बाप्पा

(डिस्क्लेमरः सदर मुक्तकात कुठल्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचा हेतू नाही. ड्यांबीसकाकांचे "नास्तिक" वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन. दुसरे काहीही नाही. मिसळपावावरील विडंबनकारांना, अर्थातच, खुले आमंत्रण आहे. सदर "कविता" अद्याप रॉ आहे, ह्याची जाणीव आहे. तेव्हा येथील सिद्धहस्त कवींनी सुधारणा सुचवाव्या, ही विनंती.)

लहानपणी देवळात, सतत पाहिला तुला
मोदक-करंज्या खात होतास नुस्ता बसलेला
पायापाशी उंदिर, मोबिलिटीसाठी
आईशप्पत, तुझ्या चंगळीचा हेवा वाटला

झालो मोठा थोडा, तेव्हा बघितलं एकदाच
रिद्धी-सिद्धींमधली निवड, तीदेखील पहिल्यांदाच
हे डिसिजन तुला, नाही करावे लागले मित्रा
कुछ भी कहो, लेकिन थोडा जळजळ हुवाच

पुन्हा एकदा दिसलास, आईच्या बायपासला
क्वाड्रुपल आहे, सांभाळून घे, विनंती मानायला
थ्यांकु व्हेरी मच, कसचं कसचं म्हणालास
तुझं जातीनं हजर राहाणं, खूपच आवडलं मला.

आता तर काय, तू नेहमीच फसवतोस
डोळ्यातल्या मोत्यांतून, तू सारखाच दिसतोस
पुढे येतात ते सगळे, वक्रतुंड महाकाय,
त्यांच्यात तुझा निवास, तिथेच का रे असतोस ?

हिच्या कर्करोगासाठी, घालू का तुला गाऱ्हाणे?
सध्या तुझे वर्कलोड, वाढले आहे म्हणे
तुझा बाप माझा पार्टनर, ब्रिजची पाने पीस
जाताना दिसावा हाच दीस, आता एकच मागणे

- सर्किट (१८ जुलॅ २००८)

वा!

सर्किटशेठ,
केवळ सुरेख कविता..अभिनंदन
खूप आवडली..
(नास्तिक अस्तिक) केशवसुमार
स्वगतः ह्या बाबाला येव्हडी अफाट प्रतिभा आहे ज्ञान आहे.. मग हा हे असले नाव घेऊन त्या नावा प्रमाणे का वागतो काही कळत नाही बॉ Waiting

मार्मिक

मस्त!
खूप आवडली.. एकदम मार्मिक

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मस्तच

कविता फार आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

वाहवा!

आवडली कविता मस्तच!

वा! क्या बात है!

एकदम सुंदर मुक्तछंद!
अर्थपूर्ण काव्य!!

चतुरंग

विशेष काव्यशैली

सर्किट यांची कुशल कुंचल्यानी काढलेले चित्र आहे.

विचार करण्यासारखे.

असेच

माझे मतही असेच.
कविता आवडली.

+१

काव्य शृंखलेतील आणखी एक उत्कृष्ट भाग ...

श्रुंखला

मुक्तसुनीत,

कदाचित "प्रायश्चित्त" वाचून नंतर ही कविता वाचल्याने, ही काव्य श्रंखला आहे, असे आपल्याला वाटत असेल. आपला दोष नाही. प्रायश्चित्त लिहून सुमारे दीड वर्षे झालीत. "बाप्पा" ही गेल्या शुक्रवारची. त्या मधल्या काळात ह्या लेखणीतून काय काय "बीभत्स" स्रवले, हे आपल्याला माहिती आहेच.

"बाप्पा" आणि प्रायश्चित्त ह्यांचा काहीही संबंध नाही. एकाच कविकिरडूने प्रसवलेल्या काही ओळी, एवढाच काय तो संबंध. पण दोन्ही लिहिताना सदर कविकिरडूच्या भावना, विचार, परिस्थिती, ह्याचा विचार करता, सदर रचनांना श्रंखला म्हणू नये, ही विनंती.

- ( उत्श्रुंखल) सर्किट

(एक) स्पष्टीकरण

कालमानाच्या संदर्भात (क्रोनोलॉजिकली) म्हणायचे झाल्यास या कविता सलग अशा असतील-नसतील. माझे असे म्हणणेच नव्हते की या एका माळेतल्या (सिरिज मधील) आहेत. परंतु या कवितांच्या अर्थातील तर्कागत संगती तुम्ही नाकाराल काय ? असे म्हणतात की कवी प्रवासात असतो (की आपण सारेच ? ). या प्रवासात लागलेली ही दोन स्थानके , एव्हढाच काय तो (माझ्यापुरता मला दिसलेला ) अर्थ.

या कविताना एका साखळीतल्या म्हण्टल्याने तुमच्या भावना दुखावल्या असतील तर अर्थातच मी माझे शब्द मागे घेतो. Smile

कविता आवडली..

काल वाचताना

आता तर काय, तू नेहमीच फसवतोस
डोळ्यातल्या मोत्यांतून, तू सारखाच दिसतोस
पुढे येतात ते सगळे, वक्रतुंड महाकाय,
त्यांच्यात तुझा निवास, तिथेच का रे असतोस ?

या कडव्याचा नीट अर्थ लागला नव्हता.. आज समजला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वा

काय मस्त कविता .. सर्किटराव तुमची प्रतिभा असामान्य आहे अन बुद्धी त्याहुनही असामान्य , आधी आम्ही आपणास सहजच गुरु म्हणायचो, आज मानले बॉ !!!

मस्त, सर्किटबाबू! मस्त!!

