उकडशेंगोळे

मितान's picture
मितान in पाककृती
22 Jan 2015 - 7:28 am

काल गप्पा मारताना मी उकडशेंगोळे केलेत म्हणाले तर प्रश्न आला म्हणजे काय ? हा मराठवाड्यातला एक वन
डिश मील का काय म्हणतात तसला पदार्थ. इतरत्र शेंगोळे म्हणून करताना कोणी कुळिथ तर कोणी नाचणीचं पीठ
वापरतात. हे शेंगोळे नुसते वाफवुन मग कमी तेलावर परतून कोरडेही खाता येतात. थालिपिठाची पिल्लंच म्हणा ना.. !

पोटभरीचा पदार्थ म्हणून करताना तो असा वरणफळाच्या स्टाइलने करतात.

आजकाल रेशिपी देताना ती पण रंजक करण्याची आपल्या मिपावर फ्याशन आहे म्हणे. बघते मला जमतेय का. काल
एकाला याचा थ्रीडी फोटु हवा होता खायला ! असली दरिद्री स्वप्नं नकोत म्हणून ही घ्या रेशिपी....

(आजी मोड ऑन )

घरात चार कार्टी असली की गिळायला जरा जास्तच लागतं. मी आपली सक्काळ संध्याकाळ त्या चुलखंडाजवळ शेकून
निघते. सुना बर्‍या आहेत पण सुगरणपणा जरा कमीच. शिवाय त्यांच्या नौकर्‍या सांभाळत गाडं काही पोळी भाजीच्या
पुढं जात नै. वेळच नै हो... मग काय.. आपल्या जिभेला शेवाळ आलं की आपणच चार वेगळे जिन्नस करायचे न
पोरांच्या नावाने गिळायचे. त्यात यांची डायटची फ्याडं सांभाळून केलं तर बरंय. नाहीतर नाकं उडवितात. पाकिटातली
गोमूत्राच्या वासाची म्यागी नि सुपं ( फुळ्ळुक पाणी नुसतं) गिळताना ही फ्याडं आड येत नाहीत याकडे मीही
कानाडोळाच करते. ;)

तर आमच्या धाकट्याच्या थोरलीचे जिभेचे चोचले फार. त्यात तो पास्ता का फास्ता म्हणजे जीव ! म्हणलं अगं त्या
पास्त्याच्या पुंगळीसारखी होशील ! जरा घसघशीत खावं... तर म्हणे आज्जी मग तु दे असं चटकमटक... म्हणलं बरं..

जन्म गेला यांच्या जिभेची कौतुकं करताना. आता नातवंडांसाठी मागं हटले तर नावाची लक्षुम्बाई नाही !

झालं. तरातरा गेले सैपाकघरात. ज्वारीचं पीठ घेतलं २ वाट्या, अर्धी वाटी बेसन आणि उगीच चिकटपणाला थोडिशिक
कणिक. त्यात घातलं चमचाभर लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि मीठ. घसाघसा मळलं नि
ठेवलं बाजूला. कढईत बचकाभर लसणाची फोडणी केली, त्यात पण तिखट मीठ हळद घातलं नि तांब्याभर पाणी
ओतलं. उकळी येऊस्त्वर वाट बघावी म्हणलं तर देवळापासच्या येश्वदाबाई आल्या गावभरची धुणी बडवायला. ( ते
तुमचं गासिप कि काय तेच ) मग तिंबलेलं पीठ घेतलं न बसले त्यांच्यापुढं. कडबोळ्यासारखे शेंगोळे वळायला तसा
वेळ नाही लागत. पण म्हटलं या बाईला मी रिक्कामटेकडी नै वाटू.. ! येश्वदेच्या तोंडच्या पट्ट्यावाणीच भराभरा शेंगोळे
वळले. तवर फोडणीच्या पाण्याला आधण आलं होतं. खळ खळ उकळीत एकेक शेंगोळे टाकले. तेवढ्यात १०८ वेळा
रामचं नाव पण घेऊन झालं. कामात काम करायचं झालं ! मग येश्वदेला चहा करुस्तोवर शिजले चांगले. बोटानी
चेपले तर आतपर्यंत शिजलेले दिसले. हो... मला नै बै उठसुठ तोंडात घालत बसायला आवडत ! मग येश्वदेला खाय
म्हणलं तर तिला प्रदोष ! धाकट्याची थोरली बसली होती गप्पा हाणत फोनवर. तिला हलवून बोलावली. म्हणलं ये
तुला गावरान पास्ता केलाय. "पास्ता?" म्हणत लेकरु टुण्ण्कन उडी मारून आलं जवळ. अशी माया आली लेकराची...
गुळाचा सुपारीएवढा खडा घेतला न टाकला शेंगोळ्यात. उगाच उकडलेलं खाऊन पोट नको फुगायला. तेवढ्यात खमंग
वासानं की काय बाकीची पोरंटोरंही आली. बसली खायला न काय सांगू सगळी कढई १० मिनिटात फस्त की वो...
"अमेझिंग पास्ता आज्जी" ! मला काय ते कळलं नाही. तरी पदर तोंडाला लावून कवतुकानं हसले झालं.
तर आसं झालं. साधं मेलं जवारीचं पीठ. त्याचे थोडे लाड केले की गप पोटात गेलं लेकरायच्या. अशा भाकरी बडवून
खाल्ल्या असत्या व्हय ???

