प्राजुच्या मागणीवरून ही कृती देत आहे.
साहित्य- १ वाटी रवा,१ वाटी मैदा,१.५ वाटी अगदी बारीक रवा,१ वाटी खवा, १/४ वाटी खसखस,२ वाट्या पिठीसाखर, वेलचीपूड,दूध,तूप,तांदळाची पिठी
कृती- १ वाटी रवा+मैदा तूपाचे मोहन घालून दुधात घट्ट भिजवा.
बारीक रवा तूपावर खमंग भाजून घ्या.खवाही भाजून घ्या. खसखस भाजून व कुटून घ्या. रवा,खवा,खसखस,पिठीसाखर,वेलचीपूड एकत्र करा.मळून लहान गोळे करा.
भिजवलेला रवा+मैदा कुटून किवा फूड प्रोसेसर मधून काढून घ्या,ह्या कणकेचे पुरीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करा आणि पुरणपोळीत जसे पुरण भरतो त्याप्रमाणे खव्याचे गोळे भरून तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने लाटा.तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद भाजा. गार करा आणि नंतर तुपात किवा रिफाईंड तेलात तळा.
(मी तव्यावरच तूप टाकून पराठ्यांसारख्या भाजते आणि थोड्याशा क्यालरी आणि कष्ट वाचवते.)
प्रतिक्रिया
2 Aug 2008 - 7:23 pm | प्राजु
ही रेसिपी म्हणजे केवळ सुगरणीच करतात. बघू मला जमते का? :)
पण, तू मी सांगितल्या वर लगेचच इथे दिलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या आता घरच्यांवर प्रयोग ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Aug 2008 - 7:36 pm | मुकेश
गार करा आणि नंतर तुपात किवा रिफाईंड तेलात तळा.
लहानपणापासून कधी तळलेल्या साटोर्या खाल्ल्या नाहीत, आमच्याकडे भाजूनच करतात.
घरी प्रयोग करायला सांगतो.
मुकेश
3 Aug 2008 - 2:50 am | अनामिक
माझी आई न भाजताच तळते. आणि माझ्या माहिती प्रमाणे सारणात रवा घालत नाही. सारण हे खवा, खसखस, वेलची घालून भाजून तयार करते. तुम्ही दिलेली रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले! माझ्या घरी गणपती आणि कृष्णाष्टमीच्या वेळी साटोर्या करतातच, पण इतरवेळी पण करतात. साटोर्या म्हणजे वेळ आणि पेशन्स दोन्ही पाहिजे. भारतात गेल्याशिवाय मिळणार नाही खायला आता!
3 Aug 2008 - 8:43 am | विसोबा खेचर
पाकृ वाचून भयंकर त्रास, वेदना, यातना झाल्या! :)
परंतु धन्यवाद स्वाती, ही माझी अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत अत्यंत........आवडती पाकृ! :)
आपला,
(साटोर्याप्रेमी) तात्या.
--
मरायच्या आधी यमाने शेवटची इच्छा विचारली तर मी 'साटोर्या आणि अण्णांचा शुद्धकल्याण!' हे उत्तर देईन! :)
3 Aug 2008 - 8:51 am | घाटावरचे भट
साटोर्या ही आमच्या मते 'विशेष कौशल्ये' या सदरात येणारी गोष्ट आहे आणि आम्ही गोडभाऊ असल्याने आम्हांस अतिप्रिय आहे. त्याची पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. वाचूनच तोंडास पाणी सुटले...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरन्निबोधत ~ स्वामी विवेकानंद