नेमक काय चुकतंय?

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
11 Feb 2015 - 6:22 pm

काल मला ती म्हणाली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय,
संसाराच्या गाड्यात माझं एकटीच तिरकिट होतंय,
तिचं देखील बरोबर आहे मला हे पटतंय,
पण काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय…

कधीतरी मी तिचा हात प्रेमाने हातात घेतो,
अलगदपणे मग तिला माझ्या मिठीत घेतो,
जेव्हा ती पाघळत असते मिठीत माझ्या,
नेमक तेव्हाच गॅसवरच दुधसुद्धा उकळतंय,
काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय…

रात्रीच्या वेळी मी थोडा निवांत बसतो,
तिच्याकडे पाहून मग छानसा हसतो,
जेव्हा ती हि हसते गालात हळूच,
नेमक तेव्हाच कार्ट आमचं भोकाड पसरतंय,
काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय…

कधीतरी मी हिच्यासाठी मुद्दाम सुट्टी काढतो,
कुठेतरी फिरवावं हिला म्हणून ठिकाण शोधतो,
जेव्हा एकदाच ठरत असतं ठिकाण आमचं,
नेमकं तेव्हाच कोणीतरी घरी कडमडतय,
काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय…

मग मात्र मी वैतागून जातो,
काहीच न करता बसून राहतो,
तर हि म्हणे तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय,
अहो! कोणीतरी सांगेल का, नेमक काय चुकतंय??

करुणकविता