त्या काळी सुके मासे इतके स्वच्छ असायचे की जवळा वगैरे न धुवता डायरेक्ट आई-आजी भाकरी केलेल्या तव्यात टाकून खरपूस भाजून द्यायचा. हा जवळा भाकरी बरोबर नुसता खाताना कुरकुरीत व चविष्ट लागायचा.

भातुकली खेळतानाही आम्ही सुक्या माश्यांचा वापर करायचो. त्यात जास्त जवळा किंवा करंदीचे कालवण असायचे. करण्याचा सराव नसल्याने बरेचदा हे कालवण जास्त पाण्यामुळे पचपचीत व्हायचे. पण चुलीवर स्वकष्टाने केलेल्या त्या कालवणाला गरमा गरम भाता बरोबर खाताना वेगळीच गोडी यायची.

सुकी करंदी/अंबाड

लग्नसमारंभात हळदीच्या दिवशी जवळा हा प्रकार पारंपारीक रित्या केला जातो. लग्नाच्या दिवसाच्या १५ दिवस आधी जवळा आणून साफ करून ठेवला जातो. हळदीच्या दिवशी जवळा करण्यासाठी मोठं पातेलं चुलीवर चढवलं जात. जवळ्या मध्ये वांग घातलं जात. ह्या जवळा वांग्याची चव मटणाच्या चवीलाही शह देणारी ठरते. काही ठिकाणी रुखवतीतही सुक्या माश्याच्या छोट्या टोपल्या पॅक करून दिलेल्याही मी पाहिल्या आहेत.

सुका जवळा

कोंकण किनार्‍या लगतच्या गावांमध्ये सुक्या माशांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जातो. ओले मासे सुकवून ते वजनावर दिले जाते. जसजसे मासे जास्त सुकत जातात तसे त्यांचे वजनही कमी होत जाते. त्याचा परिणाम निश्चितच व्यवसायातील नफा-तोट्यावर पडत असतो.आजकाल लागणार्‍या बर्‍याच प्रदर्शना मध्ये खास करून कोंकण मोहोत्सव, आगरी-कोळी मोहोत्सवात सुक्या माशांचे स्टॉल्स लावलेले असतात. लघुउद्योग म्हणून काही ठिकाणी सुक्या माशांच्या पदार्थांच्या टपर्‍याही पोळी-भाजी केंद्रा प्रमाणे चालू झाल्या आहेत.

तर असा आहे सुक्या माश्यांचा महिमा. दिसायला अगदी क्षुल्लक पण अडीअडचणीत साथ देणारा, स्नेह जुळवणारा, रोजगाराचे साधन असणारा, रुचीरसाचा आनंद देणारा.

आता आपण सुक्या माशांच्या काही रेसिपीज पाहू. सुक्या माश्यांचे प्रकार करण्याची पद्धत साधारण सारखीच असते. कालवणाची चव प्रत्येक माश्यानुसार वेगवेगळी असते. सुक्या माश्यांत मीठ घालताना नेहमीपेक्षा कमीच घालावे कारण खारवलेले असल्याने ते आधीच खारट असतात.

बोंबील, वाखटी, करंदी, अंबाड, सोडे, घोळीच्या तुकड्या, माकुल, पापलेट अश्या माशांसाठी रेसिपी खालील प्रमाणे.

साहित्य
१) सुके मासे
२) दोन मध्यम कांदे बारीक चिरून
३) ५-६ पाकळ्या लसूण ठेचून.
४) पाव चमचा हिंग
५) अर्धा चमचा हळद
६) दीड ते दोन चमचे रोजच्या वापरातला मसाला किंवा आवडीनुसार लाल तिखट
७) मोठ्या लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
८) २ चमचे तांदळाचे पीठ
९) मीठ
१०) थोडी चिरलेली कोथिंबीर
११) १-२ हिरव्या मिरच्या.
१२) दोन छोट्या पळ्या तेल

