उमड घुमड ...

मैत्र's picture
मैत्र in जनातलं, मनातलं
28 Jun 2014 - 8:18 pm

दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी.

थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे.
आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्‍याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते. पण थोडे निळे तुकडे डोकावत होते. त्यामुळे वार्‍याने हे भरून आलेले जलद निघून जातील असा विचार मनात डोकावला. आणि परत मोबाईलमध्ये लक्ष घातलं.
पण तेवढ्यात एक गंध स्पष्टपणे नाकाला जाणवला. पाऊस आला की काय म्हणून पाहिलं तर थोड्याच वेळात आकाश अगदी गडद झालं होतं. अजून माती ओली झाली नव्हती पण हवेतल्या आर्द्रतेचा आणि कदाचित काही अंतरावर पडत असलेल्या पावसाचा गंध जाणवायला लागला होता. हवेत सुखद गारवा आला..
आणि आता मात्र झाडं नाचल्याप्रमाणे घुसळून घुसळून हलायला लागली. अचानक लक्ष गेलं की आजूबाजूला मध्यम मोठी बरीच झाडं आहेत. गुलमोहर, रेनट्री, काही अनोळखी पण तुकतुकीत पानांची.. थोडी खाली कण्हेर आहे. बाजूला अबोलीसारख्या पण थोड्या केशरी रंगांच्या फुलांचं झाड कुंपणाच्या भिंतीपर्यंत वाढलं आहे. रेनट्री आणि टॅबुबिया सारख्या झाडांच्या पुंजकेवजा फुलं जाउन तिथे तपकीरी पानं आणि तुरे आले आहेत. अरेच्चा.. ही झाडं अशी वरनं पाहताना वेगळीच वाटतात..
त्या नैसर्गिक मोकळेपणापुढे थोडे लांब दिसणारे नीट नेटके रेखीव लँड्स्केप गार्डन चित्रातल्यासारखे नीट पण थोडे खोटेसे वाटतेय. हुबेहुब पण काहीतरी कमी वाटणार्‍या मेणाच्या फळांसारखं..
पक्षी थोडे इतस्ततः उडायला लागलेत. कबुतरं वळचणी बघून दबकून बसली आहेत. पण स्वस्थ बसतील ती कबुतरं कसली. साळुंक्या भिरभिरतायत. छोटे पक्षी पानांच्या आड उड्या मारतायत..

अचानक अनेक दिवस न जाणवलेला ओल्या मातीचा वास आसमंत भरभरून राहिला आणि लक्षात आलं की टपोरे मोजके थेंब आले आहेत. झाडांकडे इतकं निरखून पाहताना मध्येच कधीतरी पाऊस आला... असाच येतो नेहमी समजे समजे पर्यंत अचानक थेंब येतात.. आणि घाई असल्याप्रमाणे जास्त वेळ न घालवता थेंबांच्या धारा झाल्या.
प्रसन्न पाउस पडायला लागला. ढगांचा गडगडाट नाही. मोठ्या विजा नाहीत येण्याची सूचना नाही. मित्राप्रमाणे सहज मोकळेपणाने पाऊस आला. एकदम खूप खूप छान वाटलं.. पर्वतीवरच्या, लोणावळ्याच्या, अगदी महात्मा च्या टेकडीच्या सुंदर पावसाची आठवण आली.
सहज मूड आला म्हणून मोबाईलवर किशोरी ताईंची मला आवडणारी मियां की मल्हारची ची़ज शोधली.
उमड घुमड

पहिल्याच ओळीला असा काही पावसाचा विलक्षण ताजेपणा आघात केल्यासारखा आला की त्या एकेका सूराबरोबर मी पाऊस अनुभवू लागलो..
उमड घुमड गरज गरज ... बरसन को आयो मेघा

पानं छान ओली स्वच्छ दिसायला लागली... नुकतीच फुटल्यासारखी.
खालचा रस्ता स्वच्छ धुतला जातोय. छान आहे. धूळ गेली. थोडी हौशी मुलं फुटबॉल घेऊन उगाच इकडे तिकडे पळत आहेत.

