ती... भाग ३

सविता००१'s picture
सविता००१ in जनातलं, मनातलं
13 Nov 2014 - 8:25 pm

ती... भाग २:http://misalpav.com/node/29423

या सगळ्यावरून जर असं वाटत असेल की मला तिचा कधीच राग आला नाही, अगदीच गुडी गुडी होत सगळं तर तसंही नाही. ती अगदी सत्ता गाजवायची माझ्यावर. !
मी मोठी होत असताना माझं अस मित्रमैत्रिणीच एक जग होत. त्यावर ती आक्रमण करू पहायला लागली. आमचं कुठे जायचं ठरलं की म्हणायची ‘ सवी आणि मी बाहेर जाणार आहोत. ती येणार नाही.’
.. आईशप्पत!! हे काहीतरी भलतं व्हायला लागलं. मी आईपाशी चिडचिड करायला लागले. तिची सगळी परिस्थिती समजत असून. ती मला तिचाच ठेवा समजत होती आणि माझा विश्व बहरू पाहत होतं. आता मी पण तिच्या घरच्यांसार्खीच स्वार्थी बनायला लागले की काय असं वाटून मी कितीक वेळा स्वत:शी लढले आहे. असं वाटायचं, आहे माझी मावशी, पण प्रत्येक ठिकाणी नाही ना मी तिला नेऊ शकत! कळत कस नाही हिला?
आईला पण ती सतत सांगायची वहिनी, जन्म तू दिला असलास तरी माझी आहे हं ही. तुला योगेश आहेच. हीच लग्न मी ठरवणार आई हो म्हणायची तिला. आणि समजवायचीही – मालू, नक्की. पण तीच शिक्षण झालं की.. आता हे वाढत चाललं. मी म्हणायचे, ‘ए, मी आइची आहे हं माझ्या.’
तर म्हणायची ‘चल ग, माझीच तू !’
**--**
मी पदवीधर होऊन एका सी.ए.फार्म मध्ये आर्टिकल शिप करायला जाऊ लागले. पहिल्या दिवशीच तिने मला तुझ ऑफिस कुठे आहे? म्हणून हैराण करून सोडलं.
मग सांगितलं मी तिला. पर्यायच नाही !
माझ घर पुण्यात चतु:श्रुंगी जवळ. ऑफिस स्वारगेट ला. म्हणजे ६ कि.मी च अंतर. दुसर्या दिवशी ऑफिस सुटायच्या वेळी माझा एक सिनिअर सांगत आला
‘अग एक वेडगळ दिसणारी बाई तुला भेटायचं म्हणते.’
आयला, आता हे फार झालं. चडफड करत मी बाहेर आले. तर ही आमच्या सरांशी सराइत पणे बोलत होती. मी कशी हुशार आहे वगैरे. मी फक्त बेशुद्ध पडायची बाकी. आणि कसनुशी. सरांनाही कळत नव्हतं काल आलेल्या मुलीबद्दल ही कोण बाई सांगतेय सगळं?
..मी कसं आणि काय सांगितल सरांना, आज मला काही आठवत नाही. सर केबिन मध्ये गेल्यावर तिला म्हटलं ‘का आलीस तू इथे मालू मावशी? अग, मीच नवीन आहे इथे !’
तर हसली आणि म्हणाली ‘तू कुठे जातेस मला कळायला नको? म्हणून आले तुला पहायला. सर आणि वहिनीला जाऊन सांगते , सगळ्यात आधी मी पाहिलं लेकीच ऑफिस.’
‘अग पण आलीस कशी? पैसे?’
तर म्हणे- ‘चालत.’
‘चालत?’ मी किंचाळलेच !
तर म्हणाली, ‘तासाभरात आले सुद्धा. त्यात काय?’
मला हसावं का रडावं ते कळेना. सरांना सांगितलं, मी अर्ध्या तासात येते, मग सांगते सगळं. सगळ्यांच्या कुतूहलपूर्ण, प्रसंगी भोचक नजरा चुकवत मी तिला हॉटेल मध्ये घेऊन गेले. खाऊ घातलं. तर यावर प्रतिक्रिया काय यावी?
‘बघ. तुलाच कळलं मला भूक लागली ते! परवापासून काही खाल्लंच नाही ग! मनीषा, माया म्हणाल्या संपलं सगळं. संपलही असेल ग. मुलाबाळांच्या घरात नाही उरत एखादया वेळी.’
... मी फक्त हमसून हमसून रडले. नंतर मात्र ती असेतो दररोज एका वेळचं जेवण आमच्या घरून ठरून गेलं. आईनेच ठरवलं माझ्या.