पाककृती :
बोंबील, वाकट्या असतील तर त्यांचे डोके, शेपटी काढून बोटा एवढे किंवा आवडीनुसार तुकडे करून घ्या. करंदी (अंबाड असेल तर त्याचा डोक्या कडचा टोकेरी भाग व शेपूट काढा. घोळीच्या तुकड्यांना खवले असतील तर ती काढून टाका.
जो प्रकार करायचा आहे त्या साफ केलेले मासे मासे दोन-तीन पाण्यांतून धुऊन घ्या. जर माखल्या असतील तर त्या १५ मिनिटे गरम पाण्यात ठेवून त्याला लागलेले काळे वगैरे काढून टाका आणि साफ केलेले माखल्यांचे तुकडे धुऊन घ्या.

आता पातेल्यात तेलावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा. कांदा शिजला की त्यात हिंग, हळद, मसाला घाला. थोडे परतून गरजे एवढे पाणी घाला. आता जो हवा तो सुक्या माशाचा प्रकार घाला. एक उकळी आली की त्यात चिंचेचा कोळ घाला. तांदळाचे पीठ थोड्या पाण्यात मिक्स करून पातळ करून रश्शात सोडा. तांदळाचे पीठ दाटपणा येण्यासाठी घालतात. थोड्या प्रमाणात कालवण करायचे असेल तर नाही घातले तरी चालते. गरजे नुसार मीठ घाला. थोडावेळ रस्सा उकळू द्या. वरून कोथिंबीर आणि हिरवी मिरची मोडून घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा.

सुक्या घोळीच्या तुकड्या

रस्सा

माकुल शिजायला मात्र वेळ लागतो. साधारण पाऊण ते १ तास. बाकी सुके मासे १०-१५ मिनिटांत शिजतात.
कोणत्याही सुक्या माश्याच्या कालवणात वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग ह्या पैकी काही घातल्यास रश्शाला अजून चव येते व पुरवठ्यालाही होते. हे घालताना सुके मासे घालतो तेव्हाच घालायचे. कैर्‍यांच्या सीझन मध्ये कैरी घालता येते. मग चिंच नाही घातली तरी चालते किंवा कमी प्रमाणात घालायची.

गरमा गरम भात आणि सुक्या माशाचा रस्सा म्हणजे मस्त मेजवानी असते.

जवळा, करंदी (अंबाड), बोंबील, सोडे, टेंगळी सुकट अशा प्रकारच्या सुक्या माश्यांचे कांद्यावरचे सुके खालील प्रमाणे.

१) वरील पैकी हवे असलेल्या सुक्या माशाचा एखादा प्रकार
२) २ कांदे चिरून
३) २ ते ३ छोट्या पळ्या तेल
४) पाव चमचा हिंग
५) अर्धा चमचा हळद
६) १ ते २ चमचे मसाला
७) चवीपुरते मीठ (कमीच घालावे कारण सुका जवळा खारट असतो)
८) १ मिरची
९) थोडी कोथिंबीर चिरून
१०) कोकम ३-४ किंवा टोमॅटो १ किंवा थोडा चिंचेचा कोळ.

प्रथम सुक्या माशाचा प्रकार चांगला २ ते ३ पाण्यांतून धुऊन घ्यावा. भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत तळावा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून सुक्या माशाचा प्रकार घालावा. थोडे पाणी घालावे किंवा वाफेवर शिजवला तरी चालतो. मध्ये मध्ये ढवळावे. १० मिनिटांनी ढवळून त्यात मीठ, मिरची, कोकम किंवा किंवा चिंचेचा कोळ किंवा टोमॅटो घालावे. परत थोडावेळ वाफ आणावी. आता त्यात कोथिंबीर घालावी व २ मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा.

ह्या प्रकारातही वांगे खास करून जवळा वांगे, बोंबील बटाटा असे कॉम्बिनेशन चांगले लागते. तसेच शेवग्याच्या शेंगाही चविष्ट लागतात.

सुक्या माशांची चटणी एकदा खाल्ली की दुसर्‍या वेळेस नाव काढल्यानेही तोंडाला पाणी सुटते. खास करून जवळा, करंदी (अंबाड) आणि बोंबील यांची चटणी केली जाते.

