जागावाटपाची अजून एक युक्ती : नो मॅन्स लँड

हाडक्या's picture
हाडक्या in राजकारण
22 Sep 2014 - 4:35 am

जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात.

आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्‍या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत.

असाच एक सुचलेला हा उपाय:
जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय.

भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा.

उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५.
पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत.

मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको.

उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते.

हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान.
बाकी जय महाराष्ट्र..!!

(अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 3:18 pm | बॅटमॅन

सगळ्यांचा 'नाश' झाला तर तो इक्विलिब्रियम बाकी खास असेल ;)

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 3:20 pm | हाडक्या

गूगलून जेवढे 'Nash equilibrium ' बद्दल कळाले त्यावरुन तरी म्हणता येईल की 'नाही', फक्त या क्षणी सर्वांना 'कमीत कमी नुकसान' यासाठी ह्या उपायाचा विचार व्हायला काही हरकत नसावी.

@पोटे, बंडखोरी रोखण्याचा उपाय मण म्हणू शकता ना याला ?

श्रीगुरुजी's picture

22 Sep 2014 - 4:12 pm | श्रीगुरुजी

दोघांनीही स्वतंत्रपणे लढावे हेच उत्तम. आपल्यामुळे भाजप महाराष्ट्रात वाढला हा शिवसेनेचा स्वतःविषयी एक गोड गैरसमज आहे. १९८६ मध्ये युती होईपर्यंत शिवसेनेला मुम्बई-ठाण्याच्या बाहेर कोणीही ओळखत नव्हते. १९६६ साली स्थापन झाल्यानंतर आपला पहिला आमदार निवडून आणायला शिवसेनेला तब्बल १९ वर्षे लागली होती. १९८६ पर्यंत शिवसेनेला अवघा १ आमदार निवडून आणता आला होता व तो सुद्धा तब्बल १९ वर्षांनी आणि तो सुद्धा मुम्बईमध्ये.

या उलट १९८० मध्ये स्थापन झाल्यावर भाजपने अवघ्या दीड महिन्यात भाजपने महाराष्ट्राच्या विविध भागात आपले १२ आमदार निवडून आणले होते. १९८५ मध्ये सुद्धा जेव्हा शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला तेव्हा भाजपचे १६ आमदार निवडून आले होते.

१९९० मध्ये युती झाल्यावर शिवसेनेच्या आमदारांची संख्या १ वरून ५२ वर गेली तर भाजप १६ वरून ४२ वर पोहोचला. जे नवीन ७७ आमदार निवडून आले त्यातले ५१ शिवसेनेचे व २६ भाजपचे होते. शिवसेनेला भाजपमुळे भाजपच्या तुलनेत दुप्पट फायदा झाला हे उघड आहे.

२००९ मध्ये सुद्धा १६९ जागा लढवून सेनेला फक्त ४४ जिंकता आल्या (फक्त २६.०३ टक्के) तर भाजपला ११९ लढवून ४६ जिंकता आल्या (३८.६५ टक्के). सुरवातीपासूनच महाराष्ट्रात शिवसेनेच्या तुलनेत भाजपला जास्त जनाधार आहे. भाजपने शिवसेनेपुढे नमते न घेता आपल्या अटींवरच युती करावी.

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 5:07 pm | हाडक्या

श्रीगुरुजी, with all due respect, आपले मत आपल्यालाच पक्षपाती वातत नाही का?

या उलट १९८० मध्ये स्थापन झाल्यावर भाजपने अवघ्या दीड महिन्यात भाजपने महाराष्ट्राच्या विविध भागात आपले १२ आमदार निवडून आणले होते. १९८५ मध्ये सुद्धा जेव्हा शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला तेव्हा भाजपचे १६ आमदार निवडून आले होते.

जर एवढी ताकद होती तर मग १६९/११९ हे सूत्र भाजपाने का स्वीकारले असावे असा प्रश्न पडत नाही का इथे?

भाजपने शिवसेनेपुढे नमते न घेता आपल्या अटींवरच युती करावी.

हे जरी वादाकरता मान्य केले तरी लोकसभेच्या निकालांमुळे भाजपा जास्त आवाज चढवत आहे असे नाही का ? मग इतकी वर्षे गप्प बसलेले आता आवाज करायला लागल्यावर शिवसेना याला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न करील तर त्यात नवल ते काय ?

श्रीगुरुजी's picture

22 Sep 2014 - 8:59 pm | श्रीगुरुजी

>>> जर एवढी ताकद होती तर मग १६९/११९ हे सूत्र भाजपाने का स्वीकारले असावे असा प्रश्न पडत नाही का इथे?

गरजवंताला अक्कल नसते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत धूळधाण उडाल्यावर वाजपेयींकडून अडवाणींकडे सूत्रे आली. भाजप निव्वळ स्वतःच्या बळावर वाढणार नाही. त्यासाठी इतर काँग्रेसविरोधी पक्षांची मदत लागेल हे त्यांनी ओळखून स्थानिक पक्षांबरोबर युती करण्याची गरज ओळखली. याच गरजेतून १९८६ मध्ये सेना-भाजप युती आकाराला आली. महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेसविरोधात फक्त जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष व शेकाप, शिवसेना इ. किरकोळ काही जिल्ह्यांपुरते मर्यादीत असेलेले पक्ष होते. तत्कालीन जनता पक्षात फक्त समाजवादी शिल्लक होते ज्यांचा काँग्रेसपेक्षा भाजपला जास्त विरोध होता. त्यामुळे सेना हाच युतीसाठी एकमेव पक्ष शिल्लक होता. मुम्बई-ठाण्याबाहेर कधीही अस्तित्व नसलेल्या सेनेने ही संधी पटकावून भाजपच्या मदतीने स्वतःचा विस्तार केला व पुढील निवडणुकात दांडगाई करून भाजपच्या हक्काच्या अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्या (उदा. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ इ.). स्वतःच्या वृद्धीसाठी भाजपला तडजोड करावी लागली. अगदी २००९ मध्ये सुद्धा शिवसेनेने भाजपचा हक्काचा गुहागर मतदारसंघ हिरकावून घेतला. स्वत:च्या गरजेसाठी १६९-११९ ही तडजोड मान्य केली.

जोपर्यंत भाजप सत्तेबाहेर होता तोपर्यंत भाजपने सेनेची मुजोरी सहन केली. आता भाजप केंद्रात सत्तेत आहे व तिथे शिवसेनेच्या टेकूची गरज नाही. दुसरीकडे राज ठाकरे, राणे, नांदगावकर इ. महत्त्वाचे नेते सोडून गेल्यामुळे आपण दुर्बल झालो आहोत हेच सेनेला मान्य नाही. २००९ मध्ये भाजपपेक्षा जास्त जागा लढून भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्याने या नेत्यांनी सेनेचे किती नुकसान केले आहे हे दिसून आले होते. आता थोरले ठाकरे सुद्धा नाहीत. त्यामुळे सेना अजूनच दुर्बल झाली आहे. तरीसुद्धा मुजोरी कायम आहे. भाजपला स्वबळावर शिवसेनेपेक्षा कितीतरी जास्त जागा मिळण्याची खात्री आहे. त्यांचे अंतर्गत सर्वेक्षण व इतर काही वाहिन्यांचे सर्वेक्षण हेच सांगतात. त्यामुळे आता भाजप ऐकणार नाही. आज माघार घेतली तर भविष्यात कायमच तुच्छ वागणूक मिळेल याची भाजपला खात्री आहे. स्वतःचा जनाधार जास्त असताना व केंद्रात गरज नसताना शिवसेनेची मुजोरी भाजप ऐकून घेणार नाही. एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही. त्यामुळे भाजपने वेगळे होऊन स्वबळावर निवडणुक लढावी. कदाचित यावेळी सत्ता मिळणार नाही. परंतु शिवसेनेच्या जोखडातून कायमची मुक्ती मिळेल. शिवसेनेच्या अटी मान्य करून जरी सत्ता मिळाली तरी कायमच शिवसेनेच्या ओंजळीने प्यावे लागेल. त्यामुळे स्वतंत्र लढावे हे उत्तम.

>>> हे जरी वादाकरता मान्य केले तरी लोकसभेच्या निकालांमुळे भाजपा जास्त आवाज चढवत आहे असे नाही का ? मग इतकी वर्षे गप्प बसलेले आता आवाज करायला लागल्यावर शिवसेना याला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न करील तर त्यात नवल ते काय ?

शिवसेनेची आता गरज उरलेली नाही. त्यामुळे भाजप आता मागील अपमानांचा वचपा काढणारच आणि शिवसेना इतक्या वर्षांच्या सवयीमुळे भाजपला चेपायला बघणारच. शिवसेनेला १९८० मध्येही महाराष्ट्रात भाजपपेक्षा कमी जनाधार होता आणि २०१४ मध्ये तसेच आहे. पण आता काळ बदलला आहे. आता भाजपला केंद्रात निर्विवाद बहुमत आहे. भाजप अजून ५ वर्षे वाट पाहू शकतो. पण शिवसेनेने भाजपची साथ सोडली तर उद्धव ठाकर्‍यांचा नितीशकुमार होईल हे नक्की.