पुन्हा एकदा दिसलास, आईच्या बायपासला
क्वाड्रुपल आहे, सांभाळून घे, विनंती मानायला
थ्यांकु व्हेरी मच, कसचं कसचं म्हणालास
तुझं जातीनं हजर राहाणं, खूपच आवडलं मला.

क्या बात है!! व्वा!!
आणि,
तुझा बाप माझा पार्टनर, ब्रिजची पाने पीस
जाताना दिसावा हाच दीस, आता एकच मागणे
काय झकास कल्पना आहे, जबाब नही!
आम्ही असं लिहीलं असतं, बघा पटतंय का,

"तुझा बाप माझा पार्टनर, पीस बघू ब्रिजची पाने
जाताना दिसावा हाच दीस, हे एकच आता मागणे"

ड्यांबीसकाकांचे "नास्तिक" वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन.
(सर्किट स्वगतः तेंव्हा धोंडे मारायचे असतील तर डांबिसकाकाला मारा!!Smile) सिरियसली, तुम्हाला 'नास्तिका'वरून ही कल्पना सुचली हे वाचून अतिशय आनंद झाला. चला, आमचं पांढर्‍यावर काळं करणं अगदीच फुकट नाही गेलं तर....
तुम्ही गणपतीला श्री देव मानता (तुमचाच रेफः गणगण गणात बोते!), आणि आम्हाला त्याबद्द्ल आदर आहे.
आम्ही मात्र त्याला असं म्हटलं असतं,

"सोंडेआडून खुदकन् हसलास, मला आधी कळलंच नाही,
देवत्वाचं नको हे झंझट, तू तर माझा खरा स्नेही."
Smile
असो. तुमचं मुक्तक खूप खूप आवडलं!!!
आपला,
पिवळा डांबिस

धन्यवाद

धन्यवाद, सर्वांनाच, फक्त डांबीसकाकांनाच नाही.

पण सदर कवितेचे श्रेय डांबीसकाकांना अधिक जाते, हे नाकारून चालणार नाही. जसे जसे वय होत जाते, तेव्हा देव ह्या व्यक्तीला मित्रत्वाकडे झुकवणे आवश्यक ठरते. कारण लहानपणीच्या देवाबद्दलच्या सुपरह्युमनत्वाच्या संकल्पना हळू हळू अनुभवांतून कमी कमी होत जातात, आणि मग त्याच्यातील उणीवांची जाणीव होते. अरे, ह्याच्यात आपल्यासारखेच दोष आहेत, ही जाणिव होते, आणि मग अधिकच आपलेपण वाटू लागते. मित्रत्वाची भावना निर्माण होते. मग, जेव्ह केव्हा देवाची भेट होईल, तेव्हा त्याच्यासोबत ब्रिजचे चार डाव टाकायला काय हरकत आहे ? पण त्याच्या बापाला माझा ब्रिज पार्टनर केला, तर ते दोघे पार्टनर होणार नाहीत, हा एक स्वार्थी विचार. त्या दोघांतले अंडरस्टँडिंग अर्थातच जबरा असणार, बिडिंग न करताच, कॉण्ट्रॅक्ट वर येणार, म्हणून गणपतीला "तुझा बाप माझा पार्टनर" असे मित्रत्वाच्या भावनेने म्हटले आहे.

- सर्किट

छान

कविता विचार करण्याजोगी.
बाकी मिपावर कवितेचे अर्थ कवीनेच सांगण्याची भारी रीत सुरू झालेली दिसते Smile
लोकांनाही अर्थ लावू देत की.

अर्थ

बाकी मिपावर कवितेचे अर्थ कवीनेच सांगण्याची भारी रीत सुरू झालेली दिसते
लोकांनाही अर्थ लावू देत की.

चित्राताई,

मिपावरील सिद्धहस्त रसिकांना कवितेचा अर्थ समजवून सांगण्याची गुस्ताखी आमच्याकडून तरी शक्य नाही. डांबीस काकांनी शेवटच्या दोन ओळी बदलण्याची सूचना केली, म्हणून त्या ओळींमागची आमची भूमिका स्पष्ट केली एवढेच.

- सर्किट

स्पष्टीकरण!

सर्कीटबाबू,
आम्हाला तुमची भूमिका स्पष्ट आणि अर्थातच मान्य आहे.
आम्ही फक्त शब्दांचे डबे थोडे पुढेमागे केले. त्यामागे फक्त यमक जुळवण्याचाच उद्देश होता. गैरसमज नसावा....
-डांबिसकाका

उत्तम प्रकटन

उत्तम प्रकटन. आवडले.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

+१

आवडली

कविता आवडली, पंण शेवटचे कडवे जरा शब्द बदलून चांगले जमवता आले तर बरे होईल असे वाटले (यमक जुळत असले तरी वाचताना कुठेतरी अडखळल्यासारखे वाटले).

बाकी वृत्त वगैरे समजत नाही (त्याबाबतीत मी निवृत्त आहे!) पण ते म्हणताना जो आपसूक ठेका लागतो तो कुसुमाग्रजांच्या "कणा" कवितेसारखा वाटला.

छान आहे,

छान आहे कविता..

देवाला बंधु, सखा मानण्याची, त्याच्याशी गप्पा मारण्याची रीत जुनी आहे..

बाकी, कर्करोग किंवा बायपास आदी अडचणी आल्या कीच त्याला याद केले जाते, आपल्या आनंदाच्या क्षणी आपण त्याला अगदी सहज विसरतो असे जनरली दिसते! Smile

तात्या.

मस्त कविता

मस्त कविता . आवडली.