साहित्य
१) वरील पैकी एक सुक्या माशाचा प्रकार १ वाटी (बोंबील असल्यास तुकडे करून)
२) गरजे नुसार मिरची किंवा मिरची पूड
३) ७-८ पाकळ्या लसूण
४) थोडेसे मीठ

सुके मासे मध्यम आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या.थंड झाले की वरील बाकीचे जिन्नस एकत्र मिस्करमध्ये वाटून घ्या.

वरील चटणी पुन्हा कांद्या वर परतून त्याचा एक चविष्ट प्रकार करता येतो. त्यात थोडा चिंचेचा कोळ आणि चिरलेली कोथिंबीर घालायची.

निखारे करता येण्यासारखे असतील तर निखार्‍यावर बांगडा, बोंबील, वाकटी असे प्रकार भाजून वासाने घरभर भूक चाळवता येते.

मालवणी पद्धतीनेही सुक्या माश्यांचे बरेच चविष्ट प्रकार करता येतात.

वरील लेख ऑगस्ट २०१४ च्या माहेर -अन्नपूर्णा अंकात प्रकाशीत झालेला आहे.

प्रतिक्रिया

इरसाल's picture

18 Feb 2015 - 1:14 pm | इरसाल

मी हा धागा बघितलाच नाय !

मासेखाऊ असूनही आणि अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करुनही सुक्या माश्यांच्या कोणत्याही प्रकाराशी जुळवून घेता आलेले नसल्याने चवीविषयी जास्त बोलता येत नाही पण माहिती अत्यंत इंटरेस्टिंग आहे.

त्यातल्यात्यात किसमूर या प्रकारात सुके प्रॉन्स (बहुधा) टाकलेले होते ते खाऊ शकलो.

एरवी सुक्या मासळीच्या पदार्थांचा वास बराच उग्र असतो. अर्थात त्याची सवय झाल्यावर तो आवडतही असेल हे मान्यच आहे.

लेख आवडला.

मदनबाण's picture

18 Feb 2015 - 2:39 pm | मदनबाण

नविन माहिती मिळते आहे... परंतु मांसाहारी नसल्याने याचा काहीच अनुभव नाही. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

प्रचेतस's picture

18 Feb 2015 - 5:05 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2015 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

कोकण भागात अजोळ असल्यानी आणि व्यवसायानिमित्तहि तिकडे भरपूर फिरल्यानी हा सगळा नजारा अनेकदा पाहिला आहे.

माहिती छान दिली आहे. फोटोहि .

समांतरः-दुसर्‍या फोटूतल्या बोंबलाच्या(बांधलेल्या..)गड्ड्या,आमच्या समिधांच्या गड्ड्यांसारख्या दिसत आहेत. *mosking*

गवि's picture

18 Feb 2015 - 3:13 pm | गवि

-दुसर्‍या फोटूतल्या बोंबलाच्या(बांधलेल्या..)गड्ड्या,आमच्या समिधांच्या गड्ड्यांसारख्या दिसत आहेत.

..कुणकेश्वरा!! व्याडेश्वरा..!! विश्वेश्वरा..!!..धूतपापेश्वरा.!!!!

तुमच्या समांतर वाक्यावर प्रचंड हसले. कल्पनाही करू शकत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2015 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

@.कुणकेश्वरा!! व्याडेश्वरा..!! विश्वेश्वरा..!!..धूतपापेश्वरा.!!!!>>> =)))))

@तुमच्या समांतर वाक्यावर प्रचंड हसले. कल्पनाही करू शकत नाही. >> खर्रच! थांबा फोटू टाकतो शोधुन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2015 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसर्‍या फोटूतल्या बोंबलाच्या(बांधलेल्या..)गड्ड्या,आमच्या समिधांच्या गड्ड्यांसारख्या दिसत आहेत.

