प्रसंग - नळ दुरुस्ती

सार्थबोध's picture
सार्थबोध in काथ्याकूट
1 Dec 2014 - 3:00 pm
गाभा: 

नवीन ठिकाणी राहायला आलो होतो, नेहमीची आवरा-आवरी, केर काढणे, वस्तू जागेवर लावणे, दुध , वर्तमानपत्र वाल्याची चौकशी करणे अशी कामे करत होतो. हात-पाय धुवायला गेलो तर नळ गच्च बसला होता, आता पंचाईत झाली. बाजूला फरशीपासून कमी उंचीवर छोटा नळ होता; तात्पुरते काम भागले, पण मुख्य नळ दुरुस्त करणे गरजेचे होते. अंधार पडायला लागला होता, बाहेर पडलो सुरक्षा रक्षकाकडून नळ दुरुस्त करणाऱ्या प्लंबरचा मोबाईल क्रमांक घेतला ; त्याचे नाव नंदू. कल्पना नव्हती मला… असा विलक्षण संवाद झाला… वेळ संध्याकाळी ७ ची .
मी- फोन केला पूर्ण वेळ रिंग वाजली पलीकडून फोन उचलला नाही, अशा वेळी आपण जरा जास्तच उतावीळ आणि अस्वस्थ होतो, क्षणाचा विलंब न करता परत फोन केला ...पलीकडून फोन उचलला.

नंदू- ह SS ह ख SSख घशात आवाज काढत … मंद्या किती वेळ वाट बघतोय … कुठायस …असा प्रश्न झाला , मी गोंधळलो …अहो मी मंद्या नाही . सचिन बोलतोय, तुमचा नंबर त्या सिक्युरिटी वाल्या विकास कडून घेतला … आता पलीकडे एकदम शांतता झाली. नंदू म्हणाला साला मिष्टेक झाली काय साहेब? मला; तो विचारतोय कि सांगतोय हेच कळेना. असो. मी म्हणालो अहो माझ्या घरातला एक नळ दुरुस्त करायचा आहे , मी नवीन राहायला आलो आहे नंदन गार्डन मध्ये तुम्ही कराल का? नंदू म्हणाला, अहो नळ दुरुस्त करायचा तर एकांदा पलंबर गाठा ना राव, मला कशाला फोन केला? या वक्ताला !!!. मी चपापलो. म्हणालो आपल्याला सिक्युरिटी ने गंडवला का काय !!!. ओके ओके. मला त्या विकास ने नंबर दिला हो. नंदू म्हणाला आओ ! विकास उद्या माझा नंबर डॉक्टरचा म्हणून देईल. तुम्ही काय तब्येत दाखवायला याल का मला , काय पण राव विंटेलीजंट माणूस, न बघता फोन करता … मी- सॉरी तुम्हाला त्रास दिला. फोन कट.

म्हणलो आता जाऊन त्या सिक्युरिटी वर कट काढू. मी बाहेर जेवलो, एक दोन वस्तू घेऊन परत चाललो , तेवढ्यात मला नंदूच्या फोन वरून फोन आला, मनात म्हणले आता काय त्रास आहे यार याचा. फोन उचलला. पुन्हा घशातली खर खर ऐकू आली. साह्येब मगाशी मिष्टेक झाली काय!!. साला परत तेच… विचारतोय का सांगतोय हेच कळेना. मी म्हणालो अहो सॉरी तुम्हाला चुकून फोन केल. तो म्हणाला तुम्ही नाही सॉरी … म्या सॉरी. मी नंदू पलंबर बोलतोय. मी म्हणालो अहो मग मगाशी नाही का म्हणाला? ते काय मगाशी माझ्या भावाने, मंद्याने फोन उचलला. एकंदरीत आवाज ऐकून पलीकडे तार छेडली गेली आहे, हे मी ओळखले, एव्हाना ८ वाजून गेले होते. नंदू बोलला भावाने फोन घेतला हो, बोला काय काम आहे. मी म्हणलो अहो आवाज तर हाच होता, नंदू बोलला जुळे… आम्ही दोघे जुळे आहोत, म्हणून तसे वाटले असेल तुम्हाला. मगाशी, मी फोन केला तेंव्हा मंद्या आला नसावा, आणि खेळ सुरु झाला नसावा आणि आत्ता घसा ओला झालाय्मुळे हि सगळी लिंक लागली आहे, हे माझ्या लक्षात एव्हाना आलेच होते.

हम्म म्हणालो… चला ठीक आहे. , नंदू - बोला साहेब काय काम आहे. मी म्हणलो नळ बसवायचा आहे. नंदू - ओके बसवला आणि काय काम आहे. मी म्हणलो अहो बघायला लागेल ना आधी, नंदू - ओके बघितला; पुढे ? मी -अहो कसला नळ आहे ठरवायला नको का?, नंदू -ओके ठरवला , आणि काय काम? मी - अहो नंदू शेठ … (त्याच्या या तत्पर उत्तरांना कंटाळून मी त्याचा शेठ केला होता).

अहो मला सांगा पैसे किती ? तो बोलला ६५ , असली आड-नीड किंमत ऐकून मी वेडा झालो. अहो पण नवा नळ लावायचा असेल तर, तो म्हणे १६५. आणि पाईप खराब असेल तर , तो म्हणे २६५. मी म्हणलो अरे हे दर वेळी ६५ काय आहे? तो म्हणाला साहेब आमची चपटी संत्रा ६५ ला येते , उरलेले कामाचे पैसे. मी म्हणलो अरे !! दारू का पिता?, फळाचा ज्यूस वगैरे प्या.

नंदू बोलला, मग संत्र काय आहे?, फळच आहे ना .. काय मजाक करता काय गरीबाची !!! साहेब.

मी काय समजायचे ते समजलो, उद्या या मग बोलू असे म्हणून फोन ठेवला.