**--**
आता ती खरच बिथरू लागली. नजरेतही अधेमध्ये अनोळखी भाव दिसू लागले. दिवसेंदिवस गप्प रहायला लागली. अगदीच खोदून विचारलं तर म्हणायची,
‘छान होता गं तो. त्याच्याही काही मर्यादा असतील. नाहीतर नेलं असत नाही का गं त्याने मला त्याच्या घरी? ‘
मी गप्प.
कधी एकदमच उत्साहात यायची,
‘सवी, तू मस्त लग्न कर हं! आणि त्याच्यासाठी दररोज काहीतरी सुरेख स्वयंपाक कर. छान छान पदार्थ कर. तो घरी येतेवेळी सुरेख नटून बस.’
मी चिडवायचे तिला. मावशी, हे नाही जमणार मला. तू म्हणजे गृहशोभिकाची हिरॉइन करते आहेस मला. तर म्हणायची,
‘अग, यात पण मजा आहे. मला फार आवड होती हे सारं करण्याची. फार अपेक्षा केल्या का गं मी आयुष्याकडून ?’
...मी काय सांगणार होते तिला?
आईला सांगितल तर तिचा जीव जळायचा हिच्यासाठी. म्हणायची, ‘वाट लावली इतक्या चांगल्या पोरीची. हिच्याच आईने. आपण जास्त काही करू शकत नाही.’
तिच्या घरच्यांना माज तर इतका की कुणी तिला साडी वगैरे दिली तर त्यांच्या तोंडावर फेकायला कमी करत नसत. हळूहळू त्या कुटुंबापासून सगळेच दुरावले आणि मावशीची फरफट चालू. पहाते उठून दिसेल तिथे चालत सुटायची. किती चालायची त्याचा नेम नाही. पार दुर्दशा. एकदा माझे बाबा आणि अजून एक काका यांनी तिला सरळ येरवड्याला मनोरुग्णालयात दाखल केलं, तिच्या भावांना सांगून.
त्यांना काय, आयतं होतंय म्हटल्यावर काही आक्षेपच नव्हता त्यांचा. तर मावशी तिकडे इतकी सुरेख वागली की त्या लोकांनी बाबांना फोन करून या चांगल्या आहेत. घेऊन जा म्हणून सांगितलं ! आली परत मालू मावशी. पहिले पाढे पंचावन्न!
...यानंतर विशेष सांगण्या सारख काही उरलं नाही. आणखीनच वाईट हालत झाली होती तिची. मी आणि माझं मित्र मंडळ आमच्या अभ्यासात गुंतलो. कधीमधी दिसायची. लहर लागली तर बोलायची. जेवायला आली तरी जेवेलच याचा नेम नसायचा. सोसायटी बडी व्हायला लागली. तिच्यात हिला न ओळखणारे खूप नवीन चेहरे आले. जुने गेले. हिची कदर जुन्यांनाच राहिली. हळहळण्यापुरती. त्यात आम्हीही होतोच की.. नक्कीच.
..आणि मी ? लहानपणी दररोज हक्काने तिच्याकडे जाऊन सगळं वसूल करणारी, आता ती दिसली तर नक्की बोलायचे, अगदी मनसोक्त; घरी आली तर सगळं करायचे तिच्यासाठी.... ...बास ! संपलं ते !
.... मीही दुनियादारी सोडली नाही, नालायक पणात !
**--**
तिचा एक भाऊ दुसरीकडे रहायला गेला. मागोमाग दुसराही. हिला आणि आईला इथेच ठेवून. आता तिची आई गळा काढायला लागली. किती बाई माझी मुलं कृतघ्न! आईची कदर नाही त्यांना वगैरे म्हणायला लागली. आणि ही कशी वागली माझ्या मालूमावशीशी? तिच्यासारखीच तिची मुलं! पण ही मालू मावशी नावाची तुळस त्या भांगेत होती तिचा काय दोष? सहन सहन केलं फक्त तिनं! आई सारख्या शिव्या पण नाही दिल्या कुणाला! पण तिची आई फार दिवस नाही राहिली. मग ही एकटीच. काहीतरी करायची, खायची कुणी दिलं तर नाहीतर अफाट चालणं आहेच.