तसंच आहे ते ! त्या समिधा आम्ही अग्निवर ठेवतो आणि खरपूस भाजून झाल्या की मग मनोमनी अग्निरूप धारण करून त्या स्वाहा करतो... आणि प्रसन्न होऊन अन्नदेवतेला शुभाशिर्वाद देतो :)

जागु's picture

19 Feb 2015 - 10:39 am | जागु

वा, क्या प्रतिसाद है !

सौंदाळा's picture

18 Feb 2015 - 3:24 pm | सौंदाळा

वाह
खरं तर रेसिपीपेक्षा तुमचे लहानपणचे अनुभव आणि वर्णन जास्त आवडले.
अजुन रेसिपी येऊ द्यात
(दिघीच्या आणि वरसोलीच्या सोड्यांचा कर्दनकाळ) सौंदाळा

कपिलमुनी's picture

18 Feb 2015 - 6:23 pm | कपिलमुनी

लेख आवडला . वासाशी जमत नसल्याने या पासून लांब असतो !

यातही सोडे हा आवडता प्रकार ! सोडे घालून केलेला भात / पुलाव / खिचडी प्रचंड आवडते.

..मांजरांचा जीव की प्राण ही सर्व प्रकारची सुकी मासळी.
..घेऊन अंगणात पाऊल टाकलं तरी बाणासारखी वेगाने मांजर पायात येऊन घासणीप्रमाणे तीव्रतेने अंग घासून
" म्या आ आ आं व..." ..अशी अखंड तारसप्तकी मागणी चालू होई.

रेवती's picture

18 Feb 2015 - 8:15 pm | रेवती

माहिती आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2015 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

समुद्राच्या वाळवलेल्या फळांचा नेहमीच चवीने आस्वाद घेत असल्याने लेख आणि फोटो लै आवल्डे :)

सानिकास्वप्निल's picture

18 Feb 2015 - 9:42 pm | सानिकास्वप्निल

वाह! सुकी मच्छी बघून तोंपासु :)
लेख छान लिहिला आहे.

मला घोळीचे खारं खूप आवडतं आमच्याकडे त्याचे वांगे-बटाटा घालून कालवण करतात.... भन्नाट लागतं.
जवळा भरुन वांगी, सोड्याचे कालवण, सोडे-दूधी कालवण, सुकट घालून कांद्याची पात, सुक्या बोंबिलाची चटणी, मुळा- बोंबिल, कांदा-बोंबिल्/जवळा, तोंडी लावायला भाजलेला बोंबिल, जवळ्याची कोशिबीर असे भाकरीबरोबर अहाहा!

आज काहीतरी बनवावेच लागणार आता.....

मुक्त विहारि's picture

18 Feb 2015 - 10:26 pm | मुक्त विहारि

आठवतात ते मोरपंखी कॉलेजचे दिवस.

आमचा एक मित्र कोळीच होता.

त्यामुळे मनसोक्त सुकट्,जवळा आणि बोंबील खाल्ले आणि सोबत तांदूळाची भाकरी.

मुक्त विहारि's picture

18 Feb 2015 - 10:26 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 10:51 pm | पिवळा डांबिस

काय अफलातून लेख आणि फोटो आहेत!!!
आजवरच्या जागुच्याच काय पण सगळ्या खादाडीविषयींच्या लेखामध्ये हा एक सर्वोत्कृष्ट लेख!!!
त्या सफेद जवळ्याच्या फोटोने तर काळजात कळ मारली!!! अहाहा!!

पिवळा जवळा, बोंबीलकाड्या, करंदी, सोडे (आणि कधीमधी बांगडे) घरात नेहमी असतात. पण सफेद जवळा गेल्या कित्येक वर्षात खाल्ला नाही!!
जागु, पुढल्या ट्रीपला तुझ्याकडे भेट नक्की!!! :)
स्वागत करशील ना, बाये?

जागु's picture

19 Feb 2015 - 10:42 am | जागु

हो नक्कीच.

:(
पण असे लज्जतदार लेख वाचुन ति रुखरुख राहात नाहि मग :)

मयुरा गुप्ते's picture

19 Feb 2015 - 4:32 am | मयुरा गुप्ते

आईग्गं....

