उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला
माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते ! राजस्थानी गीत असे :
उड उड रे, उड उड रे, उड उड रे म्हारा काला रे कागला !!
कद म्हारा पियुजी घर आवे,कद म्हारा पियुजी घर आवे !
आवे रे आवे, उड उड रे, उड उड रे !!
खीर खांडरो जींमण जीमाऊं, सोनानी चोच मढाऊं, म्हारा कागा,
जद म्हारा पियुजी घर आवे !!
पगल्याने थारे, बांधुरे घुंगरा,गलेमे हार पैराऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
आंगलियामे थारे अंगुठी कराऊं, चांदीका पांख लगाऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
जो तू उडैने सगून बतावे,थारो जनम जनम गुन गाऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
आवे रे आवे, जद म्हारा पियुजी घर आवे !!
कद--केंव्हा, जद-- जेंव्हा,खीर खांडरो-- साखरेची खीर, जीमण जीमाऊं --जेवूं घालीन. पाख--पंख
आता तुमच्याही मनांत गुंजी घालावयाला सुरवात केली असेल श्री. ज्ञानेश्वरांच्या विराणीने
पैल तोहे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे !
उड उड रे काऊ,तुझे सोन्याने मढवीन पाऊं !
पाहुणे पंढरीराऊ, घरा कै येती !!
दही भाताची उंडी, लावीन तुझे तोंडी !
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी !!
दुधे भरूनी वाटी,लावीन तुझे ओठी !
सत्य सांगे गोठी विठू येईल कारे !!
अंबिया डहाळी, फ़ळे चुंबी रसाळी !
आजिचीरे काळी शकून सांगे !!
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे !
भेटती पंढरीराणे शकून सांगे !!
दोनही रचनांमध्ये काय साम्य आहे पहा .कुठे मारवाडमधील पतीची वाट पाहणारी गृहिणी आणि कुठे महाराष्ट्रातील विठूची वाट पहाणारा भक्त ? एक भेटीची आर्तता सोडली तर दोघांमध्ये कुठलीही समान गोष्ट शोधूनही सापडणार नाही. पण नाही तरी कसे म्हणावे ? दोघांनाही शकून विचारण्यासाठी एकच पक्षी सापडला-- काळा कावळा ! दोघेही त्याला "लाडिगोडी" करण्यास सारखेच तत्पर. दोघेही त्याला नुसते खावावयास गोड पदार्थ करून थांबावयास तयार नाहीत तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी त्याला मढवावयास सज्ज ! कावळ्याने झाडावर येऊन नुसते कोकायचे नाही तर परत उडून जावयाचे आहे. एकच धावा; उड ऊड रे, उड उड रे ! जणु दोघांनीही शेजारी शेजारी बसूनच धावा केला.
हे तर शक्यच नाही.स्थळ-काळात प्रचंड अंतर. मग काय चमत्कार आहे हा ?
लोक्गीत-विराणीच्या निर्मितीच्या काळाच्या फ़ार फ़ार मागे जा. आदीम काळात हिंदुस्तानभर,सर्वत्र,जनमानसात एक धृढ भावना रुजलेली होती. कावळा ओरडत उडाला तर प्रियकर घरी येणार. या समुजतीला स्थळ, काळ,भाषा कशाकशाचे बंधन नव्हते. शोध घेतला तर इतर भाषांमध्ये अशा रचना सापडणार नाहित कां ?
जरा शोधाना !
प्रतिक्रिया
31 Dec 2014 - 12:08 pm | शेखर काळे
उड़ जा रे कागा
मेरा स्याम गया बहु दिन का रे ॥
तेरे उड़ास्यु ँराम मेलेगा धोखा भागै मनका ।
इत गोकुल उत मथुरा नगरी हरि है गाढ़े बन का ॥
आप तो जाए बिदेसा छाए हम बासी मधुबन का ।
मीरा के प्रभु हरि अबिनासी चरणकवल हरिजन का ॥
मंगेशकर बन्धु-भगिनींनी अजरामर करून टाकले आहे हे भजन ...
31 Dec 2014 - 12:17 pm | एस
शरदसाहेब आणि आपणांस अनेक धन्यवाद या माहितीसाठी!
31 Dec 2014 - 12:11 pm | प्रसाद१९७१
हे फार रोचक आहे
31 Dec 2014 - 1:10 pm | प्यारे१
सुंदरच!
बाकी
>>> एक भेटीची आर्तता सोडली तर दोघांमध्ये कुठलीही समान गोष्ट शोधूनही सापडणार नाही.
ह्याबाबत : ज्ञानेश्वर माऊलींच्या विराण्यांमध्ये भक्त जणू प्रेयसी/पत्नी (स्त्रीभाव) आणि आराध्य देव म्हणजे प्रियकर/पती (पुरुष) अशाच प्रकारे भाव व्यक्त केला गेला असल्यानं साम्य सोधता यायला हरकत नाही.