शिवसेना म्हणजे अद्रमुक, द्रमुक, तेदे किंवा बिजद नव्हे, ज्यांनी स्वबळावर अनेकदा सत्ता मिळविली आहे. ते पक्ष राष्ट्रीय पक्षांना स्वतःच्या अटींवर नाचवू शकतात. शिवसेनेने शहाणपणाने वागून भाजप अजूनही १३० जागांवर तडजोडीला तयार आहे ते मान्य करून पुढे जावे. नाहीतर नितीशकुमारांसारखे अस्तित्व संपून जाऊन हाती भोपळा येईल.

कदाचित स्वतंत्र लढल्यावर भाजपला सत्ता मिळविता येणार नाही. पण शिवसेनाही स्वबळावर २५-३० च्या पुढे जाणार नाही. भाजप अजून ५ वर्षे थांबू शकतो. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे इतर अनेक राज्यांसारखे एक राज्य आहे. पण शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर कोठेही पुसटसे सुद्धा अस्तित्व नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपच्या मदतीशिवाय सेनेचे चालू शकत नाही. भाजपशी युती तोडल्यावर २०१७ मध्ये शिवसेनेला मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इ. महापालिका सुद्धा गमवाव्या लागतील व पुढील काही वर्षातच शिवसेना अस्तित्वहीन होईल.

हाडक्या's picture

23 Sep 2014 - 2:27 pm | हाडक्या

शिवसेनेने शहाणपणाने वागून भाजप अजूनही १३० जागांवर तडजोडीला तयार आहे ते मान्य करून पुढे जावे. नाहीतर नितीशकुमारांसारखे अस्तित्व संपून जाऊन हाती भोपळा येईल.

वरती भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग टाकलाय.. जरी त्यांच्याशी पूर्णतः सहमत नसलो तरी पण तुमचे 'शिव्सेनेचा नितीश कुमार होईल' हे मत आणि त्यांचे अगदी वत्यास असे 'भाजपचा नितीश कुमार होईल' हे मत ते पण बरोबर वाटतेय ना..

मुम्बई-ठाण्याबाहेर कधीही अस्तित्व नसलेल्या सेनेने ही संधी पटकावून भाजपच्या मदतीने स्वतःचा विस्तार केला व पुढील निवडणुकात दांडगाई करून भाजपच्या हक्काच्या अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्या (उदा. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ इ.). स्वतःच्या वृद्धीसाठी भाजपला तडजोड करावी लागली. अगदी २००९ मध्ये सुद्धा शिवसेनेने भाजपचा हक्काचा गुहागर मतदारसंघ हिरकावून घेतला. स्वत:च्या गरजेसाठी १६९-११९ ही तडजोड मान्य केली

तुम्ही भाजपचे समर्थक म्हणून तुम्हाला हहाच्प्रश्न विचारावासा वाटतोय.. या तडजोडी का स्वीकाराव्या ? गुहागरची तडजोड स्वीकारून काय फायदा झाला. जागा पण गेली आणि चांगले कार्य करणारा माणूस पण गेला ना.?

भाजप अजून ५ वर्षे थांबू शकतो. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे इतर अनेक राज्यांसारखे एक राज्य आहे.

हाच त्यांचा कच्चा दुवा पण म्हणू शकता ना की ते लोकांना 'आपल्या राज्यासाठी झटणारे' असे वाटणार नाहीत यामुळे. तसेच ते थांबू शकतात हा चुकीचा भ्रम झाला. इथले निकाल त्यांना इतर ठिकाणी परिणाम करु शकतात. आत्ता कुठे सुरुवात आहे भौ.

भाजपबद्दल सहानुभुती आहे पण त्यांचीही वाटचाल कुठेतरी 'काँग्रेसी' होत चाललेली आहे असे वाटते. ते होऊ नये.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2014 - 9:06 pm | श्रीगुरुजी

>>> वरती भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग टाकलाय.. जरी त्यांच्याशी पूर्णतः सहमत नसलो तरी पण तुमचे 'शिव्सेनेचा नितीश कुमार होईल' हे मत आणि त्यांचे अगदी वत्यास असे 'भाजपचा नितीश कुमार होईल' हे मत ते पण बरोबर वाटतेय ना..

जो आपल्या खर्‍या ताकदीपेक्षा स्वतःला जास्त ताकदवान समजतो आणि जो दुसर्‍याच्या ताकदीला कमी लेखून त्याचा उपमर्द करतो, त्याचाच नितीशकुमार होतो. महाराष्ट्रात सुरवातीपासूनच शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद जास्त होती हे मी वर दाखवून दिले आहे. हे १९८० मध्ये सत्य होते आणि २००९ मध्ये त्याची पुनर्प्रचिती आली. त्याचवेळी शिवसेनेने वारंवार भाजपला कमी लेखले. त्यामुळे जर नितीशकुमार होणार असेल तर तो शिवसेनेचाच होईल, भाजपचा नव्हे.

>>> हाच त्यांचा कच्चा दुवा पण म्हणू शकता ना की ते लोकांना 'आपल्या राज्यासाठी झटणारे' असे वाटणार नाहीत यामुळे. तसेच ते थांबू शकतात हा चुकीचा भ्रम झाला. इथले निकाल त्यांना इतर ठिकाणी परिणाम करु शकतात. आत्ता कुठे सुरुवात आहे भौ.

याच न्यायाने तसं काँग्रेसबद्दलही वाटू शकतं. पण जनता तसा विचार करत नाही.

आपण मराठी माणसांसाठी लढतो असा शिवसेनेचा भ्रम आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा या दाव्यावर कधीच विश्वास नव्हता. अन्यथा १९६६ पासून ४८ वर्षात किमान एकदा तरी महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला सत्ता दिली असती. तामिळनाडूतील द्रमुक/अद्रमुक हे तामिळींचेच पक्ष आहेत यावर तामिळ जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे एकदा नव्हे तर अनेकदा राष्ट्रीय पक्षांना डावलून तेथील जनतेने त्यांना स्वबळावर निर्विवाद बहुमत दिले आहे. बिजद, तेदे इ. प्रादेशिक पक्षांनी देखील अनेकदा स्वबळावर बहुमत मिळविले आहे. शिवसेनेला ते कधीही जमले नाही. कारण शिवसेना हा मराठी लोकांसाठीचा पक्ष आहे यावर बहुतेकांचा विश्वास नाही ('मराठी', 'मराठी' असा नारा लावून प्रत्यक्षात अनेक अमराठी लोकांना शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार केल्याचे लोकांना समजते, मुम्बई महापालिकेची अनेक कंत्राटे अमराठी व्यक्तींना जातात हेही जनता समजून आहे.). किंबहुना महाराष्ट्रातील कोणताही पक्ष फक्त मराठी लोकांच्या हितासाठी आहे यावर जनतेचा विश्वास नाही. याउलट शिवसेना अमराठी लोकांच्या विरोधात आहे यावर मात्र बहुतेकांचे एकमत आहे. शिवसेना मुम्बईत स्वतंत्र लढली तर मुम्बईतील गुजराती, उत्तर भारतीय वा इतर अमराठी जनता शिवसेनेला मते देणार नाही. केवळ भाजपबरोबर असल्याने आजपर्यंत शिवसेनेला या लोकांची मते मिळाली. पण स्वबळावर मते मिळणार नाहीत. याउलट मराठी मते ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी इ. सर्व पक्षात विभागली जातात. त्यामुळे भाजपबरोबर राहणे यावरच शिवसेनेचे अस्तित्व टिकून राहील. ज्या क्षणी शिवसेना एकटी लढेल, त्याच क्षणी शिवसेनेचा नितीशकुमार होईल.

>>> भाजपबद्दल सहानुभुती आहे पण त्यांचीही वाटचाल कुठेतरी 'काँग्रेसी' होत चाललेली आहे असे वाटते. ते होऊ नये.

सहमत

असं असेल तर मग भाजपने तोडावी युती.. कशाला ते पदती बाजू घेऊन जू वागवायचं ते. ताकद असताना देखील कमी जागा घेऊन लढणारा शहाणा कसा म्हणायचा ? स्वबळावर न लढण्याच्या भुमिकेच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण कुठेतरी विसंगत वाटतेय.