आमच्या सुना कधी असं शिकायच्या रामाला ठावुक ! येते हो आता. दिवेलागणीची वेळ झाली.

एक राहिलंच. मला माहीत व्हतं तुम्ही फोटु मागणार. पण मला बै तसं सांगायची लाज वाटली. पण पोरं पटापटा बोटं
चाटत सुटली तेव्हा थोरल्याच्या रांगत्याला म्हणलं काढ बाबा फोटु. अस्सा साजरा फोटु काढला माझ्या लेकरानं.
अर्धाच देत्ये. कारण उरलेल्या अर्ध्या फोटोत त्याची ढेरी आलीय. दृष्ट नको लागायला. ( आजी मोड
ऑफ)
;)

आता यातली नेमकी रेसिपी आपापल्या जबाबदारीवर शोधून करणे ;) :)
उकडशेंगोळे
उत्तर द्या

प्रतिक्रिया

कारण उरलेल्या अर्ध्या फोटोत त्याची ढेरी आलीय. दृष्ट नको लागायला.

देवा!!
खाउन पिउन धुष्ट पुष्ट दिसत्यात नातवंड आज्जे!! :))

बाकी काय का असना थे शेंगोले बले ढीशतात!

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 8:59 am | त्रिवेणी

कुळ्थाच्या पिठाने नेह्मीच द्गा दिलाय.
आता वरील पिठ वापरुन करेन.

जुइ's picture

22 Jan 2015 - 9:16 am | जुइ

वेगळा प्रकार दिसत आहे.

स्रुजा's picture

22 Jan 2015 - 9:22 am | स्रुजा

आजी बाई जोरात Smile मस्त रेसिपी आणि त्याहून मस्त तुझी सांगायची हातोटी . आमच्या ह्यांना पण करून खायला घालते . इकडच्या स्वारीला वेगवेगळे पदार्थ खाण्याचा फार शौक . तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मी भरपूर वेगळे प्रकार करते आणि इकडच्या स्वारी कडून माझे हट्ट पुरवून घेते . मैत्रिणी पण कौतुक करतात हो इथल्या . मग माझं नाक वर !

पैसा's picture

22 Jan 2015 - 9:32 am | पैसा

लै भारी प्रकार आहे! करून बघायलाच हवे!

पाकृ लिहायची स्टाईल आणि फोटु (अर्ध्या फोटुच्या कारणासकट) एकदम खतरनाक!! =))

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 9:44 am | सविता००१

लै मस्त सांगतीस बघ तू. आता वाचाया त लैच सोप्पी वाटली. आता करून बघाय होवी लग्गीच.
बाकी आज्जी सुगरण हायेच तवा हे उकडशेंगोळे झ्याक लागतच असत्याल. :)

फोटू बी लै साजरा आलाय. अर्धा असला तरीबी चालतोय गडे आमास्नी..

