लहसूनी दाल / लसणीचं वरण

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
13 Jan 2014 - 11:14 pm

साहित्यः

छोटी १/२ वाटी तूरीची डाळ
छोटी १/२ वाटी मुगाची डाळ
५-६ लसूण पाकळया (जरा जास्तं घेतले तरी चालेल, इथे पाकळ्या मोठ्या असतात)
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरे
२-३ लाल सुक्या बोर मिरच्या (साध्या मिरच्या वापरल्या तरी चालतील)
३-४ कढीपत्ता
पाव टीस्पून हिंग
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर

.

पाकृ:

तूरीची व मुगाची डाळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे भिजत ठेवावी.
त्यात थोडी हळद, किंचित हिंग व एक पाकळी लसूण ठेचून घालावी.
डाळ कुकरला चांगली शिजवून घ्यावी.
शिजवलेल्या डाळीत हळद व लाल तिखट घालून चांगली घोटून घ्यावी.
आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळीला उकळी काढावी. चवीप्रमाणे मीठ घालावे.
वरणाला उकळी फुटली की गॅस बंद करावा.

.

बुट्टीत तेल किंवा साजूक तूप गरम करुन मोहरी, जीरे, कढीपत्ता, बोर मिरच्या व हिंग घालून फोडणी करावी.
त्यात उरलेला लसूण, ठेचून घालावा व तो तांबूस रंगावर परतावा.
ही फोडणी वरणावर ओतावी झाकून १० मिनिटे ठेवावी.
सर्व्ह करतेवेळी वरुन कोथींबीर पेरावी.

.

लहसूनी दाल जीरा राईस किंवा स्टीम्ड राईसबरोबर सर्व्ह करावी. सोबत कुरकुरीत कारल्याच्या काचर्‍या असल्या तर अहाहा!!

.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

13 Jan 2014 - 11:22 pm | कवितानागेश

व्वॉव!! सुंदर. :)

आनन्दिता's picture

14 Jan 2014 - 1:45 am | आनन्दिता

झाली का तुझी सुरुवात...जेट लॅग वैग्रे भानगडी नसतात काय तुमच्यात.. इथे भुकेने पोटात कावळे कोकलतायत अन काय तर म्हणे लसुनी दाल :-/ :\ :-\

शिद's picture

14 Jan 2014 - 2:27 am | शिद

वाफाळत्या भाताबरोबर एकदम झकास लागेल...

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2014 - 2:47 am | प्रभाकर पेठकर

डाळ आणि भाताशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. त्यात लसूणी डाळ असेल तर भात जरा जास्तच हवा. जेवून हात धुतल्यावरही हाताच्या बोटांना बिलगलेला लसूणी डाळ (आणि जिर्‍याचा) सुगंध उच्च समाधान मिळवून देतो.
करतो उद्याच.

व्वा! मस्तच! फोटू, कृती सगळे छान आहे पण कारल्याच्या काचर्‍यांचा उल्लेख केल्याने आधी बाजारात जाऊन कारली आणावी लागतील्........नाही नाही, शोधावी लागणार नाहीत, सहजपणे मिळतात आमच्याकडे, पण आता ही दाल करायची म्हणजे कारली हवीतच असे समिकरण झाले आहे. ;)

प्यारे१'s picture

14 Jan 2014 - 2:54 am | प्यारे१

ब्रेक के बाद फिर पेश है!
'सानिका'ज किचन' !
ठेचलेल्या लसणापेक्षा आडवे बारीक काप केलेला लसूण चांगला लागेल का?

कपिलमुनी's picture

14 Jan 2014 - 12:45 pm | कपिलमुनी

>>ठेचलेल्या लसणापेक्षा आडवे बारीक काप केलेला लसूण चांगला लागेल का?

कापलेल्या लसणापेक्षा ठेचलेल्या लसणाचा स्वाद वरणा मधे किंवा फोडणी मधे लौकर आणि जास्त उतरतो / मिसळतो / खुलतो ..

आलं , मिरच्या बद्दलही हेच लागू होते ..

