सुख म्हणजे नक्की काय?

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:27 pm

आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले. असे मस्त मस्त वाटत होते. कार्यालयातून येता-जाता एका जाहिरातीच्या बोर्डावर मंद हसत असलेल्या दीपिका पदुकोनच्या विशाल नेत्रांमध्ये उगीच डोकावल्यावर कसे प्रसन्न वाटते, अगदी तसेच मला हे जेवण झाल्यानंतर वाटले. हे सुख आहे की फक्त तात्पुरता आनंद? सुखाची भावना देखील तात्पुरतीच असेल ना? सारखं आपलं कुणी 'मी सुखी आहे' असं स्वत:ला बजावत असेल असं वाटत नाही.

अमेरिकेत आमच्या अपार्टमेंटमध्ये मी आणि माझी बायको असे आम्ही दोघंच राहत होतो. एकदा रविवारी सकाळी ७:३० वाजता मी उठलो; सकाळचे कार्यक्रम आटोपले आणि 'द शायनिंग' नावाचा एक हॉरर चित्रपट लावून बसलो. जॅक निकोल्सनचा हा चित्रपट अतिशय दर्जेदार अशा मोजक्या चित्रपटांच्या यादीमधला एक चित्रपट आहे. एक अतिशय निर्जन पर्वतरांगांमधले अवाढव्य हॉटेल, लांबून कुठून तरी तिथे कारने येणारा नायक, त्याची बायको, आणि एक मुलगा. आणि त्या निर्मनुष्य हॉटेलमध्ये घडणार्‍या थरारक घटना! चित्रपट संपल्यावर काहीतरी वेगळे पाहिल्याचा आनंद जाणवला. तशाच प्रकारचा आनंद 'स्कारफेस', 'कसिनो', 'सिटीझन केन' या व अशा बर्‍याच चित्रपटांनी दिला. हा आनंद म्हणजेच सुख का? की असा आनंद मिळवण्यासाठी ज्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते ती पूर्तता म्हणजे सुख? म्हणजे नोकरीच्या ठिकाणी सगळं आलबेल असणं, नोकरीतून मिळालेल्या कष्टाच्या पैशातून टीव्ही, काँम्प्युटर, इंटरनेट, इत्यादी सुखसुविधांचा ताफा आपल्या तैनातीत ठेवणं हे सुख?

आम्ही मित्रमंडळी काही वर्षांपूर्वी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये भेटायचो. तिथे मग मस्त मैफल जमायची. गरमागरम तंदूर चिकन, झणझणीत चिकन हैदराबादी किंवा मुर्ग मुसल्लम, गरम रोट्या, आणि मनमुराद गप्पा अशी रंगीत मैफल जमायची. कुणालाच घाई नसायची. मग गुलाम अली, पंकज उधास, जगजीत सिंग यांच्या अजरामर गजलांचा कार्यक्रम व्हायचा.

तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने
की फिर ना होश का दावा किया कभी मैने
वो और होंगे जिन्हे मौत आ गयी होगी
निगाह-ए-यार से पायी है जिंदगी मैंने...

किंवा

मैं तेरी मस्तनिगाही का भरम रख लुंगा
होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही
ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही
वरना मैं कुछ भी हूं एहसानफरामोश नही

अशा शराबी, धुंद गजलांच्या माहोलमध्ये भरपूर गप्पा रंगायच्या. मध्येच

सब चमन से गुलाब ले आये, हुस्नवाले शबाब ले आये
शेखसाहब ने मांग ली जन्नत, हम वहां से शराब ले आये

अशी एखाद्या गजलेची सुरुवात व्हायची. मग गाडी हळूच "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या..." वरून "एकटेच जगू, एवढंच ना, आमचं हसं, आमचं रडं, ठेवून समोर एकटेच बघू..." ही दु:खाची स्टेशने घेत घेत "सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गयी हैं सारी मंजिले, हो सारी मंजिले, सो गया हैं रस्ता..." असा पेंगलेला निष्कर्ष काढून रात्री १-२ वाजता आपापल्या घरांच्या यार्डात जायची. या मैफलींमध्ये खूप मजा यायची. खूप गप्पा-गाणी आणि मनमुराद हसणे (खिदळणे, दात काढणे म्हटलं तरी चालेल) चालायचे. हे सुख आहे का? की हे क्षणभंगूर सुख आहे? मग या न्यायाने सगळीच सुखे क्षणभंगूर नाहीत का? भविष्याच्या चिंतेचे, विचारांचे, योजनांचे शेवाळ लगेच चढते आजकाल वर्तमानाच्या सुरेख शिल्पावर! मग वर्तमान कितीही सुसह्य केला तरी सुखी झाला असे म्हणता येईल का?

माझा एक मित्र आहे. त्याला फिरण्याची, पर्यटनाची अजिबात आवड नाही. महिनोनमहिने तो, त्याची बायको आणि एक छोटा मुलगा कुठेच जात नाहीत. तो फक्त रोज कार्यालयात जातो. राजस्थानी असल्याने बायकोला मैत्रिणी वगैरे फारशा नाहीत. बायकांनी घराबाहेर पडणे जवळ-जवळ अशक्य! शनिवार-रविवारी अगदी जवळच्या कुठल्यातरी मित्राकडे किंवा कुठल्यातरी नातेवाईकाकडे जाणे एवढाच काय तो बदल! पण त्याला नवनवीन गॅजेट्सची हौस भारी! आयपॅड, आयफोन, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, महागडी घड्याळे यावर तो बर्‍यापैकी पैसे खर्च करतो. अशी कुठली वस्तू घेतली की तो ४-२ दिवस खूप खुश असतो. ही खुशी म्हणजे सुख म्हणता येईल का? पण ही खुशी पण चार दिवस टिकते; नंतर अंगवळणी पडून नाहीशी होते.

एका अतिगरीब माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतील, नव्हे, वेगळ्या असतातच. दोन वेळेला स्वतःला आणि कुटुंबाला पोटभर खायला मिळाले आणि सगळ्यांचे आरोग्य उत्तम असले म्हणजे देखील एखादी व्यक्ती स्वतःला सुखी म्हणवून घेत असेल. सुखाची ही भावना चिरकाल टिकणारी असते का? मला वाटते ही भावना चिरकालीन टिकणारी नसावी कारण त्या भावनेला हादरे देणार्‍या अडचणी असतातच की. कधी काम मिळते, कधी नाही मिळत, कधी घरादारावर गदा येते, कधी मुले-बाळे व्यसनी होतात, कधी मुलीचे लग्न फसते अशा समस्यांचा लकडा असतोच. म्हणजे शुद्ध सुखाची भावना कायम टिकणारी आहे असे म्हणता येणार नाही. शेवटी ती देखील क्षणभंगूरच!

