घटकाभरचं झुरणं..

Targat Porga's picture
Targat Porga in जनातलं, मनातलं
20 Nov 2014 - 11:56 pm

प्रेम! हा शब्द तुम्ही फक्त ऐकलेला,वाचलेला असतो.त्या बाबतीत तुम्ही जास्त विचारही केलेला नसतो ती केवळ एक रम्य कल्पनाच आहे अशीच तुमची समजूत असते.ह्या गोष्टीची तुम्हालाही अनुभूती मिळावी ही कल्पना तुम्हाला कधी कधी शिवून जाते पण तुम्ही मात्र 'श्या !आपलं काम नाही हे प्रेम बीम ' अस मनातच म्हणून ती कल्पना करणं सोडून देतात.त्याचे फक्त वाईटच परिणाम असतात असं म्हणून तुम्ही स्वतःला समजावतात. तुमच्या बाबतीत द्राक्षे खरोखरच आंबट असतात .अर्थात तसे तुम्ही भोळे भाबडे ,लाजाळू ह्या विशेषणांनी प्रसिद्ध असतात.(काहींच्या मते कुप्रसिद्ध ) आणि कधी तुम्ही कोणत्या मुलीशी वगैरे बोललेले देखील नसतात.तशी गरजच तुम्ही कधी भासू दिलेली नसते.आणि चुकून माकून बोललाच तर डोळ्यात बघून तुम्हाला बोलताच येत नाही,काहीच सुचत नाही,तुम्ही काहीतरी कारण काढून गच्छंती चं बघत असतात.मग प्रेमाच्या भानगडीत तरी कस पडणार ?.आणि तस मग प्रेमात पडून तुम्हाला मग तोंडावर पडायचा नसतं.हा तुमचा असा स्वभाव बराच काळ तसाच टिकून राहतो.तो बदलावा याची तुम्हाला मुळीच गरज भासत नाही. आणि मग! अशातच एक कुटुंब तुमच्या घरासमोर राहायला येतं.आणि योगायोग म्हणजे त्यात एक समवयस्क तरुणीही असते. तिला बघताच तुम्ही थबकून जातात ती नाजूक,लाजरी,टपोरे डोळे असलेली,लांबसडक केसं असलेली किंचितशी सावळी.,अगदी द्रौपदी सारखी आणि थोडीशी कमी उंच आणि सुबक असते.अतिशय सुंदर.इतकी सुंदर मुलगी तुम्ही कधी बघितलेलीच नसते.तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.तिचा तो केशकलाप,स्मित हास्य,चाल ह्या गोष्टी तुम्हाला क्षणभर खिळवून ठेवतात .तुम्ही पूर्णपणे मोहून जातात.ती तुमच्या डोळ्यातच भरते,डोळे दिपुनच जातात तुमचे. तिला पाहिला तो क्षण आणि त्या नंतरचा बराच काळ तुम्हाला कोणत्या तरी अनामिक पण सुंदर गर्तेत ढकलून जातो.तुम्हाला आजूबाजूचं दुसरं काही दिसतंच नाही,तुम्ही हवेत जणू तरंगायला लागतात,अनेक रोमांच तुमच्या शरीरावर उभे राहतात,तुमच्या हृदयाच्या वीणेच्या तारा झंकारल्या जातात.तुमच्या गालावरून मोरपिसे फिरवल्या गेल्याचा भास तुम्हाला होतो,तुमच मन उंच भरारी घ्यायला लागतं,हवा गुलाबी भासते,सगळीकडे रंगीत ढग पसरल्यासारख वाटतं, सगळीकडे उत्सवच जणू चाललाय इतकं तुम्ही प्रसन्न होतात.तुम्ही नुसते ' आ' वासून बघत राहतात. आणि खूप वेळानंतर मग तुम्ही भानावर येतात.आणि मग तुमचं मन तुम्हाला विचारतं 'हेच का ते love at first site?';आता ती तुम्हाला रोजच दिसत असते. आणि दिसता क्षणीच तुम्हाला परत तसच व्हायला होतं.आणि तुम्ही पुन्हा पुन्हा भानावर येत असतात.आता नकळतच तुम्हाला त्या सौंदर्याचा छंद जडून जातो.एक वेगळीच ओढ निर्माण होते. तुम्ही सतत तिकडेच डोळे लाऊन बसलेले असतात. हर क्षणी तुम्ही तिचाच विचार करायला लागतात.एरवी धीन्च्याक! गाणी ऐकणारे तुम्ही प्रेम गाणे वगैरे ऐकायला लागतात,कविता करायला लागतात.आणि तशातच 'मेरे सामने वाली खिडकी में एक चाँद का टुकड़ा रेहता हें 'हे गान तुम्हाला अधिक अर्थपूर्ण वाटायला लागत. आता तुम्हाला प्रेमाची प्रचिती आलेली असते.अणि ती अनुभूति एव्हाना तुम्हाला मिळालेलीही असते. अणि हो! खरच!!तुम्ही चक्क प्रेमात पडलेले असतात.खरोखरच नकळत! तुमची तिची बर्याचदा नजरानजर होते.तुम्ही बोलायचा बहाना शोधता खरा पण कधी हिम्मतच करत नाही. तुम्ही मात्र त्या सौंदर्याच्या प्रेमात पार बुडालेले असतात.तिचं ते नाजुक हसणं,दिसणं,चालणं तुम्हाला दिग्मूढ करून टाकत.तुम्ही कधी आणि कसं बोलायचं हे न सुचल्याने अस्वस्थ होत असतात.तुमचे इतर विचार थांबून जातात.आणि मग तुम्ही हजारो स्वप्नेच नुसती रंगवायला लागतात.स्वप्नांचा कहर म्हणजे तुम्ही तर कल्पनेतल्या अश्वावर स्वार होऊन मुंडासे पेहरून बोहल्यावर देखील चढून आलेले असतात.ही सारी स्वप्ने खरी व्हावी असंच तुम्हाला वाटत असतं.पण अजूनही तुम्ही कधी बोलायची हिम्मतच केलेली नसते.आता मात्र तुम्ही स्वतःलाच कोसायला लागतात.तुम्ही भोळे लाजाळू ह्या विशेषणांनी कुप्रसिद्धच होतात याची तुम्हाला खात्री पटते.अशीच दिवसांमागून दिवसं जातात.आतापर्यंत कसंतरी बोलूनच टाकायचं याची तुम्ही तयारी केलेली असते.तशी योग्य वेळ तुम्ही बघत असतात.आणि, अचानक! तुम्हाला अनपेक्षित धक्काच बसतो.ती घर सोडून जाणार हे तुम्हाला कळत. आता तुमचे कान सुन्न पडतात,पोटात खड्डा पडतो,तुम्ही कासावीस होतात,तुमचं बहरतं झाड कुणीतरी कापतंय असं वाटू लागतं,तुमचे विचार एकाच ठिकाणी पिंगा घालायला लागतात ,तुमच्या डोळ्यासमोर निर्वात पोकळी पसरते,मन सैरभैर होऊन जातं,तुमचे ते नेहमीचे रंगीत धुक्याचे ढग क्षणात विरघळून जातात.तुम्ही गोठल्यासारखे होतात.तुम्ही तिच्याशी कधी काही बोललेलेच नसतातच.एव्हाना ओळख वाढवली असती तर भविष्यात काहीतरी झालंच असतं हा विचार करून तुम्ही पुन्हा स्वतःला कोसत बसतात.आणि अशातच मग ती निघून जाते....कायमची!!!तुमच्या मनात मात्र ती तशीच राहते...आता तुम्ही त्या अनामिक गर्तेला 'गोड स्वप्न' असं नाव देऊन स्वतःला सावरत बसतात... निष्फळ धीर देत...