मग मध्ये मला एक स्थळ आलं सांगून. घरी ती हालचाल. कारण या मुलाने माझ्या मावसबहिणीच्या लग्नात पाहिलं मला. आणि आला माझ्या मेव्हण्याला घेऊन घरी. त्यामुळे सगळंच अनपेक्षित. मावशी सोसायटीतच नव्हती. तिला काहीच माहित नव्हतं. इकडे पत्रिका वगैरेचा आग्रह होता. ती पाठवेपर्यंत आई होती माझी.
आणि अचानक एके दिवशी पहिला अन शेवटचा हार्ट अटॅक येऊन आम्हाला काही कळायच्या आत आई गेली ! सुन्न होणे म्हणजे काय हे सुद्धा समजलं नाही आम्हाला. तेव्हा लग्न वगैरे कोण करणार विचार? नखात रोग नसलेली माझी आई आत्ता आहे म्हणे तो नव्हती !
माझा होणारा नवरा म्हणाला की हे दिवस वगैरे झाले की मग आपण लग्न करु. रजिस्टर. माझ्या घरच्यांनाही ते आवडलं. पसंत पडलं. आता हे अगदीच मोजक्या लोकांना माहीत होत. ..तिला ही बातमी कुठून कशी कळाली कोण जाणे !. पण भन्नाट खूष झाली. माझ्या लग्नाची जी काय तयारी करायची ती पण मीच केलीये. बाबा सावरलेच नव्हते.
अशीच मी काही आणायला गाडी काढली आणि सहज समोर लक्ष गेलं. मावशी !
.. पार रया गेलेली. पण तोंडभर हसू.
‘ये ग पोरी. जवळ तरी बैस माझ्या’ म्हणाली. मी गाडी बाजूला लावली. समोरच एक छोटं हॉटेल होत. तिथे तिनेच शिरा – कॉफीची ऑर्डर दिली. म्हणाली- ‘हेच माझ्याकडून केळवण हं तुला. एवढच देऊ शकते तुझी मावशी तुला.’
म्हटलं ‘अगं हे खूप आहे मावशी. कशाला करते आहेस हे सारं?’
तर म्हणाली ‘वा गं, वहिनी नाहीये माहित आहे मला. पण तू छान संसार कर हं! करशीलच. बरं झाल आधी तुझंच लग्न झालं. आता तू योगेश चं लग्न कर. त्याच्यासाठी काहीही कर. पण तुझं आधी होतंय ना? बास.’
आणि सारखी म्हणायला लागली ‘परत भेटशील, नाही भेटशील, माहीत नाही. विसरू नकोस हं मला.’
मला काय बोलावं कळेना.
मग अचानक माझे दोन्ही हात हातात घेतले आणि खूप रडली. मुक्याने. तासभर मी फक्त तिला थोपटत होते. रडतच!
काही वेळानं तिचा आवेग ओसरला आणि अचानक उठली. काहीच न झाल्यासारखी म्हणाली- ‘रडतेस काय वेडाबाई? लग्न आहे ना तुझं ? हसरी, समाधानी रहा.’
आणि धावत निघून गेली !
मी थोडावेळ ती गेली तिकडे पहातच राहिले.
हॉटेल वाला म्हणाला ‘ बहोत भुगता है लगता है इसने. आपकी पहचान वाली है क्या? पागल है! कभी इतना नही बोलती!’
मी ओरडून म्हणाले ‘पागल नही है, दुनिया ने बना दिया ! ‘
तो पाहतच राहिला !
**--**
खर तर माझ लग्न कुठल्या मूडमध्ये मी केलंय ते माझ मला माहीत. एकीकडे माझी सगळ्यात प्रिय आई, माझी फास्टेस्ट फ्रेंड गेली. अचानक. ती नाहीये हे पचवायच्या आत लग्न. सगळं अगम्य !
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शेजारच्या काकू धावत आल्या.
‘ योगेश चल लवकर!’
तो ऑफिसच्या गडबडीत.
‘काय हो काकू? ‘
‘अरे, मालू गेली रात्री झोपेत. दार उघडं आहे तिचं! आणि दिसतेय तरी बघ कशी शांत आणि मुळात होती तशी सुंदर !’
योग्या गुल.
त्याने मला सांगितलं. म्हटलं, ‘अरे काहीतरी काय? काल संध्याकाळी बरोबर होतो आम्ही !’
पण खरंच असं झालय !
... मलाही कळत नाही. माझ्या इतक तिच्या साठी कुणी खंतावत नाही. हा कुठला योग होता मालू मावशीचा अन माझा ?
...मोठा यक्षप्रश्न आहे, कधी सुटेल अस वाटत नाही...!