मिसळपाव.कॉमवर लिहिलेल्या लेखाला खूप प्रशंसा मिळाली किंवा फेसबुकवर टाकलेल्या फोटोला भरपूर लाईक्स मिळाले म्हणजे मन सुखावते. ही सुखावलेपणाची भावना तशी अल्पायुषीच असते. फार तर दोन दिवस!

सुख मानण्यावर असते असेही म्हटले जाते. आम्ही न्यू यॉर्क, नायगाराच्या सहलीला गेलो तेव्हा अमेरिकन सरकारचा बंद होता. ही नवीनच भानगड ऐकली होती. सरकारच बंद! आणि ते बंद असून देखील सगळे सुरळीत चालू होते. आपले सरकार पूर्ण वेळ जागे असून देखील इतका गोंधळ असतो. असो. त्या बंदमुळे वॉशिंग्टन डीसी मधली महत्वाची वस्तूसंग्रहालये, स्मारके, काही खूप सुंदर असे बगिचे वगैरे पर्यटकांसाठी बंद होते. सगळे बुकिंग आधीच झाल्याने काही करता येणे शक्य नव्हते. सगळ्यांनी आमचे सांत्वन केले. "अब क्या देखोगे? तुम्हारे पैसे तो बेकार गये. ठीक हैं, जितना मिले उतना ही देख लेना, क्या कर सकते हैं? थोडा लेट जाना चाहिये था..." वगैरे वगैरे. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं की बराकभाऊंनी होर्डिंग लावलं होतं की त्यांचं सरकार झोपणार आहे म्हणून! पण आता हे सांत्वन ऐकून घावं लागणार होतं. आम्ही सहलीला गेलो. सहल खूप छान पार पडली. डीसी मधली काही ठिकाणे नाहीच पाहता आली. पण रिव्हर पोटोमॅकमध्ये दोन तासांचा क्रुझ करता आला, व्हाईट हाऊस, युएस कॅपिटॉल, राष्ट्राध्यक्षांच्या मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय (मादम तुसॉ) बघता आले, डीसीच्या भव्य रस्त्यांवरून फिरून तिथल्या भव्यतेचा आनंद लुटता आला. आम्ही घरी परत आल्यावर आम्हाला छान वाटले. आपण काही मिस केले म्हणून वैषम्य अजिबात वाटले नाही. इतके पैसे खर्च केले आणि सगळं डीसी नाही बघता आलं असा खेद नावालाही वाटला नाही. हे ही सुख अल्पायुषीच. मनाची समजूत म्हणा हवं तर.

मग सुख सुख म्हणजे आहे तरी काय नेमकं? राजकारण्यांना सत्तेसाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष म्हणजे सुख? की इच्छित सत्तास्थान काबीज केल्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे सुख? एखादी अवघड गोष्ट ठरवून, कष्ट घेऊन हासिल केल्यानंतर जी भावना मनात उचंबळते तिला सुख म्हणता येईल? मग तसं म्हणायला गेलं तर कित्येक कुठलीही ध्येये नसणारी, साधी सरळ माणसे सुखातच दिसतात की! साधा टपरीवर काम करणारा मुलगा देखील मजेत असतो. मजेत असणं म्हणजे सुख असते का? जबाबदार्‍या वाढल्या की आयुष्यातली मजा हळू-हळू कमी होत जाते म्हणजेच सुख देखील कमी होत जाते का?

अलिशान घर, गाडी, जाडजूड बँक बॅलन्स म्हणजे सुख असू शकेल काय? भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख, मजा, आनंद विकत घेता येऊ शकतो का? बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात असावं. अर्थात ते पुन्हा तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. माणसांसोबत जोडलं जाण्यात काहींना सुख वाटतं तर काहींना फक्त पैसे कमवण्यात. काहींना पर्यटनात आनंद मिळतो तर काहींना खेळण्यात किंवा वाचण्यात.

माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत. मनाला आनंद देणार्‍या गोष्टी सुख देतात आणि पुढच्या प्रवासासाठी धीर देतात असा अनुभव आहे. मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं (मग ते अगदी 'तुम तो ठहरे परदेसी' किंवा 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है' असेल किंवा 'चांदण्यात फिरतांना' किंवा 'बगळ्यांची माळफुले' असेल) की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं. तुमचं काय मत?

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

दिव्यश्री's picture

7 Apr 2014 - 5:33 pm | दिव्यश्री

माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत.>>> +++++++ १ . भारीच लिहिलंय . आवडलं . :)

इरसाल's picture

7 Apr 2014 - 5:35 pm | इरसाल

मनातल लिहीलत.
माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे.
बाकीचे नंतर लिहीतो.

पिलीयन रायडर's picture

7 Apr 2014 - 5:38 pm | पिलीयन रायडर

माझा मुलगा काल अचानक पळत येऊन मला म्हणाला ..

"आई.. सन्दे..मन्दे..तुस्दे..वेन्स्दे..थ्स्दे..फ्लाय्दे..सॅतलेदे..सन्देएएएए" आणि टाळ्या पिटायला लागला..

कधी शिकला..माहित नाही.. अचानक का आठवलं त्याला.. माहित नाही.. पण सलग न चुकता त्यानं मला काहीतरी म्हणुन दाखवलं.. २-३ आठ्वडे तो पाळणाघरात गेलेला नाही म्हणजे त्याआधीच शिकला असेल कधीतरि.. पण त्याच्या ते लक्षात होतं..

त्याक्षणी मला जे वाटलं.. ते सुख..!

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.. ज्यावर कष्ट घेतले ती गोष्ट हळुहळु साकार होताना पहाणं म्हणजे सुख असावं.. आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख..

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:37 am | समीरसूर

हे सुख अतुलनीय असणार यात शंकाच नाही. :-)

किसन शिंदे's picture

7 Apr 2014 - 5:43 pm | किसन शिंदे

लेख प्रचंड आवडला.

सविस्तर प्रतिसाद देतो थोड्यावेळाने..

एखादी ठरवलेली/अनपेक्षित किंवा आवडीची गोष्ट आपल्याला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढी, वाटेल त्या ठिकाणी, वाटेल त्या व्यक्ती सोबत/व्यक्तीविना मनासारखी उपभोगायला मिळणे व त्यातून कायम स्वरूपाचा आनंद प्राप्त होणे व "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात.

यात भरपूर काम केल्यावर आलेला थकवा घालविण्यासाठी प्रसंगी अगदी दगड/मातीवर झोपायला मिळणे किंवा तुंबून राहिलेले एखादे काम करून मोकळे होणे यात सुद्धा सुख आढळते.

ज्यावेळेला असे सुख प्रथम मिळते ते आयुष्यभर लक्षात राहते. पुढच्यावेळी मात्र ते सुख न राहता "सांखिकीय गुणोत्तर" ठरत असते.

स्मिता श्रीपाद's picture

7 Apr 2014 - 5:51 pm | स्मिता श्रीपाद

खुप छान समीर.....
शेवटचा परिच्छेद खुप आवडला आणि पटला....

