मेथी मटर मलाई

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
20 Mar 2014 - 12:54 am

.

साहित्यः

१ जूडी मेथी, पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावी.
१ छोटा कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
१ वाटी मटार (मी फ्रोझन मटार वापरले आहेत, तुम्ही जर कच्चे मटार घेत असाल तर अर्धवट उकडून घ्यावे)
३/४ वाटी फ्रेश क्रीम (ग्रेव्ही कितपत दाट-पातळ हवे त्याप्रमाणे)
२-३ लसूण पाकळ्या चिरून
पेरभर आले बारीक चिरलेले
२-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टेस्पून भिजवलेले काजू
१ टेस्पून कसूरीमेथी
२ मसाला वेलदोडे
१/२ टीस्पून जीरे
३/४ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीप्रमाणे

.

पाकृ:

स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून घ्यावी.
मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, आले. लसूण, काजू व हिरव्या मिरच्या एकत्र करुन, किंचित पाणी घालून मुलायम वाटून घेणे.

.

कढईत तेल गरम करुन जीरे व मसाला वेलदोडे घालून परतणे.
त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
आता त्यात बारीक चिरलेली मेथी, मीठ, गरम-मसाला घालून खमंग परतणे.

.

कसूरीमेथीमधील थोडी मेथी चुरडून घालावी व मटार घालून एकत्र करावे.
अगदी थोडेच पाणी घालून, झाकून वाफ काढावी.
त्यात आता क्रीम घालावे व उरलेली कसूरीमेथी घालून मिक्स करुन, झाकून ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.

.

मेथी मटर मलाई चपाती, फुलके, पराठे, रोटी किंवा नानबरोबर सर्व्ह करावी.

.

नोटः

मेथीचा कडवटपणा आवडत नसल्यास, मेथी थोडी ब्लांच करुन मग बारीक चिरून घेणे.
ह्या पाककृतीमध्ये खवा ही वापरु शकता, खवा थोडा परतून घ्यावा व त्यात वाटलेला मसाला घालावा.
खवा वापरणार असाल तर क्रिमचे प्रमाण कमी करावे किंवा ग्रेव्ही पातळ हवी असल्यास ३/४ वाटी क्रिमला २ टेस्पून खवा परतून घ्यावा.
अशाच पद्धतीने मटारऐवजी पनीर, उकडून तुकडे केलेले मश्रूम घालून पाककृती बनवता येईल.
काहीजणं ह्यात हळद, तिखट ही घालतात पण त्याने पदार्थाचा रंग बदलतो. आवडत असल्यास घाला :)

प्रतिक्रिया

दिव्यश्री's picture

20 Mar 2014 - 1:06 am | दिव्यश्री

व्वा वा ...नेहमी प्रमाणेच ...मस्त ई. ई . :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Mar 2014 - 2:48 am | प्रभाकर पेठकर

मस्त आणि सोपी पाककृती. सोबत देशी घी वाले परोठे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच.
हळद - तिखट घालून भाजीचा रंग बिघडवू नये. पांढरा-हिरवा रंगमिलाप सुंदर दिसतो.

स्पंदना's picture

20 Mar 2014 - 3:20 am | स्पंदना

शुरेख्ख्ख्ह!!
चविष्ट दिसते आहे.

नेहमीचा प्रतिसाद + एक कौतुक समजून घेणे.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2014 - 6:52 am | मुक्त विहारि

गुरुवार सार्थकी लागला.

(बाकीचे प्रतिसाद नेहमी प्रमाणे,

तोंपासू,इनो,जळजळ,छ्ळवाद इ.इ.)

यशोधरा's picture

20 Mar 2014 - 7:45 am | यशोधरा

अगं आई गं. छळवादी कार्टी!

अजया's picture

20 Mar 2014 - 8:19 am | अजया

उद्याच!!

प्रचेतस's picture

20 Mar 2014 - 8:28 am | प्रचेतस

सुरेख.

कच्ची कैरी's picture

20 Mar 2014 - 9:23 am | कच्ची कैरी

एकदम मस्त !!

सुहास झेले's picture

20 Mar 2014 - 9:37 am | सुहास झेले

नेहमीप्रमाणे झक्कास... :)

मृत्युन्जय's picture

20 Mar 2014 - 10:18 am | मृत्युन्जय

मेथी मटर मलईत तिखट आणि हळद याची कल्पनाही करु शकत नाही, मेमम ही अशीच हवी जशी फोटोत दिसते आहे. लाजवाब. आमच्या मातोश्रींचा या रेसिपीत हातखंडा आहे अर्थात तुमचे सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

सविता००१'s picture

20 Mar 2014 - 10:42 am | सविता००१

मी यशोसारखच म्हणतेय तुला. छळवादी कार्टी... ;)

आयुर्हित's picture

20 Mar 2014 - 12:25 pm | आयुर्हित

सर्व जिन्नस आरोग्यदायी आहेत.
खूप छान सादरीकरण व चवदार+अत्यंत उपयोगी पाकृ
धन्यवाद.

michmadhura's picture

20 Mar 2014 - 12:56 pm | michmadhura

छान दिसतेय, आता करून पहायलाच हवी.

बोर्डावर नाव पाहिलं, धागा उघडला, फोटो पाहिले, आता धागा बंद करतोय.
_/\_

सूड's picture

20 Mar 2014 - 2:35 pm | सूड

+१

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2014 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा........................!

आरोही's picture

21 Mar 2014 - 9:47 am | आरोही

मस्त ...

झक्कास्स पाकृ व सादरीकरण.

इंजिनिअरींला असताना माझा एक मित्र नेहमी हॉटेलमध्ये ऑर्डर देताना "१ प्लेट M3 लाना" म्हणत असे. :)

इशा१२३'s picture

22 Mar 2014 - 11:41 am | इशा१२३

माझी आवडती डिश...पण मी टॉमेटो नाही घालत.तू टॉमेटो घातला आहेस तरी रंगात काही फरक पडला नाहीये.आता अशी करून बघते.बाकी फोटो मस्तच..

ह भ प's picture

22 Mar 2014 - 12:20 pm | ह भ प

अन मस्तच मस्त... पा कॄ..

अनन्न्या's picture

22 Mar 2014 - 7:20 pm | अनन्न्या

*good*

पियुशा's picture

23 Mar 2014 - 10:13 am | पियुशा

लै भारी :)

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 3:32 am | प्यारे१

अ‍ॅज युज्वल.

व्हॉट दॅट 'फूल' इज मेड ऑफ?

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2014 - 4:03 am | सानिकास्वप्निल

व्हॉट दॅट 'फूल' इज मेड ऑफ?

लाल मिरची ;)

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 8:20 pm | प्यारे१

ओके.
मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑन >

खाण्याचा पदार्थ आहे मान्य. पण एकच लाल मिरची कुठून आणायची? का? पदार्थ बनवताना वेगळी नाही ठेवलेली.

मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑफ

लई डोक्यात जातात हे लोक. खा की गप्प. ;)

बाकी टाईम अ‍ॅण्ड मनी मॅनेजमेण्ट, जनरल स्कील्स, प्रेझेन्टेशन्स, पदार्थांचा नेमका नि नेटका वापर ह्या गोष्टींसाठी असले शोज बघावेत.

आंबट चिंच's picture

24 Mar 2014 - 12:10 pm | आंबट चिंच

मेथीची भाजी सगळ्यात जास्त आवडीची. या भाजीबरोबर कोणतीही भाकरी पण छान लागते.

Eating
चला भुक लागली.

वाह! पाककृती आणि सादरीकरण दोन्ही झकास! तुम्ही वापरलेली भांडी देखील किती स्वच्छ आहेत.

वेल्लाभट's picture

24 Mar 2014 - 8:27 pm | वेल्लाभट

कातिल फोटोज !!!!!!

मदनबाण's picture

30 Mar 2014 - 11:56 am | मदनबाण

वा.........................................................ह्ह. :)

पैसा's picture

30 Mar 2014 - 12:08 pm | पैसा

पहिल्या फोटोतच जीव गेला. भानावर आले की पुढचं वाचते.

टक्कू's picture

30 Mar 2014 - 5:05 pm | टक्कू

सही!!! शेवटच्या फोटोतलं गार्निशिंग टॉप्प ! एकदम प्रोफेशनल!

अनन्या वर्तक's picture

11 Apr 2014 - 11:51 pm | अनन्या वर्तक

सानिकादी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर पाककृती. तुम्ही क्रीम वापरले नाही म्हणून मला जास्त आवडली मी नक्की प्रयत्न करून पाहीन. माझे पती Dr Akash ह्यांना मेथीची भाजी फार आवडते. माझ्या आई ने आम्हा दोघांना गार्लिक आणि शेंगदाणे वापरून मेथीची भाजी बनवावयास शिकविले आहे आत्ता तुमची पाककृती सुचवून पाहते. बनवली तर नक्की फोटो टाकेन.

कहर आहे कहर!!! जबरा फ़ोटो आहे. भुकेनी कसातरीच व्हायला लागलं आहे :(