गायक-संगीतकार विठ्ठल शिंदे ह्यांना भावपूर्ण आदरांजली!

मित्रहो,माझे बालपण समृद्ध करणार्‍या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे विठ्ठल शिंदे. भाळी अर्धचंद्र,माथी शुभ्र गंगा,लिंपिले सर्वांगा चिता-भस्म हे त्यांचे मी ऐकलेले पहिले गाणे. काहीसा चोरटा तरीही गोड आणि तितकाच आर्त आवाज असणार्‍या विठ्ठलरावांनी त्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेडं केलं होतं. भल्या पहाटे आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या मंगलप्रभात ह्या कार्यक्रमात दर सोमवारी हे गीत हमखास लागायचे. तसेच त्यांनी गायलेली अजून काही भक्तिगीतेही खूपच लोकप्रिय होती. १)देवा हो सख्या पांडुरंगा,दर्शन द्या मजला श्रीरंगा २) विठ्ठला, देवा आलासी माझ्या दारी,पण थांब जरासा विटेवरी ३)नित्य वाचे तुझे नाम गाऊ,पांडुरंगी सदा लीन राहू ही देखिल माझ्या आवडीची आहेत आणि आजही अधून मधून ती आकाशवाणीवरून लागत असतात.
इथेच आणि ह्या बांधावर अशीच शामल वेळ,सख्या रे किती रंगला खेळ हे माणिक वर्मांनी गायलेले सुमधुर गीत आणि मज भेटून जा हो दत्त सख्या अवधूता हे आर.एन.पराडकरांनी गायलेले दत्तगीत ; ह्या दोन्ही गाजलेल्या गीतांचे संगीत दिग्दर्शन विठ्ठलरावांचे आहे.

विठ्ठलरावांचे नाव त्रिखंडात गाजवले ते मात्र एका लावणीने. प्रतिलता रोशन सातारकरांनी गायलेली लावणी म्हणजे नेहमीच राया तुमची घाई,नका लावू गठूडं बांधायला,येऊ कशी मी नांदायला हो,येऊ कशी तशी मी नांदायला ही होय. ह्या लावणीचे संगीत आहे विठ्ठरावांचे .
विठ्ठलरावांचे संगीत आणि गायिका रोशन सातारकर ह्या जोडगोळीची ही अजून काही गाजलेली लोकगीतं!
१)माझ्या नवर्‍याने सोडलीया दारु

२)मला म्हन्त्यात पुन्याची मैना
३)डार्लिंग डार्लिंग काय म्हन्तोस
४)उद्या जाईन मी माझ्या गावा,माझ्या अंगाला हळद लावा
५)पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज .
ही गाणी ऐकलेली नाहीत असा क्वचितच कुणी मराठी माणूस भेटेल.

विठ्ठलरावांनी बाबासाहेब आंबेडकरांवर गीत भीमायन हे महाकाव्य लिहिले आणि त्याचे हजारो कार्यक्रम त्यांनी अवघ्या महाराष्ट्रभर केलेत. अतिशय ऋजु वृत्तीच्या विठ्ठलरावांचे मराठी सुगम संगीत आणि लोकसंगीतातले कार्य अनमोल असेच आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित गायक-गायिकांबरोबर काम करूनही हा लोकगायक शेवटपर्यंत तसा पडद्याआडच राहिला.

लोकगीतांमध्ये विठ्ठलरावांचे नाव धृवतार्‍याप्रमाणे अढळ आहे. काय विलक्षण योगायोग आहे पाहा. अशा ह्या लोकसंगीतातल्या महागुरुला काल दिनांक १८जुलै २००८ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच देवाज्ञा झाली. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली.

भावपूर्ण आदरांजली !!

--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

श्रद्धांजली


महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित गायक-गायिकांबरोबर काम करूनही हा लोकगायक शेवटपर्यंत तसा पडद्याआडच राहिला.

खर आहे. त्यांना भावपुर्ण आदरांजली
प्रकाश घाटपांडे

प्रणाम...

विठ्ठलबुवा गेले! एक अतिशय गुणी, विनम्र कलाकार काळाने नेला!

छानच गायचे विठ्ठलबुवा! अगदी सुरेल...

त्यांच्या स्मृतींना माझाही प्रणाम...

तात्या.

--

कलेच्या क्षेत्राततं, खास करून संगीताच्या क्षेत्रातलं कुणी गेलं की घरचं, अगदी आपल्या गणगोतातलंच कुणीतरी गेलं आहे असं वाटतं!

विठ्ठल शिंदे यांना भावपुर्ण आदरांजली.

गायक,संगीतकार विठ्ठल शिंदे यांना माझीही भावपुर्ण आदरांजली.
ते कन्नमवार नगर ,विक्रोळी येथे राहत होते.

भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित गायक-गायिकांबरोबर काम करूनही हा लोकगायक शेवटपर्यंत तसा पडद्याआडच राहिला.

सहमत आहे.

त्यांचे मला ''उद्या जाईन मी माझ्या गावा,माझ्या अंगाला हळद लावा'' आणि 'येऊ कशी तशी मी'
हे खूप आवडते.

गायक,संगीतकार विठ्ठल शिंदे यांना माझीही भावपुर्ण आदरांजली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचीही आदरांजली

मराठी मनाला रिझविणारा एक अत्यंत गुणी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला.

विठ्ठलरावांनी जीवनात निर्माण केलेला आनंद मराठी सृजन कधीही विसरणार नाही.

अत्यंत थोर माणसांच्या पदरी येणारी उपेक्षा त्यांनी बरीच अनुभवली. लायकी नसलेल्यांना पद्मश्री देणार्‍या सरकारने विठ्ठलरावांच्या गुणांची योग्य ती दखल घेतली नाही, याचे शल्य कायम आमच्या मनात राहील.

विठ्ठलरावांना आमची भावपूर्ण आदरांजली.

आपला,
(खिन्न) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनाला खत लागुन राहीली.

काका विट्ठल शिदे ह्याच्या बद्दलचा माहिती पुर्णे लेख छान आहे.
पण मनाला खत लागुन राहिली तुमचा लेख वाचुन.
विट्ठल शिदे याना माझीही भावपुर्ण आदराजली.

विनम्र आदरांजली - - - - -!

गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या जाण्याने आपण रसीक एका गुणी कलाकाराला मुकले आहोत. त्यांना सदगती लाभो.

इथे ऐका!

विठ्ठल शंदे ह्यांच्या संगीताने नटलेली आणि रोशन सातारकर ह्यांनी गायलेली काही गाणी इथे ऐका.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे