किशोरी - २०१५

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
11 Jan 2015 - 2:40 pm

किशोरी - २०१४

खरे तर जेमतेम १ वर्षांपूर्वी झालेली भेट त्या स्वरांची ...मी लिहून गेलो कि पुढची भेट कधी ठाऊक नाही ...पण आज पुन्हा भेटले ते स्वर ..

आज पार्ले टिळकच्या पटांगणावर सकाळच्या सुखद थंडीत तानपुरे सुरु झाले ... स्टेजवरचे दिवे मालवायला लावले आणि कसलीही नोमतोम वगैरे नं करता माफक आलापीनंतर तोडी सुरु ... मुळातच कारुण्यरसप्रधान राग आणि हळूहळू मूडमध्ये येऊ लागलेल्या ताई ....पण सुरुवातीच्या माईकच्या काही त्रासांनी जराश्या वैतागलेल्या ...पण सुदैवाने ते सगळे वेळीच ठीकठाक झाले आणि मग आम्ही सगळे त्या तोडीच्या गाभ्यात डोळे मिटून गेलो ... जे कृष्णमुर्ती म्हणतात ती 'शून्यावस्था' कदाचित हीच असावी ..स्वर निरखून बघायची गरज नाही ... तालाची आवर्तने मोजायची गरज नाही ...कसल्याही प्रमेयाचा दावा नाही ...म्हणून मग काही सोडवून दाखवायचे नाही आणि म्हणून मग काहीही गाठायचे नाही ...कसलाही अभिनिवेश म्हणून नाहीच... फक्त स्वरांच्या दुलईत कोणीतरी हळू हळू थोपटत आहे हि नं कळणारी जाणीव आणि कसले माहित नाही पण स्वरांच्या निखळ आर्ततेतून येणारे ... आतून ...खोल तळातून येणारे गहिवर ... डोळ्यातून तरळणारे पाणी ... समेच्या जेमतेम १ मात्रा आधी उठून सम साधून (गाठून नव्हे) पुढे चालू...
....नाही म्हणायला तानपुर्यावर नात आणि सौ नंदिनीताई बेडेकर ह्यांची अतिशय समंजस साथ...तबल्यावर भरत कामत ..संवादिनीवर सुयोग कुंडलकर ...आणि मिलिंद रायकर ह्यांचे व्हायोलीन स्वरश: गात होते...
पण त्या तोडीतला पंचम जणू फुरंगटून बसलेल्या लहान मुलासारखा ...होता म्हणावा तर एकही ठेहेराव नाही ..आणि नाही म्हणावा तर सावली सतत दिसत होती जाणवत होती ..आणि मुख्य म्हणजे तार सप्तकातील मध्यमापर्यंत सरसर जाऊन येऊन एकदाही तारषड्ज 'दाखवला' नाही ...हि मांडणी कसली HAUNTINGहोती ...असो द्रुत चीजेतील तानांमध्ये आमची किशोरी पुन्हा दिसली ...८३व्या वर्षी ...पुन्हा एकदा ..

"थोडी विश्रांती घेऊयात का ...पण तुम्ही जाऊ नका हं " असे खट्याळपणे विनवून ...म्हणून मध्यंतर ...

नंतर मग ललत सुरु झाला ..पण उत्तरांगात भटियार दिसला पण ललतभटियार म्हणावे असेही नाही आणि नाही असेही नाही .. पुन्हा मधेच कुणीतरी वेगळेच भेटून जात होते ...काय कि ...मध्यलय झपताल ...पण त्यावर लिहिण्याआधी कुणाला तरी विचारले पाहिजे ...थोडे रेकोर्डिंग केलेय ...इथे कुणी सांगेल का ?

किशोरीचे नाव त्यांच्या आईने अतिशय समर्पक ठेवले आहे ....
'किशोरी'
आता पुनरागमनायच असं म्हणायचंच

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

11 Jan 2015 - 3:10 pm | बहुगुणी

शास्त्रीय संगीतातलं आपल्याला काहीच कळत नाही याची खंत मला पुन्हा एकदा जाणवली,पण निदान तुमच्यासारख्यांना जे असं मनापासून नोंदवावंसं वाटतं, ते रसग्रहण कळण्याइतकं तरी थोडं बुद्धी अगदीच बोथट व्हायच्या आत शिकायला हवं याची उर्मीही जागी झाली, त्याबद्दल आभार!

तो 'स्वरशः' शब्द फारच आवडला!

तुम्ही "थोडे रेकोर्डिंग केलेय ...इथे कुणी सांगेल का?" म्हणून विचारलंय, नक्की काय हवंय? रेकॉर्डिंग इथ्द कसं टाकायचं असा प्रश्न असेल तर divshare.com सारख्या साईट्स उपलब्ध आहेत, तिथे अपलोड करून इथे एम्पी३ दुवे देऊ शकाल.

अत्रन्गि पाउस's picture

11 Jan 2015 - 4:04 pm | अत्रन्गि पाउस

ते हे कि तो ललतभटियार होता कि अजून काही ...

वेल्लाभट's picture

4 Apr 2017 - 10:22 am | वेल्लाभट

तो 'स्वरशः' शब्द फारच आवडला!

हेच म्हणतो.

काय उत्तम लिहिलंयत तुम्ही ! सम्मोर उभं राहतंय चित्र !

आदूबाळ's picture

11 Jan 2015 - 4:38 pm | आदूबाळ

आवडलं :)

रिकॉर्डिंग ऐकण्यास उत्सुक आहे. मध्यलय पेलणं फार अवघड.

तिमा's picture

11 Jan 2015 - 6:04 pm | तिमा

किशोरीताईंचं गाणं शब्दातीत असतं. पण ते तुम्ही शब्दांत पकडण्याचा उत्तम प्रयत्न केलाय.

समेच्या जेमतेम १ मात्रा आधी उठून सम साधून (गाठून नव्हे) पुढे चालू...

आणि

पण त्या तोडीतला पंचम जणू फुरंगटून बसलेल्या लहान मुलासारखा ...होता म्हणावा तर एकही ठेहेराव नाही ..आणि नाही म्हणावा तर सावली सतत दिसत होती जाणवत होती ..आणि मुख्य म्हणजे तार सप्तकातील मध्यमापर्यंत सरसर जाऊन येऊन एकदाही तारषड्ज 'दाखवला' नाही ...हि मांडणी कसली HAUNTINGहोती ...असो द्रुत चीजेतील तानांमध्ये आमची किशोरी पुन्हा दिसली ...८३व्या वर्षी ...पुन्हा एकदा ..

ही वाक्यं वाचून स्वतः मैफलीत असल्याचा भास झाला.
रेकॉर्डिंग ऐकण्यास उत्सुक आहे.

अत्रन्गि पाउस's picture

11 Jan 2015 - 9:28 pm | अत्रन्गि पाउस

१ -२ दिवसात आणि कळवतो ...
प्रतिक्रिये बद्दल आभार :)

यशोधरा's picture

11 Jan 2015 - 9:25 pm | यशोधरा

वा वा!

रमेश आठवले's picture

12 Jan 2015 - 5:57 am | रमेश आठवले

वाट पहात आहे

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 6:29 am | स्पंदना

लेख कसा वाटला सांगू? म्हणजे पाऊस आहे म्हणावं तर छत्री उघडायची गरज नाही, आणि नाही म्हणावं तर धुरधुर, भुरभुर सुरु आहे. इतक शांत वाटावं, ना पळायची गरज भिजतोय म्हणुन, ना थांबायची गरज मनसोक्त भिजव म्हणुन, जणु दोन सोबती चालताहेत; एकत्र, पण आपापले.
किशोरी आमोणकरांबद्दल काय बोलावं? त्यांच्या आ कारात जेव्हढं गाण सामावलयं तेव्हढ संगीत आख्ख्या मैफीलभर गाऊन नाही जमायच कुणाला. आणि तो चेहरा, त्यावरचे ते भावं.
वर कुणी तरी म्हंटल्यापरमाणे आयुष्यभर गाणं समजलं नाही शास्त्रीय अस, पणं स्वर कळतात, भावतात आणि स्पर्शतातही. त्यातला पहिला स्वर मी किशोरी ताईंचा म्हणेन!!