- सार्थबोध
www.saarthbod.com

प्रतिक्रिया

विभाग काथ्थाकुट.गल्ली चुकली का ?
बाकी मुक्तक छान आहे.

कपिलमुनी's picture

1 Dec 2014 - 3:34 pm | कपिलमुनी

नळ दुरुस्ती ई ई छोटी कामे घरीच करत जावा .. प्लंबर आणि डॉक्टरच्या व्हिजीटींग फी आज काल सारख्याच झाल्यात

सार्थबोध's picture

1 Dec 2014 - 3:48 pm | सार्थबोध

कपिलमुनी - हे बाकी बरोब्बर बोलला तुम्ही ... एखादे छिद्र (ड्रिल) पाडायचे पैसे पण भयानक, भिंतीला छिद्र पडतात कि खिशाला ते कळत नाही

कपिलमुनी's picture

1 Dec 2014 - 4:19 pm | कपिलमुनी

toolkit

असला टूल किट विकत घेतलेले परवडते . २००० च्या आसपास सुरू होतात पण सर्व कामे होतात .

कपिलमुनी's picture

1 Dec 2014 - 4:21 pm | कपिलमुनी

toolkit

वैभव जाधव's picture

1 Dec 2014 - 4:46 pm | वैभव जाधव

आसले सगळं कीट मिळत्यात हो बाजारात पण सगळं आपणच करत बसल्यावर नंदूने काय करायचं? संतरा सुध्दा नाही मिळणार त्याला. बिचारा तुमच्या जागि हापिसात कळ फलक पण नाही बडवू शकणार. जगू द्या की त्याला. असतो त्याला पण आटिट्युड स्पेशालिस्ट असल्याचा. राहू द्यावं.

प्लंबरला जगवायचा ठेका लोकांनी का घ्यावा ते समजत नाही. च्यारिटी थोडीच चाललीये इथे.

वैभव जाधव's picture

1 Dec 2014 - 5:16 pm | वैभव जाधव

च्यारिटी आता नसति ओ सायेब. असे प्लंबराचे, म्याकानिकाचे, चप्पलवाल्याचे, रंगार्‍याचे पैसे वाचवून वाचवून परत निव्रूत्तीनंतर च्यारिटीचेच डोहाळे लागत्येत ना. मग ८० जी वाल्या संस्था हुडकण्याआयवजी आशी केली च्यारिटी. काय बिघडले?
बाकी आपल्याशी वाद घालायची आपली कप्याशिटी नाय ब्वा. मापी असावी.

वाद घालून मला काय मिळणारे जाधवसाहेब. काय स्पर्धा थोडीच आहे इथे.

काही गोष्टी स्वतः केल्याने बिघडत नाही इतकाच मुद्दा होता. असो.

रेवती's picture

1 Dec 2014 - 7:45 pm | रेवती

एकदा बोलावल्यावर "येतो" म्हणून वेळेवर आलेला एकही प्लमर मला माहित नाही. एकजण तर अमूक एक पार्ट घेऊन येतो म्हणू पैसे घेऊन गेला तो गेलाच! ते पैसे गेले म्हंजे च्यारिटी झालीच की! आपल्या घरातील कामे आपल्याला करता येणे यात वैट काहीच नाही.

अगदी असेच म्हणतो. त्यामुळे पैसे जास्त झालेल्यांनी प्लंबरांप्रति च्यारिटी करत रहावी, आम्ही गरीब आपली कामे जमेल तितकी स्वतः करण्याचा प्रयत्न करू.

नाखु's picture

2 Dec 2014 - 12:59 pm | नाखु

प्लंबर-रंगारी-सुतार-बांधकाम मजूर ई. मंडळी वेळेवर येण्यात्-आणि वेळेत आटोपशीर काम "न करण्यासाठीच" कुप्रसिद्ध आहेत. तेव्हा त्यांचेकरीता समाजसेवा ईल्ले!
स्वतःचे घर बांधताना हेलपाट्याने-तगाद्याने अर्धमेला झालेला शिंगरू
ना.खु.

काळा पहाड's picture

1 Dec 2014 - 7:03 pm | काळा पहाड

मुनिश्वर, कुठ्ले व्हर्जन घ्यावे बोश्च चे? ५००आर ई, ४५० आर ई? ऑनलाईन बरीच व्हर्जन्स उपलब्ध आहेत.

वारा's picture

3 Dec 2014 - 2:35 pm | वारा

तुर्भ्याला जाउन ड्रील मशीन घ्या. १२००/- पासुन चायनीज ड्रील मशीन मिळेल. स्वस्त आणि मस्त, कधीतरी वापरायला चांगल असत.

काळा पहाड's picture

3 Dec 2014 - 8:43 pm | काळा पहाड

धन्यवाद. पुण्याबद्दल माहीती आहे का कुठे मिळेल ते?

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 1:40 pm | सुबोध खरे

प्लंबर आणि डॉक्टरच्या व्हिजीटींग फी
एकदा एका मेंदूची शल्यक्रिया करणाऱ्या डॉक्टरने नळाचे काम करायला प्लंबर ला बोलावले त्याने काम करून १००० रुपये मागितले तेंव्हा हा डॉक्टर रागाने त्याला म्हणाला मी न्यूरोसर्जन असून मला कोणी हजार रुपये देत नाही तर तू काय मागतो आहेस?
त्यावर तो प्लंबर म्हणाला, मी न्युरोसर्र्जन म्हणून काम करत असताना मला सुद्धा कोणी हजार रुपये देत नव्हतं
*dance4* *DANCE* :dance:*dance4* *DANCE* :dance:*dance4* *DANCE* :dance:

खटपट्या's picture

4 Dec 2014 - 6:37 am | खटपट्या

ज ब रा !!! :)

सार्थबोध's picture

1 Dec 2014 - 3:46 pm | सार्थबोध

होय सयुक्तिक गल्ली सापडली नाही, निपुण नसल्याचा तोटा, संत्रा जास्त झाली असावी मला कदाचित :-)