रेवती's picture

7 Apr 2014 - 5:59 pm | रेवती

छान लिहिलय.

मितान's picture

7 Apr 2014 - 6:05 pm | मितान

लेखन खूप आवडले.
सुखाची एकच एक व्याख्या नाहीच करता येणार.
तुमची व्याख्या अगदी पटतेय तरी पूर्ण नाही वाटत. आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच !

प्यारे१'s picture

7 Apr 2014 - 7:09 pm | प्यारे१

+११११

हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! असे वपु म्हणाल्याचे आठवते. चुभू दया घ्या
आणि जर ती गोष्ट कष्टाने मिळवली असेल तर सुखाची गोडी वाढते. एकंदरीत सुख हे कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असते असाच आजवरचा अनुभव आहे!

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:10 am | समीरसूर

हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! ही सुखाची फारच सोपी आणि ढोबळ व्याख्या झाली. पण ही व्याख्या अजिबात पटण्यासारखी नाही असे वाटते. जास्त पैसे कुणाला नको असतात? म्हणून मला माझ्या नोकरीमध्ये अचानक जर दुप्पट पगार मिळायला लागला तर त्यात मला सुख वाटणार नाही. मला आज एमबीए करण्याची इच्छा आहे म्हणून मला जर कुणी ताबडतोब प्रमाणपत्र आणून दिले तर त्या सुखाला काहीच अर्थ नाही. हिमालय बघायचा असेल तर तिथे जाण्याचे कष्ट घ्यावेच लागतात. आणि त्यानंतर हिमालयाचे दर्शन जास्त सुखावह भासते. जादू झाल्यासारखं जे हवं ते लगेच, ताबडतोब मिळालं तर जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. 'द अल्केमिस्ट' मध्ये काचेच्या वस्तूंचा व्यापारी मक्क्याला जाणे सतत पुढे ढकलतो. आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही तो मक्क्याला जाणे टाळतो; कारण मक्क्याला जाऊन आल्यानंतर त्याची ईस्लामची पाच कर्तव्ये पूर्ण होतात. मग जगण्यासारखे काही राहणारच नाही या भीतीने तो मक्क्याला जातच नाही. काहीतरी हवं असणं आणि त्यासाठी झटणं हे सुखाचं पॅकेज आहे. सगळं लगेच हवं तेव्हा मिळणं म्हणजे सुख खचितच नसावं. खरं म्हणजे जे हवं ते लगेच मिळणं म्हणजे आयुष्यातल्या चैतन्याचा मृत्यूच! चैतन्य हे गतिमध्ये आहे. असो. माझं मत.

खुपच आवडला लेख, माझ्या सुखाची व्याख्या काय? मलाही नक्की समजत नाहिये ... विचार करायला भाग पाडलत समीरसूर..

शुचि's picture

7 Apr 2014 - 8:21 pm | शुचि

सुंदर!

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2014 - 8:43 pm | प्रकाश घाटपांडे

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो. भुक लागली कि जेवायला मिळणे, तहान लागल्यावर पाणी मिळणे, उकडत असताना गार वार्‍याची झुळुक येणे, वगैरे सगळे सुखच कि! मी सुखी समाधानी आहे असे म्हणले कि लोक मला अल्पसंतुष्ट म्हणतात. काही लोक तर म्हणतात लो एम इज क्राईम. ही असली माणस ही जगायला लायक नाहीत या स्पर्धेच्या जगात. काय हे किड्या मुंग्यांच जगण?

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो.

:) परवाच एका पुस्तकाचे टायटल वाचले - हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर :)

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 11:13 pm | आत्मशून्य

हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर

माणसांच्या विचारांची किंमतच नाही कुणाला ;)

ई.घ्या. (इनो नवे इझीं घ्या)

भूभूच्या नाकावरचा गारपणा ही एक जीवघेणी गोष्ट आहे. त्याची तुलना झालीच तर माठाच्या गारथंड अन ओलसर स्पर्शाबरोबरच होऊ शकते.

मला ते ओलं नाक आवडत नाही. भूभू आवडतो पण भीती वाटते. कॉलेजात एक गावठी भूभू चावलेलं :(

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:15 am | समीरसूर

छोट्या गोष्टींमधला आनंद खरंच जास्त समाधान देऊन जातो असे वाटते. पाषाण तलावावरची रम्य सकाळ खूप आनंद देऊन जाते. भूभू मला पण आवडतात पण मी पाळलेला नाही. त्यांच्या दिवसभरातल्या अ‍ॅक्टीविटीज मजेदार असतात. उगीच शेपूट हलवत कुठेतरी जाणे आणी कान टवकारून एकटक बघत राहणे, जीभ बाहेर काढून हसणे, समोरचे दोन पाय एकमेकांवर दुमडून टाकणे आणि गहन विचारात बुडून जाणे..हे सगळं बघण्यात देखील मजा आहे बुआ. :-)

कवितानागेश's picture

8 Apr 2014 - 2:54 pm | कवितानागेश

प्रत्येक वाक्याशी सहमत. :)

चित्रगुप्त's picture

7 Apr 2014 - 9:38 pm | चित्रगुप्त

छान लिहिले आहे.
हवी-हवीशी वाटणारी, कधी संपू नये अशी वाटणारी अनुभूति म्हणजे सुख, तर याविरुद्ध असणारी अनुभूति म्हणजे दु:ख असं म्हणता येईल. पण सुख-दु:ख हे एकमेकांशी निगडीतच असतं, जश्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अति झालं, की तेच सुख दु:खात परिवर्तित होतं, जसं गोड खायला आवडावं, पण ते खाता खाता एक वेळ अशी येते, की मग ते नकोसं वाटू लागतं. सुखाची चव कळायला दु:खाचा अनुभव पण आवश्यक असतो.
या विषयी एक गोष्ट वाचनात आली आहे ती अशी, की एका राजाला (कदाचित अकबर) त्याची राजनर्तकी फार आवडत असते, तिचं मात्र राजाच्या अंगरक्षकावर प्रेम असतं. हे राजाला समजल्यावर तो त्या दोघांना बोलावून विचारतो, ती दोघे एकमेकांच्या सहवासात कायम राहण्याची इच्छा प्रकट करतात. मग राजा त्यांना परवानगी देतो, ती दोघे आनंदाने मिठी मारतात. मात्र राजा त्यांना कायम एकमेकांच्या सहवासात राहता यावे, म्हणून त्यांना आलिंगनबद्ध अवस्थेत करकचून बांधून टाकतो, काही काळाने उकाडा, घामाची दुर्गंधी, बांधलेल्या अवस्थेतच शौच्यादि करावे लागणे, वगैरेंमुळे ते दोघे इतके कातावतात, की यापुढे त्यांना एकमेकांचे तोंडही बघू नये असे होते....

सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल, हा विचार अनेक प्रकारच्या 'तपश्चर्यां' च्या मुळाशी असावा. काट्यांच्या शैय्येवर निजणे, पंचाग्निसाधन वगैरे.