घाटावरचे भट's picture

12 Jan 2015 - 9:27 am | घाटावरचे भट

पंचम नसेल तर भटियाराचा काही संबंध नाही. कदाचित शुद्ध धैवताचा ललत असावा. पण हा आपला अंदाज.

सदस्य११'s picture

12 Jan 2015 - 5:04 pm | सदस्य११

ललत पन्चम राग होता तो

अत्रन्गि पाउस's picture

12 Jan 2015 - 5:14 pm | अत्रन्गि पाउस

धन्यवाद

सुधांशुनूलकर's picture

12 Jan 2015 - 5:21 pm | सुधांशुनूलकर

परवाच शुक्रवारी ९ जानेवारीला दादरला पं. सी.आर. व्यास वंदना कार्यक्रमात त्यांनी उ. झाकीर हुसेनबरोबर पं. सी.आर. व्यास यांच्या एका सीडीसंचाचं लोकार्पण केलं, तेव्हा त्यांना पाहिलं. एकाच वेळी दोन देवांचं दर्शन...

एक खूप जुनी आठवण - १९८८-८९ असेल. नोव्हेंबरमधल्या एका रविवारी सकाळी ७ वाजण्यापूर्वीच दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पोहोचलो. मला दामाकसेंचं सदस्यत्व मिळणार होतं, ते ताईंच्या या कार्यक्रमापासून. सभागॄह खचाखच भरलेलं. ताई खूप उशिरा येतात, विचित्र वागतात अशी त्या काळात भरपूर कुप्रसिद्धी झालेली, त्याच ताई ७च्या ठोक्याला मंचावर हजर होत्या. प्रथम विभास, त्यानंतर बहादुरी तोडी, जौनपुरी... कार्यक्रम संपला, तेव्हा बारा-साडेबारा वाजले असतील, किती वाजले ते बघायचाही विसर पडला होता. आजही कधीतरी ते सूर अचानक आठवतात.

त्यानंतर त्यांच्या अनेक मैफलींना जायला मिळालं. महद्भाग्य!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2015 - 7:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर रसग्रहण !

शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही. पण कॉलेजच्या आर्ट सर्कलच्या सौजन्याने श्रीमती शोभा गुर्टू याचे गायन त्यांच्या बैठकीसमोर जमिनीवर बसून मीटर-दोन मीटरवरून अनुभवले आणि शास्त्रीय संगीताबद्दल अजूनही काही कळत नसताना तसे सुमधुर स्वर ऐकले की मन तरंगू लागते. मग, गायनातले थोडेबहुत कळले असते तर... असे अजूनही वाटत राहते.

: शुन्य (नव्हे बराच उणे) तानसेन आणि किंचितसा कानसेन इ ए.

पैसा's picture

12 Jan 2015 - 10:16 pm | पैसा

तुम्ही गाण्याबद्दल अजून खूप लिहा!

अत्रन्गि पाउस's picture

12 Jan 2015 - 11:23 pm | अत्रन्गि पाउस

धन्यवाद

अत्रन्गि पाउस's picture

4 Apr 2017 - 7:48 am | अत्रन्गि पाउस

अतिशय शोकाकुल अवस्था आहे आज

किशोरीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

विकास's picture

4 Apr 2017 - 9:16 am | विकास

लेख खुप आवडला...

शास्त्रिय संगितातले ओ का ठो कळत नाही. पण ऐकायला कधी कधी आवडते! किशोरी आमोणकर यांचे मला आवडलेले आविष्कार म्हणजे, त्यांचा प्रामुख्याने "रंगी रंगला श्रीरंग" हा अल्बम. अनंत वेळेस ऐकलेला आहे. म्हणजे आता तो ऐकायला लावण्याची पण गरज लागत नाही, इतका कानात दरवळत राहतो. तसेच अतिशय शांतीरसात म्हणलेला गजर...