पावसाचा जोर वाढला. धारा एकमेकांत मिसळून गेल्या.
ऐसोही झरन लागे... पिया बिन मोरे नैना

पाण्याचा एक पडदासा झाला. आकाश दिसेनासं झालं. पूर्ण जोराने पाऊस जणू वाहायला लागला. एव्हाना हलणारी झाडं ओलिचिंब झाली होती. हळूहळू एक धुकट झालं. आजूबाजूला थोड्या अंतरावरचंही दिसेना. पावसाच्या जोराने सर्व माणसं पक्षी सगळेच गायब झाले होते. एकदम जाणवलं की या क्षणी मी एकटाच स्वत:शी पाऊस बघतो आहे. निसर्ग अनुभवण्यासाठी कुठे खास जायची गरज नाही. पाहण्याची, शांत पणे आपल्याच आजूबाजूचा परिसर नव्याने पाहिल्याप्रमाणे निरीक्षण करण्याची गरज आहे.
त्या मिस्ट मध्ये खालचे छोटे दिवे धुरकट दिसायला लागले. गंमत वाटली की इतका पाऊस कोसळतो आहे की ना धार आहे ना काही दिसतंय.. थेंबांचं आणि तुषारांचं धुकं झालंय... झाडं आता निथळत होती..

किशोरीताईंच्या ताना लहरींप्रमाणे येत होत्या. मियां की मल्हार च्या सुरावटीत काही तरी एक मन प्रसन्न करणारी जादू आहे.. साध्या म प ध नि सा मध्येही.. त्या मध्ये लावलेल्या कोमल निषादात आहे तो भाव का " म रे प .." च्या रचनेत.
जाऊ दे या एकूण प्रसंगाचा आणि त्या अप्रतिम गाण्याचा आनंद घ्यावा. बटाटा वडा एकदम झकास चविष्ट लागतोय तर उगाच त्यात काय काय आहे हे वरचं बेसनाचं कव्हर काढून त्याचा अ‍ॅनॅलिसिस करु नये. डोळे बंद करून चवीची मजा घ्यावी. डोळे बंद केले तर सूरांबरोबर बाहेर पाऊस एक स्थिर आणि वेगळाच सूर करून पडत होता. आत आणि बाहेर पाऊस.. छताखाली असून नखशिखांत भिजल्यासारखं वाटलं. शहारलो आणि डोळे उघडून पाहिलं.
गोनीदांच्या बुधाची आठवण आली. पाऊस धार करून कुडपू लागला होता. लांबच्या छोट्या टेकड्या पाहून मणरंजेणाची आणि राजमाचीची प्रकर्षाने आठवण झाली..
आता वारा परत आला होता पण उगाच वादळ न करता स्वरमंडलाच्या तारा छेडाव्यात तसा किशोरीताईंच्या तानांना साथ करत पाण्याच्या पडद्यावर लाटा आणत होता. असे काही क्षण गेले की योगायोगाने छोट्या छोट्या तानांबरोबर पाऊस वार्‍याच्या साथीने डोलला .. हसू यावं अशी बालिश गंमत वाटली की पाऊस कुठे मोबाईलवरचं गाणं ऐकतोय.. पण मग विचार करणार्‍या मनाने सांगितलं की सगळंच गाणं झालंय.. तुला गरज आहे म्हणून तू त्या सुरांच्या मदतीनं ऐकतोयस..
हरकत नाही.. ऐकता येतंय हे महत्त्वाचं.

चमकत बिजू .. गगन तपत...

हलक्या विजा चमकायला लागल्या. हे छान आहे. आधी कडकडाट नाही. आता ताल द्यावा तशा छोट्या विजा समेवर येतायत. मी डोळे बंद केले तर कुठे आहे याचंही भान वाटत नाहीये. काही वेळ असाच गेला त्या चढत्या तानांबरोबर.
वरच्या सूरांच्या आक्रमक तानांबरोबर डोळे उघडले.

पावसाचा जोर कमी झालाय.
खाली पाणी साठलंय. झाडं निश्चलपणे उभी आहेत. काय आठवली तर नंदनच्या लेखातली भिजलेली वानरी.
जणू झाडं भिजून जड झालीयेत आणि अंग आक्रसून पानं पाडून शांत उभी आहेत त्या आत खोल झिरपणार्‍या पाण्याला जाणवत आपलेही डोळे मिटून.

गारवा जरा गारठ्यामध्ये बदलला आहे. सगळं शांत आहे. पावसाचाही आवाज कमी आहे.
मी आत आलो. दिवा लावावासा वाटला नाही. पाऊस मंदावला आहे.
गाणं संपलंय..

डोळे बंद केले अंधारात तर एक शांत सुखद जाणीव झाली की...
पाऊसही पडतोय धार करुन आणि भिजलेले स्वर चालूच आहेत..... मनातल्या मनात...
उमड घुमड .. गरज गरज.. बरसन को आयो मेघा..

मुक्तकआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Jun 2014 - 8:26 pm | यशोधरा

वा, सुरेख!

मीराताई's picture

28 Jun 2014 - 8:29 pm | मीराताई

सुंदर अनुभवकथन.

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jun 2014 - 9:24 pm | लॉरी टांगटूंगकर

क्या बात है भाई, बर्‍याच दिवसांनी लेखणीला हात घातलात. झक्कास लेख जमलाय.