@सार्थबोध-विभाग पाहुन आणी लेखाचे नाव पाहुन डोक्यात किमान विस प्रश्न निर्माण झालते.
वाटल चांगला काथ्था कुटला जाईल :-)

स्वप्नज's picture

1 Dec 2014 - 9:26 pm | स्वप्नज

त्या २० प्रश्नांपैकी ३ प्रश्न (३रा, ८वा व १७वा) फारच चावट आहेत हे नमूद करतो

आनंदराव's picture

1 Dec 2014 - 5:37 pm | आनंदराव

असेच काहिसे पण उद्धट अनुभव आहेत.
त्यामुळे शक्य होतील तितकी कामे घरीच करतो.
पैसे वाचवल्याचे समाधान आणि एक नवीन काम शिकल्याचा आनंद

सह्यमित्र's picture

1 Dec 2014 - 6:24 pm | सह्यमित्र

मस्त रे परत वाचले :-) भरपूर हसलो

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2014 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

ख्या, ख्या, ख्या... हल्लीच्या बारा बलुतेदारांबद्दल काही सांगता येत नाही. त्यांच्या सत्यकथा काल्पनाविलासापेक्षा भारी असतात :)

कपिलेश's picture

1 Dec 2014 - 9:17 pm | कपिलेश

प्लंबर लोकांचा मोबाइल फोन एडव्हांस घेतल्यानंर हामखास बंद होतो.

रेवती's picture

1 Dec 2014 - 9:18 pm | रेवती

हाच अनुभव.

ह्या नावाने जी.एफ. चा नंबर सेव्ह केल्याचा किस्सा आठवला :-D

योगी९००'s picture

2 Dec 2014 - 9:37 am | योगी९००

एकाने 'तुकाराम प्लंबर' ह्या नावाने जी.एफ. चा नंबर सेव्ह केल्याचा किस्सा आठवला
हा हा हा...मग तो एकजण कायम नळ दुरूस्तीसाठी तुकाराम प्लंबरला बोलावत असेल...

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2014 - 10:12 am | टवाळ कार्टा

अश्लील अश्लील ;)

पाषाणभेद's picture

2 Dec 2014 - 10:29 am | पाषाणभेद

तुझी घागर नळाला लाव हा रिंगटोन सेट केला असेल काय?

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2014 - 10:55 am | टवाळ कार्टा

=)) ;)

हाडक्या's picture

3 Dec 2014 - 9:07 pm | हाडक्या

तुझी घागर नळाला लाव

एका "सभ्य" मित्राला याचा सुयोग्य अर्थ साग्र-संगीत समजावून सांगितला होता. बिचार्‍याची निरागसताच लोप पावली हो. ;)

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 9:16 pm | टवाळ कार्टा

एक असाही कट्टा होउन जाउदे... ;)

बिचार्‍याची निरागसताच लोप पावली हो.

अहो, खरं तर तो "चांगल्या" मार्गाला लागला...:)

hitesh's picture

5 Dec 2014 - 6:20 am | hitesh

बोळा निघाला व पाणी वाहते झाले

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 8:37 am | टवाळ कार्टा

काही लोकं या वाक्याला सुध्ध्य सुध्धा अश्लिल म्हणतील :P

हाडक्या's picture

5 Dec 2014 - 4:56 pm | हाडक्या

ट.का., दृष्टी तशी सृष्टी असे म्हणावे काय हो .. ;)

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 10:11 pm | टवाळ कार्टा

:P

नंतर त्या एकीने त्या एकाचा नंबर 'खानावळवाल्या खाडेकाकू' असा सेव्ह केल्याचा ऐकण्यात आलं ... :-D
विनोद असेल कदाचित.

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 9:22 am | योगी९००

मग त्या "खानावळवाल्या खाडेकाकू" यांचा "तुकाराम प्लंबर" शी कसा काय संवाद होत असावा?

तो : तुकाराम प्लंबर आहे का? आज परत नळ दुरूस्तीची गरज आहे.
ती : आहो काकू..रोज रोज काय जेवायला येऊ? आज माझा खाडा मांडा.
तो : पण आमच्या प्रॉब्लेमचे काय? पाणी खुपच वहात आहे.
ती : आहो माझे पोट भरले आहे. आज मला अजिबात जेवायला नको..
...
जाऊ दे अजून लिहीत नाही. लोकं अश्लिल अश्लिल म्हणून ओरडतील..

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 10:02 am | टवाळ कार्टा

=))

बॅटमॅन's picture

3 Dec 2014 - 12:42 pm | बॅटमॅन

अगागागागा =))

हाडक्या's picture

3 Dec 2014 - 9:09 pm | हाडक्या

मेलो मेलो..
*lol* . *lol* . *lol*

अख्खा तिख्खट जिलबीचा लेख पाडशील मेल्या.. !!

पाषाणभेद's picture

4 Dec 2014 - 9:03 am | पाषाणभेद

जबरा

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Dec 2014 - 11:03 am | लॉरी टांगटूंगकर

सांगतो नंदूला.
च्यायला फुकटच्या पब्लिसीटीसाठी कार्ट काही पण करतंय.

स्पंदना's picture

2 Dec 2014 - 12:10 pm | स्पंदना

ह्यो गावला मंद्या!!! :))))

खटपट्या's picture

2 Dec 2014 - 12:20 pm | खटपट्या

चांगलंय नंदू, मंद्या.....

घरगुती बारीक सारीक कामावर मी दहा भागाची सिरीज लिहु शकतो.बरेच गैरसमज दुर होतील.

(हाऊसिंग केअर & सर्व्हिसेस वाला) जेपी

लिहा की ओ मग. लय लोकांचे दुवे घ्येताल.