साहित्यिकप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

21 Nov 2014 - 12:13 am | बहुगुणी

प्रकटन; अनुभव; विरंगुळा म्हंटलंय, पण हे 'प्रकटन' योग्य वेळीच योग्य व्यक्तीसमोर झालं असतं तर इथे 'विरंगुळा' म्हणून अनुभव लिहायची वेळ नसती ना आली! (हलकेच घ्या :-) )

मिपावरचं पहिलंच लेखन असेल तर स्वागत, हा सत्य अनुभव असेल-नसेल, पण सरळ-साध्या शब्दांत चांगलं लिहिलं आहे. परिच्छेद पाडलेत तर लिखाण आणखी वाचनीय होईल.

9 व्या वर्गात शिकत आसताना.एका सिंधी मुली बाबत 'तारे हें बाराती' हा विचार केलता.पण 10 वी संपायच्या आत ती बोहल्यावर चढली आणी मी पुढे सरकलो.
टारगट पोरा मिपावर स्वागत.

स्वप्नज's picture

21 Nov 2014 - 9:07 am | स्वप्नज

छान लिहलंय...
सगळी जुनी प्रकरणे आठवली....

Targat Porga's picture

21 Nov 2014 - 11:54 am | Targat Porga

घटकाभराच्या 'अनुभवाचे' 'प्रकटन' करून घटकाभराचा 'विरंगुळा' देण्याचा पहिलाच प्रयत्न होता.(हलकेच घेतलं :) )पुढल्या खेपेला आळस झटकून परिच्छेद पाडण्यावर मेहनत घेईन.
जेपी, स्वप्नज.. मनापासून आभार. :)

तुषार काळभोर's picture

21 Nov 2014 - 12:04 pm | तुषार काळभोर

राहिल्या त्या आठवणी...

Targat Porga's picture

22 Nov 2014 - 5:10 pm | Targat Porga

विश्वास बसणार नाही पण खरंतर हे अस आहे. ,गेलेत तिला दिवस…माझ्यावाटी फक्त आठवणी. :/

जेपी's picture

22 Nov 2014 - 5:38 pm | जेपी

भेंडी,
पैलवान म्हणातात गेले ते दिवस,तु मंतो गेलेत तिला दिवस.
सोडा भुतकाळ आणी चल पुढे.
पुना जर आसले प्रतिसाद आले तर डु आयडी समजुन शोधकार्याला लागेन

पायाखालच्या जळीताचे चटके जरा जास्तच भाजत असत ना.. :-)

Targat Porga's picture

22 Nov 2014 - 5:22 pm | Targat Porga

मी ही अनुभवले असते… खिडकी बाहेर पडायला हव होतं फक्त.