त्यांच्या विचित्र वागण्याबद्दलच्या कथा प्रसिद्धच आहेत. पण त्या वेगळ्याच कलाकार होत्या हे विसरता कामा नये. असे म्हणायचे कारण म्हणजे त्यासंदर्भात त्यांनी मांडलेले त्यांचे मत वाचल्यावरच कळेल... The loneliness of Kishori Amonkar ते वाचल्यावर समजले की त्यांचे स्वर ऐकताना, आपण पण इतके रंगून कसे जातो ते!

या एका असामान्य गानविदुषीला एका अतिसामान्य श्रोत्याची मनःपूर्वक श्रद्धांजली.

चतुरंग's picture

4 Apr 2017 - 2:21 pm | चतुरंग

प्रतिक्रिया श्रद्धांजलीतून देण्याची वेळ यावी याला काय म्हणावे..? अजून एक स्वर निखळला.. :(
किशोरीताईंना मनःपूर्वक श्रद्धांजली! दुर्दैवाने प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधीच आला नाही.
वरती विकास म्हणाले आहेत तसं 'रंगी रंगला श्रीरंग' ही संत सोयराबाईंची भैरवी त्यांनी अशी काही गायली आहे की साक्षात विठ्ठलही हात जोडून समोर उभा रहावा!
(कुठल्याशा यूट्यूब फितीत त्यांचं गाणं बघितल्याचं आठवतं. तबल्यावर झाकीर हुसेन. ताई मंचावर आल्यानंतर झाकीर स्वतः उठून पुढे गेले पायांना हात लावून नमस्कार केला आणि पुन्हा तबल्यावर येऊन बसले, अशी थोरवी!)

चौकटराजा's picture

5 Apr 2017 - 9:17 am | चौकटराजा

मी १९६८ पासून शास्त्रीय संगीत ऐकत आहे. त्यातील आपल्याला काही कळत नाही असं का होतं ? कळत नाही असं काही नसतं ! इतकं शास्त्रीय दुर्बोध नक्कीच नाही. कारण लय, आंदोलन ,ठहराव,हरकती ताना या सांगितिक गोष्टी आपण डोळ्यानी अनेक वेळा अनुभवत असतो. उदा द्यायचं झालं तर समुद्राच्या लाटा किनार्यावर एकामागून एक अशा येणे यात लय आहे. एखादीच लाट एकदम नागासारखी फडा काढून येणे यात मींड आहे. ई. आपल्याला एखादे वाद्य जर वाजविता येत असेल तर संगीताचा प्रत्यय कानसेन हा पातळीपलिकडे येउ शकतो.हे मी अनुभवाने ठामपणे सांगू शकतो. एखादी जागा गायकाने घेतली तर जाणकाराच्या तोंडून क्या बात है ! वाह ! असे यायला वेळ लागत नाही. कारण बहुतेक वेळा त्याने अशी जागा स्बतः गाताना वा वाजविताना घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे कलकाराच्या योग्य योगदानाला प्रतिक्षिप्त क्रियेने योग्य दाद मिळते.

मला शास्त्रीय संगीत ऐकताना बहुशः बडे गुलाम अली भीमसेन जी, अमीर खान कुमार गंधर्व ई पुरूष गायकच जास्त भावले. अर्थात ही माझी मर्यादा म्हणावी. किशोरी आमोणकर यानी चांगले शिष्य घडविण्याचे कार्य केले याबद्द्ल त्याना यथोचित श्रद्धा़ंजली .

बाकी वर तार षडज लवकर न लावणे हा एक श्रोत्याना गोड छळण्याचा ठराविक प्रकार आहे. अ स्टॅन्डर्ड प्रोसीजर ! पण या साठी अनेक उपजांचे ( व्हेरिएशन) अगाध ज्ञान कलाकाराला असावे लागते. नाहीतर षडज दाखवायचा नाही या हट्टापायी तोच तोच पणा येऊ शकतो. काही रागात षडजाला महत्वच कमी आहे उदा. मारवा .