आत्मशून्य's picture

10 Apr 2014 - 2:33 am | आत्मशून्य

बंदिस्तपणा सुखाच्या मुळावर उठ्लाय... व दुःख बनला या न्यायाने सुख म्हणजे स्त्रिमुक्ती म्हणता येइल. कारण स्त्री जर मुक्त झाली तर पुरूषाचे जोखड सुधा नाहीसे नाही का होणार ? पहा विचार करा सामिल वहा

हे चिरकाल हवे असेल तर कल्पना लोप पावली पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2014 - 11:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

हवेहवेसे वाटाणारे मिळणे सुखकारक होईलच असे नाही... पण मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख !

मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख! सहमत आहे आणि सुखीही !!

हे छानच! शिवाय डोक्यालाही शांतता हा बोनस!

तुमचा अभिषेक's picture

7 Apr 2014 - 11:06 pm | तुमचा अभिषेक

सुखावर लिहावेसे वाटणे हे देखीले एक सुखी माणसाचे लक्षण आहे.
तर अभिनंदन, तुम्ही सुखी आहात :)

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.

शुचि's picture

7 Apr 2014 - 11:24 pm | शुचि

:) क्या बात है!

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:26 am | समीरसूर

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.

सुरेख!

मी सुखी आहे का? माहित नाही. आणि हीच खरी गंमत आहे. स्वतःला नाही मोजता येत. दुसर्‍यांची मापं व्यवस्थित काढता येतात. :-) खूप कठीण परिस्थिती असणारी काही माणसे असतात. अगदी पर्वताएवढी संकटं असतात काहींच्या आयुष्यांत. आरोग्य, गरीबी, व्यसनं, गुन्हेगारी, अपघात, अन्याय अशा अनेक कारणांमुळे काही माणसांना अतिशय प्रखर दु:खाचा सामना करावा लागतो. अशा माणसांविषयी नक्कीच आदर वाटतो. आयुष्यच एक संकट वाटावं किंवा जगणं नकोनकोसं वाटावं ही दु:खाची परिसीमा झाली. असं पराकोटीचं दु:ख आयुष्यात नसणं म्हणजे देखील एक प्रकारचं सुखच असावं. फक्त ते नॉर्मल आयुष्यात जाणवत नाही. खरं तर ते सगळ्यात मोठं सुख असावं. बाकी पैसा, मान, वस्तूंचा संग्रह वगैरे तर येत-जात असतात. आयुष्याच्या शेवटी या सगळ्यांची किंमत फारशी वाटत नसावी.

आनंदराव's picture

12 Apr 2014 - 4:01 pm | आनंदराव

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.<h1>

१००% बरोबर

बहुगुणी's picture

8 Apr 2014 - 3:15 am | बहुगुणी

समीरसूरः लेख आवडला.

Parable of The Mexican Fisherman And The Banker आठवली, बर्‍याच जणांनी वाचली असेलच, इतरांसाठी देतो आहे:

एक श्रीमंत अमेरिकन गुंतवणूक उद्योजक खूप व्यग्र आयुष्यातून वेळ काढून सुटीसाठी समुद्रकिनारीच्या छोट्याशा मेक्सिकन खेड्यात गेलेला असतो. त्याला तिथे केवळ एकच लहान बोट बांधून ठेवलेली दिसते, बोटीत काही मोठे ताजे मासे असतात आणि नावाडी उन्हाची तिरीप टाळण्यासाठी डोळ्यांवर टोपी ठेवून माडाच्या झाडाखाली पहुडलेला असतो.

ते उत्तम मासे पाहून अमेरिकन उद्योजक त्या नावाड्याला विचारतो: "मासे फारच चांगले दिसताहेत, किती वेळ लागला तुला हे पकडायला?"

नावाडी: "फार काही नाही, दोन-चार तासांत पकडले."

अमेरिकन उद्योजक: "अरे, आणखी काही तास का नाही राहिलास समुद्रात, भरपूर कमाई झाली असती!"

नावाडी: "काय करू आणखी वेळ वाया घालवून? झटपट काम आटपलं, माझ्या कुटुंबाला उद्याला आवश्यक इतके पैसे देतील इतके मासे मिळाले, बास झालं!"

अमेरिकन उद्योजक: "इथंच तुम्हा लोकांचं चुकतं! अरे, तू मासेमारीचा वेळ वाचवून करतोस काय त्या वेळाचं?"

नावाडी: "अहो सिन्योर, मी चांगली झोप काढतो, माझ्या मुलांबरोबर खेळतो, बायकोबरोबर मस्त वेळ काढतो, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकतो, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणतो..."

अमेरिकन उद्योजक: "अरे बाबा, मी आयव्ही लीग युनिव्हर्सिटीतून एम बी ए केलंय, मी तुला यशस्वी व्हायला मदत करू शकेन."

नावाडी: "ती कशी बुवा?"

अमेरिकन उद्योजक: "हे बघ, तू मासेमारीत दर दिवशी आधिक वेळ घालवलास की मासे विकून तुला मोठी बोट घेता येईल, एका मोठ्या बोटीत आणखी जास्त मासे मिळवलेस की त्या पैशांत आणखी काही बोटी विकत घेऊन तू स्वतःचा मोठा व्यवसाय करू शकशील, मग मधल्या दलालाला मासे विकण्यापेक्षा सरळ स्वतःच थेट पंचतारांकित हॉटेल्सना मार्केटिंग करू शकशील."

नावाडी: "आणि मग?"

अमेरिकन उद्योजक: "मग तू स्वत:चं वितरणाचं जाळं निर्माण करू शकशील, गोदामं विकत घेऊन त्यांत फ्रीझर्समध्ये मासे ठेवू शकशील आणि जगभर पुरवू शकशील..."

नावाडी: "आणि मग?"

अमेरिकन उद्योजक: "मग तू मेक्सिको सिटीसारख्या मोठ्या शहरात आलीशान घरात रहायला जाशील, तुझ्या कंपनीचा आयपीओ निघेल, तुझ्या कंपनीचे शेअर्स जगभरातून लोक विकत घेतील आणि तू गडगंज श्रीमंत होशील?"

नावाडी: "काय म्हणता काय? या सगळ्याला किती वेळ लागेल हो?"

अमेरिकन उद्योजक: "फक्त १०-१५ वर्षं! मग सगळी मजाच आहे!"

नावाडी: "आणि मग काय होईल?"

अमेरिकन उद्योजक: "अरे मग तू त्या धकाधकीच्या शहरी जीवनापासून लांब, मस्त चार-दोन मासे पकडून झाले की, अशा शांत किनारी पहूडशील, झोप काढशील, तुझ्या मुलांबरोबर खेळशील, बायकोबरोबर मस्त वेळ काढशील, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकशील, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणशील..."