वेगळा विचार म्हणून, आपण म्हणतो की पूर्वी दळणवळणाची साधनं कमी असल्यानं काही देवाणघेवाण नव्हती. पण जर नामदेवांच्या ओव्या गुरु ग्रंथसाहिब मध्ये सापडतात तर कदाचित माऊलींच्या विराण्या सुद्धा एकाकडून दुसर्याकडे, ह्या भाषेतून त्या भाषेत जाणं शक्य आहे. अर्थात हा फक्त एक विचार मांडला आहे.
त्या उप्परही प्रतिभा आपलं रुप कुठं प्रगट करेल ह्या बाबत सांगणं शक्य नसल्यानं एकाच प्रकारचं काव्य अनेक कवींच्या मनी स्फुरायला देखील वाव आहेच.
31 Dec 2014 - 2:04 pm | कंजूस
अरे वा !मला उत्सुकता आहे तो नाम्या गुरूमुखीत काय लिहून गेला ते जाणून घेण्याची.
31 Dec 2014 - 2:53 pm | योगेश पाडेकर
एकेरी रुचली नाही :(
31 Dec 2014 - 2:58 pm | प्यारे१
ते 'माईमोड'मध्ये तल्लीन झाले असतील. ;)
ग्रंथसाहेब मध्ये माझ्या माहितीनुसार नामदेव महाराजांचे ६१ अभंग आहेत. १२७० ते १३५० असं ८० वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं, त्यात उत्तर आयुष्यातला बर्यापैकी कालावधी त्यांनी उत्तर भारतात घालवला.
http://www.ringan.in/article-read.php?a_id=5 हा एक लेख सापडला.
31 Dec 2014 - 5:43 pm | योगेश पाडेकर
+१
31 Dec 2014 - 10:09 pm | मनिम्याऊ
उड़ जा काले कावां तेरे मूविच खंड पावां
ले जा तू संदेशा मेरा मैं सदके जावां
बागों में फिर झूले पाड़गे पक गये मिठियाँ अंबियाँ
यह छोटिसी ज़िंदगी दे राता लंबियाँ लंबियाँ
ओह घर आजा परदेसी के तेरी मेरी एक ज़िंदडी
1 Jan 2015 - 4:20 pm | बोका-ए-आझम
हे 'गदर: एक प्रेमचोथा ' नावाच्या सनीपटात होतं. ते मूळ लोकगीत आहे ही माहिती नवीन होती!
2 Jan 2015 - 2:02 pm | बॅटमॅन
प्रेमचोथा???????
=)) =)) =))
4 Jan 2015 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'गदर: एक प्रेमचोथा '
=))
-दिलीप बिरुटे
2 Jan 2015 - 2:02 pm | बॅटमॅन
वा!
भारतीय भाषांत अशी साम्यस्थळे हुडकावयास हवीत. त्यांचा एक डेटाबेस केल्या गेला पाहिजे, जसा इंग्लिश पारंपरिक लोकगीतांचा आहे तसा. तो इथे पहावयास मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/Roud_Folk_Song_Index
4 Jan 2015 - 11:41 pm | आदूबाळ
भारीच!
साम्यस्थळांपेक्षाही फरक रोचक आहेत.
- राजस्थानीत कावळ्याच्या जेवणाचं वर्णन थोडक्यात आटपलं आहे - खीर खांडरो वगैरे. मराठीत (१) दहीभाताची उंडी (२) दुधाची वाटी = अनप्रोसेस्ड खीर (३) फळे अशी व्हरायटी दिसते.
दूधदुभत्याची आणि मिठायांची चंगळ असणार्या राजस्थानात खीर आणि रांगड्या महाराष्ट्रात तुलनेने सोपे पदार्थ - हे योग्यच वाटलं. पण खीर खांडरोपेक्षा काऊचे जास्त लाड न पुरवण्याचं आश्चर्य वाटलं.
- दागिन्यांच्या वर्णनात मात्र राजस्थानी लोकगीताला तोड नाही. सोन्याची चोच काय, पायात घुंगरू काय, गळ्यात हार काय, चांदीचा पंख काय! पंजात अंगठी घालायची कल्पनाही कमाल. आपण मराठीत मात्र पाय सोन्याने मढवीन, इथपर्यंतच उडी घेतली आहे. एवढे वस्त्रालंकार लेवून कावळा उडणार कसा - हा प्रॅक्टिकल विचार माऊलींच्या मनात असावा.
- मीरा भजन आणि प्रेमचोथा चित्रपटातल्या गीतात मात्र कावळ्याला काहीही आश्वासनं दिलेली नाहीयेत. त्या प्रांतातले कावळे निस्पृह असावेत (किंवा माणसं जास्त प्रामाणिक असावीत)