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 10:33 am | योगी९००

घरगुती बारीक सारीक कामावर मी दहा भागाची सिरीज लिहु शकतो.बरेच गैरसमज दुर होतील.
लिहा की मग.... आम्हा पामरांना उपयोग होईल. नाहीतर तुमच्या "मी पयला" वर टिका केल्याने तुमच्या-माझ्यात गैर(?)समज झाले होते ते दुर होतील.

विटेकर's picture

3 Dec 2014 - 10:10 am | विटेकर

एकदा (२००८) मी धनबाद स्टेशनवर उतरलो साधारण संध्याकाळची पाच ची वेळ होती. माझ्याबरोबर माझे साहेब होते .. विदिशा कडले पण मराठी आनि मनाने अगदी साधे ! मी आपला माझी ब्याग उचलून चालायला लागलो ,पूलावरुन चढून तीन फलाट पार करायचे होते, आगदी किरकोळच होते माझ्यासाठी !
साहेबांनी थांबवले , आणि हमालाला बोलावले त्याच्या हातात सामान द्यायला लावले आणि सांगितले , धनबाद स्टेशनवर असे कितिक लोक उतरतात जे हमाली देऊ शकतील? कदाचित त्याची ही दिवसभराची एकमेव हमाली असेल ! आनि मी पाहिले की खूप लोक ते लाल डगले घालून आशाळ भूतपणाने प्रवाश्यांकडे पहात होते ....
त्या दोन ब्यागांचे मी त्याला ३५ रुपये दिले .....
मला साहेबांचा मुद्दा पटला. बारा बलुतेदार ही एक सिस्टिम होती, लोक जगून निघत असत. नव्या सिस्टीम मध्ये अक्षम लोकांना स्थान नाही !!!
आणि म्ह्णून आपल्याला येत असले तरीही त्यांना त्यांचे काम करु देणे हा मला पटलेला उपाय आहे.
हां,आता नव्या सिस्टिम मधले प्लम्बर , वायरमन , रंगारी जरा जास्त पैसे मागतात , माज करतात .. पण खरे विचाराल तर ......
तुम्ही कमावता ते तरी कुठे कष्टाचे असतात ? तुम्ही मिळवत असलेला पैसा आणि त्यासाठी केलेले कष्ट ( बौद्धिक कष्ट धरुन देखील ) याचे काही गुणोत्तर आहे का ?
की शारिरिक श्रम हे बौद्धिक श्रमापेक्शा नेहेमीच कमी प्रतीचे असतात ???
आणि असा धो धो पैसा प्लंबर वगैरे लोकांना मिळत असता तर आभियांत्रिकी म्हाविद्यालये ओस पडली असती ..

.
अस्तु , हे माझे चिन्तन झाले , तुम्हाला मान्य असायलाच हवे असे कुठे आहे ??

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 11:04 am | योगी९००

तुमची प्रतिक्रिया आवडली पण खालील वाक्ये पटली नाहीत.

तुम्ही कमावता ते तरी कुठे कष्टाचे असतात ? तुम्ही मिळवत असलेला पैसा आणि त्यासाठी केलेले कष्ट ( बौद्धिक कष्ट धरुन देखील ) याचे काही गुणोत्तर आहे का ? की शारिरिक श्रम हे बौद्धिक श्रमापेक्शा नेहेमीच कमी प्रतीचे असतात ???
शारीरिक कष्ट आणि बौद्धिक श्रम एकत्र तोलण्यासाठी काही परीमाण आहे का? बौद्धिक श्रम ही शरीराला तितकेच क्लेश देतात.

नाखु's picture

3 Dec 2014 - 11:24 am | नाखु

सहमत.
मुळात हे "अधुनिक बलुतेदार" तुम्ही किती अडलेले आहात हे पाहून नखरे-माज करतात हे माझे घर बांधतानाचे अनुभव आहेत.ठेकेदाराकडे काम करताना गुमान बांधकाम सामान (टाईल्स्/विटा/पोती) वाहून नेणारे, तसेच दुकानात वेळप्रसंगी दुकानदारकडून हिडिस-फिडीस सहन करतील (विशेष तः प्लंबर मंडळी) पण आपल्याकडे काम संपवताना नको तेव्ह्ढा माज करून नेहमी तुमच्यावर उपकार म्हणून इतक्या कमी दरात काम केले असा अविर्भाव का दाखवतात?
यांना ठरावीक दुकानातून माल घेतल्यास कट मिळ्तो हे मला एका टेंपोवाल्यानेच सांगितले.
सांगीतल्या वेळेवर न येणे आणि नोकरदार असल्यास आपण हाफिसात गेल्यावरच किंवा नेमके आपण घरी पोहोचण्या अगोदरच येऊन जाणे ही यांचा हातखंडा खासीयत.

आता विषय नीघालाच आहे तर माझा गावाकड्चा घर बांधतानाचा अनुभव सांगतो.