सानिकास्वप्निल's picture

14 Jan 2014 - 6:18 pm | सानिकास्वप्निल

अगदी बरोबर
धन्यवाद :)

अजया's picture

14 Jan 2014 - 8:20 am | अजया

लावलस का आम्हालापण कामाला! ;)

मस्त! फोटो आणि कृती - दोन्ही आणि तो शेवटचा फोटो तर कातील आहे! इथे तिथे पडलेले डाळीचे दाणे, एखादेच कढीपत्त्याचे पान, लसणीच्या पाकळ्या, बोर मिरची.. कलात्मक रीत्या पडलेय सारे :) एक्दम भारी गं :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2014 - 11:06 am | प्रभाकर पेठकर

बहुतेक टेबल आवरायचं राहून गेलं. (ह.घ्या. सानिकास्वप्निल)

एक फोटो म्हणून सुरेख दिसतय की पेठकरकाका. मस्त आला आहे फोटो.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jan 2014 - 10:07 am | प्रभाकर पेठकर

नक्कीच. सहमत आहेच.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2014 - 12:24 pm | मुक्त विहारि

त्याला बरीच कारणे आहेत.

एक तर हे असे सुंदर स्वैपाक घर (त्या स्वच्छ आणि चार बर्नर वाल्या शेगडी वर्रुन , स्वैपाक घर पण सुंदरच असणार, नाही का? "शीतावरून भाताची परिक्षा आणि चूली वरून स्वैपाक ग्रुहाची परीक्षा", करावी असे , भ.ले. भले सांगून गेले आहेत.)

दुसरे म्हणजे, ती मोजून मापून घेतलेली उपकरणे, आणि ती पण डाग विरहीत.

तिसरे म्हणजे सादरी करण तेच ते लेखन.

चौथे म्हणजे फोटो.

तुमचे हे असे लेख वाचले की, आमच्यातील न्युनगंड जागा होतो.

जावूदे, शेवटी काय? तर...

तुम्ही कधी तरी चुकाल अशी अपेक्षा कर्रून तुमचा पुढला धागा उघडणे, इतकेच आमच्या हाती आहे.

अर्थात मग परत अपेक्षाभंग होतोच, पण तो सुखदच बरे का. प्रत्येकवेळी दु:खदच अपेक्षाभंग व्हावा असा काही नियम नाही.

Mrunalini's picture

14 Jan 2014 - 12:32 pm | Mrunalini

वा वा सानिका.. एकदम यम्म्म्म्म. माझी फेवरीट डाळ. मस्तच आणि फोटोहि छान

सखी's picture

15 Jan 2014 - 1:38 am | सखी

हेच म्हणते, थंडी किंवा खूप पाउस पडला असेल, त्यादिवशी ही दाल अजुन चविष्ट लागते, बरोबर भाजलेला पापड.
तुझ्या सादरीकरणाला किती दाद द्यावी तेच क़ळत नाही.

वात्रट मेले's picture

14 Jan 2014 - 12:55 pm | वात्रट मेले

होउ द्या खर्च
आज सगल्यांना पार्टि देउनच टाका.

अनन्न्या's picture

14 Jan 2014 - 5:27 pm | अनन्न्या

बय्राच दिवसानी परत सानिका आपल्या आवडत्या जागी हजर झालेली दिसतेय!

मधुरा देशपांडे's picture

14 Jan 2014 - 6:02 pm | मधुरा देशपांडे

फोटो पण अप्रतिम.
माझी आई लसूण आणि थोडे जिरे एकत्र ठेचून घालते. त्याची एकत्र चवही छान लागते.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2014 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ..! लय भारी. :)

जाता जाता:- ही दाल,रामदेवबाबा ढाब्यावर लै झ्याक मिळते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jan 2014 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! स्स्स्स्स्स्स्स्स्सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र !!

पैसा's picture

14 Jan 2014 - 8:40 pm | पैसा

बघून आज दुपारी लगेच केली. ए-वन! (जास्त काही करायचा कंटाळा आला होता.) फक्त बरोबर भात आणि कारल्याऐवजी बटाट्याचे काप केले.