कथा

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

13 Nov 2014 - 8:31 pm | मधुरा देशपांडे

आधीही वाचताना डोळे भरुन आले होते. आता पुन्हा. :(

का होतं ना असं? का वागतात असे लोक?

माधुरी विनायक's picture

14 Nov 2014 - 2:46 pm | माधुरी विनायक

माणूस असूनही...

बॅटमॅन's picture

14 Nov 2014 - 3:21 pm | बॅटमॅन

:(

आधीही वाचताना वाईट वाटलं होतं, सख्खे लोकच असे वागले तर बाकीच्यांची काय कथा. तिला तुझा आणि तुझ्या घरच्यांचा तरी जरा आधार मिळाला हिच काय ती जमेची बाजु.

शिल्पा नाईक's picture

16 Nov 2014 - 10:01 pm | शिल्पा नाईक

शब्दच नाहित. डोळे भरुन आले खरच. वाईट वागतात घरचेच.

आतिवास's picture

16 Nov 2014 - 11:37 pm | आतिवास

चटका लावणारं लेखन.
अनेक माणसांचे व्यवहार (आणि कधी कधी आपलंही मन) आपल्याला समजत नाहीत, हेच खरं!
वाईट वाटलं खूप वाचून.

स्वीत स्वाति's picture

19 Nov 2014 - 12:29 pm | स्वीत स्वाति

सुन्न झाले .
खरेच माणसे अशी वागू शकतात ?
वाचताना डोळ्यात कधी पाणी आले कळलेच नाही .

शित्रेउमेश's picture

14 Nov 2019 - 12:40 pm | शित्रेउमेश

तुमच्या मालु मावशी ने रडवलं.... :'(

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2019 - 4:20 pm | मराठी कथालेखक

छान कथा.. या आधी वाचनात आली नाही...
खूप जास्त निस्वार्थी (खरंतर इथे selfless हा इंग्शिश शब्द जास्त योग्य) असणं हा गुन्हाच आहे. या गुन्ह्याची शिक्षा मालतीला मिळाली.

श्वेता२४'s picture

14 Nov 2019 - 5:39 pm | श्वेता२४

.