गावी घर बांधताना रोजंदारीवर सुतार बोलावले होते. चिर्‍याच्या भिंती बांधुन झाल्या होत्या. आणि छपराचे काम बाकि होते. एका सुताराचे दिवसाचे ३०० रू. मजूरि ठरली होती. चार सुतार सकाळी ९ वाजता येतील अशी अपेक्षा होती पण कधीही कोणीही १०:१५ च्या आधी आलेले आठवत नाही. १०:१५ ला आल्यावर १०:४५ पर्यंत ते हत्यारांना धार लावत असत. मी विचारले की हत्यारांना रोज धार लावाविच लागते का? त्यावर त्यांचे उत्तर "जातिवंत सुतार हत्याराला धार लावल्याशीवाय काम चालुच करनार नाय... हा".
१०:४५ ला काम चालू झाल्यावर जेमतेम ११:३० पर्यन्त काम झाले की त्यांची ऑर्डर यायची, "चाय येवदे" मग मी चायवाल्यासारखा त्यांना कामाच्या ठिकाणी चहा नेउन द्यायचो. चहा पिउन झाल्यावर ते पान खायचे. व १२ वाजता काम चालू व्हायचे. १:०० वाजेपर्यंत काम झाले की दोघेजण जेवायला घरी जायचे आणि दोघे तिथेच जेवायचे.जेवण झाल्यावर हक्काची झोप घ्यायचे. २:१५ ते अडीच वाजता झोपून उठायचे. उठल्यावर परत चहाची ऑर्डर यायची. परत मी चाय्वाल्यासारखा चहा घेउन जाणार. चहा पिउन परत पानाचा तोबरा भरून ३ वाजता काम चालू व्हायचे. चार वाजेपर्यंत काम झाल्यावर परत एकदा चहाचा पुकारा व्हायचा. हे शेवटचे चहापान ४:३० पर्यंत चालायचे आणि कामाला परत सुरवात व्हायची. ५:३० ला काम संपवून मोजुन माझ्याकडून १२०० रू वसूल केले जायचे. १२०० रू दिल्यानंतर त्यांचे म्हणणे असायचे की, "ही तर आमची हजेरी झाली. चापान्याला कायतरी द्या?" (चापानी म्हणजे दारु). १००ची एक नोट अजुन जायची.
एकंदर कामाचा आढावा घेतल्यावर कळायचे की चौघांनी मिळून ४ ते ५ वासे घरावर चढवलेले असायचे. असा आठवडा गेल्यावर आपण पुरते फसवले गेलोय याची कल्पना आली. शेवटी सर्व मजूरांना नारळ दीला आणी एक ठेकेदार पकडून काम पुर्ण केले.

ठेकेदाराची मजा पुन्हा केव्हातरी...

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 10:44 am | योगी९००

मी नुकतेच घर घेतले. रिनोव्हेशनच्या वेळी सेम असाच अनुभव आला. जे काम १५ दिवसात होईल असे वाटले होते ते काम लांबवत ३५ दिवसात पुर्ण केले गेले. माझा पैसा/वेळ गेला आणि मन:स्ताप झाला तो वेगळाच. कधी घरात साधे एक drill मारायचे झाले तरी रु.१०० मागितले जातात. म्हणून एकदम सर्व drills मारायचा प्लॅन केला. सुतार ३ तास उशिरा आला आणि थातूर मातुर काम करून ठरलेल्या मजूरीपेक्षा १०० रु. आधिक घेऊन गेला. काही ड्रिल जी एका रेषेत हवी होती ती त्याने थोडी तिरकी मारली होती (त्यावर चित्र टांगल्यावर लक्षात आले).

आता वरती कपिलमुनींनी दिलेला Drill-set विकत घ्यायचा विचार करतोय.

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 11:00 am | सुबोध खरे

योगी साहेब
घरात हत्यारे असणे ( आणि ती वापरता येणे) हे आजकाल फार मह्त्त्वाचे आहे. कारण त्याला लागणाऱ्या पैश्यापेक्षा या बलुतेदारांच्या दाढी धरण्यापासून मुक्तता मिळते. एकतर ते तुमच्या वेळेत येत नाहीत.संध्या ळी ६ वाजता नक्की येतो सांगून दुसर्या दिवशी १२ पर्यंत न उगवणे इ. "सर्वसाधारणपणे" उर्मट आणि आगाऊ असतात आणि त्यांना पाहिजे तसेच (तुम्हाला पाहिजे तसे नाही) काम करतात.
माझ्याकडे नुसतेच भोक पडायचे यंत्र आहे असे नव्हे तर करवत, पटाशी,टोच्या पासून "एलन की " पर्यंत सर्व हत्यारे आहेत.
कालच दवाखान्याच्या दरवाजाचे अंगभूत कुलूप मी दुरुस्त केले. चावी बनवणार्यापैकी एक जण १२ वाजेपर्यंत आलेला नव्हता दुसरा कुठेतरी बाहेर गेला होता आणि तिसर्याने ते काम मला येत नाही हे सांगितले आणि दुसरे कुलूप विकत घेऊन या मी बसवून देतो सांगितले. ( मुंबईत असल्याने चावी बनवणारे तीन जण एक किमी परिघात सापडतात)
कंटाळून मी ते उघडले तर फक्त आतील स्प्रिंग सटकली होती ती बसवली आणि काम झाले. म्हणजे या तीन लोकांच्या दर्शना साठी लागणाऱ्या वेळेच्या एक चतुर्थांश वेळात माझे काम झाले.

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 11:59 am | योगी९००

घरात हत्यारे असणे ( आणि ती वापरता येणे) हे आजकाल फार मह्त्त्वाचे आहे.
या एकाच कारणासाठी अजूनपर्यंत drill machine घेतले नव्हते. जरा हाताळण्याची भिती वाटत होती. तसेच घरात लहान (आणि दंगेखोर) मुलगा असल्याने चुकून त्याच्या हातात drill bit पडले तर केवढ्याला पडेल हा ही विचार होताच. बाकी छोटी मोठी कामे मीच घरी करतो.

सहज म्हणून सांगतो. कपीलमुनींनी वर दाखवलेला bosch चा set साधारण ३००० ते ३५०० ला मिळेल. म्हणजे साधारणपणे ३५ भोकं पाडली तर हा पैसा वसुल होईल. (रु. १०० एक भोक पाडण्यासाठी). पण एवढी गरज पडणार आहे का? असा विचार केला तर सुताराला घरी बोलावणे स्वस्त पडेल असे उगीचच वाटले. (होणारा मनस्ताप सहन करू तेवढा वेळ ..काय?)

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 12:08 pm | टवाळ कार्टा

तुम्ही घ्या आणि इथे कळवा...बाकी मिपाकर भोके पाडायला तुम्हाला बोलावतील...हा.का.ना.का. :)
(कॄ.ह.घे.)

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 1:26 pm | योगी९००

हलकेच नाही पण सिरीयसली घेतले आहे.