स्टाईल लाजवाब! आम्ही वरणातली फळं म्हणतो याला - आणि पीठ जरा वेगळे असते. हे पण आवडले - करून बघायला पाहिजे. :-)

मितान's picture

22 Jan 2015 - 10:45 am | मितान

मनिष, वरणातली फळं वेगळी. त्यात वरण पण असते. आणि कणिक वापरतात. त्यालाच चकोल्या, वरणफळं गुजरातीत दाल ढोकली असं म्हणतात. हा त्याच रांगेतला पदार्थ. यात डाळ नाही. बाकीचे चिंच गूळ, कोथिंबिर वगेरे नखरे पण नाहीत. सीधासाधा मामला ! :)

हो! पण ती साधारण अशीच दिसतात, पीठ वेगळे असते हे माहित आहे, 'वरणातील फळं' हा खास विदर्भातला शब्द.

स्पंदना's picture

22 Jan 2015 - 10:05 am | स्पंदना

आता मात्र वरणफळाची रेशीपी पायजेच.
आवं एकदा केलं तर घरात कुणी हात नाय लावला.

निनाद's picture

22 Jan 2015 - 10:06 am | निनाद

झकास सांगितली आजीबाईंनी रेशिप्यी! :)

जेपी's picture

22 Jan 2015 - 10:21 am | जेपी

आवडता पदार्थ.. :-)

अजया's picture

22 Jan 2015 - 10:37 am | अजया

अाजीची रेशिपी लई भारी!आज्जीसारखीच!!

निखिल देशपांडे's picture

22 Jan 2015 - 11:04 am | निखिल देशपांडे

खुप दिवसांनी पाहिले उकड शेंगोळे. करुन बघायला हवे.

मितान's picture

22 Jan 2015 - 11:12 am | मितान

निखिल, तुझी आठवण आलीच हे लिहिताना...
मागे कधीतरी उकडशेंगोळे, गडगिळे, उखरी, गाकर अशा गप्पा झाल्या होत्या तेव्हा मी ही रेसिपी टाकेन म्हणाले होते. आता सुमारे ५ वर्षांनी का होईना दिली बरं का रेसिपी :))
(गुळातले गडगिळे राहिलंच आहे पण .... )

मस्त पाकृ, आजी स्टाईलपण!
उकडशेंगोळे, गडगिळे, उखरी, गाकर - बापरे हे सगळे मराठी पदार्थ आहेत? मी फारच अडाणी आहे, मग आता आजीची मालिका येऊ दे ना या सगळ्या पदार्थांवर.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 11:11 am | मुक्त विहारि

मॅगी आणि पास्ता, मला पण अजिबात आवडत नाही...

मनिमौ's picture

22 Jan 2015 - 11:13 am | मनिमौ

नमस्कार रेसिपी नसून आजी बोलत आहे अस वाटतय. बादवे रेसिपी �छाछानछ

शेंगोळे पण मस्त आणि त्यांची गोष्टपण ! *smile*

गवि's picture

22 Jan 2015 - 11:28 am | गवि

आहा...

विभावरी's picture

22 Jan 2015 - 11:32 am | विभावरी

आजी आणि नातवंड लई भारी !
करुन बघायला पाहिजे ही रेसिपी.

यम्म यम्म यम्म … विकांताच्या नाश्ता मेनू मध्ये हा पदार्थ सामावून घेतला आहे :)

एस's picture

22 Jan 2015 - 11:57 am | एस

शेंगोळे जाडसर झाले आहेत. आमच्या घरी बर्‍याच पातळ आणि नाजूक बनवतात. आणि रश्श्यात हळद टाकत नाहीत. दाण्याच्या आमटीसारखा काहीसा प्रकार असतो.

दाण्याच्या आमटीसारखा काहीसा प्रकार असतो. >>>>
स्वॅप्स,
शेंगादाणे अत्यंत प्रिय आहेत मला. तुमच्या घरी होणारी रेसिपी सांगाल का ? दाण्याच्या आमटीत शेंगोळे ही आयड्या भारी वाटतिये.