तुमचा अभिषेक's picture

8 Apr 2014 - 10:11 am | तुमचा अभिषेक

सेम आशयाचीच कथा लहानपणी मराठी वर्जनमध्ये वाचलेली. एवढे सारे डिटेल नव्हते पण झाडाखाली आरामात झोपलेल्या एका माणसाला मेहनत करून पैसा कमवायचा आणि मग म्हातारपणी आराम करायचा असा उपदेश देणार्‍याचा त्याने असाच पोपट केला होता.

पण या फंड्यामध्ये एक गोची अशी आहे की मेहनत करून पैसा आपण फक्त स्वतासाठी म्हणून नाही कमवत तर काही जणांची जबाबदारी सुद्धा आपल्यावर असते. सुख हे पैसा कमवून स्वता आराम करण्यात नाही तर आपल्या जीवलगांना आरामात ठेवण्यात आहे. कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहे आणि आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतोय हि खरी सुखाची जाणीव आहे.

Anvita's picture

8 Apr 2014 - 8:53 am | Anvita

छान लेख!

स्पंदना's picture

8 Apr 2014 - 9:03 am | स्पंदना

कुणी आपल्याला सुखं व्हावं म्हणुन काही करु पहातो ते म्हणजे सुख!

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:33 am | समीरसूर

छान व्याख्या. पण अर्थात अनेक सुखांच्या कल्पनांपैकी ही एक. आदर मिळणं, मान मिळणं, प्रेमापोटी कुणीतरी काळजी घेणं या गोष्टी सुखावून जातातच.

अजून एक, कुणाचा तरी तिरस्कार करणं, कुणाला तरी शिव्या हासडणं, कुणापेक्षा मी जरा वरच्या लेव्हलला आहे असं मानणं ही मानवी मनाची गरज असते. टू लिव अ हॅपी लाईफ, इट इज अ‍ॅज एसेन्शियल टू हेट सम पीपल ऑर थिंग्ज अ‍ॅज इट इज टू लव अ फ्यू अदर्स.

कुणाचा किंवा कुठल्यातरी बाबींचा किंवा वस्तूंचा तिरस्कार करणं ही मानवी मनाची भावनिक गरज असते. जाणते-अजाणतेपणी आपण आपली ही गरज भागवून घेत असतो. गंमत आहे, नाही? :-) मानवी मन म्हणजे जगातली सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट असावी.

स्वप्नांची राणी's picture

8 Apr 2014 - 9:56 am | स्वप्नांची राणी

>> माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे.>>
>> आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख.. >>
>> "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. >>
>> आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच ! >>
>> भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. >>
>> सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल.. >>
>> हवेहवेसे वाटाणारे मिळणे सुखकारक होईलच असे नाही... पण मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख ! >>
>> बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. >>
>> कुणी आपल्याला सुखं व्हावं म्हणुन काही करु पहातो ते म्हणजे सुख! >>

कोटेबल कोट्स चं पोटेन्शिअल असलेली भरपुर वाक्य आहेत हां प्रतिसादात. लेखाचा शेवटचा पॅरा तर फुल्ल कोट्च आहे. पण ...

>> हे चिरकाल हवे असेल तर कल्पना लोप पावली पाहिजे. >> ईथे मात्र गोची आहे हां. कल्पनाच लोप पावली तर स्वप्नाळु लोकांनी काय करायच?

अनुप ढेरे's picture

8 Apr 2014 - 10:06 am | अनुप ढेरे

छान लिहिलय. आवडलं!

निवेदिता-ताई's picture

8 Apr 2014 - 10:32 am | निवेदिता-ताई

छान लेख्..आवडला

पैसा's picture

8 Apr 2014 - 10:45 am | पैसा

आवडलंच. वाचताना वाचनाचं सुख मिळालं पुरेपूर! सुख काय किंवा आनंद याच्या कल्पना व्यक्तीनुसार बदलतात. त्याच्या कंडिशनिंगवर अवलंबून असतात. आणि त्यावर खूपदा आजूबाजूची परिस्थिती, इतर दडपणं यांचाही परिणाम होतो. अर्थात ज्यांचं सुख ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं, ते खरे सुखी. मात्र दु:खाचा अभाव म्हणजे सुख असेलच असं काही सांगता येणार नाही!

अनुप ढेरे's picture

8 Apr 2014 - 11:42 am | अनुप ढेरे

'माझे खाद्यजीवन' या लेखाच्या शेवटी पुलंनी लिहिलेली सुखाची कल्पना आठवली.

हवालदार's picture

8 Apr 2014 - 2:41 pm | हवालदार

गार पाणि मिळणे आणि घाईची लागलेली असताना सोडायला मिळणे तो सुखी मनुश्य. एकन्दरीत तहान असणे आणि ती शमवली जाउ शकणे हे खरे सुख असे माझे मत आहे.

दोन्हीबद्दल प्रचंड सहमत!!!!

चावटमेला's picture

8 Apr 2014 - 3:41 pm | चावटमेला

छान लेख. विचार करायला भाग पाडलंत एवधं खरं. मी सुखी आहे का नाही? खरंच माहीत नाही. कदाचित खूप विचार करून सुखाच्या संकल्पना उगाच कीचकट करून ठेवल्यात मी. बहुतेक असा सुख दु:खाचा विचारच करत न बसणारी माणसं जास्त सुखी असावीत ;)

पेट थेरपी's picture

8 Apr 2014 - 4:39 pm | पेट थेरपी

हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप वाट्ते. गॅजेट आवडत नाही. छोट्या गोष्टीत खूष आहे. इत्यादी. पण इतरांची सुखाची व्याख्या निराळी असू शकते. अगदी व्यक्तिसापेक्ष आहे हे. जीवनात खूप झगडलेले तरी ही यशस्वी न झालेले, खूप काही हरवलेले जीव असतात किंवा हकनाक अन्यायाचे बळी झालेले लोक असतात त्यांना सूख
नको असते का पण नाही मिळत. अपंग, मूक बधिर, मानसिक आजारी लोक, अत्याचार सहन केलेली लहान मुले, टाकलेली अनाथ मुले, बायका ह्यांना पण सुखाची गरज आहेच. इट इज अ व्हेरी पर्सनल जर्नी.

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 5:46 pm | बॅटमॅन

रिव्हर्स स्नॉबरीबद्दल सहमत आहे.

समीरसूर's picture

9 Apr 2014 - 7:48 pm | समीरसूर

रिव्हर्स स्नॉबरी अशी काही थिअरी असू शकेल पण त्याने मनाचे समाधान कसे मिळणार? भव्य काही घडवणे जमत नाही म्हणून कुणाला लहान-सहान गोष्टींमध्येच आनंद मिळतो अशी फुशारकी मारता येईल पण स्वतःला कसे फसवणार? मन अशांतच राहील अशा परिस्थितीमध्ये.

माझ्या एका प्रतिसादात मी संकटग्रस्त लोकांच्या सुखाच्या कल्पनेविषयी लिहिले आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना अगदी भिन्न असू शकतील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुखाच्या कल्पना व्यक्तीसापेक्षच आहेत. पण ढोबळ अर्थाने ज्याला सुख म्हटले जाते ते सुख तितकेसे सकस नसते असेच वाटते.