प्रवास खर्च + ५० रु. पर भोक** + चायपाणी (दारूचखणा पण चालेल) असे मिळणार असेल तर मी drilling करायला तयार आहे.
(** ५० रु पर भोक हा १० mm व्यासाच्या आणि २५.४ mm खोलीच्या भोकाचा दर आहे. नाहीतर उगाच माझ्याकडून भोकाच्या नावाखाली किचन विंडो नाहीतर विहीर खोदून घ्याल..)

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 1:28 pm | टवाळ कार्टा

(** ५० रु पर भोक हा १० mm व्यासाच्या आणि २५.४ mm खोलीच्या भोकाचा दर आहे. नाहीतर उगाच माझ्याकडून भोकाच्या नावाखाली किचन विंडो नाहीतर विहीर खोदून घ्याल..)

तुम्ही पुण्यातले वाटते :P

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 1:36 pm | योगी९००

मी मुंबईचा (वरीजीनल कोल्हापुरचा...).

विचारणारे पुण्याचे असू शकतील हे गृहित धरून प्रतिसाद दिलाय वाटतं .. ;)

हॅन्ड ड्रिल मशिन घ्या 200 रु.ला भेटते.
बिटची किंमत 10 रु. पासुन 200 रु. आहे.
गरजेनुसार वापरता येते.हेवी मशनरीचा फक्त व्यावसायीक वापरच होऊ शकतो.
घरगुती नाही.

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 1:36 pm | सुबोध खरे

योगी साहेब
बॉश चा सेट आपल्याला आयुष्यभर पुरेल शिवाय आपल्या कर पासून घरापर्यंत वाटेल तेथे वापरता येईल. मुळात हा मुद्दा परवडण्याचा नाहीच. एखादा उद्दाम माणूस तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतो आहे आणी तुम्हा काही करू शकत नाही या अगतिकपणातून सुटकेचा आनंद मिळाल्याचा असेल.
मी एकदा प्लंबर ला बेसिनचा नळ गळतो म्हणून बोलावले. तो आला नाही मग ते काम मी करून टाकले. सारखा नळ गळण्याचा आवाज आणी त्यापेक्षा पाणी फुकट जात आहे याची खंत. हा पठ्ठ्या दोन दिवसानी उगवला तेंव्हा त्याला रिकाम्या हाताने परत पाठवल्याचा मला (थोडासा आसुरी) आनंद नक्कीच झाला.

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 1:36 pm | सुबोध खरे

कार पासून

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 12:05 pm | टवाळ कार्टा

"एलन की "

???
तुम्ही पण सायकलवाले का? :)

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 1:29 pm | सुबोध खरे

नाही
मोटर सायकलवाले

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 10:42 am | सुबोध खरे

विटेकर साहेब
काही मुद्दे मान्य आणि काही अमान्य.
माझ्या घरातील काचेच्या दाराचा स्क्रू निखळला. मी ते करू शकलो असतो पण उगाच काच फुटली तर काय घ्या यासाठी त्याच्या माणसाला आपल्या मोटर सायकल वर बसवून घरी घेऊन आलो त्याने तो स्क्रू बसवून दिला. त्या दुकानाच्या मालकाला किती पैसे विचारले तर त्याने रुपये ४००(चारशे) फक्त सांगितले. मी त्याला विचारले तू कोणत्या दराने सांगत आहेस त्य्यावर तो म्हणाला मला त्याची हजेरी म्हणून दिवसाला हजार रुपये द्यायला लागतात( या शुद्ध थापा). असो मी त्याला फक्त एवढेच म्हटले कि माझी बायको एम बी बी एस आहे ती कोणाच्या घरी रुग्णाला बघायला गेली तर लोकांचे तिला ३०० रुपये द्यायची तयारी नसते. अर्थात मी त्याच्याशी घासाघीस केली नाही (कारण घासाघीस करून त्याने उपकार म्हणून ५० रुपये कमी केले असते).
माझ्या दवाखान्यात एक नळ बसवायला प्लंबरने ८०० रुपये घेतले ( नळाची किंमत वेगळी). माझ्या घरी रंग लावायला आलेला मजूर अर्धा दिवस घासून काहीच होत नव्हते म्हणून मी त्याला परत पाठवले त्यावर त्याने दिवसाची हजेरी म्हणून ५०० रुपये घेतले.
अशा बलुतेदारांनी मला एक गोष्ट शिकवली कि मुंबईत कोणीही गरीब नाही आणि अशा बलुतेदारांना एक पैसाही डिस्काउंट देऊ नये.
राहिली गोष्ट "तुम्ही कमावता ते तरी कुठे कष्टाचे असतात ?"
२३ नोव्हेंबर रोजी( रविवारी) माझ्या बायकोला एका कुलकर्णी म्हणून रुग्णाचा फोन आला त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला ताप होता. तिची लक्षणे पाहून माझ्या बायकोने तिला औषधे सांगितली आणि रक्त तपासणी करून यायला सांगितले. त्यात काहीच आले नाही. दुसर्या दिवशी ते मुलीला घेऊन आले तिची तपासणी करून बायकोने तिला परत रक्त तपासणी करायला सांगितले. तिला ताप परत आलाच नव्हता तरी. नाखुशीने त्यांनी रक्त तपासणी केली तेंव्हा त्यात प्लेटलेट्स कमी झालेल्या दिसल्या. त्यावर तिची डेंग्यूची तपासणी केली तर तिच्या डेंग्यू आहे हे समजले. तिला जवळच्या रुग्णालयात भरती केले. दुसर्या दिवशी तिच्या अंगावर रक्ताच्या बारीक पुटकुळ्या दिसू लागल्या म्हणून त्या रुग्णालयातून तिला कोहिनूर रुग्णालयात हलवले. तेथे तिला प्लेटलेटस चढवायला लागल्या. ती जवळ जवळ बेशुद्धीत गेली होती. सुदैवाने ती त्यातून बरी होऊन एक आठवड्याने घरी आली. ४०-४५ हजार रुपये खर्च झाला पण मुलीचा जीव वाचला.
मी माझ्या बायकोला विचारले कि कोणतीही लक्षणे नसताना तुला तिला डेंग्यू आहे हे असे कसे वाटले?यावर तिला पण समाधानकारक उत्तर देता आले नाही. पण आतून असे वाटत होते एवढेच ती म्हणाली. या सर्व प्रकरणात तिला पैसे मिळाले रुपये २०० (दोनशे फक्त). रविवारी केलेल्या फोनवरील सल्ल्याची किंमत शून्य.( फोनवर च्या सल्ल्याची काय किमत असते?) एक फायदा झाला त्यांच्या सोसायटीतील तीन जण तिच्याकडे रुग्ण म्हणून मागच्या आठवड्यात आले. पण त्यात काय अमुक हे हॉटेल चांगले म्हणून सांगितले तर आपले मिपाकरही तिथे जातातच कि.
आता यात कष्ट कुठे आले हे आपण विचारालं? परंतु बारावीत ९७ टक्के गुण मिळवून एम बी बी एस ला प्रवेश मिळवायला कष्ट पडतात. त्यानंतर एम बी बी एस च्या तीन परीक्षा पास व्हायचे. मग एक वर्ष ग्रामीण भागात काम करायचे. यात काय कष्ट आहेत ? म्हणूनच लोक २०० रुपये देतात.( नाहीतरी डॉक्टर लुटतातच).
असो