बाकी आज्जी म्हणे, दहा तोंडं चुलखंडाजवळ भुक्भुक करत असताना नाजुक शेंगोळे वळत खेळत बसायला
वेळ नाही मला ;) ते काम सुनांनी करावं.
बाकी आज्जी वाती वळताना मात्र बारीक नाजुक वळते हे पण सांगितलंय हो तिने :)

एस's picture

26 Jan 2015 - 2:06 pm | एस

हो टंकतो. घरी विचारतो. आजी आणि आई फारच भारी बनवायच्या. मावसबहीणही एक्स्पर्ट आहे यात. विचारून घेतो रेसिपि.

मस्त... नक्की करण्यात येतील ..फोटो सुंदर बरका आज्ज्ये ...

आदूबाळ's picture

22 Jan 2015 - 12:21 pm | आदूबाळ

भारी प्रकार दिसतोय...

भेंडी नेमका लंच हवर च्या आधी फोटो पहिला

मेलोय साफ

इशा१२३'s picture

22 Jan 2015 - 12:31 pm | इशा१२३

मस्त वर्णन मितान.माझ्या घरातहि हा पदार्थ लोकप्रिय आहे.थोडि वेगळी पद्धत आहे आणि कोरडे फोडणीत परतून केलेले आवडतात.कधी असेहि केले जातात.

सुचेता's picture

22 Jan 2015 - 1:11 pm | सुचेता

करुन बघायला पाहिजे अत्ता,

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2015 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजीच्या नातवंडांनी त्याचा चट्टामट्टा केला म्हणजे पदार्थ तर चवदार दिसतोय ! आ़जीची पाकृ सांगायची पद्धतपण खमंग आहे :)

स्वाती दिनेश's picture

22 Jan 2015 - 1:46 pm | स्वाती दिनेश

एकदम 'मितान टच'!
आज्जी मोड फारच आवडला,
स्वाती

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा

रेशिपिच्या मूळ चवी पेक्षा,ती-सांगितल्याचीच चव जास्त आवडली आहे! :-D

@पाकिटातली
गोमूत्राच्या वासाची म्यागी नि सुपं >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

गवि's picture

22 Jan 2015 - 2:17 pm | गवि

पाकिटातली
गोमूत्राच्या वासाची म्यागी नि सुपं

मॅगीचा प्रचंड अवमान. आज्जींचा निषेध.

मॅगी ही बॅचलर्सच नव्हे तर बर्‍याच फ्यामिलींचीही ताबडतोब भूक भागवणारी प्रेमळ चीजवस्तू आहे. तिला हिणवण्याचे कारण नाही.

मितान's picture

22 Jan 2015 - 5:41 pm | मितान

मॅगीचा प्रचंड अवमान. आज्जींचा निषेध. >>>> +१११

आज्जीला नाहीच पटत ! मी तर म्हणते गोमूत्राचा वास यायला त्यात गोमूत्र असणारच की ! म्हणजेच अत्यंत पवित्र पदार्थ आहेत ते. सणावाराला विकतच्या पदार्थांऐवजी मॅगीचाच नैवेद्य दाखवला पाहिजे तिच्या रामाला ;)
देव भी खुश भक्त भी खुश ! :))

एकच नंबर !! आज्जी मोड आवडला.

उमा @ मिपा's picture

22 Jan 2015 - 4:06 pm | उमा @ मिपा

मस्तच गं मितान!
आज्जीच्या पाकृ असा एक स्वतंत्र धागा काढला तर खजिना जमा होईल.

रेवती's picture

22 Jan 2015 - 4:21 pm | रेवती

मस्त रेसिपी. ज्वारीच्या पिठाची पहिल्यांदाच पाहतीये. छान दिसतायत. आम्ही बाजरीचे पीठ वापरतो. आता ज्वारी व बाजरी मिश्र पिठे वापरीन. नक्की करते गं, खूप दिवसात खाल्ली नाहीयेत.