नारायणमूर्तींनी ठरवलं तर ते कुठेही बिझनेस क्लासने आरामदायी प्रवास करू शकतात. हजारो कोटींची संपत्ती असलेला हा माणूस सहसा इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. यात रिव्हर्स स्नॉबरीपेक्षा मोठ्या ध्येयांकडे असलेली दृष्टी जास्त महत्वाची असावी असे वाटते.

एक मित्र मी अमेरिकेत ज्या गावात राहत होतो तिथून कुटुंबासहित अटलांटा शहर बघण्यासाठी ३.५ दिवस गेला. दोन-तीन नेहमीची आकर्षणे पाहिल्यानंतर त्यांनी तिथल्या ग्लोबल मॉलमध्ये १.५ दिवस फक्त भारतीय पदार्थ खाण्यात घालवले. मी अटलांटाला जाऊन आल्यानंतर २ दिवसात काय काय पाहिले हे सांगीतले. तो म्हटला "यार, ये सब तो हमने देखा ही नही. हम सिर्फ इंडियन खाने पे अटके हुए थे". मी त्याला सांगीतलं की आम्ही २ दिवसाचे खाण्याचे पदार्थ सोबत घेउन गेलो होतो. त्यामुळे आमचा हॉटेलमध्ये खाण्याचा वेळ आणि खर्च वाचला आणि तेवढे अधिक स्थलदर्शन करता आले. फोकस फिरण्यावर होता, जास्तीत जास्त नवनवीन ठिकाणे पाहण्यावर, अनुभवण्यावर होता; खाण्यावर नाही. भारतीय पदार्थ एरवी आपण नेहमीच खातच असतो की. अगदी अमेरिकेत घरीसुद्धा भारतीय पदार्थ करता येतातच. मग त्या नेहमीच्या अ‍ॅक्टीविटीवर आपला सहलीमधला अमूल्य वेळ का दवडा? त्याला पटले. अर्थात, त्याच्या सुखाची कल्पना निराळी असू शकते.

मला वाटते फोकस महत्वाचा असतो. काय अपेक्षित आहे त्यावर फोकस केला की बाकी गोष्टी गौण ठरवून इच्छित गोष्टींचा पुरेपूर आनंद घेता येतो. आणि मनाला खरे समाधान लाभते. तेच सुख, अजून वेगळे काय?

बर्‍याच लोकांना पैसे खर्च करतांना किंवा कुठलीही गोष्ट करतांना हा फोकस लक्षात येत नाही. नको तिथे नको ते वाचवतांना किंवा टाळतांना बर्‍याच आनंदांना मुकतो आपण. सगळ्यांकडे आहे म्हणून मलाही स्मार्टफोन घ्यायचा; सगळे वापरतात म्हणून मलाही कार हवी, सगळ्यांकडे आलिशान फर्निचर आहे म्हणजे आपल्याकडे हवेच हवे; नाहीतर लोकं काय म्हणतील अशा भावनेपोटीच अनावश्यक वस्तूसंग्रहालय तयार होत जाते. आणि मग अ‍ॅटॅचमेंट्स तयार होत जातात. आपण नेमके या अ‍ॅटॅचमेंट्सना सुख समजण्याची चूक करून बसतो. :-) नायगारा धबधबा बघून आल्यावर तिथल्या 'मेड ऑफ द मिस्ट' क्रूझची तिकिटे जपून ठेवावीत असे बायकोने सुचवले. मी कशासाठी जपून ठेवायची असे विचारले. "आठवण म्हणून" असे उत्तर आल्यानंतर मला हसू आले. मी म्हटलं आपल्या मनात आठवण आहे; आणि तो धबधबा पाहिला तो क्षण आपण उपभोगला आहे; अजून काय पाहिजे? किती वेळा ते तिकिट पाहणार आहेस तू? आणि ते तिकिट बघून आपल्याला तो क्षण अनुभवता येणार नाही पण मनात साद घातल्यानंतर मात्र तो क्षण कदाचित आपल्याला पुन्हा अनुभवता येईल; मग कागदाच्या त्या तुकड्याचे जोखड कशासाठी? तिला पटलं. आनंद वस्तूंमध्ये सहसा नसतो; त्या वस्तू आणि त्याहूनही कैक पटीने महत्वाचे असे काही हासिल करण्याच्या क्षमतेत आणि प्रक्रियेत असतो असे वाटते.

ऋषिकेश's picture

8 Apr 2014 - 4:43 pm | ऋषिकेश

"समाधान हे सुखाचे मुळ आहे" ही माझी सुखाची व्याख्या आहे.

लेखही चांगलाय

भावना कल्लोळ's picture

8 Apr 2014 - 5:14 pm | भावना कल्लोळ

आपल्यामुल चारजनाच्या चेहऱ्यावर आलेले हसू म्हणजे सुख, चार घटका मित्र मैत्रीणीसोबत हसत खेळत घालवणे म्हणजे सुख, दमडी हातात नसतांना अथक प्रयत्नाने उभ्या केलेल्या घराच्या गृहप्रवेशावेळी बंद दरवाज्यावरून हात फिरवताना आलेले अश्रू म्हणजे सुख, मातृत्वची चाहुल व ते निभावताना तो प्रत्येक क्षण अनुभवणे म्हणजे सुख. हिरव्यागार गवतावर पाडून चांदण्या रात्री आसमंत न्याहाळणे म्हणजे सुख, भुकेल्या निरागस जीवाला अन्न दिल्यावर त्याने पहिला घास घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे सुख. स्वताला उपेक्षित समजणाऱ्या जीवाला मैत्रीपुर्ण दिलेली साद म्हणजे सुख. पहिल्या पावसात मनसोक्त भिजणे म्हणजे सुख. माझी तरी हीच व्याख्या आहे. जे आहे, जे हवे आहे ते देतांना येणारी अनुभुती म्हणजे सुख.

चौकटराजा's picture

8 Apr 2014 - 5:47 pm | चौकटराजा

अत्यंत नैसर्गिक कारणे उदा .भूक तहान, कामवासना ई नी शरीरावर येणारा ताण . काही मनोधारणांमुळे मनावर येणारा ताण उदा महत्वाकांक्षा , स्वाभिमान, ई ई यांचा निचरा होतानाची शरीराची व मनाची अस्वस्था म्हणजे सुख.

अवतार's picture

8 Apr 2014 - 7:32 pm | अवतार

हा प्रश्न पडण्याइतकी उसंत आणि स्वातंत्र्य मिळणे हे खरे सुख!

ऋषिकेश's picture

10 Apr 2014 - 11:20 am | ऋषिकेश

क ड क!
आवडले!