खतरनाक फोटोज, अप्रतिम..शब्दच संपले.
दिल के तार छेडें..

-मयुरा.

निव्वळ अशक्य फोटू आणि लेख!

राही's picture

19 Feb 2015 - 9:58 am | राही

निव्वळ अशक्य प्रतिसाद.
म्हणला/म्हणलो तुका झाले माका. (हे बरोबर आहे काय? तुका काही-बाही म्हणाला आणि ते थेट मलाच लागू झाले किंवा ते माझ्याच पथ्यावर पडले असे म्हणायचे होते.)
बाकी लेख तर सुंदरच आहे. जागूच्या सर्व लेखांसारखाच.

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 10:25 am | पिवळा डांबिस

तुका म्हणे सर्व मासीं, सुके घालावे आम्हांसी!

अगदी, अगदी!

मत्स्याहारी दशा, उन्मनी असावी,
उपाधी नसावी, अंतर्बाही |
लोलुपता काय, मत्स्याते जिणावे,
भोजन करावे, अपरिमित ||
:)

राही's picture

19 Feb 2015 - 10:39 am | राही

आता अश्या प्रतिसादांचे करावे तरी काय?
करावे आणि वांग्यात भरावे, वगैरे म्हणी आठवू लागल्या आहेत.
अय्यय्या, करूं मैं क्या, सुक्के सुक्के !

राही's picture

19 Feb 2015 - 10:47 am | राही

या सुक्यांनो या.
सुके आले माझ्या दारी मज काय कमी या संसारी.
सुके हे अमृत झाले, सुके स्वर्गीचे आले.

आता शुक शुक ऐवजी सुक सुक असा हाकारा द्यायला हरकत नाही.
हा लेख म्हणजे दुबईतल्या सूक प्रमाणे मिसळपावचा माशांचा सूकच आहे.

बापरे सुक्यावरही अशा रचना होऊ शकतात? फक्त मिपावरच. जय मिपाकर. :smile:

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 11:55 am | पिवळा डांबिस

"जरी खंडकाव्ये घडती लुकड्या पोरींवरती,
तरी का न घडावी ती सुकड्या मोरीवरती?" :)

जागु, या सगळ्या उत्सवात सुकी मोरी राहिली की गो!!!!

(ज्येंना ठावं नाय तेंच्यासाठी; मोरी = शार्क मासा)

अनुप ढेरे's picture

19 Feb 2015 - 12:04 pm | अनुप ढेरे

सुकी मोरी

आयला, शार्क सारख्या टर्रेबाज माश्याला असं वाळत टाकतात दोरीवर... आवरा !!

मला अजून मोरी/शार्क टेस्ट करायचा आहे.

वेटिंग लिस्ट वर आहेत काही मासे.

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2015 - 2:07 am | पिवळा डांबिस

मला अजून मोरी/शार्क टेस्ट करायचा आहे.

कर, कर. आधी ताज्या मोरीचं सुकं ट्राय कर. सुक्या मटणासारखंच पण त्याला मोरीची एक आगळीच चव असते!
मग सुक्या मोरीचं कालवण ट्राय कर!
(पूर्वी खारदांडा आणि वेसाव्याला काय मस्त मोर्‍या मिळायच्या!)

मोरीचं मटण उत्तमच. अजून बनवलं नाहीस?

भरपूर गरम मसाला लावून वेंगुर्ल्यात मिळालं होतं त्यातला मसाल्याचा अतिरेक आवडला नाही.

शिवाय मोरी फार मोठी असेल तर मोठी हाडकेच येतात मधेमधे. त्यामुळे खाताना मासा वाटतच नाही. मटणच वाटतं.

गोव्यात काही ठिकाणी घरगुती बनवून खिलवलेलं फार जास्त चवदार वाटलं.

हो आता नक्कीच आणेन हा मासा. मी अस ऐकल आहे की हॉटेलवाले चिकन लॉलीपॉपलाही मोरी माशाच मांस लावतात.