मधुरा देशपांडे's picture

22 Jan 2015 - 5:02 pm | मधुरा देशपांडे

चटकमटक पदार्थ आणि फोटो आणि तेवढेच मस्त वर्णन. धन्यवाद मितान आज्जी.

लइच झ्याक हाय की व ही रेशिपी का काय म्हंतेत त्याला त्या गोऱ्याच्या भाषेत...

mi gayatri's picture

22 Jan 2015 - 5:07 pm | mi gayatri

फोटू बी लई मस्त हाय

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 5:13 pm | मदनबाण

आमच्या ढेरीला घरातल्या सगळ्यांची दॄष्ट लागलेली असल्याने... ही पाकॄ मुद्दामुन दाखवण्यात येइल. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

अनन्न्या's picture

22 Jan 2015 - 5:25 pm | अनन्न्या

फोटोमुळे अंदाज येतोय रेसिपीचा, अर्धा असला तरी!

यशोधरा's picture

22 Jan 2015 - 9:35 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय :)

बाकी लसूण अगदी उजव्या हाताने घातलेला दिसतोय.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jan 2015 - 10:51 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खुप छान लिहलंयस मितान.मी कुळथाचेच शेंगोळे खाल्लेत.

प्रचेतस's picture

22 Jan 2015 - 10:55 pm | प्रचेतस

जबरी दिसतेय पाकृ

माहितगार's picture

23 Jan 2015 - 1:51 pm | माहितगार

उकड शेंगोळ्यांसोबत वर्णनही अमेझींग झालं आहे. मला नेमके जिन्नस माहित नाहीत पण आमच्या घरी शिजवण्यासाठी कदाचित पातळ ताक वापरले जात असावे (नॉट श्यूअर खाऊन बरेच महिने / वर्ष लोटले असावे).

नंदन's picture

23 Jan 2015 - 2:03 pm | नंदन

पाकृ आणि शैली - दोन्ही खास!

करून बघितले शेंगोळे ..चव अप्रतिम होती. फोटो काढला नाही . आज्जीनी वळलेल्या शेंगोळ्यांपुढे मी वळलेले शेंगोळे म्हणजे घोडयापुढे गाढव .

मस्त पाकृ आज्जी..करून बघीन..

वीकांती करुन पाह्यले. पण तुमच्या आजीसारखं ज्वारीचं पीठ नव्हतं घरी!! मग थालपीट भाजणी आणि अगदी नावाला उपासाची भाजणी घालून केले हे. घरात मटार पण शिल्लक होते, ते पण दिले फोडणीत टाकून !! ;)
हा फोटो, आमची काही ढेरी वैगरे नसल्याने सबंध फोटो टाकलाय !! ;) शेंगोळे काही आजीइतके नाजूक वळता नै आले.

मितान's picture

26 Jan 2015 - 10:11 am | मितान

फार छान ! मी पण तुमच्या पद्धतीने करून बघेन आता :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2015 - 2:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक नाव सोडलं तर हा पदार्थ भारी आवडतो :)

गवि's picture

27 Jan 2015 - 12:09 pm | गवि

अगदी अगदी..

उकडशेंगोळे, गडगिळे, उखरी, गाकर, मुटकुळी, कडबोळी, फदफदं, खतखतं, धबधबीत, कोयाडं, तंबिटलाडू, कालवण वगैरे शब्द ऐकून लपंडावमधला अशोक सराफ डोळ्यासमोर येतो:

"अळूचं कसलं फदं?.. आपल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं चांगलं आहे.. फक्त नाव देण्यात थोSSडे कमी पडतात.."

हा पदार्थ करून पाहिला. छान झाला होता. यावेळी फक्त ज्वारीचे पीठ वापरले होते.
मी केलेल्यात सुधारणेस वाव होता. एक म्हणजे तेल जरा जास्त झाले फोडणीत, दुसरे म्हणजे शेंगोळी नाजूक वळायला हवी होती. उकडली गेल्यावर मोठी होतात. या सुधारणा करून येत्या काही दिवसात पदार्थ पुन्हा करून पाहीन.