अवतार's picture

11 Apr 2014 - 11:29 pm | अवतार

प्रतिसाद आवडण्याचे सुख मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद :)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2014 - 9:02 pm | प्रकाश घाटपांडे

जगी सर्व सुखी असा कोण आहे। विचारी मना तुची शोधोनी पाहे।
जय जय रघुवीर समर्थ

दिव्यश्री's picture

8 Apr 2014 - 9:14 pm | दिव्यश्री

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत ...जरूर ऐका . :)

https://www.youtube.com/watch?v=OprOJoTM8BE

दिव्यश्री's picture

8 Apr 2014 - 9:15 pm | दिव्यश्री
अर्धवटराव's picture

10 Apr 2014 - 6:47 am | अर्धवटराव

तो एक प्रकारचा केमीकल लोचा आहे शरीरातला. त्यातला एक घटक म्हणजे शर्करा ज्वलन मोजणारी यंत्रणा. असं बरच काहिबाहि आहे त्या समिकरणात.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2014 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

खर आहे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Apr 2014 - 9:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्याला हव्या असणार्‍या व्यक्ती,वस्तु किंवा अनुभव अनपेक्षितपणे मिळणं ह्यासारख सुख नाही.

(पहाटे ९.३० ला उठणं आणि दुपारच्या गाढ झोपेचं सुख हरवलेला) अनिरुद्ध

ज्ञानव's picture

10 Apr 2014 - 10:55 am | ज्ञानव

माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या

एक भाकरी आणि अनेक ही "भाकरी"च हे वाचून अत्यंत आनंद झाला कारण सर्व सामान्यपणे भाकर्या असे म्हंटले जाते....तेव्हा योग्य शब्द वापराचे सुख तुम्ही दिलेत त्याबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

10 Apr 2014 - 11:14 am | चित्रगुप्त

एक भाकरी खाल्ली -- अनेक भाकरी खाल्ल्या.
एक मुलगी दिसली -- अनेक मुली दिसल्या.
एक पिशवी घेतली -- अनेक पिशव्या घेतल्या.
एक रेकॉर्ड वाजवली -- अनेक रेकॉर्डी वाजवल्या.
एक सायकल चालवली -- अनेक सायकली चालवल्या....

नेमका नियम काय आहे????

ज्ञानव's picture

10 Apr 2014 - 11:21 am | ज्ञानव

रेकॉर्ड, सायकल सारख्या इंग्रजी शब्दांचे अनेकवचन मराठीत भयंकरच होते जसे सिनेमा आणि सिनेमे (हे जास्तच त्रासदायक आहे पण सर्रास वापरातही आहे.)

बाकी इकारांत शब्दांचे अनेकवचन ज्या नियमानुसार होते त्याबाबत तज्ञ इतरत्र चर्चा करत आहेत तिथे डोकवावे इथे सुखी धाग्याचे उगाचच रणकंदन नको.

मलाही भारीचे अनेकवचन वाचून असाच आनंद झाला.

वन्दना सपकाल's picture

12 Apr 2014 - 4:00 am | वन्दना सपकाल

खुपच सुंदर....लिहलय....

अनिता ठाकूर's picture

12 Apr 2014 - 2:37 pm | अनिता ठाकूर

@ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ'. (तत+ज्ञ=तज्ज्ञ).( 'त' चा पाय मोडता येत नाही.)म्हणजे, त्या संबंधित विषयातील जाणकार. तसेच, 'रणकंदन' नाही, तर, 'रणक्रंदन'.म्हणजे, रणावर चाललेली धुमश्चक्री.
@रेवती, आपल्याला 'भाकरी' म्हणावयाचे आहे का?
बाकी, सुखाबद्दल जे वर लिहिले गेले आहे त्यात सगळं आलं आहेच.
एखाद्या अक्षराचा पाय कसा मोडायचा ते कुणी सांगेल का?

शुचि's picture

14 Apr 2014 - 7:01 pm | शुचि

"तज्ञ" च अन "रणकंदन" च वाचलेलं तरी आहे. आक्रंदन वेगळं पण रणकंदन हा शब्द रणकंदन म्हणूनच वाचला आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच.

होय अनिताताई, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. भाकरीच म्हणायचे आहे.

मुक्त विहारि's picture

14 Apr 2014 - 11:01 pm | मुक्त विहारि

आवडले.

अमीबा's picture

16 Apr 2014 - 11:31 am | अमीबा

"मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत."

>>

हे विशेष पटले. साध्या आणि मोजक्या शब्दांत मांडले आहे.

विटेकर's picture

16 Apr 2014 - 4:12 pm | विटेकर

मेरा फंडा इसमे बहुत क्लियर है, नो कन्फ्युजन अ‍ॅट ऑल!
मागे मी एकदा याच विषयावर एक अर्धवट लेखमाला लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता..
मला वाटते सुख हे चार पातळ्यांवर असते आणि प्रत्य्क पातळीवर त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढत जातो.
१. शरीर
२. मन
३. बुद्धी
४. आत्मा
आता पुन्हा टंकत नाही , तेच चिकटवतो.

माणसाची जगण्याची मूलभूत प्रेरणा " सुख " आहे आणि अधिकाधिक सुख मिळवणे , त्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे आणि सुख मिळवणे याच साठी मनुष्य जगत असतो. आणि मनुष्यच नव्हे तर आखिल प्रणिमात्र हे सुखासाठीच धडपडत असतात.
सुख म्हणजे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती ! गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली , गुलाब्जाम मिळाले सुख ! तहान लागली थंड्गार पाणी मिळाले सुख ! झोप आली , आरामदायी शय्येवर सुरेख झोप मिळाली , सु़ख ! थोडक्यात-

आपल्या मनातील इच्छांची पूर्ती पुन्हा पुन्हा होत राहणे म्हणजे पुन्हा पुन्हा सुख !

अधिकाधिक इच्छांची पूर्ती म्हणजे अधिकाधिक सुख !

मनातील इच्छांची पूर्ती
सुख = -------------------
मनातील एकूण इच्छा

इतकी सुखाची साधी सोपी सरळ व्याख्या निर्माण झाली, पण सुखाची साधने मर्यादित होती आणि त्यामानाने इच्छुक मात्र उदंड अशी स्थिती निर्माण झाली. मग मनुष्य अधिकाधिक सुखासाठी अधिकाधिक उपभोगाची साधने निर्माण करु लागला / खरेदी करु लागला आणि अश्या प्रकारच्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी अधिकाधिक धनसंचय करु लागला आणि धन संचय म्हणजे सुख असा काहींसा समज दृढ झाला. आणि या पैश्याच्या हव्यासासाठी सुखाच्या मागे धावणारा माणूस प्रत्यक्षात मात्र दु:खी झाला !

आणि ही साधने मर्यादीत न रहावीत म्हणून औद्योगिक क्रांती द्वारे अधिकाधिक उत्पाद्न सुरु झाले. अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी बाजारपेठ अशी चक्राकार गती सुरु झाली.
आणि अश्या प्रकारची विकसित बाजार पेठ निर्माण करणे, त्यामध्ये खर्च करु शकेल असा वर्ग निर्माण करणे आणि सतत पोकळी निर्माण करून त्यात भर टाकत राहणे यालाच "विकास " असे म्हंटले गेले !