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2014 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे

रविवारी केलेल्या फोनवरील सल्ल्याची किंमत शून्य.( फोनवर च्या सल्ल्याची काय किमत असते?) यावरून आमच्या वैद्यकिय महाविद्यालयातले एक अत्यंत नावाजलेले आणि बक्कळ खाजगी प्रॅक्टीस असलेले ऑनररी फिजिशियन शिक्षकांचे म्हणणे आठवले.

ते म्हणायचे : "आपण डॉक्टर हे शेवटी बौधिक हुशारी बरोबर शारिरिक कष्ट करणारे हमालच (फिजिकल लेबरर). आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून आणि पेशंटच्या अंगाला हात लावल्याशिवाय केवळ सल्ल्यासाठी फी देणे लोकांना पटत नाही. खरे बौधिक तज्ञ म्हणजे जे केवळ प्रत्यक्ष अथवा फोनवरच्या सल्ल्यासाठी हक्काने ठोकून फी घेऊ शकतात, उदा. वकील, सीए, सीएस, इ."

बोका-ए-आझम's picture

8 Dec 2014 - 9:48 am | बोका-ए-आझम

वकील लोक तर " काल रात्री ९ ते ९.३० मी तुमच्या केसबद्दल विचार केला " याचेही पैसे लावतात असे ऐकिवात आहे! ;)

योगी९००'s picture

8 Dec 2014 - 1:03 pm | योगी९००

project नुसार timesheet भरणे आणि त्याप्रमाणे billing करणे हे कदाचित वकील लोकांनीच IT ला शिकवले असावे.

विटेकर's picture

3 Dec 2014 - 12:04 pm | विटेकर

तुमचा अनुभव खूप बोलका आहे यात वादच नाही.
फुकट सल्ला ( आणि सेवा) घेणे आणि शक्यतर काम न करता अधिक पैसे मिळवणे हा भारतीयांचा स्थायी भाव आहे.
सबसिडी / डिस्काउण्ट याची भारतीय मनाला प्रचंड भुरळ पडते.
तेव्हा अश्या गोष्टी घडणे हा आपल्या समाजाचा स्थायी भावच आहे , त्यात समाजाचे सर्व स्तर आले. पण अनेक वर्षे कार्पोरेट मध्ये काढल्यावर मा़झ्या लक्शात आले आहे , पैसा नाही .. गुडविल असेल तर व्यवसाय वाढतो...गुडवील पोटी घालवलेले १०० रुपये, हजारो परत आणून देतात. विशेषतः सेवा क्षेत्रात हे अधिक खरे आहे ! अर्थात अपवाद असतीलच !
अन्य प्रतिसाद :
गावाकडे घराचे बान्धकाम करताना काम चुकारपणा करणारा सुतार आणि आत्ता इथे कंपनीचे नेटवर्क आणि साधने वापरुन माझे विनोदन करुन घेणारा मी .. यात तत्वतः फरक कसा करायचा ?
आमच्या हकाच्या रजा घेणारे आम्ही , घरातल्या कामवालीने दाण्डी मारली की आदळ आपट करतो की नाही ?
तेव्हा माझा मुद्दा इतकाच आहे की ते लोक काम बरोबर करत नाहीत, ते माज करतात .. हे खरेच आहे पण ते सार्वत्रिक सत्य आहे ... आमच्या समाजाचे भयानक वास्तव !
उडदामाजी काळे गोरे | काय निवडावे निवडणारे |

सुबोध खरे's picture

3 Dec 2014 - 1:27 pm | सुबोध खरे

तत्वतः गल्लत
मुळात आपण धंदा आणी नोकरीत गल्लत करीत आहात. नोकरीत एखाद्या बलुतेदाराने( त्यानेच का कोणीही) वाटेल तेंव्हा या आणी वाटेल तेंव्हा जा असे केले तर नोकरीत डच्चुच मिळेल. स्वतःचा व्यवसाय करीत असताना आपण माज दाखवत राहिलात तर तो व्यवसाय फळणार फुलणार नाही हीही वस्तुस्थिती आहे.
राहिली गोष्ट "आपण काम करतो ते कष्टाचे कुठे आहे?" यात (बलुतेदारीसाठी) प्लम्बर किंवा सुतार होण्यासाठी एखादे वर्षाचे जुजबी शिक्षण पुरते ( आठवी पास नंतर किंवा तेही नसेल तर चालेल) हि वस्तुस्थिती इतर सर्व व्यवसायांसाठी नाही. डॉक्टर वकीलच कशाला एम सी ए साठी सुद्धा बारावी नंतर ५ वर्षे घासावे लागतेच. मग हे शिक्षण घेतल्यावर आपण बसून खातो असा आपला अध्यारुथ अर्थ बरोबर नाही. बसून खाणे हे फक्त आपल्या कडे वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ( त्यासाठी सुद्धा आपल्या वाद वडील पूर्वज कोणीतरी कष्ट केलेले असतात ज्याची फळे आपण खात असतो.)
आमचे एक सर एम डी च्या वेळेस म्हणत असत कि ३ वर्षे( एम डी ची) मेहनत करा आणी ३० वर्षे आराम करा किंवा तीन वर्षे मजा करा आणी तीस वर्षे मेहनत करा.
आणखी काय लिहावे?