राही's picture

19 Feb 2015 - 10:52 am | राही

एका सुक्यापोटी | छळ कोटी कोटी ||

बोंबील या प्रकाराशी आमच कधीच नाही जुळलं. :(
इअतक चविष्ट असत म्हणुन सांगतात लोकं,पण हाय राम त्यातले काटे काढण्याचा इतका नाद लागलाय की खाउच नाही शकत. तसेही आम्ही मटण जास्त खाणारे, मासे आमच्याकडे जरा कमीच. पण सुरमाई आणि बांगडा (ओला आणि सुक्का दोन्ही) अतिशय आवडीचा. सुक्या बांगड्याचे तिकल म्हनुन एक चटनीचा प्रकार असतो घरी अतिशय चविष्ट!! आणि सुरमाई हलकीच भाजून मग पाण्यात भिजवुन सगळी वाळू निघालीय ना हे पाहूनच मग भरमसाट कांद्यात बनवली जाते.
जवळा किंवा करण्दी म्हणजे झिंगा असावा. हा सुद्धा आम्ही पहिला भाजून मग भिजवुन मग बनवतो.
लेख अतिशय माहितीपूर्ण. कोकणच्या मातीचा सुवास भरलेला.

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 10:34 am | पिवळा डांबिस

बोंबील...पण हाय राम त्यातले काटे काढण्याचा इतका नाद लागलाय की खाउच नाही शकत.

एक शिक्रेट सांगतो अपर्णाबाय!
बोंबलातले काटे काढायचे नसतात.
ते चावून्-चावून त्यातला रस गिळून चोथा टाकून द्यायचा असतो!!!
फॉस्फरस असतो त्यांत. मेंदूला आणि हाडांना पोषक असा!!
आता नेक्स्ट टाईम ट्राय करा!!!!
:)

तरीच कोकण्यांचा मेंदु तल्लख म्हणतात. ह्ये शिक्रेट हाय व्हय?
मग बरा आसा काका. आता नाय सोडत त्या फॉस्फरसाक :)

बोंबलात काटे? हिला करली खायला द्या रे कोणीतरी!!

अर्र!! स्पाच्या वाग्दत्त सासूबै नै का!! एकेरी तेवढा सांभाळून घ्या. ;)

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2015 - 1:57 am | पिवळा डांबिस

तरीच कोकण्यांचा मेंदु तल्लख म्हणतात. ह्ये शिक्रेट हाय व्हय?

व्हय! ह्ये आनि त्ये डुईवर खोबरेल थापत्यात सारकं, त्ये!!!!
:)

एस's picture

19 Feb 2015 - 8:31 am | एस

वाचनखूण साठवली आहे.

सुनील's picture

19 Feb 2015 - 8:53 am | सुनील

खरं म्हणजे, सुकी मासळी म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार!

तरीही, किंचित आलं-ओली मिरची लावलेलं ताकही फर्मास लागतच ना!!

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 10:18 am | पिवळा डांबिस

सुकी मासळी म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार!

हाय कंबख्त, तूने सुकी मासळी एंजॉय ही नही की!!!! :)
सोड्याची नारळाच्या दुधात सुरमटवलेली खिचडी, सुक्या बांगड्याची स्वादिष्ट किसमूर, सुक्या जवल्याची झणझणीत चटणी
कधी एंजॉय केली आहे का मिष्टर?
सुके नुस्ते म्हळ्यार कितें समजोलें रें तू पांपया!!!!!
अँऽऽऽक! साऽऽमको माऽऽरे तूं!!!!
:)

स्पंदना's picture

19 Feb 2015 - 12:33 pm | स्पंदना

ओये होये !!
उगा अस्ल बोलू नका राव, अहो एकदा जर झिंग्याची आठवण आली ना तर बाकि आख्ख बकर कापा, तरी थंड नाय पडत जीव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2015 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

या प्रतिसादाला "आजचा सर्वात विनोदी प्रतिसाद" असा किताब एक भाजलेली सुक्या बोंबलाची गड्डी आणि पाव किलो सुकटीच्या चटणीसह देण्यात येत आहे ;)

: समस्त जागतिक सुकी मासळी खवैय्या संघाचे पदाधिकारी आणि सभासद

सगळ्यांचे भन्नाट प्रतिसाद आवडले.