दुर्दैवाने पाश्चिमात्य जगातील हीच विकासाची व्याख्या भारतीयांनी स्वाकारली आणि अक्षय सुखाचा ठेवा देणारी सर्वंकष भारतीय जीवन शैली नाकारली.

मनातील इच्छांची पूर्ती
सुख = -------------------
मनातील एकूण इच्छा

हे समिकरण प्राचीन भारतीयांना माहीत नव्हते काय ? त्याशिवाय चार्वाकांसारखे दार्शनिक ही होते. ययाती सारखी ओर्बाडून सुख घेऊ पाह्णारे ही होते , पण भारतीय तत्ववेत्त्यानी सधा विचार केला , हा भागाकार पूर्ण १ यायचा असेल तर " छेद " कमी केला पाहीजे ! इच्छा कमी केल्या की आपोआपाच भागाकार १ कडे जाईल.

पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील !
आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !

पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव !
मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली.

योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात ..

१. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा.
२. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा)
३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा.
४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल.

थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे !
अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम !
धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो. याचा सरल सरळ अर्थ असा की, संयमित अथवा प्रमाणित उपभोग माणसाला सुखापर्यंत नेऊ शकतो !
ही सुखे प्रामाणित करण्यसाठी चार आश्रमांची मांड्णी करुन एकात्म सुख मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य करु शकतो , नव्हे असे मिळवता येते हे भारतीय संस्कॄतीने सिद्ध केले आहे. या प्रमाणीकरणाला पुरुषार्थाची जोड दिली आहे म्हणजे रस्ता ( आश्रम ) आणि गंतव्य ( पुरुषार्थ ) दोन्हीही सांगितले आहेत. मोक्ष हे नरदेहाचे अंतिम गंतव्य आहे आणि जन्म ते मृत्यु या सार्या प्रवासात सारे लक्ष्य तिकडेच असले पाहीजे, म्हणजे प्रत्येक कर्म हे त्याच्याच अनुसंधानात असले पाहीजे.
धर्म या पुरुषार्थाच्या मर्यादेत अर्थ आणि काम या पुरुषर्थाची आखणी केली आहे. आयुष्याचा जीवन प्रवाह हा धर्माचे तीर सांभाळून अर्थ आणि काम पुरुषार्थांने प्रवाहित केले पाहिजेत , म्हणजे मोक्षाप्रत जाता येते !
अर्थ आणि काम हा पुरुषार्थ फक्त गॄहस्थाश्रमातच असल्याने आपोआपच उपभोग मर्यादित झाला. धर्माचे बंधन ही आपोआप प्राप्त झाले. वान्प्रस्थ आणि संन्यासाश्रमात समाजोपयोगी ( आत्मन मोक्षार्थ जगद हितायच ) व मोक्षाप्रत नेणारीच कामे करायची आहेत.
या चार पुरुषार्थ आणि चार आश्रमांच्या रचनेमुळे , राष्ट्राचे सर्वात शेवटचे एक़क - मनुष्य हा सुखी होऊ शकला. अशा सुखी लोकांचा समूह म्हणजेच सुखी समाज !
याचाच व्यत्यास असा की केवळ शरिर उपभोगाच्या सुख - सुविधा उपलब्ध करुन आणि भौतिक गोष्टी निर्माण करुन सुखी होता येणे अवघड आहे. त्यामुळे मनुष्य केवळ अर्थ आणि कामाचा अतिरेक करुन दु:खीच होईल !

समीरसूर's picture

18 Apr 2014 - 11:05 am | समीरसूर

छान प्रतिसाद.

पण आजकाल पाश्चिमात्य देश भारतापेक्षा जास्त सुखात आहेत असे वाटते. भारतातल्या लोकांची गोची झालीय. भारतातल्या तात्विक सुखाची कास धरायची की पाश्चिमात्य देशांमधल्या भौतिक सुखांच्या मागे पळायचं या गोंधळात भारतीय माणूस हरवला आहे असे वाटते. आणि सुख अनुभवण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा, सच्चेपणा हे गुण देखील लागतातच; या गुणांची भारतात प्रखर वानवा आहे. त्यामुळे सगळंच कठीण झालं आहे. असो.

सुख मिळवण्याची साधनं आणि खरं सुख(आनंद) ह्यातला फरक (डिस्क्रिमिनेट) समजून घेतला जाणं अपेक्षित आहे. नंतर सुख म्हणजे नक्की काय त्याचा विचार होऊ शकेल.

सुखाची साधनं ही एक म्हटलं तर खूप वाईड रेन्ज मानावी लागेल. स्वशरीरापासून सुरुवात करुन जगातली प्रत्येक गोष्ट सुखाचं साधन म्हणता येते. त्याबरोबरच असलेपणानं नि नसले पणानं सुखाची जाणीव होते. अर्थात ही जाणीव खरोखरच त्यावर अवलंबून असते की ती आपली त्या गोष्टीवर निर्माण झालेली 'प्रतिक्रिया' असते?

सुख अथवा आनंद कुठल्याही व्यक्ति, वस्तू अथवा परिस्थिती मध्ये बदलत नसेल तरंच त्याला 'खरं सुख' म्हणता येईल.

अनिता ठाकूर's picture

17 Apr 2014 - 12:57 pm | अनिता ठाकूर

@शुची, मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे. मात्र,आपण म्हंटल्याप्रमाणे,'रणकंदन' हा शब्दही आहे. ह्या शब्दाबद्दलची माझी चूक मी सुधारत आहे. मनापासून धन्यवाद.

मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे.

अरेच्च्या मग असेल बुवा. आपल्यालाही धन्यवाद.

सुशेगाद's picture

18 Apr 2014 - 1:34 am | सुशेगाद

पडल्या पडल्या झोप लागणे, भरपूर सेक्स , फुल स्पीड इंटरनेट आठवड्याला एखादी समुद्रावर ट्रीप मारणे , मासे खाणे , दारू पिऊन थोडफार झिंगणे आणि लिहिणे म्हणजे सुख. जस जस वय वाढत जाईल तसतस सुखाच्या अपेक्षा देखील बदलत जातील. सुरवातीपासूनच त्या जर मर्यादित ठेवल्या तर सगळ सुख आपलाच आहे.
-सुखाच्या शोधात असणारा एक तात्पुरता दुखी मनुष्य!

सुखाच्या शोधात असणारा एक तात्पुरता दुखी मनुष्य!

ये दिन भी जायेंगे!

अर्धवटराव's picture

18 Apr 2014 - 3:42 am | अर्धवटराव

काय शाप देताय का ??? =))

नाही हो, दु:खात आहेत म्हणून म्हटले हे दिवस जातील :)