प्यारे१'s picture

3 Dec 2014 - 1:57 pm | प्यारे१

माझ्या मते 'हजेरी'वर काम देण्यात भयानक वैताग असतो. काम 'अंगावर' द्यावं. आपसुक नखरे, वेळ आणि एनर्जी वाचतात. एवढं एवढं काम करायचं आहे, पैसे बोला, रेट बोला. स्क्वे फू, स्क्वे मी पासून ते एक 'लम्पसम' अमाऊंट सांगून काम उरकायचं.
पैसा थोडा जास्त लागू शकतो पण वाचलेल्या वेळात आपण आपली कामं 'खाऊन, पिऊन, 'अमुक' करुन, हात पुसून, पुढच्या कामाला' लागू शकतो.

कपिलमुनी's picture

3 Dec 2014 - 2:44 pm | कपिलमुनी

काम 'अंगावर' देताना मटेरीयल सकट दिला तर चुना लागतोच .
मटेरीयल आपण आणून देउन काम अंगावर देणे चांगले !

प्यारे१'s picture

3 Dec 2014 - 5:55 pm | प्यारे१

ह्ये बाकी येकदम खरं बोल्ला बगा सायेब.
पन कसंय ना, लोकांना आस्ती घाई. चटाकदिशी काय तं करुन पायजे आस्तंय.

मग आमच्या सार्खे हातावं प्वाट आसलेली लोकं काय कर्तो ना की किर्डीट चालनार्‍या दुकानदाराकडं जाऊन माल आन्तो. १०० च्या जागी ८०चंच आनायचं आनि तुमाला १०० सांगायचं. जुन्या कामामदी पन आस्तंच की कायतर शिल्लक. त्ये पन घुसडायचं गा.

आनि आंगावर काम घ्येतलं तरी आपल्याला बरुबर अंदाज आस्ला कामाचा तरच हुतंय काम येळंत.
पंटर लोकांना बरुबर तेवडं काम करुनच घरी जायचं असं म्हनलं तरच हुतंय. नाय्तं आमाला चुना.

ईलेक्ट्रीकल सामान ए पी एम सी पशी घ्या. पुण्यातला २५ रु चा स्विच १८ ला मिळेल. घरात्ल्या सर्व स्विच बोर्ड आणि प्लग स्विच ची खरेदी. ५०००/- पर्यंत होईल.

कपिलमुनी's picture

3 Dec 2014 - 2:43 pm | कपिलमुनी

मी घरच्या घरी करत असलेली कामे
१. नळ बदलणे, बेसिनचे सिंकपण घरीच बसवले आहे , तोडफोड लागत नाही अशा पाईप्स बदलणे
२. ड्रिलींग करणे
३. लाईट्च्या फिटींगची सर्व कामे ( बटणे , फॅनचे रेग्युलेटर बदलणे)
४. छोटी सुतारकामे ,
५. कार/ बाईकचे ओईल बदलणे , एयर फिल्टर साफ करणे , क्लच , ब्रेक सर्विसिंग, बॅटरीचे पाणी बदलणे ( छोटासा सर्विसिंग)
६. गॅस शेगडीचे सर्विसिंग ( हे एक नवीनच सुरु झालय) ते पण घरीच करतो !
७ जुन्या पद्धतीच्या खिडक्यांना बाहेरून 'लांबी' लावणे.

सहसा काचेच्या आणि लाकडी वस्तूंबद्दल बाहेरून मदत घेतो, घराला रंग सुद्धा स्वतःच लावायची इच्छा होती पण घरूनच विरोध झाला :)

बादवे फारीनमध्ये खुप सारी कामे घरीच करतात असे ऐकून आहे .

लॉरी टांगटूंगकर's picture

3 Dec 2014 - 3:01 pm | लॉरी टांगटूंगकर

घराला रंग सुद्धा स्वतःच लावायची इच्छा होती पण घरूनच विरोध झाला.
माझ्या घरीपण. अजून वाटतंय किमान एक खोली प्रयोगाखातर करायला पाहीजेल होती.

मोहनराव's picture

4 Dec 2014 - 2:24 pm | मोहनराव

मी माझ्या वॉलपेपर घरी स्वतः बसवले आहेत. इकडे लेबर वापरला तर खूप खर्च येतो. अश्या प्रत्येक कामासाठी इकडे मार्केट मध्ये handbook मिलते. स्टेप बाय स्टेप सुचनामुळे आरामात सगळी कामे करता येतात व स्वतः काही केल्याचा आनंद वेगळाच असतो.

जमेल तितकी घरची कामे मी करतो...अगदी गिझर बसवणे इं. बाकी प्लंबर ने येतो असे सांगितले की तो येणार नाही याची १००% खात्री असते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

माझे काही मित्र ह्याच बांधकाम व्यवसायात असल्याने म्हणा...

सुतार्,प्लंबर आणि इलेक्टिशियन यांचा त्रास होत नाही.

डोंबोलीत काही काम असेल तर नक्की सांगा.

उत्तम माणूस नक्की देवू शकतो.