स्पंदना मग तुम्ही बोंबलाची चटणी करुन खा. त्यात काटे लागण्याचा संमंध येणार नाही.

आता यात संमंध कुठुन आणि आणला?
संबंध असेल तर ठिक्काय पण भूत खेतं नगोत ग बाय!!

संबंधच. तरी मी आधी लिहुन पुन्हा एडीट करुन संमंध लिहले. (कन्फ्युज झालेली बाहुली).

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 1:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ताजे मासे खायला भयानक आवडतात. आणि बाकी घरी णाणवेजला फाट्यावर मारलेलं असल्यानी खायचे प्रसंगही कमी येतात. त्यामुले माश्यांची तहान कोंबडी, अंडी वगैरेंवर भागवली जाते बाहेरच्या बाहेर.

सुक्या माश्यांच्या वासाचं आणि माझं गणितचं जमत नाही पण, :)

(सामिषप्रेमी) अनिरुद्ध दातार.

चैत्रबन's picture

19 Feb 2015 - 3:09 pm | चैत्रबन

तों पा सु...

पद्मश्री चित्रे's picture

19 Feb 2015 - 5:58 pm | पद्मश्री चित्रे

तू म्हटलस तसा साठवणीचा डबा आहे गं खरच. सोडे, बोम्बील,अंबाड,खारं ( ते संपत आलय हे आठवलं).. उद्या करतेच सोड्याची खिचड़ी..

पैसा's picture

21 Feb 2015 - 12:29 pm | पैसा

गाडी रत्नागिरी स्टेशनात जायच्या आधीच निवसर ओलांडले की हळूहळू सुक्या मासळीचा गंध नाकपुड्यात भरतो. मग रत्नागिरी आली हे कोणी सांगावं लागत नाही.

बारीक सुकट (जवळा) मांजरांना जाम आवडते. भातात नुसती मिक्स करून दिली तरी फन्ना उडवतात. गावचे लोक खारे मासे शिंकाळ्यात टांगून ठेवतात. मांजरांना ताजे मासे मिळाले नाहीत तर ती शेजार्‍यांच्या घरात घुसून हे मासे पळवायचा प्रयत्न करतात. आणि या प्रयत्नात कधी कधी स्वतःच कुत्र्यांच्या तोंडी जातात.

गवि, कप्तान चिमणरावसारख्यांना जवळ्याची किसमूर खाऊन बघायला हरकत नाही. करायलाही सोपी असते. कांदे, ओलं खोबरं, आमसुलं, हिरव्या मिरच्या, जवळा सगळं सुकंच परतायचं. बोंबील हा प्रकार ओल्यापेक्षा सुकाच जास्त लोकप्रिय आहे. खारे बांगडे आणि सुकट यांचे कालवण गरम मसाला घालूनही करतात. कारवारहून येणार्‍या सुक्या बांगड्यांना मीठ कमी प्रमाणात असते. ते दिसतातही जास्त पांढरे. कोणाला ते जास्त आवडतात.

मलाही ओल्या बांगड्यापेक्षा सुका बांगडा जास्त आवडतो.

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 4:23 pm | खंडेराव

छान लेख! आमच्याकडे सुके मासे फारसे मिळत नाहित आणि करताही येत नाहीत, माहिती वाचुन मजा आली आणि भुकही लागली. कधीतरी खाल्लेल्या बोम्बिल चटनीची आठ्वन झाली!

आमच्या गौतमहळ्ळीत असलं काय मिळायचं म्हणजे मारामार. भाएरच जातो थांबा जरा अन निवांत हादडून येतो तेच्यायला. जुलूम आहे नुस्ता असले लेख म्हणजे.

मोहनराव's picture

4 Mar 2015 - 5:38 pm | मोहनराव

लेख अप्रतीम!!
या सुक्या मेव्याची इतकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!