स्पंदना's picture

26 Jan 2015 - 5:13 pm | स्पंदना

बनवले आज!!
जर्रा चटणी जास्तीची पडली माझ्या हातून :( पण जास्त कचकच नाही केली कुणी खाताना. :)

आजी मोड आणि पाकृ दोन्ही आवडलं.

चिगो's picture

26 Jan 2015 - 11:00 pm | चिगो

लहानपणी अत्यंत आवडीने खायचो हे.. आता वर्षं, नव्हे तपं, लोटली हा प्रकार खाऊन.. करुन बघावा लागेल.
रेसिपी, पदार्थ आणि शैली, तिन्ही आवडले..

हीतेस भाय फोटु जरा बारीक करके डालू!!

hitesh's picture

27 Jan 2015 - 11:49 am | hitesh

.

दिपक.कुवेत's picture

27 Jan 2015 - 12:22 pm | दिपक.कुवेत

पदार्थ तर आवडलाच पण पाकृ सांगण्याची स्टाईल लय भारी!!!

सूडः तु केलेले शेंगोळे फारच टेंम्टींग दिसत आहेत. स्पेशली रस्सा आणि त्यात घातलेले मटार.

चला आता करुन / खाउन पाहिल्याशीवाय काय चैन पडायचं नाहि. ह्या शुक्रवारीच करतो म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत परत काय चघळत बसायला नको. पण घरात ज्वारीच पीठं नाहिये त्यामुळे नुसती कणीक आणि बेसन (समप्रमाणात) घेतलं तर चालेल का?

hitesh's picture

27 Jan 2015 - 2:27 pm | hitesh

नुसत्या कणकेचे होणार नाहीत. कारण्कणकेचे पीठ चिकट असते. त्यातले कण सुटे होत नाहीत.. म्हणुन कणकेच्या करताना तूर डाळीचेवरण करुन त्यात चकोल्या टाकतात.

पण ज्वारी पिठाचे कण सुटे होऊन ते रसात मिसळतात.. त्यामुळे रसात डाळ वगैरे काही नसतानाही रस घट्ट झाला आहे.

भरपुर पाणी घालुन भरपुर शिजवणे हे महत्वाचे. म्हणजे रस दाट होतो

हा पदार्थ करून बघणारांचे आणि प्रतिसादकांचे आभार !
@ दिपकभाऊ, सूड आणि हितेश यांनी केलेत तसा प्रयोग करून बघा आणि सांगा.. कणिक बेसन म्हणजे वेगळ्या आकारात चकोल्या होण्याची शक्यता जास्त आहे.
@ गवि, चला आपणच नावं बदलू !
सुशिला, माणिकमोती,रंभासुधा त्रिपूरसुंदरी,लवंगलतिक,चंपाकळी इ नावांचे पदार्थ चवीसह आठवले :)

hitesh's picture

27 Jan 2015 - 2:35 pm | hitesh

http://www.maayboli.com/node/52479

मी इकडे लिहिले.

तुम्ही इकडे नाही का ?

काल व्हॉट्सअ‍ॅपवर ही पोस्ट आली.. "आजी मोड ऑन" पासून "येते हो आता" पर्यंत.. अर्थातच कुणाला श्रेय वगैरे न देता!

सुखीमाणूस's picture

28 Sep 2016 - 8:16 am | सुखीमाणूस

पण मी लगेच सान्गितले की misalpav.com वरचा लेख आहे•

तुझा आज्जी मोड व्हॉटसअपवर चांगलाच फिरतोय. माहित नव्हता की हा तुझ्याच या लेखाचा भाग आहे. आता कुणी टाकला की त्याला तुझे नाव टाकायला सांगतोच..

नीलमोहर's picture

28 Sep 2016 - 10:43 am | नीलमोहर

पाकृ आणि आज्जी स्टाईल दोन्ही मस्त,

स्वीट टॉकर's picture

28 Sep 2016 - 1:37 pm | स्वीट टॉकर

आजी मोड कसला मस्त जमलाय!