तुम्ही कदाचित तेवढा तटस्थ विचार करणार नाही पण भाजपचे स्थानिक नेतृत्व मुंडे-महाजन गेल्यापासून अगदीच मिळमिळीत वाटतेय. देवेंद्रला प्रमोट केले जातेय असे दिसतेय पण इतरांचे काय ? किमान आदर वाटावा असा एक जण तरी आहे काय ? (दुसर्‍या बाजूला आहे का? असा प्रश्न याचे उत्तर नव्हे)

चौकटराजा's picture

23 Sep 2014 - 4:33 pm | चौकटराजा

"खामोश गुर्जी-! " उधोजी राजे वाघाची नक्क्ल करीत गुर्गुरले. "तुम्ही आमच्या पक्षाला काय शू शेणा समजला काय?
खबरदार ! काही सत्य सांगाल तर ! मायभवानीची आन घून सांगतो. १५१ पयकी १५२ जागा जि़कणार त्याशिवाय चैन पडणार नाही आम्हाला.. कोण आहे रे तिकडे ? या गुर्जीला आमच्या समोरून आताच्या आता घेऊन जा कसे ! "

अमोल केळकर's picture

22 Sep 2014 - 4:26 pm | अमोल केळकर

उत्तम विचार,
ताबडतोब मातोश्रीला कळवा

अमोल केळकर

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 4:57 pm | हाडक्या

कोणाच्या मातोश्रीला ?
आमच्या मतोश्रीस कालच ऐकवून झाले आहे. बाकीच्यांनी आपापल्या मातोश्रीस कळवावे हवे असेल तर.. *lol*

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 10:11 am | खटपट्या

बाजारात तुरी आणि भट भट्णीला मारी !!!

अजून एक उपाय आहे. राष्ट्रवादी, खान्ग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, रिपाई यांनी २८८ जागा वाटून घ्याव्यात आणि शरद मामांना मुख्यमंत्री करावे. मंत्रीमंडळ सुद्धा वाटून घ्यावे.
एकमेका सहाय्य करू, अवघे खाऊ कुरण.

हाडक्या's picture

23 Sep 2014 - 2:15 pm | हाडक्या

हा हा हा..

हा सगळ्यात भारी उपाय आहे. तो आठवले तिकडे ठेवलेल्या बाईसारखा वागतोय.. शरद पवारांचा फोन आलाय म्हणून सांगतोय. तुम्ही नाही तर रा. कॉ बरोबर जाईन म्हणे. अरे काय जनाची नाय तर मनाची तरी..

प्रसाद१९७१'s picture

23 Sep 2014 - 2:34 pm | प्रसाद१९७१

'पोपट मेला आहे, शिवसेना-भाजप युती तुटली आहे', या चर्चेतली हवाच आज युतीच्या नेत्यांनी काढून टाकली आहे. शिवसेना-भाजप ही देशातील सर्वात जुनी युती कायम आहे आणि कायम राहील, अशी ग्वाही खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेच्या महासंग्रामात शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची महायुती एकसाथ उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मटाची बातमी. हम तो ये पैलेईच बोला था.

पोटे's picture

25 Sep 2014 - 8:16 pm | पोटे

घटस्थापनेला घटस्फोट झाला

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2014 - 8:52 pm | श्रीगुरुजी

युती संपुष्टात आल्यावर सेनेचा प्रथम शत्रू काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे नसून भाजप झाला आहे. उद्धव ठाकर्‍यांच्या कालच्या भाषणावरून त्याची प्रचीती आली. 'मला भाजपवर टीका करायची नाही' असे म्हणत ९० टक्के भाषण भाजपवरील टीकेने भरले होते. 'सामना'तील बहुतेक बातम्यात भाजपला शिव्या दिलेल्या असतात.

महाराष्ट्राने ह्याला गाडले, त्याचा कोथळा बाहेर काढला, अमुकची बोटे तोडली, तमुकचे मस्तवाल हत्ती कापून काढले, आमचे वाघ यँव करतील, आमच्या डरकाळीने सर्वजण घाबरतील असली कंटाळवाणी भाषा सेना किती दिवस वापरणार आहे खुदा जाने.

महाराष्ट्राने ह्याला गाडले, त्याचा कोथळा बाहेर काढला, अमुकची बोटे तोडली, तमुकचे मस्तवाल हत्ती कापून काढले, आमचे वाघ यँव करतील, आमच्या डरकाळीने सर्वजण घाबरतील असली कंटाळवाणी भाषा सेना किती दिवस वापरणार आहे खुदा जाने.

या बाबत सहमत.. अशी भाषा वापरून नक्की काय साध्य होते कोण जाणे.

शिद's picture

29 Sep 2014 - 3:27 pm | शिद

इतके दिवस भाजपा आणि मित्रपक्षांच्या गळ्यातगळे घालून फिरताना शिवसेनेला त्यांच्यात काही दोष दिसले नाहीत आणि आता युती तुटल्यावर लगेचच काटे टोचायला लागले वाटतं.

भंपकपणा सगळा.