ह भ प's picture

14 Jan 2014 - 8:52 pm | ह भ प

जेवण झाल्या झाल्या धागा उघडला.. आता परत भुक लागली.. :)

पहाटवारा's picture

15 Jan 2014 - 7:05 am | पहाटवारा

मस्तच लागते लसणी दाल .. फक्त मुगाच्या डाळिची बनवलेली रेशीपी जास्त प्रिय आहे. अशी दोन्हि (अन कधी-कधी अजून १-२ डाळी ) एकत्र करून आम्हि एक 'भेसळीचे वरण' करतो. त्यातहि हि अशी लसणाची फोडणी अन जाळून/ठेचून खोबरे घालतो. एकूणच गरम्गरम भाकरि किंवा तव्यावरल्या पोळ्या ताटात पडत असताना अशा गरमगरम , जीभ पोळणार्या वरणाबरोबर खायला एकदम खास !
-पहाटवारा

वेल्लाभट's picture

15 Jan 2014 - 7:08 am | वेल्लाभट

कै च्या कै भारी फोटटो

हे सही लागतं. आय नो.... मस्त फ्लेवर येतो लसणीचा.

सुहास झेले's picture

15 Jan 2014 - 7:54 am | सुहास झेले

भारीच.... !!!

वासु's picture

15 Jan 2014 - 11:50 am | वासु

मस्तच

पियुशा's picture

15 Jan 2014 - 2:24 pm | पियुशा

सहिच्च !

गणपा's picture

15 Jan 2014 - 5:29 pm | गणपा

नयनरम्य फोटो.
बाकी वरील सर्वांशी बाडिस.

भावना कल्लोळ's picture

15 Jan 2014 - 5:43 pm | भावना कल्लोळ

आमच्या मास्टरशेफ यांनी हजेरी लावली आहे,……… ते पण एकदम जोषात.

ganu's picture

16 Jan 2014 - 3:31 pm | ganu

लसूण आणि थोडे जिरे एकत्र ठेचून त्याची एकत्र चवही छान लागते.

मस्त ! असे हे दोन शब्द टंकुन मी माझी भूक आटपती घेतो. :)

भरपूर लसूण ठेचून केलेली फोडणी अतिशय छान चव आणते, असा स्वानुभव आहे. ते वरण असेल तर आहा..

रेवती's picture

18 Jan 2014 - 5:44 am | रेवती

आज केली होती. मस्त, खूपच चविष्ट झाली होती. वाटीभर उरलीये ती उद्या मुद्दाम रोटीबरोबर खाऊन बघणार आहे.

किसन शिंदे's picture

18 Jan 2014 - 9:46 am | किसन शिंदे

नाय आवडले फोटो आणि शेवटचा तर मुळ्ळीच नाही. :P

या बयेला पळवउन नेतील एखाद्या दिवशी एव्हढ झकास जेवण करते म्हणुन ;)

वाश्या, लेका तुच का ट्राय करत नाय ;)

प्यारे१'s picture

18 Jan 2014 - 2:04 pm | प्यारे१

आँ???????

काय, तब्बेत काय म्हणते आता? ;)

मेघना मन्दार's picture

16 Apr 2014 - 2:05 pm | मेघना मन्दार

मिपा ची सभासद नव्हते तेन्व्हा वाच्अलेली पाक्रु.. बर्‍याचदा घरी करुन पाहिली आणि घरच्याना खुप आवड्ली.. आत्ताच नवीन लग्न झाल्यावर केली तर सासू सासर्‍याना आणि नवर्‍याला पण खुप आवड्ली.. :-) सभासद झाल्यावर ठरवला होता कि इथे येउन सान्गायचा..धन्यवाद सानिका.. :)

शुचि's picture

16 Apr 2014 - 8:12 pm | शुचि

:) छान. बरं वाटलं ऐकून.

सानिकास्वप्निल's picture

16 Apr 2014 - 9:08 pm | सानिकास्वप्निल

पाकृ आवडल्याबद्दल धन्यवाद :)
मिपावर स्वागत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Apr 2014 - 8:10 pm | निनाद मुक्काम प...

मस्तच
आजच करून पाहतो