सुबोध खरे's picture

28 Jun 2014 - 9:32 pm | सुबोध खरे

सुंदर

मुक्त विहारि's picture

28 Jun 2014 - 9:40 pm | मुक्त विहारि

झक्कास

पैसा's picture

28 Jun 2014 - 10:49 pm | पैसा

किती सुंदर लिहिलंय! मस्त! तो पाऊस वाचता वाचता मलाही भिजवून गेला!

सस्नेह's picture

28 Jun 2014 - 10:58 pm | सस्नेह

तरल लेखन.

एस's picture

28 Jun 2014 - 11:13 pm | एस

भिजलो वाचताना. इथे पुण्यात दिवसभराच्या झळा रात्रीही मागे रेंगाळताहेत. अशा परिस्थितीत बंगळूराची खूपच आठवण आली.

खटपट्या's picture

29 Jun 2014 - 12:43 am | खटपट्या

मस्त

आदूबाळ's picture

29 Jun 2014 - 1:11 am | आदूबाळ

ये बात! आवड्या!

अशा वेळेला धूलिया मल्हारही पर्फेक्ट वाटतो....

कंजूस's picture

29 Jun 2014 - 4:45 am | कंजूस

छान .

आतिवास's picture

29 Jun 2014 - 8:33 am | आतिवास

सुरेख.. !

किसन शिंदे's picture

29 Jun 2014 - 9:36 am | किसन शिंदे

अतिशय सुरेख!!

आणि वर पैसाताईंच्या प्रतिसादाशी सहमत. वाचता वाचता सगळं छानसं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राह्यलं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jun 2014 - 11:51 am | ज्ञानोबाचे पैजार

सुंदर अतिशय आवडले.
या वर्षी हा अनुभव कधी येतोय कोण जाणे?
(पावसाची आतुरतेने वाट पहाणारा)पैजारबुवा,

तुमचा अभिषेक's picture

29 Jun 2014 - 12:24 pm | तुमचा अभिषेक

पाऊस सर्वांत सुंदर आपल्या घराच्या खिडकीतून दिसतो.

मधुरा देशपांडे's picture

29 Jun 2014 - 2:12 pm | मधुरा देशपांडे

सुंदर

हलक्या विजा चमकायला लागल्या. हे छान आहे. आधी कडकडाट नाही. आता ताल द्यावा तशा छोट्या विजा समेवर येतायत. मी डोळे बंद केले तर कुठे आहे याचंही भान वाटत नाहीये. काही वेळ असाच गेला त्या चढत्या तानांबरोबर.
वरच्या सूरांच्या आक्रमक तानांबरोबर डोळे उघडले. >>>

मनापासुन लिहीलयस !!

बाकी एकदम चकीत झालो ... प्रतिसादातुन गायब झालेला तु, इतका सुंदर लेख घेवुन येशील अस अजिबात वाटत नव्हते ...

मॅनेजर ची बदली झाली वाटतं का स्वतः च डॅमेजर झालास ??

तिमा's picture

29 Jun 2014 - 4:58 pm | तिमा

मिपाचा दर्जा अशा दर्जेदार लेखांनीच वाढतो. खरे रसिक आहात!

बॅटमॅन's picture

29 Jun 2014 - 8:31 pm | बॅटमॅन

अप्रतीम!!!!

(मनापासनं दाद द्यायची झाली तर 'ती' दुसराच येतो, त्याला इलाज नाही.)

वेल्लाभट's picture

30 Jun 2014 - 9:29 am | वेल्लाभट

क्या ब्बात !

उमड घुमड वरून मेहदी हसन ची क्लासिकल ठुमरी आठवली
उमड घुमड घिर आ गयो .. बदरा !

पद्मश्री चित्रे's picture

30 Jun 2014 - 10:08 am | पद्मश्री चित्रे

भिजण्याचा आनंद देणारा लेख

अजया's picture

30 Jun 2014 - 10:50 am | अजया

सुरेख लेख. आवडलाच.

चाणक्य's picture

30 Jun 2014 - 8:01 pm | चाणक्य

लिखाण

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2014 - 9:48 pm | स्वाती दिनेश

सुंदर... लेखातल्या पावसाने भिजवले,
स्वाती

सखी's picture

30 Jun 2014 - 9:50 pm | सखी

सुरेख!

मोदक's picture

9 Apr 2017 - 5:42 pm | मोदक

__/\__

मैत्र's picture

9 Apr 2017 - 5:46 pm | मैत्र

गेल्या रे किशोरी ताई. अजून अस्वस्थता जात नाहीये..

रुपी's picture

13 Apr 2017 - 4:01 am | रुपी

फार सुरेख लेखन!